डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

काश्मीरमध्ये काय झाले? भारतीय जनतेचा करोडो पैसा काश्मीरवर खर्च,  पण तेथील लोक आतंकवादी झाले. हिंदू पंडितांना बाहेर काढलं. आज कोरोनाचा राक्षस असताना मशिदीत नमाज पढतात, नियम पाळत नाहीत हे कसले मुसलमान? यांना देशाची घटनाही मान्य नाही. सय्यदजी, तुम्हाला धन्यवाद व शुभेच्छा... 

धाक हवाच,  पण त्यासाठी दंडुके नकोत! 

दि. 4 एप्रिलच्या अंकाच्या संपादकीयात आपण कोरोनाला शतकातील सर्वांत मोठे आव्हान म्हटले आहे, ते अगदी सार्थ. या आव्हानाचा आपण सर्व भारतीयांनी सर्व प्रकारे मुकाबला केला पाहिजे. तरीपण सरकारवर आपले लक्ष असून,  योग्य त्या सूचना आपण केल्या पाहिजेत, हेही खरे.

पंतप्रधान मोदी यांनी 25 मार्चला 21 दिवसांची  संचारबंदी जाहीर केली, त्याला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे. पण ती  संचारबंदी जाहीर करण्याआधी त्यांनी कोणत्याच राज्य सरकाराशी सल्लामसलत केली नाही! त्याचा परिणाम असा झाला की,  प्रजा भयभीत होऊन त्या रात्री आठ वाजल्यानंतर जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी धावाधाव करू लागली. पंतप्रधानांनी गरीब जनतेच्या सोईसाठी काहीच योजना जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे नंतरच्या घटनाक्रमांचे परखड विवेचन झाले पाहिजे.

एक चांगली गोष्ट झाली की, मा. उद्धव ठाकरे व केजरीवाल यांसारख्या मुख्यमंत्र्यांनी लोकांच्या अडचणी समजून घेऊन बरेच उपाय सुचवले. पण तेवढ्यात अनेक लोक गावी जाताना अडकले. अशा वेळी पोलिसांनी लोकांना झोडपणे सुरू केले. पोलिसांचा धाक हवाच,  पण त्यासाठी दंडुके नकोत! लोकांना मदतीचा हात द्यायला हवा होता. मात्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर एका टीव्ही चॅनलवर दंडुका दाखवून, त्याला तेल लावून लोकांना झोडपून काढण्याचे आदेश पोलिसांना द्यावे लागतील असे म्हटले; तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘प्रजेने जर ऐकले नाही तर आम्ही लष्कर मागवू’ असा सज्जड दम भरला! हे प्रकार लोकशाहीत मुळीच शोभत नाहीत. म्हणून,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचना करावीशी वाटते की, आपल्या महाराष्ट्राच्या इतर मंत्र्यांनादेखील जनतेशी सहानुभूतीने वागण्यास सांगावे. येस, लॉकडाऊनसाठी आपण नक्कीच कंबर कसू; पण त्यासाठी पोलीसराज नको, लष्करशाही तर नकोच, हे मंत्र्यांनी लक्षात ठेवावे.

फादर मायकल जी.

समाज शुद्धी अभियान, वसई.


यांना देशाची घटनाही मान्य नाही.
दि. 28 मार्चच्या साधनातील पद्मश्री श्री. सय्यदभार्इंची प्रदीर्घ मुलाखत छानच. आधीच्या सरकारांनी केलेली निराशा आणि विचार पटणारे नसूनसुध्दा मोदींनी पंधरा मिनिटे ऐकून घेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला व तलाकवरही निर्णय घेतला, हे मोदी सरकारचं कौतुक सय्यदजींमुळे साधनामध्ये छापून आलं. पण देशाचं इस्लामीकरण करण्याचा छुपा अजेंडा घेऊन शाहीनबागमध्ये दंगा करणाऱ्यांचं काय? सीएएबद्दल भाजपचं मत बरोबर आहेच. जे मुसलमान पाकिस्तानात न जाता इथे राहिले त्यातूनच हमीद दलवाई,अब्दुल हमीद आदी निर्माण झाले व दाऊदही... काश्मीरमध्ये काय झाले? भारतीय जनतेचा करोडो पैसा काश्मीरवर खर्च,  पण तेथील लोक आतंकवादी झाले. हिंदू पंडितांना बाहेर काढलं. आज कोरोनाचा राक्षस असताना मशिदीत नमाज पढतात, नियम पाळत नाहीत हे कसले मुसलमान? यांना देशाची घटनाही मान्य नाही. सय्यदजी, तुम्हाला धन्यवाद व शुभेच्छा... 

किशोर मधुकर काकडे, बेळगाव.


त्या दोन कादंबऱ्यांची तुलना हास्यास्पद !
श्री. सुहास पाटील यांचा ‘सातपाटील कुलवृत्तान्त’ या रंगनाथ पठारे सरांच्या कादंबरीवरील लेख दि. 21 मार्चच्या साधना अंकात वाचला. पाटील यांनी मुख्य कादंबरीऐवजी कादंबरी या साहित्यप्रकाराविषयी मुक्त चिंतन करण्यावर जास्त भर दिल्याचे दिसले. तसे करतानाही त्यांनी पूर्वसुरींचे काही वाचन-मनन-चिंतन केल्याचे दिसत नाही. ‘‘अशा धाटणीच्या ‘एपिक’ कादंबरीची मराठी साहित्य विश्वात मोठीच प्रतीक्षा होती. रंगनाथ पठारे यांच्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीमुळे ती पूर्ण झाली आहे ’’ या वाक्यावरूनही त्यांचा अभ्यास कमकुवत असल्याचे दिसून येते. पठारे सरांची कादंबरी कशी आहे, हा प्रश्न येथे प्रस्तुत नाही. पाटील यांनी मराठी कादंबरीचे पुरेसे वाचन केलेले नाही, हा गंभीर मुद्दा मात्र प्रस्तुत आहे; अन्यथा असे शेरे ते मारते ना. ‘प्रथम आलो’ या सुनील गंगोपाध्याय यांच्या बंगाली कादंबरीच्या मराठी अनुवादाचाही उल्लेख पाटील यांनी केला, परंतु मराठी अनुवादाचे (पहिली जाग, अनुवाद- रंजना पाठक, प्रकाशक- साहित्य अकादमी) नाव मात्र दिले नाही. पहिली जाग व सातपाटील कुलवृत्तान्त या कादंबऱ्यांची तुलना हास्यास्पद वाटली. दोन्हीचा पट, धाटणी, शैली सर्व काही वेगळे आहे. दोहोंपैकी कोणती कादंबरी श्रेष्ठ अथवा कनिष्ठ, हे ठरवण्याचा प्रश्नच नाही. दोन्हींत साम्य असल्याचा मुद्दा पाटील यांनी साधार मांडलेला नाही. पहिली जाग या कादंबरीत त्रिपुरा, बंगाल, ओडिशा असा भूप्रदेश आणि त्यातील विविध व्यक्ती येतात. त्यांच्या माध्यमातून बंगाली संस्कृतीमधील एनलायटन्मेन्ट युगाची चरितकहाणी सादर होते. आधुनिकतेच्या आगमनाची ती कथा आहे. सातपाटील कुलवृत्तान्तचा फोकस तसा नाही. पठारे सरांनी देशीवादी भूमिकेतून मराठी संस्कृतीचा ऐतिहासिक वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही कलाकृतींचे लक्ष्य आणि प्रवासमार्ग दोन्ही भिन्न आहेत.

प्रा. मनीषा शिंदे, नांदेड


त्या युद्धातील पराभवास नेहरूच जबाबदार!

साधनाचा दि. 14 मार्चचा अंक वाचला. रामचंद्र गुहा यांनी आपल्या लेखात  नेहरूंनी चीन युध्दात भारतीय सैन्याचा पराभव झाला म्हणून मेनन यांचा राजीनामा घेतला, याचा बादनारायण संबध लावून मोदींनी शहा यांचा राजीनामा घ्यावा, असा जो लेख लिहिला आहे, त्याची मांडणी चुकीची आहे. गुहा यांनी चीन सीमावाद व युद्धाातील पराभव यास मेनन यांना जबाबदार धरले आहे. यावरून त्यांना या विषयाची पूर्ण माहिती नसावी, असे दिसते. याचे कारण बहुधा त्यांच्याकडे ॲण्डरसन-भगत चौकशी समितीची प्रत नसावी किंवा त्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले असावे. या समितीचा रिपोर्ट सरकारने जनतेसाठी खुला केला नाही, पण 2014 ला तो इंटरनेटवर काही दिवसा साठी उपलब्ध होता,  तेव्हा त्याची प्रत मी उतरवून ठेवली होती. मुळातच चीन सीमावाद व युद्धातील पराभव यास नेहरू संपूर्णपणे जबाबदार आहेत, हे मी पुराव्यासह दाखवून देऊ शकतो.

संजय लडगे, बेळगाव


आपण चांगली सार्वजानिक आरोग्यव्यवस्था निर्माण करू शकू का? 

दि. 7 मार्चच्या साधनात  श्री. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी डॉ. रवींद्र हर्षे यांच्या कामाचा उत्तम परिचय करून दिला आहे. आपल्या देशातील सध्याची  सार्वजनिक आरोग्यव्यवस्था अपुरी आहे, हे सर्व मान्यवर सांगतात. ही व्यवस्था सुधारली पाहिजे, हेही बहुतेकांना मान्य असते. पण त्यासंबंधी कोणते निर्णय घ्यावेत, याबाबत एकवाक्यता नाही.  सध्याच्या  वैद्यकीय शिक्षणपद्धतीत जे दोष आहेत, त्यांचा डॉ. हर्षे यांनी उल्लेख केला आहे.  माझ्या मते, या विषयावर अधिक विचारविमर्श होणे खूप निकडीचे आहे. साधना साप्ताहिकाला या विषयावर उपयुक्त असे काम करत येईल का? 

नरेंद्र महादेव आपटे,  पुणे.

Tags: नरेंद्र महादेव आपटे संजय लडगे नांदेड प्रा. मनीषा शिंदे बेळगाव. किशोर मधुकर काकडे फादर मायकल जी. वाचक पत्रे प्रतिसाद feedback pratikriya pratisad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात