Diwali_4 प्रतिसाद (28 मार्च 2020)
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

‘बेटी नहीं तो माँ नही, माँ नहीं तो बेटा नहीं’ हा अपर्णा दीक्षित याचा लेख वाचला. (29 फेब्रु. 1920) सहायक आयुक्त कार्यालय, औंध, पुणे यांच्या वतीने रस्त्याकडेच्या भिंतींवर रंगवलेला ‘बेटी नहीं तो माँ नही, माँ नहीं तो बेटा नहीं’ हा संदेश कळत न कळत समाजातील पुरुषी मानसिकताच दर्शवितो. आपण स्वतःला कितीही सुसंस्कृत व आधुनिक समजत असलो तरी आपला महिलांकडे बघण्याचा एकूणच सामाजिक, कौटुंबिक, राजकीय आणि वैयक्तिक या चारही परिघात बघण्याचा दृष्टीकोन ‘स्त्री म्हणजे अपत्य जन्मास घालायचा कारखाना’ असाच संकुचित असल्याचे अधोरेखित करत आहे.

दोन मानसिकता : पुराणमतवादी आणि पुरुषसत्ताक

‘महायज्ञ आणि शपथग्रहण’ हे संपादकीय (दि. 14 मार्च) वाचले. संपादकीयात दोन घटनांचा उल्लेख आहे. या दोन्ही  घटना पुरोगामी विचारांचा म्हणवणाऱ्या महाराष्ट्रासाठी लाजिरवाण्या आहेत, तरीदेखील यांची पुरेशी दखल ना माध्यमांतून घेतली गेली ना समाजघटकांकडून. साधना ने ती घेणे साधनाच्या सामाजिक उत्तरदायित्वा आणि वैचारिक घुसळणीनिरूपच म्हणावे लागेल. पहिली घटना म्हणजे, विद्यार्थी धार्मिक व्हायला हवेत, पर्यावरणाचे संतुलन आणि वातावरणाचे शुद्धीकरण घडून विद्यार्थ्यांभोवती सुरक्षा कवच तयार होईल या हेतूने ‘द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी’ अशी ओळख सांगणाऱ्या पुण्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात विद्यार्थ्यांवर धर्मसंस्कार व्हावेत म्हणून दहा दिवसांचा ‘अती रूद्र महायज्ञ’ आयोजित करण्यात आला. दुसरी घटना, अमरावतीतील विद्यार्थींनींकडून ‘प्रेमविवाह न करण्याची शपथग्रहण’ करून घेणे.

व्यक्तींची शैक्षणिक- सांपत्तिक स्थिती जस जशी सुधारत जाते तस तसे त्यांच्या वैचारिक अधिष्ठानाला ग्रहण लागत जाते की काय? असा प्रश्न उपस्थित होण्याइतपत स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या समाज घटकाचे वर्तन असते याची प्रचिती या ‘महायज्ञ’ घटनेच्या निमित्ताने आली आहे. आधीच धार्मिक संस्कार, प्रथा, परंपरा आणि अस्मितांच्या संमोहनाखाली राहून एका पिढीने आपले न भरून येणारे नुकसान करून घेतले असताना नवपिढीला याच खाईत लोटले जाणे खेदजनक आहे. यातही विद्येचे माहेरघर अशी शेखी मिरवणाऱ्या पुणे शहरात असा प्रकार घडत असेल तर ‘पुणे तिथे शहाणपण उणे’ असे म्हणायची वेळ आली आहे.

विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ घेण्यास लावणे या घटनेतून तर वैचारिक दिवाळखोरीचे जाहीर प्रदर्शनच घडले आहे. हिंगणघाट येथील एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून उच्चविद्याविभूषित महिलेला पेट्रोल टाकून पेटवून दिले, ही या शपथग्रहण घटनेमागील पार्श्वभूमीवर आहे आणि ते समस्येचे सुलभीकरण करणेदेखील आहे. कोणत्याही देशातील प्रश्नांच्या समस्येचे मूळ हे तेथील संस्कृतीत शोधावे लागेल. म्हणूनच महिलांवरील अत्याचार असोत किंवा हत्येच्या समाजाकडून मर्यादा महिलांवरच लादल्या जात आहेत. मग कधी मुलींनी स्कर्ट, जीन घालू नये असे म्हणत तथाकथित संस्कृती रक्षकांकडून ‘सातच्या आत घरात’चा आग धरला जात आहे. घटनाकार डॉ.आंबेडकर यांनी समाजात जाती-धर्म नष्ट करायच्या असतील तर आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहाचा आग्रह धरला होता आणि आपल्या आयुष्यात आचरणातही आणला होता. आंतरजातीय तसेच आंतरधर्मीय विवाह हे बहुतांश प्रेमविवाहच असतात. त्यामुळे प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणे म्हणजे जाती-धर्म निर्मूलनाच्या कामात खोडा घालण्यासारखे आहे. सदर पत्रलेखकाने आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे, अशा अनेक जोडप्यांवर हे अन्यायकारक व त्यांची अवहेलना करणारे आहे असे वाटते. सरतेशेवटी प्रेम करणे अथवा न करणे ही काय ठरवून करण्यासारखी गोष्ट आहे का? उत्कट, तारुण्यसुलभ भावनांना बंदिस्त करू पाहणारे असे या भूमंडळी कोण आहे?

‘बेटी नहीं तो माँ नही, माँ नहीं तो बेटा नहीं’ हा अपर्णा दीक्षित याचा लेख वाचला. (29 फेब्रु. 1920) सहायक आयुक्त कार्यालय, औंध, पुणे यांच्या वतीने रस्त्याकडेच्या भिंतींवर रंगवलेला ‘बेटी नहीं तो माँ नही, माँ नहीं तो बेटा नहीं’ हा संदेश कळत न कळत समाजातील पुरुषी मानसिकताच दर्शवितो. आपण स्वतःला कितीही सुसंस्कृत व आधुनिक समजत असलो तरी आपला महिलांकडे बघण्याचा एकूणच सामाजिक, कौटुंबिक, राजकीय आणि वैयक्तिक या चारही परिघात बघण्याचा दृष्टीकोन ‘स्त्री म्हणजे अपत्य जन्मास घालायचा कारखाना’ असाच संकुचित असल्याचे अधोरेखित करत आहे. आपल्या तथाकथित उदात्त संस्कृतीने स्त्रीला ‘अनंत काळाची माता’ बनवून चूल आणि मूल या जोखडात अडखवून ठेवले आहेच. विवाहसंस्था निर्माण करून सगळ्या जबाबदाऱ्या स्त्रीवर ढकलून देत आपल्या रागलोभ, विषय वासना तृप्ती आणि वंशवाढीसाठीच स्त्रीचा जन्म झाला आहे, असा समज समाजाने करून घेतला आहे. पुरुषसत्ताक मानसिकतेतून पुरुषांनी स्त्रीला दुय्यम ठरवण्यात आपली नको तेवढी शक्ती खर्ची केली आहे.

बाळकृष्ण शिंदे, पुणे

Tags: बाळकृष्ण शिंदे प्रतिक्रिया प्रतिसाद वाचक पत्रे balkrushna shinde pratikriya feedback vachak patre pratisad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात