डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

दिगूचे वेड ही आकस्मिक व काहीशी अनपेक्षित घटना वाटते, कारण आधी दिगूची बेचैनी व्याकुळता कुठे तीव्रतेने जाणवत नाही. संपूर्ण चित्रपटभर पत्रकार दिगू नपुंसक, निष्क्रिय, मूक साक्षीदाराची भूमिका वठवीत असताना तो एकाएकी प्रक्षुब्ध व्हावा आणि त्याच्या वैफल्याची परिणती वेडात व्हावी इतकी ती व्यक्तिरेखा निळू फुलेसारखा ताकदीचा नट असूनही डेव्हलप झालेली नाही.

 

जब्बार पटेलचे नाटक असो की चित्रपट, तो पहाण्यावाचून तसा तुम्हाला पर्यायच नसतो. कारण एरवी एकूण नाटक-चित्रपटांत जे काही सारखे रंगमंचावर किंवा पडद्यावर येत असते ते तुम्हाला रुचत नाही. पटत नाही. आवडत नाही. काही तरी मनाचे, बुद्धीचे समाधान करणारे असे तुम्हाला पहायचे असते. अगदी अचूक सांगायचे तर अनुभवायचे असते. आणि तुमची ही अपेक्षा पुरवणारी माणसे कोण हेही तुम्हाला अनुभवाने ठाऊक झालेले असते. म्हणूनच जब्बार पटेल हे नाव जिथे दिग्दर्शक म्हणून आहे. तिथे तुम्हाला कुणी जा म्हणून सांगण्याची गरज नसते. जब्बारचे नवे काही रंगमंचावर किंवा पडद्यावर येणार आहे किंवा आले आहे एवढी कुणकुणदेखील तुम्हाला तिकडे ओढून न्यायला पुरेशी असते.

प्रयोगशीलता हे आणखी एक जब्बारचे आकर्षण असते. या प्रयोगशीलतेची कल्पना असल्याने जब्बारच्या नव्या साहसाला आपण नितळ मनाने सामोरे जातो. जब्बारच्या प्रयोगांची आर्थिक फलश्रुती काय, याची ना त्याला चिंता असावी ना तुम्हाला त्याचा विचार सुचतो. प्रयोग प्रयोग म्हणून किती आणि कसा यशस्वी झाला आहे, याचाच विचार आपल्या मनात घोळतो.

जब्बारचा 'सिंहासन' चित्रपट पडद्यावर आल्यावर तो पहाणे अर्थातच अटळ होते. सिंहासन पाहात असताना मी अनेक प्रकारे त्याचा विचार करत होतो. एक तर अरुण साधूच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या ज्या दोन कांदबर्‍यांच्या आधारे हा चित्रपट निर्माण केला आहे त्या मी दोन-तीनदा तरी वाचल्या आहेत. त्यामुळे एक मन कादंबरी आणि चित्रपट यांची तुलना करत होते. मी स्वतः गेली आठ-दहा वर्षे पत्रकार या नात्याने राजकारणाशी विशेषतः मंत्री पातळीवरील राजकारणाशी खूप जवळून संबंधित, परिचित असल्याने व पडद्यामागील राजकारणाची खूप तपशीलवार माहिती व अनुभव असल्याने 'सिंहासन'च्या पडद्यावर जे पडद्यामागील राजकारणाचे दर्शन घडत होते त्याची मी स्वतःच्या निरीक्षणांशी तुलना करत होतो. आणखी एक विचार नकळत केला जात होता तो असा की पडद्यावर अरुण सरनाईक, डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, मधुकर तोरडमल, सतीश दुभाषी, माधव वाटवे, मोहन आगाशे वगैरे अभिनेत्यांनी ज्या भूमिका केल्या होत्या त्या तशा पारदर्शकच होत्या. म्हणजे हे वसंतराव नाईक, हे शंकरराव चव्हाण, हे मधुकरराव चौधरी, हे शरद पवार, हे पी. के. सावंत, हे सुशीलकुमार शिंदे, हे जॉर्ज फर्नांडीस वगैरे असे पटकन ओळखता यावे, अशा तऱ्हेने अभिनेत्यांनी काही विशिष्ट लकबींसह भूमिका पेश केल्या होत्या. आणि ही सर्वच राजकारणी मंडळी मी जवळून पाहिली असल्यामुळे अभिनेत्याला त्या विशिष्ट मंत्र्याचे सोंग कितपत वठवता आले आहे असा विचार मनात चालू होता. आणि शिवाय मला जे दिसतेय त्या व्यतिरिक्त काहीही माहिती नाही, मी पत्रकार नाही, एक सामान्य माणूस आहे आणि एक चित्रपट म्हणून मी सिंहासन पहातोय तर तो मला कसा वाटतोय याचाही मी विचार करत होतो.

बाहेर पडल्यावर मात्र एक गंमतीदार गोष्ट माझ्या लक्षात आली. ती म्हणजे मी स्वतः पत्रकार असून व राजकीय उलाढालीत मनःपूर्वक रमणारा असूनही व 'सिंहासन'ची तत्त्वतः मध्यवर्ती व्यक्तिरेखा निळू फुलेने रंगवलेली दिगू या पत्रकाराची असूनही एक पत्रकार म्हणून एका पत्रकारावरील चित्रपट पाहात आहोत, असे जाणवले नाही वा त्या दृष्टीने मी विचारही केला नाही. असे का झाले असावे, असा स्वतःशीच जेव्हा मी विचार करू लागलो तेव्हा हे लक्षात आले की, अरुण साधूंच्या कादंबऱ्यांत दिगू या पत्रकाराची व्यक्तिरेखा केंद्रस्थानी होती तर इथे तो केवळ साक्षीदार म्हणून वावरतोय आणि केंद्रस्थानी आहे तो आपले सिंहासन डळमळीत झाल्याच्या जाणीवेने व्याकुळ, बेचैन झालेला मुख्यमंत्री!

'सिंहासन' चिटपटाची जर अरुण साधूच्या 'मुंबई दिनांक' आणि 'सिंहासन' या दोन कादंबर्‍यांशी तुलना केली तर स्फोटक, दाहक, हादरवून टाकणारा असा होता यात शंका नाही. 'सिंहासन' चित्रपटात त्यांचे स्वरूप बदलले आहे. अर्थात त्या कादंबऱ्यांतील अनुभवाची विविधता आणि व्याप्ती लक्षात घेता तो एका चित्रपटात संपणारा किंवा सामावणारा विषय नव्हे. जब्बारनी त्या कादंबऱ्यांतील फक्त मुख्यमंत्रिपदाच्या राजकारणाचा आशय उचलला आहे. पानिटकरच्या स्मगलिंग प्रकरणाचा किंवा डिकॉस्टा या ट्रेड युनियन लीडरच्या हालचालींचा किंवा दिगू या पत्रकाराच्या जीवनाचा ओझरता, निसटता असा संदर्भ या चित्रपटात येत असला तरी त्याला पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या राजकारणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जुळवून टाकले आहे.

राजकारण विशेषतः पडद्यामागे चालणारे सत्तेचे राजकारण खरोखरच असे चालते का? माझ्याबरोबर चित्रपट पाहाताना जो मित्र होता तो वारंवार मला विचारत होता 'खरंच असं चालतं का?' सर्वसामान्य असा भोवतीचा प्रेक्षकही पडद्यामागील राजकारणाच्या या पडद्यावरील दर्शनाने हबकून, सुन्न होऊन 'खरंच असं चालतं!' या प्रश्नाने विचारात पडलेला दिसत होता. माझा अनुभव असा की हे असेच नव्हे तर याहीपेक्षा जीवघेण्या आणि किळसवाण्या स्वरूपातदेखील पडद्यामागे राजकीय डावपेच लढवले जातात. त्या सत्य माहितीच्या तुलनेत पडद्यावरचे डावपेच मला भातुकलीच्या खेळातल्यासारखे लुटुपुटूचे वाटत होते! पण इतरांना त्यांनीही हादरवून टाकण्याचे स्पष्टपणे जाणवत होते. 'विलक्षण भेदक असा चित्रपट आहे' असे त्यांना वाटत होते आणि चित्रपट माध्यमातून यापेक्षा अधिक एक्स्पोज करणे शक्य नव्हते, हे लक्षात घेता जब्बारने आपल्याकडून शिकस्त केली असेच म्हटले पाहिजे. जितके होते तितके एक्पोज राजकारण्यांना सिंहासनमध्ये केले आहे. काही वेळा आपल्याला खरी आणि फार माहिती असणे आस्वादप्रक्रियेत अडथळा आणणारे ठरते ते असे. अर्थात हा माझा अनुभव.

कुणाला बदनामी वा मानहानीचा खटला तर भरता येऊ नये, पण लोकांना कोणत्या अभिनेत्याने कुणाचे सोंग वठवले आहे हे कळण्याइतके ते पारदर्शक असावे, ही मोठी तारेवरची कसरत आहे. महाराष्ट्रातील राजकारणी व्यक्तींची विशेषतः वसंतराव नाईकांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीतील अखेरच्या दीड-दोन वर्षांतील मंडळींची ज्यांना थोडीबहुत माहिती आहे त्यांना कुणी कोणाची भूमिका वठवली आहे, हे सांगणे अवघड नाही. नाटक किंवा चित्रपटात जेव्हा अशी पारदर्शक सोंगे येतात तेव्हा लोकांच्या अनुकूल- प्रतिकूल प्रतिक्रियांची तीव्रता वाढते. उत्सुकता तशीच नाराजीही निर्माण होऊ शकते. सिंहासनबाबत ते घडणे अटळ आहे.

कादंबरीतल्या पत्रकार दिगूच्या व्यक्तिरेखेला जे महत्त्व आहे ते सिंहासनमधल्या दिगूला नाही. कादंबरी, विशेषतः मुंबई दिनांक ही दिगूभोवती गुंफल्यासारखी, तशी ती वास्तविक नसूनही, वाटते, पण सिंहासन चित्रपट मुख्यमंत्री या अरुण सरनाईकांनी मनःपूर्वक व आवश्यक त्या रुबाबात रंगवलेल्या भूमिकेभोवती फिरतो. पण त्याचमुळे असेल कदाचित, पण शेवटी दिगूला वेड लागते ती घटना चित्रपटाचा शेवट वाटत नाही, तर जिथे सारे मंत्री एकत्र बसून मौजमजा करू लागतात व मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनावरचे संकट टळते, तिथेच खरे तर सिंहासन चित्रपट संपतो. दिगूचे वेड ही आकस्मिक व काहीशी अनपेक्षित घटना वाटते, कारण आधी दिगूची बेचैनी व्याकुळता कुठे तीव्रतेने जाणवत नाही. संपूर्ण चित्रपटभर पत्रकार दिगू नपुंसक, निष्क्रिय, मूक साक्षीदाराची भूमिका वठवीत असताना तो एकाएकी प्रक्षुब्ध व्हावा आणि त्याच्या वैफल्याची परिणती वेडात व्हावी इतकी ती व्यक्तिरेखा निळू फुलेसारखा ताकदीचा नट असूनही डेव्हलप झालेली नाही. अर्थात जब्बारला ती दिगूची कहाणी म्हणून पेशच करायची नसावी. 'सामना'त त्याने सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार समर्थपणे एक्स्पोज केला होता, इथे त्याला राजकीय भ्रष्टाचाराचे व सर्वसामान्यांविषयीच्या राजकारण्यांच्या तुच्छता- उपेक्षा बुद्धीचे बिंग फोडायचे आहे आणि त्यात जब्बार यशस्वी झाला आहे.

राजकारणी लोकांना सिंहासन अपुरा वाटेल, कारण खरे राजकारण यापेक्षा शेकडो पटीने अधिक भ्रष्ट आणि घृणास्पद असते, पण सर्वसामान्यांना तो आवडेल तो त्याला घडते तेही पडद्यामागील राजकारणाचे दर्शन नवे व अपरिचित असल्यामुळे.

जब्बार पटेलच्या दिग्दर्शनाचे उत्कृष्ट टीमवर्क हे आता खास वैशिष्ट्य झाले आहे. 'सिंहासन' मध्ये डॉ. श्रीराम लागूंपासून जयराम हर्डीकरपर्यंत कितीतरी कलाकार आहेत. या सार्‍यांनी आपापली ताकद पणाला लावून कामे केली आहेत. ते सर्वजण स्वतंत्रपणे आणि एकूण टीम म्हणूनही झकास कामे करून जातात. 'उष:काल होता होता, काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या, पेटवा मशाली' गाण्याचा आणि हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या आर्त चालीचा जब्बारने पुनः पुन्हा खूप परिणामकारक उपयोग करून घेतला आहे.

विजय तेंडुलकरांचे चित्रपटातील संवाद नेहमीच ताकदीने लिहिलेले असतात. विशेषतः जिथे संघर्ष किंवा जुगलबंदीचे क्षण येतात तिथे तेंडुलकरांचे संवाद विलक्षण तेज होतात. पण 'सामना'तील संवाद ते 'सामना'तील संवाद! सिंहासनमध्ये तुम्ही अनेकदा तेंडुलकरांच्या संवादांना दाद देता, पण 'सामना'चे सारे स्क्रिप्ट पाठ करणारे तरुण मला ठाऊक आहेत. ते भाग्य सिंहासनच्या संवादांना लाभेल असे वाटत नाही. तेंडुलकर जेव्हा पटकथा लिहितात तेव्हा ते पडद्यावरील नाटक लिहिताहेतसे वाटते! घडण्यापेक्षा बोलण्यावर त्यांचा अधिक भर जाणवतो. अरुण साधूच्या मूळ कादंबर्‍यांत खूप काही घडत गेले असे वाटते, तर सिंहासन चित्रपट पाहाताना आपण खूप काही ऐकत आहोत असे वाटते! अर्थात हे ऐकणेही हवेहवेसे वाटणारे असते.

'सिंहासन' हा चित्रपट जब्बारच्या 'टीम'चा आहे. तो पहायला तर हवाच, पण तो पाहिल्यावर विचारही करायला हवा. अर्थात आपण तो करतोय. कारण प्रेक्षकाला विचार करायला लावणारा दिग्दर्शक त्याला लाभलेला आहे.

Tags: राजकारण शरद पवार शंकरराव चव्हाण अरुण साधू सामना सिंहासन जब्बार पटेल Politics Sharad Pawar Shankarrao Chavan Arun Sadhu Saamna Simhasan Jabbar Patel weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके