डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुक्त विचारांचं भय : कट्टर उजव्यांनी केलेलं कट्टर डाव्यांचं अनुकरण

एका गोष्टीचा उल्लेख मात्र करायलाच हवा, आपल्या देशाचा समकालीन इतिहासही हे दाखवून देतो की, कट्टर उजवे आणि कट्टर डावे यांच्या काही गुणवैशिष्ट्यांत खूप साधर्म्य आहे. अंतिम साध्य महत्त्वाचं, त्याकरता अनुसरलेले मार्ग महत्त्वाचे नाहीत, असं समर्थन डावे करतात. सत्तेत असलेल्या राजकर्त्यांनी नोकरशाही, न्यायवस्थेवर नियंत्रण ठेवावं, तसंच कुणी कोणती कादंबरी लिहावी, कोणतं गाणं गावं... कोणत्या घोषणा दिल्या जाव्यात, कोणत्या घोषणांवर बंदी असावी. या साऱ्यावर नियंत्रण ठेवण्याचं सामर्थ्य राज्यव्यवस्था आणि सत्ताधारी पक्षाकडे असावं, असंच त्यांना वाटतं. तर कट्टर उजव्यांनीही वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष केलं आहे आणि त्यांचा विश्वास असलेल्या आध्यात्मिक, अविवेकी विचारांनुसार ते काम करत आहेत. 

डोरा रसेल या ब्रिटिश स्त्रीवादी विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञाचं आत्मकथन मी सध्या वाचतो आहे. तीन खंडांत प्रकाशित झालेल्या या आत्मकथनातला पहिला खंड मी नुकताच वाचून पूर्ण केला आहे. या खंडात प्रामुख्याने वाचायला मिळतं ते तिच्या एडवर्डिय इंग्लंडमध्ये झालेल्या जडणघडणीबद्दल. याशिवाय केंब्रिज विद्यापीठातलं तिचं शिक्षण लिंगभाव समतेबाबत उत्तरोत्तर विकसित होत गेलेले तिचे विचार, तिनं स्थापन केलेली प्रयोगशील शाळा, अतिशय विद्वान आणि तितकाच वादग्रस्त ठरलेला तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेलसोबतचं सहजीवन हे सारं या खंडांत वाचायला मिळतं.

डोरा विशीत असतानाच बोल्शेविक क्रांती झाली होती. त्यामुळेच समकालीन विचारवंतांप्रमाणेच तीसुद्धा या क्रांतीमुळे खूप प्रभावित झाली होती. या क्रांतीचा नेमका काय परिणाम झाला आहे, याचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याकरता क्रांतीनंतर अवघ्या काही काळातच ती रशियाला गेली. 1918 -19 ची ती वर्षे होती. त्या वेळी झपाटलेल्या बोल्शेविकांशी बोलल्यानंतर तिला ख्रिस्ती धर्मअभ्यासकांची आठवण झाली. या धर्मअभ्यासकांना, त्यांनी कल्पना केलेलं जग देव साकारेल, असं वाटत असे. ती लिहिते, ‘अशा धार्मिक युटोपियनांप्रमाणे ‘हे लोक (रशियातील) जगाच्या नियंत्याचं, या विश्वाच्या निर्मात्याचं अनुकरण करत होते. त्या निर्मात्याने जसं सगळ्या ग्रहमालेला एका गतीत नियंत्रित केलं, तसंच हे लोक नवीन समाजाची विस्तृत रुपरेषा बनवतील, ही रुपरेषा औद्योगिक कार्यप्रणालीवर आधारित असेल. अशा समाजात काम करून आपलं योगदान देण्याकरता स्त्री आणि पुरुष दोहोंनाही स्थान असेल. एकदा का हे चक्र सुरू झालं तर ही नवी विवेकी व्यवस्था तिच्या अंगभूत गतीवर सुरू राहील.’

या काळातील सोव्हिएत रशियातील लोकांशी, बोल्शेविकांशी केलेल्या संवादामुळे डोरा प्रभावित झाली, मात्र त्यांच्या हटवादीपणामुळे काहीशी निराशही झाली. तिनं लिहून ठेवलं, ‘भविष्यात होऊ घातलेल्या साम्यवादी राज्यव्यवस्थेच्या निर्मितीसाठी, या विचारांचा प्रसार करणं कितीही आवश्यक असलं तरी हे विचार मला शत्रुभावी बनायला लावतात. हे भावनिकपणे आणि कट्टरपणे केलं जातं, या प्रक्रियेत संरचनात्मक विचारांपेक्षा हेटाळणी करण्याचं आवाहन आणि एक हिंसक झपाटलेपण आहे.’

रसेलच्या रशियाभेटीनंतर दशकभरानं रवींद्रनाथ टागोर रशियाला गेले. तिथल्या दोन आठवड्यांच्या वास्तव्यात त्यांनी शाळा, कारखान्यांना भेटी दिल्या तसंच विविध स्तरांतील लोकांशी संवाद केला. रशियातून निघण्यापूर्वी त्यांनी ‘इझवेस्तीया’ या तिथल्या सत्ताधारी पक्षाच्या वर्तमानपत्राला मुलाखत दिली. ज्या आत्मीयतयेनं सोव्हिएतनं शिक्षणाचा प्रसार केला, त्यांचं त्यांनी कौतुक केलं. सोबतच आणखी काही चिंताजनक पुस्ती जोडल्या. ‘तुम्ही तुमच्या आदर्शांचं पालन करता, ते वर्गद्वेषानं आणि संतापाच्या भावनेनं पेटून उठून करता ना? तुमचे विचार व कल्पना न मानणाऱ्या लोकांना शत्रू समजून तुम्ही हे करता ना? तुमच्या मार्गातल्या अडथळ्यांविरोधात तुम्ही लढलं पाहिजे, हे खरं आहे. आणि सभोवताली दुर्लक्ष करण्याची वृत्ती, सहअनुभूतीचा अभाव, सततची आडमुठी भूमिका या अडथळ्यांविरोधात तुम्ही लढा दिला पाहिजे. पण तुमचं हे काम तुमच्या पक्षापुरतं वा देशापुरतं सीमित राहता कामा नये. किंबहुना तुमच्या दृष्टिकोनानुसार हे अखिल मानवतेसाठीचं काम आहे, पण मानवतेमध्ये, तुमच्या ध्येयाविरोधी असलेल्या मतांना, विचारांना काहीच स्थान नसतं का?’

टागोरांच्या मते प्रगल्भ राजकीय व्यवस्थेत विरोधी विचारांना, त्याच्या मुक्त अभिव्यक्तीला स्थान असतं. मात्र राज्यव्यवस्थेअंतर्गत ‘जेव्हा आपली सगळीच मतं जबरदस्तीनं दडपली जातात, ती इतरांना आवडत नाहीत, तेव्हा ते चित्र फक्त नीरसच नसतं तर ते एक अजननक्षम (ज्यातून काही नवनिर्मितीच होणार नाही असं) आणि रटाळ- यांत्रिकही होऊन जातं.’ तुमच्या ध्येयात सर्वंकष मानवीयतेचा अंतर्भाव असेल तर विविध मत-मतातरांच्या अस्तित्वाचा आदर राखला जाईल. मतं, धारणा सतत बदलत असतात, ती सातत्यानं वाहणाऱ्या मुक्त बुद्धिजीवी प्रवाहांमुळे आणि बदलासाठी आवश्यक असलेल्या नैतिक बळामुळे. हिंसेने हिंसा वाढते आणि डोळ्यावर कातडी ओढून केला जाणारा मूर्खपणाही! सत्याचा स्वीकार करण्यासाठी विचारांचं  स्वातंत्र्य आवश्यक आहे, मात्र भयाचं वातावरण खूप निर्दयीपणे हे सगळं मारून टाकतं.

टागोरांची ही टिपण्णी विश्वभारतीनं त्याच वर्षी प्रकाशित केलेल्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. पी.सी.महालोनोबीस हे विख्यात शास्त्रज्ञही टागोरांसोबत त्या प्रवासाला गेले होते. या दोघांनी हे पुस्तक लिहिलं आहे. मात्र ‘इझवेस्तिया’नं टागोरांची ही मुलाखत त्यांच्या वार्षिकीत छापली, हे  एक आश्चर्यच आहे. कारण ‘इझवेस्तिया’  हे पक्षाचं मुखपत्र असल्यानं सोव्हिएत राज्यव्यवस्थेवरची टीका त्यांना छापता येणार नव्हती. साम्यवाद्यांच्या सूडबुद्धी तसेच शत्रूभावी वर्तन-व्यवहाराबाबत टागोरांनी नोंदवलेली निरीक्षणं हा अद्यापही साम्यवादी विचारसरणीबाबत कळीचा मुद्दा राहिला आहे.

आता पुन्हा डोरा रसेलकडे वळू. सोव्हिएत रशियाच्या प्रवासानंतर दोनच वर्षांनी ती चीनला गेली आणि तिथल्या कम्युनिस्ट पक्षाच्या नव्या कार्यकर्त्याशी तिनं संवाद केला. रशियन कॉम्रेडसपेक्षा यांच्यात वेगळं काय होतं, तर त्यांचा अधिकाधिक एककल्लीपणा नि हटवादीपणा. बीजिंगमध्ये राहणाऱ्या तिच्या एका मित्राला तिनं 1921 मध्ये पत्र लिहिलं. या पत्रात तिनं म्हंटलं आहे, ‘कम्युनिझमच्या सार्वभौमत्वासाठी पक्षाच्या बुद्धिजीवींची अनेक ध्येयं असू शकतात, पण रशिया आणि चीनमध्येही अद्याप हे सारं एखाद्या धर्मापेक्षा वेगळं नाही. एक धर्म म्हणून त्याचे अनेक फायदे असू शकतात, जसे ते राज्यव्यवस्थेत कोणत्याही धर्माला असतात. उदा., लोकांना एकत्र बांधून ठेवून, त्यांच्याकडून एकसमान सामूहिक वर्तन होत आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण करणे. पाश्चिमात्यांकडून पूर्वेला देणगी मिळतेय ती- बदलासाठी एक धर्मच बहाल करण्याच्या रुपात, हे पाहणं अचाट आहे.’  याच पत्रात पुढे ती म्हणते, ‘आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी बळाचा अन्याय्य वापर करणं गब्बर भांडवलशाहीवाद्यांपेक्षाही जास्त भयंकर आहे. विज्ञानाबद्दल खूप अभिमानाने बोलणाऱ्या या लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव पाहून माझं डोकं चक्रावून जातं.’

एका गोष्टीचा उल्लेख मात्र करायलाच हवा, आपल्या देशाचा समकालीन इतिहासही हे दाखवून देतो की, कट्टर उजवे आणि कट्टर डावे यांच्या काही गुणवैशिष्ट्यांत खूप साधर्म्य आहे. अंतिम साध्य महत्त्वाचं, त्याकरता अनुसरलेले मार्ग महत्त्वाचे नाहीत, असं समर्थन डावे करतात. सत्तेत असलेल्या राजकर्त्यांनी नोकरशाही, न्यायवस्थेवर नियंत्रण ठेवावं, तसंच कुणी कोणती कादंबरी लिहावी, कोणतं गाणं गावं... कोणत्या घोषणा दिल्या जाव्यात, कोणत्या घोषणांवर बंदी असावी. या साऱ्यावर नियंत्रण ठेवण्याचं सामर्थ्य राज्यव्यवस्था आणि सत्ताधारी पक्षाकडे असावं, असंच त्यांना वाटतं. तर कट्टर उजव्यांनीही वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष केलं आहे आणि त्यांचा विश्वास असलेल्या आध्यात्मिक, अविवेकी विचारांनुसार ते काम करत आहेत.

उजव्या आणि डाव्या विचारसरणीमधल्या काही समांतर गोष्टींचा अतिशय उत्तमप्रकारे वेध घेण्याचं काम फ्रेंच इतिहासकार फ्रँकॉइस (फ्रांझ्वा) फ्युरे यानं त्यांच्या ‘पासिंग ऑफ ॲन इल्युजन’ या पुस्तकात केलं आहे. फ्युरे लिहितो, ‘जसे समाजवादी लोक अस्तित्वात होते, तसेच राष्ट्रीय समाजवादीही अस्तित्वात होते. त्यांच्याव्यतिरिक्त वा त्या कक्षेबाहेरचा माणूस जणू सामाजिकतेविरोधीच होता. त्या लोकांमधल्या एकतेचा सतत उदो उदो केला जायचा आणि सार्वजनिकपणे ती एकता ठसवली जायची.

विचारसरणीच्याही पलीकडे जाऊन पाहिलं तर हुकूमशाही वृत्तीचा एक सर्वशक्तिमान नेता हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे लोकांवर पक्ष आणि राज्यव्यवस्थेशी सातत्यानं जोडलेलं असणं, सक्तीचं होतं. ज्या लोकांना या नेत्यांचे विचार पटत नसत आणि यांची अमर्याद एकाधिकारशाही सत्ता मान्य नसे, अशा लोकांना हे नेते शत्रूच्या गोटात लोटत असत. लेनिनसारख्या हुकूमशहासाठी असे लोक ‘बूर्झ्वा’ होते, तर हिटलरसाठी ‘ज्यू’. सामान्य लोकांनी नेहमीच या घटकांच्या अस्तित्वाबद्दल दक्ष असावं, असं या सत्ताधीशांना वाटे आणि आपली हुकूमशाही सत्ता अबाधित राहावी, यासाठी ते त्यांच्या (बूर्झ्वा, ज्यू) अस्तित्वाचा बागुलबुवा सतत सामान्य लोकांना दाखवत असत.

फ्युरे पुढे लिहितो, फॅसिझम आणि त्याचप्रमाणे कम्युनिझमने आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करताना अनेक अनैतिक आणि हिंसक मार्गांचा वापर केला. ‘तुमच्या नागरिकांना तुम्ही युद्धातल्या शत्रूसारखं मारू शकता, अशी लेनिन आणि हिटलरची धारणा होती. त्यासाठी या नागरिकांनी केवळ चुकीच्या वर्गातलं असणं किंवा विरोधी पक्षाचं असणं पुरेसं होतं. या हुकूमशहांनी समाजातील न्याय्य आणि शांततापूर्ण वर्तनाच्या ‘औपचारिकरीत्या’ केलेल्या धिक्काराचं पर्यावसान खरोखरीच अनिर्बंध सत्ता आणि लोकांच्या मनावर दहशत गाजवण्यात झालं.’  

फ्युरेच्या पुस्तकात प्रामुख्यानं दोन महायुद्धांदरम्यानचा युरोप दिसतो. अर्थात त्यामुळेच लेनिन आणि हिटलरमधलं साम्यही! आशिया खंडात, भविष्यातील- युद्धोतर इतिहासकारालाही चीनमधील कम्युनिझमचा उदय आणि भारतातील एकाधिकारशाही हिंदुत्ववादी राजवट या दोहोंत अशी काही साम्यं दिसू शकतात, विशेषत: माओ आणि मोदी यांच्या लाटेतली साम्यं. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला इथे पक्षीय राज्यव्यवस्था निर्माण करायची आहे. त्यांनी, एकच- थोर आणि कोणत्याही उणिवा नसलेल्या मोठ्या नेत्याचं नेतृत्व, असा पायंडा अतिशय विषारी पद्धतीनं पाडला आहे. विरोधी पक्ष तसंच त्यांच्या टीकाकारांना ते मोडीत काढतात आणि ठराविक काळानं, ‘पंतप्रधानांची हत्या करण्याचा कट रचला जातोय,’ अशी आवई उठवतात, तसा प्रोपगंडा करतात. यातली सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे चीनमध्ये हान समूहाला जसं कम्युनिस्टांनी दडपलं, तसं आता भारतात मुस्लिमांना दडपलं जात आहे.

कट्टर डाव्या आणि कट्टर उजव्यांपैकी कोणीही कधीच या सगळ्याची दखल घेत नसले तरी, या दोहोंमध्ये एक युती मात्र निश्चित असते. आता डोरा रसेलचंच हे उदाहरण पहा, ‘भविष्यात साम्यवादी राज्यव्यवस्था आणण्यासाठी या विचारसरणीचा प्रसार-प्रचार करण्याची आवश्यकता असली तरी हे सगळं अतिशय भावनिकरीत्या आणि कट्टरपणे केलं जातं, ज्यामध्ये संरचनात्मक विचारांपेक्षा भवतालाची हेटाळणी करण्याचं आवाहन आणि एक हिंसक झपाटलेपण आहे. हे सारं मुक्त बुद्धिप्रामाण्य आणि त्यानुसार केल्या जाणाऱ्या कृतिकार्यक्रमांवर अंकुश ठेवणारं आहे.’ वरील विधानात ‘साम्यवाद’ या शब्दाच्या जागेवर ‘हिंदुत्ववाद’ हा शब्द ठेवून बघा, मग तुम्हाला आज रा.स्व.संघ आणि भाजप भारतात काय करू पाहत आहेत, याचं एकदम चपखल आणि टोकदार चित्र दिसेल. 

(अनुवाद : प्रियांका तुपे)

Tags: प्रियांका तुपे उजवे डावे विचारवंत स्त्री स्त्रीवाद डोरा रसेल dora russell weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके