डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पण या दोन दिवसांमध्ये मी इतक्या बॅगा उघडल्या आणि बंद केल्या, इतक्या बॅगांमध्ये आणि गाठोड्यांमागे मी फिरलो आणि इतक्या पेट्या आणि गाठोडी एखाद्या शापाप्रमाणे माझ्यामागे फिरली, इतक्या बॅगा हरवल्या आणि परत सापडल्या आणि इतक्या परत सापडल्या नाहीत आणि त्या परत मिळवण्यासाठी इतके प्रयत्न करवले आणि केले, की कुणाही सव्वीस वर्षाच्या व्यक्तीच्या जीवनात असं घडलं नसेल. मला तर अगदी बॅग-फोबिया झालाय. बॅग पाहिली की माझी दातखीळ बसते. जेव्हा चोहीकडे फक्त बॅगा आणि बॅगाच दिसतात, छोट्या, मोठ्या, मध्यम, हलक्या आणि जड, लाकडी आणि पत्र्याच्या आणि कातडी आणि कापडी- खाली एक, वर एक, जवळ एक, मागे एक- तेव्हा माझी आरडाओरड आणि पळापळ करण्याची स्वाभाविक शक्ती पूर्णपणे नष्ट होते आणि तेव्हा माझी शून्य दृष्टी, शुष्क मुख आणि दीन भाव पाहता मी एखाद्या कापुरुषासारखा वाटतो- त्यामुळे माझ्याबद्दल ननिदीचं जे मत आहे ते बरोबरच ठरतं आहे. मी विविध आणि चित्रविचित्र बॅगांमध्ये सापडल्याने असा झालो की काय? माझ्या या अवस्थेतलं एक चित्र काढायला सुरेनला सांग.

दार्जिलिंग / सप्टेंबर 1887

एवढ्यातच दार्जिलिंगला आलो. मार्गात बेली खूप चांगली वागली. खूप चिवचिवाट, गोलमालही केला, उलूसुद्धा केलं, हातांनी पक्ष्यांना बोलावलं, पण पक्षी कुठंही दिसले नाहीत. साराघाटावर स्टीमरमध्ये बसताना महाहंगामा केला. रात्रीचे दहा वाजलेले- हजार वस्तू सामानात. बरेच हमाल, महिला पाच आणि पुरुष माणूस फक्त एकच. नदी पार करून एका छोट्या रेल्वेगाडीत बसलो. त्यात चार बर्थस्‌ होते आणि आम्ही माणसं पडलो सहा. महिलांचं सामान आणि बाकीचं सामान लेडीज कंपार्टमेंटमध्ये ठेवलं. हे लिहिताना जेवढं संक्षेपात झालं, तेवढं प्रत्यक्षात मात्र झालं नाही. एकमेकांना हाका मारणं, पळापळ करणं काही कमी झालं नाही. तरीही ननिदी म्हणते की मी काहीच केलं नाही. म्हणजेच, माझ्यासारख्या पुरुषासारख्या पुरुषाने पाच महिला बरोबर असताना याहीपेक्षा अधिक आरडाओरडा आणि पळापळ करायला हवी होती. म्हणजेच, एखादा पुरुष एकदम प्रचंड संतापल्यावर जसा होतो, तसा अवतार मी धारण केला असता, तर ते पुरुषाला शोभेसं दिसलं असतं. माझा थंडपणा पाहून ननिदीची फारच निराशा झाली.

पण या दोन दिवसांमध्ये मी इतक्या बॅगा उघडल्या आणि बंद केल्या, इतक्या बॅगांमध्ये आणि गाठोड्यांमागे मी फिरलो आणि इतक्या पेट्या आणि गाठोडी एखाद्या शापाप्रमाणे माझ्यामागे फिरली, इतक्या बॅगा हरवल्या आणि परत सापडल्या आणि इतक्या परत सापडल्या नाहीत आणि त्या परत मिळवण्यासाठी इतके प्रयत्न करवले आणि केले, की कुणाही सव्वीस वर्षाच्या व्यक्तीच्या जीवनात असं घडलं नसेल. मला तर अगदी बॅग-फोबिया झालाय. बॅग पाहिली की माझी दातखीळ बसते. जेव्हा चोहीकडे फक्त बॅगा आणि बॅगाच दिसतात, छोट्या, मोठ्या, मध्यम, हलक्या आणि जड, लाकडी आणि पत्र्याच्या आणि कातडी आणि कापडी- खाली एक, वर एक, जवळ एक, मागे एक- तेव्हा माझी आरडाओरड आणि पळापळ करण्याची स्वाभाविक शक्ती पूर्णपणे नष्ट होते आणि तेव्हा माझी शून्य दृष्टी, शुष्क मुख आणि दीन भाव पाहता मी एखाद्या कापुरुषासारखा वाटतो- त्यामुळे माझ्याबद्दल ननिदीचं जे मत आहे ते बरोबरच ठरतं आहे. मी विविध आणि चित्रविचित्र बॅगांमध्ये सापडल्याने असा झालो की काय? माझ्या या अवस्थेतलं एक चित्र काढायला सुरेनला सांग.

असो. त्यानंतर मी दुसऱ्या एका कंपार्टमेंटमध्ये जाऊन झोपलो. त्या कंपार्टमध्ये आणखी दोन बंगाली होते. ते ढाक्याहून आले होते आणि बघितल्याबरोबर ते ढाक्याचे आहेत असं ओळखता येत होतं. त्यांच्यापैकी एकाच्या डोक्याला संपूर्ण टक्कल होतं आणि त्याचं बोलणं तिरकस होतं. त्यानं मला विचारलं, ‘आपले वडील दार्जिलिंगला होते का?' लक्ष्मी असती तर याचं यथोचित उत्तर देऊ शकली असती. ती बहुधा म्हणाली असती, ‘ते दार्जिलिंगला होते; पण आता दार्जिलिंग फार थंड असल्याने ते घरी परत गेले आहेत.'

सिलिगुडीपासून दार्जिलिंगपर्यंत सरलाचं उद्‌गारवाचक वाक्यात बोलणं चालू होतं- ‘अगंबाई! किती छान! कितीसुंदर!' सारखी मला डिवचून ती म्हणत होती, ‘रविमामा, बघा, बघा!' काय करणार, ती जे दाखवीत होती ते पहावंच लागत होतं. कधी एखादं झाड, कधी ढग, कधी एखादी मोठ्या नाकाची पहाडी स्त्री, तर कधी असं काही, की ती गोष्ट पाहण्याआधीच गाडी पुढे जाई आणि रविमामांना ती गोष्ट पहाता आली नाही म्हणून सरला दु:खी होई, पण रविमामांना मात्र त्याबद्दल मुळीच वाईट वाटत नसे. गाडी चालू लागली, बेली झोपू लागली. वन, पहाड, झरे, ढग आणि अनेक नकटी नाकं आणि छोटे छोटे डोळे दिसू लागले. क्रमाने थंडी, त्यानंतर ढग, त्यानंतर ननिदीची सर्दी, त्यानंतर शाल, कांबळं, पांघरूण, मोजे आणि त्यानंतर अगदी लगेच दार्जिलिंग. पुन्हा एकदा त्याच पेट्या, त्याच बॅगा, त्याच वळकट्या, तीच गाठोडी.ओझ्यांवर ओझी, हमालांवर हमाल, सामान हमालाच्या डोक्यावर देणं, साहेबाला पावती दाखवणं, साहेबाशी वादविवाद,वस्तू शोधूनही न सापडणं, आणि त्या वस्तूच्या पुनरुद्धारासाठी विविध प्रकारे बंदोबस्त करणं- यात मला दोनेक तास लागले. तोपर्यंत ननिदी डोलीत चढून, घरी जाऊन, अंगाभोवती शाल घेऊन, सोफ्यावर पडून विश्रांती घेऊ लागली होती आणि रवी काही मर्दासारखा मर्द नाही असा विचार करीत होती.

कलकत्ता

16 सप्टेंबर 1887

(बेली : रवींद्रनाथांची कन्या)

अनुवाद : विलास गिते

Tags: इंदिरादेवीला लिहिलेली पत्रे बेली विलास गीते रवींद्रनाथ टागोर vilas gite beli letter to indiradevi ravindranath tagor weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रतिक्रिया द्या

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके