डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

नयनतारा सहगल : उदात्त मूल्यांचे मूर्तीमंत रूप

येत्या 10 मे रोजी नयनतारा सहगल 95 वर्षांच्या होतील. त्यांना वाढदिवसाच्या ‘शुभेच्छा’ देण्यासारखा सध्याचा काळ नाही. त्यामुळे निव्वळ त्या जशा आहेत त्याबद्दल त्यांचे आभार मी मानू इच्छितो. लेखिका व नागरिक असणाऱ्या नयनतारा सहगल म्हणजे आपल्या प्रजासत्ताकातील उदात्त मूल्यांचं मूर्त रूप आहेत. महात्मा गांधींचं आयुष्य आणि मृत्यू सहगल यांनी पाहिला आहे. त्यांच्या बहुतांश कृतींमागची प्रेरणासुद्धा गांधींची आहे. मी केवळ अभ्यासक म्हणून गांधींना ओळखतो. गांधींचं लेखन आणि अभिलेखागारातील दस्तावेज हाच या ओळखीचा दुवा आहे. पण नयनतारा सहगल यांच्यासारख्या भारतीयांशी असणारा वैयक्तिक परिचय मला माझ्या कामासाठी व लेखनासाठी ऊर्जा पुरवत राहतो. 

1 फेब्रुवारी 1948 रोजी एका 20 वर्षीय भारतीय तरुणीने तिच्या आईला पत्र लिहिलं. या तरुणीचे वडील त्या वेळी हयात नव्हते. अमेरिकेतील वेलेस्ली कॉलेजातून पदवी मिळवून ही तरुणी नुकतीच दिल्लीत परतली होती आणि तिची आई तत्कालीन सोव्हिएत संघातील मॉस्कोमध्ये भारताची राजदूत म्हणून कार्यरत होती. गांधीहत्येची बातमी ऐकल्यानंतर 30 जानेवारीला संध्याकाळी ही मुलगी तातडीने बिर्ला हाऊसला गेली. तिथे तिने बापूंचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहिला. ‘इतक्या बिकट क्षणीसुद्धा आम्ही आशा सोडली नव्हती. काही तरी चमत्कार घडून बापू पुन्हा जिवंत होतील, असं आम्हाला वाटत होतं. त्यांच्या बाबतीत असे चमत्कार घडणं शक्य वाटायचं,’ असं तिने गांधीहत्येनंतर दोन दिवसांनी आईला पाठवलेल्या पत्रात लिहिलं होतं.

ती पत्रात पुढे लिहिते, ‘बापूंना गोळी घालण्यात आल्याची जाणीव सतत होतेय. का कुणास ठाऊक, पण त्याचा विसरच पडत नाही. मारेकरी पकडला गेला, पण इतरही लोक यात सहभागी असणारच. या देशाला कोणत्या वेडाने पछाडलं आहे, आणि आता बापू गेल्यावर हे वेड आटोक्यात येण्याची आशा आहे का?’

ही तरुणी पत्र लिहीत असतानाच स्वतःच्या वयाला साजेसं वागली आणि दुःख व यातना यांचं रूपांतर तिने निश्चयामध्ये केलं. ‘आपण बापूंच्या जाण्यावर असा शोक केल्याचं त्यांना आवडलं नसतं. आपल्या शरीराचं असणं अथवा नसणं फारसं महत्त्वाचं नाही, असं त्यांना वाटलं असतं. त्यामुळे ते कशा रितीने जगले, ते काय बोलले, याला आपण महत्त्व द्यायला हवं. ते इतका दीर्घ काळ आपल्या सोबत राहिलेले असल्यामुळे आता ते आपल्याला पूर्णपणे कधीच सोडून जाणार नाहीत,’ असं तिने आईला सांगितलं.

या पत्राचा चिंतनशील शेवट असा- ‘कदाचित आता आपण मोठं व्हायला हवं आणि या देशव्यापी वेडामुळे आपण कुठे येऊन ठेपलोय याचा विचार करायला हवा, अशी ईश्वराची इच्छा असावी. आता आपण आधीसारखे बापूंपाशी जाऊन विचारणा करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला स्वतःच्याच अंतरात्म्यामध्ये शोध घ्यावा लागेल, स्वतःच स्वतःसाठी प्रार्थना करावी लागेल आणि स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावे लागतील.’

या पत्राची लेखिका कोण आहे आणि पत्र कोणाला उद्देशून लिहिलेलं आहे, याची कल्पना आधुनिक भारतीय साहित्याच्या व आधुनिक भारतीय इतिहासाच्या विद्यार्थ्यांना आली असेलच. हे पत्र लिहिणारी तरुणी म्हणजे पुढे जाऊन ख्यातनाम कादंबरीकार झालेल्या नयनतारा सहगल (पूर्वाश्रमीच्या पंडित). तर, तिची आई म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये तुरुंगवास भोगलेल्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात मॉस्को, वॉशिंग्टन व लंडन इथे राजदूत म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या विजयालक्ष्मी पंडित (पूर्वाश्रमीच्या नेहरू).

मी डेहराडूनमध्ये लहानाचा मोठा झालो. विजयालक्ष्मी पंडित निवृत्तीनंतर याच शहरात स्थायिक झाल्या होत्या. मी कधी त्यांना पाहिलं नाही- आमची सामाजिक स्थानं खूपच भिन्न होती, आणि माझ्या आईवडिलांच्या घरापासून बरंच दूर, खोऱ्याच्या दुसऱ्या टोकाला पंडित यांचं निवासस्थान होतं. पण 1977 साली मार्चच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली विद्यापीठातील एका राजकीय सभेमध्ये त्यांचं भाषण मला ऐकायला मिळालं. त्या काळी मी तिथे शिकत होतो. आणीबाणी नुकतीच उठवण्यात आली होती आणि नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाचं समर्थन करण्यासाठी श्रीमती पंडित विद्यापीठातील सभेमध्ये आल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या त्यांची भाची असूनसुद्धा कौटुंबिक निष्ठा बाजूला ठेवून पंडित यांनी संविधानाशी असलेली बांधिलकी सर्वोच्च मानली.

माझ्या आईवडिलांनी 1984 साली डेहराडून सोडलं. आठ वर्षांनी मी वैयक्तिक कामासाठी कारने दिल्लीहून डेहराडूनला गेलो. त्या वेळी माझ्या सोबत भारतातील पेट्रोकेमिकल उद्योगाच्या उभारणीमध्ये मोलाची भूमिका निभावणारे प्रशासकीय अधिकारी लोवराज कुमार होते. रूरकीमध्ये आम्ही पोलारीस नावाच्या एका हॉटेलात कॉफी प्यायला थांबलो. तिथे नुकतीच साठीत प्रवेश करती झालेली एक लक्षणीय सुंदर स्त्री मला दिसली. त्या नयनतारा सहगल होत्या. लोवराज कुमार आणि त्यांची मुंबईत राहत असतानाची जुनी ओळख निघाली. सहगलसुद्धा डेहराडूनमध्ये स्थायिक झाल्याचं गप्पांमधून कळलं. त्या वेळी त्या दिल्लीला जात होत्या आणि आमच्यासारख्याच कॉफी प्यायला त्या हॉटेलात थांबल्या होत्या.

कादंबऱ्यांव्यतिरिक्त नयनतारा सहगल यांनी काही महत्त्वाचं कल्पितेतर (नॉन-फिक्शन) स्वरूपाचं साहित्यसुद्धा लिहिलं आहे. उच्चवर्गीय राष्ट्रवादी कुटुंबात लहानाचं मोठं होतानाचे अनुभव सांगणारं ‘प्रिझन अँड चॉकलेट केक’ हे मनमोहक पुस्तक; त्यांचे दुसरे पती ई. एन. मंगत राय यांच्याशी झालेल्या त्यांच्या पत्रव्यवहाराचं भावूक करणारं पुस्तक; आणि इंदिरा गांधींच्या राजकीय शैलीचा मर्मग्राही अभ्यास करून लिहिलेलं पुस्तक (जे मलाही माझ्या कामासाठी अत्यंत उपयोगी पडलं)- ही त्यांच्या कल्पितेतर साहित्यातील काही लक्षणीय पुस्तकं आहेत.

लेखिका म्हणून ‘नयनतारा सहगल’ यांच्याबद्दल मला आदर वाटतो आणि माणूस म्हणून ‘तारा’ यांच्याबद्दल मला आदर वाटतो. पोलारीस हॉटेलात झालेल्या पहिल्या भेटीमध्ये आम्ही परस्परांशी अगदीच जेमतेम बोललो असू (आमच्या वयांतील आणि सामाजिक स्थानांतील अंतरामुळे मी दबून गेले होतो). परंतु, नंतरच्या वर्षांमध्ये माझी त्यांच्याशी चांगली ओळख होत गेली. आम्ही साहित्य संमेलनांमध्ये आणि डेहराडूनच्या माझ्या फेऱ्यांमध्ये भेटत राहिलो, समकालीन घडामोडींबाबत व इतर विषयांबाबत आम्ही परस्परांना ई-मेल करत राहिलो आणि वेळोवेळी फोनवरूनसुद्धा बोलणं होत राहिलं. प्रत्येक भेटीनंतर त्यांच्याविषयी मला वाटणारं ममत्व आणि आदराची भावना अधिकाधिक सखोल होत गेली. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये डौल व धैर्य यांचा, आणि आत्मसन्मानाची भक्कम जाणीव व त्यांच्यापेक्षा असुरक्षित स्थितीत जगणाऱ्यांविषयीची मूलगामी करुणा यांचा दुर्मिळ संगम झालेला आहे.

आमच्या या मैत्रीच्या प्रवासामध्ये नयनतारा सहगल यांनी मला बरंच काही दिलं आणि मी मात्र त्यांना फारसं काही दिलेलं नाही. त्यांचे वडील आणि विलक्षण विद्वान व देशभक्त रणजीत सीताराम पंडित यांच्याशी संबंधित दस्तावेजांचे मला सापडलेले अंश तेवढे मी त्यांना देऊ शकलो. नयनतारा अवघ्या सोळा वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या वेगळेपणाचे काही दाखले असे: काँग्रेसचे बहुतांश नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वैरभाव राखून असताना रणजीत पंडित मात्र त्यांच्याविषयी कौतुकादराची भावना राखून होते. पंडित यांनी आंबेडकरांना भेटण्याचाही प्रयत्न केला होता. अशी भेट झाली असती तर, त्यांच्यातलं संभाषण सहजपणे इंग्रजीतून दोघांची मातृभाषा असणाऱ्या मराठीमध्ये फिरतं राहिलं असतं (असा विचार करायला मला आवडतं). मीरत कट खटल्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या साम्यवाद्यांच्या बचावासाठी निधी उभारण्याकरता मदत करावी म्हणून रणजीत पंडित यांनी त्यांचे सासरे मोतीलाल नेहरू व मेहुणे जवाहरलाल नेहरू यांचं मन वळवलं होतं. या खटल्यातील एक कैदी मुझफ्फर अहमद यांनी रणजीत पंडित यांचं वर्णन ‘विशाल व उदार सहानुभूती राखणारा मनुष्य’ असं केलं होतं.

रणजीत पंडित यांच्या मुलीलासुद्धा हेच वर्णन तंतोतंत लागू पडतं. उजव्या संघटनांकडून वाढत्या संख्येने होणाऱ्या द्वेषमूलक गुन्ह्यांचा निषेध करण्यासाठी नयनतारा सहगल यांनी 2015 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला. ‘भारत उलटा प्रवास करतो आहे. सांस्कृतिक वैविध्याचा व वादविवादाचा आपला महान विचार नाकारला जातो आहे आणि हिंदुत्व या रचलेल्या गोष्टीपुरतं सगळं संकुचित केलं जातं आहे’, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. ‘देशाचे पंतप्रधान हे संभाषणाची समज असलेले राजकीय नेते आहेत, पण लेखकांच्या हत्या होत असताना आणि झुंडींकडून मुस्लिमांचे जीव घेतले जात असताना मात्र ते मौन धारण करून आहेत,’ असं सहगल म्हणाल्या होत्या. ‘पंतप्रधानांना त्यांच्या विचारसरणीचं समर्थन करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींपासून अंतर राखायचं नाही, हे यावरून स्पष्ट होतं.’ (https://www.livemint.com/P o l i t i c s / z O N Z f H U A f E n 1 I x 0 J h Q A h N P /Nayantara-returns-Sahitya-Akademi-Awardprotests-rising-int.html)

सहगल यांनी केलेल्या निषेधानंतर भाजपच्या ‘ट्रोल-धाडी’ने त्यांच्यावर रानटीपणे हल्ला चढवला. काही संधिसाधू पत्रकारांनीसुद्धा या भाजपसमर्थकांशी हातमिळवणी केली. सहगल या इंदिरा गांधींची आत्तेबहीण आहेत व नेहरूंची भाची आहेत, त्यामुळे त्यांची टीका अवैध ठरते, असे दावे या मंडळींनी केले. वास्तविक 1970च्या दशकामध्ये इंदिरा गांधींची एकाधिकारशाही प्रवृत्ती समोर येत होती, तेव्हा त्यावर नयनतारा सहगल यांनी टीका केली होती आणि व्यक्तीशः त्यांना या भूमिकेमुळे जाचही सहन करावा लागला. मामा पंडित नेहरू यांची हिंदू-मुस्लीम सौहार्दाबाबतची तत्त्वनिष्ठ बांधिलकी सहगल यांच्या व्यक्तिमत्वाला निःसंशयपणे आकार देणारी ठरली, पण महात्मा गांधी यांच्या जीवनाचा त्यांच्या जीवनदृष्टीवर त्याहून मोठा प्रभाव पडला आहे, असं मला वाटतं.

डेहराडूनमध्ये राजपूत मार्गाच्या वरच्या बाजूला विजयालक्ष्मी पंडित यांनी बांधलेल्या घरातच नयनतारा सहगल राहतात. माझ्या मागच्या फेरीत मी त्यांना तिथेच भेटलो. काही वर्षांपूर्वी त्यांना गंभीर स्वरूपाचा कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. नंतर त्या या आजारपणातून बाहेर आल्या आणि पुन्हा कल्पित साहित्यनिर्मितीकडे वळल्या. शिवाय, हिंदुत्ववाद्यांच्या वाढत्या धर्मांधतेमुळे भारतीय प्रजासत्ताकापुढे धोका निर्माण झाल्याचं त्या सातत्याने बोलत आल्या आहेत. तर, मागच्या भेटीत माझ्या या ज्येष्ठ मैत्रिणीचा निरोप घेताना मला अचानक तिच्या सुरक्षिततेविषयी काळजी वाटू लागली. त्या वेळी त्यांनी नव्वदीत प्रवेश केला होता. कॅन्सरवर मात करून त्या पुन्हा उभ्या राहिल्या होत्या. फारशी गर्दी नसणाऱ्या आणि रात्री अगदीच काळोख्या वाटणाऱ्या रस्त्यावरच्या घरात त्या एकट्याच राहत होत्या. सध्याची राजवट सूड उगवणारी आणि गुंडगिरी करणारी मानली जाते. ‘तारा, स्वतःची काळजी घ्या, तब्येतीला जपा’, असं मी त्यांना म्हटलं. त्यावर त्या म्हणाल्या, ‘मला आजारी पडायला वेळच नाहीये. ही आजारी पडण्याची वेळच नाहीये.’

येत्या 10 मे रोजी नयनतारा सहगल पंच्याण्णव वर्षांच्या होतील. त्यांना वाढदिवसाच्या ‘शुभेच्छा’ देण्यासारखा सध्याचा काळ नाही. त्यामुळे निव्वळ त्या जशा आहेत त्याबद्दल त्यांचे आभार मी मानू इच्छितो. लेखिका व नागरीक असणाऱ्या नयनतारा सहगल म्हणजे आपल्या प्रजासत्ताकातील उदात्त मूल्यांचं मूर्त रूप आहेत. गांधींचं आयुष्य आणि मृत्यू सहगल यांनी पाहिला आहे. त्यांच्या बहुतांश कृतींमागची प्रेरणासुद्धा गांधींची आहे. मी केवळ अभ्यासक म्हणून गांधींना ओळखतो. गांधींचं लेखन आणि अभिलेखागारातील दस्तावेज हाच या ओळखीचा दुवा आहे. पण नयनतारा सहगल यांच्यासारख्या भारतीयांशी असणारा वैयक्तिक परिचय मला माझ्या कामासाठी व लेखनासाठी ऊर्जा पुरवत राहतो.

(अनुवाद - प्रभाकर पानवलकर)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके