डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हॅपिनेस इंडेक्सवरील चर्चेत भारत 149 देशात 139 व्या क्रमांकावर का, यावर केशवराव नेमके बोट ठेवून काही दुरुस्त्या सुचवतात. असो. नेहमीप्रमाणेच शेवटचा महत्त्वाचा प्रश्न ‘केशवराव तुम्ही पाऊणशे वर्षं पारतंत्र्यात व उर्वरित पाऊणशे स्वराज्यात घालवली, तेव्हा खरे खरे सांगा की तुम्ही कोणत्या काळात आनंदी जगलात.’ याचे उत्तर देणे अडचणीचे असल्याने उत्तर टाळून केशवराव निघून जातात. माझा असा कयास आहे की, त्यांचे उत्तर ‘पारतंत्र्यात’ असे असावे. 

त्या प्रश्नाला केशवरावांचे उत्तर ‘पारतंत्र्यात’ असे असावे! 

दि.10 एप्रिलच्या अंकात केशवराव यांची पाचवी मुलाखत वाचली. आधीच्या चार मुलाखतीमुळे आता केशवराव हे अनेक वाचकांना काहीसे परिचित व्यक्ती वाटायला लागले आहेत. प्रथमत: मागील शतकातील सुरुवातीच्या काळात घडलेले चारित्र्य आणि आजच्या काळापर्यंत, गेल्या सव्वाशे वर्षांत देशात घडलेले बदल, यामध्ये जमीन-आस्मान इतके अंतर लक्षात घ्यावे लागेल. तेव्हा देशात 30 कोटी नागरिक होते, आता 135 कोटी इतके असल्याने समस्यांची जटिलता चौपट वाढली आहे. त्यामुळे आजच्या प्रश्नांची उत्तरे दीडशे वर्षे वयाच्या एका अभिजन निवृत्त न्यायाधीशांकडून मिळवण्याचा प्रयत्न हे मुळातच न जमणारे समीकरण आहे. तरीही संपादक हे समीकरण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे संपादकाच्या भूमिकेला शोभणारे आहे.

मागील मुलाखतींपेक्षा प्रस्तुत मुलाखत दीर्घ वाटते. एवढेच नसून, त्यात प्रश्नांची संख्याही मोठी असल्याने त्यातल्या प्रत्येक मुद्यावर प्रतिसाद देणे शक्य नसल्याने थोड्याच मुद्यांवर लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. 

चर्चेमध्ये खालील मुद्दे आले; हॅपिनेस इंडेक्स, covid-19 संकट. सर्वसामान्य नागरिक, केवळ स्वहिताच्या पलीकडे न पाहता व्यापक सामाजिक जाण व भान न उरल्याने स्वलाभात गुंतून पडणे, सत्ताधाऱ्यांच्या व्यवस्थापनातील गोंधळ अनुभवल्यामुळे सत्ताधाऱ्यांवरील विश्वास हरवणे व शेवटी सामाजिक नैतिकतेमधील घसरण, इत्यादी घडत गेले. 

वरील प्रत्येक मुद्यावरील चर्चेत संपादक नव्या युगातील जटिलतेकडे केशवरावांचे लक्ष वेधत राहतात. परंतु केशवराव नेहमीप्रमाणे जुन्या अनुभवातील उत्तरे (थोडक्यात इंग्रजीत कट अँड ड्रॉप) देतात. कोविडचा प्रश्न निघाल्यावर केशवराव 1920 च्या स्पॅनिश आणि त्या आधीच्या प्लेगात झालेल्या साडेतीन कोटी मृत्यूंकडे व ह्या साथीचा परिणाम तीन वर्षे टिकून राहील की काय, अशी भीती व्यक्त करतात. आता वैद्यकशास्त्रात खूप मोठी प्रगती झाल्यानंतरही समाजात इतकी घबराट का, असा प्रतिप्रश्न विचारतात. संकटाचा मुकाबला जर सामाजिक राजकीय विरोधक व जनता एकत्रपणे करायला शिकले तर आणखीन एक दोन वर्षांत हा प्रश्न संपू शकेल, कोविड काही कायम राहणार नाही, असे ते सुचवतात. 

सध्या केंद्र सरकारकडे जवळजवळ सर्वच अधिकार एकवटले असूनही, पूर्वानुमान चुकीचे ठरल्याने सत्ताधारी कसे गोंधळून गेले, हे आपण अनुभवतो आहोत. प्राणवायू न मिळाल्याने अनेक रुग्ण दगावत आहेत. तिथे ठिगळ लावत असताना लसीचा तुटवडा केवळ निर्माणच होत नाही, तर आधी कुणाला टोचायचे या प्रश्नात अडकतो. लस उपलब्धतेची खात्री नसतानाही लस टोचण्याच्या कार्यक्रमात 18 ते 44 वयोगटालाही प्रशासन सामील करते व नंतर निर्णय मागे घेते. शेवटी अनेक प्रश्न राज्य सरकारवर सोपवून मोकळे होते. अशा सर्व गोंधळात, धोरणात मोठा बदल केंद्र सरकार केव्हा करेल याचे उत्तर कोणाकडेच नाही. त्यामुळे पंतप्रधानांचे कार्यालय ‘आम्ही करतो आहोत हेच सर्वात योग्य आहे’ असे आर्ग्युमेंट रेटत राहते. त्यामुळे पंतप्रधानांचे मंत्रिमंडळातील सदस्य तीच पोपटपंची उगाळत राहतात. ज्या आधारावर हे बदल केले तो आधारच वास्तवाशी मेळ खाणारा किंवा तद्दन खोटा असल्याचे अनेक परदेशी व देशी पत्रकार मीडियात मांडत राहतात. उदाहरणार्थ, सरकारने दाखवलेली कोरोना मृत्यूंची संख्या, गंगेमध्ये प्रवाहित केलेली प्रेते व काठावर उथळ वाळूत, थडग्यात गाडलेले मृतदेह यातील फरक सर्व जग पाहत आहे. पण पडलो तरी आमचेच नाक वर, या भूमिकेतून सत्तापक्ष बाहेर येणे टाळतो, कारण तसे जर केले तर अनेकांचे प्रतिमाहनन होणार ही सुप्त भीती. 

हॅपिनेस इंडेक्सवरील चर्चेत भारत 149 देशात 139 व्या क्रमांकावर का, यावर केशवराव नेमके बोट ठेवून काही दुरुस्त्या सुचवतात. असो. नेहमीप्रमाणेच शेवटचा महत्त्वाचा प्रश्न ‘केशवराव तुम्ही पाऊणशे वर्षं पारतंत्र्यात व उर्वरित पाऊणशे स्वराज्यात घालवली, तेव्हा खरे खरे सांगा की तुम्ही कोणत्या काळात आनंदी जगलात.’ याचे उत्तर देणे अडचणीचे असल्याने उत्तर टाळून केशवराव निघून जातात. माझा असा कयास आहे की, त्यांचे उत्तर ‘पारतंत्र्यात’ असे असावे. 

रमेश आगाशे, सातारा  

----

हॉस्पिटलमधील मुक्काम सुकर झाला... 

दि.2 मे रोजी जगप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित राय यांच्या जन्मशताब्दीची सांगता झाली, कोरोनामुळे ते बऱ्याच जणांच्या लक्षात आले नाही. या निमित्ताने साधनाने ‘अपरिचित सत्यजित राय’ नावाने विशेषांक काढला आहे. संपूर्ण अंकाचे लेखन व संपादन विजय पाडळकर यांनी केले आहे. अत्यंत परिश्रमपूर्वक केलेला अंक उत्कृष्ट आहे. राय यांच्या कार्याचा पूर्ण धांडोळा घेतला आहे, हा विशेषांक नावाप्रमाणेच राय यांच्याबद्दल माहीत नसलेल्या अनेक गोष्टींचा खजिना आहे. तपशिलात जात नाही, पण फक्त दोनच गोष्टी सांगतो. 

राय यांनी आपल्या 37/38 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत 36 चित्रपट/लघुपट/वृत्तचित्रपट (डॉक्युमेंटरी)ची निर्मिती केली, पैकी चार चित्रपटांना पं. रवी शंकर, विलायत खाँ व अली अकबर खाँ यांचे संगीत होते; पण राहिलेल्या सर्व चित्रपटांना स्वतः राय यांनी संगीत दिले होते. राय यांचे सर्वच चित्रपट दर्जेदार होते. पाडळकर म्हणतात, काहीही करून/ कुठूनही मिळवून आपण राय यांचे हे दहा चित्रपट ‘पाहिलेच’ पाहिजेत- ती यादी त्यांनी दिलेली आहे. 

आणखी एक- सिक्कीम (1961) ही एक डॉक्युमेंटरी सिक्कीमच्या राजाच्या विनंतीवरून राय यांनी केली. त्या वेळी सिक्कीम हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून होते. अतिशय निसर्गरम्य, नयनमनोहर पार्श्वभूमीवर केलेली ही डॉक्युमेंटरी आहे. पण बऱ्याच अनाकलनीय गोष्टी घडल्या/घडविल्यामुळे आजही (सिक्कीम भारतात एक राज्य म्हणून सामील झाल्यावरही) या डॉक्युमेंटरीवर बंदी आहे. पण युट्यूबवर एक कॉपी पाहावयास मिळते. असो. जपानचे जगप्रसिद्ध, महान दिग्दर्शक ‘अकिरा कुरोसोवा’ सत्यजित राय यांच्याबद्दल म्हणतात - "Not to have seen the Cinema of Ray means existing in the world without seeing the sun or the moon."

हा संग्राह्य विशेषांक जर आपण पाहिला/वाचला नाही तर सत्यजित राय आपणांस अपरिचितच राहतील. विजय पाडळकर यांच्या या अशा लिखाणामुळे मला त्यांना ‘सत्यजित पाडळकर’ म्हणावेसे वाटते, एवढे ते लिहिताना सत्यजित राय यांच्या कार्याशी तादात्म्य पावले आहेत. 

दि.30 एप्रिल ते 8 मे या कालावधीत कोविड-19 मुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो, त्या वेळी या विशेषांकाची रोज दोन-तीन प्रकरणे वाचून काढली. त्यामुळे आनंदाची एक वेगळीच अनुभूती येत असल्याने हॉस्पिटलमधील मुक्काम सुकर झाला. ह्यामुळे मी यास ‘कोविडानंद’ म्हणतो. 

प्रा. डॉ. निनाद शहा, सोलापूर.  

----

आमच्या पिढीची खंत 

दि. 22 मे 2021 चा अंक मिळाला. ‘महाराष्ट्राला शेवटची हाक’ हा लेख व मुलाखत हे दोन्ही वाचले. मागील अंकातील ‘साने गुरुजींचा पंढरपूर मंदिरप्रवेश आणि हिंदू धर्मसुधारणा’ हा चैत्रा रेडकर यांचा लेखही वाचला. या सर्व लेखनामधून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर प्रवेश हा विषय व यामागील साने गुरुजींची भूमिका पुन्हा महाराष्ट्राला कळली. साने गुरुजींनी महाराष्ट्राला हृदय विशाल करण्याची आणि अधिक चांगला माणूस बनण्याची शिकवण दिली. आमच्या पिढीला साने गुरुजी पाहायला व ऐकायला मिळाले नाहीत, ही खंत नेहमी वाटते. 

संतोष लिमकर, कळंब, जि उस्मानाबाद

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके