दि.15 जानेवारीच्या साधनाचे संपादकीय वाचले. संपादकीयामध्ये ‘विद्यार्थ्यांना सोडा, शिक्षकांना धरा!’ हे शीर्षक चांगलच आहे यात शंका नसावी. कोविड 19 ने जगभर धैमान घातले आहे, जग या त्याच्या विळख्यात होते आणि आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांत शाळा 600 दिवस बंद होत्या. या काळात सर्वाधिक नुकसान शिक्षणक्षेत्राचे झाले. मुलांचे तर न भरून येणारे शैक्षणिक ‘वाटोळं’ झाले. मी याच क्षेत्रात 34 वर्षे काम केले आहे. या कोविड काळात शिक्षकांनी फक्त ऑनलाईन, झूम वा मोबाईल टिचींग यांवर समाधान न मानता, अशी भरघोस कर्तव्ये पार पडली नाहीत सत्य आहे.
शिक्षण- अनौपचारिक व औपचारिक : समन्वय व सहयोग हवा
दि. 15 जानेवारीच्या साधनाचे संपादकीय (विद्यार्थ्यांना सोडा, शिक्षकांना धरा!) वाचले. संपादकीयात नमूद केलेल्या सर्व मुद्यांबाबत सहमती ठेवणे कठीण आहे. परंतु शेवटच्या परिच्छेदातील मुद्दा मला शिक्षण (सर्वच स्तरांवरील) या संकल्पनेच्या संदर्भात महत्त्वाचा वाटला, त्याबद्दल माझे मत नोंदवतो.
शिक्षणाची प्रक्रिया ही अखंड चालणारी आणि बहुआयामी आहे, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. शिक्षण, विशेषत: लहान मुलांचे, हा मोठ्या व्यक्तींचा अभ्यासाचा विषय आहे. असावा लागतो. शालेय पातळीवरील आणि महाविद्यालय पातळीवरील चालणारे शिक्षण हे औपचारिक समजले जाते. प्रत्यक्ष शिक्षणाचा उपयोग मात्र अनौपचारिकपणे चालणाऱ्या जगण्याचा भाग असतो. म्हणून औपचारिक व्यवस्थेत जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे अनौपचारिक माध्यम वापरले जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विषय शिकविण्याच्या पद्धतीही मुलांसाठी काटेकोरपणे न राबविता त्यातही अनौपचारिकता आणायला हवी. म्हणजे शिक्षण आणि जगणे यांच्यात आवश्यक व उपेक्षित असणारी सरमिसळ होईल, त्यातून शिक्षण आणि जगणेही अनुभवाधारित होत असल्याने अर्थपूर्ण व समृद्ध होण्याची शक्यता वाढेल.
शिक्षण देण्यासाठीचे माध्यम अनौपचारिक असावे इतकाच याचा मर्यादित अर्थ नाही. अनौपचारिक जगण्यातील घटना, घटक हेच औपचारिक शिक्षणाचा पाया असतात याची जाण मोठ्यांना असणे आवश्यक आहे. म्हणून सर्वच विषयांतील अधिकाधिक भाग विद्यार्थ्यांच्या जीवनास व त्यांच्या भावविश्वास जोडण्याचा प्रयत्न महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक वेळी हे जमेलच असे नाही, याची जाण ठेवून अधिकाधिक तास प्रयत्न करणे गरजेचे आहे.
औपचारिक पद्धत व अनौपचारिक माध्यमांद्वारे (वा साह्याने) दिले जाणारे शिक्षण यांचा समन्वय व सहयोग ठेवत जाणे अगत्याचे आहे. शाळांमधील शिक्षकांसाठी आवश्यक असणाऱ्या व्यावसायिक पात्रतेचे काम विद्यापीठातील अभ्यासमंडळे करतात. पण विद्यापीठांचा शालेय शिक्षणाशी थेट संबंध अत्यल्प असतो. म्हणून अभ्यासमंडळातील व्यक्ती शालेय स्तर आणि विद्यापीठ स्तर अशा दोन्हींतून घेतल्या गेल्यास शिक्षणाची तात्विक बाजू, प्रत्यक्ष व्यवहार आणि औपचारिक-अनौपचारिकता यांची सांगड घातली जाऊ शकते.
अर्थातच शिक्षणाचे भाषामाध्यम, शिक्षकांची भरती नसल्याने शाळांमधील मोठी कमतरता, शिक्षणबाह्य व्यक्तींचा हस्तक्षेप आणि ज्यांच्यावर शिक्षणाची गुणवत्ता अवलंबून आहे, अशा शिक्षकांची तुलनेने कमी संख्या यांचा विचार करता, वरील विषय किती गुंतागुंतीचा बनला आहे याची सुजाण वाचक कल्पना करू शकतात.
- प्रा. नागेश शंकर मोने, वाई, जि.सातारा
------
मध्ययुगीन संतपरंपरा तशा साधूंमुळेच जिवंत आहे!
दि.25 डिसेंबर 2021 च्या अंकांत ‘टिश्यू पेपर’, या नव्या कादंबरी संदर्भात प्रा.डॉ.अरुण कोळेकर यांनी समीक्षा केलेली आहे. या कादंबरीमध्ये हॉटेलची दुनिया एक प्रकारे मध्यमवर्गीय, श्रीमंतांच्या, उच्चभ्रूची थकवा घालविण्यासाठी आराम करण्याची जागा आहे. येथे काही लोक मौज करतात. काही आपली वेदना, दुःख, प्रश्न, नैराश्य, तणाव यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. काही आनंद शोधत असतात. यांच्या आनंदाचे चित्रण करताना लेखकाने हॉटेलमध्ये काम करणारे कामगार वेटर स्त्रिया यांच्या जीवनाची दाहकता मांडली आहे. अरुण कोळेकर यांची समीक्षा वाचकांना कादंबरी वाचण्यासाठी प्रेरित करते. समीक्षकाने सहजपणे कादंबरीसंबंधी व त्यातील व्यक्तिरेखांचा जिवंतपणा व्यक्त केला आहे. हॉटेलचे स्वतंत्र असे नवीन जग आहेच. यामध्ये अनेक गरीब, अठरापगड जमातीची शोषित पीडित मुलं-मुली, युवा-युवती काम करतात. त्यांच्या जीवनाचे दाहक अनुभव येथे पाहायला मिळतात. या काम करणाऱ्या व्यक्तींचे शोषण होत असते. हॉटेलचे हे जग काम करणाऱ्याचे टिश्यू पेपरसारखेच आहे काय? याचे चित्रण या कादंबरीच्या माध्यमातून झालेले आहे
दि. 8 जानेवारीच्या अंकातील संपादकीय ‘साधूंच्या वेषातील सैतान!’ वर्तमानातील निर्भीड पत्रकारितेची परंपरा जोपासणारे आपल्या देशातील वाढत्या विकृती, हिंसक कारवाया, धार्मिक भेदभाव हे आपल्या विश्वगुरू होण्याच्या, महासत्ता बनण्याच्या, वसुधैव कुटुंबकम या कल्पनेला छेद देण्याचा दृष्टीने अत्यंत वाईट परिणाम करणारे आहेत. ‘साधूंच्या वेषातील सैतान’ या संपादकीयामध्ये धार्मिक अहंकाराने किती भयानक रूप धारण केले आहे याचे ज्वलंत उदाहरण व्यक्त होते. धार्मिक अहंकाराने संत, साधूंच्याही हृदयात विषक्त रूप धारण केले आहे. उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे झालेल्या धर्मसंसदेत काही साधूंनी धर्माच्या नैतिकतेचे तीन तेरा करून टाकले आहे.
मध्ययुगातील संतांनी आपल्या विचारातून जाती, धर्म, संप्रदाय से परे जाकर मानवता की बात की थी. परंतु या ठिकाणच्या संतांच्या, साधूंच्या धर्मसंसदेत वेगळेच घडलेले दिसून येते. माणुसकीला काळीमा फासणारी प्रवृती त्या ठिकाणी घडली असून ती वक्तव्ये समाजमाध्यमातून धर्माधर्मात, जातींत हिंसा निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतात. सरकारी यंत्रणा अशा घटनांप्रति सजग झाल्या पाहिजेत. या घटनांचा लगेच बंदोबस्त करण्याची गरज केंद्रीय शासन-प्रशासन यावर आहे. धर्मसंसदेतील भाषणे ही विखारी प्रवृत्तीची असल्यामुळे एका विवेकवादी साधूने ती धर्मसंसद सोडून जाण्याचा निर्णय घेतला व त्या साधूने ह्या धर्मसंसदेतील भाषणे समाजविघातक आहेत म्हणून ही सभा सोडून मी जात आहे असे म्हणण्याचे धैर्य दाखवल्यामुळे मध्ययुगातील संतपरंपरा आशा साधूंमुळेच जिवंत आहे, याचे प्रमाण मिळाले.
- प्रा.डॉ.विश्वनाथ भालेराव, उदगीर, जि. लातूर
-------
भाजपच्या प्रचाराचा आरंभ व सांगता धार्मिक धु्रवीकरणाशिवाय होत नाही
दि. 8 जानेवारीच्या साधनाचे ‘साधूंच्या वेषातील सैतान!’ हे संपादकीय वाचले. सुमारे 170 वर्षांपूर्वी कार्ल मार्क्सने एका जागी नोंदवून ठेवले आहे की, ‘धर्म ही अफूची गोळी आहे.’ एवढी दशके लोटली आणि विज्ञानाचा सूर्य जगभर तळपत असताना या धर्म नामक अफूची मादकता जाणवण्यामागे दिल्ली, उत्तराखंडमधील हरिद्वार आणि छत्तीसगडची राजकीय रायपूर येथे भरलेली तथाकथित हिंदू धर्म परिषद कारणीभूत ठरली आहे. या तथाकथित धर्म संसदेत काही कथित- स्वयंघोषित संत्, महंत, धर्ममार्तंडांनी ओकलेली चिथावणीखोर आणि द्वेषमूलक गरळ त्यांच्या आध्यात्मिक आणि बौद्धिक मर्यादा स्पष्ट करणारी आहे. वास्तविक संत, महंत हे समाजाचे मार्गदर्शन असतात. पण, समाजात दुही माजवणारे हे धर्मगुरू नसून वाचाळवीर आहेत. या धर्म संसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत अनुद्गार काढण्यात आले. हा सारा घटनाक्रम जेवढा मन उद्विग्न करणारा आहे त्याहीपेक्षा अधिक देशाच्या नेतृत्वाचे यासंदर्भातील ‘मौन’ अधिक घातक आहे. कारण मौनात ब्रह्मांड डळमळीत करण्याची जशी ताकद असते, तसेच या मौनातून अनेक अर्थदेखील निघू शकतात.
दिपक त्यागी ऊर्फ यती नरसिंगानंद यांनी देशात मागील जवळपास आठ वर्षांपासून हिंदुत्ववादी विचारसरणीचे सरकार सत्तेत असतानादेखील पुन्हा एकदा ‘हिंदू खतरें में हैं’च्या शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘शस्त्र मेव जयते!’च्या उद्घोषात पार पडलेल्या या धर्मपरिषदेत सरळसरळ एका विशिष्ट अल्पसंख्याक धर्मसमुदायाला देशातून हद्दपार करायचे असेल तर तलवार आदी पारंपारिक शस्त्रे उपयोगाची नाहीत, तर आधुनिक शस्त्रे हिंदू धर्मीयांनी उचलणे गरजेची आहेत, असे जाहीर आवाहन करण्यात आले. तरीही या तथाकथित धर्मगुरूंवर कायदेशीर कारवाई होत नसेल तर त्यांना राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही. उत्तराखंड, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची ध्रुवीकरणाची समीकरणे या वरदहस्तामागे आहेत का? कारण निवडणूक कोणतीही असू देत भाजपच्या प्रचाराचा आरंभ आणि सांगता धार्मिक ध्रुवीकरणाशिवाय होत नाही
- बाळकृष्ण शिंदे, बिबवेवाडी, पुणे
------
झाले गेले गंगेला मिळाले असे मानून पुढे चालावे
दि.15 जानेवारीच्या साधनाचे संपादकीय वाचले. संपादकीयामध्ये ‘विद्यार्थ्यांना सोडा, शिक्षकांना धरा!’ हे शीर्षक चांगलच आहे यात शंका नसावी. कोविड 19 ने जगभर धैमान घातले आहे, जग या त्याच्या विळख्यात होते आणि आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांत शाळा 600 दिवस बंद होत्या. या काळात सर्वाधिक नुकसान शिक्षणक्षेत्राचे झाले. मुलांचे तर न भरून येणारे शैक्षणिक ‘वाटोळं’ झाले. मी याच क्षेत्रात 34 वर्षे काम केले आहे. या कोविड काळात शिक्षकांनी फक्त ऑनलाईन, झूम वा मोबाईल टिचींग यांवर समाधान न मानता, अशी भरघोस कर्तव्ये पार पडली नाहीत सत्य आहे.
शिक्षण व शैक्षणिक कामकाज हे तसे पोपटपंची काम. कामाचा आऊटपुट न लक्षात येणारे क्षेत्र. शिक्षक एकदा कायम झाले की बरीचशी ‘सुस्ती’ची अनुभूती पाहायला मिळते. ‘काम कमी जास्त दाम’, त्यात पती-पत्नी एकाच क्षेत्रात असतील तर आनंदी-आनंद. हे एक वास्तव आहे.मुलांच्या आत्महत्यांमुळे दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षातील क्रमांक यादी बंद केली. पुढे जाऊन पहिली ते आठवी ‘सब घोडे बारा टक्के’ सर्वच पास. नापास करायचे नाही. राज्य शासनाने प्रिंट, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक या माध्यमांचा वापर करून शिक्षकांना प्रेरणा, प्रोत्साहन व प्रशिक्षण यांच्या माध्यमातून द्यायला हवी होती. मागील दोन वर्षे कोविडमध्ये गेले ‘झाले गेले गंगेला मिळाले’ असे मानून आता तरी नवीन उपाय करून मुलांचे नुकसान होणार नाही यासाठी राज्य शासन, संस्था पातळीवर नवीन प्रकल्प राबवणे गरजेचे आहे.
असे म्हटले जाते- डॉक्टर समाजाचे आरोग्य सांभाळतो, वकील समाजाचे मन सांभाळतो, शेतकरी हा समाजासाठी अन्न, धान्य तयार करून समाजाच पोट भरतो. तो अन्न दाता ठरतो. तर शिक्षक हा समाजाचा , देशाचा भावी नागरिक घडवतो. त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे हे त्यांनी विसरून चालणार नाही.
- विलास भांदिर्गे, मु.पो.तारळे ता.पाटण, जि. सातारा
--------
विश्वासरावांचा टोकिओतील तो अनुभव
दि.11 डिसेंबरच्या अंकातील दत्तात्रय जोशी यांचा ‘आठवणीतील मुंबई दूरदर्शन’ या मथळ्याचा लेख वाचून माझ्या स्मृतीची पाने चाळविली गेली. सुरुवातीला ऐंशी नव्वदच्या दशकात दर रविवारी सकाळी एक तासाचा ‘प्रतिमा आणि प्रतिभा’ नावाचा विविध क्षेत्रांतील कर्तबगार व्यक्तींच्या मुलाखतीवर आधारित कार्यक्रम असायचा. अशाच एका कार्यक्रमात कामात प्रतिष्ठा शोधणाऱ्या नामवंत विश्वासराव चौगुले यांची मुलाखत पाहिली. कार्यक्रमात सामान्य जपानी माणसाच्या नोकरी, व्यवसाय, मालक आणि एकूणच देशावरील प्रखर निष्ठेची त्यांनी सांगितलेली आठवण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवली आहे आणि त्या आठवणीचा उपयोग तरुणांसमोर बोलताना मी पुरेपूर करत आलो आहे.
त्या आठवणीचा गोषवारा पुढीलप्रमाणे... मुलाखत घेणाऱ्याने विश्वासरावांना शेवटचा प्रश्न विचारला की, धंद्याच्या निमित्ताने त्यांचा जपानशी निकटचा संबंध आहे, तेव्हा अणुबॉम्ब वर्षावाने जर्जर झालेल्या त्या देशाने अवघ्या 30/35 वर्षांत नेत्रदीपक प्रगती केली त्याचे गमक कोणते? विश्वासराव नम्रपणे उत्तरले, ‘त्या देशाची आणि तिथल्या लोकांची महानता मी काय वर्णू? परंतु पंधराच दिवसांपूर्वी मला टोकियोत आलेला एक अनुभव सांगतो. त्यात तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडते का बघा.’
टोकियोतील एका स्टील मिलच्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या केबिनमध्ये विश्वासराव गोव्यातून कच्चे लोखंड निर्यात करण्याबाबत बोलत होते. संध्याकाळी चार-पाचची वेळ. दारावर टकटक आवाज करत एक माणूस आत आला व एम.डी.ला भिंतीवरील घड्याळाकडे त्यांचे लक्ष वेधून काही तरी म्हणाला. एम.डी.ने विश्वासरावांना टेलिप्रिंटरने भारतात काही निरोप पाठवायचा आहे का म्हणून विचारले. त्यांनी नाही म्हणून सांगितले व माणूस निघून गेला. थोड्या वेळाने चर्चा संपल्यावर न राहवून आणि कुतूहल म्हणून विश्वासरावांनी एम.डी.ला विचारले की, काही वेळापूर्वी आलेल्या माणसाने घड्याळ दाखविले व आपण माझ्याकडे विचारणा केलीत. यावर तो एम.डी. हसून म्हणाला म्हणाला, ‘‘तो आलेला माणूस माझा टेलेक्स ऑपरेटर आहे. सध्या माझे कर्मचारी त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत ‘वर्क टू रुल’ काम करत आहेत म्हणून त्याने माझे घड्याळाकडे लक्ष वेधून सांगितले की, लवकरच त्याच्या कामाची वेळ संपणार असून, त्याअगोदर तुमचा काही निरोप भारतात पाठवायचा असल्यास तो पाठवूनच तो घरी जाऊ इच्छितो.’’
तो एम.डी. पुढे आपल्या कर्मचाऱ्याबद्दल आणखी काही सांगत होता आणि इकडे मालकाशी झगडतानाही कंपनीचे व मालकाचे नुकसान होऊ नये, म्हणून काळजी घेणाऱ्या टेलेक्स ऑपरेटरच्या कृत्याने भारावलेले विश्वासराव डोळ्यातून ओघळणारे अश्रू थोपवण्याचा प्रयत्न करत होते!
- गोविंद काजरोळकर, पुणे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या