डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दि. 4 जून ते 6 जून रोजी नरेंद्रपूर येथे झालेल्या परिसंवादाचा अहवाल.

भारतीय शासनाच्या क्रीडा विभाग व रामकृष्ण मिशनची नरेंद्रपूर शाखा यांच्या संयुक्त सहकार्याने 'युवा वर्षाबद्दलच्या अपेक्षा' या विषयावर 4 जून ते 6 जून राष्ट्रीय स्तरावर एक परिसंवाद संपन्न झाला.

नरेंद्रपूर हे कलकत्त्यापासून 16 किलोमीटरवरचे, जिल्हा चोवीस परगणा, येथील एक गाव ! रामकृष्ण मिशनच्या तेथील शाखेमुळे या गावाचे महत्व वाढलेले. रामकृष्ण मिशन ही सामाजिक शिक्षण देणारी एक संस्था. गेली 50 वर्षे कलकत्त्यातील झोपडपट्टी भागात, तसेच ग्रामीण भागात विकासाची कामे संस्था करते आहे. तेथील लोकांची दुःखे दूर करून त्यांच्याच ठिकाणी उपलब्ध असलेल्या सामग्रीच्या साहाय्याने विकासकार्यात त्यांना सहभागी करून घेणे हा संस्थेचा मुख्य उद्देश. तसेच शहरी भागातील तरुणांना नियमित प्रशिक्षण देऊन समाजासाठी कार्य करणाऱ्या तरुणांची फळी उभारण्याचे कार्यही संस्थेमार्फत चालते.

3 जूनपासून ओरिसा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आसाम, तामिळनाडू, बंगलोर, गुजराथ इत्यादी भागांतून राष्ट्रीय सेवा योजना व नेहरू युवक केंद्राचे स्वयंसेवक व त्यांचे संघटक यायला सुरुवात झाली. दि. 4 जून रोजी नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी परिसंवादाचे उद्घाटन क्रीडा विभागाचे मंत्री श्री. अशोक घेलाट यांच्या हस्ते व्हायचे होते, परंतु प्रतिकूल वातावरणामुळे ते वेळेवर पोहोचू शकले नाहीत व कार्यक्रम तब्बल दोन तास उशीरा सुरू झाला. मंत्री वाचून दाखवणार होते त्या भाषणाच्या प्रती सर्वांना वाटण्यात आल्या होत्या. त्यातील महत्वाचे मुद्दे असे की, 'शांततेला बाधक ठरणाऱ्या अण्वस्त्रयुद्ध, जातीयवाद यांचा प्रतिकार वैयक्तिक तसेच सामूहिक स्तरावर करायलाच हवा. यासाठी आजच्या युवांकडेच आम्ही आशेने पाहू शकतो. म्हणूनच युवावर्गाचे सहभाग, विकास आणि शांती हे तीन प्रमुख विषय ठेवले आहेत.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्राच्या विकासासाठी ग्रामीण भागांचाही विकास होणे निकडीचे आहे. ग्रामीण भागातील युवांनाही आपण विकासाच्या प्रक्रियेत सामील करून घ्यायला हवे.'

आभारप्रदर्शनानंतर सकाळचे सत्र संपले. संध्याकाळी अमरेश चौधरी व समरेश चौधरी यांच्या गझलगायनाचा कार्यक्रम झाला.

5 जूनला उपस्थितांचे चार गटांत विभाजन केले गेले. प्रत्येक गटाचा एक अध्यक्ष व एक उपाध्यक्ष होता. साधारण 17 ते 20 जण एकेका गटात होते, चर्चेला चालना मिळावी म्हणून डॉ. एस्. एस्. चक्रवर्ती यांच्या निबंधाच्या प्रती वाटण्यात आल्या होत्या. ते म्हणाले, 'कोणत्याही देशाची भरभराट व भविष्य, हे तेथील युवापिढीच्या हातात असते!

महत्त्वाचा प्रश्न हा की, युवा कोणाला म्हणायचे? सर्वसाधारणपणे ज्यांच्यात साहस आहे, धैर्य आहे, उत्साह आहे त्याला आपण युवा म्हणतो.

राष्ट्रीय संकटे आली, तेव्हा तेव्हा येथील युवा पिढीने आपला सहभाग दिलेला आहे, हे खरे असले तरी युवांचा फार मोठा वर्ग असंघटित आहे. त्याला संघटित करणे कठीण असले तरी ते करायलाच हवे!

संयुक्त राष्ट्र संघाने 1979 च्या डिसेंबर मध्ये झालेल्या चौतिसाव्या सभेत 1985 हे युवा वर्ष म्हणून घोषित केले व सहभाग, विकास आणि शांती हे प्रमुख तीन विषय ठेवलेत. युवकांमध्ये शिकण्याची इच्छा व आव्हान स्वीकारण्याची ताकद असल्याने आपल्यासारख्या विकसनशील राष्ट्रात युवांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे. सध्याच्या युवांमध्ये पुन्हा नवीन जोम निर्माण करण्यानेच राष्ट्राचा विकास होईल. विकासाच्या प्रक्रियेत युवांचा सहभाग हवा, तरी आज त्याचा अभाव जाणवतो. त्यांना आपण योग्य तऱ्हेने संघटित केले व त्यांच्या कर्तृत्वावर, ताकदीवर विश्वास ठेवला तर त्यांचा सहभाग निश्चित मिळेल.

भरभराटीसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी 'शांती'ची गरज आहे. या बाबतीत मतभेद असू शकतील. काहींच्या मते जर सर्वत्र 'शांती' असेल तर राष्ट्राची प्रगती न होता लोकांमध्ये आळस निर्माण होईल, यासाठी राष्ट्रात सतत आव्हानात्मक परिस्थितीच हवी! काहींच्या मते 'शांती' ही एक वरवरची कल्पना आहे. या मतमतांतराच्या गलबल्यात 'शांती'चा योग्य दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा.

युवा वर्षासंबंधी दिलेल्या तीनही घटकांत सामंजस्य आहे. शांती आणि विकासासाठी युवांचा सहभाग तर हवाच. युवा वर्षाची उद्दिष्टे कोणती? लोकांना, तसेच युवांनाही त्यांच्या स्थितीविषयी जागरूक करणे. सरकार व ऐच्छिक संघटनांना युवा कल्याणातील त्यांच्या भूमिकेसंबंधी जागरूक करणे, युवांसाठी काही अर्थपूर्ण कार्यक्रमाची आखणी करण्यास सांगणे आदी.

यासाठी अनेक कार्यक्रम हातात घेता येतील. युवा कल्याणाच्या ज्या योजना आहेत त्या योग्य तऱ्हेने लागू करणे, मोठ्या प्रमाणावर युवांना शिक्षण/प्रशिक्षण देणे, शेती, लघु उद्योग, मोठे उद्योग, इत्यादी क्षेत्रांत रोजगारी उपलब्ध होईल अशी परिस्थिती निर्माण करणे, सरकारला एकूण उत्पन्नाच्या 10 टक्के उत्पन्न युवांसाठी राखून ठेवायला भाग पाडणे. 

'या युवा वर्षाकडून -

(1) लोकांमध्ये युवाविषयी जागरूकता निर्माण करणे, 
(2) शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांना युवांविषयी व त्यांच्यासंबंधीच्या कार्यक्रमांबाबत जास्त गंभीरपणे विचार करायला भाग पाडणे, 
(3) जीवनाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील, अशा प्रकारचे शिक्षण/प्रशिक्षण देण्यास विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांना भाग पाडणे, 
(4) एका राष्ट्रातील युवाला दुसऱ्या राष्ट्रातील युवाच्या परिस्थितीविषयी जागरूक करणे व स्वतःच्या आणि राष्ट्राच्या कल्याणातील त्यांची भूमिका कोणती हे सांगणे इत्यादी आमच्या अपेक्षा आहेत.'

एकूण अ, ब, क, ड या चार गटांत विभाजन झाले होते. मी ब गटात होते. आमच्या गटाचे अध्यक्ष श्री. ए. एन. आनंदराम होते. तर उपाध्यक्ष श्री. आर. पंचानंदन, इंग्रजीचे प्राध्यापक तिरुची, हे होते.

युवा वर्षासंबंधीच्या अपेक्षा व्यक्त करताना : 

(1) वैयक्तिक / सामाजिक आरोग्य, 
(2) पोषण, 
(3) विकसित तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोहोचविणे, 
(4) प्रत्येक खेड्यात यूथ क्लबची स्थापना, 
(5) सरकारने यूथ क्लबला मदत करणे, 
(6) रोजगारीची संधी उपलब्ध करून देणे इत्यादी मुद्यांवर भर दिला गेला.

तसेच वैयक्तिक व सामूहिक पातळीवर राबविता येण्यासारखे उपक्रमही सांगितले गेले जसे : 

(1) रक्तदान, चक्षुदान करणे, 
(2) शेजारच्या राष्ट्राची भाषा शिकणे, 
(3) अन्यायाचा प्रतिकार करणे, 
(4) हुंडा न घेणे, 
(5) व्यसनमुक्त असणे, 
(6) सामाजिक परिवर्तनासाठी आवश्यक असलेली मानसिकता निर्माण करणे, 
(6) रूढी, परंपरा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न करणे इत्यादी.

माझ्या गटात मी यदुनाथकाकांनी सांगितलेले दोन महत्वाचे मुद्दे उपस्थित केले,

(1) युवा वर्ष हे युवांना सोडून इतरच लोक साजरे करण्याची शक्यता आहे. तसेच 
(2) युवा वर्ष म्हणत असताना त्यातून युवतींना वगळले जाण्याची भीती आहे. हे दोन्हीही मुद्दे अंतिम अहवालात समाविष्ट केले गेले.

दि. 6 जूनला प्रथम चारही ग्रुप्सच्या चर्चेच्या आधारे एक अहवाल सभेपुढे ठेवला गेला. त्यात प्रामुख्याने पुढील मुद्दे होते :

(1) प्रदूषणाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावून 'वातावरण संरक्षण' ही मोहीम हाती घ्यावी..
(2) रोजगारीसंबंधी विचार करताना अर्ध-रोजगारी व बेरोजगारी यावर स्वयं रोजगार हा तोडगा सुचविण्यात आला. तसेच स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणारे कुटिर उद्योगधंदे हवेत, त्यासाठी लागणारे कौशल्यही शिकवायला हवे.
(3) विकासाचे व्यक्तित्व विकास व सामाजिक विकास हे दोन घटक आहेत. सामाजिक विकासात सर्वसामान्य जनतेला सुशिक्षित करणे, इतरांच्या धर्माचा आदर करणे, हुंडा, अस्पृश्यता, बालविवाह यांसारख्या अनिष्ट रूढी बंद करणे, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव होईल.
(4) अपेक्षित सामाजिक विकास घडून येण्यासाठी शिक्षणाची नितांत गरज आहे. हे जरी खरे असले तरी सद्य शिक्षणपद्धतीत बदल हा आवश्यक आहे. कारण जीवनाच्या मूलभूत गरजा भागविण्याचे सामर्थ्य या शिक्षणात नाही. चार भिंतींच्या आड दिल्या जाणाऱ्या औपचारिक शिक्षणापेक्षा अनौपचारिक शिक्षणावर जास्त भर द्यायला हवा वगैरे.

वरील अहवाल क्रीडा विभागाचे सचिव श्री. गील यांचे स्वाधीन केला तेव्हा एका उपस्थिताने रास्त शंका व्यक्त केली की, या अहवालानुसार शासनाने काहीतरी निश्चित पाऊल उचलावे ही आमची अपेक्षा आहे. नाहीतर इतर वर्षे जशी साजरी केली तीच गत युवा वर्षाचीही होईल. सरकारच्या वतीने मंत्र्यांनी अर्थातच काहीतरी करून दाखविण्याचे आश्वासन दिले.

यानंतर माहिती आणि नभोवाणी खात्याचे उपमंत्री श्री. गुलामनबी आझाद यांनी पाठविलेले व्याख्यान वाचून दाखविण्यात आले. या व्याख्यानातील महत्त्वाचे मुद्दे असे की, 'समाजवाद, लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता, आर्थिक समानता, सामाजिक न्याय, निधर्मवाद ही जी आपली जीवनमूल्ये आहेत त्यांची जोपासना करण्याची जबाबदारी तरुणांवर आहे.

देशाचा विकास व शांती ही तरुणांवर अवलंबून आहे. ज्या प्रमाणात आपण या तरुण पिढीला प्रोत्साहित करू त्या प्रमाणात आपली सामाजिक व आर्थिक वाढ होईल. तसेच देशातील सामाजिक, आर्थिक व्यवस्था सुरळीत असण्यावर देशातील शांती अवलंबून असते. त्यासाठी आपल्या समाजातील भिन्न भिन्न स्तरांवर जगत असलेल्या लोकांच्या जीवनमानात जी तफावत आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

युवा पिढीपुढील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे समाजाशी एकात्म होऊन समाजाचा विकास संपादन करणे. युवा पिढी व प्रौढ पिढी यांच्या विचारसरणीत नेहमीच दरी राहणार. यावर उपाय म्हणजे प्रौढ पिढीशी संवाद साधायचा. यामुळे युवा पिढीला जशा जीवनाच्या जबाबदाऱ्या समजतील त्याचप्रमाणे प्रौढ पिढीच्याही विचाराला नवीन दिशा मिळेल.

युवा वर्षापासून आपण युवांना दीर्घकाल फायदा मिळू शकेल असे कार्यक्रम हाती घ्यायला हवे, त्याचप्रमाणे जे कार्यक्रम आधीपासूनच सुरू आहेत त्यांची तीव्रता वाढवायला हवी.'

यानंतर आभार प्रदर्शन होऊन तीन दिवस सुरू असलेला परिसंवाद संपला. हा परिसंवाद यशस्वी करण्यासाठी रामकृष्ण मिशनचे डॉ. चक्रवर्ती, रणजित मुखर्जी, श्री. पती व त्यांचे इतर सहकारी यांनी खूप मेहनत घेतली.

Tags: युवा पिढी रामकृष्ण मिशन प्रदूषण बेरोजगारी सामाजिक विकास गुलामनबी आझाद संयुक्त राष्ट्रसंघ  युवा वर्ष Young Generation Ramakrishna Mission Pollution Unemployment Social Development Gulamanbi Azad United Nations Youth Year weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके