डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साने गुरुजींचे कथालेखन (23 जानेवारी 1999)

वाङ्ममयीन कृतीत व्यक्त होणारा अनुभव हा प्रत्यक्ष जीवनातील अनुभवाचा सृजनात्मक अनुवादच असतो. या अनुवादावर लेखकाच्या जीवनविषयक दृष्टीचा, त्याच्या वृत्तीचा प्रभाव पडत असल्याने, हे सारे कसे होते हे पाहणे बऱ्याच वेळा उद्बोधक असते.

:: 4 ::

लेखकाच्या जीवनातील अनुभव वाङ्ममयीन पातळीवर जाताना एक प्रकारचा अनुवाद घडत असतो. वाङ्ममयीन कृतीत व्यक्त होणारा अनुभव हा प्रत्यक्ष जीवनातील अनुभवाचा सृजनात्मक अनुवादच असतो. या अनुवादावर लेखकाच्या जीवनविषयक दृष्टीचा, त्याच्या वृत्तीचा प्रभाव पडत असल्याने, हे सारे कसे होते हे पाहणे बऱ्याच वेळा उद्बोधक असते. संधी असेल तर ते पाहून हाती काही लागू शकते. रामभाऊ जोशी यांनी लिहिलेल्या ‘असा होता सेनानी’ या साने गुरुजींच्या छोटेखानी चरित्रात एक प्रसंग उद्धृत करण्यात आलेला आहे. जोशी आणि गुरुजी सहाध्यायी. ते इंग्रजी चौथीत असताना त्यांना कृष्णाजी पांडुरंग लिमये ऊर्फ ‘कवी राधारमण’ हे संस्कृत शिकवीत. ते उत्तम शिक्षक होते व फार तापट स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांत फार आदर व दरारा असे. 

एके दिवशी शाळेच्या मधल्या सुट्टीत वर्गातल्या दोन खोडकर मुलांनी साऱ्या मुलांच्या वेगवेगळ्या बाकड्यांवरच्या पिशव्या एकत्र करून एका ठिकाणी बांधून टाकल्या. साने (गुरुजी) तिथेच होता. त्याने ते पाहिले होते. सुट्टी संपल्यावर सारी मुले वर्गात आली. त्यांनी ते पाहिले. जो तो आपापली पिशवी ओढू लागला. त्यामुळे पिशव्यांना मारलेल्या गाठी आणखी घट्ट बसू लागल्या. साने त्या मुलांना म्हणाला, ‘चाकूने पिशव्यांच्या नाड्या कापूया. म्हणजे पिशव्या मोकळ्या होतील. चला, घाई करा लिमये गुरुजी आता येतीलच.’ कोणीही ते ऐकले नाही.

पिशव्या फाटल्या. पुस्तके, वह्या सांडल्या, लिमये गुरुजी येताच सारी मुले हाती लागेल तशा फाटक्या पिशव्या, वह्या, पुस्तकांचे गठे्ठे घेऊन आपापल्या जागी जाऊन बसली. साने तिथेच उभा होता. तो सगळ्यांत शेवटी त्याच्या जागेवर जाऊन बसला. लिमयांचा संताप अनावर झाला. त्यांनी सानेला विचारले. तो म्हणाला, ‘मी नाही गाठी बांधल्या.’ लिमये म्हणाले, ‘ठीक कोणी बांधल्या हे तुला माहीत आहे. त्यांची नावे सांग.’
त्याने ती सांगितली नाहीत. गुरुजींनी निरगुडीचे फोक आणवून साऱ्या मुलांना दोन दोन छड्या दिल्या. शेवटी त्यांनी अत्यंत क्रोधाने सानेच्या हातावर सपासप मारायला सुरुवात केली. एका हातावर मार मारून छडी तुटली. हाताच्या वळातून रक्त ठिबकू लागले. तरीही साने बोलला नाही वा त्याने हात मागे घेतला नाही. लिमयांनी दुसरी छडी घेतली. त्यांनी सानेच्या दुसऱ्या हातावर मारायला सुरुवात केली. त्याही हातातून रक्त ठिबकू लागले. तीही छड़ी मोडली. तरीही साने गप्पच आणि हात तसाच. लिमयांनी निराश होऊन छडीचे थोटूक फेकून दिले आणि क्रुद्ध स्वरांत त्यांनी सानेला जागेवर बसायला सांगितले. सानेने तोंडातून ‘ब्र’ ही काढला नाही. नावे सांगितली नाहीत. सारा वर्ग स्तिमित झाला, कळवळला. 

आता ‘आपण सारे भाऊ’ या गोष्टीत हा प्रसंग पुढीलप्रमाणे येतो. बोर्डाच्या शाळेत शिकणारा, वसतिगृहात राहणारा कृष्णनाथ हा सुस्वभावी मुलगा. त्याच्या संदर्भातला प्रसंग.

 एके दिवशी त्याच्या खोलीतील दोन मुलांनी व दुसऱ्या दोन मुलांनी पिकलेले पोपये न विचारता काढले. कृष्णनाथाला ते पसंत नव्हते. 

‘कृष्णनाथ, ये खायला!’ मित्रांनी हाक मारली. 

‘मला नको. तुम्ही न विचारता ते काढले आहेत.’

‘मोठा शिष्टच आहेस! झाडावर फुकटच गेले असते. नाहीतर दुसऱ्या कोणी काढून नेले असते!’ 

‘परंतु आपण विचारले असते तर आपणाला का परवानगी मिळाली नसती?’

‘तू असला डुढ्ढाचार्य असशील हे नव्हते आम्हाला माहीत! आपणच खाऊ या रे!’ 

त्या मुलांनी भराभर पोपया खाऊन साली तेथेच खिडकीबाहेर टाकून दिल्या आणि ती मुले निघून गेली. कृष्णनाथ एकटाच खोलीत होता. तो उठला आणि त्या साली गोळा करू लागला. तोच चालक तिकडून आले.

‘काय रे करतो आहेस?’

‘या साली गोळा करीत आहे.’ 

‘पत्ता लागू नये म्हणून ना?’ 

‘मी नाही खाल्ल्या पोपया.’

‘परंतु येथे घाण नसावी म्हणून या साली मी गोळा करीत आहे.’ 

‘कोणी खाल्ले पोपये?’

‘दुसऱ्या मुलांनी. त्यांची नावे मी सांगणे बरे नाही. तुम्ही प्रार्थनेच्या वेळेस पोपया खाणाऱ्यांनी उभे राहावे अशी आज्ञा करा. ते मग उभे न राहिले तर मात्र मी नावे सांगेन. परंतु त्यांच्यामागे कशाला सांगू?’

‘कृष्णनाथ, तू शहाणा आहेस.’ असे म्हणून चालक गेले. 

रात्री प्रार्थनेच्या वेळेस चालकांनी कृष्णनाथची स्तुती केली. त्याचा प्रामाणिकपणा, मित्रांची नावे त्यांच्या पाठीमागे न सांगण्याची वृत्ती, चुगलखोरपणाचा अभाव, घाण दूर करण्यातील नम्रता व सेवावृत्ती इत्यादी गुणांची प्रशंसा केली. छात्रालयातील आदर्श विद्यार्थ्यास मिळणारे पदक कृष्णनाथास देण्यात येईल असेही ते म्हणाले. 

कथेतला कृष्णनाथ बोलणारा आहे. चालकांच्या साऱ्या प्रश्नांना तो व्यवस्थित उत्तरे देतो. अमुक एक गोष्ट आपण का करणार नाही व ती कोणत्या परिस्थितीत करू हेही तो नीट सांगतो. चालक त्याची स्तुती करतात. छात्रालयातील आदर्श विद्यार्थ्याला देण्यात येणारे पदक त्याला मिळेल असे सांगतात. 

प्रत्यक्षातल्या अनुभवात गुरुजी मुकपणे मार सोसतात. हात रक्ताळले तरी तोंड उघडत नाहीत. कथेतला कृष्णनाथ बोलतो. त्याची वाहवा होते. प्रत्यक्ष अनुभवातीत सोसणे, दाह याचे वाङ्ममयीन पातळीवर जाताना असे गोड गोड सारे करे होते? जे होते त्यातून ते जसे व्हावे असे वाटते तसे ते लेखनात येते. जीवनातला तपशील लिहिणाऱ्याच्या वृत्तीमुळे बदलतो. मूकपणे सोसलेला मार या लेखकाला कडवट बनवत नाही. तो त्याला वेगळया भावनात्मक अनुभवाची प्रेरणा देतो. गुरुजींच्या एकूण साहित्याच्या पाठी वस्तुस्थिती कशी असेल आणि साहित्यात ते कसे होऊ येत असेल याचा अंदाज यातून येतो. प्रत्यक्ष जीवनातील बुजरेपणा. एकाकीपण, निःशब्दपणे सोसलेल्या यातना यांचा सृजनात्मक अनुवाद किती वेगळा होऊन येतो.

:: 5 ::

गुरुजींच्या गोष्टीत लहान व तरणी मुले-मुली प्रामुख्याने असतात. तरीही त्यांच्या या गोष्टी प्रायः प्रौढ माणसांसाठीच लिहिलेल्या आहेत. प्रौढांनी मुलांशी कसे वागावे. त्यांच्या मनाला जपावे, त्यांची काळजी घ्यावी, त्यांच्या निसर्गाशी संवाद करण्याच्या वृत्तीचे पोषण करावे. त्यांच्या कुतूहलाची समंजसपणे पूर्ती करावी या प्रकारची भावना या गोष्टींमध्ये वारंवार दिसते. बालकथा म्हणजे बालांसाठी लिहिलेल्या कथा. गुरुजीच्या कथा या प्रौढांसाठी लिहिलेल्या बालकांच्या गोष्टी आहेत असे फारतर म्हणता येईल पण हेही सरसकट करता येण्याजोगे विधान नाही. 

गुरुजींनी गोष्टी सांगितल्या, लिहिल्या.... त्या साऱ्यापाठी विलक्षण झपाटा व उत्कटता होती. गोष्टींच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहून ते गोष्टीपाठीच्या गोष्टी, त्या ऐकवल्या-वरच्या प्रतिक्रिया, एवढेच नाही तर या या गोष्टीत हे हे सांगितले आहे असेही सांगत. हा भाबडेपणाच म्हणावा लागेल, तरीही त्यापाठीची त्यांची उत्कटता व तळमळ मोठी असते की त्यात आपल्या मनात उगवणारी अशी भावना सहज विलय पावते. 

विश्राम या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गुरुजी म्हणतात. ‘भरलेले हृदय रिकामे होईपर्यंत लिहायचे. दुसरे कलातंत्र मला येत नाही व साधत नाही. तंत्रमंत्रमय कलेचा येथे कदाचित खूनही असेल, कोणाला माहीत?’ टॉलस्टॉयच्या पुस्तकाच्या ‘कला म्हणजे काय?’ या त्यांनी केलेल्या अनुवादाच्या प्रस्तावनेत गुरुजी म्हणतात. ‘खेड्यापाड्यातील जनता हाच खरा महाराष्ट्र आहे. लाखो खेड्यात कोणत्या पुस्तकांचा प्रवेश झाला आहे? महाराष्ट्राचे आवडते कवी व आडवते कादंबरीकार यांचे कोणते काव्य व कोणती कादंबरी त्या खऱ्या महाराष्ट्रात गेली आहे? महाराष्ट्राचे आवडते याचा अर्थ चार सुशिक्षितांचे आवडते, यापेक्षा अधिक नाही. खरा महाराष्ट्र या कादंबरीकारांनी पाहिलेला नसतो. त्या खऱ्या कष्टाळू व श्रमी महाराष्ट्राबद्दल यांना आदर नसतो , प्रेम नसते...’

गुरुजींनी वाङ्ममयीन भूमिकाच यातून स्पष्ट होते. त्यांच्या आस्थेचा व्यूह लक्षात येतो. महाराष्ट्राचे आवडते कादंबरीकार ज्यांना म्हटले जात होते ते खेड्यापाड्यांत तसे पोहोचले होते पण कष्टाळू श्रमी महाराष्ट्र त्यांच्या कादंबऱ्यांत नक्कीच नव्हता. त्याबद्दलचा आदर तर सोडाच, आस्थाच त्यांची ठायी नव्हती. त्यांना तो माहीतच नव्हता. गुरुजींच्या हयातीत त्यांच्या कथांचे व एकूण लेखनाचेच योग्य मूल्यमापन झाले नाही. त्यांची वाङ्ममयीन भूमिका किती महत्त्वाची होती हे पुढच्या पिढयांतील महत्त्वाच्या लेखकांनी आपल्या वाङ्ममयीन कृतीतून व लेखांमधून लक्षात आणून दिले. 

चटोर कथा प्रतिष्ठित असण्याच्या व होण्याच्या काळात गुरुजी शुद्ध भारतीय नैतिक आदर्शाच्या, खेड्यापाड्यातल्या सनातन प्रामाणिक मूल्यांचा पाया असलेल्या गोष्टी अगदी साध्या सोप्या वाटणाऱ्या भाषेत सांगत होते. अगदी उत्कटतेने सांगत होते एका अर्थाने ते त्यांच्या काळातील प्रतिष्ठित वाङ्ममयीन प्रवाहाचा एकाकीपणे प्रतिकारच करीत होते. ते जगणे आणि लिहिणे यात अंतर नसण्याचा आपल्या उक्ती आणि कृतीतून पुरस्कार करीत होते. ‘कादंबरी लिहून क्रांती होते.’ असे त्यांनी म्हटले आहे. (भारतीय नारी, पृष्ठ 22) ते गांधीवादाच्या मूल्यादर्शांचा हिरीरीने पुरस्कार करीत होते. गांधीजी, त्यांचा विचार , त्यांचे जगणे हा त्या काळातल्या मराठी मध्यमवर्गाच्या टवाळीचा विषय होता. भालाकार भोपटकर, सावरकर, मुंबईची विविधवृत्त, चित्रा ही साप्ताहिके यांतून गांधीजींची टवाळी सतत चाले. 

गुरुजींनी आपले जगणे काही एका मिशनला बांधून घेतलेले होते. त्यांचे लिहिणे हा त्यांच्या जगण्याचा भाग असल्याने , ते त्या मिशनचाही भाग होते. म्हणूनच त्यांच्या लिहिण्यात व जगण्यात विसंवाद नाही, विरोध वा अंतर नाही, त्यांच्या समकालीन प्रतिष्ठितांच्या हेटाळणीनेही त्यांना नाउमेद केलेले दिसत नाही. त्यांना दुःख अर्थातच झाले असेल, पण काही सांगण्याची, मांडण्याची त्यांची उर्मीच इतकी प्रबळ होती की, तिने अशा दुःखावर सहज मात केली. अंगीकृत मूल्यांविषयी इतक्या श्रेष्ठ दर्जाची आस्था, त्यांच्याशी असणारी प्रामाणिकता असाधारणच म्हटली पाहिजे. 

आजच्या वर्तमान गुरुजींचे लेखन किती समकालीन, किती महत्त्वाचे म्हणायचे आणि का? भांडवली अर्थव्यवस्थेच्या या एकूणातच त्या प्रकारच्या जीवनप्रणालीच्या परमोत्कर्षाच्या आजच्या काळात मानवी संस्कृतीतील सनातन मूल्ये भेदरून वळचणीला गेल्यासारखी दिसतात. त्याग, संयम, वैराग्य, सेवा, प्रेम, ज्ञान, विवेक अहिंसा, सत्यनिष्ठा, प्रामाणिकता या साऱ्याच बाबी आज अशा अडगळीत जाऊ लागल्या आहेत. 
आदिम माणसाच्या ठायी स्वाभाविकपणे ती कदाचित नसतीलही; म्हणजे नव्हतीच पण ती प्रतिष्ठित करण्यासाठी माणसांच्या हजारो पिढ्यांनी फार कष्ट घेतलेले आहेत आणि हे सारे कष्ट फार वेगाने मातीमोल होऊ घातले आहेत. एक प्रकारच्या विराट अतिव्याप्त, अमर्याद सुजलेल्या भुकेने, पृथ्वीने दिलेल्या ऊर्जेच्या अमर्याद नासाडीच्या नशेने आपल्याला घेरलेले असताना व प्रमत्त शर्यतीत आपण सारेच भांबावल्यासारखे धावत असताना अगदी अलीकडे होऊन गेलेल्या गांधीजींची, त्यांच्या जीवनादर्शांची आठवण होणे जितके स्वाभाविक तितकेच साने गुरुजींच्या लेखनाचे महत्त्व स्वाभाविक आहे. 

माणसामाणसांमधल्या संवादांची साधने अमाप वाढलेली असतानाही माणसाचे एकाकीपण आणखीनच वाढले आहे. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे फुटलेपण , विखंडीकरण वाढले आहे. आपल्या लोकांपुरते बोलायचे तर शत्रुत्वाच्या भावनेचा जयजयकार करणाऱ्या प्रवृत्ती आणि त्यांना मिळणारे प्रतिसाद वाढले आहेत. खुनी प्रवृत्तीचे लोक राजकीय सत्तांच्या वर्तुळात वाढले आहेत. विद्वेषामुळे माणसांच्या समूहातील दरी वाढते आहे. शत्रू एखाद्या बागुलबोवासारखा समोर दाखवून नेतृत्व उभे राहत आहे. माणसांचा माणसाविषयीचा आदर, प्रेम दुर्मिळ होत चालले आहे . कमीत कमी वेळात सारे काही मिळवण्यासाठी बेदरकारपणे धावणे वाढले आहे. आपली हवा वाढली आहे आणि सारे कळत असूनही आपण धावतोच आहोत.

या साऱ्याचा प्रतिकार करायचा असेल तर गांधीजींकडे वळणे अपरिहार्य आहे. त्याग, संयम, सेवा, प्रेम, माणुसकी या गोष्टींना हृदयाच्या गाभ्याशी ठेवून वत्सलपणे रचना करणाऱ्या, समाजाच्या सगळ्या घरांना कवेत घेणाऱ्या साने गुरुजींच्या प्रतिभाविश्वाचे महत्त्व त्यामुळेच आहे. माणसाला व मानवी समूहांना ज्या प्रकारे आज धावावे लागत आहे, एकमेकांच्या नाशाची तरतूद करणारी दहशत बसवावी लागत आहे, एकमेकांना भिऊन जगावे लागत आहे ते सारे फार भयावह व स्फोटक आहे. या भेदरलेल्या धावण्यात मेंदू फुटून मृत्यू येण्याचा अनुभव अगदी नजिकच्या टप्प्यात आहे. ते टाळायचे असेल तर समंजसपणा पाहिजे. विवेक, संयम पाहिजे. . प्रेम, माणुसकी, परस्पराविषयीचा आदर यांची पुनर्ओळख करून घेतली पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्यावर काबू करण्यासाठी या साऱ्या मूल्यांची पुन्हा मांडणी करण्याची, त्यांच्या प्रतिष्ठेची पुनःस्थापना करण्याची, त्यांना जगण्याच्या केंद्रस्थ्यानी आणण्याची फार गरज आहे. मानवी समूह म्हणून आपण संस्कृत राहणार असू, नैतिकता टिकवणार असू तरच आपण टिकू. विशाल मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजींचे साहित्य म्हणूनच आज सगळ्यात जास्त समकालीन आहे, महत्त्वाचे आहे. त्याला त्याच्या महत्त्वाच्या जागी आणणे गरजेचे आहे.

Tags: वांङ्ममय आपण सारे भाऊ रंगनाथ पठारे साने गुरुजी Literature We All Are Brothers Rangnath Pathare Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रंगनाथ पठारे

मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके