डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

संस्कृतींचा उदयास्त (पूर्वार्ध)

‘साहित्यातील देशीवाद आणि व्यवस्थेतील जातीवाद’ हे रावसाहेब कसबे यांचे पुस्तक लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन, मुंबई यांच्या वतीने लवकरच प्रकाशित होत आहे. त्या पुस्तकातील पहिले प्रकरण ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकात मागील महिन्यात प्रसिद्ध झाले आहे. दुसरे प्रकरण साधनाच्या या व पुढील अंकात प्रसिद्ध करीत आहोत – संपादक

संस्कृती ही माणसाने निर्माण केलेली सर्वांत सुंदर गोष्ट आहे. निसर्ग आणि प्राणिसृष्टीतून तो उन्नत झाल्यानंतर त्याने तिला जन्म दिला. प्राणिसृष्टी आणि मानवी सृष्टी यांच्यात विभाजन करणारी ती एकमेव व्यवच्छेदक रेषा आहे. त्यामुळे संस्कृतींचा विचार करण्यापूर्वी माणसाचा विचार करणे आवश्यक ठरते. या माणूस नावाच्या प्राण्याचा तरी जन्म कधी झाला, असा प्रश्न साहजिकच त्यातून उद्‌भवतो. माणसाच्या जन्माचे रहस्य उकलून घ्यायचे असेल, तर उत्क्रांतीच्या सिद्धांताप्रमाणे एकपेशीय जीवांच्या (unicelluler) उगमापर्यंत- म्हणजे निदान दोनशे दशलक्ष वर्षांपर्यंत तरी आपल्याला मागे जावे लागेल; परंतु त्याची आवश्यकता नाही. माणसाच्या जन्माची सुरुवात तो मागच्या दोन पायांवर चालू लागल्यापासून आणि त्याने पुढील दोन पाय हाताच्या रूपाने अधिक, सरप्लस कमावल्यापासून म्हणजे तो होमो-इरेक्टस म्हणून उत्कांत झाल्यापासून झाली, असे आपण मानू शकतो. त्याचा कालखंड साधारणत: पाच ते दहा लाख वर्षांचा असावा, असे बहुतेक मानववंशशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. खानदेशातील एक महान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आजच्या माणसाला आठवण करून देताना लिहिले आहे-

‘‘पाखराची कारागिरी, जरा देख रे मानसा,

त्याची उलूसीच चोच, तेच दात तेच ओठ,

तुला दिले रे देवानं, दोन हात दहा बोटं’’(खोपा)

देवाने नव्हे, तर त्याच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत हे दोन हात स्वत: माणसानेच कमावले आहेत. प्राण्याचा माणूस होण्याची ही प्रक्रिया साधारणत: दहा ते पंधरा लाख वर्षांपासून सुरू होती. तिची सुरुवात आफ्रिका खंडातील उत्तर केनिया आणि नैर्ऋत्य युथोपियातील रुडॉल्फ नावाच्या सरोवराजवळील नि:वृक्ष अशा भव्य गवताळ प्रदेशात झाली असावी, याबद्दल आता मानववंशशास्त्रज्ञांत फारसे मतभेद राहिलेले नाहीत. या पृथ्वीवर वीस लाख वर्षांपूर्वी माणूस नावाचा प्राणी कधीच अस्तित्वात नव्हता. दहा लाख वर्षांपूर्वी मानवाचा पूर्वज होमो-इरेक्टस उत्क्रांत झाला. चार लाख वर्षांपूर्वी त्यानेच चीनमध्ये अग्नीचा उपयोग केला. सहा लाख वर्षांपूर्वी तो उत्तर आफ्रिकेत होता. सात लाख वर्षांपूर्वी तो जावा बेटापर्यंत पोहोचला चार लाख वर्षांपूर्वी तो पूर्वेकडे चीनपर्यंत आणि पश्चिमेकडे युरोपपर्यंत पोहोचला. पन्नास हजार वर्षांपूर्वी त्याने प्राणिसृष्टी आणि मानवी सृष्टी यांच्यात संस्कृतीच्या निर्मितीची सुरुवात करून त्यात एक व्यवच्छेदक रेषा आखली. माणसाला त्याचे आजचे हे रूप म्हणजे होमो-सॅपियनचे रूप केवळ वीस ते चाळीस हजार वर्षांपूर्वीच्या दरम्यान लाभले आहे. साठ-सत्तर हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीच्या प्रदेशात माणसे राहत होती, असे जर कोणी म्हणत असले; तर ते मानववंशशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्राचे घोर अज्ञान मानले पाहिजे.1 

मानवजाती (Human species) तिच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आफ्रिकेपासून ज्या-ज्या विविध भौगोलिक प्रदेशात गेली, तेथील पर्यावरणाच्या प्रभावामुळे तिच्यात रंगभेद, वंशभेद, शरीरयष्टीतील फरक विकसित होत गेला; परंतु तिचे मूळ आफ्रिकेत आहे. पहिला माणूस रंगाने काळाच असावा. म्हणून अमेरिकन निग्रो साहित्यात जो ‘Black is beauty’चा आग्रह धरला जातो, तो रास्तच मानला पाहिजे. माणूस हा पृथ्वीवर सर्वव्यापी (Ubiqutous) बनलेला असल्याने तो विशिष्ट प्रदेशाचाच आहे, असे मानता येत नाही. प्रदेश, राष्ट्र- राज्य, संस्कृती या माणसांनी अगदी अलीकडे जन्माला घातलेल्या नाहीत. जगात भारत हा एकमेव असा देश आहे, ज्यात सर्व वंशांचे आणि संस्कृतींचे लोक आजही दिसतात. त्यामुळे विशिष्ट प्रदेश आमचा आणि विशिष्ट दुसऱ्याचा, विशिष्ट संस्कृती आमची आणि इतर दुसऱ्यांची असा भेदभाव प्रारंभी नव्हता.

कोणतीही संस्कृती एकाकी राहून निर्माण आणि विकसित होत नसते. जगातील प्रत्येक संस्कृती विविध संस्कृतींच्या संकरातून विकसित झाली आहे. मानवजाती जीवन अस्तित्वाच्या संघर्षात जसजशी विघटित होत गेली तसतशी त्यांच्यातील पृथगात्मता वाढली. त्यामुळे कोणत्याही संस्कृतिरक्षकाला किंवा धार्मिक मूलतत्त्ववाद्याला आपली संस्कृती आणि धर्म शुद्ध रूपातील आहे, असे आज तरी म्हणता येणार नाही. तसे म्हणणे एक तर अज्ञानाचे प्रदर्शन करणारे ठरेल किंवा या कूपमंडुक वृत्तीमुळे बाष्कळ ठरेल. आजचे सर्व मूलतत्त्ववादी याच प्रकारात मोडतात, कारण त्यांचा वर्तानाशी संबंध तुटलेला असतो. तरीही या जाणून-बुजून अज्ञान पांघरणाऱ्या आणि कूपमंडुक बाष्कळ प्रवृत्तींचे आग्रह समाजविकासाच्या प्रक्रियेत इतिहासाच्या प्रत्येक संस्कृत्योत्तर कालखंडात ठोस रूपात स्पष्ट झालेले आहेत. यामागे मानवी गटांचे हितसंबंध होते आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांना त्या प्रकारे भूमिकाही घ्याव्या लागल्या होत्या. परंतु कालौघात त्या सोडूनही द्याव्या लागल्या होत्या. पाश्चिमात्य संस्कृतीने विसाव्या शतकाच्या उतरार्धात तिचे मूळचे सर्व आग्रह सोडून देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्याची चर्चा आपण पुढे करू.

या वसुंधरेवर माणसाचा आणि त्याच्या इतिहासाचा जन्म एकाच वेळी झाला आहे. जेकब बुर्कहार्टसारखे सांस्कृतिक इतिहासाचे भाष्यकार ‘‘माणसाचे निसर्गाशी असलेले जुने संबंध तोडण्यास किंवा निसर्गापासून मुक्त होण्यास माणसातील जाणीव-जागृती कारणीभूत होणे म्हणजेच इतिहासाचा जन्म होणे होय’’,2 असे मानतात. म्हणून माणसाने त्याच्या आजूबाजूची परिस्थिती समजावून घेण्यासाठी आणि स्वत:च्या कर्तृत्वाने त्या परिस्थितीला पोषक बनविण्यासाठी माणसांनी विवेकाचा उपयोग करून, त्याप्रमाणे वर्तन करण्याच्या दिशेने केलेल्या दीर्घकालीन प्रयत्नांच्या केलेल्या संघर्षाचा तपशील म्हणजे इतिहास होय, असे ई. एच. कार यांच्यासारख्या इतिहासतज्ज्ञांनी म्हटले आहे.3 म्हणूनच माणसाच्या आणि इतिहासाच्या जन्माची तारीख कोणालाही निश्चित सांगता येणार नाही. कारण ती उत्क्रांतीच्या अखंड चाललेल्या प्रक्रियेतून विकसित झालेली आहे.

डॉ.भालचंद्र नेमाडे यांना आपल्या प्राचीन सिंधू संस्कृतीचे फार आकर्षण आहे. तिच्यात असलेल्या मातृसत्तेच्या पुनरुज्जीवनाचाही त्यांनी ध्यास घेतला आहे. भारतातील जातिसंस्था श्रेणीबद्ध (vertical) नव्हती; तर सर्व जाती समपातळीवर आडव्या (Horizontal) होत्या, असे त्यांचे म्हणणे आहे. हा काळ भारतीय समाजात  नेमका कधी होता, हे ते सांगत नाहीत. सिंधू संस्कृती जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती असून ती समानतेवर उभी होती, हेही त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केलेले आहे. त्यामुळे कोणत्याही संस्कृतीची सुरुवात कशी आणि केव्हापासून होते, याच्या चर्चेला प्रारंभ करू.

वैश्विक असे काहीही नसते; जे असते, ते देशीच असते आणि सर्व देशी मिळून जो एक पुंजका तयार होतो, तोच वैश्विक असतो - ही  भूमिका ते सातत्याने आणि प्रामाणिकपणे मांडीत आहेत. त्यांच्या भूमिकेत थोडे-फार फरक झाले असले, तरी त्यांनी त्यांची मूळ भूमिका अबाधित ठेवली आहे. त्यांचे सिंधू संस्कृतीबद्दलचे आकर्षण त्यांच्या देशीवादाला मान्यता मिळविण्याच्या आवश्यकतेतून झाले आहे, हे तर स्पष्टच आहे. भारतात वैचारिक क्षेत्रात एक परंपरा सतत चालत आलेली आहे. वेदोत्तर काळात निर्माण झालेला प्रत्येक वैदिक संप्रदाय यांना त्या प्रकारे आपण वेदच प्रमाण मानतो, हे सिद्ध करण्याची धडपड करीत असे; कारण त्याशिवाय तो प्रस्थापित होणेच शक्य नव्हते. वेदप्रामाण्य हे त्याच्या प्रस्थापित होण्याची एकमात्र पूर्वअट असे.

नेमाडे हे काहीसे अवैदिक मार्गाने प्रवास करणारे लेखक असल्याने त्यांना त्यांचा पंथ प्रस्थापित करण्यासाठी सिंधू संस्कृतीचा आधार घेणे अपरिहार्य आहे. कारण भारतीय मुळाशी संबंध जोडल्याशिवाय कोणताही पंथ प्रस्थापित होऊ शकत नाही, हीच आपली परंपरा आहे. नेमाडे आणि ब्राह्मणी मूलतत्त्ववादी यांच्यात एकच फरक आढळतो. तो म्हणजे ब्राह्मणी मूलतत्त्ववादी हिंदू धर्माशी आपले मूळ जोडतो; तर नेमाडे यांना धर्मच उखडून टाकायचे असल्यामुळे व त्यांना सिंधू संस्कृती धर्मनिरपेक्ष वाटत असल्याने ते ब्राह्मणी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करण्याऐवजी जातिसंस्थेचा पुरस्कार करतात, एवढेच.

या ठिकाणी सुरुवातीलाच ‘माणसाचे’ एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य नोंदवून ठेवणे आवश्यक वाटते. ते म्हणजे वसुंधरेवरील माणसाचे अस्तित्व दोन विभागांत विभागले जाते. माणूस हा मानवजातीचा (species) एक अविभाज्य भाग असल्यामुळे तो वैश्विक पातळीवरील एक माणूस असतो. कारण त्याची मुळे संपूर्ण मानवजातीशी अतूटपणे जोडली जातात. अगदी कवी वसंत बापट यांच्या शब्दांत सांगायचे ठरले तर, ‘‘अन्याय घडो शेजारी की दुनियेच्या बाजारी ।

धावून तिथेही जाऊ स्वातंत्र्य मंत्र हा गाऊ ।।

 या प्रकारची अखिल मानवजातीसंबंधीची करुणा व प्रेम माणसाच्या मनात वसत असते आणि त्याला कोणताही प्रदेश अपवाद नसतो, हे ध्यानात ठेवले पाहिजे. थॉमस पेन यांच्यासारखा इंग्रज गृहस्थ अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धात व फ्रेंच राज्यक्रांतीत स्वत:ला झोकून देतो आणि ह्यूम व ॲनी बेंझट हे इंग्रज भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा पाया घालतात- हे त्यामुळेच घडते. म. ज्योतिराव फुले आपला गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेतील वंशवादाविरोधी लढणाऱ्या गोऱ्या लोकांना अर्पण करतात आणि कार्ल मार्क्स हे विशिष्ट प्रदेशाचा, राष्ट्राचा, संस्कृतीचा किंवा धर्माचा विचार न करता केवळ संपूर्ण मानवाचा (Total Man) विचार करतात, हे उगाच नाही. माणसाची दुसरी एक जगण्याची पातळी आहे. ती म्हणजे, त्याचे व्यक्तिगत जीवन. प्रत्येक माणूस वैशिष्ट्यपूर्ण असतो; कारण त्याच्यात विशेष प्रकारच्या क्षमता असतात आणि त्याचे प्रकटीकरण त्याला त्याच्या विशिष्ट भूप्रदेशात, संस्कृतीत, धर्मात, समाजात व राज्यव्यवस्थेत करायचे असते. म्हणून माणूस हा जसा वैश्विक असतो तसाच वैशिष्ट्यपूर्णही असतो. यापैकी कोणत्याही एका अंगावर भर देणे म्हणजे, अनेक अनर्थांना आमंत्रण देणे असते. माणसाचे मूळ रूप समजून न घेण्याचा तो परिणाम असतो.

संस्कृतीचा जन्म

संस्कृतीचा पाया ना कोण्या एका प्रदेशाने, ना एका वंशाने, ना राष्ट्राने घातला आहे. नेमाडे म्हणतात- ना तो सिंधू नदीच्या काठी वस्ती करणाऱ्यांनी पाच हजार वर्षांपूर्वी(?) घातला, ना बॅबिलोनियनांनी, ना सुमेरियनांनी घातला. ज्या गोष्टींच्या आधारे संस्कृती आकार घेते, त्या साधनांचा पाया मानवजातीने चार लाख वर्षांपूर्वीच घातला होता. अग्नी आणि धातूंचा शोध संस्कृतीच्या निर्मितीत किती महत्त्वाचा आहे, हे मोहेंजोदडो आणि हडप्पांच्या उत्खननावरून स्पष्ट होते. प्राथमिक माणसाजवळ त्याच्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी कोणतेही साधन नव्हते. त्याने हातांची निर्मिती केल्यानंतर ते क्रमाने विकसित झाले. स्वत:चा उदरनिर्वाह करण्यासाठी ती माणसाची मूलभूत गरज असल्याने ती केवळ निसर्ग भागवू शकत नव्हता. त्यासाठी त्याला शिकार करणे गरजेचे वाटत होते. म्हणून त्याने हत्यारे बनवायला सुरुवात केली. त्याची प्राथमिक स्वरूपाची हत्यारे म्हणजे गारगोटी, लाकडाची किंवा दगडाची सुरी, भाला अशी होती. अग्नीच्या शोधानंतर माणसांच्या निवासाचे प्रतीक अग्नी बनला. आपल्या निकटच्या पूर्वजाचे- होमो-इरेक्टसचे वीस हजार वर्षांपूर्वीचे हातांचे ठसे संशोधकांना जसजसे प्राप्त होत गेले; तसतशी त्याची प्राचीन निवासस्थाने गुहा होत्या, हे स्पष्ट झाले. त्या गुहांत निवारा शोधणे, उदरनिर्वाहासाठी फळे व कंदमुळे गोळा करणे आणि प्रसंगी शिकार केलेला पशू घेऊन येणे- हा त्याचा नित्याचा दिनक्रम बनला. त्याच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत तो जवळजवळ दहा लाख वर्षे याच अवस्थेत होता. त्याच्या या इतिहासपूर्व काळाचा अभ्यास करणाऱ्याजवळ काळाचे पुरावे नाहीत, हे खरे; परंतु आपल्या या आदि पूर्वजांनी काही पुरावे ठेवले होते. त्यांतील एक पुरावा म्हणजे, त्यांनी रेखाटून ठेवलेली गुहाचित्रे. युरोपातील हिमप्रदेशातील दूरवरच्या आल्तेमा, स्पेन किंवा दक्षिण फ्रान्स आणि अन्य ठिकाणी- ज्याचा उल्लेख यापूर्वी आलाच आहे- जी गुहाचित्रे सापडली आहेत, त्यावरून बरीच माहिती मिळते. जे. ब्रोनोवस्की यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा काळ वीस हजार वर्षांपूर्वीच्या आसपासचा असावा. दुसरा पुरावा म्हणजे आदिमानवाने करून ठेवलेली हत्यारे; ती प्रामुख्याने दगडी आणि लाकडी होती. इतर अनेक धातूंचा शोध लागल्यानंतर फार उशिरा लोखंडाचा शोध लागला. बॅबिलानियन किंवा अक्कड, सुमेरियन वगैरे संस्कृतींत लोखंड फार क्वचित दिसते. अर्थात, ते सिंधू संस्कृतीत अजिबात दिसत नाही. त्याची चर्चा आपण पुढे करणारच आहोत.

यावरून संस्कृती नावाच्या गोष्टीचा जन्म विविध प्रदेशांतील मानववंशाने वीस हजार वर्षांपूर्वीच चित्रे रेखाटून घातला होता आणि हत्यारे निर्माण करून तंत्रज्ञानाचा पाया घातला होता. कोणतीही संस्कृती कोणत्याही एका वांशिक गटाने जन्माला घातलेली नसते; त्याचप्रमाणे आजूबाजूला विविध संस्कृती असल्याशिवाय तिची वाढही होत नसते. या समकालीन संस्कृतीच एकमेकींच्या विकासाला हातभार लावत असतात. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात प्रत्यक्ष सहभागी असलेले पुरातत्त्ववेत्ते सिंधू संस्कृती ही एकात्म होती, असे मानत नाहीत. या उत्खनतात जे मानवी हाडांचे सांगाडे सापडले आहेत, ते भिन्न वंशांचे दिसतात. त्यात अस्ट्रालॉईड, अल्पाईन, मेडिटेरियन आणि मंगोल वंशाचे सांगाडे सापडले आहेत. यावरून सिंधू संस्कृतीच्या काठी पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वंशांचे लोक तिथे वसतीसाठी आलेले असणार, हे उघड आहे. त्यामुळे सिंधू संस्कृतीबद्दल वृथा प्रादेशिक अभिमान बाळगण्यासारखे आणि नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे तसा इतरांनीही बाळगावा, असे आवाहन करणे म्हणजे ‘भावनातिरेकी’- (hysteric) बनणे, असेच म्हणता येईल.

 डॉ. नेमाडे यांनी ‘संस्कृती म्हणजे परस्परसहकार्य  करणाऱ्या संबंधांचे जाळे’ (टी.स्व.-84-85) अशी संस्कृतीची व्याख्या केली आहे. या व्याखेत थोडेफार तथ्य असले, तरी ती फारच कामचलाऊ आहे. संस्कृतीच्या इतिहासात अनेकदा संस्कृती ही दमनाचे साधन बनलेली आहे. म्हणूनच सिग्मन फ्रॉइड यांनी धर्म आणि संस्कृतीविरुद्ध बंड पुकारले होते. एक व्यक्ती म्हणून संस्कृतीने माणसावर इतकी बंधने घातली होती आणि त्याच्या कामवासनेच्या तृप्तीवर इतके कठोर नियंत्रण ठेवले होते की, फ्रॉइड यांनी माणसातील साऱ्या मनोविकृतीचा स्रोत संस्कृती व धर्मात शोधला होता. ज्याला नेमाडे परस्पर- सहकार्य करणाऱ्या संबंधांचे जाळे म्हणतात, त्या जाळ्यातील एखाद्या गटाने सहकार्य करायचे नाकारले; तर प्रत्येक संस्कृतीने अशा गटांना वठणीवर आणण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबिले आहेत. भारतासारख्या देशात तर आजही त्यांच्यावर बहिष्कार टाकून, मारझोड करून, त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करून त्यांना त्यांची वंशपरंपरेची कामे करण्यास भाग पाडले जाते; परंतु ही संस्कृतींच्या विकासक्रमात घडून आलेली विकृती, असे आपण म्हणू शकतो. नेमाडे यांच्या संस्कृतीच्या जडण-घडणीतील या जाळ्यातील प्रत्येक समूह गटाचे इतरांशी कसे संबंध असतील, हे नीट कळत नसल्यामुळे मी तिला कामचलाऊ म्हणतो.

माणसांनी त्यांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत चित्रे रेखाटून आणि हत्यारे निर्माण करून संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा जन्मोत्सव साजरा केला, असे यापूर्वीच मी म्हटले आहे; परंतु त्याचा आधारही माणसातील एका नैसर्गिक प्रवृत्तीत आहे. मानवी उत्क्रांतीत जवळजवळ सात दशलक्ष वर्षांपूर्वी चिंपांझी आणि आधुनिक माणूस यांच्या पूर्वजात फूट पडली. त्यांपैकी एक शाखा चिंपांझीत उत्क्रांत झाली, तर दुसरी होमो-सॅपियन म्हणजे आताच्या माणसात उत्क्रांत झाली. तिला दोन लाख वर्षें झाली. माणसांनी माणसा- माणसात आणि मानवी गटा-गटात एकत्र येऊन जे एकमेकांशी संबंध प्रस्थापित केलेले असतात, त्यातून समाज निर्माण होत असतो. त्यांना एकत्रित बांधण्याचे काम संस्कृतीला करावे लागते. ही एका दृष्टीने जगण्याच्या  संघर्षात जिवंत राहण्यासाठी आणि कठीण काळात किंवा उपजीविकेच्या साधनांचा तुटवडा निर्माण झाल्यास, त्यातून मार्ग शोधून काढलेली व्यावहारिक डावपेचात्मक भूमिका होती. संस्कृती ही सतत बदलणाऱ्या क्रूर निसर्गाशी समायोजन (adaptation) करून माणसांना जगण्याची उमेद देत असते. प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ स्टॅन्ले अँब्रोसे (Stanley Ambrose) यांनी पन्नास हजार वर्षांपूर्वीच्या मानवी गटांच्या सांस्कृतिक प्रवृत्ती (traits) पहिल्यांदा शोधून काढल्या. त्यांनी संस्कृतीची व्याख्या साधी आणि सरळ अशी केली आहे- ‘संस्कृती म्हणजे माणसांनी जगण्यासाठी आखलेले व्यावहारिक डावपेच असतात’-Culture is a survival strategy’. सात दशलक्ष वर्षांपूर्वीपासून ते दोन लाख वर्षांपर्यंतचे अर्धानवी 24 प्रजातींचे (hominid species) हाडांचे सांगाडे (Fossil bones) मानववंशशास्त्रज्ञांनी आणि वैज्ञानिकांनी शोधून काढलेले आहेत. त्यांपैकी केवळ होमो-सॅपियन, म्हणजे आपली जाती (species) च टिकून राहिली. बाकीच्या सर्व जाती काळाच्या पडद्याआड गेल्या. होमो सॅपियनसुद्धा पन्नास हजार वर्षांपूर्वी क्रूर, शिकारी आणि अन्न गोळा करणारा (food gatherer) होता. तो त्यानंतरच खऱ्या अर्थाने ‘माणूस’ बनत गेला. हा काळ मानवी जीवनातील वर्तणुकीच्या दृष्टीने निसर्गापासून आणि निवाऱ्यासाठी व अन्नाच्या शोधासाठी फार बदल करणारा होता. त्यासाठी त्याला आपल्या गटाचे इतर गटांशी सहकार्य करण्यासाठी प्रेमाचे संबंध ठेवणे आवश्यक वाटू लागले. त्यासाठी एकमेकांना भेटवस्तू देण्या-घेण्यापासून सुरुवात झाली. भेटवस्तू (gift) ही प्रेम व्यक्त करण्याचे प्रतीक बनली. आदिमानवाने इतरांना दिलेली भेटवस्तू ही गळ्यातील हार होती. तो हार शहामृगांची अंडी एकमेकांत बांधून किंवा ओवून तयार केला जात असे. त्यासाठी त्या अंड्यांना मण्यांचे (beads) रूप देणे आवश्यक होते. अशा शहामृगाच्या अंड्यांपासून तयार केलेल्या माळा अगदी अलीकडे स्टॅन्ले ॲम्ब्रोसे यांनी शोधून काढल्या आहेत. त्या त्यांना मध्य केनियातील ‘हंकापुने या मुटो’ या गुहेत सापडल्या. आजही आफ्रिकेतील कुंगजसारख्या मूळनिवासी जमाती या प्रकारचे मणी तयार करीत असतात. त्यांचे कंठहार करून एकमेकांना भेटवस्तू म्हणून देत असतात. या त्यांच्या रूढीला Hxaro असा शब्द आहे आणि ती रूढी त्या लोकांनी अद्यापही चालू ठेवली आहे.

पन्नास हजार वर्षांच्या आसपास शेवटचे हिमयुग संपले होते, तरी त्याने मानवजाती उद्‌ध्वस्त केली होती. कारण तिची संख्या वाढत होती आणि अन्नाचा तुटवडा होता. त्यामुळे पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशात मात्र मानवजातीचे काही गट अस्तित्वात होते. जगण्यासाठी या विविध गटांना एकत्रित आणणे आवश्यक होते, म्हणून त्यांनी या प्रकारच्या कंठहाराची भेटवस्तू एकमेकांना देऊन प्रेमाचे संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. या आदिमानवाने भेटवस्तूंची एकमेकांत केलेली अदलाबदली म्हणजेच मानवी संस्कृतीची पहाट होती, हे नीट समजून घेणे आवश्यक आहे. कोणतीही संस्कृती आभाळातून पडत नसते. ती माणसाच्या जगण्याच्या आवश्यकतेतून जन्माला येते आणि तिचा वारसा विशिष्ट भूप्रदेशात नसतो, तर तो समाजविकासक्रमातून येत असतो.

नेल्सन उपसागराच्या जवळील गुहांत वीस हजार वर्षांपूर्वीची संस्कृती आणि आधुनिक शस्त्रे सापडलेली आहेत. त्यात शिकारीसाठी दुरून मारा करणारी धनुष्य- बाणासारखी हत्यारे सापडली आहेत; इतकेच नव्हे, तर आज आपण घरात जसे भांड्यात पाणी भरून ठेवतो किंवा प्रवासात पाण्याची बाटली वापरतो, तसाच वापर आदिमानव शहामृगाच्या रिकाम्या अंड्यांचा करीत असे. साधारणत: पन्नास हजार वर्षांपूर्वीपासून माणसाच्या शरीरातही बदल व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळे त्याच्या वर्तणुकीतही बदल होत होता. यांचाही संस्कृतीच्या उगमात मोठा वाटा आहे. अंटार्क्टिका सोडून संपूर्ण जग हे मानवजातीचे घर बनले होते. या प्रकारच्या संस्कृतीच्या विकासाने माणसांच्या उत्पादनसाधनांत आणि स्वसंरक्षणासाठी निर्माण केल्या जाणाऱ्या हत्यारांत सुधारणा होत होती. मानवी शरीरशास्त्रीय बदलाने (anatomical change) त्याच्या आनुवंशिकतेतही (genes) बराच बदल केला. अलीकडच्या जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजीने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. माणसाच्या मेंदूची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याने भाषेला जन्माला घातले.4

सिंधू संस्कृती

सिंधू संस्कृतीच्या उत्खननाची सुरुवात कोण्या देशी संस्थेने केली नसून, ती इंग्लडच्या आर्किऑलॉजी विभागाने केली आहे. त्या वेळी या विभागाचे डायरेक्टर जनरल सर जॉन मार्शल होते. ते स्वत:ही या कामात ई. जे. एच. मॅके आणि आर.ई.एम. व्हीलर या ब्रिटिश पुरातत्त्ववेत्त्यांसह सामील झालेले होते. त्यानंतर त्यात  अखंड भारतातील काही पुरातत्त्ववेत्ते सामील झाले. भारतात आर्यपूर्व सगळ्यात जुने शहर बिहारमधील पाटणा हे मानण्याची प्रथा होती आणि सिंधू संस्कृतीबद्दल ऋग्वेदातील ऋचांच्या साह्याने बराच चुकीचा अर्थ लावण्यामुळे तिच्याबद्दल काही अंदाज बांधला गेला होता. परंतु 1925 पासून पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या पोटात गडप झालेल्या व इतिहासाच्या पानांवरून हरवलेल्या अनेक नगरांचा शोध लावला. त्यांतील दोन मुख्य शहरे म्हणजे मोहोंजोदडो आणि हडप्पा ही होत. अर्थात, या प्रकारची शहरे इजिप्तमध्येही सापडलेल्या उत्खननात दिसतात. तिथे सापडलेली घरे तेथील राजांच्या भव्य थडग्यांच्या किंवा देवळांच्या मानाने नगण्य आहेत. सुमेरिया, अक्काड आणि बॅबिलोनिया येथेही ‘नगरे’ सापडली आहेत; परंतु त्यांच्या बांधणीत सिंधू संस्कृतीतील पद्धतशीरपणा दिसून येत नाही.

या ठिकाणी आपण एक गोष्ट मनात निश्चित बाळगली पाहिजे की, कोणत्याही प्राचीन समाजव्यवस्थेत वर्ग किंवा विविध स्तर (stratification) झाल्याशिवाय कोणतेही शहर निर्माण होत नसते. त्यासाठी त्या समाजात श्रमविभागणी होणे आवश्यक असते. किंबहुना, कोणत्याही संस्कृतीचा जन्म समाजात स्तर निर्माण झाल्याशिवाय होत नसतो. परंतु प्रश्न असा उपस्थित होतो की, ही शहरे नष्ट का झाली? अनेकदा इतरत्र त्यांच्यापेक्षा मोठी शहरे निर्माण झाली की जुन्यांचे महत्त्व संपत असावे किंवा आक्रमकांनी त्यांचा विध्वंस केला असावा. परंतु इराकमध्ये अशी शहरे आक्रमकांनी जिंकली, त्या जुन्या शहरांचा ताबा घेतला; परंतु त्या शहरांचा विनाश झाला नाही, त्यांच्यातील सातत्य टिकूनच राहिले. बॅबिलोनियाचा सुप्रसिद्ध राजा हम्मुराबी हा सुद्धा आर्यांसारखाच रानटी टोळ्यांचा वंशज होता, तरीही तेथील जुनी नगररचना आणि संस्कृती वृद्धिंगत झाली; परंतु भारतातील जुनी नगररचना आणि संस्कृतीची परंपरा खंडित का व्हावी? मेसोपोटेमिया येथील उत्खननावरून आणि त्यात सापडलेल्या अनेक पुराव्यांवरून इसवी सनापूर्वी तीन ते चार हजार वर्षांपूर्वी भारतातील नगरांचा त्यांच्याशी व्यापारी संबंध होता.

डी. डी. कोसंबी यांनी सिंधू संस्कृतीचा काळ इ. स. पूर्व तीन ते दोन हजार असा धरलेला आहे. त्याप्रमाणे या संस्कृतीचा शेवट इ.स.पूर्व 1750 असा धरला आहे. मोहेंजोदडो शहर तर जाळूनच टाकले गेले. तेथील आर्यांच्या- दास, दस्यू आणि पणि यांच्या कत्तलीच करण्यात आल्या. हडप्पा येथील उत्खननातील वरील स्तरांचा विध्वंस झाल्यामुळे तेथील पुरावा असा अंदाज करण्याइतपत पुरेसा नाही.5 यासाठी अनेक पुरावे ऋग्वेदांच्या ऋचांवरून सापडू शकतात.

आर्यांच्या शत्रूला ऋग्वेदात अनेक नावे आहेत. त्यात दास, दस्यू, पाणि:, अव्रत, शिश्नदेवा:, (म्हणजे लिंगपूजक) मूरा:, यातुघाना:, यातव: यांचा उल्लेख तुच्छतादर्शक या अर्थाने केला आहे. ऋग्वेदातील ऋचांचा अर्थ आजच्या कोणत्याही संस्कृत पंडिताला लावता येत नाही. त्यासाठी त्याला एक तर ऋग्वेदावरील सायनाचार्यांच्या भाष्याचा आधार घ्यावा लागतो किंवा यास्काच्या निरूक्ताचा. सायनाचार्यांनी ‘दास’ या शब्दाचा अर्थ ‘दासा अस्मदुपक्षयितार:’ म्हणजे ‘आमच्याकडून उपक्षय केला जाण्यास योग्य’ असा लावला आहे. दस्यूचाही अर्थ त्यांनी तसाच लावला आहे. ऋग्वेदात वर्णन केलेले शत्रू ‘दास’ अथवा ‘दस्यू’ हे समृद्ध शहरात राहणारे लोक असून त्यांच्या खेडेगावांशी कोणताही संबंध नव्हता, असा दावा ॲड. प्र. रा. देशमुख यांनी केला आहे.6 कोणतीही शहरे- मग ती प्राचीन असोत की अप्राचीन- ती खेड्यांच्या शोषणाशिवाय उभीच राहू शकत नाहीत, हे साधे समाजशास्त्रीय तथ्य त्यांना समजलेले दिसत नाही.

सिंधू संस्कृतीच्या कालखंडाबद्दल भारतीय मन फार हळवे आहे; कारण त्यांनी अशी समजूत करून घेतली आहे की, जे जास्तीत जास्त जुने तेच सोने असते. भारतीय प्रदेशातील कोणत्याही संस्कृतीचा किंवा साहित्याचा काळ दहा हजार वर्षांच्या मागे नेला की, ते जगातील सर्वांत प्राचीन आम्हीच आणि आमची संस्कृती सर्वश्रेष्ठ असा टेंभा मिरविता येतो. म्हणून आपल्याकडच्या ज्योतिषांनी सिंधू संस्कृतीचा काळ इ.स.पू. वीस हजार ते दहा हजार वर्षांपर्यंत नेऊन ठेवला आहे. ज्यांचा सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सिंहाचा वाटा होता, त्या सर जॉन मार्शल यांनी सुरुवातीला तिचा काळ इ.स.पूर्वी 2750 वर्षांचा ठरविला होता; परंतु विचारांती तो इ.स.पू. 2350 ठरविला. कारण त्यांना उत्खननात जे मणी सापडले, त्यांचा काळ त्यापलीकडे जात नाही. मॅक्स मुल्लर यांनी आर्यांचा भारतातील प्रवेशाचा काळ इ.स.पू. 1500 ठरविला होता. धर्मानंद कोसंबी यांनी तो इ.स.पू. दोन हजार ते सतराशे असा धरला आहे. दामोदर कोसंबींनीही साधरणत: तोच काळ मान्य केलेला दिसतो. त्यांच्या मताप्रमाणे, सिंधू संस्कृतीचा कालखंड हा इ.स.पू. तीन हजार ते दोन हजार वर्षांचा धरता येतो आणि तिचा शेवट इ.स.पू. 1750 च्या सुमारास झाला असावा. म्हणजे सिंधू संस्कृती साधारणत: हजार ते दीड हजार वर्षें टिकली असावी. डॉ. नेमाडे यांनी- ‘‘आपला इतिहास एवढेच सांगतो की, आर्य आले त्यापूर्वी द्रविड होते; तर हे असे नाही. आर्य फार अलीकडे आले. त्याच्याही साठ हजार वर्षांपूर्वीपासून आपल्याकडे लोक राहत होते. (स. प्र. उक्त)’’ असे सांगून तो काळ साठ हजार वर्षांपूर्वीपर्यंत नेला आहे.

वास्तविक पाहता, सिंधू संस्कृतीचा काळ इ.स. पू. तीन हजार वर्षांपूर्वीपलीकडे जाऊ शकत नाही. होमो-सॅपियनची निर्मिती दोन लाख वर्षांपूर्वीची मानली, तरी त्याची भटकी अवस्था दीड लाख वर्षांची होती. शेवटच्या हिमयुगाच्या शेवटी, म्हणजे पन्नास हजार वर्षांपूर्वी तो शेतीवर स्थिर झाल्यानंतर त्याने संस्कृती निर्माण केल्या. त्याला अवघी पन्नास हजार वर्षे लोटली आहेत. नेमाडे सांगतात त्या काळात कदाचित आपल्याकडे माणसे असतीलही, परंतु ती रानटी. नेमाडे जरी स्वत:ला अतिशय अभिमानाने पुरातत्त्व आणि मानववंशशास्त्राचे विद्यार्थी असल्याचे सांगत असले, तरी त्या ज्ञानशाखांचा त्यांना गंध दिसत नाही. त्या ज्ञानशाखांतील शास्त्रज्ञांची नावे सांगायला ते पटाईत असले, तरी त्यापैकी कोणीही नेमाडे यांच्यासारखा थिल्लरपणा केलेला नाही. म्हणून आपण तूर्त तरी या ज्ञानशाखांतील अभ्यासकांनी आणि शास्त्रज्ञांनी निश्चित केलेला काळ थोडाफार इकडे-तिकडे करून गृहीत धरू शकतो. त्यामुळे पुढील विवेचनाला दिशा मिळू शकेल.

आपण या ठिकाणी आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. ती म्हणजे, माणसाची जैविक (Biological) उत्क्रांती काहीशी सरळ रेषेत झालेली असली, तरी त्याची सांस्कृतिक प्रगती तशी झालेली नाही. त्याला बऱ्याच प्रमाणात निसर्गही जबाबदार आहे. म्हणूनच एक वेळ अशी होती की, माणसाची प्रगती आणि निसर्गनियम यांच्यात एक द्वैत दिसत होते. माणसाच्या प्रगतीचा सांधा निसर्गनियमांशी कसा जोडायचा, हा प्रश्न फार कठीण होता. तो सोडविण्यासाठी पहिल्यांदा पश्चिमेकडे झालेल्या प्रबोधनयुगातील विचारवंत पुढे आले. त्यांनी वरकरणी परस्परविरुद्ध वाटणारे दोन दृष्टिकोन स्वीकारले, कारण त्यांना माणसाला निसर्गाच्या विश्वात स्थान मिळवून द्यावयाचे होते. त्यांनी असे मानले की, निसर्गाचे नियम इतिहासाच्या नियमांसारखेच असतात. याउलट, त्यांची प्रगतीवरही श्रद्धा होती; परंतु निसर्ग हा प्रगतिस्वरूप आहे आणि त्याची वाटचाल उद्दिष्टसापेक्ष आहे, असे मानण्याला त्यांना आधार सापडत नव्हता.

जॉर्ज विल्यम फ्रेड्रिक हेगेल यांनी ही अडचण  सोडविण्यासाठी अशी भूमिका घेतली की, ज्याप्रमाणे इतिहास हा प्रगतिस्वरूप आहे, तसाच निसर्गही. उत्क्रांती आणि प्रगती यांना समानार्थी मानण्यात ज्या अडचणी होत्या, त्या डार्विनप्रणीत क्रांतीने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी दूर झाल्या, असे वाटू लागले. शेवटी इतिहासाप्रमाणेच निसर्गसुद्धा प्रगतिस्वरूपच आहे, हे स्पष्ट झाले. परंतु त्यामुळे एक गंभीर स्वरूपाचा गैरसमज होण्याचा मार्ग मोकळा झाला; कारण उत्क्रांतीचा उगम ज्यात आहे, तो जैविक वारसा आणि ऐतिहासिक प्रगतीचा ज्यात आहे, तो सामाजिक वारसा यांच्यात गल्लत होऊ लागली. आनुवंशिकतेने होणारी उत्क्रांती लक्षावधी वर्षांत मोजावी लागते. माणसात लिखित इतिहासाच्या प्रारंभापासून मोजता येण्यासारखा जैविक बदल झाल्याचे आढळत नाही. सामाजिक वारशाने होणारी प्रगती काही पिढ्यांत मोजता येते. मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. त्याचे सार हेच की, तो गतकालीन पिढ्यांचा अनुभव जमा करून आपल्यातील सुप्त सामर्थ्याचा विकास साधत असतो.

संस्कृतीच्या विकासात एका विशिष्ट कालखंडात एक विशिष्ट लोकसमूह नेतृत्वस्थानी असतो. मग त्याला आपण वर्ग, राष्ट्र, प्रदेश, संस्कृती असे कोणतेही नाव देऊ शकतो. परंतु तो घटक त्यापुढील कालखंडात तसेच नेतृत्व करील; याची शक्यता नसते. त्याचे सबळ कारण असे की, तो समूह आधीच्या कालखंडातील परंपरा, हितसंबंध व विचारधारा यांच्या इतका आहारी गेलेला असतो की, पुढच्या काळातील परिस्थितीशी आणि सामाजिक अपेक्षांशी जमवून घेण्यात तो पूर्णपणे असमर्थ ठरतो. म्हणून हे शक्य आहे की, एका समूहाला जो काळ ऱ्हासाचा वाटतो, तो दुसऱ्याला नव्या सुधारणांच्या उदयाचा वाटू शकतो. ज्या सामाजिक गटांनी कित्येक पिढ्या वर्चस्व गाजविलेले असते, त्यांना आपले समाजातील गेलेले श्रेष्ठ स्थान कोणत्याही प्रकारे टिकवायचे असते. इतर कोणत्याही गटाला श्रेष्ठस्थानी बसण्यास त्यांचा तीव्र विरोध असतो. आपल्या देशात सुरवातीला ब्राह्मणांचे हेच झाले. आज ग्रामीण विभागातले सामंत याच मनोवृत्तीचे पछाडलेले आहेत. डॉ. नेमाडे याच मनोवृत्तीचे प्रतिनिधी असल्याने एकीकडून ते ब्राह्मण व दलित यांना आव्हानात्मक मानत आहेत, तर दुसरीकडून सिंधू संस्कृतीशी नाळ जोडण्याच्या प्रयत्नात पाश्चिमात्य संस्कृती आणि आधुनिकीकरण यांचा तिरस्कार करीत आहेत.

यापूर्वी म्हटल्याप्रमाणे कोणतीही संस्कृती कोणत्याही काळात एकटी प्रगत होत नसते. ती तिच्या आजूबाजूच्या संस्कृतींशी प्रस्थापित केलेल्या संबंधाने आणि सहवासानेच प्रगती करू शकते. पंजाबातील- जो आज पाकिस्तानाचा भाग बनला आहे- त्यातील माँटगोमेरी जिल्ह्यात वसलेले हडप्पा आणि दक्षिणेकडील सिंध प्रांतातील लारखाना जिल्ह्यातील डोकरी गावापासून सात मैलांवर असलेले मोहेंजोदडो ही शहरे सिंधू नदीच्या काठी आहेत. या दोन शहरांतील अंतर चारशे मैलांचे आहे. आपल्याकडे ज्या काळात सिंधू संस्कृती अस्तित्वात होती, त्याच काळात तिच्या आजूबाजूलाही काही संस्कृती अस्तिवात होत्या, याचा पुरावा पुरातत्त्वाने पुढे आणला आहे. आजकालच्या मेसोपोटेमियाच्या आग्नेय दिशेला वसाहत करणाऱ्या लोकांना ‘सुमेरियन’ या नावाने ओळखले जात असे. या लोकांनी सुरुवातीला युफ्रेटिस आणि तैग्रिस या नद्यांच्या मुखाजवळ वसाहती केल्या. नंतर ते हळूहळू उत्तरेकडे पसरत गेले. लहान-लहान शहरे करून त्यात ते राहू लागले. त्यांच्या एकमेकांत लढायाही होत असत. त्याच वेळी सेमेटिक जातीच्या लोकांनी उत्तरेकडील प्रदेशावर आक्रमण करून तो काबीज केला. त्यांचा अरबांशी निकटचा संबंध दिसतो. हे लोक रानटी होते. त्यांनी सुमेरियनांना जिंकले, तरी भाषा सोडून सुमेरियन संस्कृती जशीची तशी स्वीकारली. पुढे जेव्हा त्यांनी दक्षिणेकडील सुमेरियन राजांना जिंकले, तेव्हाही त्यांची मूळचीच भाषा ठेवली. त्यामुळे मूळची सुमेरियन भाषा संस्कृत भाषेसारखीच मृत बनली. ती समजून घेण्यासाठी कोश व व्याकरणे रचावी लागली. या सेमिटन लोकांनी जिंकलेल्या उत्तर टापूला अक्काड (Akkad) किंवा अगादे (Agade) म्हणत, तर दक्षिण टापूला शुमेर (Shumer). या दोन्हीही प्रांतांना मिळून बॅबिलोनिया म्हणण्याचा प्रघात आहे. तिथे निर्माण झालेली बॅबिलोनियन संस्कृती इसवी सनापूर्वी चार-पाच हजार वर्षांपूर्वीपासून पुढे विकसित झाली, असे धर्मांनंद कोसंबी यांचे मत आहे.7

त्यानंतर बॅबिलोनियावर केशी (Kessi) लोकांच्या स्वाऱ्या होऊ लागल्या. इ.स.पू.1760 च्या सुमारास गंदश (Gandash) नावाच्या केशी राजाने आपले सार्वभौम राज्य स्थापन केले. हे केशी लोक पर्शिया आणि बॅबिलोनिया यांच्या दरम्यान असलेल्या एलाम नावाच्या प्रदेशात होते. ते घोड्यावर बसण्यात अतिशय पटाईत होते. त्यांनी संपूर्ण बॅबिलोनिया त्यांच्या या घोडदलाच्या सामर्थ्यावरच जिंकला. त्यापूर्वी बॅबिलोनियातील लोकांना घोड्याची माहिती नव्हती. आपल्याकडे ज्याप्रमाणे मालव, शक, हूण, गुर्जर, पर्शियन  इ. भिन्न जातीचे लोक हिंदुस्थानात आले आणि त्यांनी त्यांची मूळ संस्कृती सोडून हिंदू संस्कृती स्वीकारली. या केशी लोकांचा आर्यांशी निकटचा संबंध असावा, कारण आर्यदेखील घोड्यावर बसण्यात पटाईत होते. त्यांच्या भाषेमध्येसुद्धा खूप साम्य आहे. ऋग्वेदात अनेक ठिकाणी इन्द्राच्या घोड्यांना केशी हे विशेषण लावले आहे. यावरून भारतातील वैदिक संस्कृतीचा उगम बॅबिलोनियन संस्कृतीत स्पष्ट दिसतो. बॅबिलोनियन भाषा आणि ऋग्वेदातील ऋचांची भाषा यात कमालीचे साम्य आहे.

आजकालच्या सिंध आणि पंजाब भाषांना वैदिक काळी सप्तसिंधू म्हणत असत, हे ऋग्वेदाचनया अनेक ऋचांवरून स्पष्ट होते. ऋग्वेदात या प्रदेशाला ‘सप्तसिंधून’ किंवा ‘सप्तसिन्धुषु’ असाही शब्दप्रयोग वापरलेला दिसतो. अवेस्ता या ग्रंथात याच प्रदेशाला ‘हप्तहिन्दु’ म्हटले आहे. पुढे या प्रदेशाला सप्तसिंधू याच्या ऐवजी सिंधू म्हणण्याचा प्रघात पडला असावा. आज ज्या उरबडवेपणाने आपल्यातील काही लोक स्वदेशी म्हणून ज्या ‘हिंदू’ शब्दाचा जप करीत असतात आणि हिंदू या नावाने कादंबऱ्या लिहितात, त्यांना हे समजून सांगितले पाहिजे की; सिंधू नदीच्या अलीकडील लोकांना वैदिक संस्कृती ‘सिंधू लोक’ असा शब्द वापरीत असे, ‘हिंदू लोक’ असा नाही. ‘हिंदू’ या शब्दाचा उगम पर्शियन भाषेत आहे. हिंदू हे नाव आपल्याला त्यांनीच दिले आहे आणि ‘हिंदुस्थान’ही त्यातूनच निर्माण झाले आहे.

या विवेचनावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की, इतिहासपूर्व व प्राचीन मानवजातीला पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशाच्या मर्यादा नव्हत्या आणि त्यांनी आपापल्या पद्धतीने संस्कृतींचा पाया घातलेला होता. ज्या काळात सिंधू संस्कृती अस्तिवात होती, त्या काळात इतरही संस्कृतींचे अस्तित्व होते. त्यामुळे आमचीच संस्कृती प्राचीन आणि श्रेष्ठ, असा दावा फॅनॅटिक सोडून कोणीही माणूस करू शकत नाही.

आजच्या पाकिस्तानातील सोन व्हॅली येथील उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरून तेथील अश्मयुगातील मानव लेव्हॉलाईस पद्धतीने आपली दगडी हत्यारे अणकुचीदार करीत असे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या उत्खननातील पुराव्याचा काळ साधारणपणे इ.स.पू. दहा ते पाच हजार यामधील असावा, असा अंदाज आहे. संबंध युरोपातील प्रदेशात झालेल्या उत्खननात जी हत्यारे सापडली, तीही या प्रकारची आहेत. इ.स.पू. पाच हजार वर्षांच्या काळात वापरल्या गेलेल्या दगडांच्या लहान अवजारांचे (मायक्रोलिस) साठे मात्र युरोपपासून ते पॅलेस्टाइनपर्यंत सर्व प्रदेशात आढळून येतात. तसेच त्यांचे सातत्य इराण आणि अफगाणिस्तान येथील गुहांतून सापडते. तशाच दगडी हत्यारांत भारतातही सापडणारी या प्रकारची हत्यारे आणि साधने याच काळातील असावीत. यावरून आपण असे म्हणू शकतो की, प्रागैतिहासिक मानवी समाजाची परिस्थिती सर्व प्रदेशात जवळजवळ सारखीच होती. त्यामुळे कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ, असा बाष्कळपणा करणे सर्वथा अयोग्य आहे.

सिंधू-संस्कृतीचे पुरातत्त्वाने शोधलेले पुरावे

मोहेंजोदडो व हडप्पा येथे उत्खनन कोणी आणि कसे केले आहे, यासंबंधीचे विवेचन यापूर्वी आलेलेच आहे. आता आपल्याला तेथील उत्खननात कोणते पुरावे मिळाले आहेत, याचा विचार करावयाचा आहे.8 एच. आर. हॉल्फ यांनी असे निदान केले होते की, सुमेरियन लोकांनी आपली संस्कृती सिंधू तीरापर्यंत वाढविली असेल. सिंधू खोऱ्यातील मोहेंजोदडो आणि हडप्पा या दोन शहरांत विलक्षण साम्य होते. ही दोन्हीही शहरे साधारणत: एक चौरस मैल क्षेत्रफळाची असावीत. काही संशोधक त्यांचा परिघ अंदाजे साडेतीन मैलांचा असावा, असे मानतात. त्यातील घरे प्रमाणशीर आणि मोठ्या आकाराची असावीत. तेथील रस्ते रुंद असून, सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी गटारांची व्यवस्था होती. या घरांपैकी एक घर फारच मोठे दिसते. मॅकेने त्याला मोहेंजोदडोचा ‘महाल’ असे नाव दिले असले, तरी हे 180’ X 70’ या आकाराचे घर एका समृद्ध व्यापाऱ्याचे असावे. त्याच्या आजूबाजूला जी त्याच्यापेक्षा बरीच लहान घरे आहेत, ती इतर व्यापाऱ्यांची असावीत. या मोठ्या घराच्या उत्तरेकडील भिंत भरगच्च विटांनी बांधली असून काही ठिकाणी तर तिची जाडी सात फुटांची आहे. तिथे सापडलेल्या जिन्यावरून त्याला वरचे मजलेही असावेत, असे वाटते. त्यांच्यासाठी जाड तुळयांचा केलेला वापर, त्याच्या पुढील बाजूस अंगण, स्वत:ची विहीर, स्नानगृह व शौचालय, सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांची साफ करणारी यंत्रणा... या शहराची जेव्हा निर्मिती झाली असेल, तेव्हा त्यांच्या घरांची उंची जमिनीच्या पातळीपेक्षा तीस ते पन्नास फूट उंच असावी. या शहरांच्या वसतीचा काळ साधारणत: दीड हजार वर्षांपूर्वीचा असावा. या घरांच्या आजूबाजूच्या 12’x20’ आकाराची पातळ भिंतींची घरे सापडली आहेत. संशोधकांनी त्यांना मजुरांची वस्ती असे नाव दिले आहे.

ही दोन्हीही शहरे एकाच राजाच्या साम्राज्याचा भाग असावीत. त्या नोकरदारवर्ग, धर्मगुरूंचा वर्ग, मध्यम वर्ग, व्यापारी वर्ग आणि बाजारपेठाही असाव्यात. या प्रत्येक शहराला एका वेगळ्या किल्ल्याच्या परिसराच्या स्वरूपाची एक छाप होती. त्यातील इमारती बहुधा पूजाविधीसाठी वापरल्या जात असाव्यात. या दोन्हीही शहरांना मजबूत तटबंदी होती. ती दोन्हीही शहरांच्या वायव्य बाजूस 400x200 वार चौकोनी आकाराची दिसते. त्या तटबंदीच्या आत राजा, धर्माधिकारी इ. लोक राहत असावेत. सामान्य जनता त्या तटबंदीच्या बाहेर वस्ती करून राहत होती. या दोन्हीही शहरांत तटबंदीच्या बाहेर राहणाऱ्या कामगारांच्या छोट्या-छोट्या झोपड्या सापडल्या आहेत. ते लोक बहुधा गटारे साफ करणारे, मैला वाहून नेणारे असावेत. सन 1946 मध्ये व्हीलरने हडप्पाचे उत्खनन केल्यानंतर त्या शहरालाही तटबंदी, खंदक, प्रवेशद्वारे होती, हे निश्चित झाले. या शहरात राहणारे लोक काळ्या रंगाचे होते. ऋग्वेदातील त्यांचा- म्हणजे आर्यांच्या शत्रूंचा- उल्लेख अनेक ऋचामध्ये ‘कृष्णा:’ असा केलेला आहे. काही ठिकाणी ‘कृष्णयोनी:’ असाही केलेला आढळतो. येथील दास, दस्यू, पणि इ. लोक- ज्यांचा यापूर्वीच उल्लेख केला आहे ते- राहत होते. सिंधू प्रदेशात आर्यांच्या आगमनानंतर ते एकमेकांचे शत्रू बनले.

सिंधू संस्कृतीतील या आर्यपूर्व लोकांजवळ गाई आणि घोड्यांव्यतिरिक्त भरपूर पशुधन होते. तिथे सोने, तांबे इ. धातू आणि हिरेही मुबलक प्रमाणात सापडले आहेत. हे सिंधू लोक- विशेषत: त्यातील पणि हे- सुमेर संस्कृतीपर्यंत दूरवर व्यापार करणारे होते. सुमेरमध्ये ‘उमा’ आणि ‘लगारा’ या दोन ठिकाणी सिंधू घाटाच्या खापराच्या मुद्रा सापडल्या आहेत. त्या सिंधू लोकांनी सुमेरियन संस्कृतीत नेल्या, की सुमेरियनांनी सिंधू संस्कृतीत पाठविल्या, हे निश्चित करता येत नाही. कारण या दोन्हीही संस्कृती समकालीन होत्या. मेसोपोटेमियातील आणि सिंधूकाठी घडत असलेल्या समांतर घटनांवरून, उत्पादक अवजारांवरून व इतर अवशेषांच्या तौलनिक अभ्यासावरूनच या संस्कृतीबद्दल काही ठोस निष्कर्ष काढता येणे शक्य आहे. या शहरात अनेक मौल्यवान गोष्टी सापडतात. सिंधू संस्कृतीतील मजुरांच्या एका वस्तीत सोने, चांदी, जडजवाहीर पुरून ठेवलेले आढळतात. ते बहुधा एखाद्या मजुराने चोरलेले असावेत. हे लोक तांबे आणि ब्रॉंझच्या अवजारांचा उपयोग करीत असत. नीटनेटकी दगडी अवजारेही त्यांच्या उपयोगात होती. कापसाचे कापड, ते रंगविणे, कुंभाराच्या चाकावर तयार केलेल्या नक्षीकाम केलेल्या वस्तू, चाकाच्या गाडीला जुंपलेली जनावरे या गोष्टी त्यांनी कोरलेल्या मातीच्या आणि ब्राँझच्या मुद्रांवरून दिसतात.

या संस्कृतीचे प्रसरण होऊ शकले नाही, कारण त्या दृष्टीने ती असमर्थ होती. कारण गंगेच्या खोऱ्यात आणि भारताच्या दक्षिण द्वीपकल्पात प्रचंड जंगले होती. ती कापून जमीन स्वच्छ करणारी हत्यारे त्यांच्याकडे नव्हती, कारण तोपर्यंत लोखंडाचा शोध त्यांच्यापर्यंत पोचलेला नव्हता. आर्यपूर्व सिंधू संस्कृती ही ब्राँझयुगाची प्रतिनिधी होती. या संस्कृतीचा विनाशही लोखंडाच्या शोधाशी निगडित आहे. लोखंडाचा शोध पहिल्यांदा अर्मेनियातील किझ्वादना प्रदेशात लागला. तो शोध तेथील मिटानियन आर्यांनी बराच काळ गुप्त ठेवला होता. तरीही इ. स. पूर्वी एक हजार वर्षांच्या सुमारास मध्य-पूर्वेत लोखंडाचा उपयोग सार्वत्रिक झाला होता. लोखंडाच्या उपयोगाने इराणमधील शेतीची अर्थव्यवस्था इ.स.पूर्वीच्या हजार वर्षांपूर्वीच्या काळात कमालीची सुधारलेली होती. मार्शल यांच्यासारख्या पुराणवस्तुशास्त्रज्ञांना भारतातील तक्षशिलेजवळील उत्खननात जी हत्यारे सापडली, ती इ.स.पूर्वीच्या सातव्या शतकातील आहेत. मीरत शहराजवळील हस्तिनापूर येथील उत्खननातून इ.स.पूर्व अकराशे ते आठशे या काळात भारतात लोखंडाचा वापर सार्वत्रिक झाल्याचा पुरावा सापडलेला आहे. ऋग्वेदातील आर्यांच्या सिंधू संस्कृतीवरील विजयोत्सवाचा तपशील या पुराणवस्तुशास्त्रातील शोधाच्या पार्श्वभूमीवर तपासला, तर आर्यांचे सामर्थ्य आणि सिंधू संस्कृतीच्या मर्यादा आपल्या सहज ध्यानात येतील.9

सर्व अतिप्राचीन संस्कृती या नाईल, तैग्रिस, युफ्राटिस, डॅन्युब अशाच नद्यांच्या काठांवर उदयास आल्या. नाईल नदीच्या भोवतालचा प्रदेश, तैग्रिस व युफ्राटिसच्या दुआबातील प्रदेश हे अशाच गाळाच्या जमिनीचे होते. डॅन्युब नदीच्या किंवा अत्यंत जुन्या संस्कृतीच्या प्रमुख स्थानांचा परिसर अशाच गाळाच्या निर्वृक्ष प्रदेशाचा होता. अमेझॉन आणि मिसिसिपी या जगातील सर्वांत मोठ्या नद्या असल्या, तरी तिथे कोणतीही संस्कृती आकार घेऊ शकली नाही; कारण त्यांच्या काठांवर अतिशय दाट जंगले होती. ती लोखंडी अद्ययावत साधनांशिवाय साफ करणे शक्य नव्हते. इ.स. पूर्वी पहिल्या हजार वर्षांच्या काळात नागरी संस्कृतीचा उदय होण्याच्या काळातच सिंधू संस्कृतीच्या स्मृती लोप पावल्या होत्या.

सिंधू संस्कृतीचे सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणजे, धान्य उत्पादनाचे तंत्र होय. त्याचे वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी तिची तुलना इजिप्त आणि मेसोपोटेमियातील संस्कृतींशी करावी लागेल. कारण त्या संस्कृतीसुद्धा नद्यांच्या काठांवरच उगम पावल्या होत्या. सिंधू खोऱ्यात फक्त मोहेंजोदडो आणि हडप्पा ही दोनच शहरे आढळतात. त्यांच्या मानाने बाकीच्या वस्त्या फार तुरळक आहेत. इजिप्तमध्ये नाईल नदीच्या खोऱ्यात तो प्रदेश संकुचित असूनसुद्धा त्यात जास्तीत जास्त दाट वस्त्या होत्या. नाईल नदीच्या काठावरील सातशे पन्नास मैल लांबीच्या क्षेत्रात दहा हजार चौरस मैलांची जुन्या प्राथमिक अवस्थेतील शेती कसली जात होती. रोमन काळात तिथे जवळजवळ सत्तर लाख लोकसंख्या होती, त्याशिवाय रोमसारख्या शहराला शेतीतून झालेले अतिरिक्त उत्पादन पुरविले जात होते. त्याचप्रमाणे भूमध्य समुद्राच्या भोवतालच्या प्रदेशात त्या धान्याचा व्यापार होत असे. नाईल नदीच्या खोऱ्याची रुंदी जास्तीत जास्त तीस मैलांची आहे. नदीच्या काठावरील सुपीक जमीन मात्र दहा मैल रुंदीपेक्षा अधिक नाही. इजिप्तमध्ये पावसाचे प्रमाणही फार नाही. जी काही सुपीक जमीन तयार होते, ती त्या पावसाने येणाऱ्या पुरात वाहून आलेल्या गाळामुळे.

मेसोपोटेमियातील इ. स. पूर्व तीन हजार वर्षांपूर्वीची शेती ही नद्यांचे पाट काढून त्यांच्यावर केली जाई. सिंधू खोऱ्यापेक्षा तेथील प्रदेशाची व्याप्ती कमी असतानाही आणि जमीन त्या मानाने कमी सुपीक असतानाही तिथे जवळजवळ बारा मोठी नगरे आणि अनेक छोटी नगरे अस्तित्वात होती, असे दिसून आले आहे. त्यांच्याभोवतीच शेती कसली जात असे. त्या शहरातून स्वतंत्र उत्पादन व्यवसाय व नगरराज्ये (City states) निर्माण झालेली होती. त्यांच्यात आपापसात लढायाही होत असत. या दोन संस्कृतींच्या मानाने सिंधू प्रदेश एवढा अफाट असतानही तिथे केवळ दोनच शहरे का दिसतात? इजिप्तमधील फिरोहांच्या पिरॅमिडसारखी प्रचंड स्मारके किंवा मेसोपोटेमियातील संस्कृतीप्रमाणे विविध शहरांची स्थापना का दिसत नाही? याचे प्रमुख कारण- सिंधू संस्कृतीत इतर संस्कृतींच्या मानाने तंत्रज्ञानाचा विकास होऊ शकला नाही. कालवे किंवा पाट काढून लोखंडी नांगराने शेती करण्याची पद्धती नव्हती. सिंधू संस्कृतीतील जनसमुदायाने कालवे तयार केले नाहीत, हे खरे; परंतु त्यांनी पुराच्या पाण्यांना अडविणारी धरणे मात्र बांधली होती. त्यामुळे अडविलेले पाणी पाहिजे तेथे पसरविले जाई.

सिंधू संस्कृतीचा सांस्कृतिक व तांत्रिक पाया आणि मेसोपोटेमियन संस्कृतीचा पाया समान आढळतो. ही गोष्ट मापनविज्ञान (metrology) या आणि बोधचिन्हात्मक प्रतिमाने (motifs) यांत झालेल्या संशोधनावरून स्पष्ट होते. उदा.- उघड्या अंगाचा, दाढी वाढलेला, सिंहास मारणारा मेसोपोटेमियातील गिलगमेश हा वीरपुरुष ग्रीक हेरॉक्लिजसच्या धर्तीचा असून त्याचाच एक प्रतिनिधी सिंधू खोऱ्यातील विशिष्ट छापासह आढळतो. ह्या वीरपुरुषाचा मित्र एंकिडू किंवा इयाबानी हा वृक्षपुरुषदेखील स्थानिक आविष्कारात सिंधू संस्कृतीतील एका शिक्क्यावर आढळतो. जेमदेतनास्त्र काळी आपणास आढळणारा अर्धे शरीर बैलाचे आणि अर्धे हत्तीचे असा वृक्षहस्तियुक्त प्राणी हा सिंधू संस्कृतीतील चित्रावरून एका मेसोपोटेमियन कलाकाराने स्थानिक शैलीत नकललेला आढळतो. हे संमिश्र प्रतीक भारतात युगानुयुगे चालत आलेले आहे. इतिहासात त्याला नंतर गूढ गुणवत्ता असलेल्या तांत्रिक गजवृषभाचे स्वरूप आलेले दिसते. सिंधू संस्कृतीतील कलेचा आणि चित्रलिपीचा बराच भाग इसवी सनाच्या सहाव्या शतकात नोंदल्या गेलेल्या हिंदू धर्मातील तांत्रिक प्रतीकांशी तंतोतंत जुळतो. त्याचे गूढत्व अद्यापही कायम आहे. सिंधू संस्कृतीत सापडलेल्या शिक्क्यावरील चतुर्बाहू मानवी प्रतीक अद्यापही हिंदू मूर्तिकलेत दिसते. आजच्या टी.व्ही.च्या जमान्यात एकाच वेळी इडली, डोसे, मेदू वडा झटपट करण्याऱ्या सुंदर स्त्रीलाही चार-सहा हात असल्याचे दाखविले जाते. दुर्दैवाने सुमेरियन आणि हिहाईट अवयवदर्शक अक्षरमालिके(sullabaru) च्या साह्याने सिंधू संस्कृतीत सापडलेल्या शिक्क्याबाबतच्या कथा उलगडविण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला नाही. प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. आर. डी. बॅनर्जी हे त्यांच्या मित्रांना सांगत असत की, मोहेंजोदडो येथे त्यांनी एक दंतवर्णीय लिपी शोधून काढली होती; परंतु इतर संशोधकांची अकार्यक्षमता उघड करण्यासाठी त्यांनी ती गुप्त ठेवली, योग्य वेळी ते ती पुन्हा शोधून काढण्याच्या विचारात होते. त्यांचे हे विधान कोणीही गंभीरपणे घेतले नाही. त्यातच त्यांचे निधन झाले.

आता आपण सिंधू संस्कृतीतील समाजरचनेचा विचार करू. कोणतीही संस्कृती समाजात वर्ग किंवा विविध सामाजिक स्तर निर्माण झाल्याशिवाय निर्माणच होऊ शकत नाही, असे आपण यापूर्वीच म्हटलेले आहे. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरून ते आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. मोहेंजोदडो आणि हडप्पा या दोन्हीही शहरांचा विचार केला, तर त्यांची नगररचना स्पष्टपणे तीन विभागांत झालेली आहे. पहिला विभाग हा मजबूत किल्ल्याच्या तटबंदीचा दिसतो. तिथे उच्चवर्गीय लोकांचे- म्हणजे राजा असेल तर त्याचे, पुरोहितांचे आणि उच्चाधिकाऱ्यांचे वास्तव्य असावे. सामान्य जनता त्याबाहेरील तटबंदीत राहत असावी. त्यात शेतकरी, व्यापारी, हुन्नरी कलाकार इ. चा समावेश करता येईल. या तटबंदीच्या वायव्य दिशेला तिच्या बाहेर कामगारांच्या, मजुरांच्या, साफसफाई करणाऱ्या वर्गाच्या वस्त्या आहेत. त्यांना शहराच्या तटबंदीच्या आत वस्ती करून राहण्यास मज्जाव असावा. म्हणूनच ते तटबंदीच्या बाहेर राहत असणे स्वाभाविक आहे. या प्रकारची नगररचना या दोन्हीही शहरांत सापडली आहे. याचा सरळ अर्थ, तेथील समाज वर्गीय होता. आणि नेमाडे म्हणतात तसे हे वर्ग आडवे नव्हते; तर उभे-श्रेणीबद्ध होते, हे त्यांच्या वस्त्यांच्या स्थानांवरूनच स्पष्ट होते.

मंदिर आणि इतर संस्थांच्या जवळ धान्याची मोठमोठी कोठारे उत्खननात सापडली आहेत. ते धान्य दळण्याचे ओटेही त्यांच्याशी संलग्न आहेत. तिथे लाकडी उखळही सापडले आहेत. त्यात तण किंवा तसू असलेली धान्ये कुटत असावेत. त्याचप्रमाणे तेथील प्रत्येक घरात धान्य दळण्याची जाती (soddle quern) सापडली आहेत. या मोठ्या धान्याच्या कोठाराच्या आजूबाजूला अतिशय छोटी घरे आहेत. ती कामगारांची किंवा गुलामांची वस्ती असावी. मेसोपोटेमियातील उत्खननात अशाच छोट्या वस्त्या आढळल्या आहेत. तिथे कुंभारांचा बराच मोठा वर्ग अस्तित्वात असल्याशिवाय प्रमाणित नमुन्याची मातीच्या भांड्यांची चाकावरून केलेली घाऊक निर्मिती शक्यच होऊ शकली नसती. त्या शहरांच्या चतु:सीमेवर  आढळलेल्या वीटभट्ट्यांवरून ही गोष्ट निश्चित होते. तिथे दगडांची आणि ब्राँझची सुबक हत्यारे सापडलेली आहेत. तेथील व्यापारी आपल्या वस्तुविनिमयात तांबे आणत असण्याची जास्त शक्यता दिसते.

या शहरांच्या उत्खननकाळात बऱ्याच मौल्यवान वस्तू आणि विटांची लूटमार झाल्याने बऱ्याच गोष्टींवर प्रकाश पडत नाही. सिंधू संस्कृतीत राज्यसंस्थेचा (state) उदय झाल्याची फारशी चिन्हे दिसत नाहीत, कारण राज्य स्थापन होण्यासाठी सत्ताधारी वर्गाकडे भक्कम हत्यारे असावी लागतात. तिथे सापडलेली हत्यारे फार किरकोळ स्वरूपाची आहेत. तिथे तलवारीसारखे धारदार हत्यार कुठेच सापडले नाही. तिथे सापडलेले धनुष्य-बाण या मानवाच्या उत्कांतीतील शिकारी अवस्थेचे प्रतीक आहे. इजिप्शियन संस्कृतीतील सापडलेल्या चित्रलिपीचे आकार प्रदीर्घ काळ पुसले गेलेले दिसत नाहीत. तिथे धार्मिक व व्यावहारिक विषयांवर भरपूर लेखन झालेले आहे. मेसोपोटेमियन संस्कृतीतसुद्धा चित्रलिपीच्या (hierographic) ऐवजी बाणाकृती (cuneiform) मुळाक्षरे आणि अवयवदर्शक अक्षरमालिका (sulla bary) काढलेली दिसून येते. त्याचप्रमाणे व्यापाराच्या असंख्य पाट्या, हम्मुराब्बीचे कायद्यांचे संकलन, जमिनीच्या हस्तांतरांचे- गुलामांच्या विक्रीचे- मंदिरातील प्रार्थनांचे- महाकाव्याच्या नोंदी व लेख प्राप्त झालेले आहेत. सिंधू संस्कृतीत मात्र मोहेंजोदडो येथे शिक्क्यावरील तुरळक ओळी आणि मडक्यावर कोरलेला मजकूर याशिवाय काहीही सापडलेले नाही. वास्तविक पाहता, सुमेरियन संस्कृतीचा सिंधू संस्कृतीशी व्यापाराच्या निमित्ताने इतका जवळचा संबंध असतानाही त्यांच्या पद्धतीप्रमाणे मातीवर विरून जाणार नाही अशा स्वरूपाची अक्षरे काढण्याचे सिंधू लोक का शिकले नाहीत, याचे आश्चर्य वाटते. सिंधू संस्कृतीत जे मंदिराच्या प्रभावाखालील शहराच्या भूमीच्या नकाशाचे चित्र सापडले आहे, ते व्यापाऱ्यांच्या देवीमातेचे असावे. त्या मंदिराच्या सुरक्षिततेसाठी आणि देवीमातेची कृपा व्हावी, म्हणून या मंदिरास व्यापारी कर देत असत. त्यामुळे मंदिरात अपार संपत्ती साचत असे. ही परंपरा भारतात अद्यापही चालू आहे.

अगदी प्राचीन काळातही मेसोपोटेमियात सात प्रमुख मोठी शहरे होती. त्यांना वेगवेगळे सात पालक देव होते. त्यातूनच आपल्याकडे सप्तर्षींच्या कथेचा जन्म झाला असावा. या सातांचे प्रतिबिंब सिंधुकालीन शिक्क्यांवर तसेच नंतरच्या पारपंरिक ब्राह्मणांच्या सात गोत्रांच्या सिद्धांतावर पडलेले आहे. सिंधू संस्कृती कुंठीत होण्याचे प्रमुख कारण त्यांच्या शेती उत्पादनाच्या साधनांच्या प्रतीत कोणतीही सुधारणा न होणे, हे असण्याचा दाट संभव आहे. कारण या संस्कृतीत मेसोपोटेमियन संस्कृतीतील शिक्क्यांवर चित्रित केलेले नांगर दिसत नाहीत. त्यांच्याकडे एकच हत्यार दिसते. ते म्हणजे, एकच दाते असलेला कुळव (harrow) हे होय. त्यामुळे सिंधू संस्कृतीतील लिपीत कुळव आणि आज आपण बागकाम करताना वापरतो तसा लोखंडाऐवजी इतर धातूपासून बनविलेला पंजा (rake) ही एक चित्रमय खूण होऊन बसलेली आहे, एवढेच. इ.स.पूर्व 3101 हे वर्ष कलियुगाच्या प्रारंभाचे वर्ष भारतीय हिंदू संस्कृती मानते. त्यापाठीमागे कदाचित मानवी संस्कृतीचा उदय म्हणजे ऱ्हासकाळाची सुरुवात, असाही विचार असावा.

शेवटी ॲड. प्र.रा. देशमुख यांनी सिंधू संस्कृतीतील ज्या जातिसंस्था आणि अस्पृश्यतेकडे लक्ष वेधून घेतलेले आहे,10 त्याचा विचार करणे महत्त्वाचे वाटते. अर्थात, या प्रकारचा विचार त्यांनी एकट्यांनीच मांडलेला आहे, असे नाही; तसे मानणारे अनेक संशोधक होते. मनुस्मृतीतील दहावा अध्याय हा जातिव्यवस्थेच्या निर्मितीला वाहिलेला आहे. अर्थात, त्यांचा आधार विवाहाच्या अनुलोम, प्रतिलोम वगैरे ज्या पद्धती आहेत, तोच आहे. वास्तविक पाहता, आर्य हे मूर्तिपूजकही नव्हते आणि त्यांच्या वर्णव्यवस्थेशी वर-वर पाहता जातिसंस्थेशी काही संबंध असावा, असेही फारसे दिसत नाही. जातींची निर्मिती समाजव्यवस्थेतील वेगवेगळ्या कामांवरून झाली, हे उघड आहे. देशमुख यांचे म्हणणे असे आहे की, जाती या सिंधू संस्कृतीचाच भाग आहेत. सिंधू संस्कृती ही जातिप्रधान व्यवस्था होती. तिच्यात निरनिराळी कामे करणारे वर्ग होते. त्यांचीच स्वतंत्र जात निर्माण झाली. आर्यांची सत्ता भारतात प्रस्थापित झाल्यानंतर त्यांनी सिंधू संस्कृतीतील आर्यपूर्व लोकांचा समावेश त्यांच्या चातुर्वर्ण्यांतील वैश्य आणि शूद्र वर्णात केला. त्यामुळे ब्राह्मण व क्षत्रिय उच्चस्थानी राहिले, कारण ते आर्य होते; तर वैश्य व शूद्र खालच्या स्थानात गेले. हे वैश्य आणि शूद्र प्रामुख्याने अनार्य असल्यामुळे सिंधू संस्कृतीतील अगोदरच कामाच्या स्वरूपावरून निर्माण झालेल्या जाती त्यांना कायमच चिकटल्या. ब्राह्मण हा तर वर्ण आणि जात म्हणून संघटित आहे. क्षत्रियही त्याच्यासारखाच एक वर्ण आणि जातही आहे. त्यामुळे वैश्य आणि शूद्र या दोन वर्णांत जातींची जी अमाप संख्या आहे. तितकी ब्राह्मण आणि क्षत्रियांत दिसत नाही.

के.एन.सिंग यांनी 2004 मध्ये केलेल्या सर्वेक्षणातून भारतात स्वतंत्रपणे जगणाऱ्या 4700 जाती आणि जमाती वास्तव्य करीत आहेत (साधना 9 मे, 2015), हे नेमाडे यांनी मांडलेले मत रास्तच आहे. या जातीचे एक प्रमुख वैशिष्ट्य असे आहे की, प्राचीन काळापासून चालत आलेल्या जाती आपल्या धंद्याला चिकटून आहेत. म्हणूनच कार्ल मार्क्स यांनी ‘न्यूयार्क डेली ट्रिब्यून’मध्ये सन 1953 मध्ये लिहिलेल्या भारतीय समाजावरील लेखमालेत आणि इतरत्रही जातीची व्याख्या ‘वंशपरंपरागत नेमून दिलेले व्यवसाय करणारा जनसमुदाय म्हणजे जात’ अशी केली आहे. सुरुवातीला हा श्रमविभागणीचाच एक प्रकार होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जातिसंस्थेवरील पहिल्याच निबंधात ‘बंदिस्त वर्ग म्हणजे जात’ अशी जातीची व्याख्या केली असली, तरी सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत नेमके कोणत्या काळात वर्ग बंदिस्त झाले, हे सांगितलेले नाही. ते काम त्यांनी पुढील संशोधकांवर सोपविलेले होते. सिंधू संस्कृतीत जाती होत्या; परंतु त्या जातीतच विवाह करून -endogomous कशा झाल्या, याचा शोध आजकालच्या संशोधकांनी सिंधू संस्कृतीच्या समाजरचनेचा खोलवर अभ्यास करून घेतला, तर वर्ग बंदिस्त झाल्याचा तो काळ शोधून काढता येऊ शकेल.

अगदी महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचे ठरले तर, एक जात दुसऱ्या जातीला आपला व्यवसाय करू देत नव्हती. आपल्या जातीचा जन्मसिद्ध व्यवसाय एखाद्याने सोडला, तर त्याला जातपंचायत बहिष्कृत करीत असे. प्रत्येक जातीत रोटी-बेटी व्यवहार दुसऱ्या जातीशी करणे निषिद्ध होते. जातीतील एकाच व्यवसायातील नैपुण्यपूर्ण काम जातीतील विविध गट करू लागल्याने त्यांच्या पोटजाती निर्माण झाल्या. उदा.- चामड्याचे काम करणाऱ्यांत चामडे कमविणारे ढोर, तर कमावलेल्या चामड्याच्या वस्तू बनविणारे चांभार. सिंधू संस्कृतीत शौचालय आणि कचराकुंड्या या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक घराच्या बाहेर एक कचराकुंडी दिसते. तटबंदीच्या बाहेर वस्ती करून जे राहत, त्यांनी ही घाण साफ करण्याचे साफ सफाईचे काम केले, तरी त्यांचा तटबंदीच्या आत राहणाऱ्या लोकांना स्पर्श होण्याचे कारण दिसत नाही. त्यामुळे अस्पृश्यतेचा उगमही सिंधू संस्कृतीत झाल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

तळटीपा 
1.कसबे रावसाहेब, धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह, दु.आ., लोकवाङ्‌मय गृह, मुंबई (2015), यातील ‘स्वप्रयत्नांनी घडलेला प्राणी- माणूस’ या पहिल्या विभागात                 माणसाच्या जन्मासंबंधी सविस्तर विवेचन आले आहे. 
2.’History is the break with the nature caused by the awakening of the consciousness’’, Burkhardt, Reflection on World History, P.31. 
3.Carr E.H., What is History? Pelican (1964)P. 134.
4.या विषयावर प्रा. जयप्रकाश म्हात्रे यांनी ’Early Footprints of Culture on the Road of Human Evaluation’ हा शोधनिबंध भारत ज्ञानविज्ञान समितीच्या राष्ट्रीय         कौन्सिलच्या नाशिक येथील दि. 25 ते 27 एप्रिल 2015 रोजी झालेल्या बैठकीत वाचून उत्तम प्रकाश पाडला आहे. 
5.Kosambi D.D., The Culture and civilization of Ancient India, Vikas, Delhi, Forth impression(1976) Chapter 3, The First Cities. 
6.देशमुख प्र. रा.; सिंधुसंस्कृती, ऋग्वेद आणि हिंदुसंस्कृती, प्राज्ञपाठशाळा, वाई (1966), पृ. 60-61. 
7.कोसंबी धर्मानंद, हिंदी संस्कृती आणि अहिंसा, पृ. 4-13. 
8.या विवेचनासाठी वरील उद्‌धृत केलेल्या ग्रंथासोबत त्यांच्या An Introduction to Study of Indian History याचे प्रकरण तिसरे आणि प्र. रा. देशमुख यांच्या वरील ग्रंथाचा आधार घेतला आहे.
9.कसबे रावसाहेब, मानव आणि धर्मचिंतन, पृ. 133-34 वर शोधाचा सविस्तर तपशील दिला आहे. 
10.देशमुख प्र. रा., उक्त पृ. 242-244.  

( या लेखाचा उत्तरार्ध 8 ऑगस्टच्या अंकात वाचा.)

Tags: लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन रावसाहेब कसबे सिंधू संस्कृती संस्कृती प्राचीन भारत संस्कृतींचा उदयास्त साहित्य lokvangamay book literature Raosaheb Kasabe Sindhu civilization Culture Ancient India Sanskrutincha Udayast Chikitsa weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रावसाहेब कसबे

मराठी लेखक. 'झोत ' या पुस्तकात त्यांनी माधव सदाशिव गोळवलकर यांच्या द बंच ऑफ थॉट्स या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीची समीक्षा केली आहे
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके