डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधनाच्या बालकुमार दिवाळी अंकाचे वाचन हा एक अमृतानुभव आहे. यातील क्लायमेट व स्ट्राईक, सॅनिटरी पॅड, फावेला व मुलींचे शिक्षण, शूज व सन्मान, काँगोचे युद्ध, गुलाम व पाठशाळा हे सहाही लेख आवडले.

तात्त्विक विवेचन आवडले

साधना युवा दिवाळी अंकातील ‘विल ड्युरांटचा प्रयोग’ हा लेख खूप आवडला. मी नव्वदीला पोचलो असून, गत महिन्यात गंभीर आजारी असल्यामुळे अंक उशिरा पाहिला. डोळे अधू असल्याने काहीच लेख वाचतो. साधारणपणे जगण्याचा विचार करणाऱ्यांना आपण का व कशासाठी जगतो, असे प्रश्न पडतात. जगण्याचा मोह मात्र सुटत नाही. बी.ए.ला तत्त्वज्ञान हा माझा विषय होता. त्यामुळे वरील लेखातील तात्त्विक विवेचन आवडले. लोक आत्महत्या का करतात? मुलापत्नीसह आत्महत्या करून का मरण पत्करतात? देशाला दंगलग्रस्त व मूर्ख बनवून लोकांना मारण्याचा प्रयत्न का करतात? म.गांधींना आपल्या गोळीची शिकार करणाऱ्या नथुराम गोडसेचा गौरव करण्यात काही लोकांना गोडी का वाटावी? या विषयांवर तुम्ही लिहावे.

ॲड्‌. एकनाथ साळवे, बामणी-दुधोळी, चंद्रपूर

वास्तवाचे दर्शन घडवणारी छायाचित्रे

साधनाच्या बालकुमार दिवाळी अंकाचे वाचन हा एक अमृतानुभव आहे. यातील क्लायमेट व स्ट्राईक, सॅनिटरी पॅड, फावेला व मुलींचे शिक्षण, शूज व सन्मान, काँगोचे युद्ध, गुलाम व पाठशाळा हे सहाही लेख आवडले. ‘अक्षरांचा श्रम केला, फळा आला तेणे तो। अवघियाचा तळ धरी, जीव उरी नुरवूनी।’ असे संत तुकाराम म्हणाले. ‘गुरे जशी चरता-चरता अधिक चांगला चारा असणाऱ्या कुरणांकडे वळतात, त्याप्रमाणे वाचकदेखील एकदा वाचायला लागला की, आपोआप साधनाकडे वाचनासाठी वळतो’, असे पूर्वी एकदा नेमाडे म्हणाले होते. ‘दिसामाजी काही तरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे।’ असे रामदासांचे वचन आहे. साधना वाचनसंस्कृती जपते. शहराचे वैभव उंचच उंच इमारतींवरून ठरत नाही, तर शहरातील वाचनालयांवरून ठरते. पैशांच्या श्रीमंतीपेक्षा वैचारिक श्रीमंती कधीही श्रेष्ठच ठरते. बालकुमार अंकातील रंगीत छायाचित्रे बोलकी आहेत. वास्तवाचे दर्शन देतात.

राम शेळके, नांदेड  

दिवाळी अंकांच्या गर्दीत...

साधनाचा दिवाळी अंक नेहमीप्रमाणेच वाचनीय तर आहेच, परंतु अन्य दिवाळी अंकांच्या गर्दीत खूप वेगळ्या विश्वात घेऊन गेला. वेगवेगळ्या विषयांवरील लेख भावले. मुखपृष्ठावरील चित्र पाहून वाटले, आपण नेहरू- पटेल यांना प्रत्यक्ष पाहतोय. गांधी-आंबेडकरांवरील लेखात वेगवेगळ्या विचारांची माणसे एकत्र येऊ शकत नाहीत, हे दिसले. एकाकी नेहरूंची मानसिक अवस्था सुरेश द्वादशीवारांनी खूप छान शब्दांनी सजवली आहे. त्यावर त्यांनी खूप मेहनत घेतल्याचे जाणवते. त्यांचे पुढील लेख वाचायला अधीर आहे. सुदीप ठाकूर यांचा लाल श्याम महाराज यांच्यावरील लेख उत्तम आहे. ते नेता म्हणून पुढे येऊ शकले नाहीत, कारण ते खरे नेते होते. नेल्सन मंडेलांवरील ओबामांचे भाषणही उत्तम. आर्ट ॲन्ड हार्मनी या लेखात शरीफा विजळीवाला यांनी मुस्लिम वृत्तीवर छान प्रकाश टाकला आहे. ‘तमस’ ही मालिका/कादंबरी उत्तम होतीच, श्री.सुधीर कक्कर यांचा अश्वमेध उत्तम आहे.

एन.पी.शहाणे, पुणे

आपण असे शांत कसे बसलोय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या आणि मणिपूरच्या दृष्टीने झाशीच्या राणीस संदर्भहीन समजणाऱ्या  किशोरचंद्र वांगखेम या मणिपूरस्थित पत्रकारास बारा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली जाणे ही घटना केवळ धक्कादायकच नव्हे, तर जगातील सर्वांत मोठी लोकशाही समजल्या जाणाऱ्या भारत देशाला लाजीरवाणी आहे. ही घटना प्रसिद्ध होऊनही त्यावर आपल्याकडील वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या या माध्यमांतून तिचे ठळक व स्वयंस्फूर्त प्रतिसाद उमटले नाहीत. वांगखेम यांच्या संपादकांनीसुद्धा आपले हात झटकून मोकळे होणे हे चिंताजनक आहेच. शिवाय नागरिकांनी दाखवलेली उदासीनता न समजण्यासारखी आहे. हा दुर्दैवी प्रकार होऊन कालावधी लोटला हे पाहता, निर्भीड पत्रकारितेची परंपरा असलेल्या साधनासारख्या प्रकाशनाने तरी अभिव्यक्ति-स्वातंत्र्याच्या बाजूला ठामपणे उभे राहणे अपेक्षित होते, हे तीव्रतेने नमूद कारावेसे वाटते.

सुलभा शिलोत्री व पम्मी खांडेकर, मुंबई  

नेहरूंवरील लेखमालेची सुरुवात छान

तशी सुरुवात दिवाळीतच... पण 5 जानेवारीपासून सलग राहणार म्हणून हीच सुरुवात वाटते. गांधींपाठोपाठ आता नेहरू... या दोन व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा, त्यागाचा आणि विचारधारेचा अलीकडे सवंग आणि संकुचित राजकारणापायी विपर्यास सुरू आहे, अशा काळात द्वादशीवारांची ही लेखमाला प्रसिद्ध होण्याला मोठे औचित्य आहे. ते राज्यशास्त्र जाणतात-शिकवतात; जोडीला प्रतिभा व लिहिण्याला लालित्याची छटा... त्यामुळे गांधींप्रमाणेच नेहरूंवरील लेखमाला वाचनीय तर होणारच, पण ती नव्या पिढीला संकुचित राजकारणाच्या कुसंस्कारांपासून वाचवणार आहे. एका अर्थाने या पिढीचे राजकीय-वैचारिक परिपोषण करण्यात ही लेखमाला मोठी भूमिका बजावेल!

 बाबूराव शिंदे, सातारा  

राहवत नाही म्हणून लिहीत आहे

अलीकडे साधना हे अर्वाचीन इतिहासाचे जर्नल झाले आहे. महाराष्ट्रापुढे, भारतापुढे जे ज्वलंत प्रश्न आज आहेत, जे धोके आणि संधी येत्या काही दशकांत आव्हाने देत आहेत वा आवाहन करीत आहेत, त्यांच्याविषयी जास्त लेख व पत्रव्यवहार यावा, अशी अपेक्षा आहे.

सुभाष आठले, कोल्हापूर

Tags: सुभाष आठले बाबूराव शिंदे एन.पी.शहाणे राम शेळके weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके