नवा भारत कसा असावा, माणसांनी माणसांशी कसे वागावे यासंबंधीचे त्यांचे स्वप्न सर्वच लेखनात कमी-अधिक फरकाने प्रतीत झालेले दिसते. हे स्वप्न काहीसे भाबडे आहे हे खरेच, पण ज्या काळात इतर लिहिणारे असंख्य, चटोर स्वप्ने मांडून वाचकांचा ऐदीपणा वाढवत होते त्या काळात गुरुजींच्या अशा स्वप्नांचे महत्त्व खासच होते.
:: 1 ::
साने गुरुजींच्या लेखनात कथा आणि कादंबरी असा फरक करता येत नाही. वाङ्ममयीन आकृतिबंध म्हणूनही नाही आणि एकुणातच त्यांचे सारे लेखन एकमेकांशी खूप जोडलेले आहे. उदाहरणार्थ, ‘आपण सारे भाऊ’, ‘दीनबंधु’ आणि ‘नवा प्रयोग’ या कथा व कादंबऱ्यांतून त्यांनी एकाच प्रकारचे स्वप्न पाहिलेले आहे व ते मांडण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केलेला आहे. वरवरचे काही तपशील सोडले तर नवा भारत कसा असावा, माणसांनी माणसांशी कसे वागावे यासंबंधीचे त्यांचे स्वप्न या तिन्हींत कमी-अधिक फरकाने प्रतीत झालेले दिसते. हे स्वप्न काहीसे भाबडे आहे हे खरेच, पण ज्या काळात इतर लिहिणारे असंख्य, चटोर स्वप्ने मांडून वाचकांचा ऐदीपणा वाढवत होते त्या काळात गुरुजींच्या अशा स्वप्नांचे महत्त्व खासच होते.
रचना, सांगण्याची/मांडण्याची पद्धत, भाषा या अंगांनीही त्यांची कथा व कादंबरी त्यांच्या समकालीनांशी नाते सांगणारी नव्हती. हे दोन्ही वाङ्ममयप्रकार निदान आधुनिक काळात तरी आपण - विदेशी संपर्कातूनच आत्मसात केले व ते बऱ्यावाईट प्रकारे विकसित केले. अशा प्रवासात आपल्या पूर्वसूरींशी, देशी भाषांतील आधीच्या रचनांशी नाते शोधण्याचा वा जोडण्याचा प्रयत्न आपल्या भाषेत 1960 नंतर पुरेशा समझदारीने होऊ लागला त्याची चाहूल वा जाणीव गुरुजींच्या लेखनात दिसते. त्यांनी आधीचे व त्यांच्या समकालीनांचे लेखन पुरेसे वाचलेले होते, हे त्यांच्या कथनात्मक गद्यातून व वैचारिक लेखनातूनही आपल्या लक्षात येते. त्यांनी इंग्रजी भाषेतली बरीच पुस्तकेही वाचलेली असावीत. तुरुंगात अमराठी भारतीय मित्रांनी सांगितलेल्या कथाही त्यांनी ऐकल्या. या साऱ्यांचे पडसाद त्यांच्या ‘गोड गोड गोष्टी’ त दिसतात. संस्कृत भाषेतील साहित्याचे संस्कार तर त्यांच्यावर होतच होते. या सगळ्यासकट लोकसंस्कृती, लोकधारणा, परंपरा, रीवाज, समजुती यांचा त्यांनी अत्यंत स्वाभाविक ओढीने व्यासंग केलेला दिसतो. स्त्री जीवन या पुस्तकात त्यांनी गोळा केलेली खेड्यापाड्यांतल्या स्त्रियांची गाणी त्याची साक्ष देतात.
प्रत्येक लिहिणाऱ्यासाठी बरेवाईट असे पुष्कळ सांस्कृतिक संचित असतेच, त्याचा पटही पुष्कळ रुंद असतो. लिहिणारा त्यातले स्वतःसाठी म्हणून काय निवडतो आणि त्यातल्या कशाशी स्वतःला जोडून घेतो, हे फार महत्त्वाचे असते. त्यातून त्याची जीवनविषयक दृष्टी, समाजासंबंधीची धारणा व एकुणात माणूस म्हणून त्याची वृत्तीही प्रकट होत असते.
गुरुजींनी या साऱ्यातून स्वतःचे म्हणून काही सांगण्यासाठी शोधलेली भाषा व शैली यांचे नाते लोकभाषेतील कहाणीपरंपरेशी- सगळ्यात जास्ती घट्ट होते, हे ठळकपणे दिसते. साहजिकच व्यापक पटावरील मराठी समाज त्यांच्या आस्थेच्या व्यूहात आला. छोटी छोटी वाक्ये, उत्कटता, कणव, प्रेम यांनी ओतप्रोत भरलेली अनलंकृत भाषा हे त्यांच्या सांगण्याच्या लिहिण्याच्या पद्धतीचे विशेष भारतीय लोकजीवनाशी, लोकांच्या सुखदुःखांशी अधिक घट्ट नाते सांगतात. गुरुजी कथा सांगत नाहीत वा कादंबरीही लिहीत नाहीत. ते गोष्ट अथवा कहाणी सांगतात. आपल्या साऱ्या कहाण्यांच्या जनक बव्हंशी स्त्रियाच आहेत. गुरुजींच्या कथांत हा कहाण्यांचा बाज जास्ती प्रभावीपणे येतो.
एखाद्या इंग्रजी कादंबरीचा परिचय करून देणारी गोष्ट सांगतानाही ते आधी सारी गोष्ट पचवतात व ती आपल्या पद्धतीनेच उभी करतात. त्यांच्याशी आत्मचरित्राच्या अंगाने सगळ्यात जास्ती नाते सांगणारी ‘श्यामची आई’ सारखी कादंबरीही कहाणीच्या पद्धतीनेच येते. ‘शशी’ या कथेतला शशी वर्गात सोनसाखळीची गोष्ट सांगतो. ही टिपिकल कहाणीच आहे : सोनसाखळी नावाची गोड सुस्वभावी मुलगी. तिला छळणारी सावत्र आई आणि जपणारा बाप. मग बाप एके दिवशी परगावी जातो. इकडे सावत्र आईला रान मोकळे. ती सोनसाखळीचा खूप छळ करते व एके दिवशी तिला मारून टाकते. तिच्या शरीराचे तुकडे जमिनीत पुरून तिथे डाळिंबाचे झाड लावते. बाप परत येतो तर सोनसाखळी गायब. पुढे त्या डाळिंबाच्या झाडाला एकच लाल फूल येते. त्याचे पुन्हा एकच भले मोठे फळ होते. ते पाहण्यासाठी सारे गाव लोटते. ते फळ कापायला लागात तेव्हा आतली सोनसाखळी म्हणते, ‘हळू कापा. मी आत आहे’. बापाला आनंद होतो. सोनसाखळी सारे सांगते बाप सावत्र आईला मारु लागतो. सोनसाखळी आईला क्षमा करायची विनंती करते. आई तिची क्षमा मागते. नंतर आनंदी-आनंद. अशी ही एका कथेतली कहाणी.
एकूणातच नैतिक संस्कारांसाठी कहाणी या फॉर्मची ताकद त्यांनी हेरलेली होती असे जाणवते. समकालीन व आधीच्या भारतीय व अभारतीय लेखनशैलीचे सारे माहीत असताना इतकी स्वतंत्र शैली, जी लोकसंस्कृतीच्या मौखिक परंपरेत उपलब्ध होती पण लिखित साहित्यात बव्हंशी नव्हती, ती गुरुजीच्या लेखनात उपजत समझदारीसारखी आली, ही फार विशेष गोष्ट म्हटली पाहिजे.
त्यांच्या बव्हंशी साऱ्या कथा नैतिकतेची व प्रेमभावाची शिकवण देणाऱ्या, अंतःकरणाच्या उमाळ्याने सांगितलेल्या व म्हणूनच त्यांच्या समकालीनांपेक्षा खूपच वेगळ्या आहेत. ‘श्यामची आत्या’ या कथेत ते लिहितात, ‘...मनुष्याचे मन हे जात्या प्रेमळ आहे. ईश्वराने प्रत्येक प्राणिमात्राच्या हृदयात भरपूर प्रेम ठेविलेले आहे. हृदयात असणारे हे प्रेम कोणाला तरी द्यावे असे माणसाला वाटत असते. हे भरलेले प्रेम पिऊन टाकणारा कोणीतरी पाडस प्रत्येकाला पाहिजे असतो... आपण सारे या जगात हंबरत असतो. बायकांना काय किंवा पुरुषांना काय, अपत्य पाहिजे असते ते मनातील या निर्मळ व वत्सल प्रेमवृत्तीच्या समाधानासाठी.
‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे त्यांचे गीत साऱ्यांना माहीत आहे. एके ठिकाणी ते म्हणतात, ‘नदी म्हणजे परमेश्वराची वाहती करुणा.’
:: 2 ::
सारेच प्रतिभावान लेखक आपला हात धरून आपल्याला त्यांच्या प्रतिभेने उभ्या केलेल्या दुनियेत नेत असतात. गुरुजीही आपल्याला त्यांच्या कथांच्या विश्वात या प्रकारे नेतात. या जगात वासनांचे तांडव नाही, कोणत्याही प्रकारच्या भुकेचा दाह नाही. त्यांच्यात सोसणे आहे. इतरांना समजावून घेणे, त्यांचा आदर करणे आहे. या कथांमधले परस्परांवर प्रेम करणारे तरुण व तरुणी हे सवंगड्यांसारखे असतात, एकमेकांशी ते तसेच वागतात. मृदु, सुस्वभावी तरुण वा तरुणी, त्याच्यावर वा तिच्यावर येणारी संकटे, त्यांना सामोरे जाताना तो वा ती प्रकट करीत असलेले सत्व, देव भल्या प्रवृत्तीचे सत्त्व पाहतो पण अखेर न्यायही देतो म्हणून अखेर सारेच गोड होऊन आनंदीआनंद असा काहीसा बाज बऱ्याच कथांना आहे. प्रत्येकाच्या प्रत्येक बऱ्यावाईट कृतीचे समर्थनही त्यात असते. ‘चित्रा आणि चारू’ या कथेत गुंड चित्राला पळवून नेतात आणि डांबून ठेवतात, तेव्हा एकदा ती म्हणते, ‘का मला छळता? गरीब गायीला छळू नका. सोडा मला.’
गुंड म्हणतो,
‘बाई, पोटासाठी आम्ही सारे करतो. मी तुमच्या अंगाला हात लावणार नाही. परंतु तुम्हाला आम्ही विकू. त्या पैशांनी आमच्या कुटुंबाचे पोषण करू. तुमचा येथे छळ नाही. खा, प्या.’
गुरुजींच्या कथेतला गुंडही या प्रकारे मोठ्या मवाळपणे आपल्या कृतीचे समर्थन करतो! ‘सती’ च्या प्रस्तावनेत गुरुजींनी म्हटलेलेच आहे की, ‘मला खलपुरुषांची कल्पनाच करता येत नाही.’
या कथांच्या दुनियेत स्वप्ने अमाप आहेत. दुःख आहे आणि बळकट श्रद्धांच्या आधाराने त्याला सामोरे जाणेही आहे. गुरुजी गांधीजींच्या विचार व आदर्शांचे क्रियाशील प्रवक्ते होते. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या जगण्यातच होते. त्यामुळे ते त्यांच्या व्याख्यानात, लेखनात अर्थातच होते. स्वातंत्र्यचळवळ, गांधीजींचे विचार, आदर्श यांची मांडणी त्यांच्या लेखनात ठायी ठायी येते. ‘आपण सारे भाऊ’ या कथेतील कृष्णनाथ म्हणतो,
‘स्वातंत्र्य एकच आहे. मनाचे, सदसदविवेकबुद्धीचे. अन्यायासमोर मी नमणार नाही...’
‘भारतीय नारी’ या छोटेखानी पुस्तकात एके ठिकाणी गुरुजी म्हणतात, ‘जोवर दुसऱ्याच्या आत्म्याची प्रतिष्ठा आपणास कळली नाही तोवर स्वातंत्र्याचा अर्थ आपणास कळला असे मी तरी म्हणणार नाही.’
हा माणुसकीचा गहिवर आहे. दुसऱ्याची प्रतिष्ठा जपण्याची ही वृत्ती गुरुजींच्या कथांत ठायी ठायी दिसते. सत्य, अहिंसा, मानवता, प्रेम, करुणा यांचा संदेश आणि भारतीय संस्कृती, परंपरा यांची व्यापक समावेशक मांडणी त्यांच्यात आहे. हिंदू मुसलमानांतील तेढ, त्यामुळे झालेले नुकसान, या शत्रुत्वापाठीचे अडाणीपण यांमुळे जाणवणारी वेदना त्यांच्या लेखनात अनेक ठिकाणी दिसते. ज्या काळात बाकी सारे प्रसिद्ध आणि ज्यांची युगे झाली असे काही म्हणतात, ते लेखक समाजाचा फारच बारका भाग आपल्या आस्थेच्या पर्यावरणात घेऊन लेखन करीत होते. त्यावेळी गुरुजी मात्र सारा मराठी समाज, हिंदु-मुसलमान, त्या दोहोतील अठरा पगड जातींना आपल्या आस्थेच्या व्यूहात घेऊन रचना करीत होते, हे लक्षणीय आहे.
कथानक, पात्रांमधील परस्परसंबंध, त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया, कथात्मक विकासातील पात्रांचे विकसन, त्यांचे बदलते संबंध असल्या तंत्रामंत्राच्या गोष्टीपेक्षा आपल्याला नैतिकतेच्या ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या गुरुजींच्या मनाच्या गाभ्याशी अधिक प्राधान्याने दिसतात. म्हणजे काही एक नैतिक आशय मांडण्यासाठी व शोधण्यासाठी कथा अथवा कादंबरी हे माध्यम, अशी गर्भित धारणा त्यांच्या मनाशी दिसते. माणसांविषयी, त्यांच्या सुखदुःखांविषयी आस्था असणारा व त्यांच्या वेदनांशी सहकंप पावू शकणारा लेखक या प्रकारचा प्राधान्यक्रम ठरवत असतो. कलात्मकतेचे खेळ अग्रस्थानी बाळगत बाकी माणसांविषयी, मानवी समूहांच्या सुखदुःखांविषयी अज्ञान बाळगणाऱ्या वा त्याविषयी बेफिकीर राहणाऱ्या लेखकांना आणि त्यांच्या सहप्रवाश्यांना हे समजत नव्हते. किंबहुना ते समजावून घ्यायची त्यांची तयारीच नव्हती. म्हणूनच गुरुजींच्या या समकालीन प्रतिष्ठितांनी त्यांची भरपूर हेटाळणी केलेली दिसते. त्यांचे समर्थनही काहींनी केले. पण त्यांना साहित्याच्या त्या वेळी प्रतिष्ठित असणाऱ्या व्यवस्थेत फारसे स्थान नव्हते. साहित्याशी संबंधित प्रतिष्ठित समीक्षेकडून गुरुजींचा हिरीरीने पुरस्कार होण्यासाठी पुष्कळ काळ जावा लागला. त्या आधी समीक्षेत प्रतिष्ठित असलेल्या व्यवस्थेला पुष्कळ हादरे ध्यावे लागले, हे लक्षात घेतले पाहिजे.
:: 3 ::
बौद्धिकता आणि भावनिकता ही मानवी अभिव्यक्तीची महत्त्वाची अंगे होत. तत्त्वज्ञानात बौद्धिकता, बौद्धिक मांडणी जास्त काटेकोरपणे असते. तरीही गाभ्याशी भावनिकता असतेच. कवितेत वा कथेत याच्या उलटे असते. मानवी जीवनात या दोहोंचेही आपापल्या परीने महत्त्व आहे. आणि प्राधान्यक्रम बदलले तरी सत्याकडे जाण्याचा रस्ता या दोन्ही अभिव्यक्तीत खुलाच राहतो. साहित्याचे आशयद्रव्य हे जास्त फ्लुईड असते व म्हणूनच नव्या मांडणीला, आकलनाला वा अभिव्यक्तीला ते तुलनेने सहज खुले असते. तिथून सत्याकडे जाण्याच्या वाटा अधिक खुल्या असतात. एक प्रकारची लवचिकता असते. तत्त्वज्ञानाचे जग हे काठिण्याचे व सहजी न हलणारे, म्हणून तिथली वाट ही कमी खुली व जास्त बिकट असते. विशेषतः जगण्यातल्या संस्काराच्या दृष्टीने साहित्याचे महत्त्व अधिक आहे. आपल्याला काय करायचे आहे हे गुरुजींना उमजले होते. त्यांना आपला स्वभावधर्म कळला होता व म्हणूनच त्यांनी ही फ्लुईड वाट निवडली.
त्यांना सत्याकडे पोहोचण्यापेक्षा आपल्याला दिसणाऱ्या सत्याची मांडणी करण्याची निकड जास्त वाटत होती. तीच ते करीत राहिले. अगदी ‘भारतीय संस्कृती’ सारखे त्यांचे वैचारिक लेखनही त्यामुळे दर्शनाच्या मांडणीच्या पातळीवर न राहता ते संस्कार करण्याच्या सुबोध पातळीवरच अधिक राहते. गुरुजींनी त्यांच्या साऱ्या वाङ्ममयकृतीतून पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
‘आस्तिक’ च्या प्रस्तावनेत गुरुजी म्हणतात. ‘पुस्तकांची नावे निराळी, आतील पात्रांची नावे निराळी, परंतु तेच विचार, त्याच भावना. मी निराळे देणार तरी काय?’ ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ - मनात जे असते तेच प्रकट होणार- झाडांना दर वर्षी नवीन नवीन पालवी फुटते, ती का त्यांच्या पूर्वीच्या पालवीपेक्षा निराळी असते? तशीच असते. तरीही ती आपण कौतुकाने पाहतो व आनंदतो. तसेच माझे. तीच विचारांची व भावनांची पालवी सर्वत्र दिसणार.
गुरुजींच्या या निवेदनाला त्यांच्यावरच्या तेच ते पणाच्या आरोपांची पार्श्वभूमी आहे. खरे तर झाडाची प्रत्येक वर्षीची पालवी नवी आणि वेगळी असतेच. कारण दर वर्षी झाडही बरेच बदललेले असते. सभोवतीची स्थलकालस्थिती बदललेली असते. पाहणारे आपणही बदललेले असतो. सारे नवेच असते. प्रत्येक वेळी ते तसे असते. लिहितानाही नवे येते ते जुन्याच्या उजेडातच येते. काही समजावून घेण्याच्या प्रवासाचा; सत्याकडे जाण्याच्या प्रवासाचा तो भाग असतो. वरवर तोच तो खेळ मांडून आणि प्रत्यक्षात प्रत्येक वेळी तो वेगळ्या प्रकारे वेगळ्या उजेडात मांडून लिहिणारा त्याला जे शोधायचे असते त्याच्या निकट जाण्याच्या प्रयत्नात असतो. स्ट्रिंडबर्गने एके ठिकाणी म्हटले आहे,
‘उथळ माणसे विविधतेची मागणी करत असतात. परंतु ठसठसणाऱ्या नसेच्या निकट; जास्तीत जास्त निकट जाण्याचा प्रयत्न करीत मी आयुष्यभर पुन्हा पुन्हा तीच ती गोष्ट लिहीत आलो आहे.’ या प्रकारे दुखऱ्या नसेच्या निकट जाणे, तसा प्रयत्न करीत राहणे ही कोणत्याही लिहिणाऱ्याची आकांक्षाच असते. अशा प्रकारची आकांक्षा गुरुजींनी बाळगलेली असावी असे दिसत नाही. सनातन मानवी मूल्यांचा अंगीकार करताना या दुनियेच्या व्यवहारात अडचणी, संकटे येतातच. तरीही अखेर त्यांच्या बळावर आपण तरून जाऊ शकतो म्हणून ती महत्त्वाची आहेत; या प्रकारचा संस्कार, करणे गुरुजींनी अधिक महत्त्वाचे मानले. त्यासाठी विविध गोष्टींद्वारे तेच ते विचार पुन्हा पुन्हा मांडून ठसवण्याचा प्रयत्न केला.
मराठी समाजाचा व्यापक पट आस्थेच्या व्यूहात घेऊन त्यांनी ते केले. त्याचे महत्त्व आहेच आणि ज्या फडके, खांडेकर, माडखोलकर अथवा त्यांच्या समर्थकांनी गुरुजींवर अगदी निर्दयतेने एकसुरीपणाची टीका केली. त्यांच्या लेखनात तरी ते वेगळे वेगळे असे काय आणत होते? फडके तर वेगवेगळ्या पोषाखांत तीच पात्रे, तीच प्रणयवर्णने, तेच सौंदर्याचे गुलाब आणि त्याच त्या धनुष्याकार भुवया आणत होते आणि खांडेकरांच्या लेखनाला, त्यांच्या स्वप्नाळू बिनबुडाच्या आदर्शवादाला वास्तवतेची भूमीच नसल्यामुळे ते पुन्हा पुन्हा तेच धान्य वेगळ्या वेगळ्या सुपाने पाखडत हवेत लुप्त होणाऱ्या सुभाषितांची फोलकटे उडवीत होते.
माडखोलकर बेगडी समाजवादाच्या आवरणाखाली कामुक गोष्टी सांगत होते. या साऱ्यांचा प्रवास कोणत्या दुःखाच्या आकलनाची नस शोधत होता ? उलट साने गुरुजी नैतिक आदर्शाचा काही एक ठोस नमुना शोधत, आकार शोधत, अत्यंत उत्कटपणे मराठी समाजावर काही संस्कार करण्याचा प्रयत्न करीत होते. कोणताही लेखक उरतो, टिकतो तो त्याच्या पुढच्या पिढ्यांमधल्या वाचकांमध्ये आणि लेखकांमध्ये. त्यातले लेखकांमध्ये टिकणे अधिक महत्त्वाचे कारण लेखक हा प्रगल्भ वाचक असण्याची शक्यता नेहमीच जास्ती असते. पुढच्या पिढीतल्या उद्धव शेळके यांच्या ‘धग’ सारख्या श्रेष्ठ कादंबरीतील कौतिकचे नाते श्यामच्या आईशी नक्कीच जोडता येईल. पूर्वसूरींचा प्रभाव पचवून पुढे जाण्याचे या प्रकारचे उदाहरण साने गुरुजींनी प्रेरित केल्यातून जसे दिसते, तशी फडके खांडेकरांची प्रेरणा घेऊन पुढे कोणती श्रेष्ठ कृती आपल्या भाषेत निर्माण झाल्याचे उदाहरण सांगता येत नाही.
(साहित्य अकादमी व कोसाप यांच्यातर्फे गुरुजींच्या साहित्यावर 25-26 डिसेंबर रोजी दापोली येथे झालेल्या चर्चासत्रात वाचलेला निबंध.)
(या लेखाचा उत्तरार्ध पुढील अंकात वाचा)
Tags: पुस्तके कथा मुल्य रंगनाथ पठारे साने गुरुजी Books Stories Ethics Rangnath Pathare Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या