1994 चा ‘साधना’ दिवाळी अंक आवडला. इतर दिवाळी अंकांपेक्षा साधना अंक विलोभनीय वाटला. कविता खूप आवडल्या. प्रतिमा इंगोले यांची कथा आणि इंदिरा संत यांचा लेख फार आवडले. साधना साप्ताहिक आम्ही नेमाने वाचीत असतोच.
25 डिसेंबर 93 च्या अंकात ‘साने गुरुजी’ हे 84 साली अमळनेरला दिलेले पु.ल. देशपांडे यांचे व्याख्यान वाचायला मिळाले, वाचताना तर साने गुरुजी स्वतःच बोलताहेत असे वाटले. नकळत गुरुजी व पु.ल. एकरूप झालेत असे जाणवले.
कारण लेखकही महान आणि ज्यांच्यावर लिहिले गेले ते साने गुरुजी तर त्यांच्याहूनही महान. साधनाचे गेले कित्येक वर्षांचे अंक मी बाईंड करून ठेवलेत. त्यात हा अंक अतिविशेष म्हणून ठेवीन.
मल्हार गंगाधर कावळे, हिंगणघाट.
1994 चा ‘साधना’ दिवाळी अंक आवडला. इतर दिवाळी अंकांपेक्षा साधना अंक विलोभनीय वाटला. कविता खूप आवडल्या. प्रतिमा इंगोले यांची कथा आणि इंदिरा संत यांचा लेख फार आवडले. साधना साप्ताहिक आम्ही नेमाने वाचीत असतोच. ‘साधना’ ला नववर्षाच्या शुभेच्छा.
सौ. सिंधुताई देशमुख, अकोला.
नवीन वर्षाची सुरुवात झाली. 1 जानेवारी 1994 'साधना'च्या अंकात ‘देशांतरीच्या गोष्टी’ वाचायला मिळाल्या. त्याचा क्रमांक 1 आहे म्हणजे ही लेखमाला असणार असे समजून जास्तच आनंद वाटला. आपला दुसरा लेख हातात येईपर्यंत पहिला लेख पुन्हा पुन्हा वाचणार असे ठरविले आहे.
अरविंद रानडे, हिंगणे.
'साधना' दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ थोडेसे विचित्र वाटले. रडका चेहरा, विसंगत वाटला. कुसुमाग्रजांचा ‘आदेश’ मात्र खूप भावला. अथपासून इतिपर्यंत लेख, कविता, सर्वच आवडले. अशोक काळे यांची ‘जगायचा हक्क’ प्रतिमा इंगोले यांचा ‘पाखुरवाळा’ ही कथा विशेष आवडल्या. ‘साधना’च्या सर्व लेखकांना, संपादकांना नवीन वर्ष सुख-समृद्धीचे जावो ही सदिच्छा.
कमल दामोदर, ठाणे.
‘साधना’चा दिवाळी अंक प्रसन्न आणि रोचक निघाला आहे. सर्व साहित्य, कविता उत्तम आहेत.
‘श्रीकृष्ण नावाचा पुरुषोत्तम’ हा लेख फारच आवडला. श्री पुं.वर लिहिणे खरोखर अवघड, पण प्रा. बापटांनी त्यावर सहजपणे संदर लिहिले आहे. श्री पुंचा सहवास तर सोडाच पण साधा परिचयही नसणार्या मला या व्यक्तिमत्वाविषयी फार आदरयुक्त कुतूहल होते. आपल्या लेखामुळे श्री.पु. खूप कळले. ‘साधना’चे अभिनंदन.
शंतनू चिंपडे, पुणे.
साधनेच्या मागील एका अंकात श्री. अनिरुद्ध ताम्हणे लिहितात की, 'हिंदुत्वनिष्ठ स.ह.देशपांडे व खुल्या अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते अशोक कोतवाल यांना इतका वाव देण्याचे कारण नाही. त्यांच्या मतप्रचारावर निर्बंध घालावेत- (निदान ‘साधने’ने) कारण 'साधना'ची समाजवादाशी बांधिलकी आहे. असे खुले मतप्रदर्शन ‘साधना’च्या वाचकांना बुद्धिभेद करेल!
‘साधने’चा वाचकवर्ग खरेच जास्त सुविद्य व वैचारिकदृष्ट्या जास्त प्रौढ असतो. एक दोन लेख वाचून वाहून जाणारा नसतो. शिवाय 'साधना' व्यतिरिक्त अन्यही त्याचे बरेच वाचन असते. श्री. ताम्हणे यांना नको वाटणाऱ्या मतप्रचारावर कोठे कोठे निर्बंध घालणार?
‘साधने’ची समाजवादाशी बांधिलकी असेल कदाचित- व ती संपादकीयांत प्रकट होईलच. पण याचा अर्थ समाजवादाशी बांधिलकी असणारेच लिखाण साधनेत यावे, अन्य विचारधारांना स्थान मिळू नये असा होत नाही. ‘साधने’च्या वाचकवर्गाने नक्कीच समाजवादाशी बांधिलकी स्वीकारलेली नाही. सर्व प्रकारच्या विचारधारा त्यांना साधनेतून वाचायला आवडतील. सर्व काही वाचून आपले मत बनवण्यास वाचकवर्ग समर्थ आहे.
‘हिंदुत्वनिष्ठ’, ‘समाजवादी’, ‘आंबेडकरवादी’, ‘परंपरावादी’, ‘मूलतत्त्ववादी’ अशा लेबलांनी माणसाच्या पूर्ण व्यक्तिमत्वाचे आकलन होत नाही, तर त्याचा संकोच होतो. अशा लेबलांचा हळूहळू शिवी म्हणून वापर होऊ लागतो. विचार दाबून टाकण्यासाठी त्याचा हत्यारासारखा उपयोग होतो. म्हणून अशी लेबले लावण्याचा मोह टाळणे योग्य.
सुभाष आठले, कोल्हापूर.
‘साधना’च्या 11 डिसेंबरच्या अंकातील ‘दिगंबर’ हा कै. ना. ग. गोरे यांचा पुनर्मुद्रित लेख वाचला. लेख खरोखरच अप्रतिम आहे. मूर्तिकाराची सहसा कोणी दखल घेत नाही. घेतलीच तर ती अगदी रूक्ष पद्धतीने हा नेहमीचा अनुभव. पण मा. नानासाहेबांनी मात्र आपल्या ललितसुंदर शैलीने गोमटेश्वराइतकीच त्याची मूर्ती बनविणाऱ्या शिल्पकाराची भव्यता समर्थपणे रेखाटली आहे. असा लेख पुनर्मुद्रित केल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
या लेखातील काही त्रुटी जाणवल्या. त्याही देत आहे. कदाचित हे मुद्रणदोषही असू शकतील.
1. मूर्ती ‘गोमतेश्वरा’ची नसून ‘गोमटेश्वरा’ची आहे.
2. शिल्पकाराचे नाव 'अरिष्टनेमी' आहे. 'अरिशिनेमी' नव्हे.
3. लेखाच्या सुरुवातीस उद्धृत केलेली ऋचा ऋग्वेदातील 'पुरुषसूक्ता'तील आहे. तिच्या दुसऱ्या ओळीत 'पुरुषमेवेद सर्व यद्भुत यच्च भव्यम्' असे शब्द हवेत. तर तिसर्या ओळीत उतामृतत्वस्येषानो ऐवजी 'उतामृतत्वेस्येशानो' हवे
4. लेखाच्या शेवटी चौकोनी कंसात उल्लेखिलेल्या शिलालेखातील शब्द 'श्रीचादुंडरायें करवियले गंगराजें सुत्ताले करवियले' असे आहेत. चौकोनी कंसातील दिलेले शब्द बरोबर नाहीत, मुद्रित शब्दांमुळे ('गंगराजसुते करविवली चामुंडराये करवियली') निष्कारण गैरसमज निर्माण होईल. शक्य तर व योग्य वाटल्यास हे माझे पत्र प्रसिद्ध करावे.
रा. पां. निपाणीकर, इस्लामपूर.
मूलतत्त्ववादी, जमातवादी, हिंदुत्ववादी, कडवे मुसलमान एकाच वेळी धर्मनिरपेक्षता, स्त्रीमुक्ती, राखीव जागा, विद्यापीठ नामांतरण इत्यादी निरनिराळ्या सामाजिक व राजकीय प्रश्नांच्या बाबतीत एकसारखी भूमिका का घेतात याचा शोध घेणे उद्बोधक ठरावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस काय किंवा कडवा मुस्लिम काय, स्त्रीमुक्तीच्या विरोधात बोलणारच हे अगदी ठरलेले आढळते. ही मंडळी सरसकट अशी कृपण, अनुदार आणि कोती का असतात? कोणताही जमातवादी आपल्या जमातीतील बांधवाच्या एकजुटीची स्वप्ने बघतो परंतु आपल्याच स्त्रियांना मात्र पारतंत्र्याच्या व मर्यादित स्वातंत्र्याच्या जोखडात जखडून ठेवण्याच्या मताचा असतो. त्याच्या एकंदरच विचारसरणीतील अनुदारता या स्त्रीविरोधी विचाराच्या मुळाशी असावी. एकदा विचारांची बैठक अमुक प्रकारची असली म्हणजे तिचे प्रतिबिंब कळत न कळत जीवनदृष्टीत व जीवनातील इतर प्रश्नांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात पडते.
हिंदू जमातवाद्यांना अभिप्रेत असलेल्या समाजाच्या (हिंदू राष्ट्र) कल्पनेचा आराखडा धार्मिक प्रेरणेतून आकाराला आला आहे. या आराखड्यात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या अर्वाचीन मूल्यांना आपले अंग झाकण्यापुरती देखील जागा नाही. जगातल्या सर्व सुसंस्कृत व विकसित राष्ट्रांच्या समाजरचनेची उभारणी या मूल्यांच्या पायावर झाली आहे. परंतु त्यासाठी धार्मिक बाबींच्या लुडबुडीला सोडचिठ्ठी देण्याचा कटु परंतु हितकारक निर्णय येथील घटनाकारांना घ्यावा लागला आहे. या मानवतावादी व माणुसकीचा भाव उज्वल करणाऱ्या मूल्यांशी वैर बाळगूनच धर्माधिष्ठित समाजाची किंवा राष्ट्रवादाची मनोराज्ये पाहता येऊ शकतात. या मंडळीस अभिप्रेत असणारी समाजरचना स्त्री-पुरुष समतेबद्दल देखील संवेदनाक्षम, हळवी व न्यायशील नसते, हे यावरून कळण्यास हरकत नसावी. या समाजव्यवस्थेत स्त्रीला मानाची किंवा बरोबरीची जागा मिळणे दुरापास्तच. या भूमिकेपोटीच ही यद्ययावत मंडळी आधुनिकतेबद्दल बोटे मोडत असतात व संस्कृतिसंरक्षणाची जबाबदारी प्रामुख्याने स्त्रीची आहे अशी लबाड विधाने करून मोकळे होतात. अशी तथाकथित प्राचीन सांस्कृतिकता जोपासण्याची जबाबदारी एकदा का स्त्रीवार टाकली की आधुनिकतेचे वारे तिला लागणे दुरापास्तच. यातूनच तिच्या गुलामगिरीची अनंतयात्रा सुरू होते. हिंदू जनमानसात असलेली राष्ट्रवादाची कल्पना आणि भारतीय समाजाची किंवा मुख्य राष्ट्रीय प्रवाहाची कल्पना यांत साम्य नव्हे तर विरोधदेखील आहे. स्त्रीमुक्तिवाद्यांचा लढा यासाठीच जमातवाद्यांशी देखील आहे, धर्माधिष्ठित समाजरचनेशी व अशा आंधळ्या, एकतर्फी राष्ट्रवादाशी देखील आहे.
आधुनिकतेशी एकदा काडीमोड घेण्याचे ठरवले की मग लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजाच्या दुबळ्या घटकांबद्दल कणव, स्त्रीस्वातंत्र्याची तरफदारी यांची निरर्थकता, अनुपयुक्तता किंवा विघातकता आढळू लागते.
सतीश तराणेकर, इंदोर.
Tags: साधना साप्ताहिक हिंदुराष्ट्र हिंदुत्ववाद कुसुमाग्रज पु.ल.देशपांडे Sadhana Weekly Hindutwwad Kusumagrj P.L.Deshpande weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या