डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विविधतेचा स्वीकार करण्याची शिकवण मिळाली...

माझ्या भारतातील खाद्यभ्रमंतीतून मला शिकण्याचा एक नवा रस्ताच सापडला. या खाद्यभ्रमंतीमुळे दक्षिण आशियाई संस्कृतीची जास्त ओळख झाली, विविधतेचा स्वीकार करण्याची शिकवण मिळाली. (जुन्या दिल्लीतील चावडी बाजारमधील बिर्याणीपासून ते केएफसीपर्यंतचे नॉनव्हेज जेवण घ्यायचो. तसेच गुजरात भवन आणि राजस्थानला दिलेल्या भेटींमधून शाकाहारी जेवणाबाबत असणारे गैरसमज दूर झाले.

‘सार्क युनिव्हर्सिटीतला काळ माझ्या ॲकॅडमिक आयुष्यात कायमच झळाळत राहील’, असे एक वाक्य म्हणजे इतरांना नम्र सुरुवात वाटेल. पण या वाक्याचा अर्थ माझ्या दृष्टिकोनातून उलगडून दाखवायचा म्हणजे अनेक पाने खर्ची घालावी लागतील. त्यामुळे या लेखात त्यातले काही महत्त्वाचे तेवढे सांगायचा प्रयत्न करतो. 

एका सुशिक्षित आणि अतिशय प्रामाणिक अशा कुटुंबात मी वाढलो. आई-वडिलांनी माझ्यावर ‘अभ्यासाशिवाय आयुष्यातले उद्दिष्ट साध्य करता येणार नाही’ अशी शिकवण ठसवण्याचा प्रयत्न सातत्याने केला... आणि माझे प्रयत्न व प्रामाणिकपणा यांच्या जोरावर बांगलादेशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांमध्ये मला शिकता आले. सेण्ट जोसेफ हायस्कूल, नोत्रे डेम कॉलेज आणि ढाका युनिव्हर्सिटी या तीन elite संस्थांमध्ये माझे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. मी त्या संस्थांच्या कठीण प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण व्हायचो तेव्हाचे माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचे हास्य मी कधीच विसरू शकणार नाही. पदवीपर्यंतच्या काळात वर्गात जे शिकवले जाते, त्याविषयी माझ्या आई-वडिलांना (दुपारी किंवा रात्री) आम्ही जेवायला बसायचो तेव्हा सांगणे ही सवय मला होती. या चर्चांचा शेवट नेहमी ‘वाचाल तर खूप शिकाल’ आणि ‘उत्तम अभ्यासाद्वारेच तुम्ही मानवी संस्कृतीसाठी काही योगदान देऊ शकाल’ अशा सल्ल्यांनी होत असे. 

त्यांना माझ्या भविष्याची चिंता असल्यामुळेच ते माझी काळजी घेत असत. त्यांनी माझ्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न वाया गेले नाहीत. त्यांच्यामुळेच ‘वाचन आणि लेखन’ यांच्याशी माझे रोमँटिक अफेअर सुरू झाले. सार्क युनिव्हर्सिटीतील प्रतिष्ठेची ‘प्रेसिडेंट स्कॉलरशिप’ मिळाल्याने माझ्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला. ढाका ते दिल्ली या विमानप्रवासाचे तिकीट वडिलांनी माझ्या हातात ठेवले, तेव्हा स्वातंत्र्याची एक तीव्र भावना माझ्या शरीरातून सळसळत गेली. (अर्थात हा माझा देशाबाहेर जाण्याचा काही पहिलाच अनुभव नव्हता. मी त्यापूर्वी नेपाळला जाऊन आलो होतो). आनंद आणि अभिमानाच्या भावनेने माझे अंतःकरण उचंबळून आले होते. सार्क युनिव्हर्सिटीत मीच माझा पालक असणार होतो. शिकण्याची तहान भागवण्यासाठीचे स्वातंत्र्य मला मिळणार होते. माझ्या आई-वडिलांनी मला हे स्वातंत्र्य घेऊ दिले, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. 

सार्क युनिव्हर्सिटीतील होस्टेलमुळे मला एक अविस्मरणीय अनुभव घेता आला. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील (इरिट्रियातील) सहाध्यायांपासून मला खूप शिकता आले. रात्रीच्या जेवणापूर्वी किंवा जेवणानंतरच्या वेळेत होणाऱ्या गप्पा दक्षिण आशियाई दृष्टिकोन समजून घ्यायला फार उपयुक्त आहेत, असे माझ्या लक्षात आले. त्या वेळेत आम्ही (सार्क युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी) होस्टेलच्या कॉरिडॉरमध्ये किंवा कॅम्पसमध्ये जमत असू आणि प्रचलित घडामोडींवर चर्चा करत असू. आता मला (त्या गप्पांमधील) कोणताच एक स्पेसिफिक असा विषय सांगता येत नाहीये. मात्र हे मान्य केले पाहिजे की, अशा ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्समुळे प्रत्येक विषयाकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात, हा धडा मला शिकायला मिळाला. 

मला वाटते (ज्यांच्याशी चांगल्या चर्चा होऊ शकतील), असे लोक होस्टेलमध्ये असणे, ही माझ्यासाठी मोठीच फायद्याची गोष्ट होती. (युनिव्हर्सिटीतले) शिक्षक, भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि संशोधन संस्थांमधले लोक यांच्यासोबतच्या चर्चांमुळे मला दक्षिण आशियाई दृष्टिकोन अधिक नेमकेपणाने समजून घेता आला. तसेच माझी एकूण समज बरीच वाढली. माझ्या खाद्यभ्रमंतीच्या वर्णनाशिवाय आणि ग्रंथालयांना दिलेल्या भेटींशिवाय, दिल्लीतील माझ्या दोन वर्षांचे वर्णन पूर्ण होणार नाही. भारतातील खाद्यभ्रमंतीतून मला शिकण्याचा एक नवा रस्ताच सापडला. या खाद्यभ्रमंतीमुळे दक्षिण आशियाई संस्कृतीची जास्त ओळख झाली, विविधतेचा स्वीकार करण्याची शिकवण मिळाली. (जुन्या दिल्लीतील चावडी बाजारमधील बिर्याणीपासून ते केएफसीपर्यंतचे नॉनव्हेज जेवण घ्यायचो. तसेच गुजरात भवन आणि राजस्थानला दिलेल्या भेटींमधून शाकाहारी जेवणाबाबत असणारे गैरसमज दूर झाले. अशा या खाद्यभ्रमंतीमध्ये निवडक मित्रही सोबत असायचे.) 

दिल्लीतील ग्रंथालयांमुळे माझी अभ्यासाची क्षितिजे फारच विस्तारली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, इंडियन स्कूल ऑफ इंटरनॅशनल लॉ आणि सार्क युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमुळे इतकी वर्षे दूरवर राहिलेली ज्ञानकेंद्रे आवाक्यात आली होती. या ज्ञानमंदिरांमुळे मला माझे वाचन, लेखन आणि संशोधन यात सुसंगती आणता आली. (दिल्लीत उपलब्ध सुविधांमुळे मला दोन वर्षांत एकूण तीसपेक्षा जास्त पेपर्स लिहिता आले, त्यांचा अमेरिकेत प्रवेश घ्यायला खूप उपयोग झाला.) या लेखामुळे मला त्या ज्ञानकेंद्रांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. साधेपणा, (इतरांचे मोकळेपणाने) कौतुक करणे आणि परमतसहिष्णुता हे खऱ्या संशोधकाचे दागिने असतात, हे मला इथेच शिकता आले. 

सार्क युनिव्हर्सिटीत घालवलेल्या दिवसांविषयी विचार करताना, माझे यश आणि मला इथे मिळालेली शिकवण यांचे चर्वितचर्वण मनातल्या मनात होत राहते. मला असे जाणवत राहते की, सार्क युनिव्हर्सिटीच्या स्वरूपामुळेच दक्षिण आशियाशी संबंधित विषयांच्या खोलात मी जाऊ शकलो. दक्षिण आशियाशी संबंधित समस्या आणि ज्या प्रश्नांचा मी अभ्यास केला ते प्रश्न यांचे स्वरूपच असे आहे की, तिथे कायदा आणि आंतरराष्ट्रीय राजकारण एकत्र येतात. (सार्क युनिव्हर्सिटीमध्ये असतानाही International Relations या डिपार्टमेंटमध्ये माझे अनेक मित्र होते. त्यांच्याशी सार्कचे भवितव्य, बांगलादेश-श्रीलंका-भारत यांच्यातील सागरविषयक सहकार्य, मासेमारी आणि जलवाहतूक यासंबंधीचे प्रश्न याबाबत चर्चा व्हायची.) या प्रश्नांना मी माझे ॲकॅडमिक लेखन आणि संशोधन याद्वारे प्रतिसाद दिला. 

दक्षिण आशियाच्या प्रश्नांशी संबंधित माझे काम वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत/ परिसंवादांत मांडण्याची संधी मिळाली. (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतील सेमिनारमध्ये, केवळ तिथे येणाऱ्या लोकांशी संवाद साधता यावा म्हणून मी खास जेएनयूच्या होस्टेलमध्ये जाऊन राहिलो होतो. फावल्या वेळेत तिथल्या ग्रंथालयातही मी जात असे.) चर्चासत्रांच्या निमित्ताने मी भारतातल्या अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. यामध्ये दिल्ली, गुजरात, जोधपूर, ओडिशा यांचा समावेश होतो. त्यांपैकी गुजरातमधील चर्चासत्रात मला पुण्याच्या कॉलेजातील काही तरुण प्राध्यापक भेटले होते! 

या चर्चासत्रांमध्ये मी दक्षिण आशियाच्या भविष्याच्या दृष्टीने आवश्यक विषयांवर  प्रेझेन्टेशन्स दिली. माझ्या त्या पेपर्समधून शॉर्ट टर्म प्रश्नांना उत्तरे मिळणार नाहीत. मात्र दीर्घ काळासाठी उपयुक्त असे उपाय सुचवण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे आज मला याचे समाधान आहे की, दक्षिण आशियाचे गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मला थोडे काम (सार्क युनिव्हर्सिटीमध्ये असताना) करता आले. 

0 0 

(सार्क युनिव्हर्सिटीमध्ये असताना रुबाईयतने south asia canteen’ या नावाचा एक ब्लॉग स्वतंत्रपणे चालवला होता, त्याला कोणाचीही मदत नव्हती. या ब्लॉगवर काही निवडक (रुबाईयतला हुशार वाटणाऱ्या!) विद्यार्थ्यांच्या असाईनमेंट्‌स, पुस्तक परीक्षणे, रिसर्च पेपर्स वगैरे अपलोड केले जात असत. या ब्लॉगसाठी काही लेख लिहून घ्यावेत यासाठी रुबाईयतने प्रयत्न केले होते, त्यात त्याला फार यश आले नाही. मात्र इतर विद्यार्थ्यांना त्याच्या या उपक्रमामागील उत्साहाविषयी फार कुतूहल वाटत असे. दक्षिण आशियातल्या चांगल्या मुलांचे लिखाण जगासमोर आणणे आणि दक्षिण आशियाविषयक लेखन एकत्र उपलब्ध करून देणे, असा त्या ब्लॉगचा हेतू होता. 

अनेक विद्यार्थ्यांनी त्या ब्लॉगला प्रतिसादही चांगला दिला. काही निवडक कार्यक्रमांचे वृत्तांत, फोटोसुद्धा तिथे टाकले जात असत. असा ब्लॉग चालवणे ही रुबाईयतची हौस होती. या ब्लॉगला कोण भेटी देत आहे (आणि कोणत्या देशातून) यावर तो लक्ष ठेवत असे. बऱ्याचदा तो आम्हाला सांगत असे की, ‘गेल्या आठवड्यात चारशे लोकांनी ब्लॉग पाहिला, त्यांपैकी ७० लोक ब्राझीलमधले होते,’ वगैरे. तो स्वतः सार्क युनिव्हर्सिटीमध्ये होता तोपर्यंत ब्लॉग चांगला चालला. - अतिथी संपादक)

रुबाईयतने सार्क युनिव्हर्सिटीमधून LLM (२०१२-१४) केले आहे. सध्या तो अमेरिकेत सागरविषयक कायद्यांवर संशोधन करीत आहे.
 

Tags: सार्क विद्यापीठ बांगलादेश रुबाईयत रेहमान saarc university LLM bangladesh Rubaiyat rehman weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके