डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आज मीडियाचा केवढा प्रभाव समाजमनावर आहे. 24 तास बातम्यांचं दळण घालणाऱ्या असंख्य वाहिन्यांनी अक्षरश: धुडगूस घातलाय. तरीही सकाळी उठलं की वाफाळत्या चहाचा कप आणि सोबतीला वर्तमानपत्र यांची जादू काही मनावरून जराही उतरलेली नाही. वर्तमानपत्रातल्या मजकुरातील ‘बिटवीन द लाईन्स’ची गोडी काही वेगळीच आहे. ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’ या लो. टिळकांच्या एका संपादकीय शीर्षकानं ढवळून निघालेला समाज आणि हादरलेली ब्रिटिश सत्ता जोपर्यंत आपल्या लक्षात आहे, तोपर्यंत वर्तमानपत्रीय मजकुराला आणि त्यात दडलेल्या अर्थाला मरण नाही.

26 नोव्हेंबर 2008 या दिवशी मुंबईत जे काही घडलं, त्यानं सारा देश हादरला, मग आमची चिमुकली शाळा, शाळेतली मुलं भयभीत झाली, यात नवल नाहीच. मधल्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर किंवा अगदी शाळा भरण्याआधी सुद्धा, मुलं गटागटानं त्याघटनेवर चर्चा करताना दिसत. कान देऊन या चर्चा ऐकताना, या मुलांच्या बोलण्यात थोड्या अंशी का होईना पण एक प्रकारचा हताशपणा आणि बऱ्याच अंशी कमालीचा कडवटपणा जाणवत असे.

यातून शिक्षकांमध्ये विचारमंथन सुरू झालं. या चर्चांना एकसुसूत्र रूप यावं, मुलांच्या चर्चा अधिक अर्थपूर्ण, आशयघन व्हाव्यात असं तर आम्हा सर्वांना वाटू लागलंच, पण याहीपलीकडे त्यांच्या मनातील गोंधळाचा कानोसा घ्यावा अशी आकांक्षाही वाटली.

हे घडवून आणायचं असेल, तर काम करावं, असा विचार शिक्षक करायला लागले, तेव्हा अर्थातच अनेक माध्यमं कशी वापरावीत यावर संवाद झडू लागले. कोणी सुचवलं की, याविषयातील तज्ज्ञांना, विचारवंतांना बोलावून सांगोपांग चर्चा व्हावी, तर कोणाचं मत पडलं मुलांचा परिसंवाद घडवून आणावा. एका शिक्षकांनी सूचना केली की, मुलांनी नाट्य, गीतं या माध्यमातून आपल्या भावनांचं आणि विचारांचं प्रकटीकरण करावं- आणि या त्यांच्या प्रयत्नात शिक्षकांनी त्यांना साथ द्यावी.

शेवटी एका नव्यानंच रूजू झालेल्या शिक्षिकेनं म्हटलं की, मुंबईतल्या आतंकवादी हल्ल्याची ज्या वर्तमानपत्रांनी अगदी गंभीर नोंद घेतली आहे, ज्यात या घटनांमागच्या वैचारिक घडामोडींचा वेध घेतला गेला आहे, अशी वर्तमानपत्रं मुलांना दिली जावीत. मुलांनी काही दिवस या वर्तमानपत्रांचा सांगोपांग अभ्यास करावा. इंग्रजी वर्तमानपत्रांच्या संदर्भात मुलांना वाचनविषयक अडचणी आल्यास शिक्षकांनी त्यांना मदत तर जरूर करावी परंतु...’

‘परंतु’ असं म्हणून ती तरुण शिक्षिका क्षणभर थांबलीच. आपण नव्यानंच शाळेत रुजू झालो असल्यानं आपण अधिक मतप्रदर्शन करावं की नाही, हे तिला समजेना. परंतु अंमळशानं तिनं घसा खाकरला आणि ती म्हणू लागली, ‘‘शिक्षकांनी मुलांना गेल्या पंधरवड्यातील वर्तमानपत्रातील मजकूर वाचण्यास मदत करावी, परंतु आपली मतं मात्र त्यांच्या समोर व्यक्त करू नयेत. वर्तमानपत्रं वाचल्यावर मुलांना काम वाटलं, हे व्यक्त करण्यासाठी एका परिसंवादाचं आयोजन मात्र जरूर करण्यात यावं.’’

त्या पोरसवदा शिक्षिकेचं ते बोलणं सर्वांनाच पटलं असं दिसलं. मिडीयावर अहोरात्र झळकणाऱ्या बातम्या, त्यावर झडणाऱ्या त्याच- त्याच चर्चा, यांपेक्षा वर्तमानपत्रीय ‘अक्षर’वाङ्‌मयावर सभेतील सर्वांचाच अधिक विश्वास होता असं दिसलं. वर्तमानपत्रं मुलांना दिली जावीत, मुलांनी स्वतंत्रपणे त्यांचा अभ्यास करावा आणि खुलेपणानं आपलं मत प्रदर्शन करावंया विचारावर शिक्कामोर्तब झालं. मुलांच्या कानांवर शिक्षकसभेतल्या या ठरावाचं वृत्त जाताच त्यांनी ही या बाबतीत मोठा उत्साह दाखवून, या कार्यक्रयात  सहभागी होण्याची तयारी दर्शविली.

एकंदरीत एवढी तयारी झाल्यावर, पुढची कामं भराभर झाली. वेगवेगळ्या भाषांतील (हिंदी, मराठी, इंग्रजी, क्वचित गुजराथी)वर्तमानपत्रं जमवणं, त्यातील महत्त्वाची कात्रणं काढणं, ती दिनांकवार लावून ठेवणं अशा कायांची धांदल उडून गेली.

साधारण एका पंधरवड्यानं चर्चेचा दिवस उजाडला. नववी व दहावीची मुलं शाळेच्या मधल्या हॉलमध्ये जमली. सभेला शाळेतील शिक्षक तर हजर होतेच, परंतु शाळेबाहेरील काही पाहुणे मंडळींनीही या कार्मक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती.

परिसंवाद सुरू झाला. सुरुवातीला मुलं शांतच होती. शिक्षकांचं अस्तित्व, पाहुण्यांची हजेरी यांचं त्यांच्या मनावर दडपण आल्याचं स्पष्ट जाणवत होतं. काही वेळ तसाच गेला. हळूहळू मुलं बोलू लागली. चर्चेला रंग चढतोय, एवढेच नव्हे तर अपेक्षित वैचारिकतेनं परिसंवाद आकार घेतोय असं वाटत असताना राहुल नावाचा मुलगा अनपेक्षितरित्या एकदम उभाच राहिला. तो अतिशम उत्तेजित झाला होता. अत्यंत  तावातावानं त्यानं पाकिस्तानवर शाब्दिक हा चढवला. या देशानं फाळणी झाल्यापासून आपल्या देशाचं किती नुकसान केलंय, हे तो मोठमोठ्यानं सांगत राहिला. राहुल बोलत होता, टाचणी पडली तरी आवाज येईल, एवढ्या नि:शब्दतेत, सारं सभागृह राहुलचं म्हणणं ऐकत होतं. अनेक याना संमतीदर्शक हलत होत्या राहुलचं बोलणं संपलं आणि रमजान बोलायला लागला. त्यानं या हल्ल्यातील पाकिस्तानच्या हल्ल्याचा निषेध केला, पण त्याचवेळी अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्यांचा निषेध करणाऱ्या भारतीय मुसलमानांना किती असाहाय्य, असुरक्षित वाटतं याची मीमांसा करामला रमजाननं सुरूवात केली.

रमजान बोलतोय, आपलं म्हणणं मांडतोय, एवढ्यात कोपऱ्यातून एक अस्पष्टसा हुंदका ऐकू आला. सर्वांचेच डोळे तिकडे वळले. कोपऱ्यात रमजानची बहीण नजमा बसली होती. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. आपला हुंदका आवरत पण डोळ्यात भरून आलेल्या अश्रूंना मुक्त वाट करून देत नजमा म्हणाली, ‘‘सगळेजण सारखे पाकिस्तानकडे बोट दाखवता, पण तुमच्याकडे या सगळ्याचा असा कितीसा पुरावा आहे?’’

नजमाचं हे बोलणं ऐकताना सारी सभा तटस्थ झाली. रमजानहा नजमाचा सख्खा धाकटा भाऊ. आपली एवढी शांत मोठी बहीण असं काही बोलते आहे, याचं आश्चर्य त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलं होतं. आपण काय बोलत होतो, याचाच त्याला विसर पडला आणि तो खालीच बसला.

त्यानंतर नजमाशी खूप बोलणं झालं. तिला इतकं अनिवार रडू का कोसळलं, तिच्या शांत आणि संयमी स्वभावाला न शोभणारं आक्रमक असं वागणं तिच्याकडून कसं काय घडलं याचा अंदाज शिक्षकांनी घेतला. या विचार मंथनातून जे हाती लागलं ते विलक्षण होतं. नजमाला अत्यंत असुरक्षित वाटत होतं ते दोन प्रकारांनी. ती जिथं रहात होती, तो भागच मुळात हिंसाचारी. त्यात हे प्रकार घडले. एका विशिष्ट धर्माची प्रतिनिधी म्हणून तर ती घाबरलीच होती, पण तिला खऱ्या अर्थानं भीती वाटत होती, याचं कारण ती मुलगी होती. हिंसाचाराच्या, धर्म विद्वेषाच्या वणव्यात स्त्रीच्या वाट्याला कोणती होरपळ येऊ शकते याविषयी तिनं ऐकलं होतं. चौदा-पंधरा वर्षांची आतंकवादाविषयी संपूर्ण अनभिज्ञ असलेली ती मुलगी आतंकवाद्याच्या संभाव्य परिणायांच्या आशंकेनं तिचं बहरणारं आयुष्य कमालीचं अस्थिर झालं होतं.

वर्तमानपत्रांच्या प्रकल्पानं हे साध्य झालं असं सर्वच शिक्षकांना वाटलं. मुलांनी वर्तमानपत्रं वाचली, त्यावर विचार केला, चर्चा केल्या ... म्हणूनच आम्हा सर्वांना आमच्या एका मुलीच्या मनातली स्पंदनं जाणवली. तिची भीती समजली आणि त्या संदर्भात काही करावंसं वाटलं. राहुलच्या मनातला द्वेष समजला. रमजान, नजमाच्या भूमिकेतील फरकाची कारणं समजली.

कितीतरी वर्षांपासून मला असं वाटत आलंय की, वर्तमानपत्रं हा शिक्षणातला महत्त्वाचा भाग असावा. नेहमीच्या अभ्यासक्रयाची  पुस्तकं आणि वर्तमानपत्रं यांची तुलना केलीतर वर्तमानपत्रं किती छान वाटतात. अगदी लहान मुलांना लिहाय-वाचायला शिकवायचं म्हटलं तरी प्रत्येक पानावर चित्रांची केवढी लयलूट असते. त्या चित्रांना किती शीर्षकं दिलेली असतात. ती चित्रं पहावीशी वाटतात आणि साहजिकच त्या चित्रांखालचा मजकूर वाचावासा वाटतो. जेबाल शिक्षणाविषयी आहे, तेच प्रौढ शिक्षणाविषयीही खरं आहे. प्रौढपणी लिहाय-वाचायला शिकणारे कितीतरी लोक देहभानहरपून वर्तमानपत्रं वाचताना दिसतात.

खरं म्हणजे वर्तमानपत्राइतका वैविध्यानं नटलेला वाङ्‌मयप्रकार विरळाच. अक्षरांचे इतके टाईप अनेक प्रकारचे कॉलम, जाहिराती आणि चित्रं ज्याला जो विषय आवडतो त्या विषयावरचं खाद्य मिळवण्याचं हमखास ठिकाण म्हणजे वर्तमानपत्र.

खूप दर्जेदार पुस्तकं लिहून, साहित्य क्षेत्रात आपल्या लेखणीचा प्रभावी ठसा उमटवणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीनं वर्तमानपत्रीय लिखाणाविषयी मला एक वेगळीच गंमत सांगितली होती. ती म्हणाली, ‘लिखाणाच्या अगदी सुरुवातीच्या काळात माझं लेखनवर्तमानपत्रातून छापून यायचं. संपादकीयाच्या शेजारी एक छोटाकॉलम मला दिला जायचा. ज्या दिवशी लेख छापून येणार असायचा, त्या दिवशी उत्कंठेनं धडधडायचं. वर्तमानपत्र उघडून तिथं आपलं नाव बघितलं की खूप छान वाटायचं. आजही इतकी पुस्तकं प्रसिद्ध झाल्यावर, मागे वळून बघते, तेव्हा छापून आलेले माझे लेख आणि त्यांनी मला दिलेला आनंद म्हणजे सुकलेली बकुळीची फुलंच आहेत असं वाटतं.’

मैत्रिणीचा उल्लेख झाला, त्यामुळे रमाबाई रानडेंची आठवण होणं अपरिहार्यच आहे. लग्नानंतर त्या वाचायला शिकल्या तेव्हा वर्तमानपत्राचा एखादा कपटा वाचायला मिळाला तरी त्यांना ब्रह्मानंद व्हायचा, इतका वर्तमानपत्राचा प्रभाव त्यांच्या मनावर होता.

रमाबाई रानडे शिकल्या त्याला किती वर्षे उलटून गेली, पण आजही या देशात अगणित लोकांच्या घरात वर्तमानपत्र येत नाही. हे ग्रामीण भागात जितकं खरं आहे, तितक्या प्रमाणात नसलं तरी काही अंशी शहरी भागातही खरं आहे. घरी वर्तमानपत्र येत नाही अशी कित्येक कुटुंब आसपास आढळतात. त्यामुळे सहज शिक्षणाची संधी गमावतात. शाळा या संदर्भात सार्वजनिक वाचनालयासारखी खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

आज मीडियाचा केवढा प्रभाव समाजमनावर आहे. 24 तास बातम्यांचं दळण घालणाऱ्या असंख्य वाहिन्यांनी अक्षरश: धुडगूस घातलाय. तरीही सकाळी उठलं की वाफाळत्या चहाचा कप आणि सोबतीला वर्तमानपत्र यांची जादू काही मनावरून जराही उतरलेली नाही. वर्तमानपत्रातल्या मजकुरातील ‘बिटवीन द लाईन्स’ची गोडी काही वेगळीच आहे.

‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’ या लो. टिळकांच्या एका संपादकीय शीर्षकानं ढवळून निघालेला समाज आणि हादरलेली ब्रिटिश सत्ता जोपर्यंत आपल्या लक्षात आहे, तोपर्यंत वर्तमानपत्रीय मजकुराला आणि त्यात दडलेल्या अर्थाला मरण नाही.

Tags: बिटवीन द लाइन्स education renu gavaskar सहज शिक्षणाची संधी शिक्षण रेणू गावस्कर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके