डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आजच्या काळाच्या संदर्भात चळवळीला दिशा देणाऱ्या नेतृत्वाचा जेव्हा मी विचार करते आणि मार्गदर्शक म्हणून मी यदुनाथजींकडे बघते, तेव्हा ते अतिशय दुर्मीळ आणि लक्षणीय वाटतं. आजच्या काळाची परिस्थिती आणीबाणीपेक्षाही भयंकर आहे. अशा वेळी पदोपदी यदुनाथजींची आठवण होते. त्यांनी एका भाषणात सांगितलं होतं, ‘‘जुलमी हुकूमशहा सगळ्यांत जास्त कोणाला भीत असेल तर लोकांमधल्या स्वतंत्र विचारशक्तीला. त्यामुळे लोकांची मने गुलाम करायचा प्रयत्न ते करतात.’’ आणि म्हणूनच विचारशक्ती जोपासण्याची साधने, तेजस्वी विचारप्रवर्तक साहित्य आणि पत्रकारिता महत्त्वाची ठरते. त्यांनी साप्ताहिक साधनाची हीच ध्येयदृष्टी ठेवली होती.मी साप्ताहिक साधनामध्ये त्यांच्यासोबत जायचे त्या वेळी अनेक गोष्टी त्यांनी समजून सांगितल्या. त्या म्हणजे- बोलताना किंवा लिहिताना वाक्यं लहान असावीत, पल्लेदार असू नयेत. त्यामुळे आपले म्हणणे सहजपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू शकतो.

आदरणीय यदुनाथजींबद्दल लिहिताना दर वेळी मनात एक आंदोलन निर्माण होते. माझ्या आयुष्यातल्या पहिल्या टप्प्यावर यदुनाथजी मला भेटले, तेव्हा मला व्यवस्थेच्या विरोधात बंडखोरी करायची होती. ती लढाई त्यांनी संवेदनशीलपणे समजून घेतली आणि ते माझ्या बाजूने उभे राहिले. त्यांचं ते उभं राहणं कोण्या एका रझियासाठी नव्हतं, तर अन्यायाचा प्रतिकार करू पाहणाऱ्या एका मुलीसाठी होतं. पुढे सामाजिक चळवळीचा भाग झाल्यावर मला पदोपदी यदुनाथजींचा आधार वाटत राहिला.

आज मागे वळून बघते, तेव्हा विचार करते की, एका दूरवरच्या लहान खेड्यातली मुलगी मी- जिचा बाहेरच्या जगाशी प्रत्यक्ष संबंध कधी आला नव्हता, तिला प्रकर्षाने असे का वाटावे की आपल्या मनातलं दु:ख यदुनाथजींना सांगावं, ते मला मदत करतील? मला त्याचं उत्तर मिळतं ते म्हणजे ज्या पद्धतीने यदुनाथजींनी ‘साधना’ साप्ताहिक चालवलं त्याच्या स्वरूपात आहे. माझी तारुण्यातील वैचारिक घडण यदुनाथजींनी चालवलेल्या साधना साप्ताहिकातून झाली आहे.

साप्ताहिक साधनाचे बालकुमार अंक, दिवाळी अंक, दर आठवड्याला नियमित येणारे अंक मी वाचत असे. या अंकांमधून काही मूल्ये रुजली. काही विचार रुजले. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर काम करणारे, दूरवर आदिवासी भागात काम करणाऱ्यांचा, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या अनेक तरुण-तरुणींचा परिचय होत गेला. यदुनाथजींनी ‘समता संगर’ नावाचे एक सदरच साधनामध्ये सुरू केले होते. ते माझे आवडते सदर होते. त्यात कार्यकर्त्यांच्या कामाबद्दल लिहिलेलं असायचं. बालकुमार अंकामध्ये आपली भावंडं म्हणून इतर प्रांतांमधील मुलांबद्दल लिहिलेलं असायचं, दिवाळी अंकामध्ये भारतातील विविध एक तरी परप्रांतीय भाषेतली अनुवादित कथा, कविता असायची. आंतरभारतीचा विचार असा झिरपत गेला. शिवाय आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर स्नेहलता रेड्डींनी लिहिलेलं ‘सीता’ हे नाटक साप्ताहिक साधनामधूनच मी अनुवादित स्वरूपात वाचलं. आणीबाणीच्या काळात काळ्या रंगाचं मुखपृष्ठ असलेलं साधना साप्ताहिक मी पाहिलंय. नंतर जयप्रकाशजींच्या विचारांचा, आंदोलनाचा परिचय मला त्यातूनच झाला.

असे यदुनाथजी लहान खेड्यातल्या एका मुलीच्या पत्रांना उत्तरं देत होते. त्यांच्याबद्दल विश्वास वाटावा, असं काहीतरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होतं. त्यांनी केवळ मला पत्रोत्तरंच दिली असं नाही, तर ते माझ्या वडिलांना गावी येऊन भेटले आणि माझ्या वडिलांनाही त्यांच्याबद्दल तेवढंच प्रेम वाटत होतं. पुढे जेव्हा पुण्यात त्यांच्या घरी मी जाऊन राहिले, तेव्हा जवळून त्यांच्याकडे बघताना माझ्या असं लक्षात आलं की, माझ्यासारखी शेकडो तरुण मुलंमुली त्यांच्याकडे आकर्षित झालेली आहेत. तरुणांबद्दल त्यांचं प्रेम आणि ममत्व हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष भाग होता. चळवळीतील मुलं मग ती संघर्ष वाहिनीची असोत, युक्रांदची असोत की राष्ट्र सेवादलाची; त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. त्यामुळे ते सगळ्यांना आपलेसे वाटायचे.

अशा चळवळीतल्या, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या युवकांना अभिव्यक्तीसाठी जागा असली पाहिजे, असे त्यांना वाटत असे. राजा ढाले यांच्या ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख साधनात छापल्यानंतर खूप गहबज झाला होता. अगदी यदुनाथजींचे पुतळे जाळण्यापर्यंत मजल गेली होती. पण ते ठाम होते. समाजातल्या सर्व थरांतल्या समस्या डोळसपणे आणि संवेदनशीलतेने समजून घेणं, त्या समोर मांडणं आणि त्या सुटण्यासाठी चालना देणं हा त्यांच्या कार्याचा अविरत भाग होता.

साधनाचे संपादकत्व सांभाळून ते देशभर फिरायचे, लोकांशी बोलायचे. त्यांनी लोकशाही समाजवादाचा विचार देशातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत आणि विशेषत: तरुणांमध्ये रुजवला. हे करताना त्यांनी खूप माणसं जोडली. पण शेवटपर्यंत एका कार्यकर्त्याच्या भूमिकेतच त्यांनी स्वत:ला पाहिलं. मी नेता आणि माझे हे अनुयायी, असे यदुनाथजी कधी दिसत नाहीत. अहंकार नाही. मन आणि विचारांना व्यापून टाकणारा  साधेपणा, आयुष्यभर त्यांनी सार्वजनिक वाहनातून प्रवास केला एस.टी. आणि रेल्वेतून. शेवटच्या काळातला पक्षाघात त्यांना रेल्वेच्या प्रवासात झाला.

खेडोपाडी प्रवास करताना ते तिथे काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना विशेषत्वाने भेटत. शिरपूर-शिंदखेडा या भागात आदिवासींच्या जंगल-जमीन हक्कांसाठी लढणाऱ्या मजूर संघर्ष वाहिनीचे भीमराव म्हस्के आणि कुंजबिहारी रावत यांच्या अनेक कार्यक्रमांसाठी यदुनाथजीं गेले होते. कुंजबिहारी रावत सांगतात की, त्यांना स्वत:साठी वेगळी व्यवस्था नको असायची. आम्ही जसे राहत होतो, जसं जेवण घेत होतो तसेच तेही घ्यायचे. त्यांना नेता, सत्ता, पदं अशा गोष्टींची पत्रास नव्हती.

मी जेव्हा त्यांच्या सोबत राहिले, साप्ताहिक साधनामध्येही त्यांच्या सोबत जात होते, त्या काळात मला लक्षात आली ती लोकशाही आणि लोकनीतीवरील त्यांचा दृढ विश्वास. लोकनीती, लोकशक्ती ही लोकशाहीत जास्त महत्त्वाची असते आणि म्हणून लोकशाहीची संस्कृती समाजात रुजली पाहिजे, असे ते म्हणत.  त्यांचा सत्तेच्या राजकारणाकडे मग ते चळवळ असो वा राजकीय, त्यांचा फार कल नव्हता. आणीबाणीच्या विरोधात इतका प्रखर तेजस्वी लढा दिल्यानंतर ते पुन्हा आपल्या पूर्वीच्या भूमिकेत रमून गेले. त्या लढ्याचा त्यांनी नंतर गवगवा केला नाही की बदललेल्या राजवटीकडून स्वत:साठी काही अपेक्षा ठेवल्या नाहीत. स्वत:बद्दल ते एकूणच कमी बोलायचे. राहणीमान खूप साधं, दर्प कुठेही नाही. त्यांचं ममत्वही जाणवायचं. त्यामुळे कोणालाही त्यांचा दरारा वाटायचा नाही किंवा त्यांची नाराजी, राग, लोभ या गोष्टींनाही सहसा सामोरं जावं लागायचं नाही. कारण ते समोरच्याचीच बाजू आधी समजून घ्यायचे.

आजच्या काळाच्या संदर्भात चळवळीला दिशा देणाऱ्या नेतृत्वाचा जेव्हा मी विचार करते आणि मार्गदर्शक म्हणून मी यदुनाथजींकडे बघते, तेव्हा ते अतिशय दुर्मीळ आणि लक्षणीय वाटतं. आजच्या काळाची परिस्थिती आहे, आणीबाणीपेक्षाही भयंकर आहे. अशा वेळी पदोपदी यदुनाथजींची आठवण होते. त्यांनी एका भाषणात सांगितलं होतं, ‘‘जुलमी हुकूमशहा सगळ्यांत जास्त कोणाला भीत असेल तर लोकांमधल्या स्वतंत्र विचारशक्तीला. त्यामुळे लोकांची मने गुलाम करायचा प्रयत्न ते करतात.’’ आणि म्हणूनच विचारशक्ती जोपासण्याची साधने, तेजस्वी विचारप्रवर्तक साहित्य आणि पत्रकारिता महत्त्वाची ठरते. त्यांनी साप्ताहिक साधनाची हीच ध्येयदृष्टी ठेवली होती.

मी साप्ताहिक साधनामध्ये त्यांच्यासोबत जायचे त्या वेळी अनेक गोष्टी त्यांनी समजून सांगितल्या. त्या म्हणजे- बोलताना किंवा लिहिताना वाक्यं लहान असावीत, पल्लेदार असू नयेत. त्यामुळे आपले म्हणणे सहजपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू शकतो. दुसरं म्हणजे- लिहिताना ते नेहमी पाठकोरे कागद, पूर्णपणे उघडून घेतलेले, वापरलेले लिफाफे वापरत.

भारतीय शिक्षणसंस्थेतून जेव्हा आम्ही मुस्लिम समाजातल्या निरक्षरतेबाबत आणि मुस्लिम मुलांच्या शाळा गळतीबाबत काम करत होतो, तेव्हा महानगरपालिकांच्या प्राथमिक शाळांमध्ये छोट्या मुलांसाठीच्या आणि वस्त्यांमधील कार्यक्रमांतदेखील यदुनाथजी आले होते. छोट्या मुलांसाठी गाणी, गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. लहान मुलांशी बोलण्याची त्यांची भाषाशैली होती. त्यामुळे ती लहान मुले त्यांच्याशी पटकन्‌ समरस व्हायची. वस्तुत: लहान मुलांशी बोलणं कठीण असतं आणि त्यांना बोलणाऱ्यांमध्ये प्रेम आणि ममत्व जाणवलं तरच ती प्रतिसाद देतात. यदुनाथजी त्यांच्याशी असा संवाद साधत.

यदुनाथजी जसे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत, तशा माई थत्तेही. यदुनाथजींनी मला त्यांच्या घरी घेऊन गेल्यानंतर मार्इंनी मला घरात सामावून घेतलं. हे खरं म्हणजे इतकं सोपं नसतं, हे आज जाणवतं. एक तरुण मुलगी- तीही मुस्लिम समाजातून आलेली, तिला त्यांनी मुलीप्रमाणे सांभाळली.

यदुनाथजींनी लोकशाही, धर्मनिरपेक्षता, मानवता आणि निर्भयता ही जीवनमूल्ये आणि विचार दिले. त्यांच्याशी त्यांनी कधी समझोता केला नाही आणि तीच दृष्टी मलाही दिली. आजच्या भयंकर कोलमडणाऱ्या परिस्थितीत मला तिचा आधार वाटतो.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रझिया पटेल
raziap@gmail.com

मागील चाळीस वर्षे रझिया पटेल सामाजिक कार्यात असून, मुस्लिम समाजाचे प्रश्न, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समता या तीन क्षेत्रांत त्या विशेष सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके