डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

गांधींनी खिलाफतला पाठिंबा हिंदू-मुसलमान ऐक्याच्या दृष्टीने त्यांना ते महत्त्वाचे  पाऊल वाटले. परंतु ॲण्ड्र्यूज त्या बाबतीत अस्वस्थ झाले. त्यांनी काहीशा  व्यथित तरी तीव्र निषेधपर मन:स्थितीत गांधींना लिहिले. युद्धकाळात  सैन्यभरतीच्या कामात सहकार्य केल्याबद्दल प्रायश्चित्त घेतले पाहिजे, असे त्यांनी सुचविले. ॲण्ड्र्यूज यांचा तेव्हा मतभेद असला तरी त्यांनी गांधींना परावृत्त केले  नाही, याबद्दल तेही स्वत:ला दोषी समजत होते. गांधींनी खिलाफत चळवळीला  पाठिंबा दिल्यावर 31 ऑगस्ट 1920 हा खिलाफत दिन म्हणून साजरा झाला. त्याला इंडियन नॅशनल काँग्रेसचा पाठिंबा होता. गांधींच्या खिलाफत धोरणाला  आपण पाठिंबा देऊ शकत नाही, याबद्दल ॲण्ड्र्यूजना यातना झाल्या.  

ॲण्ड्र्यूज आणि पियरसन इंग्लंडला गेले, त्यानंतर थोड्याच दिवसांत गांधींना थोरले बंधू  लक्ष्मीदास वारल्याची बातमी कळली. एका तपाहून अधिक काळ ह्या दोघा भावांची भेट झाली  नव्हती. हरिलालचे लग्न आपल्याला न विचारता तरुण वयातच लक्ष्मीदासकाकांनी लावले म्हणून गांधी नाराज होते आणि गांधींनी अपरिग्रहाचा स्वीकार केल्यानंतर कुटुंबासाठी राजकोटला पैसे पाठवणे बंद केले म्हणून लक्ष्मीदास नाराज होते. तरी आपल्या कुटुंबातला अखेरचा दुवा निखळला आणि त्यांची कधीच भेट होणार नाही म्हणून स्थितप्रज्ञ गांधीदेखील हळहळले. गांधी इंग्लंडला पोचेतो महायुद्धाला तोंड फुटले होते. हिंदीप्रजेने जर राणीच्या जाहीरनाम्यानुसार ब्रिटिश प्रजाजन म्हणून समान हक्क मागायचे तर आपली कर्तव्येही पार पाडायला हवीत, ही गांधींची भूमिका ठाम होती. त्यांनी इंग्लंडमध्ये पोचल्यावर स्वत:च्या  आजाराची पर्वा न करता हिंदी स्वयंसेवकांचे एक पथक उभे करण्याचा प्रयत्न केला. गोखले  यांच्या अनुयायांपैकी महमद अली जीना, सरोजिनी नायडू यांच्याप्रमाणे ॲण्ड्र्यूजही होते.

गोखले आपल्या आजारामुळे हिंदुस्थानात परतले. ॲण्ड्र्यूजही लवकरच त्यांच्या मानलेल्या  मायदेशी परतले. हिंदुस्थानात पाऊल ठेवताना गांधींना सर्वांत मोठा आधार ॲण्ड्र्यूज यांचाच होता. मगनलालसोबत फिनिक्समधील सत्याग्रही हिंदुस्थानात पोचले तेव्हा त्यांची सोय काही दिवस  महात्मा मुन्शीराम यांचे गुरुकुल कांग्री येथे केली. त्यानंतर ते गुरुदेव टागोर यांच्या  शांतिनिकेतनला जाऊन राहिले. गांधी शांतिनिकेतनला पोचले तेव्हा टागोर तिथे नव्हते. गोखल्यांनी गांधींना भारतसेवक समाजात सामील होण्यासाठी बोलावले होते. ॲण्ड्र्यूज दक्षिण  आफ्रिकेत गांधींना भेटले होते, तेव्हा त्यांनी गांधींना आठवण दिली होती. गांधीही हिंदुस्थानास  परतले ते आपल्या राजकीय गुरूच्या पायाशी बसून मातृभूमीची सेवा करण्याच्या उद्देशाने. परंतु  गांधींचे भारतसेवक समाजाशी जुळणे कठीण, अशी चिन्हे दिसू लागली. फिनिक्सहून आलेल्या सत्याग्रहींची पुढील व्यवस्था करण्यासाठी गांधी शांतिनिकेतनला आले, तितक्यात गोखले  यांचा मृत्यू झाला. गोखले हे ॲण्ड्र्यूजनाही गुरूसमान होते. किंबहुना, एकदा बोटीच्या प्रदीर्घ प्रवासात एकत्र  अनेक विषयांवर चर्चा करायची संधी त्यांना मिळाली होती. गोखल्यांची मायभूमीबद्दलची भक्ती, देशवासीयांच्या आयुष्याबद्दल सर्वांगीण विचार करत राहण्याची त्यांची शक्ती, धर्म- नैतिकता आणि राष्ट्रभक्ती यांची त्यांनी घातलेली सांगड यांचा  ॲण्ड्र्यूजवर मोठा प्रभाव होता.

आपापल्या कुटुंबीयांच्या मृत्यूमुळे आलेले पोरकेपण पचवण्यापूर्वीच गांधी आणि  ॲण्ड्र्यूज ह्या दोघांच्याही आयुष्यात गोखल्यांच्या निधनामुळे  पोकळी निर्माण झाली. ॲण्ड्र्यूज यांनी शांतिनिकेतन आपले  घरच बनवले होते. महात्मा मुन्शीराम आणि स्टीफन कॉलेजचे  प्रा.सुशील रूड हेही त्यांना साथ देत होते. गांधींना आपल्या  मायदेशाची नव्याने ओळख करून घेताना ॲण्ड्र्यूज आणि  त्यांचा परिवार यांची मोठी मदत होणार होती. ॲण्ड्र्यूज परिवारातील दिल्ली, गुरुकुल कांग्री शांतिनिकेतन  आणि भारतसेवक समाज ह्या सर्वांना भेट दिल्यानंतर गांधींनी अहमदाबादला सत्याग्रह आश्रम काढायचे ठरवले. ॲण्ड्र्यूज- पियरसन यांनी ह्या आश्रमाला भेट दिली आणि त्यानंतर ते  फिजी बेटातील हिंदी कंत्राटी कामगारांच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तिथे गेले. तेथील हिंदी रहिवाशांचा प्रश्न  बराचसा दक्षिण आफ्रिकेला नेण्यात आलेल्या हिंदी कामगारांसारखाच होता. गांधींनी वर्षभर तरी हिंदुस्थानाच्या राजकारणात भाग न  घेण्याचे आणि त्या काळात देशभर संचार करून इथली  परिस्थिती जाणून घेण्याचे वचन दिले होते.

लखनौ येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनास ते हजर होते आणि मंडालेहून  परतून पुन्हा प्रभावी ठरलेल्या टिळकांनी त्यांना कार्यकारिणीत  बळे ओढून घेतले होते. परंतु त्या अधिवेशनात गांधींच्या  राजकीय आयुष्याला वळण मिळाले ते राजकुमार शुक्ल ह्या  बिहारमधील शेतकऱ्यांमुळे. चंपारण जिल्ह्यातील नीळीची  शेती करायला लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा  काढण्यासाठी त्यांनी गांधींना बिहारमध्ये ओढून नेले. गांधी  त्या वेळी सत्याग्रह ह्या शांततामय अस्त्राचे सल्लागार मानले  जात. सत्याग्रह चळवळीआधी सत्य परिस्थिती शोधून काढली  पाहिजे, ह्या उद्देशाने गांधींनी तिथे काम सुरू केले. पुढे त्यांच्या  कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आचार्य  जे.बी.कृपलानी, बाबू राजेंद्रप्रसाद यांचा परिचय ह्या  सत्यशोधन प्रक्रियेच्या वेळी झाला. तिथल्या शेतकऱ्यांच्या  तक्रारी कितपत खऱ्या आहेत ह्याचा शोध हा युरोपियन  जमीनदार आणि शासनकर्ते यांच्या दृष्टीने सोईचा नव्हता. चंपारण जिल्ह्याच्या मॅजिस्ट्रेटने गांधींना कोर्टात हजर  राहण्याचा हुकूम सोडला. ही एक मोठीच बातमी ठरली. ती  देशभर वर्तमानपत्रांतून झळकताच ॲण्ड्र्यूज तातडीने  चंपारणला आले. तेथील शासकीय अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी गांधींच्या शांततामय कार्यपद्धतीकडे लक्ष वेधले. आपण  दक्षिण आफ्रिकेत प्रत्यक्ष पाहिलेल्या घडामोडींबद्दल  तपशिलात सांगितले. ॲण्ड्र्यूज यांनी शांतपणे केलेल्या ह्या  शिष्टाईमुळे गांधीविरुद्धची केसपाठी घेण्यात आली. शासनाने  एक चौकशी समिती नेमली आणि त्यात गांधींचाही समावेश  केला. ह्या समितीने सुचवलेल्या शिफारसी स्वीकारल्या गेल्या  आणि गांधींच्या हिंदुस्थानातील ह्या पहिल्याच सत्याग्रहाच्या  यशामुळे सारा इतिहासच बदलून जाणार होता.

एकमेकांविषयी  आदर बाळगूनही मतभेद असणारे गुरुतुल्य टागोर व गोखले  यांच्यात आणि गांधींत दुवा साधण्याचे काम जसे ॲण्ड्र्यूज  करायचे, तसेच दक्षिण आफ्रिकेत जनरल स्मट्‌स किंवा  हिंदुस्थानात लॉर्ड हार्डिंग आणि ब्रिटिश अधिकारी वर्ग  यांच्याशीही. हिंदुस्थानला टप्प्याटप्प्याने लोकशाही शासन देणार, असे एडविन माँटेग्यू यांनी जाहीर केले. माँटेग्यू-चेम्सफर्ड अहवाल 12 जुलै 1918 ला प्रसिद्ध झाला. लगोलग रौलट कमिशनचा  रिपोर्ट प्रसिद्ध झाला. पास झाला. युद्धपरिस्थितीत जे जालीम  कायदे चालू होते, ते युद्धोत्तर परिस्थितीतही चालू ठेवणे हा  उद्देश होता. युद्धकाळात हिंदी सैनिकांनी ब्रिटिशांसाठी प्राण गमावले होते. गांधींनी एक ब्रिटिश नागरिक ह्या भूमिकेतून  सैन्यभरतीचा प्रयत्न करून ॲण्ड्र्यूजसारख्या शांतताप्रिय  मित्रांना नाराज केले होते. डिसेंबर 1918 मध्ये इंडियन नॅशनल  काँग्रेसने विरोधाचा ठरावही स्वीकारला. ह्या साऱ्या गोष्टींकडे  दुर्लक्ष करून रौलट बिल पास केले गेले. ह्या बिलांना विरोध करण्यासाठी गांधी हे पहिल्यांदा  ब्रिटिशांच्या विरुद्ध चळवळीसाठी सज्ज झाले. दिल्लीला 30  मार्चला हरताळ करायचे ठरले. हिंदु-मुस्लिम ऐक्याचे ते एक  महत्त्वाचे पाऊल होते.

आर्य समाजाचे पुढारी स्वामी श्रद्धानंद हे  महात्मा मुन्शीराम यांचे नवे नामाभिधान- यांना दिल्लीच्या जामा मशिदीत मोठ्या मुस्लिम समुदायासमोर भाषणासाठी  बोलवण्यात आले. सरोजिनी नायडू यांनी आपल्या डौलदार  उर्दू भाषणाने त्या समुदायाला मंत्रमुग्ध केले. परंतु दिल्लीत गोळीबार झाला. पंजाबात धरपकड झाली. दंगे  उसळले. गांधींच्या शांततामय सत्याग्रहाला गालबोट लागले. पंजाबात अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे जमलेल्या  शांततामय जमावावर जनरल डायर यांनी चौफेर गोळीबार करून अनेकांना ठार केले. पंजाबात ‘मार्शल लॉ’ जाहीर केला. इतका काळ ॲण्ड्र्यूज प्रत्यक्ष राजकारणापासून काहीसे दूर  होते. रौलट बिल समोर आले तेव्हा गांधींचा सत्याग्रह हेच एक  अस्त्र आहे, असे टागोर आणि ॲण्ड्र्यूज यांना वाटत होते. पंजाबमधील अत्याचार दिवसेंदिवस वाढत गेले. सत्याग्रहींना  शांततामय चळवळीपासून न ढळण्याविषयी गांधीजी वारंवार  सांगत होते. पूर्ण तयारी होण्यापूर्वीच आपण असहकाराचा पवित्रा  घेतला, ही फार मोठी- हिमालयाएवढी चूक झाली, याची  गांधींना जाणीव झाली.

स्वामी श्रद्धानंदसारख्या सहकाऱ्यांनी  सत्याग्रह सभेतून राजीनामा दिला. पंजाबमधील ‘ट्रिब्यून’चे संपादक कालिनाथ रॉय यांच्यावर फिर्याद केली आणि त्यांना तुरुंगात टाकले. त्यांच्या सुटकेसाठी  गांधी आणि ॲण्ड्र्यूज प्रयत्न करू लागले. गांधींना पंजाबमध्ये जायचे होते, पण त्यांच्यावर बंदीहुकूम  होता. पंजाबमधील घडामोडींबद्दल गांधींना ॲण्ड्र्यूज कळवत  होते. सप्टेंबर 1919 मध्ये ब्रिटिश शासनाने परिस्थितीची  पाहणी करण्यासाठी हंटर कमिशन नेमले. तोवर परिस्थिती  काहीशी निवळली होती. कालिनाथ रॉय यांना सोडले होते. ॲण्ड्र्यूजवरील बंदी उठवली होती. गांधींनी पंजाब परिस्थितीची वेगळी चौकशी करण्यासाठी  एक स्वतंत्र चौकशी समिती नेमली. त्यात पंडित मदन मोहन  मालवीय, चित्तरंजनदास, मोतीलाल नेहरू यांच्यासोबत  ॲण्ड्र्यूज यांचीही नेमणूक झाली होती. परंतु त्यांना लगेच काही  ब्रिटिश वसाहतींतील हिंदी लोकांच्या कामासाठी जावे लागले.

युद्ध संपल्यावर तुर्कस्तानबरोबर जो तह झाला, त्यामुळे नवे  प्रश्न निर्माण झाले. त्यांनी खलिफाचे सर्व अधिकार काढून  घेतले होते आणि तुर्कस्तानच्या अखत्यारीतील सर्व प्रदेश  वाटून टाकले होते. ह्या साऱ्या करणीला जणू धार्मिक अधिष्ठान  असल्याचे व्हाईसरॉय भासवत होते. ॲण्ड्र्यूजच्या ख्रिश्चन  श्रद्धांना त्यामुळे तीव्र धक्का बसला. गांधींनी खिलाफतला पाठिंबा देऊन असहकार चळवळीशी  त्याची सांगड घातली गेली. हिंदू-मुसलमान ऐक्याच्या दृष्टीने  त्यांना ते महत्त्वाचे पाऊल वाटले. परंतु ॲण्ड्र्यूज त्या बाबतीतही अस्वस्थ झाले. त्यांनी काहीशा व्यथित तरी तीव्र  निषेधपर मन:स्थितीत गांधींना लिहिले. युद्धकाळात सैन्यभरतीच्या कामात सहकार्य केल्याबद्दल प्रायश्चित्त घेतले पाहिजे, असे त्यांनी सुचविले. ॲण्ड्र्यूज यांचा तेव्हा मतभेद  असला तरी त्यांनी गांधींना परावृत्त केले नाही, याबद्दल तेही  स्वत:ला दोषी समजत होते. गांधींनी खिलाफत चळवळीला  पाठिंबा दिल्यावर 31 ऑगस्ट 1920 हा खिलाफत दिन  म्हणून साजरा झाला. त्याला इंडियन नॅशनल काँग्रेसचा पाठिंबा  होता. गांधींच्या खिलाफत धोरणाला आपण पाठिंबा देऊ शकत नाही, याबद्दल ॲण्ड्र्यूजना यातना झाल्या. गांधींच्या  एकूण भूमिकेबद्दल अत्यंत आदर बाळगणारे ॲण्ड्र्यूज यांनी ज्या-ज्या वेळी त्यांना गांधींची भूमिका पटली नाही तेव्हा  तेव्हा आपले मत स्वच्छपणे त्यांना कळवले.  

 (क्रमश:)

Tags: माँटेग्यू-चेम्सफर्ड चार्ल्‌स फ्रीअर ॲण्ड्र्यूज राजकुमार शुक्ल नीळ चंपारण्य सत्याग्रह फोपाल कृष्ण गोखले मार्शल लॉ हंटर कमिशन सरोजनी नायडू रौलट कायदा लॉर्ड हार्डिंग स्वामी श्रद्धानंद आर्य समाज महात्मा मुन्शीराम जनरल डायर कालीनाथ रॉय ट्रिब्यून खिलापत चळवळ इंडियन कॉंग्रेस महात्मा गांधी रामदास भटकळ मोहनशोध Rajkumar Shukl Neel Chanparany Satyagarh Gopal Krushn Gokhale Marshal Law Montagu-Chelmsford Hunter Commision Sarojani Nayadu Rowlatt Act Lord Harding Swami Shardhanand Aray Samaj Mahtma Munshiram General Dayar Kalinath Roy Tribun Khilpat Chalwal Indian National Congress Mahatma Gandhi Charles Fair Andrews Ramdas Bhatkal Mohanshodh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामदास भटकळ

पॉप्युलर प्रकाशन या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके