डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

ॲण्ड्र्यूज अनेक गावांतून हिंडले. तेथील हिंदी लोकांच्या परिस्थितीचं ते स्वत: निरीक्षण करत होते. आपल्या भाषणात ते हिंदी लोकांच्या कामसू आणि सहिष्णू  वृत्तीबद्दल गौरवोद्‌गार काढत, ते युरोपियन श्रोत्यांना आवडत नसे. तरी हळूहळू  त्यांच्या वृत्तीतही बदल होऊ लागला. त्यांची भ्रमंती चालू असतानाच त्यांची  आई अत्यवस्थ असल्याचे निरोप येऊ लागले. त्यांनी केपटाऊनहून इंग्लंडची  बोट तातडीने पकडण्याचे ठरवले. त्यांच्या प्रवासाची सर्व तयारी गांधींनीच करून  दिली. केपटाऊनपर्यंत गांधींनी त्यांची सोबतही केली. गांधी आणि ॲण्ड्र्यूज इतके जवळ आले होते की, पुढे एकमेकांना मोहन  आणि चार्ली म्हणूनच ओळखू लागले. गांधी इतर जवळच्या व्यक्तींना प्रोफेसर  गोखले, लोअर हाऊस (कॅलनबाख), मिस्टर पोलाक- अशी पत्रे लिहीत. सही  करताना एम.के.गांधी, अपर हाऊस किंवा बापू अशी करत; परंतु ॲण्ड्र्यूजना  मात्र चार्ली असे हाकारत आणि मोहन अशी ओळख देत.

 

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये 11 सप्टेंबर 1906 रोजी जी सभा झाली, तीत अन्यायकारक काळ्या कायद्याचे पालन करायचे नाही आणि त्या कायद्यानुसार होणारी शिक्षा आनंदाने सहन करायची- असा निर्धार झाला. हा कायदा किती अन्यायकारक आहे, हे शासनकर्त्यांच्यादेखील ध्यानात यावे, हा यामागे हेतू होता. ह्या ‘पॅसिव्ह रेझिस्टन्स’ला सत्याग्रह  हे नाव पुढील वर्षी देण्यात आले आणि प्रत्यक्ष चळवळ 1908 मध्ये सुरू झाली. हिंदी  रहिवाशांवरील जाचक पोलटॅक्स, गुन्हेगारांप्रमाणे बोटांचे ठसे देऊन मानहानिकारकरीत्या  नोंदणी करण्याची सक्ती आणि दहा-वीस वर्षांत सर्व हिंदी लोकांना देशाबाहेर काढून टाकण्याचा शासनाचा इरादा यामुळे नाताळ-ट्रान्सवालमधील जवळजवळ सर्व हिंदी पुरुष चळवळीत  सामील झाले होते. जस्टिस सर्ल यांनी 1913 मध्ये एका निवाड्यात फक्त ख्रिश्चन किंवा नोंदणी पद्धतीने झालेले विवाह हे वैध ठरवल्यामुळे संतापलेल्या हिंदी स्त्रियाही चळवळीत सामील झाल्या.

धरपकडीचे  सत्र सुरू झाले. अटक करून घेणे, हे सत्याग्रहींचे धोरण असल्याने त्याला विरोधही झाला नाही. चळवळ आणि त्यासंबंधीच्या घटना हिंदुस्थानात सातत्याने कळवल्या जात असत. चळवळीचे  नेते तुरुंगात गेले, तेव्हा हे काम इंग्रज अल्बर्ट वेस्ट यांच्यावर सोपवण्यात आले. त्यांनाही जेव्हा  अटक झाली, तेव्हा हिंदुस्थानात गोपाळकृष्ण गोखले अस्वस्थ झाले. ते स्वत: दक्षिण आफ्रिकेत वर्षापूर्वी गेले असता, त्यांना जनरल स्मट्‌सनी हिंदी लोकांच्या  मागण्या मान्य करायचे आश्वासन दिले होते. आश्वासन तर पाळले गेले नाहीच; त्यावर  गोखल्यांना खोटे पाडण्यात आले होते आणि दडपशाही सुरू होती. त्यांनी आपले काही  प्रतिनिधी पाठवून प्रत्यक्ष परिस्थिती समजून घ्यायचे ठरवले. ट्रान्सवालमध्ये मारझोड, गोळीबार होत असल्याच्या बातम्या येत होत्या. गोखल्यांना काही दिवसांपूर्वी लाहोरला भेटलेला चार्ल्‌स  ॲण्ड्र्यूज ह्या इंग्रज रेव्हरंडची अचानक आठवण झाली.

चार्ल्‌सचा जन्म आणि शिक्षण इंग्लंडमध्ये झालेले. त्यांचे वडील कॅथॉलिक चर्चशी संबंधित  होते, तरी चार्ल्‌स ने पंथ बदलून चर्च ऑफ इंग्लंडमध्ये धर्मगुरू व्हायचे ठरवले. वेस्टकॉट हाऊस  थिऑलॉजिकल कॉलेजचे व्हॉईस प्रिन्सिपॉल झाले. बायबलची शिकवण व सामाजिक न्याय  यांचा संबंध हा त्यांच्या अभ्यासाचा विषय झाला आणि त्यातूनच ते हिंदुस्थानातील प्रश्नांत गुंतू लागले. केंब्रिज ब्रदरहूडतर्फे दिल्लीत सेंट स्टीफन्स कॉलेज चालवले  जाते, तिथे ते 1904 मध्ये तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी रुजू  झाले. हिंदुस्थानात चर्चमध्येदेखील वंशभेद पाळला जातो, हे  पाहून त्यांच्या मनात चलबिचल झाली. कॉलेजात उपप्राचार्य  सुशीलकुमार रुद्र हे होते. प्रिन्सिपॉलची जागा रिकामी  झाल्यावर ती ॲण्ड्र्यूजना देऊ केली, तेव्हा त्यांनी रुद्रांनाच  प्रिन्सिपॉल करावे, असा आग्रह धरला आणि रुद्र त्या कॉलेजचे  पहिले हिंदी प्रिन्सिपॉल झाले.

ॲण्ड्र्यूज आता स्वत:ला भारतीयच समजू लागले. त्यांनी  संतकवींच्या काव्याचा अभ्यास सुरू केला. त्यांचा एक स्वभावविशेष म्हणजे, ते विविध स्तरांतील लोकांशी समरस होऊ शकत. ते उर्दू शिकण्यासाठी सिमल्याला गेले, तेव्हा त्यांनी हंगामी व्हाइसरॉय लॉर्ड ॲम्प्टहिल यांच्या मुलांची  शिकवणी केली. पुढे लॉर्ड हार्डिंग ह्या व्हाइसरॉयशी त्यांची मैत्री झाली. ते 1906 च्या काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हजर होते. ह्या अधिवेशनात दादाभाई नौरोजी यांनी आपल्या  अध्यक्षीय भाषणात पहिल्यांदाच ‘स्वराज्य’ ह्या मागणीचा  उल्लेख केला. लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, लाला लजपतराय ह्या जहाल नेत्यांशी ॲण्ड्र्यूजचा जसा संबंध आला; तसाच गोपाळकृष्ण गोखले, महमद अली जीना, महात्मा मुन्शीराम (पुढे स्वामी श्रद्धानंद) ह्या मवाळ  नेत्यांशीही. याशिवाय पंजाबचे लाला हरदयाळ, बंगालमधील विख्यात शास्त्रज्ञ प्रफुल्लचंद रॉय असे किती तरी.

पुढे गांधी  हिंदुस्थानात आल्यावर ॲण्ड्र्यूजच्या ह्या मित्रपरिवाराचा  गांधींना आधार मिळणार होता. दक्षिण आफ्रिकेतील गांधींच्या संघर्षाला 1896 पासून टिळक-गोखले यांचा पाठिंबा मिळाला होता. हिंदी रहिवाशांच्या प्रश्नांबद्दल 1901 च्या काँग्रेसच्या कलकत्ता  अधिवेशनात गांधींनी स्वत: प्रस्ताव मांडला होता. बंगालची  फाळणी झाल्यानंतर हिंदुस्थानात अशांतता निर्माण झाली आणि त्याचे पडसाद दक्षिण आफ्रिकेतही उमटले. ‘इंडियन ओपिनियन’चे प्रकाशन 1903 मध्ये सुरू झाले आणि त्याचे  अंक हिंदुस्थानातील नेत्यांना नियमितपणे पाठवले जात. तरीही  ह्या प्रश्नाला खरा उठाव आला तो 1908 मध्ये.

वर्षाच्या  सुरुवातीलाच बॅरिस्टर गांधी यांनी कायदा जाणीवपूर्वक मोडून  न्यायालयाकडून जास्तीत जास्त शिक्षा मागून घेतली होती. हिंदुस्थानात सत्याग्रह चळवळींसंबंधी जनमत तयार  करण्यासाठी त्यांनी हेन्री पोलॉक यांना पाठवले होते. गोखल्यांच्या सल्ल्यानुसार हिंदुस्थानात अनेकांना पोलॉक  भेटत होते. त्यातच ते ॲण्ड्र्यूजनाही भेटले. त्या दोघा इंग्रजांचे तर छानच जुळले, शिवाय गांधींच्या व्यक्तित्वाविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी ॲण्ड्र्यूजना आदर निर्माण झाला. पुढील  वर्षी काँग्रेसला उद्देशून बोलताना गोखल्यांनी गांधींविषयी जे  गौरवोद्गार काढले, त्यामुळे यात भर पडली. काँग्रेस अधिवेशनासाठी ॲण्ड्र्यूज कलकत्त्याला गेले तरी  त्यांची टागोरांशी भेट हिंदुस्थानात झाली नव्हती. त्यांचा ‘मॉडर्न रिव्ह्यू’चे संपादक रामानंद चॅटर्जी यांच्याशी दाट परिचय झाला होता आणि ॲण्ड्र्यूज त्यातून स्वत: लिहू लागले.

टागोरांचा बंगालवर झालेला प्रभाव याची त्यांना कल्पना होती. तरीही त्यांची टागोरांशी पहिली भेट झाली ती इंग्लंडमध्ये 1912 मध्ये. इंग्लंडमध्ये टागोरांच्या इंग्रजी ‘गीतांजली’चे वाचन आयरिश कवी येट्‌स करणार होते. त्या वाचनाचे ॲण्ड्र्यूजना  निमंत्रण मिळाले. त्या भेटीत टागोर आणि ॲण्ड्र्यूज  एकमेकांच्या तत्काळ जवळ आले. त्यांच्या विचारांत साम्य  होते आणि पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारांना एकत्र आणणे हा  दोघांचाही ध्यास होता. त्यानंतर ॲण्ड्र्यूजच्या  शांतिनिकेतनच्या भेटी वाढू लागल्या आणि पुढे तर ते शांतिनिकेतनचाच एक भाग बनले. सत्याग्रह चळवळीत स्त्रियाही सामील झाल्या. निधड्या  छातीने त्याही तुरुंगवास आनंदाने स्वीकारतात आणि धीराने  हाल-अपेष्टा सहन करतात, हे कळल्यावर रेव्हरंड ॲण्ड्र्यूजनी  चळवळीसाठी आपल्या शिलकीतले तीनशे पौंड देऊ केले आणि ह्या संघर्षासाठी आपण काहीही करायला तयार असल्याचे गोखल्यांना सांगितले.

गोखल्यांनी त्यातील फक्त पंचाहत्तर पौंडांचा गांधींच्या वतीने स्वीकार केला. दक्षिण आफ्रिकेत संचार करायला ज्यांना मज्जाव होणार  नाही, अशा प्रतिनिधींची निवड करताना गोखल्यांना साहजिक ॲण्ड्र्यूजची आठवण झाली. त्यांच्याबरोबर  शांतिनिकेतनमध्येच अध्यापन करणारे विल्यम पिअरसन यांनाही पाठवण्यात आले. तितक्यात चार्ल्‌सची आई इंग्लंडमध्ये आजारी पडली. ‘मी  मार्चपर्यंत येतो’ असे कळवून डिसेंबरमध्ये ते आफ्रिकेत  जायला निघाले. ह्या निर्णयाला गोखले आणि टागोर यांचा  दुजोरा होता. बोट अपेक्षेपेक्षा दोन दिवस उशिरा पोचली. पोर्ट नाताळ  बंदरात उतरल्यावर नेमके काय करायचे याची ॲण्ड्र्यूज   पिअरसन यांना कल्पना नव्हती. ते फक्त हेन्री पोलाकना ओळखत होते. बंदरात स्वागतासाठी गांधी-पोलाक- कॅलनबाख यांच्याबरोबर हिंदी व्यापारी आणि युरोपियन  मिशनरी आले होते, पण तुरुंगात कोण आणि बाहेर कोण याची कल्पना नव्हती. एका लुंगीधारी लुकड्या माणसाने पाहुण्यांचे  स्वागत केले.

त्या गर्दीत ॲण्ड्र्यूजनी पोलाकना ओळखले आणि विचारले, ‘गांधी कोणत्या तुरुंगात आहेत?’ त्यांना  सोडले होते ही बातमी तोपर्यंत प्रवासात ॲण्ड्र्यूजना कळली नव्हती. पोलाक हसून म्हणाले, ‘आत्ताच ते तुम्हाला भेटले की!’ ते कोणी साधूबाबा असावेत, असे ॲण्ड्र्यूजना वाटले  होते. ते मागे वळले आणि लुंगी-कुर्ता ह्या दक्षिणी कंत्राटी कामगाराच्या पोशाखातील गांधींना भेटले. त्यांना पाहताच ॲण्ड्र्यूजनी आपले गुडघे टेकून गांधींच्या चरणांना स्पर्श करून  वंदन केले. एका ख्रिश्चन रेव्हरंडने एका काफराला अशा प्रकारे अभिवादन केल्याबद्दल डरर्बनच्या वर्तमानपत्रांनी टीका केली. ॲण्ड्र्यूजनी त्यांना एका वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले, ‘मला  त्यांच्यात येशू ख्रिस्त दिसला.’ त्या दोन दिवसांत दोघांनी चळवळीसंबंधी बोलणी केली. गोखल्यांनी व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंगचे मत ह्या चळवळीसंबंधी  अनुकूल करून घेतले होते. हिंदी रहिवासी हे ब्रिटिश साम्राज्याचे प्रजाजन आणि त्यांच्यावर जुलूम होत असेल; तर त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे  व्हाइसरॉय मानत. त्यांचा गांधींशी एकाच बाबतीत मतभेद होता.

जनरल स्मट्‌स यांनी हिंदी लोकांच्या मागण्या मान्य  करण्यापूर्वी सॉलोमन कमिशन नेमले होते. ह्या कमिशनच्या शिफारशींच्या आधारे ते युरोपियन नागरिकांना समजावू शकले  असते. ह्या कमिशनमध्ये हिंदीविरोधी दोन सदस्य होते आणि गोखल्यांनी सुचवलेल्या नावांचा विचार झाला नव्हता. म्हणून गांधी-पोलाक-कॅलनबाख यांनी ह्या कमिशनवर बहिष्कार टाकायचे ठरवले. गोखल्यांचा ह्या बहिष्काराला विरोध होता. गांधींना गोखले-हार्डिंग यांच्या निरोपाचा तपशील ॲण्ड्र्यूज सांगत होते. उलट सत्याग्रहींच्या किमान मागण्या स्वीकारल्या  गेल्याशिवाय चळवळ का थांबवता येणार नाही, हे गांधी त्यांना  समजावत होते. गांधींनी सत्याग्रहामागील तत्त्व आणि आचरणातील धोरण सांगितले. यात मुख्य प्रश्न आत्मसन्मानाचा आहे, हे लक्षात आल्याबरोबर ॲण्ड्र्यूजनी  गांधींच्या निर्धाराला पाठिंबा दिला. त्या दिवसापासून पोलाक आणि कॅलनबाख यांच्याप्रमाणे  ॲण्ड्र्यूज हेही सत्याग्रह चळवळीचे प्रतिनिधी झाले.

गांधींची बाजू समजावून घ्यायची आणि मग ती तेथील युरोपियन नागरिकांना समजावून द्यायची, हे महत्त्वाचे काम ते करू लागले. लॉर्ड हार्डिंग यांनी पाठवलेले प्रतिनिधि बेंजामिन रॉबर्टसन आणि शासनातील स्मट्‌स व त्यांचे सहकारी यांच्याशीही ॲण्ड्र्यूज यांनी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. अनेक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कारणांमुळे हिंदी लोकांचा प्रश्न सोडवणे स्मट्‌सनाही आवश्यक वाटत होते. तेवढ्यात रेल्वेच्या युरोपियन कर्मचाऱ्यांनी संप जाहीर केला. त्याच सुमारास एक मोर्चा काढायचे सत्याग्रही पुढाऱ्यांच्या  मनात होते. दोन्ही चळवळी एकदम सुरू झाल्या तर शासन  कोंडीत सापडून सर्व मागण्या मान्य करील, अशी संपकऱ्यांची इच्छा होती; पण विरोधकांच्या अडचणींचा फायदा घेऊन आपले काम साधायचे, हे सत्याग्रहाच्या तत्त्वात बसण्यासारखे  नव्हते. आपल्या मागण्यांचा स्वतंत्रपणे विचार व्हावा, असे वाटत होते. तेव्हा गांधींनी आपली चळवळ काही दिवस  स्थगित केली. ह्या निर्णयाला प्रसिद्धी मिळू नये, अशी गांधींची  इच्छा होती. परंतु हा निर्णय भीतीपोटी घेतला नसून त्यामागील  तात्त्विक भूमिका कळली पाहिजे, ह्या कारणाने ॲण्ड्र्यूजनी  गांधींचे मत वळवले. ही बातमी प्रसृत झाली, तेव्हा त्याचा  अत्यंत अनुकूल परिणाम झाला.

इंग्लंडमधील लॉर्ड  ॲम्प्टहिलसारख्या हितचिंतकांचे अभिनंदनपर संदेश आले. स्मट्‌सच्या एका सचिवाने तर म्हटले की, तुम्ही जर आमच्या अडचणींची काळजी घेता तर आम्ही काय करणार? इंग्रज  संपकऱ्यांप्रमाणे तुम्ही दगा केला असता, तर मग तुमची  वासलात लावणे सोपे गेले असते. तुम्ही तर शत्रूवरदेखील हात  उगारत नाही. सॉलोमन कमिशन अनुकूल शिफारसी करेल, अशी सोय  स्मट्‌सनी करून ठेवली होती. त्या हाती आल्यावर वाटाघाटी  करण्यात गांधींबरोबर स्मट्‌सनी महत्त्वाची भूमिका निभावली. पूर्वी स्मट्‌सनी तोंडी कबूल केलेल्या गोष्टी पुढे नाकारून  फसवणूक केली होती. त्यांना आता दरवेळी शब्दच्छल करू न  देता लेखी गुंतवण्यात ॲण्ड्र्यूजची मदत झाली. हिंदी समाजातही वेगवेगळे गट होते. युरोपियन नागरिकांकडेही  दुर्लक्ष करून शासनाला चालले नसते. हिंदुस्थानात व्हाइसरॉय आणि काँग्रेस नेते यांचेही खलिते येत होते. इंग्लंडमधील  इंपीरियल शासन तर अंतिम अधिकार बाळगून होते. सर्वांना  सांभाळून तडजोडीचा मसुदा जवळजवळ तयार झाला. फक्त  एका कलमाबद्दल गांधी संतुष्ट नव्हते.  

कस्तुरबांची प्रकृती पार बिघडल्याचे निरोप फिनिक्सहून येत  होते, पण ते कलम मनासारखे होईपर्यंत गांधी प्रिटोरिया सोडायला तयार नव्हते. गांधी आणि ॲण्ड्र्यूज यांनी रात्रभर चर्चा केल्यावर ॲण्ड्र्यूजनी एक बदल सुचवला. पहाटे ॲण्ड्र्यूज तातडीने तो मसुदा घेऊन स्मट्‌सकडे गेले. यापूर्वी भेट द्यायला नाकारणारे स्मट्‌स तेव्हा ॲण्ड्र्यूजसाठी दार उघडे ठेवून वाट पाहत होते. त्यांनी तो बदल मान्य केला आणि त्यानंतरच गांधी फिनिक्सला जाऊन कस्तुरबांची शुश्रूषा करू शकले. ॲण्ड्र्यूजनी आपल्या दक्षिण आफ्रिकेतील अनुभवांबद्दल  लिहिताना, तेथील दरिद्री कंत्राटी कामगारांना गांधींनी आशेचा  किरण दाखवून नवीन आयुष्य कसे दिले, याबद्दल सांगितले आहे. फिनिक्स आश्रमात ॲण्ड्र्यूज राहिले होते. तेथील मुले गांधींभोवती कशी गोळा व्हायची आणि त्या सर्वांच्या बागडण्यात मोठ्यांनाही आपले बालपण कसे मिळवून द्यायची याचे वर्णन केले आहे.

ॲण्ड्र्यूज अनेक गावांतून हिंडले. तेथील हिंदी लोकांच्या  परिस्थितीचं ते स्वत: निरीक्षण करत होते. आपल्या भाषणात  ते हिंदी लोकांच्या कामसू आणि सहिष्णू वृत्तीबद्दल गौरवोद्‌गार  काढत, ते युरोपियन श्रोत्यांना आवडत नसे. तरी हळूहळू  त्यांच्या वृत्तीतही बदल होऊ लागला. त्यांची भ्रमंती चालू  असतानाच त्यांची आई अत्यवस्थ असल्याचे निरोप येऊ  लागले. त्यांनी केपटाऊनहून इंग्लंडची बोट तातडीने  पकडण्याचे ठरवले. त्यांच्या प्रवासाची सर्व तयारी गांधींनीच  करून दिली. केपटाऊनपर्यंत गांधींनी त्यांची सोबतही केली. ॲण्ड्र्यूज-पिअरसन दक्षिण आफ्रिकेत जेमतेम सात  आठवडे होते. अनेक वर्षे चाललेली सत्याग्रह चळवळ निदान  तात्पुरती यशस्वी करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. त्यातून गांधींची आणि ॲण्ड्र्यूज यांची दाट मैत्री झाली. दोघेही  आपापल्या मातृभूमीपासून दूर जाऊन परक्या देशात  न्यायासाठी संघर्ष करीत होते. ॲण्ड्र्यूज आता मनाने पूर्ण  भारतीय झाले होते.

काही महिन्यांतच गांधीही स्वदेशी परतून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्ययुद्धाचे नेतृत्व करणार होते. निरोप घेऊन बोट सुटल्यावरच काय झाले ते ॲण्ड्र्यूजच्या  लक्षात येऊ लागले. त्यांनी बोटीवरून लिहिलेल्या पत्रात गांधींना लिहिले, ‘तुमचा माझ्यावर केवढा जीव जडला आहे, हे मला त्या सकाळपर्यंत कळले नाही- जेव्हा माझ्या खांद्यावर  हात ठेवून मी गेल्यानंतर तुम्ही किती एकटे पडाल ते सांगितले... बंदरात उभे राहून तुम्ही दोन्ही हात आशीर्वादपर  उभारले, तेव्हा माझ्या लक्षात आले... जे प्रिटोरियातदेखील  मला उमजले नव्हते- तुम्ही मला किती प्रिय झालात ते.’

ॲण्ड्र्यूजनी केपटाऊन सोडण्यापूर्वीच त्यांच्या आईच्या  मृत्यूची बातमी आली होती. आईवर त्यांचे नितांत प्रेम होते. त्यांनी आपले स्नेही महात्मा मुन्शीराम (स्वामी श्रद्धानंद) यांना  पत्रात लिहिले की, मी माझे दु:ख भारतमातेच्या चरणी अर्पण करणार आहे. शांती आणि आनंद मला तिथेच सापडणार आहे. गांधी आणि ॲण्ड्र्यूज इतके जवळ आले होते की, पुढे  एकमेकांना मोहन आणि चार्ली म्हणूनच ओळखू लागले. गांधी  इतर जवळच्या व्यक्तींना प्रोफेसर गोखले, लोअर हाऊस (कॅलनबाख), मिस्टर पोलाक- अशी पत्रे लिहीत. सही करताना एम.के.गांधी, अपर हाऊस किंवा बापू अशी करत; परंतु ॲण्ड्र्यूजना मात्र चार्ली असे हाकारत आणि मोहन अशी  ओळख देत. चार्ली आणि मोहन यांची कथा इथे सुरू झाली. पुढील  पंचवीस वर्षांचा वेध आपल्याला घ्यायचा आहे.

Tags: रामदास भटकळ चार्ल्‌स फ्रीअर ॲण्ड्र्यूज चार्ल्‌स ॲण्ड्र्यू गीतांजली टागोर सुशीलकुमार रुद्र सेंट स्टीफन्स कॉलेज स्वराज्य दादाभाई नौरोजी गोपालकृष्ण गोखले केंब्रिज ब्रदरहूड रामानंद चॅटर्जी मॉडर्न रिव्ह्यू दक्षिण आफ्रिका पॅसिव्ह रेझिस्टन्स Charles Andrews मोहनशोध Tagor. Geetanjali Sent Stephen College Sushilkumar Rudr Swarajy Dadabhai Nouroji Gopalkrushan Gokhale Cambridge Brotherhood Modren Review South Africa Dakshin Africa Passive Resistance M.K Gandhi Mahtma Gandh Ramdas Bhatakal Charles Fair Andrews Mohanshodh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामदास भटकळ

पॉप्युलर प्रकाशन या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके