डिजिटल अर्काईव्ह

साप्ताहिक साधना : वाचकांनी दिलेला फीडबॅक 2023

एक वर्षांपासून अधिक काळ साधना साप्ताहिकाचे वाचक असलेल्या दहा हजार लोकांना एक फीडबॅक फॉर्म 1 ते 15 डिसेंबर 2023 या काळात पाठवण्यात आला होता. त्या फॉर्ममध्ये 24 प्रश्न होते, पहिला व शेवटचा हे दोनच प्रश्न ऐच्छिक होते, उरलेले सर्व प्रश्न भरल्याशिवाय तो फॉर्म सबमिट होऊ शकणार नव्हता. या सर्व्हेतून 1255 लोकांनी फॉर्म भरले. त्यांचे विश्लेषण करून काढलेले निष्कर्ष या लेखामध्ये देत आहोत. मात्र हा लेख वाचण्यापूर्वी वाचकांनी या लेखाच्या अखेरीस छापलेली चार रंगीत पाने काळजीपूर्वक वाचावीत, त्यामध्ये सर्व 24 प्रश्नांचे आलेख दिलेले आहेत. ती चार पाने व्यवस्थित वाचली  तरच हा लेख अधिक नेमकेपणाने समजू शकेल. आणि हा लेख वाचून झाल्यावर सर्व्हे करून देणाऱ्या अक्षय जोशीचे टिपण वाचावे.

‘साधना’ साप्ताहिकाला 75 वर्षे पूर्ण झाली, विद्यमान संपादकांच्या कारकिर्दीला दहा वर्षे पूर्ण झाली आणि 2024 हे नवे वर्ष उंबरठ्यावर आहे, ही तीन निमित्तं लक्षात घेऊन; साधना साप्ताहिकाच्या वाचकांकडून फीडबॅक घ्यावा, असे दिवाळी सुट्टीत ठरवले होते. ते काम साधनाचा वाचक व हितचिंतक असलेल्या अक्षय जोशी या तरुणाकडे सोपवले होते. कारण, त्याने अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीमधून पब्लिक पॉलिसीमध्ये मास्टर्स केलेले असून, राष्ट्रीय स्तरावरील सरकारी व बिगर सरकारी संस्थांसोबत वरिष्ठ पातळीवर काम करण्याचा त्याला अनुभव आहे. त्या त्या ठिकाणी, अशा प्रकारचे अनेक सर्व्हे विविध निमित्तांनी त्याने केलेले आहेत.आणि अर्थातच त्याला साधनाविषयी विशेष आस्था आणि तटस्थताही आहे. त्यामुळे, वाचकांकडून फीडबॅक घेण्यासाठी किती व कोणत्या प्रकारचे प्रश्न असावेत याबाबत त्याच्याशी चर्चा करण्यात आली, आणखी दोन-तीन तज्ज्ञांचे मत घेऊन प्रश्नांमध्ये थोडे बदल करण्यात आले. मग तयार झालेला गुगल फॉर्म व्यवस्थित भरला जातो आहे ना, त्यात तांत्रिक अडचणी येत नाहीत ना, त्यातील ग्राफिक्स अचूक येत आहेत ना आणि विश्लेषण करून निष्कर्ष काढता येणे शक्य आहे ना, याची चाचणी घेणे आवश्यक होते. त्यासाठी नोव्हेंबरच्या मध्याला, साधनाच्या 20 कार्यालयीन सहकाऱ्यांना हा फॉर्म पाठवण्यात आला (अर्थातच त्यांची मते अधिकृतपणे व एकत्रितपणे कळावीत हा उद्देशही होताच), ती चाचणी पूर्णतः यशस्वी झाली. मात्र, त्यानंतरही दोन प्रश्न समाविष्ट करून एकूण 24 प्रश्नांचा गुगल फॉर्म तयार करण्यात आला आणि तो वाचकांना पाठवण्याचे ठरवले (अर्थातच तो फॉर्म साधनाचे सहकारी भरणार नव्हते.)

1 ते 15 डिसेंबर 2023 या दोन आठवड्यांच्या काळात हा सर्व्हे घेण्यात यावा आणि 30 डिसेंबर 2023च्या साधना अंकात त्या सर्व्हेेचे तपशील व ग्राफिक्स जाहीर करून, त्यातून निघणारे निष्कर्ष प्रसिद्ध करावेत असे ठरले. अर्थातच, त्या निष्कर्षांसोबत काही प्रमाणात कारणमीमांसा आणि शक्य असेल तर आगामी बदलांच्या दिशा हेही मांडता आल्यास पाहावे, असेही ठरवले. मग सर्व्हेची रणनीती साधनाच्या 20 कार्यालयीन सहकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये अंतिम करण्यात आली. त्यानुसार साप्ताहिक, कर्तव्य, प्रकाशन आणि संपादक यांच्याकडे असलेल्या चार ब्रॉडकास्ट लिस्टमधील सर्वांना हे फॉर्म पाठवावेत असेही ठरले. त्याच दिवशी साप्ताहिक, प्रकाशन व कर्तव्य या तिन्ही वेबसाइट्‌सवर त्या फॉर्मची लिंक टाकण्यात आली. आणि त्या तिन्हींच्या फेसबुक पेजवर व इंस्टाग्रामवरही ती लिंक टाकण्यात आली. शिवाय, साधनाचे लेखक, जाहिरातदार, डिजिटल वर्गणीदार यांनाही पाठवण्यात आली. जे लोक सोशल मीडियावर नाहीत त्यांना ईमेलद्वारे ती लिंक पाठवण्यात आली. शिवाय, त्या दोन आठवड्यांच्या काळात येणाऱ्या साधना साप्ताहिकाच्या दोन अंकांतही (9 व 16 डिसेंबर) फॉर्म छापण्यात आला, त्यासोबत क्यूआर कोड देण्यात आला (लिंकवर येण्यासाठी) आणि ज्यांना लिंकद्वारे फॉर्म भरता येणे शक्य नाही त्यांनी छापील कागदावरचे फॉर्म भरावेत आणि स्कॅन करून किंवा पोस्टाद्वारे साधना कार्यालयाकडे पाठवावेत, असेही सांगण्यात आले. इतके सर्व केल्यानंतर एकाच दिवशी काही वाचकांना दोन-तीन ठिकाणांवरून लिंक जाणार, हे उघड होते. मात्र, एका व्यक्तीला एकदाच फॉर्म भरता येईल, अशी व्यवस्था केलेली होती (म्हणजे एकाच नंबरवरून व एकाच ईमेल आयडीवरून एकच फॉर्म भरता येईल.) त्याप्रमाणे, एकूण गणित केले तेव्हा दहा हजार लोकांदरम्यान ती लिंक जाणार हे स्पष्ट झाले. दहा हजार लोकांच्या पर्यंत लिंक जाणार असली तरी, पुढील पंधरा दिवसांचा अवधी तो फॉर्म भरून पाठवण्यासाठी देण्यात आला होता. लिंकसोबत पाठवलेल्या मेसेजमध्ये तसा स्पष्ट उल्लेख केला होता आणि एक वर्ष व अधिक काळ साधनाचे वाचक असलेल्यांनीच हा फॉर्म भरावा अशीही विनंती करण्यात आली होती.

हा फॉर्म भरण्यासाठी जरी तीन ते पाच मिनिटे इतका अल्प काळ लागणार असला तरी, असे फीडबॅक फॉर्म भरणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी असते; म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याची गरज असते. हेही अक्षयकडून (आणि अन्य तीन-चार तज्ज्ञ व्यक्तींकडूनही) सांगण्यात आले होते. एवढेच नाही तर दहा हजार लोकांना फीडबॅक फॉर्म पाठवाल, तेव्हा पाच ते सहा टक्केच लोकच असे फॉर्म भरतात असेही त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे दहा हजार वाचकांपर्यंत ही लिंक गेली तर, 500 ते 600 या दरम्यान लोक फॉर्म भरतील आणि ती संख्या विश्लेषण व निष्कर्ष यासाठी चांगलीच असेल, असे त्यांचे म्हणणे होते. तेव्हा आम्ही थोडे खट्टू झालो, कारण किमान हजार लोकांनी तरी हा फीडबॅक फॉर्म भरायला हवा असे आम्हांला वाटत होते. तेव्हा अक्षयने त्यामागचे शास्त्र सांगितले, ते असे : ‘दहा हजार लोकांना लिंक पाठवली तर कमीतकमी 266 अर्ज भरून यायला हवेत, ती 90 टक्के कॉन्फिडन्स इंटर्व्हल असेल. 95 टक्के कॉन्फिडन्स इंटर्व्हलसाठी 385 लोकांनी फॉर्म भरायला हवेत आणि 98 टक्के कॉन्फिडन्स इंटर्व्हलसाठी 543 लोकांनी फॉर्म भरायला हवेत.’

अखेर सर्व तयारी केल्यावर 1 डिसेंबरला ठरल्याप्रमाणे पाच-सहा विविध मार्गांनी साधनाच्या त्या त्या विभागातील कार्यालयीन सहकाऱ्यांनी ही लिंक जिकडेतिकडे म्हणजे दहा हजार लोकांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर प्रत्येक तीन-चार दिवसांनी रिमाइंडर पाठवायला हवेत असे आम्हांला सांगण्यात आले होते, मात्र आम्ही जास्तीत जास्त दोन रिमाइंडर पाठवायचे ठरवले. तेव्हा सर्वांचाच अंदाज असा होता की, पहिल्या दिवशी शे-दीडशे लोक फॉर्म भरतील आणि पुढील दोन आठवड्यांत 543 हा आकडा पार होईल. म्हणजे आपला सर्व्हे 98 टक्के कॉन्फिडन्स इंटर्व्हलनुसार होऊ शकेल. भरले जाणारे सर्व फॉर्म्स आणि त्यातील तपशील पाहण्यासाठीची सुविधा फक्त अक्षयकडे ठेवण्यात आलेली होती. (साधनाचे संपादक वा साधनाच्या कार्यालयीन सहकाऱ्यांकडे ती सुविधा ठेवली नव्हती).

प्रत्यक्षात काय झाले? 2 डिसेंबरला सकाळी अक्षयने कळवले, ‘‘पहिल्याच दिवशी 442 लोकांनी फॉर्म भरले आहेत, हे आश्चर्यकारक आहे. असे खूपच कमी वेळा घडते.’’ 3 डिसेंबरला सकाळी त्याने कळवले, ‘‘आता फॉर्म भरणाऱ्यांचा आकडा 588 झाला आहे, म्हणजे 98 टक्के कॉन्फिडन्स इंटर्व्हलसाठी आवश्यक तो टप्पा आपण दुसऱ्याच दिवशी गाठला आहे.’त्यामुळे आम्हां सर्वांनाच असा विश्वास वाटू लागला की, पुढील दोन आठवड्यांत हजाराचा आकडा सहज पार होईल. त्यानंतर रोज 30 ते 50 लोक अर्ज भरत होते आणि पुढील बारा-तेरा दिवसांत दोन तारखांना रिमाइंडर पाठवले, तेव्हा तो आकडा प्रत्येक वेळी 70 ते 80 ने वाढला होता. पूर्ण पंधरा दिवस झाले तेव्हा 1220 लोकांनी अर्ज भरले होते. तरीही काही लोक उशिरा भरतील का आणि ते किती असतील याचा अंदाज घेण्यासाठी (मुदत जाहीरपणे न वाढवता) आणखी एक दिवस लिंक खुली ठेवली होती. त्या वाढवलेल्या एका दिवसात आणखी 12 लोकांनी अर्ज भरले होते, त्यानंतरच्या दोन दिवसांत (छापील अंक वाचून ईमेल-द्वारे व पोस्टाने आलेले) आणखी 23 फॉर्म आले. म्हणजे 18 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरणाऱ्यांची एकूण संख्या 1255 झाली. तो आकडा म्हणजे, सर्व्हे करणाऱ्या अक्षयच्या अंदाजापेक्षा दुप्पट आणि आम्हांला अपेक्षित होता त्यापेक्षा 25 टक्के जास्त आहे.

फीडबॅक फॉर्ममध्ये एकूण 24 प्रश्न दिले होते. त्या सर्व प्रश्नांना आलेल्या उत्तरांनुसारच स्वतंत्र आलेख गुगल शिटने दिलेले असून, प्रस्तुत अंकात ते सर्व 24 आलेख चार रंगीत पानांवर दिलेले आहेत. त्यातून सर्व आकडेवारी अतिशय नेमकेपणाने काही क्षणांत समजून घेता येते. शिवाय, अक्षयने पाठवलेले मूळ इंग्रजीतील टिपण अनुवाद करून चौकटीत दिले आहे. मात्र संपादकाच्या बाजूने अधिक स्पष्टीकरण, कारणमीमांसा व भाष्य येथे देत आहे.

फीडबॅक फॉर्ममध्ये पहिला व अखेरचा प्रश्न ऐच्छिक होता. उर्वरित सर्व प्रश्नांची उत्तरे भरणे अनिवार्य होते, त्याशिवाय तो फॉर्म सबमिट होणारच नव्हता.

प्रश्न 1 : पहिला प्रश्न होता नाव लिहा, 1255 पैकी 1184 लोकांनी फॉर्म भरताना आपली नावे लिहिली, केवळ 71 लोकांनी नावे लिहिली नाहीत. म्हणजे जवळपास 95 टक्के लोकांनी नावे लिहिली आहेत, 5 टक्के लोकांना ते गरजेचे वाटले नाही किंवा आपला फीडबॅक गोपनीय रहावा असे वाटले.

प्रश्न 2 : तुमच्या गावाचे नाव लिहा हा दुसरा प्रश्न होता. काहींनी जिल्ह्यांची नावे भरली, काहीनी तालुक्याची, तर काहींनी गावाची नावे भरली. त्यातून लक्षात येते की, महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यांतून (पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद) मिळून 32 टक्के वाचकांनी फॉर्म भरले आहेत. उरलेले 68 टक्के वाचक महाराष्ट्राच्या उर्वरित 29 जिल्ह्यांतील आहेत. त्याव्यतिरिक्त अगदी थोडे दिल्ली, अहमदाबाद, बडोदा, बंगळुरू, गोवा, कानपूर, कोलकाता, भोपाळ या शहरांतील आहेत. साधनाचे वर्गणीदार वाचक महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत आहेत, त्यामुळे हे तपशील आश्चर्याचे नाहीत. मात्र, यातून आम्ही घेतलेला बोध असा की, अन्य राज्यांमध्ये वास्तव्य असलेल्या मराठी भाषकांपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचायला हवे, ते साधनाचे वर्गणीदार वाचक होण्यासाठी जास्त उत्सुक असू शकतील आणि त्याचे अन्य काही फायदेही होऊ शकतील (उदा., त्या त्या राज्यातील विषय हाताळण्यासाठी व लेखक मिळवण्यासाठी.)

प्रश्न 3 : तिसरा प्रश्न लिंग (जेंडर), हा आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. फॉर्म भरणाऱ्या 1255 मध्ये 231 स्त्रिया आहेत, हे प्रमाण केवळ 18.4 टक्के इतके आहे. हा खूपच महत्त्वाचा निष्कर्ष या सर्व्हेतून निघाला आहे. हे प्रमाण कमी असेलच हे आम्हांला माहीत होतेच, मात्र आमच्या अपेक्षेपेक्षाही हा आकडा थोडा कमी निघाला आहे. शक्य तितक्या लवकर हा आकडा 30 टक्के तरी व्हायला हवा असा बोध आम्ही यातून घेतला आहे. त्यासाठी स्त्रियांनी लिहिलेले लेखन व स्त्रियांविषयीचे लेखन वाढवायला हवे, हे तर उघडच आहे. पण, त्याव्यतिरिक्त काय केले तर वाचकांमध्ये स्त्रियांचे प्रमाण वाढेल याकडे लक्ष देण्याची नितांत गरज यातून अधोरेखित होते आहे.

प्रश्न 4 : चौथा प्रश्न होता वयोगट. 18 पेक्षा कमी वयोगटातील वाचक  जवळपास नाहीत आणि 19 ते 30 वर्षे या वयोगटातील वाचक केवळ 7.5 टक्के आहेत, हा या सर्व्हेतून निघालेला दुसरा अतिशय महत्त्वाचा निष्कर्ष आहे. या वयोगटासाठी वर्षातून एकदा युवा दिवाळी अंक येतो. पण युवकांचे व युवकांना आवडेल असे लेखन नियमित अंकांतून मोठ्या प्रमाणात वाढवायला हवे, हा मेसेज या सर्व्हेतून मिळाला आहे. 31 ते 50 वर्षे या वयोगटात 37 टक्के आणि 51 ते 65 या वयोगटात 33.5 टक्के वाचक आहेत, म्हणजे 31 ते 65 या वयोगटातील साधनाचे वाचक 70.5 टक्के आहेत आणि 65 वर्षांपेक्षा पुढील वयातील वाचकही 21.8 टक्के आहेत, याचा अर्थ साधनात अधिक गहन व गंभीर आशय-विषय हाताळले जातात, हे अधोरेखित होते आहे. मात्र, युवा वाचकांच्या तुलनेत 65 वर्षांपुढील वाचक तीनपट जास्त आहेत. याचा अर्थ ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास खूप आहे हा आनंदाचा भाग आणि युवा वाचक पुरेसे आकर्षित होत नाहीत ही थोडी काळजीची बाब.

प्रश्न 5 : पाचवा प्रश्न होता साधना अंक कुठे वाचता? वर्गणीचा छापील अंक येतो, असे म्हणणारे 60 टक्के आहेत व ग्रंथालयात वाचणारे 8.2 टक्के आहेत, छापील व ऑनलाइन असे दोन्हीकडे वाचणारे 15.9 टक्के आहेत. याचा अर्थ छापील अंक एकूण 84 टक्के लोक वाचतात आणि फक्त ऑनलाइन वाचणारे केवळ 16 टक्के आहेत. म्हणजे मागील पाच वर्षे साधना डिजिटलचा प्रसार एवढा केलेला आहे तरीही हे प्रमाण 32 टक्के इतकेच आहे असे म्हणता येईल आणि पाचच वर्षांत साधनाने तब्बल 32 टक्के वाचक ऑनलाइन मिळवले असेही म्हणता येईल. पुढील काळात ऑनलाइन वाचणाऱ्यांचे प्रमाण वाढतच जाणार आहे, मात्र ऑनलाइन वाचक प्रिंट इतका टिकून राहत नाही (त्याला अनेक पर्याय दिवसेंदिवस मिळत जातात). शिवाय वाचायला छापील अंक अधिक सुसह्य वाटणाऱ्यांची संख्या अद्याप जास्त आहे आणि ते वर्गणीदार असल्यामुळे नियमितपणा जास्त आहे. तरीही यातून आम्हांला बोध असा होतो आहे की, यापुढे डिजिटल वर्गणीदारांचे प्रमाण वाढवायला हवे; त्यातून आर्थिक स्रोत तयार होईल हा भाग तर आहेच; परंतु अधिक संख्येने व नवे वाचक जोडले जातील.

प्रश्न 6 : सहावा प्रश्न तुमच्याकडे येणारा छापील अंक किती लोक वाचतात? 1 ते 4 लोक वाचतात असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण 70 टक्के आहे, इथे 1 ते 3 असा पर्याय दिला असता तरी ते प्रमाण एवढेच राहिले असते. 5 ते 10 लोक वाचणाऱ्यांचे प्रमाण 5 टक्के आहे (हे वर्गणीदार संस्था-संघटना असणार) आणि 10 पेक्षा अधिक लोक वाचतात ते प्रमाण 6 टक्के (ही ग्रंथालये असणार) आहे. याचा अर्थ विविध संस्थांची कार्यालये आणि ग्रंथालये इथे 11 टक्के वर्गणीदार आहेत. म्हणजे व्यक्ती वर्गणीदार होते तेव्हा तो अंक सरासरी 3 लोक वाचतात आणि संस्था वर्गणीदार होते तेव्हा तो अंक व्यक्तिगत वर्गणीदारांपेक्षा तीन-चार पट जास्त वाचला जातो. याचाच अर्थ संस्था, कार्यालये व ग्रंथालये वर्गणीदार झाले तर थेट आर्थिक फायदा काहीच होणार नाही, पण वाचक संख्या अधिक झपाट्याने वाढेल. त्यासाठी मोहीमच राबवण्याची गरज लक्षात येते.

प्रश्न 7 : सातवा प्रश्न साधनाकडून सोशल मीडियाच्या लिंक तुम्हांला किती येतात? ‘येतच नाहीत’ असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण 39 टक्के आहे, ही संख्या खूपच जास्त आहे. मागील चार वर्षांत साधना साप्ताहिकाचे अर्काइव्ह आणि अन्य कार्यक्रम व उपक्रम इतके जास्त आहेत आणि त्यांच्या इतक्या जास्त लिंक पाठवल्या जातात, तरीही साप्ताहिकाचे 39 टक्के वाचक त्यापासून दूर राहताहेत ही मोठीच त्रुटी आहे. कारण, हे सर्व साधना साप्ताहिकाचे नियमित वाचक आहेत. शिवाय, दरमहा 1 ते 5 लिंक येतात असे म्हणणारा वर्ग 30 टक्के आहे, त्यांनाही दरमहा 10 पेक्षा अधिक लिंक जात नसतील तर ते साधना डिजिटलशी पक्के जोडलेले नसून, त्यांना अन्य मार्गाने लिंक जात असाव्यात. याचा अर्थ डिजिटल कंटेंट 31 टक्के लोकांपर्यंतच नियमित जातो आहे आणि हा निष्कर्ष आधीच्या प्रश्नाला मिळणाऱ्या उत्तराशी जुळणारा आहे. याची दोन-तीन कारणे प्रथमदर्शनी लक्षात येतात. मागील चार-साडेचार वर्षांत तयार केलेल्या व्हॉट्‌सॲपच्या ब्रॉडकास्ट लिस्ट पुरेशा अपडेट होत राहिल्या नाहीत, मेलद्वारे लिंक पाठवण्याचे काम जवळपास झाले नाही आणि जुन्या वाचकांचे फोन व ईपत्ते मिळवता आले नाहीत. या आघाडीवरही मोठे काम करण्याची गरज आहे, मात्र हे काम तुलनेने सुलभ असल्याने जलद करता येण्यासारखे आहे.

प्रश्न 8 : आठवा प्रश्न आहे, किती वर्षांपासून साधना अंक वाचता? 20 पेक्षा अधिक वर्षे वाचणारा वर्ग 21.1 टक्के आहे, म्हणजे 2004च्या आधीपासून साधना अंक वाचणारा हा वर्ग आहे. मात्र, याचाच अर्थ आताचे 79 टक्के वाचक गेल्या वीस वर्षांत म्हणजे 2004 नंतर साधनाशी जोडले गेलेले आहेत. साधनाचा वाचकवर्ग खूपच पारंपरिक आहे, या समजाला इथे काहीसा छेद जातो आहे. अलीकडची 1 ते 4 वर्षे वाचक असणारावर्ग 23 टक्के आहे, ही संख्याही लहान नाही. कोरोना कालखंडानंतर जोडला गेलेला हा वाचकवर्ग आहे, ही विशेष स्वागतार्ह बाब आहे. म्हणजे अलीकडची 5 ते 20 वर्षे वाचक असणारा वर्ग 52 टक्के आहे. आणि 20 पेक्षा अधिक वर्षे वर्गणीदार असलेले 21 टक्के मिळवले तर हा टिकून राहिलेला वाचकवर्ग 73 टक्के आहे. साधनाला 75 व्या वर्षाकडून 100व्या वर्षाकडे जाण्यासाठी पुरेपूर वाव आहे हे वरील आकडे सूचित करतात.

प्रश्न 9 : महिन्यातील चारपैकी किती अंक पाहण्यात- वाचण्यात येतात, हा प्रश्न दोन कारणांसाठी विचारला होता. एक म्हणजे त्यांची वाचनीयता किती आहे आणि दुसरे वाचकांना ते किती नियमितपणे मिळतात? तर 58.2 टक्के लोक चारही अंक वाचतात-पाहतात आणि तीन अंक पाहणारे-वाचणारे 15.8 टक्के आहेत. म्हणजे एकूण 74 टक्के लोक नियमितपणे अंक पाहतात-वाचतात, असे म्हणता येते. मात्र, 26 टक्के लोक दरमहा एक-दोनच अंक वाचतात-पाहतात, हा टक्का घसरला पाहिजे. त्यासाठी अंकाची वाचनीयता वाढवली पाहिजे आणि नियमितपणे वाचकांना अंक मिळतील असे पाहिले पाहिजे. 

प्रश्न 10 : प्रकाशित झालेला अंक त्या त्या आठवड्यात वाचता का, हा प्रश्न अंकातील लेखनाचा ताजेपणा तपासण्यासाठी टाकला होता. ‘नेहमी’ आणि ‘सामान्यतः’ ही दोन्ही उत्तरे मिळून आलेला आकडा 76.5 टक्के आहे, पण 23.5 टक्के लोकांना त्या त्या आठवड्यात अंक वाचलाच पाहिजे असे वाटत नाही (किंवा वेळ मिळत नाही.) याचा अर्थ साधना अंकात ताजेपणा पुरेसा नाही, तो वाढवण्यासाठी काम करण्याची गरज आहे.

प्रश्न 11 :  नियमित अंकात साधारणतः नऊ लेख असतात, त्यातले सरासरी किती लेख तुम्ही वाचता? 4 ते 6 लेख वाचणारे 41.7 टक्के आणि 7 ते 9 लेख वाचणारे 31.3 टक्के आहेत. आणि 1 ते 3 लेख वाचणारे 27 टक्के आहेत. या प्रश्नाचे उत्तर मी स्वतः अंकाचा दर्जा तपासण्यासाठी वापरत आलो आहे, पंधरा वर्षांपूर्वी स्वतःची एक पद्धती तयार केलेली आहे. त्यानुसार वरील आकडे सांगतात की, सध्याच्या साधनाच्या नियमित अंकांचा दर्जा 50 ते 55 टक्के गुण देता येतील इतकाच आहे. (तीन दिवाळी अंक व विशेषांक यांना मात्र 60 ते 75 टक्के गुण देत आलो आहे )

प्रश्न 12 : तीन दिवाळी अंक व अन्य विशेषांक नियमित अंकांच्या तुलनेत किती वाचनीय असतात, हा प्रश्न विचारण्याचे कारण : दिवाळी अंक व विशेष अंकांमध्ये प्रामुख्याने दीर्घ लेख असतात आणि त्यातील अर्ध्याहून अधिक लेख वर्तमान घटना-घडामोडींशी थेट संबंधित नसतात. नेहमीच्या अंकांपेक्षा ‘थोडे जास्त’ आणि ‘बरेच जास्त’, असे म्हणणाऱ्यांचे एकूण प्रमाण आहे 75 टक्के. मात्र, ‘नियमित अंकांइतकेच’ व ‘नियमित अंकांपेक्षा कमी’, असे म्हणणारे 25 टक्के लोक आहेत. या वाचकांना बहुदा दीर्घ लेख वाचायला आवडत नसावेत असा एक अर्थ निघतो किंवा चालू घटना-घडामोडींवरील लेखन जास्त आवडत असावे. यातून असाही अर्थ निघतो की, विशेषांकातसुद्धा दीर्घ लेख कमी असतील आणि तुलनेने ताज्या घडामोडींवरील लेख जास्त असतील तर हा 25 टक्के आकडा बराच कमी होईल.

प्रश्न 13 : कोणत्या विषयावरील लेख वाचायला आवडते, या प्रश्नाचे उत्तर देताना सर्वाधिक पसंती ‘सामाजिक’ला आहे (89 टक्के), त्या पाठोपाठ राजकीय (66), सांस्कृतिक (61), साहित्य ( 68) हे तीन विषय येतात. आणि शेती (37 टक्के) व आर्थिक (48 टक्के) यांचे प्रमाण कमी आहे. एकूण समाजातील वाचन-आवड पाहता, हे चित्र सार्वत्रिक आहे. मात्र, शेती व शिक्षण या दोन्ही विषयांवरील लेखन अधिकाधिक चांगले व सातत्याने देण्याची गरज आहे. तसे झाले तर आधीचे चार विषय आणि नंतरचे दोन विषय यांतील आकडेवारीची तफावत कमी होईल.

प्रश्न 14 : आवडलेले लेख इतरांना वाचायला सांगता का, हा प्रश्न विशेष महत्त्वाचा होता. एखादा लेख उत्तम वा अप्रतिम असल्याशिवाय लोक इतरांना वाचायला सांगत नाहीत, फॉरवर्ड करीत नाहीत. या प्रश्नाला उत्तर देताना ‘नेहमी’ म्हणणारे 52 टक्के आणि ‘कधीकधी’ म्हणणारे 45 टक्के आहेत, म्हणजे ही आकडेवारी 97 टक्के आहे. कोणाही संपादकाला हेवा वाटावा अशीच ही आकडेवारी आहे. हा निष्कर्ष मला स्वतःला सुखद आश्चर्याचा धक्का होता. अक्षयने त्याच्या टिपणामध्ये या संदर्भात लिहिले आहे. मात्र, याचा अर्थ मी असा घेतो की, एकूण अंकांची वाचनीयता कमी-जास्त असेल तरी, उत्तम दर्जाचे व अप्रतिम लेख प्रत्येक अंकात एक-दोन का होईना असतातच, म्हणून हा असा फीडबॅक आला असावा.

प्रश्न 15 : येणाऱ्या अंकात काय आहे, याचे कुतूहल असते का, हा प्रश्न विचारण्याचे कारण अंकाचा ताजेपणा किती आहे आणि वाचकांना अंकातील भूमिकेबद्दल उत्सुकता किती आहे, हे तपासून घ्यायचे होते. तर 66.6 टक्के लोकांना ‘नेहमी’ कुतूहल असते याचे कारण, प्रामुख्याने विशिष्ट विषयासंदर्भात भूमिका काय घेतली जाते हे जाणून घेण्याचे कुतूहल त्यांना असावे. आणि 29 टक्के लोकांना ‘कधी कधी’ कुतूहल असते याचे कारण प्रामुख्याने त्यांना ताजे लेख आवश्यक वाटत असावेत.

प्रश्न 16 : तुम्हांला अजिबात आवडत नाहीत असे लेख अंकात असतात का, हा प्रश्न विचारण्याचे कारण : अवाचनीय, बोजड, नकारात्मक, आक्रस्ताळे, उथळ, अगदीच वरवरचे, गोलमाल, भोंगळ इत्यादी प्रकारचे लेखन अंकात किती असते हे तपासून घ्यायचे होते. या प्रश्नाला उत्तर देताना ‘क्वचितच’ म्हणणारे 71 टक्के लोक आहेत. मात्र ‘कधी कधी’ म्हणणारे 26 टक्के आहेत, हे प्रमाण बरेच जास्त आहे. त्यामुळे वरील विशेषणे लावता येईल असे लेख किंवा त्यांचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. 

प्रश्न 17 : हातात आलेल्या अंकातील काय वाचावे, हे कसे ठरवता? हा प्रश्न तुलनेने सर्वांत साधा होता.  लेखाची  मांडणी व सजावट किती प्रभाव टाकते आणि लेखाचे विषय व लेखकाचे नाव किती महत्त्वाचे ठरतात, याचा अंदाज त्यातून घ्यायचा होता. लेखाचा विषय पाहून ठरवणाऱ्यांचे प्रमाण (75 टक्के)

अपेक्षितच होते. पण, लेखकाच्या नावापेक्षा लेखाचे शीर्षक अधिक प्रभाव टाकून जाते (49 टक्के) हा मुद्दा पुन्हा नव्याने अधोरेखित झाला.

प्रश्न 18 : साधनाचे लेखन इतिहासात / गतकाळात रमणारे असते का, असा प्रश्न विचारला होता.    त्याचे कारण खरोखरच ते गतकालीन जास्त असते, हा आमच्या चिंतेचा विषय आहे. वर्तमानाशी निगडित कमी असते आणि भविष्याचा वेध घेणारे लेखन तर अत्यल्प असते, अशी आमची पक्की धारणा आहे. मात्र, वाचकांच्या मनात ती भावना तेवढी प्रबळ नाही,  असे या प्रश्नाच्या उत्तरातून दिसते आहे.  ‘क्वचित वाटते’ आणि ‘कधीकधी वाटते’ असे म्हणणारे मिळून 80 टक्के आहेत. तर ‘अनेक वेळा’ वाटते व ‘नेहमी’ वाटते, असे म्हणणारांचे एकूण प्रमाण 20 टक्के दिसते. याचे आम्हांला दिसणारे कारण असे की, गतकालीन लेखन असले तरी त्याचा वर्तमान समजून घेण्यासाठी उपयोग होतो, असे 80 टक्के लोकांना वाटत असावे आणि उर्वरित 20 टक्क्यांना ताज्या विषयांवरील लेखन

वाचण्यात जास्त रस असेल. मात्र, संपादक म्हणून माझी सहमती या 20 टक्क्यांच्या बाजूने जास्त आहे.

प्रश्न 19 : अंक वाचून साधनाची वैचारिक भूमिका कशी आहे असे वाटते? या प्रश्नाला ‘सामान्यतः विवेकी’, ‘मध्यम मार्गी व उदारमतवादी’ हे दोन पर्याय निवडणारे अनुक्रमे 78 टक्के आणि 51 टक्के इतके आहेत. ‘डावीकडे झुकलेली’, या पर्यायाला 20.7 टक्के इतकी कमी पसंती दिसल्यावर काहींना आश्चर्य वाटेल. मात्र, याची तीन कारणे आहेत, एक म्हणजे आधीचे दोन पर्याय हाच अर्थ सूचित करतात. आणि जरी या प्रश्नात अधिक पर्याय निवडण्याची मुभा होती तरी  आधीचे  दोन पर्यायच लोकांना जास्त योग्य वाटले असावेत. किंबहुना आधीचे दोन पर्याय नसते तर कदाचित ‘डावीकडे झुकलेली’ या पर्यायाला अधिक पसंती मिळाली असती. शिवाय डावीकडे झुकलेली यामधून प्रामुख्याने राजकीय आशय व्यक्त होतो. हा फीडबॅक मात्र सामाजिक, सांस्कृतिक व संकीर्ण या विषयांनाही लागू होतो. ‘गोलमाल’ व ‘बचावात्मक’ आणि ‘कर्मठ’ व ‘नकारात्मक’ हे पर्याय निवडणारे अनुक्रमे दोन टक्के व एक टक्का इतके वाचक

आहेत, साहजिकच ते अनुक्रमे जास्त डाव्या व जास्त उजव्या बाजूला बाजूला असण्याची शक्यता आहे. मात्र, संख्येने अत्यल्प असले तरी त्यांनी ते नोंदवले याचे महत्त्व आहेच!

प्रश्न 20 : स्पष्ट व टोकदार भूमिका घेण्यात साधना कमी पडते आहे का? ‘नाही वाटत’ असे म्हणणारे व ‘क्वचित वाटते’ असे म्हणणारे मिळून 78 टक्के लोक आहेत. ‘कधी कधी वाटते’ आणि ‘अनेक वेळा वाटते’ असे म्हणणारे 22 टक्के आहेत. इथे तीन कारणे नोंदवावीशी वाटतात. काही वेळा अधिक टोकदार भूमिका घ्यायची तर सामान्यतः विवेकी व

उदारमतवादी भूमिका घेण्याला छेद जातो. तर काही वेळा विशिष्ट विषयांवरील चांगले लेखनच न मिळाल्याने किंवा ते विषय मागे पडल्याने त्या त्या विषयांवर प्रसिद्ध करायचे राहून जाते. तिसरे कारण असे की अनेकांना अपेक्षित असलेला टोकदारपणा साधनाला वा संपादकाला अपेक्षित नसतो. तरीही 22 टक्के हा आकडा कमी करता येईल असे प्रयत्न करायला हवेत, एवढी नोंद तर घ्यायलाच हवी.

प्रश्न 21 : साधनातील संपादकीय लेखनाबाबत समाधानी असता का? हा प्रश्न विचारण्याचे कारण, मागील सोळा वर्षे सातत्याने संपादकीय लेख लिहिण्यातून वाचकांना काहीसा तोचतोचपणा नकळतपणे जाणवतो आहे का, याचा शोध मला घ्यायचा होता. मात्र, ‘नेहमी’ व ‘बहुतेक वेळा’ समाधान मिळते असे म्हणणारे 86 टक्के वाचक आहेत, शिवाय ‘सामान्यतः समाधान’ मिळते असे

म्हणणारे 12 टक्के आहेत. या प्रश्नाला सर्वाधिक गुण वाचकांनी दिलेले आहेत. हा मुद्दा अक्षयने त्याच्या टिपणात नोंदवलेला आहेच.  पण, हे  सर्वाधिक गुण मिळण्यासाठी संपादकाला असलेले विशेष अधिकार व अधिकच्या सोयी कारणीभूत आहेत, असे वाटते. म्हणजे स्वतःचा विषय स्वतः निवडणे व त्याचा फोकस स्वत:ला ठरवता येणे, ते लेखन घाईत व सर्वांत शेवटी केले जात असले तरी ताज्या विषयावर लिहायला मिळणे आणि सारी कार्यालयीन यंत्रणा हाताशी असल्याने प्रेसला पाठवण्याचा अंक थांबवता येणे इथपर्यंतची सोय असते. शिवाय, अंकाच्या प्रारंभी संपादकीय लेख छापलेला असल्याने वाचकांचे आधी लक्ष त्याकडेच  जाते. अर्थातच  संपादकीय जागेवर  इतक्या  सातत्याने व  काटेकोरपणे  लिहिण्याचा  उत्साह टिकून राहणे, हे श्रेय संपादक म्हणून निश्चितच घेता येईल. पण, वरील चार सुविधा व विशेष अधिकार नसते तर इतके सातत्याने लिहीत राहण्याचा उत्साह टिकून राहिला असता का, या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे द्यायचे तर ‘नाही’ असेच आहे.

प्रश्न 22 : साधना अंकातील ‘प्रतिसाद’ सदरात वाचकांचे प्रतिबिंब दिसते का? या प्रश्नाला ‘नेहमी दिसते’ म्हणणारे 25 टक्के आहेत, ‘बहुतांश वेळा दिसते’ म्हणणारे 53 टक्के आहेत, म्हणजे एकूण 78 टक्के वाचकांना ते दिसते. उर्वरित 22 टक्क्यांना ‘तसे दिसत नाही’. माझी सहमती या 22 टक्क्यांशी आहे. कारण, जास्त टोकदार वा एकारलेल्या वा काही त्रुटी राहिलेल्या लेखावर तरी जास्त प्रतिक्रिया येतात किंवा अगदीच अप्रतिम लेख असेल तर त्यावर! मात्र,  बहुतांश  लेख  या दोन्हींच्या  मध्येच असतात, त्यावर  खूप  कमी  प्रतिक्रिया  येतात.  शिवाय  अनेक  चांगल्या लेखांमधील सौंदर्यस्थळे व चांगल्या लेखांमधील विसंगती वा मर्यादा दाखवणारी पत्रे अभावाने आलेली पाहायला मिळतात. त्यामुळे प्रतिसादमधील पत्रांच्या बाबतीत मी तरी खूप कमी वेळा समाधानी असतो. अर्थात याचे कारण अनेक लोक आता फोन, मेसेज, मेल याद्वारे थेट लेखकाला प्रतिसाद देतात हे असावे.

प्रश्न 23 : साधनातील लेखनाचा चांगला परिणाम समाजजीवनावर किती होतो असे वाटते? हा प्रश्न जरा मोघम (व्हेग) आहे, असे प्रश्नावली तयार करताना अक्षय म्हणाला होता. मात्र, परिणाम मोजणे ही खूपच व्यक्तिनिष्ठ प्रक्रिया असल्याने, त्याला मर्यादित पर्याय देणे योग्य वाटत नव्हते. शिवाय, याच एका प्रश्नाच्या भोवती स्वतंत्र सर्व्हे पुढे कधी तरी करण्याची गरजही वाटत होती. अखेर अक्षयला वाटत होते तसेच झाले. 21 टक्के वाचकांनी या प्रश्नाला उत्तर देताना

‘सांगता येत नाही’ हा पर्याय निवडला आहे. उर्वरित तीन  पर्यायांचा  विचार  करता  ‘अगदी थोडा’ म्हणणारे 14 टक्के, तर ‘बराच’ व ‘जास्त परिणाम होतो’ म्हणणारे 64 टक्के आहेत. या एकाच प्रश्नाचे अनेक आयाम पुढे करून एक स्वतंत्र फीडबॅक सर्व्हे पुढे  निश्चितच करता येईल. कारण, यापुढील काळात परिणामकारकता (इम्पॅक्ट) हा साधनेच्या दृष्टीने महत्त्वाचा मापदंड ठरवला जाणार आहे.

प्रश्न 24 : शेवटचा प्रश्न होता, तुम्ही साधना कशासाठी वाचता, तुम्हांला त्यातून काय मिळते? या प्रश्नाला दोन ते तीन वाक्यांत उत्तर देणे अपेक्षित होते. (या एकाच प्रश्नाचे उत्तर लिहावयाचे होते, उर्वरित सर्व प्रश्न टिकमार्क करायचे होते.) या प्रश्नाला 1018 वाचकांनी एक ते पाच वाक्यांत उत्तर लिहिले आहे. म्हणजे 237 वाचकांनी लिहिलेले नाही. याचा अर्थ 81 टक्के वाचकांनी लिहिले, 19 टक्के वाचकांनी लिहिण्याचा कंटाळा केला किंवा प्रश्न ऐच्छिक असल्याने लिहिण्याची गरज वाटली नाही. अर्थातच, तो प्रश्न सकारात्मक असल्याने, त्या सर्वांनी साधनाविषयी चांगलेच लिहिले आहे. पण, ते कोणती गुणवैशिष्ट्ये अधोरेखित करतात, याचे आम्हांला कुतूहल होते. त्यातून आलेली वर्ड क्लाउड जनरेटरने तयार केलेली प्रतिमा, या अंकाच्या मुखपृष्ठावर घेतली आहे. जेवढे जास्त शब्द तेवढे ते अधिक ठळक व मोठ्या अक्षरांत आहेत. जेवढे कमी शब्द तेवढे ते लहान व अस्पष्ट आहेत. उदा., सामाजिक व वैचारिक हे शब्द सर्वाधिक वेळा वापरले गेले आहेत; भूमिका, राजकीय हे शब्द त्या तुलनेत कमी वापरले गेले आहेत.

असे  हे 24  प्रश्न  आणि  त्यांची  उत्तरे  या संदर्भात संपादक म्हणून लिहिलेले हे स्पष्टीकरण. काही वाचकांना हे त्रोटक वाटेल, काही वाचकांना विस्तृत वाटेल, काही वाचकांना अवाचनीय वाटेल, तर काही वाचकांना अगदी नेमके (टू द पॉइंट) वाटेल. पण, कोणाला कसे वाटले हे  शोधायचे असेल तर कदाचित या प्रश्नावरच छोटा फीडबॅक सर्व्हे घ्यावा लागेल. मात्र, तसे काही न करता, हा सर्व्हे घडवून आणण्यासाठी मागील महिनाभर पूर्णतः तत्पर असणारा तरुण मित्र अक्षय जोशी, ही सर्व कार्यवाही घडवून आणणारे साधनाचे कार्यालयीन सहकारी आणि अर्थातच या सर्व्हेसाठी फीडबॅक फॉर्म भरून पाठवणारे साधनाचे वाचक यांचे मनःपूर्वक आभार...!


फीडबॅक सर्व्हे करणाऱ्या अक्षय जोशी यांचे टिपण वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे ( 115 लेख )
vinod.shirsath@gmail.com

मागील दोन दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी