डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रकाशन समारंभातील प्रास्ताविक व सूत्रसंचालन करणारे संपादक- विनोद शिरसाठ, लेखक- अतुल देऊळगावकर, प्रमुख पाहुणे- आसाराम लोमटे व अध्यक्षीय मनोगत व्यक्त करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर या सर्वांची भाषणे अतिशय मुद्देसूद, आटोपशीर व अभ्यासपूर्ण होती. प्रास्ताविकात संपादकांनी मुलाखतीच्या संदर्भात सांगितलेले (मुलाखत घेणे, मुलाखत देणे व वाचकांनी ती कुठल्याही प्रश्नापासून वाचायला सुरुवात करणे) हे तितकेसे बरोबर वाटत नाही. कारण मुलाखतकर्ता व मुलाखतदाता या दोघांच्याही दृष्टीने या सर्वच प्रक्रिया अधिक अभ्यासाची व गांभीर्याची मागणी करणाऱ्या आहेत. तेव्हा मुलाखत घेणे व देणे याचे इतके सुलभीकरण योग्य वाटत नाही.

मी अनुभवलेला भास्कर

दि.20 फेब्रुवारीच्या साधनातील आसाराम लोमटे यांचा ‘भास्कर चंदनशिव : सर्जनाचा मूल्यगर्भ अविष्कार’ हा लेखकाच्या साहित्य आणि लेखनशैलीने समृद्ध झालेला सुंदर लेख वाचावयास मिळाला. ‘भास्कर’च्या सहवासामधील 1964 ते 68 या महाविद्यालयीन कालखंडामधील ती नयनरम्य चार मला वर्षे आठवली. आम्ही दोघे मराठवाड्यामधील एकाच जिल्ह्यामधील जेमतेम 20 किमी अंतरावर दोन वेगळ्या खेड्यांत राहणारे, मात्र अंबेजोगाईला आम्ही एकत्रच आलो नाहीत तर एका खोलीत दोन भावाच्या नात्याने राहात होतो. फरक एवढाच की, मी विज्ञान शाखेकडे आणि तो कला शाखेचा विद्यार्थी. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात मराठी कथा, कांदबऱ्यांची मागणी करणारे आम्ही कायम वाचनात मग्न असे. भास्कर वाचलेल्या साहित्यामधील अक्षरांच्या नोंदी करून त्या ऋण म्हणून संभाळून ठेवत असे. मी त्यात फारसा रमलो नाही. भास्कर चंदनशिव यांच्या कथा-साहित्याचा पाया येथेच रचला. आसाराम लोमटे यांनी म्हटल्याप्रमाणे चंदनशिव यांच्या साहित्यावर ग्रामीण ठसा आणि आत गाभ्यामध्ये शेतकऱ्यांच्या वेदना आणि त्यांचे हुंकारसुद्धा आढळतात.

लोमटे यांनी त्यांच्या विविध कथासंग्रहाचे अतिशय योग्य मूल्यांकन केले आहे. भास्करची कथा वाचताना अख्खे गाव समोर उभा राहते आणि त्यातील वेगवेगळी माणसे प्रत्यक्ष आपल्याशी बोलू लागतात. कथा जेव्हा तुमच्याशी बोलू लागते, तेव्हाच लेखकाची आतमधील वेदना आपल्याला कळते, हे त्याचे साहित्य वाचताना प्रत्यक्ष अनुभवले नसून जगलेलो आहे.

मराठी पाठ्यपुस्तकातील लेखकांनी प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्यांना भेटावे, या उद्देशाने ठाण्याच्या सरस्वती मंदिर शाळेत मी ‘लेखक तुमच्या भेटीला’ हा उपक्रम 2001 मध्ये सुरू केला आणि भास्करने त्याच्या ‘लाल चिखल’ या कथेने या उपक्रमाचे पहिले पुष्प गुंफले होते. या सुरेख रसाळ कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी त्याला लिहिलेली 100 च्या वर पत्रे वाचून त्या वेळी त्याच्यामधील लेखक विलक्षण हळवा झाला होता.

भास्करची अनेक पुस्तके माझ्या संग्रही आहेत. जेव्हा मला या जिवलग मित्राची आठवण येते, तेव्हा त्याचे पुस्तक पटकन माझ्या हातात येते आणि तो माझ्या जवळ बसला आहे, याचा सतत मला भास होतो. माझ्याही ग्रामीण लिखानामध्ये शेतकरी हा कायम मध्यबिंदू राहिलेला आहे, तेसुद्धा भास्करच्या साहित्य संस्कारामुळेच, फरक एवढाच की, त्याच्या कथेत बोलीभाषेमधून वेदना झिरपत असते आणि मी मात्र डोळ्यांच्या कडा ओलावत थोडा सकारात्मक भूमिकेत असतो. भास्करने अनेक वेळा माझ्या कृषिविषयक लेखांचे दूरध्वनीच्या माध्यमातून कौतुक केले. पुस्तकरूपाने ते प्रसिद्ध करण्याचा आग्रहही धरला, अजून तरी मला ते जमले नाही. गद्देपंचविशीच्या आतील आमची मैत्री आज त्याच्या पंच्याहत्तरीतही अनवट वळणास मराठवाड्याच्या झणझणीत फोडणीसारखी रसरशीत आहे, हेच या पत्रलेखनाचे सार.

डॉ. नागेश टेकाळे, मुंबई

----

स्त्री लेखिकांमध्ये वाढ व्हावी, ही अपेक्षा पूर्ण झाली!

संपादकीयासाठी काही सर्वकालीन तर काही प्रासंगिक विषयांवरील मांडणी पहिल्यासारखीच टिकून असली तरी आता विषय आणि लेखकांची निवड विस्तारली हा ‘साधना’साठी चांगला बदल आहे. पाच वर्षांपूर्वी तुम्ही साताऱ्यात वाचकमेळावा घेतला होता. त्यामध्ये ‘स्त्री-लेखिका साधनात क्वचितच दिसतात, त्यात वाढ व्हावी’ अशी अपेक्षा मी मांडली होती, ती आता पुरी झालेली आहे. काही जुन्या व काही नव्या विशेषत: मुस्लिमधर्मीय लेखिका आता त्यांच्या लेखनातून भेटतात हा योग्य बदल आहे.

रामचंद्र गुहा यांची उणीव मागील दोन अंकांत जाणवली. त्यांचे सदर पुढेही सुरू राहिले तर बरे... गेल्या काही वर्षांमध्ये सुरेश द्वादशीवार यांचे सुंदर लेख वाचायला मिळत होते, यापुढेही त्यांनी अधूनमधून लिहावे असे वाटते.

देशासमोर येथून पुढे अर्थकारण व पर्यावरण हे महत्त्वाचे विषय राहणार आहेत. अर्थकारणावर अधूनमधून साधनात वाचायला मिळते. आपल्या सहयोगी संपादक मंडळात अभय टिळक आहेत, त्यांनी महिन्यातून किंवा पंधरा दिवसांतून एखादा तरी लेख लिहावा असे सुचवावेसे वाटते. सद्य:स्थितीतील राजकीय समस्या, मतस्वातंत्र्याची गळचेपी, खऱ्या लोकशाहीचा होत असलेला संकोच, अतिरेकी हिंदुत्वातून होणारी पोलिसी कारवाई, न्यायव्यवस्थेतील दिरंगाई इत्यादी विषयांचे मर्मग्राही विश्लेषण करून नि:संकोच भाष्य करणाऱ्या सुहास पळशीकरांचे अभिनंदन करावेसे वाटते. अलीकडेच रमेश जाधव यांचे शेतीच्या समस्यांवरील लेख, प्रतापसिंह साळुंके यांचे न्यायव्यवस्थेवरील लेख, सतीश बागल यांचे चीनमधील बदलांची लेखमाला, दत्तप्रसाद दाभोळकरांनी केलेली वाचनीय पुस्तकांची समीक्षा या सर्वांचे आम्ही स्वागत करतो.

विनय हर्डीकर यांचे लेख व दत्ता दामोदर नायक यांची प्रवासवर्णने हे चांगले बदल आहेत. प्रतिसाद सदरात सर्व तऱ्हेच्या मतांना खुलेपणाने प्रसिद्धी मिळते. समाजवादी धोरणांचा डिफेन्स पन्नालाल सुराणा करतात आणि स्त्रीहक्काबदल जागृत असणाऱ्या श्रीमती वृंदा दाभोळकर यांचे अधूनमधून येणारे प्रतिसाद इत्यादी बदलांमुळे साधना दर्जेदार बनली आहे.

रमेश आगाशे, सातारा

----

रंजन गोगोई यांचे अचंबित करणारे विधान!

दि. 27 फेब्रुवारीच्या साधनातील ‘इंडिया टुडे’ कॉन्क्लेवमधील गोगोई यांची मुलाखत वाचली. देशाचे माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा सदस्य रंजन गोगोई यांनी ‘मी न्यायालयात जाणार नाही; तेथे न्याय मिळत नाही’, असे अचंबित करणारे विधान  केले आहे. आजमितीस साडेपाच कोटींहून अधिक खटले देशातील विविध न्यायालयांत ‘न्याया’च्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांनी आपली संपूर्ण हयात न्यायदानाच्या प्रतिक्षेत घालवली आहे- घालवत आहेत. पण त्यांच्या या निकालातून खरंच ‘न्याय’ मिळतो का, असा प्रश्नही उपस्थित होतोच. सर्वसामान्य माणूस मोठ्या विश्वासाने आणि आशेने न्यायालयाची पायरी चढत असतो, त्याचा विश्वास न्याययंत्रणेवरून उडणार नाही, यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण त्यांनी ज्या पद्धतीने हाताळले, यावरून त्यांना ‘न्याय’  मिळाला नाही असे समजायचे का? तसेच राफेल लढाऊ विमाने खरेदी प्रकरण आणि रामजन्मभूमी प्रकरण हे निवाडे त्यांनी ‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री...’ या पद्धतीनेच दिलेले दिसतात. ‘न्यायालयात गेल्यावर पश्चात्तापच हाती येतो’, असे विधान करताना त्यांनी न्यायमूर्ती म्हणून काम करत असताना या व्यवस्थेत बदल व्हावा म्हणून काय पावले उचलली? सीझरची पत्नी ही कोणत्याही संशयाच्या आरोपापासून दूरच असली पाहिजे, हे ज्युलियस सीझर यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. हे जसे सर्वच राजकर्त्यांना लागू आहे, त्याचबरोबर ते सर्वांच्च न्यायालयात सरन्यायाधीशासारखे अत्यंत महत्त्वाचे तसेच जबाबदारीचे पद भूषवणाऱ्या व्यक्तीलाही लागू असायला हवे.

सर्वसामान्य जनतेसाठी न्यायालयाची जागा आजही अगदी धार्मिक उपमाच द्यायची तर, देवाच्या मंदिरासारखी आहे. म्हणूनच तर न्यायालयाला न्यायमंदिर असेही म्हटले जाते. पण माजी सरन्यायाधीशच ‘न्यायालयात न्याय मिळत नाही,’ असे हताश विधान करत असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे दाद मागावी?

बाळकृष्ण शिंदे, बिबवेवाडी, पुणे

----

उदास वातावरणात आशेचे हिरवे कोंब...

‘साधना’मध्ये तीन भागांत प्रसिद्ध झालेला सुहास पळशीकर यांचा लोकशाहीवरील दीर्घ लेख मला आवडला. लोकशाही सध्या जगभरात अभूतपूर्व अशा मंदीचा सामना करत असताना त्यांचे विश्लेषण समर्पक आणि यथार्थ आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

त्या दीर्घ लेखावर मी बरेच दिवस विचार करत होतो. त्यांतील काही महत्त्वाच्या मुद्यांवर थोडक्यात प्रतिक्रिया द्यावीशी वाटते-

अ) ‘तंत्रस्नेही’ पद्धत वापरत लोकांच्या मूलभूत हक्कांवर गदा कशी आणली जात आहे, याचे विवेचन त्यांनी समर्थपणे केले आहे. दमनशाही यंत्रणांनी डिजिटल तंत्रज्ञानाचे सामिलीकरण (कॉ-ऑप्ट करणे या अर्थाने) केले आहे, हे लोकांना कळत-पटत नाही. कारण तंत्रज्ञान हे चांगल्यासाठीच असते, फार तर तटस्थ असते असा लोकांचा गैरसमज असतो. विशेषतः डिजिटल तंत्रज्ञानाने मतस्वातंत्र्याची कवाडे उघडली आहेत, असे लोकांना वाटते. समाजमाध्यमे कंपन्यांनी दमनशाही यंत्रणांबरोबर संगनमत करत या कथित व्यक्तिस्वातंत्र्याचे कसे धिंडवडे काढले आहे, हे काही सांगायला नको. (भांडवलशाहीचा एक अतिशय मोठा भाग ‘पाळतखोर भांडवलशाही’त हल्ली कसा उत्क्रांत होत आहे, याचे उत्कृष्ट विवेचन शोशाना झुबोफ या विदुषींनी केले आहे, ते मुळापासूनच वाचण्यासारखे आहे. भारतातही अंबानी यांनी डिजिटल क्षेत्रात मुसंडी मारली आहे, हा काही निव्वळ योगायोग नाही.)

ब) भांडवलशाहीवर आधारित बाजारसंस्था आणि लोकशाही यांच्या युतीने पाश्चात्त्य जगात शतकभर तरी समृद्धी आणली, महामंदी आणि दोन महायुद्धे पचवली. आता मात्र या युतीला तडे जात आहेत, कारण ही युती सामान्यजनांना मदत न करता निव्वळ मूठभर अभिजनांसाठी कार्यरत असते, या ढळढळीत सत्यामुळे पाश्चात्त्य जगात लोकशाहीवरचे ममत्व झपाट्याने कसे कमी होत आहे, हे मी स्वतः प्रत्यक्षपणे पाहत आहे. (बेझोसचे उदाहरण समर्पक आहे. कोरोनाकाळात बेझोसची संपत्ती 70 बिलियन डॉलर्सनी वाढली. या काळात त्याच्या कंपनीचे 20 हजारहून जास्त कर्मचारी कोविडने आजारी पडले आणि यांतील हजारोंना जेवणासाठी सरकारी मदतीवर अवलंबून राहावे लागले - अमॅझॉनमध्ये नोकरी चालू असताना!)

क) चीनवर अजून लिहिले असते तरी चालले असते असे वाटते, कारण चीनच्या अफाट यशामुळे आफ्रिकन आणि आशियाई देशांना लोकशाहीला पर्यायी असे प्रारूप उपलब्ध झाले आहे. चीनसारखा हुकूमशाही देश कोरोनावर (साथीचा तेथे उगम झाला असला तरीही) मात करू  शकला  आणि अमेरिकेत साधे मुखपट्टी घालावी की नाही, यावर एकमत होत नाही, हा विरोधाभास लोकांनी पाहिला आहे.

लेखाच्या शेवटी विचारलेला प्रश्न विचारप्रवण करणारा आहे, आणि उत्तर न देण्याचा त्यांचा विनय खराखुरा वाटतो. यापुढे माझ्यासारख्या सामान्य वाचकाने उत्तर देणे अनाहुतपणाचे ठरेल. पण तरीही- येत्या दशकात कुठल्याही राजकीय व्यवस्थेला पर्यावरणीय समस्येवर दुर्लक्ष करून चालणार नाही. पर्यावरणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या पक्षांना युरोपमध्ये लक्षणयि यश मिळत आहे. हे पक्ष कुठलाही अपवाद न करता लोकशाहीचे खंदे समर्थक आहेत, हे महत्त्वाचे. आजूबाजूला उदास करणारे वातावरण असताना आशेचे हे हिरवे कोंब दिसत आहेत, हे काही कमी आहे का?

भूषण निगळे, जर्मनी

----

मुलाखत देणे व घेणे याचे इतके सुलभीकरण योग्य नाही!

साधना प्रकाशनाकडून फेसबुक पेजवर प्रकाशित झालेल्या अतुल देऊळगावकर लिखित ‘ऐकता दाट’ या पुस्तकाचा ऑनलाईन प्रकाशन समारंभ पाहिला, आवडला. ऑनलाईन माध्यमाद्वारे एका तासाच्या कालावधीत विविध मान्यवरांच्या सहभागातून अगदी साधेपणाने एखाद्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ किती उत्तमरीत्या करता येतो, याचा चांगला वस्तुपाठच  अनुभवता आला. शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, प्राचार्य व प्राध्यापकांना यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. या प्रकाशन समारंभातील प्रास्ताविक व सूत्रसंचालन करणारे संपादक- विनोद शिरसाठ, लेखक- अतुल देऊळगावकर, प्रमुख पाहुणे- आसाराम लोमटे व अध्यक्षीय मनोगत व्यक्त करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर या सर्वांची भाषणे अतिशय मुद्देसूद, आटोपशीर व अभ्यासपूर्ण होती. प्रास्ताविकात संपादकांनी मुलाखतीच्या संदर्भात सांगितलेले (मुलाखत घेणे, मुलाखत देणे व वाचकांनी ती कुठल्याही प्रश्नापासून वाचायला सुरुवात करणे) हे तितकेसे बरोबर वाटत नाही. कारण मुलाखतकर्ता व मुलाखतदाता या दोघांच्याही दृष्टीने या सर्वच प्रक्रिया अधिक अभ्यासाची व गांभीर्याची मागणी करणाऱ्या आहेत. तेव्हा मुलाखत घेणे व देणे याचे इतके सुलभीकरण योग्य वाटत नाही.

फेसबुक या माध्यमातून एका आठवड्यात हा कार्यक्रम 6272 वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याने विशेष आनंद झाला. अशा माध्यमाच्या साह्याने अधिक काम करायला साधनाला खूप संधी आहे, याची खात्री पटली. हे लक्षात घेऊन साधनाने यापुढे महत्त्वाच्या कार्यक्रमांचे प्रसारण व्हाट्‌सअप, फेसबुक, यू-ट्यूब या समूह संपर्कमाध्यमांद्वारे पुरेशा कालावधीपुरते उपलब्ध ठेवायला हवे. साधनाचे फेसबुक पेज व यू-ट्यूब चॅनेलवरील हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असावा. साधनाने अशा कार्यक्रमात अधिकाधिक तांत्रिक उत्कृष्टता साधून एकाच वेळी खेड्यापाड्यातल्या तसेच जगातल्या सामान्य तसेच असामान्य वाचक प्रेक्षकापर्यंत असे विचार पोहोचवावेत.

प्रा. भागवत शिंदे, श्रीरामपूर, जि.अहमदनगर

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके