डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

नरेंद्र मोदींच्या चीनविषयक धोरणात नेहरूंचे प्रतिध्वनी

खरे पाहता, परदेशी धोरणांचे वैयक्तिकीकरण करण्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरूंना मागे टाकले आहे, हे इथपर्यंतचा हा माझा लेख वाचून लक्षात येते. भारतीय आणि चिनी नागरिकांमधील नाते अधोरेखित करताना जिनपिंग यांच्याविषयी मोदी ज्या भावनिक पातळीवर येऊन बोलले, तसे अध्यक्ष माओ यांच्याविषयी नेहरू कधीही बोलले नाहीत. इथे हे नोंदविणे आवश्यक आहे की,  2018 मध्ये आपल्या पंतप्रधानांच्या वुहान येथील त्या भावनिक भाषणाला चीनच्या अध्यक्षांनी विडंबनात्मक प्रतिसाद देताना म्हटले होते, ‘पंतप्रधान मोदींना भेटून मी खूप खूश झालो आहे. वसंत ऋतू भेटीगाठींसाठी चांगलाच असतो.’ हे खरेच आहे. वसंत ऋतू हा भारतीय नेत्याला चीनमध्ये भेटण्यासाठी चांगला असतो आणि उन्हाळा त्याच भारताची काही जमीन हिसकावून घेण्यासाठी अधिक चांगला असतो.

चीनविरुद्ध लडाखमध्ये नुकत्याच झालेल्या संघर्षात किमान वीस भारतीय जवान दुःखदरीत्या मारले गेले. या घटनेचा विचार करता, भारत सरकारच्या चीनविषयीच्या धोरणाचा आढावा घ्यायला हवा. चीनसोबतच्या लष्करी आणि आर्थिक डावपेचांच्या संबंधांविषयी मी काहीही भाष्य करण्याऐवजी, त्या-त्या क्षेत्रांतील तज्ज्ञांवर ती बाब सोडून देतो. पण एक इतिहासकार म्हणून इथे लिहीत असताना, आपले पहिले पंतप्रधान आणि विद्यमान पंतप्रधान यांच्या चीनविषयीच्या धोरणांमधील औत्सुक्यपूर्ण समांतर रेषा अधोरेखित करून दाखवू इच्छितो.

राजकीय विचारसरणीच्या दृष्टीने जवाहरलाल नेहरू एक टोकावर तर नरेंद्र मोदी दुसरे टोकावर आहेत हे सर्वज्ञात आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याप्रति नेहरूंची बांधिलकी किंवा वैज्ञानिक संशोधन आणि तांत्रिक शिक्षणाच्या बाबतीत नेहरूंना असणारा रस मोदींना नाही. तसेच टीकाकारांकडे पाहण्याचा मोदींचा दृष्टिकोन हा नेहरूंपेक्षा किती तरी कठोर आहे.

तरीही या सर्व वेगळेपणासह नेहरू आणि मोदी यांच्यात, भारताच्या सर्वांत मोठ्या आणि शक्तिमान शेजारी राष्ट्राला भिडण्याच्या पद्धतीमध्ये कमालीचे साधर्म्य आहे. कम्युनिस्ट (साम्यवादी) चीनच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत वैयक्तिक मैत्रीचे संबंध प्रस्थापित केल्याने दोन्ही देशांतील लोकांमध्ये एकात्मतेची भावना रुजेल, असे आपल्या पहिल्या पंतप्रधानांप्रमाणेच विद्यमान पंतप्रधानांनादेखील वाटले.

पूर्वी 1954 मध्ये माओ झेडाँग आणि चौ एन लाय यांच्याशी चर्चा करण्यासाठी जवाहरलाल नेहरू चीनला गेले होते. तेव्हा नेहरूंची खुशामत करण्यासाठी यजमानांनी दहा लाख नागरिकांना स्वागतासाठी बीजिंगच्या रस्त्यावर उतरवले. याचा परिणाम म्हणून ‘मला इतका लोकविलक्षण भावनिक प्रतिसाद चिनी नागरिकांकडून मिळाला की, मी चकितच झालो’ असे मित्रास लिहून कळवणे नेहरूंना भाग पडले.

चीनहून परत आल्यानंतर नेहरूंनी कलकत्ता येथील मैदानावर एका मोठ्या सार्वजनिक सभेला संबोधित केले. तेव्हा त्यांनी जमलेल्या श्रोत्यांना सांगितले की, ‘चीनच्या नागरिकांना युद्ध नको आहे.’ वरवर पाहता, चिनी लोक त्यांचा देश एकसंध बांधण्यात आणि त्याला गरिबीतून बाहेर काढण्यात व्यग्र होते. चीनमध्ये झालेल्या भव्य स्वागताबद्दल बोलताना नेहरू पुढे म्हणाले, ‘काही तरी विशेष क्षमता असणाऱ्या जवाहरलालचे ते स्वागत नव्हते, तर ते स्वागत भारताच्या पंतप्रधानाचे होते. भारताच्या पंतप्रधानाचे- ज्या देशाविषयी चीनमधील नागरिकांच्या हृदयात उदंड प्रेम आहे व ज्याच्याशी त्यांना कायम मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत.’

आपल्या विद्यमान पंतप्रधानांनी हे भाषण वाचले वा ऐकले असण्याची शक्यता नाही. तरीही एप्रिल 2018 मध्ये क्षी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीनंतर नरेंद्र मोदी यांनी वुहानमध्ये केलेल्या भाषणामध्ये उमटलेला, नेहरूंच्या त्या भाषणाचा प्रतिध्वनी लक्ष वेधून घेणारा होता. इथे मोदींनी प्रभावीपणे चीनच्या नेत्यास संबोधित करताना म्हटले, ‘अनौपचारिक शिखर परिषदेच्या निमित्ताने इथे खूपच सकारात्मक वातावरणनिर्मिती करण्यात आली आणि तुम्ही वैयक्तिकरीत्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिलेले आहे. चीनमध्ये माझा पाहुणचार करण्यासाठी तुम्ही दोन वेळा बीजिंगच्या बाहेर पडलात, हे तुम्हाला भारताविषयी वाटणाऱ्या आपुलकीचेच प्रतीक आहे. मी भारताचा असा पहिला पंतप्रधान आहे, ज्याच्या स्वागतासाठी तुम्ही तुमच्या राजधानीमधून दोन वेळा बाहेर पडला आहात. या गोष्टीचा भारतीय नागरिकांना खरेच खूप अभिमान आहे.’ पुढे प्रस्तुत दोन देशांतील अतूट बंधनाविषयीची काव्यमय बंदिश रचली गेली, जेव्हा मोदींनी सांगितले की, भारत आणि चीन या दोन्ही संस्कृती या नदीच्या काठावर कशा वसलेल्या आहेत आणि दोन हजार वर्षांपैकी 1600 वर्षें भारत आणि चीनने जागतिक आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून कसे काम केले आहे. (https://timesofindia.indiatimes.com/india/im-first-indian-pm-you-came-out-of-beijing-to-receive-pm-narendra-modi-to-xi-jinping-in-wuhan/articleshow/63940029.cms)

वुहानमधील भेट होण्याआधी पंतप्रधान मोदी आणि क्षी जिनपिंग यांची सप्टेंबर 2014 मध्ये अहमदाबाद इथे एक भेट झाली. त्या वेळी साबरमती नदीच्या काठावर खास बांधून घेतलेल्या झोपाळ्यावर बसून दोन्ही नेत्यांनी चर्चा केली होती. त्यानंतरच्या मे महिन्यात भारताचे पंतप्रधान म्हणून मोदी पहिल्यांदा चीनला गेले. तिथे शांघायमध्ये बोलत असताना जिंगपिंग यांच्यासोबत मैत्रीचे संबंध गृहीत धरून ते म्हणाले, ‘दोन देशांचे प्रमुख इतक्या आत्मीयतेने, जवळिकीने आणि साहचर्याने भेटत आहेत, हे ‘प्लस वन’ आहे. जागतिक संबंधांच्या पारंपरिक चर्चेपेक्षा हे अधिक चांगले आहे आणि ही ‘प्लस वन’ मैत्री समजून घ्यायला व वाखाणण्यासाठी अनेकांना बराच वेळ लागेल. (https://www.dnaindia.com/india/report-my-friendship-with-xi-is-plus-one-pm-modi-2086471)

मोदींची नजीकच्या भूतकाळात जिनपिंग यांच्याशी भेट झाली ती ऑक्टोबर 2019 मध्ये महाबलीपुरम इथे. त्यानंतर भारत सरकारच्या वेबसाईटवर या दोन नेत्यांचे काही फोटो प्रदर्शित करण्यात आले. त्या फोटोंसोबत देण्यात आलेला मजकूर असा होता, ‘सातव्या शतकातील दगडी स्मारके व शिल्पांच्या सान्निध्यात...’ भारत आणि चीनचे हे दोन नेते नारळाचे पाणी प्यायले आणि भारत व चीन या देशांतील संबंध एक नवा पुढचा टप्पा गाठतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यामध्ये दोन्ही देशांचा बरोबरीचा सहयोग असेल, एकमेकांविषयी अधिक विश्वास असेल आणि एकमेकांच्या फायद्याचा व आकांक्षांचा विचार असेल. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असलेल्या महाबलीपुरम इथे प्राचीन दगडी शिल्पे दाखवण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊन गेले आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था समुद्रकिनारी निसर्गरम्य मंदिरात केली होती. या वेळी या दोन्ही नेत्यांमध्ये एक चांगले नाते प्रस्थापित झाल्याचे दिसून आले.  (https://www.indiaperspectives.gov.in/en_US/the-chennai-connect/).

पंतप्रधानांच्या वैयक्तिक वेबसाईटवरही एक छोटेखानी लेख आला होता. त्या लेखामध्ये दोन नेत्यांच्या या भेटीमुळे भारत-चीन नातेसंबंधांना चालना मिळेल; याचा फायदा आपल्या देशातील आणि पर्यायाने जगातील लोकांना होईल, असा दावा करण्यात आला होता. (https://www.narendramodi.in/chennai-connect-begins-a-new-era-of-cooperation-in-india-china-relations-says-prime-minister-narendra-modi-546848).

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून मागील सहा वर्षांत मोदी आणि जिनपिंग किमान 18 वेळा तरी भेटले असतील. हे ‘वुहान स्पिरिट’ आणि ‘चेन्नई कनेक्ट’सारखे देखावे म्हणजे ‘हिंदी-चिनी भाई भाई’चीच पुढची आवृत्ती ठरली. भारताचे पंतप्रधान व चायनीज कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष एकमेकांचे मित्र होऊ शकतात आणि मग प्रस्तुत देशांच्या नागरिकांमध्येही मैत्रीचे संबंध निर्माण होऊ शकतात, असा युक्तिवाद करण्यात आला. पण चीनच्या हेतूंवर भाबडा विश्वास ठेवणे मुळातच चुकीचे आहे, हे नरेंद्र मोदी यांना आता उशिराने लक्षात आलेले आहे, जे जवाहरलाल नेहरूंना पूर्वीच लक्षात आले होते.

सप्टेंबर 1959 मध्ये चिनी आणि भारतीय जवानांमध्ये संघर्ष झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते दीनदयाळ उपाध्याय यांनी नेहरूंच्या अपयशी ठरलेल्या चीनविषयक धोरणांबाबत एक लेखमाला लिहिली होती. त्यात उपरोधाने उपाध्याय लिहितात, ‘फक्त त्यांना (नेहरूंना) ठाऊक असते की, संकट हे कधी संकट नाही’ आणि ‘आगीशिवाय धूर कसा काढायचा व शब्दांच्या धबधब्यामध्ये वणवा कसा कैद करायचा, हेदेखील फक्त तेच (नेहरूच) जाणतात.’ जनसंघाच्या त्या नेत्याच्या मते, ‘सद्य परिस्थिती ही पंतप्रधानांच्या आत्मसंतुष्टतेचा परिपाक आहे. ते कारवाई करण्यास टाळाटाळ करत राहिले आणि परिस्थिती आणखी गंभीर होत गेली.’ नेहरूंचे चीनविषयीचे धोरण अपयशी का ठरले, असे विचारताना उपाध्याय म्हणतात, ‘हे स्पष्ट अज्ञान आहे, शुद्ध भ्याडपणा आहे, की कमजोर लष्कर, वैचारिक अस्पष्टता आणि राष्ट्रप्रेमात झालेली घट यातून प्रेरित झालेले राष्ट्रीय धोरण यास कारणीभूत आहे?’ (वरील संदर्भ ‘ऑर्गनायझर’ मधील 7, 14 आणि 21 सप्टेंबर 1959 या तारखांच्या उपाध्याय यांच्या लेखांमधून घेतले आहेत.)

नरेंद्र मोदींच्या मनात दीनदयाळ उपाध्यायांविषयी आदर आहे, हे तर सिद्धच आहे. पण आज उपाध्याय हयात असते तर, त्यांनी चिनी सैनिकांनी केलेल्या घुसखोरीविषयी आणि भारतीय सैनिकांच्या मरणाविषयी तसे लिहिले असते का? यासाठी त्यांनी पंतप्रधानांच्या अज्ञानाला, आत्म-संतुष्टतेला किंवा भ्याडपणाला जबाबदार धरले असते- की त्याऐवजी कमजोर लष्कराला आणि वैचारिक अस्पष्टतेला?

खरे पाहता, परदेशी धोरणांचे वैयक्तिकीकरण करण्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरूंना मागे टाकले आहे, हे इथपर्यंतचा हा माझा लेख वाचून लक्षात येते. भारतीय आणि चिनी नागरिकांमधील नाते अधोरेखित करताना मोदी हे जिनपिंग यांच्याविषयी ज्या भावनिक पातळीवर येऊन बोलले, तसे अध्यक्ष माओ यांच्याविषयी नेहरू कधीही बोलले नाहीत.

इथे हे नोंदविणे आवश्यक आहे की, 2018 मध्ये आपल्या पंतप्रधानांच्या वुहान येथील त्या भावनिक भाषणाला चीनच्या अध्यक्षांनी विडंबनात्मक प्रतिसाद देताना म्हटले होते, ‘पंतप्रधान मोदींना भेटून मी खूप खूश झालो आहे. वसंत ऋतू भेटीगाठींसाठी चांगलाच असतो.’ हे खरेच आहे. वसंत ऋतू हा भारतीय नेत्याला चीनमध्ये भेटण्यासाठी चांगला असतो आणि उन्हाळा हा त्याच भारताची काही जमीन हिसकावून घेण्यासाठी अधिक चांगला असतो.

1959 मध्ये झालेल्या संघर्षांतून पुढे तीन वर्षांचे संपूर्ण युद्ध जन्माला आले. आता तसे होण्याचा संभव नाही, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब आहे. आपल्या शक्तिमान आणि बेभरवशाच्या शेजारी देशासोबत निर्माण झालेला हा तणाव आपल्या प्रजासत्ताक इतिहासामधली सर्वांत वाईट वेळ साधून आलेला आहे. आपली अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीमध्ये आहे. विकासाचा वेग अनेक वर्षांपासून मंदावलेला आहे. या सगळ्यांतून वर येण्याचा मार्ग रोखून कोरोना महामारी उभी राहिलेली आहे.  चुकीच्या पद्धतीने आणलेल्या नागरी सुधारणा कायद्यामुळे आपली सामाजिक घडी आणखी नाजूक झाली आहे आणि त्या कायद्याद्वारे आपण अनेक वर्षांचा आपला सहयोगी बांगलादेश याला दुखावले आहे. पूर्वीपासूनचा आपला सहयोगी नेपाळ- त्याच्यासोबतचे आपले संबंध आत्तापर्यंतच्या सर्वांत वाईट पातळीला पोचलेले आहेत.

या समस्यांना तोंड देण्याची आपली ताकद आणि मुळात या समस्या संपूर्ण समजून घेण्याची क्षमता आजच्या राजकीय संस्कृतीपाशी जाऊन अडते. कारण त्यामध्ये ‘पंतप्रधान हे कधी चुकूच शकत नाहीत आणि त्यांची धोरणे ही टीकेच्या पलीकडली असतात,’ अशी प्रतिमा सरकार व सत्तापक्ष यांना निर्माण करायची आहे. नेहरूंनी स्वतः दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारख्या व्यक्तीची देशद्रोही म्हणून थट्टा करण्याचा विचारही कधी केला नसता. पण गलवान खोऱ्यातील संघर्षाच्या अनेक आठवडे आधी चिनी घुसखोरीविषयी प्रामाणिकपणे चेतावणी देणाऱ्या सन्मानित ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना उजव्यांकडून आणि गोदी मीडियाकडून मात्र क्रूरपणे ट्रोल करण्यात आले.

आपल्या जवानांच्या दुःखद निधनाचा विचार करता, आपले चीनविषयक धोरण बदललेच पाहिजे. पण सध्याची देशातील गोंधळाची परिस्थिती पाहता, फक्त एका देशासोबतच्या धोरणाच्या पुनर्रचनेचा विचार करून भागणार नाही. आपली आर्थिक, सामाजिक व परराष्ट्र धोरणे या सगळ्यांचाच नव्याने विचार झाला पाहिजे आणि तो पंतप्रधानांच्या वैयक्तिक अंतःप्रेरणेवर अवलंबून न ठेवता प्रत्यक्ष वास्तवावर आधारित असला पाहिजे.

(अनुवाद : मृदगंधा दीक्षित)

Tags: चीनविषयक धोरणे भारत चीन चीन नेहरू जवाहरलाल नेहरू नरेंद्र मोदी ladakh issue china policy nehru jawaharlal nehru india china narendra modi chi jinping weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 


Comments

  1. Sachin Jagtap- 10 Jul 2020

    True Analysis.

    save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात