डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

इतिहासाविना ऐतिहासिक स्मृतिचिन्हे

स्थळ आणि काल यांच्या नेमक्या ओळखीबाबतचे प्रश्न पुरातत्त्ववेत्ते आणि इतिहासकार यांना नेहमीच अडचणीचे वाटतात; पण धर्मश्रद्धांबाबत हळवे असणारांची चिंता बाळगण्याचे त्यांना काहीच कारण नसते, या असाधारण मुद्यावर सतत भर द्यायला हवा. सेतुसमुद्रम प्रकल्पाच्या निमित्ताने राम अस्तित्वात होता की नाही, किंवा समुद्राच्या पाण्याखाली बांधासारखी झालेली रचना ही रामानेच बांधलेल्या सेतूचे अवशेष आहेत काय, यांसारखे उपस्थित केले गेलेले प्रश्न महत्त्वाचे नसून पर्यावरणावर आणि अर्थकारणावर या प्रकल्पाचा काय परिणाम होईल, या संबंधातील विविध जटिल प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि त्यांना धर्मश्रद्धा अगर पुरातत्त्व विज्ञान या दोहोंचेही संदर्भ नसावेत. या प्रकल्पाचा फायदा काय होईल किंवा त्यामुळे कोणता विध्वंस होईल, हे जाणून घेण्यासाठी या विषयावर विस्तृत चर्चेची आवश्यकता आहे.

सध्या या देशाचा सार्वजनिक अवकाश पुन्हा एकदा धर्मश्रद्धा आणि इतिहास यांच्यामधील (घडवून आणलेल्या) संघर्षाने व्यापून राहिलेला आहे. या दोहोंचा समन्वय (फ्यूजन) अशक्य आहे, हे लक्षात घेतल्यास या संघर्षाचा प्रत्यक्ष परिणाम होणार नाही. कारण या दोनही गोष्टी स्वतंत्र आहेत. त्यांचे क्षेत्र, त्यांच्या संशोधनपद्धती आणि त्यांची वैचारिक मांडणी संपूर्णपणे भिन्न आहे. म्हणून त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्यामधील फरक लक्षात घेऊन त्यांचा स्वतंत्रपणे विचार करायला हवा.

व्यक्ती, स्थळ किंवा घटना यांच्या ऐतिहासिकतेबद्दल इतिहासकार वक्तव्ये करतात, तेव्हा त्यांना या सर्वांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काही पुराव्यांची गरज लागते आणि या पुराव्यांचा संदर्भ काल व अवकाश यांच्याशी असतो. वाल्मिकी रामायणात अयोध्या आणि लंका ही दोन महत्त्वाची ठिकाणे आहेत, पण त्यांचे स्थान निश्चित करता येत नाही.

जुन्या अयोध्येचे स्थान आणि आजची अयोध्या वेगवेगळी आहे, याबाबत अनेक परस्परविरोधी विधाने आजपर्यंत करण्यात आली आहेत. बौद्ध वाङ्मयात म्हटले आहे अयोध्या गंगेच्या काठी आहे, तर काहीजण शरयू नदीच्या तीरावरील अयोध्येचा उल्लेख करतात. 'रामायण उत्खनन' या प्रकल्पाखाली अयोध्येमध्ये उत्खनन सुरू झाले, तेव्हा हा वाद उपस्थित झाला होता आणि त्या संबंधात पुरातत्त्व संशोधकांमध्ये चर्चाही झाली होती. याबाबत लेखकांचा काही गोंधळ होतो आहे काय, की या एकाच नावाची दोन गावे अस्तित्वात होती? इतिहासामध्ये स्थानांच्या गावाची अशी पुनरावृत्ती होताना दिसते, याची काही कारणे असावीत. 

काही वेळा त्या नावांची स्मृती कायम ठेवण्यासाठी ही पुनरावृत्ती होत असावी; किंवा नवीन झालेल्या वसाहतींना अधिकृतपणा यावा म्हणूनही ती होत असावी. आणखी एक कारण म्हणजे वातावरणातील प्रतिकूलतेमुळे एका ठिकाणच्या वस्तीचे दुसरीकडे स्थलांतर होते, तेव्हा अनेकदा ते त्या ठिकाणच्या नावासकट होते. अयोध्येच्या स्थानाबद्दल ही शक्यता रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी काही इतिहासकारांनी बोलून दाखवली होती. पण त्यांच्या संशोधनावर 'मार्क्सवादी इतिहासकारांची विकृती' असा शिक्का मारण्यात आला. पण साधी व्यावहारिक अक्कल असण्यासाठी मार्क्सवादी असण्याची गरज नाही.

लंकेच्या स्थानाबद्दलसुद्धा मागील शतकात विद्वानांमध्ये मतभेद होते आणि वादविवादानंतर निघालेले निष्कर्षही अनिश्चित होते. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे हिरालाल, रायकृष्णदास, परमशिव अय्यर, यू.पी.शाह आणि एच.डी.सांकलिया यांसारखे विद्वान लंकेचे स्थान विध्य पर्वताच्या परिसरात शोधतात- अमरकंटक अगर छोटा नागपूर यांमध्ये- तर काहीजण ओरिसात महानदीच्या खोऱ्यात ते शोधतात. आजच्या श्रीलंकेशी रामकालीन लंकेचे स्थान जुळत नाही. त्याबाबत प्रश्नचिन्ह आहे; कारण सिलोनच्या इतिहासात त्या बेटाचे नाव लंका कधीच नव्हते.

इसवीसनाच्या पाचव्या शतकात सिलोनमध्ये निघालेल्या 'महावंश' या घटनांची नोंद करणाऱ्या पत्रिकेत या बेटाचा उल्लेख अनेक नावांनी केलेला आढळतो. ओजदीप, वरादीप, मंडदीप इत्यादी नावे कदाचित काल्पनिकही असतील; पण दुसऱ्या अनेक विविध प्रकारच्या (स्रोतांची) सर्वसामान्यपणे वापरात असलेली नावे अगदी वेगळी आहेत. भारतीय, ग्रीक आणि लॅटिन साहित्याच्या संदर्भांचा मौर्यकालीन व नंतरचा काळ असा विचार केला तर ताम्रपर्णी, ताम्बपत्नी (ग्रीकमध्ये टॅप्रोबेन) अशी या बेटाची पूर्वीची नावे आढळतात. 

ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने आपल्या स्तंभलेखावरील आज्ञांत ताम्रपर्णी ही आपली सरहद्द असल्याचे म्हटले आहे. शिवाय तिचा संदर्भ चौल, पाण्डय आणि केरळपुत्त या दक्षिणेकडील राजसत्तांशी असल्यामुळे 'ताम्रपर्णी म्हणजेच सिलोन' या निकषावर अनेक विद्वान आलेले आहेत. काहींनी अगदी दक्षिण टोकाजवळ असणाऱ्या ताम्रपर्णी नावाच्या नदीशी त्या स्तंभावरील उल्लेखाचा संदर्भ असावा, असेही म्हटले आहे.

या संदर्भातच 'सिंहल' किंवा 'सिंहलद्वीप'चा उल्लेख वरचेवर झाला आहे, तो ग्रीक-लॅटिन कागदपत्रांत आलेल्या 'सिलम किंवा 'सिएलद्वीप' या नावावरून. या शिवाय 'पलाई सायमाउंडो' असाही या कागदपत्रांत या बेटाचा उल्लेख आहे; पण या नावाच्या मागचा इतिहास अज्ञात आहे. इसवीसनाच्या पहिल्या सहस्रकात हे उल्लेख असेच चालू राहिले. दरम्यानच्या काळात कधीतरी सिलोनचा उल्लेख लंका या नावाने होऊ लागला आणि मग त्या नावाने हे बेट ओळखले जाऊ लागले.

इतिहासकारांसमोर हे एक मोठेच कोडे आहे. आपल्या महाकाव्यात वाल्मिकीला जर सिलोनचा उल्लेख करायचा होता, तर त्या लिखाणाच्या काळात ते बेट ज्या नावांनी ओळखले जात होते त्यांचा, म्हणजे ताम्रपर्णी, सिंहल किंवा सिंहलद्वीप अशा नावांचा उल्लेख त्यांनी करायला हवा होता. पण या नावांऐवजी लंकेचा उल्लेख रामायणात होत राहिल्यामुळे तिचे स्थान दुसरीकडे कोठेतरी असावे, असा निष्कर्ष निघतो आणि त्यावरूनच रामसेतूचे स्थानही आज समजले जाते, त्यापेक्षा भिन्न असावे, या दृष्टिकोनातून त्याचा फेरविचार व्हावयास हवा. वर उल्लेख केलेल्या काही विद्वानांनी हेच सुचवले आहे. 

काहींच्या मते मध्य भारतातील एखाद्या जलाशयावर हा 'सेतू' असावा किंवा महानदीच्या मुखाशी असलेल्या लहान लहान बेटांशी संबंधित असावा; पाल्कच्या सामुद्रधुनीशी नव्हे. दुसर्या काही विद्वानांच्या मतांप्रमाणे चौल राजांच्या साम्राज्याचा विकास होत गेला, तेव्हा त्यांची नाविक ताकद वाढत होती आणि सिलोनचा काही भाग त्यांनी जिंकला होता. त्या काळात या सेतूची चर्चा होऊ लागली असेल. पण या दोनही अभिप्रायांत 'सेतू'ला विशेष महत्त्वाचे स्थान दिलेले नाही, कारण त्याच रामकथेमध्ये लंकेला पोचण्याचे इतरही मार्गांचे वर्णन आहे आणि त्यांतील काहींमध्ये कल्पनेच्या भराऱ्या आहेत.

रामायणाचा काळ

रामायणात उल्लेख केल्याप्रमाणे सिलोन हीच लंका असेल, तर मग वाल्मिकीच्या या महाकाव्याच्या निर्मितीकालाबद्दलही फेरविचार करायला हवा. कारण मग सिलोनला लंका हे नाव रूढ झाले, त्यानंतर रामायणाची निर्मिती झाली, असे मानावे लागेल. हा काळ आतापर्यंत सर्वमान्य असलेल्या काळाच्या कितीतरी अलीकडचा काळ आहे. 'लंका' या नावाचा वापर कधीपासून सुरू झाला, याबद्दल मोठेच प्रश्नचिन्ह आहे. पण इसवी सनापूर्वी शेकडो वर्षे आधी या पुलाचे झालेले आहे बांधकाम आणि तेही समुद्राच्या एका मोठ्या भागावर झालेले आहे, असे मानणे हा तांत्रिकदृष्ट्या पटण्यासारखे नाही.

आता असाही एक प्रतिवाद केला जातो की रामसेतू हा एक सांस्कृतिक वारसा असल्यामुळे ती रचना निव्वळ भौगोलिक आहे असे सिद्ध झाले, तरी तिचा विध्वंस करता कामा नये. खरे तर ह्या सेतूची कल्पना हीच खरा सांस्कृतिक वारसा बनली आहे. अशा तऱ्हेच्या अस्तित्वात नसलेल्या मानवाने केलेल्या निर्मितीचा शोध घेतला जातो, तेव्हा कल्पनेच्या रम्य भराऱ्या आणि दंतकथांचे इमले ओलांडावेच लागतात. पाल्क सामुद्रधुनीत समुद्राच्या पाण्याखाली वाळूचे थर साठून तयार झालेली रचना हा नैसर्गिक वारसा मानणेच योग्य आहे, आणि त्या दृष्टिकोनातून त्याचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. आमच्या पर्यावरणीय भवितव्यासाठी अशा सागरी उद्यानांचे (पार्कस्) अस्तित्व जमिनीवर दिसणाऱ्या बागा किंवा वनरायांइतकेच महत्त्वाचे आहे.

या प्रकरणातील ऐतिहासिक संशोधनाचा पाठपुरावा करण्यासाठी थोड्या अंतरावरून त्याकडे पाहिले पाहिजे. भारतीय परंपरेला प्रश्नोत्तराचे वावडे नाही. आमच्या सांस्कृतिक वारशाचे मूल्यमापन करताना जे आम्ही सोयिस्करपणे विसरतो किंवा त्याकडे कानाडोळा करतो, ते हे की प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा एक मोठा हिस्सा विवेक आणि नास्तिकता यांनी व्यापलेला आहे. ही वस्तुस्थिती फक्त चार्वाक अगर लोकायत या विचारवंतांपुरतीच मर्यादित नाही, तर बुद्ध आणि जैन यांच्यासारख्या अन्य तत्त्वज्ञानांनाही ती लागू पडते. प्रश्नांची आपली दीर्घ परंपरा केवळ तत्त्व- चर्चेसाठीच नाही तर साहित्य व व्यवहार यांतही प्रभावी ठरली आहे, म्हणून ती सांभाळून ठेवली पाहिजे. 

वाल्मिकी रामायणामध्ये अयोध्येचे वर्णन एक समृद्ध, सुविकसित, विशाल नगरी असे आले आहे. एखाद्या इतिहासकाराला, त्यावरून ख्रिस्तपूर्व पाचव्या-सहाव्या शतकातील गंगेच्या मैदानातील एखाद्या शहराशी त्याबद्दलच्या वाङ्मयावरून, अगर पुरातत्त्व शास्त्राच्या साहाय्याने परिचित झालेल्या माहितीवरून, अयोध्येचे स्थान शोधण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते. गेल्या चाळीस वर्षांत अयोध्येत वेगवेगळ्या वेळी प्रसंगोपात्त जी उत्खनने झाली, त्यांवरून असे सिद्ध झाले आहे, की अयोध्येचे अस्तित्व ख्रिस्तपूर्व कालापूर्वी 5०० वर्षे या कालमर्यादेपलीकडे जाऊ शकत नाही. ग्रंथातील नोंदीप्रमाणे उत्खननातून मिळालेले पुरावे त्या ठिकाणी समृद्ध समाज नांदत होता, असे दाखवत नाहीत; आणि हा फरक अनेक उत्खनन क्षेत्रांत आढळून येतो. परंतु रामायण हे आदिकाव्य म्हणून ओळखले जात असल्यामुळे, त्यातील काव्यात्मकता या संदर्भात लक्षात घेतली पाहिजे. 

गंगेच्या काठावर प्रथमच या काळात नागरी वसाहती झाल्या आणि त्यामुळे नागरिकांना जगाचे जे नवदर्शन घडले, त्यामुळे पूर्वीच्या ग्रामीण वसाहतींपेक्षा भिन्न अशा हालचाली आणि ललितरम्य वैचारिक प्रक्रिया त्यांच्या मनात उमटणे साहजिकच होते. ह्या अनुभवांचे इतके उदात्तीकरण आणि अतिशयोक्ती का व्हावी, हे मात्र समजून घेणे जरूरीचे आहे. या आधीच्या काळात इतर उत्खननांवरून ज्या वसाहतींचा अंदाज केला जातो, त्यांचे कालखंड या कालखंडाच्या आजूबाजूचेच आहेत; पण त्यात महाकाव्यातील अयोध्येच्या नागरी जीवनाचे थोडेही प्रतिबिंब दिसत नाही.

केवळ वसाहतींचे अस्तित्व होते एवढ्याच पुराव्यावर शिकारी, गुराखी आणि शेतकरी यांनी व्यापलेल्या जमिनीवर, एक महाकाव्यातील घटनांचे केंद्र असलेले नगर वसलेले होते, हे सत्य मानणे हे महाकाव्य लिहिणाऱ्या कवींच्या कल्पनांच्या भरारी पलीकडचे आहे. ग्रंथातील माहिती आणि उत्खननातील वस्तू आणि संशोधन यांचा कोठेतरी संबंध दिसणे आवश्यक आहे; पण अद्यापही काही इतिहासकार आणि पुरातत्त्व संशोधक ही अट स्थलनामांकनाचा मूलभूत निकष म्हणून खुलेपणाने मान्य करीत नाहीत. संबंधित वस्तू अगर उद्दिष्टे ग्रंथांमध्ये आणि उत्खननात अशा दोनही स्रोतांमध्ये आढळून येतील, तेव्हाच त्यांचे स्थान निश्चित करता येईल.

पाश्चिमात्यांनी होमर या त्यांच्या महाकवीच्या काव्यावरून चालवलेले संशोधन उत्खननातील पुराव्याअभावी आजही अपूर्ण राहिलेले आहे.

देशोदेशीचे अवतार

रामकथेतील रामावर आधारलेल्या जगभरच्या अनेक गोष्टींतील त्याच्या वेगवेगळ्या भूमिका लक्षात घेतल्या, तर रामाचे व्यक्तिमत्त्व ऐतिहासिक नाही हेच सिद्ध होते. जावा किंवा मलाया या देशातील रामकथा तर आपल्याकडील रामकथेपासून कितीतरी वेगळ्या आहेत. रामाच्या या विविध अवतारांतील संघर्षांमुळे- जे भारतातल्याही काही भागांत आढळतात- ते परस्परविरोधी भूमिकांत जातात, तेव्हा त्यांतील एकच अवतार खरा आहे असे मानणाऱ्यांची पंचाईत होते. अनेक अवतारांभोवती गुंफलेल्या कथांमुळे इतिहास आणि तौलनिक पृथक्करण यांच्यामध्ये अभ्यासकांचे स्वारस्य वाढीला लागते; आणि मग त्यामागे ऐतिहासिक सत्य असलेच, तर ते कितपत आहे आणि त्याला मिळालेल्या वळणातून काय सिद्ध होते याचेही मूल्यमापन करण्यास उत्तेजन मिळते.

बौद्धांच्या रामायणाला 'दशरथ जातक असे नाव आहे. ते वाल्मिकी रामायणाला कदाचित् समकालीन असले तरी त्या दोहोंमध्ये बराच फरक आहे. रामायणाच्या या बौद्ध रूपांतरात रामाला राम-पंडित असे संबोधले आहे. तो दशरथाचा नव्हे तर वाराणशीच्या राजाचा मुलगा आहे. तो वनवासात जातो तो हिमालयात; विंध्य पर्वतात नव्हे. मुख्य म्हणजे बौद्ध रामायणात राम आणि सीता ही भावंडे आहेत. वाल्मिकीच्या रामायणापेक्षा हा फरक अगदी मूलभूत आहे आणि बौद्ध परंपरेमध्ये या नात्याचा मोठा सन्मान केलेला आहे; कारण ते मोठ्या प्रतिष्ठेचे मानले जाते. शिवाय त्या कथेमध्ये रावणाकडून सीतेचे अपहरण हा भागच नाही. रामाचा वनवास आणि त्याचे राजधानीत पुन्हा परतणे यापुरतीच ही कथा मर्यादित आहे.

रामायणाची जैन साहित्यात जी रूपांतरे केलेली आहेत, त्यांतील सर्वात आधीचे म्हणजे ख्रिस्त शकातील पहिल्या काही शतकांतल्याच विमलासुरींनी लिहिलेल्या 'पद्मचरित' या ग्रंथातल्या आधीच्या सर्व समजुतींना आणि ग्रांथिक लिखाणातील कल्पनांना छेद देणारे लिखाण केलेले आहे. त्यासाठीच या ग्रंथाचा प्रपंच केलेला आहे, असे ग्रंथकर्ते स्पष्ट सांगतात. वाल्मिकी रामायणापेक्षा या रामायण आवृत्तीतील मूलभूत फरकाचा भाग म्हणजे या जैन आवृत्तीत रावण खलनायक दाखवलेला नसून मानवी प्रतिनायक दाखवलेला आहे. त्यामुळे जैनांच्या वैचारिक तत्त्वज्ञानाच्या चौकटीत ही कथा बसवलेली आहे आणि म्हणूनच या परंपरेच्या बाहेर कोठेही तिचा स्वीकार झालेला नाही.

वाल्मिकी रामायणावर ज्यांचा विश्वास आहे किंवा त्यात आहे ते संपूर्ण सत्य म्हणून मानणारे जे आहेत, ते इतर पंथांनी किंवा परदेशातील नागरिकांनी काढलेल्या रामायणाच्या आवृत्त्या नाकारणारच; कारण त्यांतील जी भाष्ये आहेत त्यांनी वाल्मिकीच्या रामायणकथेसमोर प्रतिप्रश्न उभे केले आहेत. त्यातल्या त्यात इतिहासकारांना जे कुतूहल आहे, ते भारतात किंवा आशियात रामायणाच्या किती आवृत्त्या निघाल्या आणि त्यांत कोणती परस्परविरोधी भाष्ये झाली, यांत नसून, त्या कथेतील विविध आवृत्त्यांमध्ये इतके टोकाचे बदल का केले जावेत, याबद्दल आहे. कारण त्याचमुळे एका राम या नायकावर वेगवेगळ्या देशांतील काव्यांमध्ये इतकी वेगवेगळी भाष्ये करण्यात आली आहेत. याचा एक अर्थ असा असू शकतो की, स्थानिक परिस्थितीच्या गरजांनुसार राम या व्यक्तिमत्त्वाचे आवश्यक ते प्रदर्शन करण्याइतके स्वातंत्र्य त्या रचनाकारांना असावे. त्याचमुळे विविध स्वरूपात साकार होणाऱ्या रामाचे व्यक्तिमत्त्व निश्चितपणे ऐतिहासिक मानण्यासाठी आवश्यक तो पुरावा या परिस्थितीतून हाती येत नाही.

अन्य धर्मसंस्थापक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबाबत हा गोंधळ उडालेला दिसत नाही. बुद्ध, येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर आणि गुरुनानक यांच्या चरित्रकथा कोठेही पाहिल्या, तरी त्यांचे कथानक एकच आणि बांधीव असलेले दिसते. त्यामुळे त्यांच्या चरित्रकथेला अधिकृतता प्राप्त झालेली आहे. त्यांच्या चरित्रकथा केवळ मौखिक किंवा लिखितच नाहीत; तर त्यांना स्थितिजन्य आणि अन्य पुराव्यांची जोड आहे. 

उदाहरणार्थ, बुद्धाच्या निर्वाणानंतर दोन शतकांनी सम्राट अशोकाने लुंबिनी वनाला भेट देऊन तेथे स्तंभ उभा करून, त्या ठिकाणची बुद्धजन्माची खूण पटवली. त्या स्तंभावर बुद्धाचा जन्मवृत्तांत लिहिलेला आहे. लुंबिनी ही बुद्धाची जन्मभूमी म्हणून सम्राट अशोकाने त्या गावावरील कर कमी करून बुद्धजयंतीचा सोहळा साजरा केला. बुद्धाप्रमाणे इतरही धर्मसंस्थापकांच्या जन्माचे पुरावे किंवा त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे वेळोवेळी हाती येत गेल्यामुळे त्या सर्वांच्या ऐतिहासिकतेबाबत कोणताही संभ्रम उरलेला नाही.

राजकीय डावपेचांच्या ऐरणीवर

रामाविषयी चाललेल्या या वादविवादाला चिकित्सेची बाजू असती, तर या वादात इतिहाससंशोधक सामील झाले असते; पण हा विषय राजकीय ऐरणीवर येऊन दाखल झाला आहे आणि धर्माच्या नावाखाली त्याचा वापर करणारे व त्यांना विरोध करणारे, असे दोघेही हे राजकारण खेळत आहेत. पुरातत्त्वज्ञान आणि इतिहास या दोनही मुद्यांवर भारताच्या पुरातत्त्वविज्ञान खात्याने (आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) सर्वोच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र सादर केले, त्यात केलेले "राम हा ऐतिहासिक पुरुष होता याचा निणर्यात्मक पुरावा आजवर मिळालेला नाही" हे विधान अत्यंत योग्य होते; पण राजकारणापोटीच ते विधान नंतर प्रतिज्ञापत्रातून रद्द करावे लागले. 

इतिहासाची पार्श्वभूमी एखाद्या व्यक्तीला किंवा घटनेला नसणे, हे इतिहास किंवा त्या अन्वये रचण्यात येणाऱ्या भूतकाळाशी जरी संबंधित असले, तरी त्याचा संबंध कोणताही धर्म किंवा श्रद्धा यांच्याशी असत नाही. त्याबाबतीत मिळालेल्या निर्णायक पुराव्याचा संबंधही इतिहासाशीच असतो; धर्माशी नाही. एखाद्या 'अवतारा'चे अस्तित्व मान्य करणे ही श्रद्धेची बाब आहे; इतिहासाची नाही. ऐतिहासिकतेचा संशय घेणे ही बदनामी नव्हे. इतिहासकार एखाद्या धर्मश्रद्धेबाबत कायदेशीर प्रश्न विचारू शकत नाही; पण तिचा ऐतिहासिक मागोवा आणि एका विशिष्ट परिस्थितीत आणि कालखंडात तिला मिळालेला पाठिंबा किंवा झालेली वाढ यांच्याबाबतचे स्पष्टीकरण त्याला द्यावेच लागते.

जर एखाद्या धार्मिक बाबीविषयी लोकमनात-लक्षावधी लोकांच्या मनात तीव्र भावना असतील, तर मोठमोठी निदर्शने, हिंसाचार आणि अनेक निष्पाप जीवांच्या हत्या, या केवळ राजकीय लाभाच्या दृष्टिकोनातून योजिलेल्या गोष्टींची अजिबात आवश्यकता नसते. त्या धर्मश्रद्धा अभंग ठेवण्यासाठी पुरातत्त्वविद्या किंवा इतिहास यांना वापरणेही आवश्यक नसते. श्रद्धेला स्वत:चे स्वतंत्र स्थान व कार्य आहे, त्याचप्रमाणे पुरातत्त्वविद्या व इतिहास यांनाही आहे. या दोहोंचेही कार्यक्षेत्र स्वतंत्र आहे.

धर्मश्रद्धेच्या नावाखाली वाद उपस्थित करून ज्ञान आणि सत्यस्थिती यांची अवहेलना करू पाहणाऱ्या भारतीयांनी वैज्ञानिकांशी मात्र आजपर्यंत संघर्ष टाळला आहे. विज्ञान हे अद्याप राजकारण्यांच्या जाळ्याबाहेरच राहिले आहे. तरीही वैज्ञानिकांचा त्यांच्या कार्यक्षेत्रांत धार्मिक समजुतींच्या प्रश्नांशी संघर्ष चालू शकतो. या संदर्भात भारतीय समाजाची परिस्थिती काय आहे? जगातील इतर देशांत जागोजागी असे संघर्ष झाले आहेत. उदाहरणार्थ, कॅथॉलिक चर्च आणि गॅलिलियो या शास्त्रज्ञाचा पृथ्वीच्या भ्रमणावरून झालेला संघर्ष. 

अशा देशांत आजही राजकीय आघाड्या वैज्ञानिकांना अत्यंत कडवेपणाने विरोध करून वर्चस्व गाजवताना दिसत आहेत आणि ज्या ठिकाणी या धार्मिक आघाड्या कमी पडतात, या विज्ञानाचा विनाश करण्यासाठी त्या सत्ताधाऱ्यांनाही आवाहन करीत असतात. याचे एक कारण म्हणजे काही समाजात ज्ञानशाखांचे स्वतंत्र आणि अलग अस्तित्व मान्य झालेले असते; मग ती पुरातत्त्वविद्या असो, इतिहास असो किंवा खगोलशास्त्र असो. भारतात ही परिस्थिती आढळत नाही.

पाल्कच्या सामुद्रधुनीतील पाण्याखालील बांध कोणत्याही कारणासाठी तोडून टाकणे लक्षावधी भारतीयांच्या भावना दुखावणारे आहे, असे म्हणणे म्हणजे त्या श्रद्धेचेच मोल कमी करण्यासारखे आहे. श्रद्धा ही इतकी ठिसूळ आहे काय, की ती कोणत्या तरी अधिभौतिक शक्तीने निर्माण केला, अशी समजूत असणाऱ्या पाण्याखालील बांधांच्या आधाराने उभी राहते ? त्याचबरोबर निवडणुका जिंकून राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी केलेला श्रद्धांचा वापर हा त्या श्रद्धांचा खरा उपमर्दच नाही काय? फायदे मिळवण्यासाठी श्रद्धेला इतिहासाच्या विरोधात उभे केले जाते. आणि त्या मागची मानसिकता त्या दोहोंनाही राजकारण्यांच्या हातांतील प्यादी बनवण्याचीच असते.

धर्मश्रद्धा आणि ज्ञान यांच्यामधील संघर्ष पेटता ठेवण्यामागे किमान दोन हेतू असतात. एक म्हणजे या संघर्षाचे रूपांतर राजकीय प्रचारयंत्रणेत करून घेणे; जे निवडणुकांच्या लगतच्या कालखंडात फार उपयुक्त असते. गेल्या वीस वर्षांत याची पद्धत आणि उद्दिष्टे ही लोकांना सर्वपरिचित झाली आहेत. दुसरा हेतू म्हणजे लोकांसमोर जे अतिमहत्त्वाचे प्रश्न असतात व जे शासनाकडून सोडवले जावेत अशी त्यांची अपेक्षा असते, त्यांच्यावरून या संघर्षाच्या आधारे लक्ष उडवून काही किरकोळ भावनात्मक प्रश्नांचे भूत त्यांच्यासमोर उभे करणे. आज उभा केलेला रामसेतूचा प्रश्न अशाच प्रकारचा आणि लोकांच्या अगत्याच्या प्रश्नांवरून लक्ष उडवणारा आहे.

आता फक्त या रामसेतू प्रकल्पाचा विचार करायचे ठरवले, तर खरा राम अस्तित्वात होता की नाही, किंवा समुद्राखालील बांध अगर त्याचा काही भाग हा त्यानेच बांधला होता की नाही, यांचा वस्तुस्थितीशी किंवा प्रकल्पाच्या उद्दिष्टांशी काही संबंध नाही; तर यापेक्षा कितीतरी वेगळे आणि निकडीचे प्रश्न, ज्यांची उत्तरे धर्मश्रद्धा किंवा पुरातत्त्वविद्या या दोनही गोष्टी देऊ शकणार नाहीत, असे या प्रकल्पाशी संबंधित आहेत. या प्रकल्पातून होणारे लाभ किंवा होणारा विनाश या दोहोंचाही साधकबाधक विचार करण्यासाठी अतिशय चाणाक्ष आणि कुशल तंत्रज्ञांमध्ये चर्चा होऊन काही निष्कर्ष काढण्याची गरज आहे. हा नैसर्गिक बांध दूर केला तर त्यामुळे सामुद्रिक जीवनाची, पर्यावरणाची काही हानी होईल का; त्यामुळे दक्षिण भारत व श्रीलंका यांचे किनारे उघडे पडल्यामुळे वादळे आणि प्रसंगी त्सुनामीसारखे सागरी संकट यांना तोंड द्यावे लागेल का, या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. त्याचबरोबर असे नुकसान टाळण्यासाठी या प्रकल्पाचे नियोजन व रचना कशाप्रकारे केली पाहिजे यावरही प्रदीर्घ चिंतन झाले पाहिजे.

अशा प्रकारच्या प्रकल्पापासून, दळणवळण व संपर्क वाढवण्यासाठी उपाय योजून मिळणारे आर्थिक फायदे किती आहेत, याची प्रथम तपशीलवार चर्चा झाली पाहिजे. त्याचबरोबर स्थानिक रहिवाशांच्या प्रचलित किंवा भविष्यकालीन जीवनमानावर त्याचे काय परिणाम होणार आहेत, प्रकल्पातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यांचे लोण त्यांच्यापर्यंत पोचणार आहे काय, हेही पाहिले पाहिजे. जर त्यांचे काही नुकसान होणार असेल, तर त्यांच्या पुनर्वसनाची काही योजना आहे काय, याचाही विचार या प्रकल्पाच्या संदर्भात आवश्यक आहे. राजकारणी आणि माध्यमे यांनी फायदेशीर बाजूंचा बराच गवगवा केलेला असला तरी किनाऱ्याजवळ राहणाऱ्या व तेथेच उपजीविका करणाऱ्या श्रमिकांची दखल घेतलेली दिसत नाही. 

आणखी एक लक्षात घ्यावयाची महत्त्वाची बाब म्हणजे बहुराष्ट्रीय अर्थ व व्यापार संघटना आणि त्यांचे भारतीय भागीदार यांची या प्रकल्पातील नेमकी भूमिका कोणती? या अशा भव्य प्रकल्पात वेगवेगळ्या विभागांना लागणाऱ्या आर्थिक पुरवठ्याची व रचनेवरील नियंत्रणाची जबाबदारी कोण घेणार? जेव्हा या सर्व प्रश्नांची उत्तरे सामग्न्याने आणि पारदर्शकपणे मिळतील, तेव्हाच या प्रकल्पाच्या निमित्ताने सुरू झालेल्या हालचालींबाबतचे काही धागेदोरे आपल्या हाती लागू शकतील. सध्या तरी 'सेतुसमुद्रम' प्रकल्पाशी वरील सर्व प्रश्न संबंधित असून त्यांनी या देशातील सार्वजनिक अवकाश व्यापून टाकला आहे.

('इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली' वरून साभार)

Tags: ग्रीक-लॅटिन 'रामायण उत्खनन स्थळ किंवा घटना व्यक्ती अयोध्येचे वर्णन रामायणाचा काळ Historical monuments without history देशोदेशीचे अवतार weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रोमिला थापर

निवृत्त प्राध्यापक , जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. भारतीय इतिहासकार.   
(प्राचीन भारतीय इतिहासाचे संशोधन,  भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन.)
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके