डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

जेव्हा भारतीय संघ सातत्याने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात सामने आणि मालिका जिंकू लागेल तेव्हाच आपण स्वतःला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे केंद्रबिंदू मानू शकू. यासाठी आवश्यक असलेले खेळाडू आणि कप्तान आपल्याकडे नक्कीच आहेत. जर भारतीय क्रिकेट बोर्डाला खरोखर यश मिळायला हवे असेल तर कप्तानाचा अधिकार आणि अहंकार याला नक्कीच सौम्य करायला हवे. या गोष्टी जरी कप्तानाच्या व्यक्तिगत यशासाठी आवश्यक असल्या तरीसुद्धा संस्थात्मक यशासाठी ते घातक आहे. विराट कोहलीचे वय आज फक्त 29 वर्षे आहे. तो पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाचा दौरा होईल तेव्हा त्याचे नेतृत्व करू शकतो. आणि ऑस्ट्रेलियाचे एकाहून अधिक दौरे तो करू शकेल. दोन वर्षांपूर्वी त्याने माझ्या सार्वकालिक संघात स्थान मिळवले होते. विराट कोहलीचे करिअर संपण्यापूर्वी तो भारताच्या त्या सार्वकालिक संघाचा कप्तान असावा अशीच माझी इच्छा आणि आशा आहे.

मार्च 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाविरूद्ध खेळताना विराट कोहलीने मारलेले दोन स्क्वेअर ड्राईव्ह पाहून मी असे टि्वट केले होते की, ‘आता यानंतर माझा बालपणीचा हिरो (आणि स्क्वेअर ड्राईव्ह खेळण्यात पटाईत) गुंडाप्पा विश्वनाथ माझ्या मनातील सार्वकालिक भारतीय संघात नसेल’. भारतात झालेल्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या त्या उपांत्यपूर्व सामन्यात कोहलीने 82 धावांची संघाला विजय मिळवून देणारी खेळी केली होती. त्या खेळीतील त्या दोन शॉट्‌समुळे माझ्यासाठी तरी कोहलीचा समावेश क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये का केला जातो हे स्पष्ट झाले होते.

मी विराट कोहलीला 2012 मध्ये बंगलोर येथील कसोटी सामन्यात पहिल्यांदा प्रत्यक्ष खेळताना पाहिले होते. त्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते. न्यूझीलंड संघाच्या चांगल्या गोलंदाजांसमोर खेळताना सचिन तेंडुलकर अडचणीत येत होता. मात्र त्याच सचिनला त्याच्या आधीच्या वर्षीच (2011 मध्ये विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील विजयानंतर) ज्याने आपल्या खांद्यावर उचलून घेतले होते, तो विराट कोहली मात्र न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांना सहजतेने खेळत होता. त्यानंतर (दोनच वर्षांनी) विराट कोहली भारतीय कसोटी संघाचा कप्तान झाल्यावर त्याच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियातील ॲडिलेड येथे त्याने 141 धावा काढल्या होत्या. मी ती खेळी टीव्हीवर पूर्ण पाहिली होती. त्याच्या त्या खेळीच्या जोरावर भारताला ती कसोटी जिंकण्याची उत्तम संधी निर्माण झाली होती. त्यानंतर विराटविषयी मला वाटलेल्या आदरात वाढच होत गेली. त्यामुळे जेव्हा विराटने त्या मार्च 2016 मधील सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेम्स फॉकनरला ते दोन स्क्वेअर ड्राईव्ह मारले तेव्हा माझ्या मनात गुंडाप्पा विश्वनाथविषयी असलेल्या बालपणीच्या भावनांना सुरुंग लागला. माझ्या मनातील सर्वोत्तम भारतीय संघात विरेंदर सेहवाग आणि सुनील गावस्कर हे सलामीला येतील. त्यांच्यानंतर राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर अनुक्रमे क्रमांक तीन व चारवर खेळतील, आणि मग कोहली त्या संघात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल.

या साऱ्याला आता दोन वर्षे उलटून गेली आहेत. त्यानंतर विराटने अनेकदा अप्रतिम अशा खेळी केल्या आहेत. नुकत्याच चालू असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील मालिकेतसुद्धा त्याने 153 धावांची खेळी केली होती. त्यामुळे मी आता दोन वर्षांपूर्वी जे म्हटले होते, त्याच्याही पुढे जाईन. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्‌स आणि सर्व प्रकारच्या परिस्थितीत खेळू शकणारा विराट कोहली हा भारताचा कदाचित सार्वकालिक सर्वोत्तम फलंदाज असेल.

द्रविड व गावस्कर यांच्या खेळीतील तंत्रशुद्धता आणि अभिजातता यामुळे त्यांना एकदिवसीय सामन्यांमध्ये फारसा प्रभाव पाडता आला नाही. सेहवागसुद्धा एकदिवसीय सामन्यांत फारसा चांगला प्रभाव पाडू शकला नाही. एकदिवसीय सामन्यांतील सामना जिंकून देणारी त्याची कोणती खेळी आज आपल्याला आठवते? सचिनला टी-ट्वेंटी फॉरमॅटवर आपले प्रभुत्व निर्माण करता आले नाही. (त्याचे आयपीएलमधील आकडे काढून पहावेत.) तसेच सचिन जरी कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात उत्कृष्ट, काही वेळा तर सर्वोत्तम, फलंदाजी करत असे. तरीसुद्धा चौथ्या डावात सामना वाचवताना त्याच्यावर संघ पूर्णतः विसंबून राहू शकत नसे. त्याच्याबाबत हीच गोष्ट एकदिवसीय सामन्यांत धावांचा पाठलाग करतानाही लागू पडते. याशिवाय सचिन कप्तानपदी आला तेव्हा फलंदाजी करताना नर्व्हस आणि असुरक्षित वाटत असे.

दुसऱ्या बाजूला कोहलीकडे पाहिले तर असे दिसते की, कप्तानपद आल्यामुळे त्याच्या आत्मविश्वासात भरच पडली आहे. तसेच धावांचा पाठलाग करताना तर तो अप्रतिम पद्धतीने खेळतो. मी विराट कोहलीला आतापर्यंत केवळ एकदाच भेटलो आहे. यापुढे मी त्याला भेटण्याची शक्यता कमीच आहे. आमचे त्या एकमेव भेटीतील बोलणे आणि त्याला मी जे इतरत्र पाहिले आहे त्यावरून हे सांगू शकतो की, भारताच्या सर्व प्रभावशाली खेळाडूंपैकी कोहली हा सर्वाधिक करिष्मा असलेला खेळाडू आहे. तो क्रिकेट व बाहेरच्या जीवनातसुद्धा अतिशय आत्मविश्वासाने आणि हुशारीने वावरताना दिसतो. गावस्कर आणि द्रविड हे दोघेही कोहलीइतकेच स्पष्टवक्ते आणि बोलण्यात वाकबगार होते. परंतु त्यांच्याकडे कोहलीकडे असलेला करिष्मा नव्हता.

कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी हे दोघे कोहलीइतकाच प्रभाव पाडू शकतात. मात्र कोहलीचे शब्दांवर जे प्रभुत्व आहे त्याचा या दोघांकडे अभाव आहे. गेल्या वर्षी मी भारतीय क्रिकेट बोर्डाबरोबर चार महिने काम केले होते. तेव्हा मला कोहलीच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव जवळून पहायला मिळाला होता. भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ ज्या प्रमाणात नरेंद्र मोदींबाबत भक्तिभाव दाखवते त्याहून अधिक भक्तिभाव क्रिकेट बोर्डाचे अधिकारी कोहलीबाबत दाखवतात. भारतीय कप्तानाच्या अधिकारांत नसलेल्या गोष्टींबाबतही विराटशी सल्लामसलत केली जाते. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे भावी काळातील दौरे ठरवण्यासाठी बैठक झाली तेव्हा क्रिकेट बोर्डाच्या कायदा सल्लागारांनी सांगितले की, यासाठी विराटची परवानगी घेतली पाहिजे.

बंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडेमीच्या व्यवस्थापनाविषयीचा प्रश्न चर्चेत आला, तेव्हा बोर्डाच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही ॲकॅडेमी कशी चालवली जावी याबाबत विराट जे म्हणेल तसे करायला हवे. (बोर्डाचे अधिकारी विराटचा उल्लेख त्याच्या एकेरी नावानेच करत होते. कदाचित आपली त्याच्याबरोबरची जवळीक दाखवणे हा त्यामागील हेतू असावा. मात्र या वर्तणुकीचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, मालक-नोकर नात्याशी त्याचे साम्य आहे.) भारतातील राजकारण, उद्योग, खेळ अथवा ॲकॅडेमिक क्षेत्रात प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि मिळवलेले यश यांची सांगड घातली गेली, तर त्यामुळे अशी व्यक्ती संस्थात्मक यंत्रणेपेक्षा जास्त ताकदवान होऊन बसते.

हे खरे आहे की, विराट कोहली खेळताना आणि त्याबाहेरसुद्धा आपला प्रभाव पाडतोच. आपल्या देशात क्रिकेटच्या इतिहासात कोणीही खेळाडू, विराटकडे आहे तसे खेळातील यश, मानसिक जागरूकता आणि व्यक्तिगत करिष्मा यांची सांगड घालू शकलेला नाही. याच्या थोडीफार जवळ येऊ शकेल अशी व्यक्ती शोधायला गेलो तर अनिल कुंबळेचे नाव समोर येते. कुंबळे हा भारताचा सर्वोत्तम गोलंदाज होता. खेळाविषयी त्याचे स्वतःचे असे काही स्पष्ट चिंतन होते. त्याने उत्तम शिक्षण घेतले होते, समाजात आणि राजकारणात काय चालले आहे यात त्याला रस होता. स्वतःचे महत्त्व काय आहे, याची त्याला स्पष्ट जाणीव होती. मात्र स्वतःचा हा आत्मविश्वास घेऊन तो कन्नड पद्धतीने (म्हणजेच अतिशय शालीनतेने, विराटसारख्या पंजाबी पद्धतीने आक्रमकपणे नव्हे) वावरत असे. असे असू शकेल की, कुंबळे हा एकटाच कोहलीच्या बरोबरीने एक खेळाडू म्हणून आणि एक प्रभावी व्यक्ती म्हणूनसुद्धा वावरू शकेल. त्यामुळेच कदाचित त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाले असावेत आणि कुंबळेला संघाचे प्रशिक्षकपद सोडावे लागले.

मात्र प्रश्न असा येतो  की, कुंबळेच्या जागी प्रशिक्षक म्हणून व्यक्तिमत्त्व आणि खेळातील यश या दोन्हींबाबत कप्तान कोहलीच्या तुलनेत इतकी दुय्यम दर्जाची व्यक्ती का आणली गेली? याचे कारण असे की, कोहलीच्या व्यक्तिमत्त्वाशी सामना करण्याची वेळ येताच भारतीय क्रिकेट बोर्डाचे कायदाविषयक सल्लागार, मुख्य प्रशासकीय अधिकारी, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकांच्या समितीचे अध्यक्ष (विनोद राय) यांनी आपली स्वतंत्र बुद्धी बाजूला ठेवली. ‘क्रिकेट निवडसमिती’ या नावाने जी समिती बनवली गेली आहे, त्यांनीसुद्धा असेच केले. टॉम मुडी (आणि इतर उमेदवार) यांना बाजूला ठेवून रवी शास्त्री यांची नियुक्ती प्रशिक्षक म्हणून झाली. कारण विनोद राय, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्यापैकी कोणाहीकडे कप्तानाला त्याच्या मर्यादा दाखवून देण्याचे धैर्य नव्हते. भारत जोपर्यंत आपल्याच देशात दुय्यम दर्जाच्या प्रतिस्पर्ध्यांशी खेळत होता, तोपर्यंत त्या निर्णयाचे परिणाम दिसले नाहीत. जर क्रिकेट बोर्डाने पैशांचा विचार न करता खेळाचा विचार केला असता तर दक्षिण आफ्रिकेतील मालिकेत एकही सराव सामना न खेळता भारतीय संघ थेट कसोटी खेळायला उतरलाच नसता. जर निवडसमितीचे सदस्य थोडे शहाणे किंवा धाडसी असते तर या मालिकेत भारताबाबत 2-0 (एकही विजय न मिळवता दोन पराभव) अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माणच झाली नसती.

कोहलीने अप्रतिम अशी खेळी खेळल्यानंतर आलेल्या या लेखाबाबत काही कोहलीभक्त आक्षेप घेतील. मात्र आपण व्यक्तिगत यश आणि महानता यांच्या सावलीत राहून संस्थात्मक यंत्रणेला बाजूला ठेवू नये हे सांगण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आपल्या संघाला विजय मिळवता यावा यासाठी कोहलीने सर्व काही केले. मात्र एका सांघिक खेळात व्यक्तिगत कामगिरीला मर्यादा येतातच. जर दोन्ही कसोटी सामन्यांत अजिंक्य रहाणे खेळला असता, जर भुवनेश्वर कुमारला दुसऱ्या कसोटीत खेळवले असते, जर भारतीय संघ देशातच श्रीलंकेच्या दुय्यम दर्जाच्या संघाविरुद्ध न खेळता दक्षिण आफ्रिकेला दोन आठवडे आधीच गेला असता तर कदाचित काही वेगळे परिणाम दिसू शकले असते. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि त्यांचे अतिउत्साही  समर्थक, भारत कसा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा केंद्रबिंदू झाला आहे हे उच्चरवाने सांगत असतात. आर्थिक बाबतीत हे खरे असेलसुद्धा. मात्र खेळातील कामगिरीबाबत हे म्हणणे नक्कीच खरे नाही.

क्रिकेट बोर्डातील मी माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून या दु:खद निष्कर्षाला पोहोचलो आहे की, जर भारतात क्रिकेटचे व्यवस्थापन नीटपणे केले तर भारतीय संघ कधीही मालिका हरू शकत नाही. ब्राझिलमध्ये जितके फुटबॉलवेडे आहेत त्याहून दहापट अधिक क्रिकेटवेडे भारतात आहेत. भारतीय क्रिकेट बोर्डाकडे फार मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध आहे. त्यामुळे या आर्थिक आणि (क्रिकेटप्रेमींच्या) लोकसंख्येच्या आधारावर भारत क्रिकेटच्या सर्व प्रकारांत कायम आणि नियमितपणे सर्वोच्च क्रमांकावर असायला हवा. वस्तुनिष्ठपणे पाहायला गेलं तर भारतीय क्रिकेट संघ देशात आणि परदेशात एखादी कसोटी, एकदिवसीय सामना अथवा टी-ट्वेंटी सामना हरण्याचे काहीच कारण नाही. मात्र जर आपण अजूनही सामने आणि मालिकांमध्ये पराभूत होत असू, सत्तर वर्षांत आपण जर अजूनही ऑस्ट्रेलिया (या बृहन्मुंबईच्या आकाराची लोकसंख्या असलेल्या) देशामध्ये जाऊन मालिका जिंकू शकत नसू, तर याचा दोष या देशात या खेळाचे जे गैर-व्यवस्थापन केले जाते त्याच्याकडे जातो. भ्रष्टाचार आणि आपल्या जवळच्या लोकांना फायदा मिळवून देण्याची प्रवृत्ती यांच्यासारख्या जुन्या दोषांमध्ये आता ‘सुपरस्टार सिंड्रोम’ या तिसऱ्या दोषाची भर पडली आहे.

कोहली एक उत्तम खेळाडू आहे. एक उत्कृष्ट कर्णधार आहे. मात्र संस्थात्मक नियंत्रण आणि समतोल यांच्याशिवाय त्याचा संघ (चाहत्यांना हवा असलेल्या) महानतेच्या दिशेने जाऊ शकणार नाही. 1970 च्या दशकात भारताने पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये मालिका जिंकली तेव्हा विजय मर्चंट निवडसमितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर बऱ्याच काळाने भारतीय संघ नियमितपणे देशात सामने आणि मालिका जिंकू लागला तेव्हा गुंडाप्पा विश्वनाथ आणि दिलीप वेंगसरकर यांच्यासारखे माजी खेळाडू निवडसमितीचे अध्यक्ष होते. ते तेव्हा संघात खेळणाऱ्या खेळाडूंइतकेच यशस्वी होते. दुसऱ्या बाजूला, सध्याच्या निवडसमितीतील सदस्य खेळाडू असताना फारच थोडे सामने खेळलेले आहेत. प्रशिक्षक रवी शास्त्री हे थोडे जास्त सामने खेळलेले आहेत. मात्र ते क्रिकेटमध्ये कधीही ‘महान’ खेळाडू म्हणून ओळखले गेले नाहीत. तसेच त्यांच्या मनातील कप्तानाविषयीची आदब/भीड अगदी स्पष्टपणे दिसते.

आजच्या भारतीय क्रिकेटमध्ये निवड समितीचे सदस्य, प्रशिक्षण देणारा स्टाफ आणि प्रशासक हे सगळेच जण कोहलीच्या तुलनेत फारच खुजे आहेत. हे बदलायला हवे. निवड समितीचे सदस्य (पूर्वी असायचे तसे) स्वतः यशस्वी खेळाडू असायला हवेत. प्रशिक्षकाकडे कप्तानावर स्वतःचा अधिकार गाजवता येईल इतके शहाणपण आणि धाडस असायलाच हवे. (जसे की 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत कुंबळेच्या आग्रहाखातर कुलदीप यादवला खेळवले गेले आणि त्याच्या कामगिरीमुळे तो सामना आणि मालिका भारताने जिंकली.) तसेच प्रशासकांनी सामने अशा रीतीने आखायला हवेत, ज्यामुळे आपण परदेशात चांगले खेळण्याची शक्यता सर्वाधिक होऊ शकेल. पैसे आणि व्यक्तिगत राग-लोभ याचा विचार बाजूला ठेवून भारतीय क्रिकेट संघाचे दौरे व्हायला हवेत. (दक्षिण आफ्रिकेत छोटाच दौरा खेळण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट बोर्ड आणि दक्षिण आफ्रिकन बोर्ड यांच्यातील वादामुळे घेतला गेला.)

जेव्हा भारतीय संघ सातत्याने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात सामने आणि मालिका जिंकू लागेल, तेव्हाच आपण स्वतःला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे केंद्रबिंदू मानू शकू. यासाठी आवश्यक असलेले खेळाडू आणि कप्तान आपल्याकडे नक्कीच आहेत. जर भारतीय क्रिकेट बोर्डाला खरोखर यश मिळायला हवे असेल तर कप्तानाचा अधिकार आणि अहंकार याला नक्कीच सौम्य करायला हवे. या गोष्टी जरी कप्तानाच्या व्यक्तिगत यशासाठी आवश्यक असल्या तरीसुद्धा संस्थात्मक यशासाठी ते घातक आहे. विराट कोहलीचे वय आज फक्त 29 वर्षे आहे. पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाचा दौरा होईल तेव्हा तो त्याचे नेतृत्व करू शकतो. आणि ऑस्ट्रेलियाचे एकाहून अधिक दौरे तो करू शकेल. दोन वर्षांपूर्वी त्याने माझ्या सार्वकालिक संघात स्थान मिळवले होते. विराट कोहलीचे करिअर संपण्यापूर्वी तो भारताच्या त्या सार्वकालिक संघाचा कप्तान असावा अशीच माझी इच्छा आहे.

(अनुवाद - संकल्प गुर्जर)

Tags: sankalp gurjar translation ramchandra guha virat kohli cricket krida garvachi savali virat kohalichya mahantevar kalparwa weekly sadhana 03 february 2018 sadhana saptahik संकल्प गुर्जर अनुवाद रामचंद्र गुहा विराट कोहली क्रिकेट क्रीडा विराट कोहलीच्या महानतेवर गर्वाची सावली कालपरवा साधना साधना साप्ताहिक अंक 03 फेब्रुअरी 2018 साधना साप्ताहिक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके