डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

10 ऑक्टोबरच्या अंकातील अमरेंन्द्र धनेश्वरांच्या श्री.रामचंद्र गुहा यांच्या लेखावर टिपण्णी करताना ‘आंबेडकर हे टिळक किंवा गोखले यांच्याप्रमाणे उच्चवर्णीय होते, असा गांधींचा गैरसमज झाला होता...’ हे मत भाबडेपमाचे असल्याचे श्री.माधव ढेकणे यांनी दि. 26 डिसेंबरच्या साधना अंकात म्हटले आहे. पण वस्तुस्थिती तशीच होती, हे डॉ.य.दि.फडके यांनीही ‘डॉ.आंबेडकरांचे मारेकरी : अरुण शौरी’ (लोकवाङ्‌मय गृह, पहिली आवृत्ती 14 एप्रिल 1999, पृ.63-64) या आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. 

ह्या सामान्य ज्ञानामुळे सामान्य व्यक्तीही एखादी आत्महत्या टाळू शकतील

दि.9 डिसेंबरच्या साधना संपादकीयात (शोकसागरात बुडालेले आनंदवन) डॉ.शीतल आमटे यांच्या मृत्यूच्या सामाजिक परिमाणांची थोडक्यात पण साक्षेपी चर्चा करण्यात आली. डॉ.शीतल यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या घटकांचा शोध त्यांच्या-त्यांच्या परीने पोलीस व न्याययंत्रणा घेत राहतील, असे संपादकांनी म्हटले आहे.

संपादकीयात आनंदवनाबद्दल व आमटे परिवाराबद्दल आपल्या सर्वांच्याच मनातील आदरभाव व जिव्हाळा व्यक्त करताना अनेक सहृदय वाचकांच्या मनात येणाऱ्या स्वाभाविक प्रश्नांचीही चर्चा केली आहे. या संवेदनशील हाताळणीत आत्महत्येच्या एका मोठ्या पैलूकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. ते म्हणजे- मानसिक आजार आणि आत्महत्या यांतील संबंध. एका विशिष्ट व्यक्तीबद्दल- विशेषतः तिच्या व्यक्तिगत वैद्यकीय इतिहासाची पुरेशी माहिती नसताना- सायकिॲट्रिस्ट म्हणून टिप्पणी करणे योग्य नसते आणि नाही. म्हणून मी येथे जे लिहितो आहे ते आत्महत्येच्या समस्येबद्दल सर्वसाधारण माहिती साधनाच्या प्रबुद्ध वाचकवर्गाला व्हावी, या हेतूने.

आत्महत्या हे जगभरात मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. जगातील सर्व मृत्यूंपैकी साधारणतः 1.5 टक्के मृत्यू हे आत्महत्येमुळे होतात. ही प्रचंड मोठी संख्या आहे.

आत्महत्येच्या समस्येला वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक, धार्मिक, आर्थिक, वैद्यकीय असे अनेक पैलू आहेत. हा एक कॉम्प्लेक्स विषय आहे. पण एका बाबतीत मात्र जगभरच्या संशोधकांत एकमत आहे की, आत्महत्येमागे अनेकदा मानसिक आजार कारणीभूत असतात. जागतिक आरोग्य संघटनाही (WHO) आत्महत्येमागे मानसिक आजार हे सर्वांत महत्त्वाचे कारण मानते. ह्याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे असे-

1. डिप्रेशन, दारूचे व्यसन, स्किझोफ्रेनिया इत्यादी आजारांमध्ये आत्महत्येचे प्रमाण खूप अधिक असते. या आजारांवर जर योग्य उपाय वेळीच झाले, तर अनेक आत्महत्या थांबवल्या जाऊ शकतात.

2. डिप्रेशनचा आजार हा इतर वैद्यकीय आजारांसारखा आहे. हा मज्जासंस्थेचा आजार आहे. यात काही वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक कारणे असली तरी मूळ आजार हा मेंदूत होणाऱ्या बदलांमुळे होतो.

3. डिप्रेशन हा आजार आणि रोजच्या आयुष्यात येणारी दुःखे, नैराश्य या दोन भिन्न गोष्टी आहेत. लक्षणांच्या आधारावर डॉक्टर यांतील फरक ओळखू शकतात.   पश्चिमेकडील देशांत साधारणतः जनरल प्रॅक्टिशनर्स, फॅमिली फिजिशियन्सच डिप्रेशनचे निदान व प्राथमिक उपचार करतात.
डिप्रेशनच्या आजाराला कारणीभूत पंधराएक जनुके शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहेत. मधुमेहाच्या आजारावरसुद्धा आहार-विहार-जीवनशैली आदी बाबींचा परिणाम होतो. तसेच ह्या आजाराचे आहे.

4. डिप्रेशनसारखे आजार कुणालाही होऊ शकतात. त्यात व्यक्तिमत्त्व किती कणखर आहे, याचा फारसा संबंध नसतो. डॉक्टरही समाजाचेच अंग असतात आणि त्यामुळे दुर्दैवाने काही डॉक्टरांमध्येही मानसिक आजारांबद्दल गैरसमज असतात. अत्यंत गंभीर डिप्रेशनच्या आजारातून उपचारानंतर बरे झाल्यावरही एखादा डॉक्टर म्हणतो की- मी मेंटली इतका स्ट्राँग आहे, मला हा आजार झालाच कसा? मानसिक आजार हे स्वभावाशी-व्यक्तिमत्त्वाशी संबंधित नसतात, तर इतर वैद्यकीय आजारांसारखे असतात, ही जाणीव हळूहळू वाढीस लागली आहे. त्यामागे नवनवीन सबळ शास्त्रीय आधारही मिळत आहेत.

5. डिप्रेशन एक आजार म्हणून ओळखल्याने व त्यावर त्वरित योग्य उपाय केल्याने अनेक आत्महत्या टाळल्या जाऊ शकतात.

6. आत्महत्येचा विचार आल्यास तो जवळच्या व्यक्तींशी शेअर करणे, तसेच लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. डॉक्टर मग त्यामागे डिप्रेशनसारखा आजार आहे का, हे तपासून बघतात.

7. आपल्या परिचितांमध्ये कुणीही ‘आयुष्याला कंटाळलो/कंटाळले बघ’ किंवा ‘जगावेसे वाटत नाही’ असे म्हटले तर त्यांना आत्महत्येच्या विचारांबद्दल जरूर विचारावे. असे प्रश्न विचारल्याने आत्महत्येची शक्यता वाढत नाही, तर कमी होते. त्या व्यक्तीला आपली स्थिती कुणी समजावून घेते आहे, असा आधार वाटतो. अशा व्यक्तीला संबंधित डॉक्टरांकडे लगेच जाण्यास प्रोत्साहित करावे.

कुणीही प्रसिद्ध व्यक्ती आत्महत्येला बळी पडली की, त्यामागे सर्व प्रकारची चर्चा सुरू होते. त्यात अनेकदा खरी कळकळ असते, दुःख असते, मानसिक धक्का असतो. कधी अनेकांना जीवनविषयक तत्त्वज्ञानावर चर्चा करायची संधी मिळते. यातील काही चर्चा सवंग असते. अनेक कॉमेंट्‌स तर सर्वथा अनुचित असतात. काही जण ह्याला ‘ती व्यक्ती पराभूत झाली’ असे जजमेंट देतात. कधी कुणी त्यावर राजकीय पोळी भाजून घेतो. अनेक प्रसिद्धिमाध्यमांना सत्यापेक्षा लोकांना काही तरी भंपक देण्यात रस असतो, कारण खऱ्या-खोट्या स्कँडल्समुळे टीआरपी वाढतो.

साधना हे विज्ञानाची कास धरणारे वैचारिक साप्ताहिक आहे. त्यामुळे त्याच्या वाचकवर्गाला आत्महत्या आणि मानसिक आजारांच्या संबंधांची माहिती असावी, असे वाटते.

पुनःश्च कुण्या एका व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबद्दल कुणी सायकिॲट्रिस्ट सार्वजनिक चर्चा करत नाहीत. ते योग्यही नाही. येथे ह्या दुःखद घटनेच्या निमित्ताने आत्महत्या ह्या मानवतेपुढील एका ज्वलंत प्रश्नाच्या मेडिकल पैलूबद्दल वाचकांचे थोडे प्रबोधन व्हावे, एवढाच हेतू आहे. आशा ही की, आत्महत्येच्या मागे डिप्रेशनसारखा आजार कारणीभूत असू शकतो, ह्या ज्ञानामुळे सामान्य वाचकही एखादी आत्महत्या टाळून कुणाचा जीव वाचवू शकेल.

डॉ. धनंजय चव्हाण
---
आत्महत्या ही केवळ त्या व्यक्तीची कृती नसते...

‘तुमची सारी नैतिकता तुम्ही प्रथम कशाला प्राधान्य देता यावर अवलंबून आहे’, अशी गांधींची धारणा आहे. त्यांनी सर्व शासन-शोषणांच्या विरोधात जो संघर्ष उभा केला, त्याला अहिंसेचे पथ्य संगितले. त्याला साध्य न मानता साधन मानले. ती अन्यायाच्या विरोधात संघर्षशील व सक्रिय बनते. (129)

महात्मा गांधींची विचारसृष्टी - काही अलक्षित पैलू, यशवंत सुमंत, साधना प्रकाशन, 2016  

Non-violence, to be a potent force, must begin with the mind. (202)

Timeless Inspirator - Reliving Gandhi, Editor : Raghunath Mashelkar (Museum of Tolerance- Gandhi : An American Perspective) It is most possible that anyone reading these two quotes would think the following write-up would be about M.K. Gandhi and non-violence. But that is not the case, though these two quotes have guided me to process the suicide of Dr. Sheetal Amte and the subsequent editorial in weekly Sadhana.

I am not writing this to express or speculate why Sheetal committed suicide. It is beyond my knowledge sphere - Neither I knew Sheetal, never met her in fact, though I have visited Anandwan, Lokbiradari, Somnath twice (I was one of the participants of श्रम संस्कार छावणी in the year 2001 and later been there with my brother), nor am I a student of human Psychology. But I grieve for Sheetal, not just her, for all those who commit suicide for one reason or another. 

ही आत्महत्या आणि साधनातला संपादकीय लेख हे एक निमित्त आहे माझ्या ह्या लिखाणाला. 

I realised, suicide is the violence done by the individual to his/her mind and body. But it is not just an individual act, in this act of violence the main culprit is the individual's surrounding, the society, आपण सर्व.

आपलं काही सगळ्यांशी जमत नसतं आणि सगळ्यांचे आपण आवडतेही नसतो. तसेच आपल्या सर्वांच्या काही ना काही दुखऱ्या नसा असतात, irrespective of who we are, what we represent, etc. या दुखऱ्या नसा सहन करण्यासाठी त्यांना शांतपणे, खंबीरपणे सामोरे जाणे गरजेचे असते. त्यासाठी सगळ्यांना support system  ची गरज असते. ही support system  आपल्या कुटुंबाची, मित्र-मैत्रिणींची, आपल्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांची, पुस्तकांची, काही आदर्शांची, मूल्यांची- कशाचीही असू शकते. (नकारात्मक support system बद्दल मी नाही बोलत आहे-addictions) काहीही समस्या आली, तरी एक ठिकाणा विसाव्याचा असणं फार गरजेचे आहे. असा विसावा एखाद्या व्यक्तीला समाज जर देऊ शकत नसेल, तर ती समाजाने व्यक्तिप्रती केलेली हिंसा ठरावी. 

संस्था माणसांना मोठं करतात तसेच माणसांमुळेही संस्था मोठ्या होतात. पण संस्था माणसांशिवाय कशा वाढतील, टिकतील? माणसाला सांभाळायचं काम संस्थांनी केलंच पाहिजे. Each individual counts/matter. 

शीतल असो, शेतकरी असो- आपल्या हिंसेने त्यांचा बळी घेतलेला असतो; त्यांना support system  आपण दिलेली नसते. कारण अहिंसा आपण आपल्यापासून सुरू केलेली नसते...

उज्ज्वला देशपांडे, पुणे
---
ते मत वस्तुस्थिती आहे, भाबडेपणा नव्हे!

10 ऑक्टोबरच्या अंकातील अमरेंन्द्र धनेश्वरांच्या श्री.रामचंद्र गुहा यांच्या लेखावर टिपण्णी करताना ‘आंबेडकर हे टिळक किंवा गोखले यांच्याप्रमाणे उच्चवर्णीय होते, असा गांधींचा गैरसमज झाला होता...’ हे मत भाबडेपमाचे असल्याचे श्री.माधव ढेकणे यांनी दि. 26 डिसेंबरच्या साधना अंकात म्हटले आहे. पण वस्तुस्थिती तशीच होती, हे डॉ.य.दि.फडके यांनीही ‘डॉ.आंबेडकरांचे मारेकरी : अरुण शौरी’ (लोकवाङ्‌मय गृह, पहिली आवृत्ती 14 एप्रिल 1999, पृ.63-64) या आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. 

‘1932 मध्ये गांधीजी येरवडा तुरुंगात असताना दि.1 एप्रिल रोजी डॉ.आंबेडकरांचा विषय निघाला तेव्हा गांधीजी महादेवभाई देसाईंना म्हणाले, मी इंग्लंडला जाईपर्यंत आंबेडकर हरिजन आहेत हे मला माहीत नव्हते. हरिजनांच्या प्रश्नांबद्दल विलक्षण आस्था असलेले ते एक ब्राह्मण आहेत आणि म्हणून ते असे अतिरेकी बोलतात अशी माझी समजूत होती.’ य.दि. म्हणतात ‘महादेवभाईंनी रोजनिशीत नोंदवलेले गांधीजींबरोबरचे संभाषण वाचले म्हणजे आंबेडकरांसारख्या मुंबई प्रांतातील नेत्याविषयीचे महात्मा गांधींसारख्या अखिल भारतीय कीर्तीच्या नेत्याचे गाढ अज्ञान पाहून धक्का बसल्याशिवाय राहत नाही.’ 

गांधीजी व श्रेष्ठ कादंबरीकार हरिभाऊ आपटे यांच्यातील शाब्दिक चकमकीचीदेखील या बोलण्याला पार्श्वभूमी होती.

वासंती फडके, मुंबई
----
डॉ. रखमाबाई यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन व्हायला हवे!

संदेश प्रभुदेसाय या शोधपत्रकाराच्या (19 डिसें.20 च्या अंकात) ‘आनंदीबाई ...ते कमला हॅरिस’  या लेखात डॉ. रखमाबाई राऊत यांचा यथोचित केलेला सन्मान्य समावेश न्याय्यच, प्रथमच असे घडलेले पाहण्यात आले. हा शोधपत्रकारितेचा सन्मान म्हणायचा का?

1) डॉ. रखमाबाई राऊत यांचे वैशिष्ट्य असे की, संपूर्ण वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांंनी तहहयात प्रॅक्टीस केली. अग्रणी स्त्री प्रॅक्टिसिंग डॉक्टर!!

2) स्वत:चा झालेला बालविवाह नाकारून प्रसंगी त्यासाठी कोर्टात लढत देऊन त्या यशस्वीही झाल्या. कर्मठ समाजाचा व नेत्यांचाही जाहीर विरोध असतानाही... बालविवाहाची क्रूर (आठ-दहा वर्षांची मुलगी नि 70 वर्षीय पुरुष) प्रथा कायदेशीररीत्या बंद करण्याचा मार्ग सुकर... हे मोठे योगदान मान्य करावेच लागते. डॉ. रखमाबाईंचे वडील मुंबईचे प्रसिद्ध डॉ. राऊत यांचा भक्कम पाठिंबा हेही त्यांचे मोठे बळ होते.

3) इतके असूनही डॉ.रखमाबाई इतक्या अनुल्लेखित उपेक्षित का राहिल्या? समाज राजकारणात, अभिजन-बहुजन या दरीतील ती एक स्ट्रॅटेजी म्हणून अशा या काळोखाच्या लेकी! गुगलने रखमाबाईंचे फोटो दिले आहेतच. ‘टाइम्स आफ इंडिया’मध्ये अनेक स्त्री-प्रश्न व  स्त्री-शिक्षणावर सातत्याने डॉ.रखमाबाई लेखन करीत हे लेखकाने मांडले आहेच. परंतु आनंदीबाई केवळ एकट्याच नव्हत्या, त्यांच्याच वयाच्या रखमाबाईही.... अशी मार्मिक केलेली जोडणीतील समर्पकता त्यांच्या लेखनशैलीत आहे.

याच अंकात ‘गांधीजींचे गारुड’ या सदरामध्ये ‘प्रेमा काय देऊ तुला’ हा सिद्धहस्त अधिकारी संजीवनी खेर यांचाही लक्षणीयच लेख. गांधीजींनी कार्यकर्त्यांची उद्दिष्टे कशी हवीत, हे परखडपणे सुस्पष्ट, प्रेरकतेने कसे मांडले हा मला यातील महत्त्वाचा भाग वाटतो. त्यानंतर प्रेमाताईंनी निरंतर सामाजिक कार्यात जीवन समर्पितच केले हे सर्वश्रुतच आहे. वैयक्तिक पातळीवर त्यांच्या सहवासात मी होतेच. पण पुढेही लग्नानंतर आम्हीही उभयतांनी त्यांच्या मायेतील मैत्र हसत-खेळत विनोदाने मुक्तपणे अनुभवले.

मला आता तर वाटते की, डॉ.रखमाबाईंवरील या प्रदीर्घ सामाजिक अन्यायाचे परिमार्जन व्हायला हवे. एखाद्या मोठ्या मेडिकल संस्थेस या सेवाव्रती डॉ.रखमाबाई राऊतयांचे नाव दिले जावे. डॉ.रखमाबाईंची लढाऊ व झंजार वृत्तीही विशेषत: मुलींना प्रोत्साहकच ठरावी.

वृन्दाश्री दाभोलकर, सातारा
----
साधनाविषयी मित्रांना सांगताना अभिमान वाटतो...

साधनाच्या पहिल्या अंकापासून मी साधनाशी जोडलेला आहे. राष्ट्र सेवादलात एस.एम.अण्णा आणि प्रधानमास्तर यांच्या खूळ जवळ जाण्याचे भाग्य मला लाभले. मी कॉलेजात असताना संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू होता. एस.एम.अण्णांनी मला गुजराथी स्त्री-पुरुषांना बरोबर घेऊन मोर्चा काढून सत्याग्रह करण्यास सांगितले होते.

मी विवेकानंद शिक्षण संस्थेत आजन्म अध्यापन केले. त्या संस्थेच्या तीन महाविद्यालयांचा प्राचार्य होण्याचा योग माझ्या आयुष्यात आला. तळमावल्याच्या कॉलेजची सुरुवात करताना प्रधानमास्तर आणि माझे बंधुतुल्य ज्येष्ठ मित्र यदुनाथ थत्ते यांचे मला फार मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तळमावल्याच्या खडकाळ डोंगरावर आम्ही शेकडो झाडे लावली. हे सर्व ‘तळमावल्याचे दिवस’ या माझ्या पुस्तकात मी दिलेले आहे. मध्यंतरी ‘अंतर्नाद’ मासिकाने गेल्या 25 वर्षांतील सर्वोत्कृष्ट 10 पुस्तकांत त्याचा समावेश केला होता.

हे सारे सांगण्याचे कारण वेगळे. त्यामुळे मी सेवानिवृत्त झाल्यावर प्रधानमास्तरांनी साधनाचे पुस्तक प्रकाशन मला बघायला सांगितले होते. काही काळ हा विभाग समर्थपणे कार्यरत ठेवल्यावर, तरुणांचा सहभाग हवा आणि साधनाचा संपादक आणि पुस्तक प्रकाशन विभाग एकाच तरुणाकडे हवा म्हणून मी प्रधानमास्तरांना सांगून नरेंद्रला तो विभाग कार्यरत ठेवण्यास सांगितले. पुढे नरेंद्रचा अचानक, अकल्पित, अवेळी झालेल्या मृत्यूनंतर साप्ताहिक व प्रकाशन यांचे काय होणार ही काळजी काही दिवस मनात होती. मात्र आपण ती जबाबदारी फार सहजपणे आणि उत्कृष्टपणे सांभाळली. आता तर साधनाने कात टाकली आहे असे वाटते. आपण एकापाठोपाठ सरस अंक काढत आहात. आपण साधनाला एक नवी उंची प्राप्त करून दिली आहे. ‘लोकशाही समाजवाद’ म्हणजे ‘शंभर फुले फुलू देत’ हा विचार राष्ट्र सेवादलात आमच्या मनावर वज्रलेप करण्यात आला होता. मला सध्याच्या अंकातील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे आपण वेगळ्या विचारांना योग्य तेवढी जागा देता, त्यामुळे ते विचार अस्पृश्य न मानता समजावून घेऊन त्यांचा प्रतिवाद आपण करतो. त्यानंतर योग्य, संयमित शब्दांत त्यांचा प्रतिवाद करून आपली वैचारिक बैएक त्यांना समजावून देऊ शकतो. प्रभाकर देवधर यांच्या लेखावरची तीन पत्रे आणि विनय हर्डीकर यांना सडेतोड पण संयमी शब्दांत आमचे ज्येष्ठ नेते पन्नालाल सुराणा यांनी दिलेले उत्तर हे याचे वस्तुपाठ आहेत. लोकशाही समाजवाद हा झापडबंद प्रवास नाही. ‘शंभर फुले फुलू दे’ हे आज साधनाच्या व्यासपीठावर दिसतंय, याचा खूप आनंद होतो.

आणखी एक सांगावेसे वाटते. आणीबाणीत साधना सुरू होती, कोविड-19 च्या टाळेबंदीतही आपण साधना सुरू ठेवलीत. त्यामुळे वयाची नव्वदी गाठण्यासाठीचा प्रवास सुरू असलेल्या माझ्यासारख्या अनेकांनी संगणक समजावून घेऊन अंक वाचायला सुरुवात केली. आम्ही संगणकसाक्षर झालो! आणि त्यानंतर आपण पुन्हा अंक छापून आमच्याकडे पाठवलेत. अर्थातच, अंक हातात घेऊन वाचण्याचा आनंद काही वेगळाच असतो. ज्या समर्थपणे या काळात आपण अंक काढलेत त्याचा खूप खूप आनंद झाला. साधना म्हणजे काय हे मित्रांना सांगताना अभिमानही वाटला. बालअंक, कुमारअंक, दिवाळी अंक एकाहून एक सरस. त्रिवेणी संगम. ‘आंतरभारतीय’ असे हे तीन अंक हिंदीत जावयास हवेतच.

प्रा.पुरुषोत्तम शेठ, सातारा

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके