डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

त्रिखंडात्मक कादंबरीतील ‘होळी’च्या निमित्ताने रवींद्र शोभणे यांची मुलाखत

त्या अर्थानं जर विचार केला तर ही प्रत्येक कादंबरी स्वतंत्र आहे. कारण की, ती जर स्वतंत्र नसती तर मी एकाच वेळी तिन्ही खंड प्रकाशित केले असते. पण मी थांबलो. ‘पडघम’मध्ये येणारा काळ 1975 ते 1984. ही कादंबरी 2007 मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर या कादंबरीवर प्रतिक्रिया काय आहेत, वाचकांना ही कादंबरी कशी वाटते याचा मी अंदाज घेत होतो. त्यानंतर ‘अश्वमेध’ लिहायला घेतली. अश्वमेध ही 2014 मध्ये प्रकाशित झाली. अश्वमेधच्या प्रकाशनानंतर तिसरा खंड- ‘होळी’ लिहायला घेतला. ती 2021 मध्ये प्रकाशित झाली. या तिन्ही कादंबऱ्या एकाच सूत्रात गुंफलेल्या असल्या, तरी त्या स्वतंत्र कलाकृतीही आहेत, असं आपल्याला म्हणता येईल.

डॉ. रवींद्र शोभणे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचं नाव. कथाकार, कादंबरीकार, समीक्षक म्हणून ते प्रसिद्ध आहेतच; सोबतच महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक चळवळीतही ते सक्रिय असतात. त्यांची ‘उत्तरायण’ ही महाभारतावरील कादंबरी गाजली ती महाभारताची एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून केलेल्या मांडणीमुळे. उत्तरायणने त्यांची गणना मराठीतील ख्यातकीर्त कादंबरीकार म्हणून केली जाते.

डॉ. शोभणे यांच्यावर विशिष्ट वाङमयप्रकार हाताळणारे आणि विशिष्ट विचारांचा पुरस्कार करणारे लेखक म्हणून असा कोणताही शिक्का मारता येत नाही. ग्रामीण कादंबरीच्या सकस लेखनाएवढ्याच त्यांच्या राजकीय कादंबऱ्याही महत्त्वाच्या ठरतात. ते आपल्या कादंबरी-विश्वाची सभोवतालच्या समग्र परिप्रेक्ष्यातून सजगपणे मांडणी करतात. आपल्या कादंबऱ्यांमधून ते जशी सामाजिक बलस्थानं दर्शवितात तशाच त्या समाजाच्या उणिवांवर प्रकर्षाने प्रहारसुद्धा करतात. तर्कनिष्ठ दृष्टिकोनातून सामाजिक प्रश्नांची मांडणी करताना ते त्या प्रश्नांद्वारे बहुपेडी आशयकेन्द्री मांडणी कशी करता येईल याचा विचार अधिक करतात.

1975 ते 2000 हा भारतीय आणि महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक संदर्भांतील एका मोठ्या मन्वंतराचा काळ. या काळाला कवेत घेत बृहद कादंबरी उभी करणे अधिक आव्हानात्मक आणि जोखमीचेही होते; पण ते आव्हान रवींद्र शोभणे यांनी लेखनाच्या निमित्ताने यशस्वीपणे पेलले असे म्हणता येईल. कारण मराठी कादंबरीक्षेत्रात त्रिखंडात्मक राजकीय कादंबरी म्हणून पडघम, अश्वमेध आणि होळी यांचे महत्त्व नक्कीच आहे. त्या अनुषंगाने रवींद्र शोभणे यांचा लेखनप्रवास समजून घेण्याच्या दृष्टीने घेतलेली त्यांची ही मुलाखत.

 

प्रश्न - सर, तुमची पडघम, अश्वमेध आणि आता नुकतीच होळी ह्या राजकीय कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. राजकीय कादंबरी आणि या कादंबरी-त्रयीविषयी आपण काय सांगाल? होळी हा एक टप्पा आहे की ती स्वतंत्र कलाकृती आहे?

- पडघम, अश्वमेध आणि होळी या तिन्हीही कादंबऱ्या खरं म्हणजे एकाच कथानकावरच्या आहेत. वेगळा विचार केला तर त्याला सलग असे कथानक नाही; पण एकाच कालखंडावर आणि एकाच सूत्रात गुंफलेल्या ह्या तिन्ही कादंबऱ्या आहेत.

1975 नंतरचे जे बदलते सामाजिक, राजकीय वास्तव होते ते वास्तव मला कादंबरीच्या माध्यमातून मांडायचे होते. ते वास्तव मांडताना 1975 ते 2000 असा तो पाव शतकाचा प्रवास घ्यायचा मी ठरवलं. जेव्हा प्रत्यक्षात कादंबरीच्या लेखनाची सुरुवात झाली त्या वेळेला आणीबाणी ते आणीबाणी संपेपर्यंतचा जो काळ होता तो साधारणतः 350 पानांपर्यंत गेला. त्याचे सर्व आडवे-उभे धागे, त्यातले सगळे ताण हे मांडताना आणि त्यातल्या व्यक्तिरेखांचा विचार करता माझ्या असं डोक्यात आलं की, हा 25 वर्षांचा कालखंड केवळ एका कादंबरीत लिहून होणार नाही. त्यामुळे हा कालखंड विभागायचा. 1975 ते 1984 हा आणीबाणी ते इंदिरा गांधींची हत्या असा जो काळ आहे त्या काळाचा विचार साधारणतः पडघम या पहिल्या खंडामध्ये आलेला आहे. दुसरा जो खंड म्हणजे अश्वमेध- त्यात राजीव गांधींचा सत्ताप्रवेश ते राजीव गांधींची हत्या असा हा साधारणतः 1984 ते 1991 पर्यंतचा काळ आहे आणि तिसरा खंड आहे तो म्हणजे होळीचा. 1991 ते 2000 अशी ती विभागणी आहे. तसं म्हटलं तर एकच कादंबरी मला लिहायची होती; पण ही एकाच खंडामध्ये किंवा पुस्तकात येणं शक्य नव्हतं, त्यामुळे मग मी ही कादंबरी तीन भागांत विभागली गेली. म्हणून त्याला सहजपणे त्रिखंडात्मक कादंबरीचं स्वरूप प्राप्त झालं.

तुमचा जो मूळ प्रश्न आहे की, ह्या तिन्ही कादंबऱ्या स्वतंत्र आहेत का? तर त्या अर्थानं जर विचार केला तर ही प्रत्येक कादंबरी स्वतंत्र आहे. कारण की, ती जर स्वतंत्र नसती तर मी एकाच वेळी तिन्ही खंड प्रकाशित केले असते. पण मी थांबलो. पडघममध्ये येणारा काळ 1975 ते 1984. ही कादंबरी 2007 मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर या कादंबरीवर प्रतिक्रिया काय आहे, वाचकांना ही कादंबरी कशी वाटते याचा मी अंदाज घेत होतो. त्यानंतर अश्वमेध लिहायला घेतली. अश्वमेध ही 2014 मध्ये प्रकाशित झाली. अश्वमेधच्या प्रकाशनानंतर तिसरा खंड- होळी लिहायला घेतला. ती 2021 मध्ये प्रकाशित झाली. या तिन्ही कादंबऱ्या एकाच सूत्रात गुंफलेल्या असल्या, तरी त्या स्वतंत्र कलाकृतीही आहेत, असं आपल्याला म्हणता येईल.

प्रश्न - शरच्चंद्र मुक्तिबोधांची कादंबरीत्रयी आपल्याला माहिती आहे. ‘क्षिप्रा’, ‘सरहद्द ’आणि ‘जन हे ओळतू जेथ’ या तिन्ही कादंबऱ्यांचा नायक एकच आहे. कथानक पुढे पुढे सरकत जाते. बिशू जर पूर्ण समजून घ्यायचा असेल तर तिन्ही कादंबऱ्या वाचाव्या लागतात. तुमच्या ह्या तिन्ही कादंबऱ्यांचे असे मुख्य सूत्र कोणते सांगता येईल?

- या तिन्ही कादंबऱ्यांचा विचार करताना विशिष्ट असा कुठला एक नायक किंवा व्यक्ती या कादंबरीत नाही, हे तुम्हांला जाणवलं असेलच. अनेक व्यक्तिरेखा या कादंबरीत आहेत. त्या सगळ्या व्यक्तिरेखांचा आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या घटनाक्रमांचा, कथानकांचा, त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांचा विचार केला तर प्रत्येक माणसांची एक स्वतंत्र कादंबरी उभी राहू शकते. अशा प्रकारचे सूत्रसुद्धा त्यात आहे. पडघममध्ये साधारणतः समोर दिसतो तो भानुदास आणि अर्जुन. या अंगाने ती पुढे पुढे सरकते. अश्वमेध या कादंबरीला वेगळे केंद्र प्राप्त होते. त्यानंतर होळीमध्येसुद्धा एक वेगळे केंद्र प्राप्त होते. मुक्तिबोधांची जी कादंबरीत्रयी आहे त्यात क्षिप्रामध्ये बिशूचं बालपण, त्यानंतर सरहद्दमध्ये बिशू हा मावशीकडे उज्जैनला जातो तो कालखंड आणि तिसऱ्यामध्ये ती कादंबरी मधूच्या अंगाने अधिक फुलते. असा एखाद्या व्यक्तीचा विकास माझ्या समोर या कादंबरीच्या रूपाने नव्हता. सामाजिक- राजकीय स्थित्यंतरे कशी कशी होत गेलीत यांचं चित्रण मी यात केलं आहे. मुख्यतः 1975च्या आधीचं राजकारण हे तत्त्वाधारित होतं. आदर्शनिष्ठ नि मूल्याधारित होतं; पण त्यानंतरचं राजकारण हे हळूहळू अध:पतनाकडे झुकू लागल्याचे दिसते आहे. हा अध:पतनाचा वेग पडघम आणि अश्वमेधमध्ये थोडा संथ आहे; पण तो होळीमध्ये अधिक आहे. त्यामुळे जे बदलते मूल्यप्रवाह आहेत, मग ते सामाजिक, राजकीय किंवा अनेक अंगांनी असतील, त्यांना चितारणे आणि अनेक व्यक्तींच्या माध्यमातून चितारणे हे माझ्या समोर एक सूत्र होतं आणि म्हणूनच साधारणतः पडघममध्ये असणाऱ्या व्यक्ती होळीपर्यंत येतात. पडघममधील पंचविशीची पिढी होळीमध्ये पन्नाशीला आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जो आलेख आहे तोसुद्धा त्या त्या पद्वतीने बदलतो. सबंध माणसांच्या आयुष्याची त्यांनी केलेली गोळाबेरीज आणि त्यांनी केलेलं आत्मपरीक्षण, विशेषतः होळीच्या शेवटी येणारं, जे मृणालच्या संदर्भातलं आहे ते तपासून पाहण्यासारखं आहे. पडघममध्ये सुसाटपणे आपल्या आयुष्याशी खेळणारी मृणाल ही होळीमध्ये त्या आयुष्यानं दिलेल्या चपराकीनं कशी उद्‌ध्वस्त होते आणि आयुष्यातल्या दुःखांना शरण जाते, हेही पाहण्याजोगं आहे. काही माणसं नव्याने येतात; पण ती माणसं त्या त्या कालखंडाची आणि त्या त्या घटनाप्रसंगांची मागणी असते. या पद्धतीनं काळाधिष्ठित कादंबरी म्हणून या तिन्ही कादंबऱ्यांकडे मी पाहतो.

प्रश्न - सर, होळी या कादंबरीच्या प्रारंभीच आपण राजेश जोशी यांची अनुवादित कविता दिलेली आहे. ही कविता केवळ राजकीय वास्तव चित्रित करीत नाही, तर त्या सामाजिक वास्तवासोबतच आपली मानसिकताही चित्रित करते. खरंच आपला देश आपली अस्मिता हरवू लागलाय की हे मत एकांगी आहे?

- ही कविता 2000 ची आहे. एक सहस्रक संपतं आहे आणि नंतरचं दुसरं सहस्रक सुरू होतं- म्हणजे जो अवस्थांतराचा काळ आहे या अवस्थांतराला धरून त्यांनी ती कविता लिहिली आहे. या कवितेचा सूर थोडा विडंबनात्मक आहे. या कवितेच्या ध्वन्यार्थाचा आंतरसंबंध हा होळीशी आहे असं मला वाटलं. कारण होळीसुद्धा 2000च्या टप्प्यावर संपते. त्यामुळे मला असं वाटलं की या कवितेचं जे सूत्र आहे ते होळीशी योग्यरीत्या लागू होतं; पण तुम्ही जे म्हणता तेही खरंच आहे. केवळ राजकीय मूल्यांची घसरण अशी एकांगी नसते. राजकीय वास्तवासोबतच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वास्तव तसंच भावनिक, मानसिक भूमी या सर्वांमध्ये बदल होत जातात. मुळात अवस्थांतराचा प्रवास हा एकांगी नसतो, तर तो एकसमयावच्छेदेकरून आपल्या जगण्याशी भिडलेला असतो. त्याचाच विचार होळीच्या निमित्तानं मला करावयाचा होता. त्यामुळं ही कविता मला योग्य वाटली. होळीच्या आशयाला ही कविता अधिक बोलकं करणारी आहे. त्यामुळे कादंबरीचं पान उघडल्याबरोबर कादंबरीच्या आशयाकडे अंगुलिनिर्देश करू शकेल असं तिचं स्वरूप आहे.

प्रश्न - होळी ही आपली 631 पानांची कादंबरी आहे. त्यात पात्रांच्या अवतीभोवती राजकारण आहे आणि राजकारणाच्या अवतीभोवती पात्रं आहेत. हे कसं साधलं आणि होळीच्या निर्मितिप्रक्रियेविषयी काय सांगाल?

- माणूस जेव्हा जगतो तेव्हा तो कधीच एकांगी जगत नाही. त्याच्या जगण्याला अनेक पैलू असतात. म्हणजे घरातसुद्धा तो राजकारण करतो. आपल्या नात्यातल्या माणसांशीसुद्धा तो राजकारण करतो. राजकारण म्हणजे सत्ता आणि निवडणुका इथपर्यंतच ते मर्यादित नसतं. सत्तेचा जो आंतर्संबंध आहे तो माणसामाणसांच्या नात्यांमध्ये असतो. त्याचा आपण जेव्हा शोध घेतो तेव्हा कुणावर कुणीतरी प्रभावी होणं किंवा कुणीतरी कुणाचं शोषण करणं हे आलंच. ते इतकं अप्रत्यक्षपणे असतं की आपल्याला ते कळतसुद्धा नाही. हे शोषण मानसिक, भावनिक, सामाजिक, शारीरिक असतं, तसंच ते शोषण बौद्धिकसुद्धा असू शकतं, असा होळीचा आंतरसबंध आहे. यामधील माणसं म्हणाल तर अण्णाजी देशमुख निवर्तल्यानंतरचा हा सबंध कालखंड आहे. यामधली सर्व पात्रं, माणसं ही एकमेकांसोबत प्रेमानं वागतात, भावनिक नातं जपण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळी एकदुसऱ्यांविषयीचा आकस, तेढ आणि स्पर्धा ही या माणसांच्या मनामध्ये ताजी असते. सर्वसामान्यत: या व्यक्ती बाह्यस्वरूपी राजकारणाइतपतच मर्यादित नसतात, तर त्यांच्यातल्या संबंधांचा विचार अधिक खोलात जाऊन करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने मी विचार केला आहे. उदा., मृणाल आणि श्रीनिवास बनकर या दोघांच्या आंतर्संबंधांमधील जे काही चढउतार आहेत ते खूप वेगळे आहेत. हा विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की, जयप्रकाश नारायणांच्या नवनिर्माण संकल्पनेतून समोर आलेली माणसं पाहिली तर त्यांच्या काही शिष्यांनी भ्रष्टाचार केला. ते कारागृहात गेले. काही शिष्यांनी ध्येयवादी दृष्टिकोन समोर ठेवून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. उदा., काही लोकांनी काय केलं की, एखादं खेडं दत्तक घेतलं आणि त्यात आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करायचं ठरवलं. परंतु खेड्यातील माणसांनाही अशा सुधारणा करणारा माणूस नको आहे. त्याचा ते उपहास करतात. असं जगताना मग त्या व्यक्तींच्या मनात प्रश्न निर्माण होतात की, मी यशस्वी झालो की अपयशी? तत्त्वनिष्ठपणे समाजकारण, राजकारण करणाऱ्या बहुतेक सर्वच व्यक्तींची ही आंतरिक व्यथा आहे आणि याउलट जे बनेल किंवा तात्चिक विचाराच्या मागे स्वार्थ घेऊन आलेली माणसं आयुष्यामध्ये प्रचंड यशस्वी झालेली आहेत; हाही आजच्या राजकारणाचा भाग आहे. दुसरं असं की, राजकारणात येणारी पंचाहत्तरनंतरची दुसरी पिढी पहिल्या पिढीच्या कृपाप्रसादाने कर्तृत्व नसले तरी स्थिरावली आहे. कारण आधीच्या पिढीचा हा अट्टाहास असतो. एकदाची ही सत्ता आपल्या घरात आली की आपली कार्यसिद्धी झाली म्हणून जिवाच्या आकांताने प्रयत्न करणाऱ्या मंडळींत नागनाथ देशमुख, यावलकरसुद्धा आहेत. त्यामुळे चारित्र्यशून्य राजकारणी पिढी पुढे आली. यावलकर आपल्या दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर लहानग्या नातवाला राजकारणात आणण्याचे स्वप्न पाहतात, याचाच अर्थ राजकारण यांच्या मनात किती खोल घुसले आहे हे लक्षात येते. रक्ताच्या लाल रंगाप्रमाणे या राजकारणाचाही एक रंग त्यांच्यात भिनलेला दिसतो. होळीमध्ये याचे प्रतिबिंब आपल्याला दिसते. पडघम, अश्वमेध आणि होळी हा माणसांच्या जगण्यासंबंधीचा एक प्रगल्भ प्रवास आहे, असे मला वाटते.

प्रश्न - सर, होळीमध्ये अण्णाजी देशमुख ही एक व्यक्ती आहे. प्रारंभीच त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे अण्णाजी गांधीवादी आहेत. अण्णाजींच्या मृत्यूनंतर होणारे कौटुंबिक वाद वगैरे हा घटनाक्रम बघता आज गांधीवाद कुठे दिसतो का? अशी जगणारी ध्येयवादी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत? की गांधीवाद संपलाय?

- हो. याचं उत्तर मला अतिशय चांगल्या पद्धतीने देता येईल. 1975 आणि तिथून साधारण दहा-पंधरा वर्षे गांधीवाद प्राधान्याने होता. म्हणजे गांधीवादी समाजवादाची कास धरून चालणारी मंडळी होती. 1980 मध्ये भाजपाची स्थापना झाली तेव्हा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की, महात्मा गांधींच्या समाजवादी विचाराने चालणारा आमचा पक्ष असेल. परंतु त्यानंतर हळूहळू हा विचार मागे पडत गेला आणि खुद्द काँग्रेसनेसुद्धा हा विचार गुंडाळून ठेवला आहे. गांधीजींच्या तसबिरीमधे त्यांचा विचारसुद्धा टांगून ठेवला आहे. अण्णाजींचा मुलगा नागनाथ देशमुख करीत असलेलं घृणित राजकारण बघून त्यांना दुःख होतं आणि नागनाथला आपल्या कृतीचे पडसाद वर्तमानपत्रांत येऊ नये याची भीतीही आहेच. इथे वर्तमानपत्रांचंसुद्धा विश्व उभं राहिलेलं आहे. आज 2020 मध्ये सर्व परिस्थिती बघता सर्वार्थाने गांधीजींचा विचार घेऊन जगणारी माणसं अशक्यच आहेत. महात्मा गांधींचा विचार आपल्याला पटो की न पटो, पण त्यांच्या हाकेसरशी लाखो माणसं धावून येत होती. त्या वेळी त्यांच्या शब्दाला प्रचंड मान होता. ते पंतप्रधान किंवा राष्ट्रपती झाले नाहीत. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते बंगालमध्ये आंदोलनकर्त्यांना समजावीत होते. असा हा नि:स्वार्थी महात्मा त्यांच्या अनुयायांनासुद्धा पुरेसा कळला नाही. आजच्या काळात काय आणि पुढील काळात काय एवढे तत्त्वनिष्ठ कुणाला जगता येईल असे मला वाटत नाही. तीच तत्त्वनिष्ठा अंगी बाणून जगणाऱ्या अण्णाजी देशमुखांची तगमग आपल्याला पडघम आणि अश्वमेधमध्ये बघायला मिळते. 

प्रश्न - समाजवाद्यांविषयी काय म्हणाल? काहींचं म्हणणं आहे की समाजवाद्यांपेक्षा मार्क्सवादी परवडलेत. आज समाजवाद्यांची स्थिती काय झालेली आहे?

- समाजवाद्यांनी समाजवाद राजकारणाच्या वेठीला बांधला. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, भाई वैद्य यांच्यासारखी मंडळी इथे होती. पुढे समाजवाद्यांची काय अवस्था झाली आहे हे आपण पाहतोच आहोत. दोन्हीही कम्युनिस्ट पक्षांचही तसंच आहे. त्यांचाही समाजातील प्रभाव कमी झाला आहे. रशियातच 1990-91 मध्ये लेनिन, मार्क्स यांच्या पुतळ्यांची विटंबना होते. ते उखडून फेकले जातात. त्याचा परिणाम जागतिक पातळीवर होणारच. मुख्य भाग असा की संपूर्ण समाज केवळ मार्क्स, समाजवाद किंवा गांधीजींच्या विचारांवर चालत नाही. सर्वच विचारांचा- मग तो आधुनिक विचार असो की सनातनी; यांच्या योग्य समन्वयाने समाज चालत असतो. तेव्हा ही अशी काही मंडळी हा विचार ओलांडून पुढे जातात किंवा तो विचार बाजूला सारतात. हीच स्थिती समाजवाद्यांची झाली आहे. आज समाजवाद हा शब्दसुद्धा फार ऐकायला येत नाही. राजकारणाच्या दावणीला विचार बांधला की असं होतं. याचं उदाहरण म्हणजे होळीमधील श्रीनिवास बनकर. त्याच्या हाती अखेर काहीच उरत नाही. तो पूर्णतः हताश झाला आहे. एका अर्थाने तो म्हणजे आजच्या समाजवाद्यांचा प्रतिनिधी आहे.

प्रश्न - होळीमधील महत्त्वाचा टप्पा म्हणजे पी.व्ही.नरसिंह राव पंतप्रधान होणे आणि शरद पवारांनी केंद्रीय राजकारणात प्रवेश करणे. खरं तर ही केंद्रीय आणि राज्याच्या पातळीवर नवं वळण देणारी घटना होती. याच वेळी भारतीय राजकारणाचं स्खलन व्हायला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल?

- राजकारणाच्या स्खलनाला याआधीच सुरुवात झाली होती. मुख्यतः नव्वदनंतर आपल्याकडे जागतिकीकरण आलं त्याचाही संबंध राजकारणाशी आहे. यात महत्त्वाचे म्हणजे नरसिंह रावांनी पंतप्रधान होणे म्हणजे शास्त्रीजींनंतर गांधी घराण्याबाहेरचे झालेले ते पंतप्रधान होते. त्यांना सत्तास्थापनेसाठी फोडाफोडीचं राजकारणसुद्धा करावं लागलं. इकडे पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या पावलांवर पाऊल ठेवलं. पवारांचं केंद्रात जाणं हे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही अर्थानं नवं वळण घेणं आहे. सुधारकरराव नाईकांनी मुख्यमंत्री होणं हीसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी दिशा होती. कारण मराठा माणसाला टाळून जातीनं मराठा नसलेल्या माणसाला खुद्द शरदराव पवार यांनी मुख्यमंत्रिपदी बसविलं होतं. हे महत्त्वाचं आहे.

प्रश्न - रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद पाडली जाणं ही नव्वदच्या दशकातील मोठी घटना आहे. आपण हा संवेदनशील प्रश्न या कादंबरीत उत्तम रीतीने चितारला आहे. संघ आणि विहिंप यांच्यावर तुमचा बऱ्यापैकी आक्षेप दिसतो. बाबरी मस्जिद पाडली याचं तुम्हांला दुःख आहे की डाव्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न आहे?

- मुख्य प्रश्न असा आहे की, रामभक्त हे कारसेवेसाठी अयोध्येला गेले होते. कारसेवा राहिली बाजूला; आणि बाबरी पाडली गेली. भाजपा नेत्यांची प्रक्षोभक भाषणं लोकांसमोर झाली. ‘एक धक्का और दो, बाबरी मस्जिद तोड दो’ अशा घोषणा दिल्या गेल्या. कारसेवेला गेल्यानंतर सब्बल, टिकाव, फावडी घेऊन जाण्याची गरज खरंच होती? अयोध्येत काही मुस्लिमांचे नाहक खून पडले. भाजपाचा किंवा संघाचा माणूससुद्धा यावर तटस्थपणे विचार करेल तर त्याला ते चुकीचंच वाटेल. आपण चांगल्या कामासाठी जातो आणि काही वाईट घडणार असेल तर ते थांबवता आलं पाहिजे. भाजपला ते जमलं नाही. घडलेल्या घटनेचं मूल्यमापन होणारच. ज्यांचा दोष आहे आणि जे चुकीच्या पद्धतीने घडलं ते समाजासमोर आणलं तर त्यात चुकीचं काय आहे? जे घडलं ते होळी या कादंबरीत मी तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रश्न - बाबरी मस्जिद पाडणं ही तुमच्या दृष्टीने वाईट घटना आहे?

- अर्थातच ही घटना वाईट आहे. कारण राममंदिर बांधण्यापासून कुणीही कुणाला अडवलं नव्हतं. पण घडलं वेगळंच. दुसरं असं की, सहा डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचा विचार कसा होता ते आपणां सर्वांना माहिती आहे. नेमका हाच मुहूर्त का निवडला? रामनवमीचा का नाही? हनुमान जयंतीचा का नाही? त्यामुळं भाजपची जी एक दलित विरोधी प्रतिमा आहे ती उभी राहिली.

प्रश्न - राजीव गांधींची हत्या हा या कादंबरीचा दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. त्या दृष्टीने आपण सुंदर कथानक गुंफले आहे. ही पात्रे रंगवताना तुमच्यातला लेखक म्हणून आणि डॉ. शोभणे व्यक्ती म्हणून तुम्हांला काय वाटतं?

- ह्या संबंधी जो पसारा मी मांडला आहे त्या पसाऱ्यामध्ये विविध राजकीय भूमिका आहेत. आंदोलनं आहेत. माणसांच्याही भूमिका आहेत. यात मी कुठल्याही एका पक्षाचा झेंडा घेऊन उभा नाही. असे जर केले तर ते त्या कलाकृतीसाठी मारक ठरले असते. मी कुठलाही अजेंडा घेऊन लिहीत नाही. मी काळाचं चित्रण करतो. हा काळ स्थित्यंतराचा काळ आहे. मूल्यऱ्हासाचा काळ आहे. मूल्यांची जागा मूल्यहीन गोष्टींनी घेतली आहे. हा स्थित्यंतराचा प्रवास हेच या कादंबरीत्रयीचं एकमेव सूत्र आहे. काळाची चिरंतन मूल्ये मी या कादंबऱ्यांमधून मांडली आहेत. मूल्यांच्या पलीकडे माणूस आणि समाज जात असतो. त्याची दिवटी घेऊन आपण अंधारातील प्रवास करीत असतो. लेखकाने बटबटीतपणे भूमिका घेण्यापेक्षा मूल्यांच्या, तत्त्वांच्या सोबत भक्कमपणे उभे राहणे महत्त्वाचं आहे. ते मी या कादंबऱ्यांतून केले आहे. ठोस भूमिका घेणं हा साहित्यात जो एक समज निर्माण झालेला आहे तोच अशा लेखनासाठी अडचणीचा ठरतो.

प्रश्न - होळी लिहिताना आपण अनेक घटनाक्रम घेतले. त्यात तुम्ही राष्ट्रीय स्तरावरील राजकारणाचा घटनाक्रम मांडला तेव्हा वास्ववातील पात्रं तुम्ही घेतली आहेत. परंतु राज्यस्तरावरील किंवा स्थानिक पातळीवरील राजकारणाचं चित्रण करताना आपण वेगळ्या पात्रांची निवड केली आहे. असं का?

- मी सर्वच पात्रं प्रत्यक्षातील घेतली असती तर ती माझी निर्मिती ठरली नसती. माझी निर्मिती करताना प्रत्यक्षातील एखाद्या पटावरच्या घटनांशी त्या निर्मितीचं एक सायुज्यत्व मला मांडायचं आहे. मूल्यहीन राजकारणाचा विचार करताना जर प्रत्यक्षातील व्यक्ती घेतल्या तर तो केवळ दस्तऐवज होईल. केवळ दस्तऐवज मांडणं हे लेखकाचं काम नाही. प्रत्यक्षातील व्यक्ती आणि कादंबरीतील व्यक्ती यांचं एकमेकांशी जे नातं जोडलेलं असतं त्यातून वास्तव आणि कल्पिताचा एक सुरेख मेळ कसा घालता येईल याचा विचार करून मी या कादंबरीत पात्रांची योजना केली आहे.

प्रश्न - सर, होळीमध्ये राजकारणासोबतच समाजकारणही आलं आहे. त्यावरील तुमचे अभिप्राय महत्त्वाचे आहेत. याविषयी काय सांगाल?

- ही कादंबरी शंभर टक्के राजकीय आहे असं नाही तर ती तेवढीच सामाजिकही आहे. संस्कृतीच्या अंगानेही जाणारी आहे. आपलं जगणं, आपला भवताल असा एका रेषेत कधीच नसतो. राजकारणात समाजकारण, समाजकारणात राजकारण येतं. यातून सामाजिक स्थित्यंतराचा वेध घेण्याचा मी प्रयत्न केला. या कादंबरीतील काळ जसा राजकीय स्थित्यंतराचा, बदलाचा आहे तसाच सामाजिक स्थित्यंतराचाही आहे. त्यामुळे एका वेगळ्या अंगाने विचार करणारी ही कादंबरी आहे. राजकारण आणि समाजकारण ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि त्या सर्जनाच्या पातळीवर मांडणे हाच माझा प्रयत्न आहे.

प्रश्न - या कादंबरीत्रयींचा कालखंड हा 1975 ते 2000 असा आहे. 2000 ते 2022 असा पुढील भाग घेण्याचा आणि पुन्हा या राजकारण्यांची होळी पेटविण्याचा काही विचार आहे?

- नाही नाही. अशी काही योजना नाही. 2000 नंतरचा कालखंड मी ‘पांढर’ या कादंबरीत दुष्काळाचा आणि जागतिकीकरणाचा प्रश्न समोर ठेवून चितारला आहेच. पाणीप्रश्नापासून ते इतर अनेक प्रश्न त्यात हाताळले आहेत. शिक्षणव्यवस्थेवर मी ‘पांढरे हत्ती’ लिहिली आहे. माझा लेखन करण्यामागचा जो दृष्टिकोन असतो तो म्हणजे सहसा जे मराठी कादंबरीत आलेलं नाही ते मांडण्याचा प्रयत्न असतो. तुमच्या लक्षात आलं असेल की, आणीबाणी आणि त्यानंतरचा काळ याचं चित्रण मराठीत आलेलं नाही. त्या काळाचं राजकीय, सामाजिक अंगानं चित्रण करणं हे माझं ध्येय होतं. राजकारण हे इतर सर्व मुद्द्यांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. त्यामुळे ते चित्रण मी केले आहे. 2000 नंतरचं सामाजिक स्तरावरचं चित्रण मराठीत भरपूर प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा तेच चितारण्याचा विचार मी करणार नाही. बघू भविष्याच्या गर्भात काय आहे ते. परंतु आज मात्र निश्चितपणे यावर काही सांगता येणार नाही. होळीच्या ताणातून सध्या मी मुक्त झालो आहे आणि होळीच्या निर्मितीने मी पूर्णतः समाधानी आहे.

संवादक : डॉ.अजय कुलकर्णी, नागपूर

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके