डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

माझ्या बंडखोर जाणीवांचा प्रवास

देशातल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर स्नेहलता रेड्डी यांच्या 'सीता' नावाच्या नाटकाचा सरिता पदकी यांनी केलेला अनुवाद साधनामधून यदुनाथजींनी प्रकाशित केला. त्यातल्या सीतेनं मला झपाटून टाकलं. त्यातली सीता माझ्याच भावना बोलत होती. देशातल्याच नाही तर माझ्या अवतीभवती स्त्री म्हणून जी आणीबाणी समाजव्यवस्थेनं उभी केली होती, त्याविरुद्ध लढण्याची, बंडाची, विद्रोहाची भाषा त्यातली सीता बोलत होती. बंडखोरी करून मरण पत्करणं किंवा शरण जाणं हे दोनच रस्ते माझ्यापुढं आहेत. मला मरणाची भीती वाटत नाही, पण हा समाज त्याची ही नीती, धर्म या नावाखाली जे ढोंग भविष्यकाळपर्यंत चालवलं जाईल त्याला घाबरते मी. मला माहीत आहे, जग एका दिवसात बदलणार नाही. पण मी नाहीच शरण जाणार, मी स्वतंत्रपणे निवड करीन, माझी निवड आहे बंडाची. जीवनाचं मोल देऊन!

माणूसपणाच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी माझ्या मनात पहिल्यांदा जाणीवा निर्माण झाल्या आणि मी आवाज बुलंद करण्यासाठी सिद्ध झाले तेव्हा अभिव्यक्तीसाठी सर्वप्रथम व्यासपीठ मला 'साधना' साप्ताहिकाने दिलं. २८ वर्षांपूर्वी सुरू केलेला लढा चालूच आहे. या लढ्याच्या अभिव्यक्तीसाठी गरज पडेल तेव्हा आणि मधूनमधून काही प्रश्नांवर काही मुद्यांच्या अनुषंगाने 'साधना'त मी लिहीत आलेच आहे. पण 'व्यासपीठ' सदराच्या निमित्ताने पुन्हा एकदा 'साधना'ने एक अवकाश प्राप्त करून दिला आहे, जो आयुष्याच्या या टप्प्यावर आवश्यकच होता.

१९८० ते ८२ या काळात मी माझ्या मनातील घुसमट व्यक्त करणारी अनेक पत्रे साप्ताहिक साधनाच्या संपादकांना लिहिली होती. यदुनाथ थत्ते हे तेव्हा साधनाचे संपादक होते. त्यांनी ३ एप्रिल १९८२ च्या साधना अंकात माझी पत्रे छापली होती. ज्या माणूसपणाच्या आणि समतेच्या हक्का साठीच्या जाणीवांचा उल्लेख मी वर केला आहे. त्या जाणीवांची निर्मिती आणि त्याला बळ देणाऱ्यांमध्ये साधनाचं स्थान महत्त्वाचं होतं आणि यदुनाथजींची भूमिका फक्त संपादक इतकीच नव्हती, त्यापेक्षाही व्यापक होती. विशिष्ट सामाजिक, राजकीय विचारांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा समाजाशी असलेला संबंध, त्यांच्याबद्दल असलेला आदर या सर्व गोष्टी त्यात अंतर्भूत होत्या. त्यामुळे प्रचंड सामाजिक दडपणाखाली असतानाही साप्ताहिक साधनाच्या या संपादकापर्यंत आपलं म्हणणं आपली वेदना पोचवली पाहिजे, असा विश्वास त्या किशोरवयीन अवस्थेतही मला वाटला. 

मुस्लिम कुटुंबातून, मुस्लिम समाजातून अशा प्रकारच्या सामाजिक राजकीय चळवळीत आणि तेही मुलीने येणं, ही आजही सहज न घडू शकणारी गोष्ट, वीस-पंचवीस वर्षांपूर्वी घडू शकली ती कशामुळे? याचा मी विचार करते तेव्हा, मला दोन गोष्टी स्पष्टपणे जाणवतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे, ज्या प्रकारच्या वातावरणात तुम्ही बालपण घालवता, वाढता, त्याचा तुमच्या मनावर, विचारांवर भावविश्वावर व्यक्तिमत्त्वावर न पुसला जाणारा ठसा उमटतो आणि दुसरी गोष्ट असते ती तुमच्या विचारांमुळे निर्माण झालेल्या नात्यांची.

माझे वडील पुणे येथील म.फुले कृषि विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडले. खरं तर त्यावेळी त्यांना मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती, पण त्यांनी गावात येऊन शेती करायचे ठरवले. ते प्रगतीशील शेतकरी होते. तसेच, गावात श्रमदान करून जी माध्यमिक शाळा सुरू केली होती, त्यात शिक्षक म्हणूनही काम करत होते. त्या काळात त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे साहित्यसंकलन केले ते माझ्या वाचनात आले. त्याचा माझ्या मनावर खोल ठसा उमटला. या साहित्य संकलनात कबीर, सूरदास पासून ते रस्कीन टॉलस्टॉय, मोपांसा यांचे विचार सांगणारे उतारे आणि भगवद्गीता, कुराण, बायबल यातील उतारेही आहेत.

माझ्या वडिलांचा लोकसंग्रह अफाट होता. त्यांच्यात नेतृत्व कौशल्य होतं. पण त्यांचा विश्वास सत्तातीत, धर्मातीत राजकारण व लोकनीती यावर होता. त्यामुळे त्यांनी कधीही कुठलीही निवडणूक लढवली नाही. गांधीजी, साने गुरुजी आणि राष्ट्रीय चळवळीचा वारसा घेऊन एका लहान गावातील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या, आयुष्यभर शेतकरी म्हणून राबलेल्या, आणि अन्यायाविरोधात मी केलेल्या बंडखोरीत माझ्या पाठीशी राहिलेल्या, मी चळवळीत काम करत असताना समाजाच्या टिकेला तोंड देत राहणाऱ्या माझ्या वडिलांचा खोलवर ठसा माझ्या मनावर व बुद्धीवर पडला आहे.

माझा आत्तापर्यंतचा प्रवास मधून मधून कठीण आणि थकवणारा वाटला तरी मी वर नमूद केलेल्या दोन्ही गोष्टी म्हणजे ज्या वातावरणात मी वाढले ते माझं कुटुंब, गाव, माझा समाज त्यातून घडलेली मी आणि ज्या विचारांमुळे मी या लढ्यात आहे ते यांचा नेहमीच आधार वाटतो. मी ज्या गावात वाढले ते भारतातील खेड्यांचं जे प्रातिनिधिक चित्र आहे, त्यापेक्षा काही वेगळं नव्हतं. माझ्या लहानपणी सातशे घरांची वस्ती तिथे होती, आता बरीच वाढली आहे. गावात गावगाड्याची व्यवस्था आणि रचना होती. गावाच्या मध्यभागी एक ब्राह्मण कुटुंबाचं घर, मग लेवापाटील, मग मुसलमान नंतर सर्व बलुतेदार आणि जातीव्यवस्थेतला खालचा स्तर, मुख्य वस्ती लेवापाटील शेतकऱ्यांची. पंधरा वीस घरं पटेल, देशमुख या शेतकरी (यात शेतमजुरही होतेच) मुसलमानांची, एक-दोन घरं पठाण, मोगल, कासार (मुसलमान) आणि फकीर, बकरी कसाब (खाटिक) यांची. 

गावातील सर्व सवाष्णींना बांगड्या भरण्याचं काम मुसलमान कासाराचं, खाटिक गावाचाच. फकीर कुटुंबातल्या पुरुषाचे काम होतं रमजान महिन्यात उपवासासाठी पहाटे तीन वाजता मुसलमान घरातल्या सर्वांना जागं करायचं. सर्वांना रोजाच्या सहरीसाठी (सूर्योदयापूर्वी घ्यायचं जेवण, मग सूर्यास्तापर्यत अन्न नाही की पाणी नाही असा रोजा) जो उठवायला यायचा त्याचं नाव अरमानशाह फकीर. आम्हाला सक्त ताकीद होती की त्याला 'अरमानदादा' म्हणायचं, नुसत्या नावानं हाक मारायची नाही. हा अरमानदादा हातात कंदील, पांघरूण गुंडाळलेला, खड्या सुरेल आवाजात एक गाणं म्हणून मुसलमान कुटुंबांना जागं करायचा. त्याचं गाणं, त्या गाण्याचे शब्द, त्याचा आवाज आजही मला आठवतो- ते गाणं कुठल्या तरी सिनेमातलं असावं. त्याचे शब्द होते....

रातभर का है मेहमां अंधेरा 
किसके रोके रूका है सवेरा 
रात जितनी भी संगीन होगी 
सुबहा उतनी ही रंगीन होगी 
गम ना कर गर है बादल घनेरा 
किस के रोके रूका है सवेरा 
आ कोई मिलके तदबीर सोचे 
सुख के सपनों की ताबीर सोचे 
जो तेरा है वही गम है मेरा 
किस के रोके रुका है सवेरा

अरमानदादाच्या कुटुंबाचा दुसरा व्यवसाय होता लग्न आणि उत्सवांमध्ये ताशा आणि बँड वाजवणे. पण ते वर्षातून ठराविकच वेळेला मिळणारं काम. मुसलमान घरांना रोजच्या भाकरीसाठी हाक घालणं आणि ती गोळा करणं हे त्याचं रोजच्या उपजीविकेसाठी काम. मुस्लिम समाजव्यवस्थेतही असणाऱ्या जातिव्यवस्थेच्या उतरंडीवर तो खालीच होता. अरमानदादाचं घर गावगाड्यात खालच्या उतरंडीवर असणाऱ्या इतर जातींच्या वस्तीमध्येच होतं. याशिवाय एक घर सुताराचे, एक घर न्हाव्याचे, एक-दोन घरे मातंगांची, कुंभारवाडा सात-आठ घरांचा. चांभारवस्ती सात-आठ घराची, दोन घरं मारवाड्यांची सगळ्या गावाला किराणा पुरवणारी दुकानं त्यांची.

बारा बलुतेदारांव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या घरात सालगडी म्हणून काम करणाऱ्यांमध्ये मुसलमान आणि चांभार समाजाचे लोक मुख्यत्वे होते. आमच्याकडे असलेल्या सालगड्यामध्ये चांभार समाजातला होता. याच्याबाबतीतही आम्हाला सांगितले होते की, त्यांना 'भाऊ' म्हणायचे. इतकेच काय शेतीच्या रखवालीसाठी एक भिल्ल कुटुब होतं, त्यातल्या जंग्या भील हा आमचा जंग्याभाऊ. असेच मग सुपड्याभाऊ, रामभाऊ... या सर्वांना आमच्या स्वयंपाक घरापर्यंत प्रवेश होता. ईदच्या दिवशी या सर्वांचे जेवण आमच्या घरी केले जायचे. त्यांच्या पंक्तीला वाढण्याचे काम आम्हा मुलांचे असायचे. 

याशिवाय तालुक्याच्या गावातून येणारा एखादा किरकोळ विक्रेता, चणे-फुटाणे विकायला येणाऱ्या भोईणी यांच्या दुपारच्या जेवण्याची व्यवस्थाही होऊन जायची. डोक्यावर टोपलं घेऊन वस्तू विकायला आलेल्या एका मुलाची तर आमची आजी, फक्त जेवणच नाही तर रात्र झाल्यास ओसरीवर झोपण्याची व्यवस्थाही करायची.

गावाच्या सीमेलगत एक ओढा होता. त्याला मधून मधून पाटाचं पाणी सोडलं गेलं की पाणी यायचं. या ओढ्यावर गावातल्या महिला धुणी-भांडी करायला येत. या ओढ्याच्या पलीकडे शेतं सुरू होत. ओढा ओलांडला की गावाच्या पूर्वेकडे एक महानुभाव पंथाचं मंदिर होतं. तिथे काळे कपडे घातलेल्या पुजारणी आणि गुलाबी फेटे घातलेले महानुभाव भक्त अधून मधून दिसत. एक मशीद होती. 

अशा या गावात मुस्लिम शेतकऱ्याच्या कुटुंबात मी वाढले. आता मुस्लिम असं विशेषत्वाने नमूद करण्यासारखं काय तर धर्म आणि काही चालीरिती, विवाहपद्धती, सणसमारंभ वेगळे इतकंच. बाकी काही फारसा फरक नव्हता. आमचं कुटुंब एकत्रकुटुंब होतं. त्यामुळे चार काका, काकू, चुलत भावंडे, मोठ्या बारदान्यात आश्रयाला असलेली माणसं, विधवा स्त्रिया, आले-गेले असा सर्व मोठा पसारा. या सर्व पसाऱ्यांची सूत्रधार माझी आजी. ती कुटुंबप्रमुख. आमच्या आजोबांना पहिल्याचं आठवलं नाही, ते आमच्या मोठ्या भावंडांच्या लहानपणीच गेले. माझी आजी गुजराती पद्धतीची साडी नेसायची, म्हणजे मागून समोर पदर तर तिच्या सुना सर्व पाचवारी गोल पातळ नेसायच्या. बुरख्याची पद्धत नव्हती, मात्र फारशा बाहेर पडत नसत. आम्ही सर्व नातवंडांना फ्रॉक, शर्ट आणि हाफ चड्डी तर शाळेत जाणाऱ्या बहिणींना स्कर्ट ब्लाऊज अशी वेशभूषा. घरात बोलली जाणारी भाषा थोडीशी उर्दू आणि बरेचसे मराठी अशा मिश्रणातून तयार झालेली.

दरवर्षी घरातल्या कुणा ना कुणा भावंडाला शाळेत नाव दाखल करण्याचा समारंभ असे. छोटी भावंडं घरात राहत. शाळा मराठी माध्यमाचीच, शिवाय जिल्हा परिषदेची. गावातली सगळीच मुलं याच शाळेत येत, त्यामुळे जवळपास सगळ्याच समाजातल्या मुलांशी आमची मैत्री होई. त्यात काही जातीभेद विशेषतः आम्हा सर्वच भावंडांच्या मित्र मैत्रिणींमध्ये दिसला नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेने आमच्यावर केलेला तो सर्वात महत्त्वाचा संस्कार आहे असं मला वाटतं.

आमच्या घरात दिवाळी, ईदही व्हायची. शेतकरी कुटुंब म्हणून आखाजी व्हायची (अक्षय तृतीया), बैलपोळा व्हायचा. त्यात बैलांना आंघोळ घालून त्यांच्या शिंगांना रंग, झूल, गोंडे इत्यादींनी सजवून त्यांना पुरणपोळी खाऊ घातली जायची. शिवाय दरवर्षी गावची जत्रा असायची. ईदच्या दिवशी गावातल्या लोकांना शिरखुरमा खायला बोलवायचं, दिवाळीच्या वेळी आकाशकंदील मुलांनी घरीच बनवायचा. फटाके, फुलबाज्या आणायच्या. फराळाचे पदार्थ करायचे. कुंभाराने आणून दिलेल्या कोऱ्या पणत्या पाण्यात बुडवून ठेवायच्या. वाती वळून ठेवायच्या. संध्याकाळी आजी म्हणायजी लक्ष्मी आने का बखत हुवा दिया जलाओ'. सगळ्या पणत्या पेटवून घराच्या अंगणापासून ते कोनाड्यापर्यंत ठेवल्या जायच्या. 'दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा' हेदेखील असायचंच. वडील पांढरे शुभ्र धोतर, सदरा नेसून बाहेरच्या खोलीत बसायचे, ते दसऱ्याच सोनं आणि मिठाई घेऊन. गावातली माणसं येऊन कोणी पाया पडायचं, कोणी भेट घ्यायचं, सोन्याची पानं दिली-घेतली जायची. संक्रातीचा हलवा कसा दिला-घेतला जायचा. हे सगळं तर होतंच, शिवाय पैगंबर जयंती (मिलादुन्नबी ईद ए मिलाद)च्या रात्री रात्रभर जागरण करून नमाज पठण, त्यात पैगंबर गीतं म्हणायची. याशिवाय पंढरपूरची वारी, कीर्तनाचा गजर. हाजी मलंगच्या डोंगरावर गावातील हिंदू मुसलमान सकट सगळे जायचे. असे वर्षभर भरगच्च सणवार असायचे. 

शिवाय सुगीच्या दिवसात रामायण, महाभारत नाटक मंडळी यायची. त्यांची नाटकं, रामलीला बघायला जायचे, शिवाय कव्वालीचा कार्यक्रम इथंपासून ते शाळेतले मित्र मैत्रिंणीसोबत शेतात केलेली भरीतपार्टी ते भुलाबाई-भुलोजी आणि भोंडला, इथपर्यंत. हे सर्व सांगायचे कारण म्हणजे स्वत:ची जडणघडण म्हटली तर त्यात या सगळ्याच गोष्टी आल्या. यातली एकही गोष्ट मला माझ्यापासून वेगळी करता येईल का? किंवा माझ्या मनातून त्या नाहीशा करता येतील का? अशक्यच आहे. भारतीय गाव किंवा समाजाची ही जी एकरूपता आहे, ती आज दोन्हीकडच्या धर्मांध शक्ती जाणून-बुजून तोडायचा प्रयत्न करीत आहेत हे पाहून मन विषण्ण होतं.

आमचे कुटुंब म्हणजे मोठा बारदानाच, त्यामुळे मोठ्या काकांपासून ते छोट्या काकांपर्यंत, आईपासून काकू-आत्यापर्यंत आणि मोठ्या चुलत भावंडांपासून ते धाकट्या चुलतभावंडांपर्यंत या सर्वांचेही अंश माझ्या या जडणघडणीत आहेत. माझी मोठी आत्या तिच्याकडे तर सात-सात दिवस चालणाऱ्या कहाण्यांचा साठा होता. शिवाय मन्नत (नवस) फिटण्यासाठी मोहोल्ल्याच्या महिलासभेत वाचल्या जाणाऱ्या जनाबे सय्यदाच्या कहाण्या 'हार खुंटीने गिळला...' याही होत्याच. 

शाळेत जाणाऱ्या माझ्या मोठ्या ताईने केलेले संस्कार नीटनीटके, स्वच्छ राहण्याचे, मन लावून अभ्यास करण्याचे. शिवाय नीतीमूल्ये सांगणाऱ्या कथा सांगून केलेले संस्कार. तिने एक वही केली होती, ज्यात ती गांधीजींच्या वर्तमानपत्रातून येणाऱ्या गोष्टी कापून चिकटवत असे. त्यांची चित्रे चिकटवत असे. त्या वहीमध्येच मी पहिल्यांदा 'उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया' है ग.दि.माडगूळकरांचे गीत वाचले आणि पुढे शाळेत सामूहिकरित्या म्हटले. 

लेखन वाचनाचा पहिला संस्कार माझ्या आईने केला, ती आमच्या घरातली एकमेव साक्षर सून गावात ज्या मोजक्या घरात वर्तमानपत्र यायचे, त्यात आमचं घर होतं. शिवाय आमच्याकडे साधना साप्ताहिकदेखील येत होतं. आई वर्तमानपत्र वाचायची, आम्ही सर्व बहीण- भावंडंही वर्तमानपत्र आणि साधना वाचायचो. आमची वाचनाची आवड वाढली ती माझ्या सर्वात धाकट्या काकांमुळे. तालुक्याच्या गावी ते गेले की आमच्यासाठी एखादं तरी लहान मुलांचे मासिक, गोष्टीचं पुस्तक घेऊन येत, त्यात हिंदी, मराठी दोन्ही भाषांमध्ये पुस्तक असत. 

माझ्या वडिलांनी साधना साप्ताहिकाची वर्गणीच माझ्या नावाने भरली होती, त्यामुळे साधना साप्ताहिक वाचणं आपलं कर्तव्यच आहे असं मला वाटायचं. पुढे गावानेच प्रयत्न करून सुरू केलेल्या माध्यमिक शाळेत, ज्याला हायस्कूल असं म्हटलं जायचं, त्या शाळेने आणि शाळेच्या वाचनालयाने माझी वाचनाची ओढ वृद्धिंगत केली. चांदोबा, कुमार, किशोर, एकलव्य, आनंद यांसारख्या मुलांच्या मासिकांपासून ते पराग, धर्मयुग सारख्या हिंदी मासिक-साप्ताहिकांपर्यंत साहित्य वाचनासाठी उपलब्ध झालं. त्यातून मराठी सोबत हिंदीचीदेखील गती वाढली. वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घेतल्यावर बक्षीस मिळायचं, ते पुस्तकांचंच. कुटुंब, समाज आणि गाव या पाठोपाठ जर माझ्या जडणघडणीवर प्रभाव असला तर तो या वाचनाचा आहे. भाषा विषयाची पाठ्यपुस्तके माझी जास्त आवडती. बहिणाबाईच्या कवितांपासून कवियित्री पद्मजा…

दुःख नको टीचभर हृदयाचे
दुःख नको ओंजळभर प्रीतीचे
दुःख नको भिंतीतच उबणारे 
दुःख नको छपरातच दबणारे
दुःख असावे असे विशाल 
घेईल ते निज कवेत क्षितीताला
दुःख हवे गरुडाचे गर्वोहृत 
मातेच्या मुक्तीसह आणील जे जगी अमृत
प्रभू तुझ्या हास्यासम करुणामय 
दुःख हवे ही

आणि रामावतार त्यागीच्या 'पर मै बेईमान समय को अपना अहम नही बेचूंगा' पासून ते हरिवंशराय बच्चन यांच्या 'नन्हे पौधे और वृक्ष' यांचा संवाद... कवी बी यांची कविता. 

तेजाचे तारे तुटले मग मळेची सगळे पिकले 
लागती दुहीच्या आगी राष्ट्राच्या संसाराला 
अति महापूर येतो ढोंग्यांच्या पावित्र्याला
खडबडाट उडवी जेव्हा, कोरड्या विधींचा मेळा 
चरकात मान्यवर पिळती, सामान्य मुकी जनता ती 
कौटिल्य स्वैर बोकाळे तेजाचे तारे तुटले 

अशा सगळ्या भाषा साहित्याने माझं मन आणि विचारविश्व घडवलं. भोवतालच्या स्त्रियांची दुःख, आसपासची दु:खं, स्वत:ची होणारी कोंडी ही स्पष्टपणे पाहू शकले ती त्यातून. सभोवतालच्या दुःखांची जाणीव आणि त्याविरुद्ध लढलं पाहिजे, तो लढा कसा असेल याची दिशा साधनातून मिळाली. 

देशातल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर स्नेहलता रेड्डी यांच्या 'सीता' नावाच्या नाटकाचा सरिता पदकी यांनी केलेला अनुवाद साधनामधून यदुनाथांना प्रकाशित केला. त्यातल्या सीतेनं मला झपाटून टाकलं. त्यातली सीता माझ्याच भावना बोलत होती. देशातल्याच नाही तर माझ्या अवतीभवती स्त्री म्हणून जी आणीबाणी समाजव्यवस्थेनं उभी केली होती, त्याविरुद्ध लढण्याची, बंडाची, विद्रोहाची भाषा त्यातली सीता बोलत होते. ती म्हणत होती- ''अशा परिस्थितीत मी काय करावं? मला उत्तराची अपेक्षा नाहीच. बंडखोरी करून मरण पत्करणं किंवा शरण जाणं हे दोनच रस्ते माझ्यापुढं आहेत. मला मरणाची भीती वाटत नाही, पण हा समाज त्याची ही नीती, धर्म या नावाखाली जे ढोंग भविष्यकाळ पर्यंत चालले जाईल त्याला घाबरते मी. पुरुष जातीच्या भयंकर दडपणाची भीती वाटते मला. आम्ही स्त्रिया भुवया न उंचावता मान तुकवतो. पुरुषाचं अधिराज्य स्वीकारतो आपल्या आत दुःख सोसतो काही न बोलता. पण मी नाहीच शरण जाणार, मी स्वतंत्रपणे निवड करीन, माझी निवड आहे बंडाची, जीवनाचं मोल देऊन. मला माहीत आहे, जग एका दिवसात बदलणार नाही. '' 

तेव्हापासून तुम्ही मला संपवू शकाल माझ्या विचारांना नाही, ही भावना मनात सततची जागी राहिली अगदी सिनेमाबंदीच्या लढ्यापासून ती आजतागायत. 

(क्रमशः)

Tags: मुसलमान शेतकरी बारा बलुतेदार गावगाडा Muslims जातिव्यवस्था farmers Bara Balutedar Gavgada caste system weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रझिया पटेल
raziap@gmail.com

मागील चाळीस वर्षे रझिया पटेल सामाजिक कार्यात असून, मुस्लिम समाजाचे प्रश्न, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समता या तीन क्षेत्रांत त्या विशेष सक्रिय आहेत.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके