डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

देशाचं अखंडत्व, संविधान संपताना दिसतंय. कसे बोलतायत नेते! कुणाचा कुणास पायपोस नसावा, अशी स्थिती आहे. जनता मजबूर. धूळफेकीचं तंत्र मात्र मस्त जमलंय नेत्यांना. शेतकरी लाचार.. मध्यमवर्गीय सतत बचावाच्या संघर्षात डोलत असतो- मन की बात ऐकत.. फसव्या, फुगवून सांगितलेल्या पॅकेजचा बोलबालाही नीट पसरवला टीव्हीवर.  बरोब्बर यांचा सगळा फुलोरा उघडून दाखवते. रविशकुमार आहे तोवर हे समजत राहील. बाकी सगळे चॅनेल्स गारुड्याच्या पुंगीवर डोलणारे साप झालेत. मस्त दिवसभर खोटी चऱ्हाटं वळत असतात.

मुस्लिम सत्यशोधकांच्या कोंडीचे पाचवे कारण

मार्च महिन्याच्या अंकातील संपादकीय वाचले. आपण मुस्लिम सत्यशोधकांची कोंडी कोणकोणत्या चार कारणांनी झाली याची केलेली चर्चा व त्यातून काढलेले निष्कर्ष पटणारे आहेत. त्यामध्ये आणखीही एक कारण जोडावेसे वाटते. इतिहासकाळात ब्रिटिशांची राज्यसत्ता आल्यामुळे प्रथमच समान पीनल कोड लागू झाल्याने शासनाकडून फौजदारी गुन्ह्यांमध्ये निष्पक्ष भूमिका घेण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कुठल्याही समुदायाने कायदा मोडणारी आगळिक केल्यास त्याचा परिणामकारक बंदोबस्त होऊ लागला. त्यातून हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांना शांततापूर्ण सहअस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सांभाळाव्या लागणाऱ्या मर्यादांचे जास्त व्यवस्थित भान आल्याने गेल्या दीडशे वर्षांत त्या दोन्ही समाजांच्या अंगवळणी पडल्या. प्रत्येक समाज आपल्या बाजूने शक्यतो ह्या मर्यादांचे उल्लंघन होऊ न देण्याचा प्रयत्न करतो आणि दोन्ही समाजांतील समजदार माणसे एकत्रितपणे स्थानिक पातळीवरच समझोता घडवून आणतात. त्यामुळे सहअस्तित्व जास्त टिकाऊ झाले आहे. पण हिंदुत्ववादी शासन संस्था समान न्यायाचे तत्त्व उल्लंघनाचे अनुभव वाढत असल्याने हे पुढे पडलेले पाऊल पुन्हा मागे जाईल की काय, अशी तुम्ही व्यक्त केलेली शंका योग्य आहे.

खरे तर टिकाऊ सहअस्तित्वास तडा जाऊ न देता त्याच्यापुढचे पाऊल सहसौहार्द निर्माण करणे असे आहे. ते करण्यामध्ये मुस्लिम समाजातील पडदा पद्धत ही मोठीच अडचण ठरते, असे वाटते. मुस्लिम समाज अलग पडण्यात/राहण्यात त्या पाचव्या कारणाने कोंडी होते. आज अनेक सुशिक्षित, उच्चशिक्षित, सुधारणावादी मुस्लिम महिला पडदामुक्त होऊन समाजात मोकळेपणाने वावरत असलेल्या दिसत असल्या तरी सर्वसामान्य मुस्लिम समाज- विशेषत: शहरात राहणारा- पडदापद्धत टिकवून ठेवताना दिसतो. त्यामुळे दुरावा टिकून राहण्यास मदत होते. उदा. मिस्टर देशपांडे आणि मिस्टर शेख हे जरी परस्परांचे चांगले मित्र असले तरी देशपांडे आणि शेख परिवारांमध्ये कौटुंबिक स्नेह निर्माण होण्यावर पडदा घालण्याने मर्यादा पडतात. असे कौटुंबिक संबंध आणि मैत्र निर्माण झाले तर, दोन्ही समाजांमधील परस्परांमधील पूर्वग्रह दूर होण्यास बरीच मदत होईल.

 असा बदल जर व्यापक प्रमाणावर झाला, तर दोन्ही समाजांमध्ये केवळ सहअस्तित्वापुढे जाऊन सामाजिक दुरावा नाहीसा होईल. शेवटी दोन्ही समाजांच्या रोजच्या जीवनाच्या समस्या सारख्याच आहेत, याचा एहसास निर्माण होईल. त्यामुळे मुस्लिम सत्यशोधक समाजाने त्यांच्या इतर सर्व कार्यक्रमांच्या जोडीला पडदामुक्तीच्या चळवळीला प्राधान्यता द्यावी, असे सुचवावेसे वाटते. सर्वच प्रकारच्या कोंडीमध्ये अडकलेल्या मुस्लिम महिला याला उत्साहाने प्रतिसाद देतील, असा विश्वास वाटतो.

मागच्या काही अंकांमध्ये शमसुद्दीन तांबोळी यांनी आपल्या विस्तृत लेखांमधून गेल्या पाच दशकांतील मुस्लिम सत्यशोधक चळवळीच्या कार्यक्रमांची क्रमवार लांबच लांब जंत्री मांडली होती. त्या सर्वांमधून खरे कार्यकर्ते चळवळ पुढे रेटण्याचा कसा सतत प्रयत्न करत आहेत, हे समजले. या पाच दशकांतील महत्त्वाच्या घडामोडी, प्रगती, किती ठिकाणी नव्याने काम सुरू होऊ शकले, किती लोक जोडले गेले- ही आकडेवारीही मांडावी असे वाटते. कदाचित 22 मार्चच्या प्रस्तावित कार्यक्रमावेळी अशी मांडणी होईल, अशी अपेक्षा. कदाचित मुस्लिम महिलांनी सर्वांसाठी खुल्या महिला मंडळाचे सदस्य होणे, हे पहिले सोपे पाऊल ठरेल.

या बाबतीतील साताऱ्यातील अनुभव असा की- निवृत्त अभियंता मंडळात हिंदू-मुस्लिम एकत्र येऊन मैत्र टिकवतात, पण अभियंता भार्या समितीच्या वेगळ्या बैठकांमध्ये सामील होणे मुस्लिम अभियंता भार्या टाळतात.

रमेश आगाशे, सातारा

 

मातृदिनाचा असाही एक सन्मान

दि.30 मेचा साधना अंक डिजिटल माध्यमामधून समोर आला, आधीप्रमाणे मुखपृष्ठ पाहून अनुक्रमणिकेचे पृष्ठ उघडले आणि तर्जनीने ‘आई, तुझ्यामुळेच दिसले जग हे थोडे!’ हा दत्ता गांधी यांचा लेख उघडला. वाचताना आईची आठवण येऊन डोळे भरून येत होते.

साधनाशी माझा संबंध गेल्या 50 वर्षांपासून आहे, तसाच दृढ आहे; म्हणूनच गुरुजींचे संस्कार आणि साधनाच्या सततच्या संपर्कामुळे दत्ता गांधी यांच्या या लेखामधील प्रत्येक शब्दात मला ‘श्यामची आई’च दिसत होती. अप्पांनी 98 व्या वर्षाच्या पदार्पणामध्ये केलेले हे लिखाण- प्रत्येक वाक्यात डोकावत असणारे त्यांचे मातृप्रेम संवेदनशील मनास ओलावून टाकते. मुले शिकून मोठी झाली आणि परदेशात जाऊन तेथे चाकरी करू लागली की, त्यांना लाडू भरविणारे आणि इतरांना आनंदाने वाटणारे शेकडो आई-बाबा मी जवळून पाहिले; पण राष्ट्रप्रेमाने भारलेल्या अप्पांना ‘वंदे मातरम्‌’ म्हटल्यावर आईने त्यांच्या मुखामध्ये गुळाचा खडा भरविणे, ही त्यांच्या आईची आठवण डोळे ओले करते. ढासळलेल्या घराच्या प्रत्येक चिऱ्याला आधार देऊन चिमण्या पाखरांचे रक्षण आणि पोषण केलेली अप्पांची आई भारतीय संस्कृतीला तशी नवी नाही. प्रत्येक घरात ती होती आणि आजही आहे. फक्त दत्ता गांधी यांना तिला शब्दबद्ध करता आले, इतरांनी मात्र मातृदिन साजरा करून कुठे तरी ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न केला. गेली 97 वर्षे आणि यातील प्रत्येक दिवस त्यांनी मातृदिन म्हणून साजरा केला, हा आईचा खरा सन्मान. अशा सन्मानापासून कुठलीही माता वंचित राहू नये, आईचे कष्ट व वात्सल्य याला ऋण समजू नये- एवढा संदेश जरी या लेखामधून वाचकांपर्यंत पोहोचला तरी आयुष्याच्या सांजवेळी अप्पांनी ‘साधनासाठी लिहिलेल्या या शब्दांचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला आहे’ असे मला वाटेल.

डॉ. नागेश टेकाळे, मुलुंड (मुंबई)

 

अनारोग्याचा अंधार निरसू दे आणि स्वच्छ विचारांच्या पुस्तकांची लख-लख बरसू दे

आम्ही चंदगडनजीक एका लहानशा खेड्याजवळ रानात राहतो आहोत. कोणतीही लिंक सहजासहजी उघडत नाही. दुर्गम प्रदेशामुळं रेंज.. नेट.. नाही. फार पातळ. पण सांगलीला घरी ‘साधना’चे अंक येतील एवढ्यात. सगळं वातावरण निराशेचं आहे. जमेल तेवढं वाचायला मिळतंय. पण पालनपोषण करणारं सरकार.. राजकारणी सध्या जनतेकडे न बघता परिस्थितीचा फायदा स्वतःसाठी कसा होईल, यात गुंग आहेत. फार वाईट गोष्ट आहे ही. यांना कोण सांगणार... थोडंसं बोलून बिळात जाऊन बसणारे, एखादा साधू महाराज वगैरे असावा असे परिस्थितीबाबत तटस्थ नेते... काय करणार हे...? यांची गुजरातची कारकीर्दच रक्तरंजित होती, प्रत्येक पावलावर हुकूमशाही.

अचानक नोटबंदी.. अचानक लॉकडाऊन.. कुणाशी सल्लामसलत नाही, परिणामावर चर्चा नाही. हे केवळ धनिकांचेच धनी आहेत. कसली जबाबदेही पण नाही. जरा चार-पाच दिवस वेळ दिला असता, तर मजूर असे देशोधडी लागले नसते. आता तोंडावर मास्क घालून सोईस्कर गप्प बसतात. आता तर राज्या-राज्यांत काय ते बघा; मी मोकळा. असं चित्र आहे.

देशाचं अखंडत्व, संविधान संपताना दिसतंय. कसे बोलतायत नेते! कुणाचा कुणास पायपोस नसावा, अशी स्थिती आहे. जनता मजबूर. धूळफेकीचं तंत्र मात्र मस्त जमलंय नेत्यांना. शेतकरी लाचार.. मध्यमवर्गीय सतत बचावाच्या संघर्षात डोलत असतो- मन की बात ऐकत.. फसव्या, फुगवून सांगितलेल्या पॅकेजचा बोलबालाही नीट पसरवला टीव्हीवर.  बरोब्बर यांचा सगळा फुलोरा उघडून दाखवते. रविशकुमार आहे तोवर हे समजत राहील. बाकी सगळे चॅनेल्स गारुड्याच्या पुंगीवर डोलणारे साप झालेत. मस्त दिवसभर खोटी चऱ्हाटं वळत असतात.

योगींना कळत नाही- लॉकडाऊन अविचारीपणे अचानक कुणी आणला? यांना तर तीच हौस आहे आतली, लोकांना बंदिस्त करणे. काळ यांच्या पथ्यावरच आहे. लढाईही पथ्यावर पडली. काम काहीच नाही. गाय आणि मंदिर यापुढं माणूस कःपदार्थ.

आता हे चित्र बदलणं आणि मानवतावादी, उदारमतवादी, समतावादी राज्य पूर्वपदावर येणं अवघड. काँग्रेसला कंटाळून यांना संधी दिली आणि आता शेवटच आला. काँग्रेसची माणसं मूर्ख आहेत. पण ते जात-धर्म बघून मरणाचं-संपवण्याचं, हटवादी राष्ट्रवादाचं षडयंत्र तरी करीत नाहीत. आताची हवा दुष्ट आहे. ‘मुँह में राम बगल में छुरी.’ या म्हणीस तंतोतंत उतरणारी आहे. आता हवाच पूर्ण प्रदूषित नाही, विषारी झाली आहे. ताकद मोठी आहे. पैसा आहे.. उद्योगपतींचं सरकार आहे. कशाचीच कमी नाही..

हे राजकीय चक्र सोसूनच सामान्यांना पार जावे लागेल. आता केवळ स्वतःचाच विचार करणाऱ्या जमाती आणि समुदाय.. साने गुरुजींची साधना, रामचंद्र गुहा, रविशकुमार यांसारखे पत्रकार, भारतीय संविधान हे सगळे सकारात्मक, मानवतावादी विचार जिंकत राहोत. या विचारापाठीच राहणं हाती आहे.

असो. बाहेर शहरातून सगळे स्वतंत्र बेटावर विखुरलेत. मरणारे मरतायत.. राजकीय यश-अपयश दाखवण्यात गुंग अतिरथी-महारथी! ही हवा छान मिळाली आहे त्यांना. काय बोलावे यावर कळत नाही. साधना ताकदीने चालावी.

वंदना साबळे, चंदगड, जि.कोल्हापूर

 

साधना सांप्रत काळातील सर्वोत्तम मराठी साप्ताहिक आहे. मी लहानपणापासून संघस्वयंसेवक आणि संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपमध्ये काम केलेला माणूस आहे. यादरम्यान त्यांचं सांगणं आणि वागणं यातला 180 अंशांचा फरक माझ्या लक्षात येत गेला. या काळात मी ‘साधना’ वाचायला सुरुवात केली आणि मी त्यांच्यापासून संपूर्णपणे दूर गेलो. साधनाचे विचार आणि माझे विचारांती तयार झालेले विचार खूपसे जुळणारे आहेत, असं मला वाटायला लागलेलं आहे.

नितीन साळुंखे

 

दि.23 मेच्या साधना अंकातील संकल्प गुर्जर यांनी लिहिलेला, येऊ घातलेल्या टोळधाडीवरील लेख वाचला. हे एक नवीनच संकट! ‘मामाच्या गावाला जाऊ या’ हे गाणं कुठल्या चित्रपटात? या चित्रपटाची सुरुवात टोळधाडीच्या दृश्याने होते. एका आत्मचरित्रात वाचल्याचे स्मरते- टोळधाड आली की, सूर्यही झाकला जायचा. टोळधाडीनंतर दुष्काळ येणार हे पाहून लोक टोळ मारून, ते पोती-पोती भरून ठेवत व नंतर भाजून खात!

विजय दिवाण,

 

It's strange observation that Marathi Retd IAS officers are rarely seen in this list. It may be Becoz of

typical Marathi mentality 'not to look beyond ourself. ' Thank u for the online Sadhna I sent...

Subhash Deshmukh, Nashik

I read all 44 pages of this magazine ( 11 th April) and those of 4th April 2020. I felt information given

is of great importance and useful. Therefore, request you to send me hard copies of all them, starting

from 4th April onwards. Thanks.

V. B. Bargaje

दि. 4 मेचा साधना पीडीएफ मिळाला, पण हार्डकॉपी वाचता यावी म्हणून प्रिंट करून घेतला!

मधुकर घनसावंत, जिंतूर, जि. परभणी

 

सत्तेला सत्य ऐकवणाऱ्या गटाची पत्रे अनुवादित करून मराठीत छापणार असल्याचे दि. 9 मेच्या साधना अंकातील संपादकीयात वाचलं. ही खूपच चांगली गोष्ट आहे, पण मूळ इंग्रजी पत्रेही छापावीत. देशभरात ती जाणं आवश्यक आहे.                                                                              

आत्माराम मिस्त्री

साधनाचे डिजिटल अंक व्यवस्थित मिळत आहेत! एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत आपण वाचनीय, माहितीपूर्ण अंक आमच्यासाठी करीत आहात- आम्ही अतिशय ऋणी आहोत! सध्या अंक प्रकाशित करायला आपणास जास्त कष्ट होत असतील. आपली काळजी घ्यावी.

ज्योती मळेकर

 

डिजिटल आवृत्ती वाचायला आणि साठवायला जास्त  सोपी आहे... लॉकडाऊन संपल्यानंतरही चालू राहिली, तर चांगले होईल.

अरविंद परुळेकर

 

विपरीत परिस्थिती आणि आकस्मिक अडचणी दूर करून आम्हा वाचकांना वक्तशीरपणे दर्जेदार साहित्य पुरवीत असल्याबद्दल साधनाचे आभार!

सुरेखा सबनीस

 

सहवेदना

आदरणीय हिंदुराव पवार,

रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य रसिक परिवाराचा मी एक सदस्य झालो आणि तिथून आजवरच्या तुमच्या सहवासात रमून त्या परिवाराचा एक अविभाज्य भाग कधी बनलो, हे माझं मलाच समजलं नाही.  कुठल्याही भौतिक साधनांमधून मिळणाऱ्या आनंदापेक्षा साहित्यातून मिळणारा बौद्धिक आनंद हा नेहमीच तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. किंबहुना, तेच तुमच्या जीवनाचं ध्येय होतं.

वाचनसंस्कृती समृद्ध करण्यासाठी अनेक ठिकाणी अनेकांकडून पोकळ अपेक्षा व्यक्त केल्या जातात. पण त्यासाठी फार कमी लोक प्रत्यक्षरीत्या प्रयत्न प्रयत्न करतात आपण त्यातले एक. त्यामुळेच डॉ.अण्णा देशपांडे, डॉ.वा. गो. परांजपे, कवी गिरीश, वसंत कानेटकर, डॉ.गो.पु. देशपांडे या साहित्यिकांचा वारसा असलेल्या रहिमतपूरमध्ये तुमच्या प्रयत्नातून साहित्य रसिक परिवार उदयास आला. त्यातून साहित्य संमेलने, विवेक जागर व्याख्यानमाला, पुस्तक चर्चा यांसारखे विविध उपक्रम सुरू झाले.

तुमच्या तरुणपणी, 80 च्या दशकात रहिमतपूरमध्ये नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला जवळपास 10 वर्षे चालवली. त्यानंतर थांबलेली साहित्यिक चळवळ तुम्ही साहित्य रसिक परिवाराच्या माध्यमातून पुन्हा त्याच जोमाने सुरू केलीत. हे करत असताना आपल्या ग्रुपमधल्या वेगवेगळ्या स्वभावांच्या सहकाऱ्यांना तुम्ही तितक्याच कौशल्याने हाताळले. कदाचित मानसशास्त्राचे प्राध्यापक आणि अभ्यासक असल्यामुळे तुम्ही प्रत्येकाची नाडी बरोबर पकडली होती. 

साहित्यविषयक उपक्रमांच्या नियोजनाबाबत आपल्या ज्या बैठका व्हायच्या, त्या वेळी तुम्ही साताऱ्याहून रहिमतपूरला येणार, हेच आम्हा सगळ्यांसाठी चैतन्यदायी असायचं. तुम्ही असल्याशिवाय कोणत्याही नियोजनाला परिपूर्णता मिळायची नाही, असा आम्हा सगळ्यांनाच विश्वास होता. आताही लॉकडाऊनच्या काळात पुढच्या तीन कार्यक्रमांचं जोरदार आणि तितक्याच उत्साहाने तुम्ही नियोजन केलं होतं, पण... पण तुमच्या जाण्याची वेळ चुकली.

तुम्ही कधीच कोणावर रागवायचे नाहीत. तुम्ही शब्दांचा वापर करतानाही गांधींची अहिंसा काटेकोरपणे जपलीत. किड्या-मुंग्यांनाही जिथे कधी दुखावलं नाहीत, तिथे माणसांना काय दुखावणार? म्हणूनच की काय, तुमचं जाणंही इतकं अनपेक्षित की- कोणालाच, कसलाच त्रास दिला नाहीत.

‘साहित्य रसिक परिवार वाढला पाहिजे, विशेषतः तरुणांची संख्या वाढली पाहिजे,’ असा आग्रह धरणारे तुम्हीच असे अचानक निघून जाल आणि आपल्या ग्रुपची संख्या एकने कमी कराल, असं वाटलं नव्हतं.

केतन जाधव, रहिमतपूर, जि.सातारा

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके