डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साने गुरुजींच्या नावानं पैसे गोळा करून चालवल्या जाणाऱ्या ‘साधना’त अशा प्रकारचा अविवेकी, अविचारी आणि अज्ञानावर आधारलेला अग्रलेख  प्रसिद्ध व्हावा, हे खरोखरच दुर्दैवी आहे. या अग्रलेखातील ‘नरो वा- कुंजरो वा’ भूमिका असं सरळ दाखवून देते की, आपल्याला या विषयावर स्पष्ट भूमिका घेण्यात अडचण आहे; कारण एक तर या विषयाची पुरेशी माहिती आपल्यापाशी नाही किंवा तेवढी राजकीय धमक दाखवण्याची आपली इच्छा नाही. त्यामुळेच संपूर्ण अग्रलेखात ‘असं झालं तर तसं होईल’, ‘असं झालं तर तसं होणार नाही’, या प्रकारच्या वाक्यरचनांची रेलचेल आहे.

लोकशाही संवर्धकांनी पूर्ण आत्मविश्वासाने चालावे

‘आकसणारी लोकशाही’ या विषयावरील सुहास पळशीकर यांच्या दीर्घ व्याख्यानाला ‘साधना’च्या मागील तीन अंकात प्रसिद्धी देऊन आपण महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकशाहीबद्दलच्या अपेक्षा अनेक देशांतील मध्यम व कष्टकरी वर्गात तसेच दलित, महिला व युवा या समूहांत उंचावल्या होत्या; त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने लोकशाही व्यवस्था समाधानकारक रीतीने काम करत नाही, असे सुहास पळशीकर म्हणतात. तसा अनुभव सत्तरच्या दशकात वाढत्या प्रमाणात येऊ लागला. त्यामुळे ‘लोकशाही उपयोगाची नाही’ अशी भावना पसरू लागली व रुतून बसलेल्या संरचना अधिक जोर धरू लागल्या.

समाजातील पीडित व वंचित समूहांना प्रगती साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुरेशी संधी व त्यादृष्टीने निर्णयप्रक्रियेत स्थान मिळणे हे त्यातल्या त्यात लोकशाही व्यवस्थेतच शक्य आहे. कुठल्याही प्रकारची एकाधिकारशाही सुरुवातीला कितीही आश्वासक वाटली तरी लवकरच रुतून बसलेल्या संरचनांच्या हिताचेच रक्षण करू लागते. याबाबत व्यापक व सतत जनजागृती करत राहणे आवश्यक आहे. लोकांनी अवताराची वाट पाहू नये; जे व्हायचे ते सर्वसामान्य स्त्री-पुरुषांच्या प्रयत्नानेच होणार आहे, असे सतत बिंबवले पाहिजे. लोकशाहीची ऊर्जा जागी ठेवण्यासाठी नव्या सामाजिक शक्ती लोकशाहीच्या समर्थनासाठी सतत उभ्या करणे हे लोकशाहीवादी क्रियावंताच्या पुढचे आव्हान आहे; या पळशीकरांच्या प्रतिपादनाचे सर्व क्रियाशील परिवर्तनवाद्यांनी सतत भान ठेवले पाहिजे. या दृष्टीने पुढील दोन-तीन सूचना मी विचारार्थ मांडत आहे.

1. कुमार व युवा यांच्यात लोकशाहीबद्दलची आपुलकी निर्माण करणे; तिचे संरक्षण व संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे, अशी भावना त्यांच्यात रुजवण्यासाठी विविध उपक्रम व नवनवी माध्यमे  कल्पकतेने शोधली पाहिजेत. ती खर्चिक नसावीत.

2. या प्रकारचे काम करणे हे आपले करिअर बनवणे, मात्र उपजीविकेसाठी कुणावर अवलंबून न राहता आपापल्या कमाईचा मार्ग अवलंबणे गरजेचे आहे, असे पटवून देणे. त्याबाबत व्यवहारिक मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

3. आपले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रस्थापित माध्यमांवर अवलंबून न राहता, छोट्या-छोट्या वर्तुळासाठीची माध्यमे चालवली पाहिजेत. इलेक्ट्रॉनिक/सोशल मीडियाचा उपयोग जरूर करावा, पण त्याची क्षणभंगुरता लक्षात घेऊन लिखित/ मुद्रित साधनांचा वापरही वाढवला पाहिजे. आपापल्या परिसरात महिन्यातून एक स्टिकर किंवा पोस्टर लावणे, एक पानी छापील पत्रक हजार-दोन हजार लोकांपर्यंत पोहोचवणे, अशा गोष्टींचा विचार करावा.

लोकशाही संवर्धकांनी दबल्या पावलांनी न चालता, पूर्ण आत्मविश्वासाने बोलावे व चालावे. नेकी व चिकाटी नक्कीच परिणामकारक ठरतात.

पन्नालाल सुराणा, आसू, उस्मानाबाद

----

अविवेकी, अविचारी आणि अज्ञानावर आधारलेला अग्रलेख

दि. 6 फेब्रुवारीच्या अंकातील ‘शेतकरी आंदोलन : युद्धात जिंकले, तहात हरले? हा अग्रलेख वाचला आणि साने गुरुजी यांचे गीत आठवले...

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान।

शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण।

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील।

एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान॥

कोण आम्हां अडवील, कोण आम्हां रडवील।

अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण॥

शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे।

तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान॥

पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा।

शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण

हे गीत आठवलं. साने गुरुजींच्या नावानं पैसे गोळा करून चालवल्या जाणाऱ्या ‘साधना’त अशा प्रकारचा अविवेकी, अविचारी आणि अज्ञानावर आधारलेला अग्रलेख  प्रसिद्ध व्हावा, हे खरोखरच दुर्दैवी आहे.

या अग्रलेखातील ‘नरो वा- कुंजरो वा’ भूमिका असं सरळ दाखवून देते की, आपल्याला या विषयावर स्पष्ट भूमिका घेण्यात अडचण आहे; कारण एक तर या विषयाची पुरेशी माहिती आपल्यापाशी नाही किंवा तेवढी राजकीय धमक दाखवण्याची आपली इच्छा नाही. त्यामुळेच संपूर्ण अग्रलेखात ‘असं झालं तर तसं होईल’, ‘असं झालं तर तसं होणार नाही’, या प्रकारच्या वाक्यरचनांची रेलचेल आहे.

‘मुळात ट्रॅक्टर हे वाहन दिल्लीच्या स्त्यावरून भरधाव वेगानं  दामटणं, हे आडदांडपणाचं  प्रदर्शन ठरणार, हे उघड होते,’ हे अग्रलेखातील वाक्य तर आपल्याला 26 जानेवारीला काय घडलं, याची अजिबात जाणीव नाही आणि प्रत्यक्षात माहिती मिळवायचा आपण काहीही प्रयत्न केलेला नाही, हे दर्शवणारं अज्ञानमूलक विधान आहे.

एके काळी आणीबाणीविरुद्ध खंबीर लढा देणाऱ्या ‘साधना’ची गणना आता ‘गोदी मीडिया’ तर होणार नाही ना, ही शंका मनात यावी, असा हा अग्रलेख आहे.

प्रकाश बाळ, ठाणे

----

तोपर्यंत ग्रामीण जनतेला चांगले दिवस येणार नाहीत!

दि.30 जानेवारीच्या साधना अंकात श्री.रमेश जाधव यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. तीन कृषी कायदे चांगले आहेत की शेतकरीविरोधी आहेत, हे आम्हा शहरवासीयांना कळेनासे झाले आहे. भाजप आणि विरोधी पक्ष जे सांगत आहेत ते त्यांच्या सोयीप्रमाणे. म्हणूनच आम्हा शहरवासीयांना कृषिसमस्या आणि कृषी कायदे यांचा संबंध समजून घेणे आवश्यक आहे, ते समजून घेताना पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन न ठेवता स्वतंत्र विचार करावा लागेल.

शेती हा आपल्या देशातील कोट्यवधी कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा एकमेव किंवा सर्वांत महत्त्वाचा व्यवसाय आहे. शेती करणाऱ्या कुटुंबांचा कोणीही वाली नाही. त्याहून दुर्दैवाची बाब अशी की, त्यांचे प्रतिनिधी म्हणून जे शेतकरी आज कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत ते या बहुसंख्य छोट्या शेतकऱ्यांचे, म्हणजेच अल्पभूधारकांचे प्रतिनिधी आहेत का, हा प्रश्न विचारला गेलाच पाहिजे. माझ्या मते आंदोलन करणारे वेगळे आहेत आणि छोटे शेतकरी पूर्णपणे वेगळे आहेत.

शेतकऱ्यांच्या सध्याच्या समस्यांचे उत्तर कायदे बदलण्यात नाही तर नव्या विचारांना सामोरे जाण्यात आहे. या बद्दल मला इतर काही मांडावायचे आहेत ते असे-

आजही शेतकरी आंदोलन तोडग्याविना एका कोंडीत सापडले असे दिसते आहे. या आंदोलनात एक जाणवणारी बाब म्हणजे, काँग्रेस आणि युपीएमधील इतर राजकीय पक्षांची भूमिका प्रामाणिक नाही. या आंदोलनाचा राजकीय फायदा  कसा  करून घेता येईल, एवढाच अतिशय छोटा विचार हे पक्ष करत आहेत. केंद्रातील भाजप सरकार अडचणीत आले आहे, एवढ्यावर या राजकीय पक्षांचे पुढारी समाधानी आहेत. कदाचित, या पुढाऱ्यांना  आपल्या देशात छोटे शेतकरी बहुसंख्य आहेत याची जाणीव दिसत नाही. याचा एक अर्थ असा की, या छोट्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी या पक्षांची बांधिलकी नाही. 

माझे असे ठाम मत आहे की- जोपर्यंत आपल्या देशातील छोट्या शेतकऱ्यांचे प्रश्न पूर्णपणे वेगळे आहेत हे  मान्य होत नाही आणि जोपर्यंत त्यांच्यासाठी ठोस कार्यक्रम राबवले जात नाहीत, तोपर्यंत आपल्या देशातील ग्रामीण जनतेला चांगले दिवस येणार नाहीत.

छोट्या शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम राबवले जावेत, यासाठी मध्यमवर्गीय शहरवासीयांनी जागरूकपणे प्रयत्न केले पाहिजेत. छोट्या शेतकऱ्यांचे आणि शहरवासीयांचे हित एकमेकांना समजून घेण्यात आणि एकमेकांना साहाय्य करण्यात आहे.

नरेंद्र महादेव आपटे, पुणे

----

त्याचे सुरेख विश्लेषण करणारा लेख हवा!

साधना दिवाळी अंकातील स्वामी अग्निवेश यांच्यावरील विनय हर्डीकर यांचा लेख वाचला. आवडला. त्या निमित्ताने मा.शरद जोशी ह्यांचेही काही गुणावगुण माहीत झाले. स्वामीजींच्या वैचारिक गडबडीवर लिहिताना समाजवाद आणि समाजवाद्यांच्या वैचारिक गोंधळावर या लेखात जे भाष्य आले, ते अधिक भावले. असे परखड विश्लेषण करणे आणि ते साधनामध्ये छापून येणे यासाठी लेखकाबरोबर साधनाकारांचेही कौतुक... अन्यथा जर कोणाविषयी काही विरोधात बोललं तर.... बापरे... असो.

1920-25 च्या सुमारास भारतात राजकीय सुरुवात करणारे कम्युनिस्ट व  समाजवादीही आज  नावापुरते उरले आहेत. तर त्याच सुमारास सुरुवात करणाऱ्या दुसऱ्या एका संघटनेने ‘आम्ही सांस्कृतिक संघटना आहोत, राजकीय नाही’ असं सांगत आज संपूर्ण देश व्यापला आहे. हे असे का घडले यावर एक सुरेख विश्लेषण करणारा लेख हर्डीकरांनी लिहावा ही विनंती. ‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा’ हे श्री. मिलिंद चंपानेरकराचे (मूळ लेखक- प्रफुल्ल बिडवई) पुस्तक वाचल्यापासून ह्या विषयावर कोणा अभ्यासू स्पष्टवक्त्या विश्लेषकाने लिहावे, असे वाटत आले आहे.

शुभानन आजगांवकर, ठाणे

----

तीनही बिंदूंमध्ये समन्वय व त्रिकोण हवा!

‘कोणाच्या खांद्यावर कोणाची बंदूक?’ हा रमेश जाधव यांनी लिहिलेला (30 जानेवारी अंकातील) विश्लेषणात्मक लेख शेतकरी आंदोलनाबाबतची दशा आणि दिशा यावर प्रकाश टाकणारा आहे. नवीन कृषिविधेयके सरकारने संमत करून ज्या पद्धतीने आणि धिसाडघाईने हे कायदे झाले, त्या अनुषंगाने या विषयाचे राजकारण झाले आणि आंदोलनाने उग्र रुप धारण केले हे पाहता, सर्वमान्य तोडगा नजीकच्या काळात निघण्याची शक्यता धूसर दिसते. न्यायपालिका, संसद आणि बळीराजा या तीनही बिंदूंमधला समन्वय व त्रिकोण योग्यरीत्या आणि समंजसपणे साधला गेल्यास या विषयावर धगधगणारी आग शांत होऊ शकते. या तिन्ही यंत्रणानी तडजोडीने मार्ग काढणे देशहिताचे ठरेल.

ॲड्‌. नकुल पार्सेकर, सिंधुदुर्ग

----

‘गांधींचे गारुड’ पुस्तकरुपात यावे...

साधना अंकांचा वार्षिक सभासद असल्याने सर्व अंक वाचायला मिळतात. प्रत्येक अंक वाचनीय असतो. साधनात प्रसिद्ध होणाऱ्या काही सदरे नंतर पुस्तकरूपाने प्रसिद्ध होतात. सतीश बागल यांनी लिहिलेली चीनवरची लेखमाला पुस्तकरूपाने येत आहेच. तर ‘गांधीचे गारुड’ ही संजीवनी खेर यांची लेखमाला (मागील अंकात समाप्त झाली) सुद्धा पुस्तकरूपाने आणावी.

मनोहर जोशी, मुंबई

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके