डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘अंतर्नाद’ हे कसलेल्या तसेच होतकरू लेखकांचं हक्काचं आणि घरगुती व्यासपीठ होतं, ते आज नाहीसे झालं. हे खरंच, पण एक विचार मनात आला की- ‘अंतर्नादने मला काय दिलं?’ उत्तर शोधू लागलो तेव्हा जाणवलं की, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचनाचा आनंद मुबलक प्रमाणात दिला. चांगलं आणि वेगवेगळ्या प्रकारचं वैचारिक खाद्य दिलं. वरवर अनाग्रही वाटणारे लेखन डोळसपणे वाचायची नवी दृष्टी दिली. फुरसतीने वाचायला आणि लिहायला सुचवलं. वाचताना अंतर्मुख व्हायला शिकवलं आणि चांगल्या लेखनासाठी आवश्यक अशी स्वानुभव, सभ्यपणा व उदारता ही त्रिसूत्री दिली. हे संचित आपल्यापासून कोणीच हिरावू शकणार नाही. हे काय कमी आहे? एक वाचक म्हणून ‘अंतर्नाद’बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. अंतर्नादचे संपादक आणि त्यांचे सहकारी यांनी दीर्घ काळ केलेल्या या अजोड कार्याबद्दल त्यांना मन:पूर्वक सलाम.

‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे 2020 मध्ये वर्षानुवर्षे सहजगत्या घडणाऱ्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत. आपल्याकडची पंढरीची वारी असो किंवा जपानमध्ये होऊ घातलेले ऑलिम्पिक, मग सांस्कृतिक उपक्रम होणे तर दूरच राहिले. पण या सगळ्यात एक गोष्ट सुदैवानं चांगली झाली. ती म्हणजे- ज्याला आधुनिक महाराष्ट्राची समृद्ध परंपरा म्हणता येईल, असे दिवाळी अंक बहुतांशी प्रकाशित झाले आणि ते डिसेंबरच्या सुरुवातीला मला इथे अमेरिकेत घरपोच मिळालेदेखील! त्यामुळे घरकैदेने पुरत्या त्रासलेल्या या वाचकाला भरपूर नवी सामग्री मिळाली. मोठ्या उत्साहानं  ‘अंतर्नाद’चा अंक वाचायला घेतला खरा, पण संपादकीय वाचतानाच हा शेवटचा अंक याची जाणीव प्रकर्षानं झाली. अर्थात हे माहीत होतंच, परंतु शेवटी ते घडलं आणि खूप खिन्न झालो. अंतर्नादनं ऐन रौप्यमहोत्सवी वर्षात अशी Graceful Exit घ्यावी, ही चोखंदळ मराठी वाचकांच्या दृष्टीनं खरं तर एक लक्षवेधी व दुर्दैवी घटना आहे. आणि तिची योग्य दखल घेतली जावी, याच एकाच भावनेनं हे मनोगत लिहीत आहे.

माणूस खिन्न झाला की जुन्या चांगल्या आठवणींत रमतो हे खरं, त्यामुळे माझं मन अंतर्नादच्या आठवणी काढत बरीच वर्षे मागे गेलं. तसं पहिलं तर वृत्तपत्रं आणि मासिकं यातलं बरंचसं चांगलं वाचन हे योगायोगानं होत असतं. मी 15 वर्षांपूर्वी मद्रासला राहत असताना मुंबईला भेटायला आलो की, रविवार पुरवण्यांची जपून ठेवलेली कात्रणं वडील मला देत असत (त्यांना वाटे, मला तिथे मराठी वाचायला कसे मिळणार?). एका पुरवणीत संपादकांनी ‘बदलता भारत’ या पुस्तकातील भानू काळेंचे मनोगतच छापलं होतं. ते मला खूप आवडलंच, पण त्याचबरोबर ‘अंतर्नाद’ नावाचं मराठी भाषा आणि संस्कृती याला वाहिलेलं एक छोटेखानी मासिक गेली कित्येक वर्षे काळे पती-पत्नी चालवितात, हे प्रथमच कळलं. मग तत्परतेने अंतर्नादचा वर्गणीदार होणे आणि त्यातून छापून येणाऱ्या लेखांचा आनंद लुटणे या गोष्टी ओघाने आल्याच! तेव्हा आपण अंतर्नादचे वर्गणीदार आधीच का झालो नाही याची खंत वाटली होती; परंतु पुढची अनेक वर्षे या मासिकाचा आस्वाद मला घेता आला, हेही नसे थोडके!  

आता यंदाच्या दिवाळी अंकाबद्दल. 2020 च्या दिवाळी अंकात गेल्या 25 वर्षांतील निवडक लेखन संकलित केलेले आहे. त्यावर नजर फिरवली तर- किती तरी नावाजलेल्या आणि त्याचबरोबर काहीशा अपरिचित व्यक्तींना अंतर्नादने कसे बांधून ठेवले, प्रोत्साहित केले याचा अंदाज येतो. ही पुनर्भेट संग्राह्य झाली आहेच. त्यामुळेच की काय, मीदेखील जपून ठेवलेले जुने अंक परवा चाळत बसलो होतो. आणि जाणवले की, एकंदरीतच असे लेखन- जे मोठ्या वृत्तपत्रात किंवा मासिकांत जागेच्या मर्यादेमुळे वा अन्य कारणांमुळे छापले जाणे शक्य नव्हते ते- ‘अंतर्नाद’च्या संपादकांनी आवर्जून छापले. उदा.- पं.भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ पुत्र राघवेंद्र जोशी यांच्या ‘गाणाऱ्याचे  पोर’  पुस्तकातील एक प्रकरण किंवा ना.सी. फडके यांच्या कन्येने लिहिलेल्या आठवणी. दोन्ही लेखकांनी मनात साचलेल्या भावनांना मोकळेपणाने वाट करून दिलेली आहे. आणखी एक साठवण म्हणजे डॉ.सरोजा भाटे यांचा संस्कृत भाषेतली सौंदर्यस्थळं उलगडून दाखवणारा ‘निद्रिस्त परी’ हा सुंदर लेख. ‘तेलुगू-मराठी घरोबा’ हा विजय पांढरीपांडे यांचा लेख, हेरंब कुलकर्णी लिखित ‘ग्रामीण दारिद्य्राची शोधयात्रा’ किंवा ‘मालदीव सोडताना’ हे ज्ञानेश्वर मुळे यांचे कथन. याशिवाय काहीशा अपरिचित माणसांवर त्यांच्या आप्तेष्टांनी लिहिलेली सुंदर व्यक्तिचित्रं. अशी किती उदाहरणे सांगावीत!  

कवितेवर संपादकांचे खास प्रेम असावे, इतकी जागा कवितेसाठी अंतर्नाद देत असे. कोणताही अंक चाळलात तर त्यांत जागोजागी कविता दिसतात- अगदी जाहिरातीतही!  काव्यप्रकारावर आधारित ‘सदरे’ वेळोवेळी चालवलेली आढळतात. कविवर्य पाडगावकर कुठलेही मासिक उघडताच त्यातल्या कविता सगळ्यात आधी वाचायचे, असं म्हणतात. मला खात्री आहे की, त्यांनी ‘अंतर्नाद’ला अगदी उत्तम गुण दिले असणार! मुखपृष्ठावरील चित्रं आणि चित्रकलेवरची सदरं हे इथले आणखी एक दालन... ती लिहिण्यासाठी त्यांनी नामवंत चित्रकारांना लिहितं केलं.

मला स्वतःला आवडणारा एक भाग म्हणजे वाचकांचा प्रतिसाद. यातली काही पत्रं जरुरीपेक्षा अधिकच ‘दीर्घ’ असली तरी बहुतांशी वाचनीय असत किंवा पोटतिडिकीने लिहिलेली असत. कदाचित अशा पत्रांवर कात्री चालवण्यापेक्षा ती तशीच छापली तर पत्रलेखकांना (ज्यात मीही आलो!) प्रोत्साहन मिळू शकतं आणि त्यातले काही पुढे चांगले लेखन पाठवू शकतील, हाही उदार विचार असावा.

मला वाटतं की, अंतर्नाद हा अडीचखांबी तंबू. पहिला खांब म्हणजे हे मासिक निष्ठेने चालवणारे काळे पती-पत्नी (आणि व्याकरण सल्लागार यास्मिन शेख), दुसरा वर्गणीदार-आश्रयदाते यांचा आणि डगमगणारा अर्धा खांब जाहिरातदारांचा! तरीदेखील मासिक 25 वर्षे नेटाने टिकून राहिलं; हे कसे? माझ्या मते, वर उल्लेखलेल्या वैविध्यपूर्ण गोष्टींबरोबरच संपादकांच्या स्वतःच्या लेखनशैलीचाही त्यात सिंहाचा वाटा आहे. यात वेळोवेळी खाद्य आणि भ्रमंती यावर खुसखुशीत लिहिणाऱ्या कार्यकारी संपादिका वर्षा काळेदेखील आल्या.

भानू काळे यांचे संपादकीय म्हणजे वाचकांशी हळुवारपणे केलेले हितगुजच जणू. याची इतकी सवय होऊन गेली होती की, दोन वर्षांपासून मासिक स्वरूप बंद झाल्यानं मला चुकल्यासारखे वाटे, काही तरी गमावल्यासारखे वाटे! अर्थात वेळोवेळी त्यांनी लिहिलेल्या दीर्घ लेखांत ‘लेखक’ भानू काळे दिसून येतात. गेली काही वर्षे अशा लेखांद्वारे ते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची व सुचवलेल्या मूलभूत उपायांची ओळख करून देताना किंवा विस्मृतीत गेलेल्या समतानंद गद्रे यांचे सामाजिक क्षेत्रातले काम लोकांपर्यंत पोहोचवताना दिसले. महर्षी शिंदे यांच्या शैक्षणिक कार्याचा त्यांनी फार सुंदर आढावा घेतल्याचे स्मरते. हे लेख संशोधनात्मक असल्याने काहीसे भरीव व माहितीपूर्ण आहेत. त्यामानाने त्यांचे आधीचे लेख जास्त सुटसुटीत आणि जास्त आकर्षक झाले आहेत. त्यातले विषय काहीसे नैमित्तिक असतीलही, पण लेखन विचार करायला लावणारे. अंतर्नादच्या सुरुवातीपासून 2007 पर्यंत वेळोवेळी त्यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन ‘अंतरीचे धावे’ (मौज प्रकाशन गृह) या संग्रहात झाले आहे, त्यातील मला भावलेल्या दोन-तीन लेखांविषयी थोडक्यात!

जे.आर.डी.टाटा यांचावरील एका पुस्तकावर एक सुंदर लेख येतो. त्यात जेआरडींनी रुजवलेली व्यवस्थापनशैली, एअर इंडियाबद्दलचे त्यांचे प्रेम आणि पुढे त्यातूनच त्यांच्या वाट्याला आलेली कटुता यावर भानू काळे छान टिप्पणी करताना दिसतात (आता 2021 मध्ये आर्थिक डबघाईला आलेली ‘एअर इंडिया’ टाटा समूहाने जर पुन्हा विकत घेतली तर that will be a sweet justice!). . एखादी कंपनी निव्वळ नफ्याइतकेच महत्त्व सामाजिक बांधिलकी आणि Human Resources या गोष्टींनाही देऊ शकते याचा प्रत्यय येतो. अर्थात 1991 नंतर रतन टाटांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुप बराच बदलला. तरी आपला मूळ पंथ त्यांनी सोडलेला नाही, हे मी स्वतः जमशेदपूर व कुर्ग येथे अनुभवले आहे.

भानू काळे स्वतः एके काळी मुद्रण व्यवसायात होते आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी बरीच मुशाफिरी केली आहे. साहजिकच त्यांनी ‘इंडिया टुडे’चे सर्वेसर्वा अरुण पुरी यांची वाटचाल फार आत्मीयतेने आणि त्या क्षेत्रातल्या बारकाव्यांसह मांडली आहे. चांगल्या समाजाभिमुख (त्याचप्रमाणे चटकदार) विषयांवर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून एक मासिक निघते आणि निव्वळ अभ्यासपूर्ण लेख व आकर्षकता यामुळे ते दिवसेंदिवस लोकप्रिय होत जाते, ही कल्पनाच 80 च्या दशकात करवत नसे! इंग्रजी मासिके वाचायचे माझे वेडही ‘इंडिया टुडे’पासूनचेच. पत्रकारांना पुरी यांनी त्या वेळी दिलेल्या सोई आणि स्वातंत्र्य हे आजही बऱ्याच ठिकाणी मिळत नसेल. आणि आणीबाणी व दहशतीच्या काळात एखादी बातमी खरी असेल, तर ती छापण्याचे धारिष्ट्य तरी आज कुठे दिसते? बरीचशी पत्रकारमंडळी, नेते आणि नोकरशहा यांच्यात मिलीभगत असल्यासारखी वाटते. त्यामुळे अरुण पुरींसारख्या व्यक्तीबद्दल अचंबा वाटतो.

शांता शेळकेंना त्यांनी वाहिलेली आदरांजली ही एका अतिशय गुणी व्यक्तीचे मूल्यमापन आहे. शांताबाई किती व्यासंगी, अभ्यासू तितक्याच साध्या आणि भावुक होत्या याची प्रचिती हा लेख वाचताना येते. त्यांचे इंग्रजी वाचन किती चौफेर होते, याची कल्पना त्यांच्या मराठमोळ्या अवताराकडे बघून पटकन येत नसे, अशा अर्थाचे त्यांचे प्रांजळ आणि अचूक निरीक्षण मला खूप भावले! एका बाईने त्या काळात कविता, लेखन, गीत व पटकथालेखन या काहीशा पुरुषी प्रांतात स्वतःचा स्पष्ट ठसा उमटवला याचे ते तोंड भरून कौतुक करतात. त्याचबरोबर जाणवलेले स्वभावविशेष, हरहुन्नरी वृत्तीमुळे त्यांच्या legacybm आलेल्या मर्यादा यावरही काळे स्पष्टपणे लिहितात; अर्थात तेही शांताबाईंवरच्या जिव्हाळ्यापोटीच!

हे लेख वाचले की भानू काळे हे काय ताकदीचे लेखक-संपादक आहेत याची कल्पना येते आणि लगेच जाणवते की, ते हस्तिदंती मनोऱ्यात बसून लेख लिहिणारे संपादक नाहीत. अर्थकारण, राजकारण, जागतिकीकरण आणि त्याचे मराठी समाजावर व भाषेवर होणारे बरे-वाईट परिणाम हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे व त्यात ते खरे रमतात. आणि ते करताना उसनं ढोंग आणण्यापेक्षा सुसंस्कृत, शहरी व मध्यमवर्गीय या आपल्या कक्षा ते सोडत नाहीत. बहुतांशी स्वतः प्रवास किंवा शोधयात्रा करून अनुभवलेल्या गोष्टींवरच ते मोकळेपणे लिहितात. त्यात राणा भीमदेवी थाटाचे लेखन नसते किंवा ‘मी सांगत नव्हतो का?’ ही आत्मप्रौढीही नसते. आपला मुद्दा माहितीच्या आधारावर ते सभ्यपणे पण नेटाने मांडत राहतात.

आज ‘अंतर्नाद’चा प्रवास थांबल्यावर भानू काळे यांनी 2005 मध्ये लिहिलेल्या ‘अंतर्नादची दशकपूर्ती : थोडे प्रकट चिंतन’ या लेखाचा उल्लेख करणे उचित ठरेल.  हा लेख म्हणजे एक छोटे मासिक चालवताना, संपादन करताना येणाऱ्या अडचणी, परंतु त्याचबरोबर मिळणारे आंतरिक समाधान यावर मोकळेपणे केलेले भाष्यच. मी वाचलेल्या चिंतनपर लेखांपैकी तो एक सर्वोत्तम लेख आहे आणि मुख्य म्हणजे त्यात कुठेही त्यागाचा, अन्याय झाल्याचा सूर नाही! आपण जाणीवपूर्वक एक कार्ययज्ञ करतो आहोत आणि ते यज्ञकुंड यथाशक्ती पेटते कसे ठेवता येईल, हीच भावना आहे. मराठी माणसाला सकस आणि शुद्ध लेखन देत राहणे हेच त्यांचं ब्रीद व हीच त्यांची ऊर्जा, हे वाचकाला जाणवल्याशिवाय राहत नाही. त्यांना चिंता असलीच तर मासिक स्वबळावर दीर्घ काळ कसे तगेल, कालानुरूप त्यात काय बदल केले पाहिजेत आणि ते करताना मूळ उद्देश व निष्ठावंत वर्गणीदार यांच्यावर अन्याय होणार नाही ना- याची आहे! सत्यकथा बंद करण्यामागची आपली भूमिका श्री.पु.भागवतांनी एका लेखात मांडली होती आणि पुढे सत्यकथा बंद करावे लागले. तो लेख आणि भानू काळेंचा हा लेख यात मनाला चटका लावणारे साधर्म्य आहे. परंतु, ते कटु वास्तव आपण वाचक किंवा आश्रयदाते बदलू शकलो नाहीत, हे आज खेदाने मान्य करावे लागते.

खरं तर आज तीन-चार जणांचे कुटुंब उडप्याच्या हॉटेलात जेवायला गेले तर जितके बिल होते तितकीच अंतर्नादची वार्षिक वर्गणी  होती! मग 10 कोटींच्या महाराष्ट्रात 3000 पेक्षा जास्त वर्गणीदार त्याला का मिळाले नसावेत? शेकडो कोटींचे व्यापार करणारी आणि समाजात मराठी उद्योजक म्हणून टेंभा मिरवणारी मंडळी अंतर्नादसारख्या उपक्रमांना सढळ हस्ते जाहिराती का देत नसावीत, हे प्रश्न मलाही पडतात. जणू काही मराठी सांभाळण्याची जबाबदारी फक्त भानू काळेंसारख्या मंडळींवर आपण सोईस्करपणे टाकून मोकळे होतो. अर्थात आता हे प्रश्न विचारायला किंवा त्यांची उत्तरे शोधायला बराच उशीर झाला आहे!

‘अंतर्नाद’ हे कसलेल्या तसेच होतकरू लेखकांचं हक्काचं आणि घरगुती व्यासपीठ होतं ते आज नाहीसे झालं, हे खरंच; पण एक विचार मनात आला की, ‘अंतर्नादने मला काय दिलं?’ उत्तर शोधू लागलो तेव्हा जाणवलं की, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचनाचा आनंद मुबलक प्रमाणात दिला. चांगलं आणि वेगवेगळ्या प्रकारचं वैचारिक खाद्य दिलं. वरवर अनाग्रही वाटणारे लेखन डोळसपणे वाचायची नवी दृष्टी दिली. फुरसतीने वाचायला आणि लिहायला सुचवलं. वाचताना अंतर्मुख व्हायला शिकवलं आणि चांगल्या लेखनासाठी आवश्यक अशी स्वानुभव, सभ्यपणा व उदारता ही त्रिसूत्री दिली. हे संचित आपल्यापासून कोणीच हिरावू शकणार नाही. हे काय कमी आहे?

एक वाचक म्हणून ‘अंतर्नाद’बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, हे मी माझं कर्तव्य समजतो. अंतर्नादचे संपादक आणि त्यांचे सहकारी यांनी दीर्घ काळ केलेल्या या अजोड कार्याबद्दल त्यांना मन:पूर्वक सलाम आणि पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा! 

Tags: मराठी दिवाळी अंक नियतकालिके अंतर्नाद भानू काळे रवी गोडबोले bhanu kale ravi godbole antarnaad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके