डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘हिंदुत्ववाद- एक फेरमांडणी’ : प्रतिक्रियांना उत्तरे (पूर्वार्ध)

कुराणात पूर्वप्रेषितांचा उल्लेख अनेकदा येतो. या प्रेषितांनी सांगितलेला धर्म इस्लामच होता, या पूर्वप्रेषितांनी हा धर्म स्वीकारा असे लोकांना आवाहन केले, पण कुणीही स्वीकारला नाही, अशा अनेक लोकसमूहांना दुष्काळ, वादळ, पूर, भूकंप इत्यादी नैसर्गिक प्रकोप घडवून आणून अल्लाने समूळ नष्ट केले, अशा पूर्वप्रेषितांच्या कथा आहेत.3 ‘आमच्या संदेशांना नकार देणाऱ्या काफिरांचा आम्ही पूर्णपणे उच्छेद केला’असे कुराणात वारंवार म्हटले आहे.(उदा. 7.72, 11.58-60, 51.42 इत्यादी) श्रद्धाहीनांना (काफिरांना) ‘पृथ्वीवर हक्क नसताना राहणारे’असेही कुराणात म्हटले आहे (41.15). ‘समूळ नष्ट करणे’याचा अर्थ ‘इस्लामचा स्वीकार न करणारांना मृत्युदंड’असाच होतो. तो एक प्रकारचा काफिरांविरुद्ध जिहादच आहे.

‘साधना’च्या 11-18 ऑगस्टच्या विशेषांकात माझा लेख ‘हिंदुत्ववाद- एक फेरमांडणी’या मथळ्याखाली प्रसिद्ध झाला.त्यावर एकूण चार प्रतिक्रिया आल्या आहेत. 22 सप्टेंबरच्या अंकात हुसेन जमादार (व आणखी दोन लेखक) व मधु वाणी यांचे व 27 ऑक्टोबरच्या अंकात प्रदीप देशपांडे व रमेश आगाशे यांचे माझ्या लेखावर टीका करणारे लेख आले आहेत. या सर्वांना वेगवेगळी उत्तरे न देता एकत्रितपणे देत आहे.

1. ‘ही कसली फेरमांडणी...(?)’ असा प्रश्न मधु वाणी यांनी आपल्या लेखाच्या शीर्षकातच विचारला आहे. त्यामुळे सुरुवातीला माझी भूमिका स्पष्ट करतो.

आजचा रूढ हिंदुत्ववाद संघपरिवाराचा आहे, त्याच्या बव्हंशी विरोधात माझी मांडणी आहे.

मी हिंदू राष्ट्राचे प्रतिपादन केलेले नाही. माझ्या दृष्टीने भारतीय किंवा हिंदी राष्ट्रवाद ही आदर्श स्थिती आहे. (मात्र ती आजच प्रत्यक्षात आलेली नाही, अशी माझी धारणा आहे.) धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेवर व लोकशाहीवर माझी नितांत श्रद्धा आहे. या राज्यसंस्थेत सर्वांना धर्मनिरपेक्षपणे समान अधिकार आहेत. त्यामुळे हिंदुवर्चस्वाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मात्र प्राप्त परिस्थितीत हिंदू संघटन होणे गरजेचे आहे असे मला वाटते माझा हिंदुत्ववाद म्हणजे केवळ हिंदू संघटनवाद आहे. हे हिंदू संघटन निधर्मी राज्यसंस्थेच्या चौकटीत करता येते हे मी दाखवले आहे. मात्र ते कोणत्याही राजकीय पक्षाने न करता नागरी समाजातील (सिव्हिल सोसायटीमधील) एखाद्या स्वयंस्फूर्त संस्थेने केले पाहिजे. शिवाय माझ्या कल्पनेतला हिंदू समाज जातिविहीन व विज्ञाननिष्ठ असणार आहे.

कोणत्याही अन्यायग्रस्त लोकसमूहाने अन्याय करणारांविरुद्ध संघटित होणे हे स्वाभाविक आणि इष्टही आहे; तो दुसऱ्या लोकसमूहावर अन्याय करू लागला तर ते निषेधार्ह आहे. दुसऱ्यावर वर्चस्व गाजविणे अन्याय्य आहे. माझ्या मांडणीत वर सांगितल्याप्रमाणे वर्चस्ववाद नाही आणि इतरही अन्याय्य हेतू नाहीत.

हिंदूंवर हिंदू म्हणून होणाऱ्या अन्यायांपैकी दोन प्रमुख अन्यायांचा उल्लेख मी केला आहे. एक जगण्याच्या हक्कावर आघात आणि दुसरा स्वातंत्र्यावर आघात. पहिला जिहादच्या इस्लामी तत्त्वामधून निर्माण होतो आणि दुसरा मुख्यतः सामूहिक धर्मांतरातून (मास कॉन्व्हर्शन) निर्माण होतो. दोन्हींचे आणखीही आनुषंगिक परिणाम आहेत. (या विषयांचे अधिक स्पष्टीकरण पुढे येणार आहे.) 

2. माझ्या विवेचनात प्रामुख्याने इस्लाम आणि गौणत्वाने ख्रिस्ती मिशनरी यांवर मी शस्त्र धरले आहे. मी टीकाकारांच्या आणि इतर वाचकांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, इस्लामची चिकित्सा जे हिंदुत्ववादी नाहीत त्या विचारवंतांनीचअधिक केली आहे. त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत, प्रा.अ.भि.शहा आहेत आणि खास सेवादलीय प्रा.नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई आहेत. (14 जुलै 2007 च्या साधनाच्या अंकात कुरुंदकरांवर संपादकीय लेख आहे, त्यात त्यांच्या या थोर कार्याचा उल्लेख आलेला नाही.) मी मुस्लिमद्वेष्टा असेल तर हे बिगर-हिंदुत्ववादी विचारवंत माझ्यापेक्षा जास्त मुस्लिमद्वेष्टे ठरतील.

शहा, कुरुंदकर आणि दलवाई यांना, इस्लामच्या प्रेरणेतून मुसलमान हिंदू समाजावर आक्रमण करीत आहेत हे मान्य होते; पण त्याचा तर्कसंगत निष्कर्ष हिंदू संघटन हा आहे, येथपर्यंत ते आले नाहीत आणि प्रचलित हिंदुत्ववाद जर त्यांना मान्य नसेल, तर त्यात कोणत्या दिशेने सुधारणा व्हावी हे त्यांनी सुचविलेले नाही.हिंदुत्ववाद त्यांनी पुरेशा गांभीर्याने विचारात घेतलाच नाही.

3.आता जमादार (आणि दोन सहलेखक) यांनी घेतलेल्या आक्षेपांचा विचार करू. हिंदू समाजाचे आज अधिक विघटन झाले आहे असे मी लिहिले. त्यावर जमादारांचे भाष्य असे...

‘...विघटनाला इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म जबाबदार नाहीत.’मी तसे म्हटलेलेच नाही! पुढे जमादार म्हणतात, ‘मूळ धर्माची चौकटच समाजाचे विघटन करणारी आहे, हे सत्य कधीतरी स्वीकारणार आहात की नाही?’ते मी मूळ लेखातच स्वीकारलेले आहे!

4. ‘इस्लाम इतर धर्मीयांना स्वर्ग नाकारतो’असे मी म्हटले, त्यावर जमादारांचा आक्षेप आहे. मी आणखी असे म्हणावयास हवे होते की, ‘तो इतर धर्मीयांना (काफिरांना) नरकात पाठवतो.’

या ठिकाणी इस्लामचे एक वैशिष्ट्य लक्षात घेतले पाहिजे.मुसलमान म्हणून जन्माला आल्याबरोबर किंवा इस्लाम धर्म स्वीकारल्याबरोबर स्वर्गाची हमी मिळते. इस्लामनुसार पाप-पुण्याचा हिशेब ‘आखिरियत’च्या (‘निर्णयदिना’च्या) वेळी मिळाल्यानंतर क्रमाने अधिकाधिक सुखे असणाऱ्या सातपैकी कुठल्यातरी स्वर्गात जागा हमखासमिळते. हिंदू (वैदिक) धर्म स्वर्गाची हमी देत नाही. पुण्यातून पाप वजा करून जर ‘शिल्लक’ उरली तरच स्वर्ग मिळतो. शिवाय कोणत्याही देवाची उपासना हिंदूला चालते किंवा देव न मानताही तो हिंदू राहू शकतो. हिंदू धर्म बिगर हिंदूंना स्वर्ग नाकारीत नाही आणि त्यांची नरकात पाठवणी करीत नाही. ऋग्वेद काळापासून (‘एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति।’) तो तहत संघाच्या गुरुजींपर्यंत ही परंपरा चालू आहे. गुरुजी म्हणतात, ‘सामाजिक जीवनातील... विविध कर्तव्ये पार पाडल्यावरही कोणी म्हटले की, “मी कुराण शरीफचा किंवा बायबलचा अभ्यास केला आहे, त्या उपासनापद्धतीविषयी मला अधिक आपुलकी वाटते; त्या मार्गानेच मला ईश्वराची अधिक चांगल्या प्रकारे आराधना करता येईल,”तर त्याला आमची मुळीच हरकत नाही.’1

‘मरणोत्तर सुख-समृद्धीची एक जागा’या सर्वसामान्य अर्थाने मी ‘स्वर्ग’हा शब्द वापरला आहे, विशेषनाम म्हणून नाही. पण प्रत्येक धर्माच्या स्वर्गाचे नाव निराळे, इस्लामच्या स्वर्गाचे नाव ‘जन्नत’.
त्या नावाचा स्वर्ग हिंदूंना इस्लाम नाकारतो. हिंदूंना त्यांचा ‘स्वर्ग, वैकुंठ किंवा कैलास’आहेच- असा शाब्दिक खेळ जमादारांनी केला आहे. ‘जन्नत’केवळ मुसलमानांसाठी आणि ‘जहन्नम’ (नरक) इतर काफिरांसकट हिंदूंसाठी असे कसे होईल?

‘इस्लाम धर्म सर्वांना स्वर्ग नाकारतो असे म्हणण्यापेक्षा “अल्लाच्या मर्जीवर ते अवलंबून आहे असे मानतो”- असे म्हणणे बरोबर ठरेल,’असे जमादार म्हणतात. म्हणजे हा मनमानी कारभार आहे आणि इस्लामच्या तत्त्वाच्या विरोधी आहे. इस्लामचे तत्त्व मुसलमान असल्याशिवाय किंवा झाल्याशिवाय स्वर्ग नाही आणि काफिरांना नरक ठेवलेलाच आहे.

5. ‘जगातील सर्व मानवजातीचे कल्याण होऊ दे!’अशी प्रार्थना सामुदायिक नमाजाच्या वेळी केली जाते- इति जमादार.यासाठी इस्लामचे स्वरूप समजावून घेतले पाहिजे. अल्लाने पृथ्वी निर्माण केली, तीवर अनेक प्रेषितांनंतर एक ‘अखेरचा’प्रेषित मोहंमद यांना पाठविले व अखेरच्या प्रेषिताला कुराणातल्या आरती सांगितल्या; त्यामुळे कुराणात सांगितलेला धर्म परिपूर्ण आहे, त्यात सुधारणा करण्यास वाव नाही. याचाच अर्थ इतर धर्मांना अस्तित्वात असण्याचा अधिकार नाही. म्हणूनच मुसलमानांना स्वर्गव काफिरांना नरक. इतरांना नरकापासून वाचविणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. सर्व मानवजात मुसलमान होईपर्यंत हे कर्तव्य चालू राहणार आहे.

अल्लाचा धर्म न पाळणारे ते काफिर. त्यांचे कल्याण अल्ला कसे करील? आणि त्याला तसे कर अशी प्रार्थना तरी कशी करता येईल? जर काफिरांचे कल्याण होत असेल तर आपला काफिरपणा सोडून अल्लाला एकमात्र देव मानण्याची काफिराला काय गरज आहे? त्याला इस्लाम स्वीकारासाठी ‘दावत’ (निमंत्रण) देण्याची मुस्लिमांना काय गरज असणार?

वरील प्रार्थनेचा खरा अर्थ असा आहे की, ‘ ...सबंध मनुष्यजात इस्लामधर्मीय बनू दे आणि त्यामुळे कल्याणास पात्र होऊ दे.’

6. ‘एखाद्याने मुसलमान होण्याचे नाकारले तर त्याला मृत्युदंडाची शिक्षा सांगितले आहे’व ‘जिहाद म्हणजे धर्मयुद्ध आहे’ही विधाने जमादारांना आक्षेपार्ह वाटतात.

कुराणाच्या व हादिसच्या मूळ तत्त्वापासून निघणारा हा निष्कर्ष आहे. काफिर हा पशुसमान आहे, त्याहूनही नीच आहे, अन्यायी, अत्याचारी, मूढ, एवढेच नव्हे तर अल्लाचा शत्रू आहे (2-98), तो बंडखोर आहे, विद्रोही आहे, अशी कुराणाची भूमिका आहे.प्रेषिताने हदीसमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, ‘मला लोकांविरुद्ध तोपर्यंत युद्ध करण्यास सांगितले आहे की जोपर्यंत ते म्हणणार नाहीत की, अल्ला हा फक्त एकच (देव) आहे.’2

7. जमादारांनी सर्वश्रेष्ठ जिहाद (जिहाद-ए-अकबर) म्हणजे स्वत:शी संघर्ष, त्यापेक्षा कनिष्ठ प्रतीचा जिहाद (जिहाद-ए-असगर) हा दुसऱ्याविरुद्ध केलेला सशस्त्र जिहाद असतो असे म्हटलेआहे ते बरोबर आहे. कनिष्ठ जिहादचा एकच प्रकार, स्वसंरक्षणासाठी शस्त्र हातात घेणे, हा जमादार यांनी उल्लेखिला आहे. पण दुसरा प्रकार उल्लेखिलेला नाही; तो आहे काफिरांविरुद्ध शस्त्राचार.

कुराणात पूर्वप्रेषितांचा उल्लेख अनेकदा येतो. या प्रेषितांनी सांगितलेला धर्म इस्लामच होता, या पूर्वप्रेषितांनी हा धर्म स्वीकारा असे लोकांना आवाहन केले, पण कुणीही स्वीकारला नाही, अशा अनेक लोकसमूहांना दुष्काळ, वादळ, पूर, भूकंप इत्यादी नैसर्गिक प्रकोप घडवून आणून अल्लाने समूळ नष्ट केले, अशा पूर्वप्रेषितांच्या कथा आहेत.3 ‘आमच्या संदेशांना नकार देणाऱ्या काफिरांचा आम्ही पूर्णपणे उच्छेद केला’असे कुराणात वारंवार म्हटले आहे.(उदा. 7.72, 11.58-60, 51.42 इत्यादी) श्रद्धाहीनांना (काफिरांना) ‘पृथ्वीवर हक्क नसताना राहणारे’असेही कुराणात म्हटले आहे (41.15). ‘समूळ नष्ट करणे’याचा अर्थ ‘इस्लामचा स्वीकार न करणारांना मृत्युदंड’असाच होतो. तो एक प्रकारचा काफिरांविरुद्ध जिहादच आहे.

सूरह म्हणजे कुराणातील प्रकरण. नवव्या सूरहमध्ये एकूण 129 आयती आहेत. सूरह क्र.9 मध्ये विविध प्रकारच्या लोकांविरुद्ध सशस्त्र जिहाद करण्याच्या स्वतंत्र आज्ञा आलेल्या आहेत. पहिल्या सहा आयती अनेकेश्वरवादी काफिरांविरुद्ध असा जिहाद करण्यासाठी आल्या आहेत. ‘ते पश्चात्ताप पावेपर्यंत’ त्यांच्याशी लढण्याचा व त्यांना ठार मारण्याचा त्यात आदेश आला आहे, याचा अर्थ ‘अल्लाकडे पश्चात्ताप पावेपर्यंत’ असा आहे आणि इस्लामचा स्वीकार केल्याशिवाय अल्ला पश्चात्ताप स्वीकारीत नाही. म्हणून त्याचा खरा अर्थ ‘इस्लाम स्वीकारीपर्यंत’असा आहे.

या सूरहमधील 29व्या आयतीत ग्रंथधारक काफिरांविरुद्ध लढण्याचा आदेश आहे. जर ग्रंथधारकांनी मांडलिक बनण्यास नकार दिला तर त्यांना ठार मारण्यापर्यंत लढायचे आहे.

या सूरहमधील 73व्या आयतीत मुस्लिमांतील दांभिकांविरुद्ध जिहाद करण्याचा आदेश आहे.

तसेच 123व्या आयतीत ‘नजीकच्या काफिरां’ विरुद्ध जिहाद करण्याचा आदेश आहे. येथे ‘नजीकचे काफिर’याचा अर्थ अरब भूमीनजीकचे देश असा आहे. अरबभूमी इस्लाममय झाल्यानंतर क्रमाने नजीकचे देश इस्लामी करीत जाण्यासाठी आलेला हा जिहादचा आदेश आहे.

नवव्या सूरहचे आणखी एक महत्त्व आहे. कुराणातल्या आयती कालक्रमाने म्हणजे जसजशा त्या अवतरल्या, त्या क्रमाने दिलेल्या नाहीत. कुराणात एकूण 114 सूरह आहेत. कुराण ग्रंथातील 9वी सूरह ही अवतरणक्रमाने 113 वी आहे, म्हणजे प्रेषिताच्या अगदी अखेरच्या काळातील आहे. याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे प्रेषितांचा परिपक्व विचार या सूरहमध्ये प्रकट झाला आहे. दुसरा म्हणजे मागे आलेल्या सर्व ‘अहिंसक’किंवा ‘सहिष्णु’आयती यानंतर आलेल्या आयतीमुळे बाद ठरतात. नमुन्यादाखल 9व्या सूरहमधील एक आयत घेऊ.

‘मग जेव्हा हे पवित्र चार महिने संपतील तेव्हा (हे श्रद्धावानांनो) जेथे सापडतील तेथे या मूर्तिपूजकांना ठार करा, त्यांना कैद करा, घेरा आणि त्यांचा समाचार घेण्यासाठी मोक्याच्या जागेवर दबा धरून बसा. परंतु ते जर पश्चात्ताप पावतील, नमाज अदा करतील व जकात देतील तर त्यांना जोडून द्या. अल्ला क्षमा व दया करणारा आहे’, (9.5) शिवाय पुढच्या आयतीही जमादारांनी पाहाव्यात.2.193, 216, 4.74, 76, 8.65, 67.4 

8. माझे म्हणणे ‘धादांत खोटे’असल्याचा आरोप करून जमादार सांगतात, ‘भारतात जवळजवळ सलग सातशे वर्षे मुसलमानांची राजवट होती. तरीही इथे 85% हिंदू कसे शिल्लक राहतात?’

प्रश्न इस्लामच्या तत्त्वाचा आहे. व्यवहारात प्रत्येक काळी, प्रत्येक परिस्थितीत ते अंमलात आणणे मुस्लिमांना जमले नाही हे खरे आहे. सार्वत्रिक इस्लामीकरण झाले नाही याची आणखीही काही कारणे आहेत. एक म्हणजे रजपूत, मराठे व शीख यांनी केलेला प्रतिकार. दुसरे म्हणजे मुस्लिम राज्यकर्त्यांना  कर देण्यासाठी हिंदू प्रजा हवी होती.
दुसरी एक गोष्ट. भारतात हिंदूंना जिझिया कर देऊन ‘संरक्षित’समूह (‘धिम्मी’) म्हणून (पण अपमानित स्थितीत) राहण्याची सवलत मिळाली. ही सवलत ‘किताबी’लोकांना देण्यात येते.किताबी किंवा ग्रंथधारक यांचे म्हणजे ज्यू, ख्रिश्चन व मुस्लिम यांचे प्रेषित एकच आहेत व जुना करार, नवा करार हे ग्रंथ मुस्लिमांना (काही भाग वगळून) आदरणीय आहेत. शिवाय ते एकेश्वरी आहेत आणि तत्त्वतः मूर्तिपूजक नाहीत. हिंदूंना ही सवलत मिळाली याचे कारण इस्लामच्या चार धर्मपरंपरांपैकी ‘हनाफी’परंपरा हिंदूंना लागू करण्यात आली. इतर तीन प्रमुख धर्मपरंपरांना हे मान्य नव्हते.कुरुंदकरांचे या बाबतीतील भाष्य वाचण्यासारखे आहे.5 

जमादार यांचे जिहाद नावाचे आत्मकथन मी वाचलेले आहे.हमीद दलवाईंच्या नेतृत्वाखाली मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे गेली 35 वर्षे ते काम करीत आहेत हे मला माहीत आहे. त्यांना फक्त दलवाईंच्या एका विधानाची आठवण करून देतो. मुस्लिम पुढाऱ्यांच्या वक्तव्यांचा निष्कर्ष काढताना ते म्हणतात, ‘(हे पुढारी) हिंदूंविरुद्ध एक प्रचंड जेहाद- धर्मयुद्ध करण्यासाठी कटिबद्ध झाले आहेत. सर्व भारतीयांचे इस्लामीकरण होईल तेव्हाच हे युद्ध थांबणार आहे.’या 5-अ वाक्यात दलवाईंनी सांगितलेला जिहादचा अर्थ अगदी स्पष्ट आहे.

जिहाद-ए-अकबर (स्वतः विरुद्ध संघर्ष) आणि जिहाद-बा-सैफ (तलवारीचे धर्मयुद्ध) या दोन्हींमध्ये एक आंतरिक संबंध आहे, तो कुरुंदकरांनी दाखविला आहे. ‘परधर्मीयांना तलवारीने इस्लाम पढवावा... ही धर्माज्ञा नेहमीच मनाला पटत नाही. ती मनाला घट्ट पटविणे हा स्वत:विरुद्ध जेहाद आहे.’6

9. ‘तुम्हाला तुमचा धर्म, मला माझा धर्म’ही आयत उद्धृत करून जमादार असे भासवतात की, पैगंबरांनी सर्वांना आपापले धर्म पाळण्याची परवानगी दिली आहे. ही चक्क दिशाभूल आहे, कारण ती आयत मक्काकालीन आहे.

महंमदांना अल्लाकडून संदेश यायला इ.स.610 साली सुरुवात झाली. 610 ते 622 हा काळ ते मक्केत होते. 622 ते 632 पर्यंत म्हणजे ते अल्लाचे प्यारे होईपर्यंत त्यांचा मदिना येथे मुक्काम होता. अल्लाकडून संदेश यायला लागल्याबरोबर त्यांनी गुप्तपणे नव्या धर्माचा प्रसार सुरू केला. उघड प्रचार सुरू झाल्यावर मक्केतील मूर्तिपूजकांनी त्यांचा छळ सुरू केला. (यामुळेच त्यांना ‘हिजरत’करून मदिनेला जावे लागले.) जेव्हा प्रेषिताकडे फक्त तीस-चाळीस अनुयायी होते, तेव्हा ही आयत अवतरित झालेली आहे.अबू तालिब हे प्रेषितांचे पालनकर्ते चुलते होते. ते मुस्लिम झाले नव्हते, प्रेषितांनी मूर्तिपूजकांच्या मूर्तीवर व त्यांच्या पूर्वजांवर केलेल्या टीकेमुळे तेथील लोक अबू तालिबकडे तक्रार घेऊन गेले व महंमदांना असे वागण्यापासून प्रतिबंध करण्याची त्यांनी मागणी केली. त्यानुसार अबू तालिबने महंमदांना असला धर्म न पाळण्याचा व त्याचा प्रचार न करण्याचा उपदेश केला. त्या वेळेस महंमदांनी दिलेले उत्तर वरील आयतीत आले आहे. स्वतःचाच धर्म पाळण्याचा हक्क धोक्यात आला असताना इतरांना आपापला धर्म पाळण्याचा हक्क देऊ करणे हे हास्यास्पदच समजले पाहिजे.(मदिनाकाळात मात्र हे चित्र बदलले, कारण प्रेषितांनी तलवार हातात घेतली. शेवटी सर्व अरबस्तान मुस्लिम झाला.)

10. ‘इस्लामला देशप्रेम व राष्ट्राभिमान या गोष्टी मान्य नाहीत’ असे मी लिहिले होते, त्यावर जमादारांची टीका आहे.

इस्लाममध्ये दार-उल-हरब व दार-उल-इस्लाम या संकल्पना आहेत. पहिला शत्रुदेश, ज्यात मुस्लिम राज्य नाही, त्यामुळे तो सोडून जावे किंवा त्याचे इस्लामीकरण करावे असा आदेश आहे.भारत इस्लामच्या दृष्टीने दार-उल-हरब आहे.

इस्लामच्या मते सर्व मुस्लिमांची निष्ठा जागतिक मुस्लिम समाजावर- ‘उम्मत’वर असली पाहिजे. अनेक मुस्लिम राष्ट्रे आहेत आणि ती एकमेकांशी युद्धे करतात, पण हे इस्लामच्या तत्त्वाच्या विरुद्ध आहे. कळीचा प्रश्न दार-उल-हरबमध्ये मुस्लिमांची वागणूक कशी आहे हा आहे. याबाबत पुन्हा हमीद दलवाई काय म्हणतात याकडे अंगुलीनिर्देश केला पाहिजे.

‘...ज्या ज्या देशात मुसलमान अल्पसंख्य आहेत, त्या त्या देशातील राष्ट्रवादी चळवळीशी त्यांचे वैर असते’‘ भारतीय मुसलमान अजूनही स्वत:ला पाकिस्तानी समजतात आणि पाकिस्तान झाल्यामुळे आपली मुक्तता आता निश्चित होणार असे त्यांना वाटते.’ शिवाय दलवाई असेही सांगतात की, आपण मुसलमानांची म्हणून जी मते सांगत आहोत ती केवळ मूठभर व्यक्तींची नसून 90 टक्क्यांची आहेत!’

(उत्तरार्ध पुढील अंकात)

Tags: मधु वाणी हुसेन जमादार संघ परिवार हिंदू मुस्लिम कुराण हिंदुत्ववाद स ह देशपांडे s h deshpande in sadhana muslims hindu hindutvavad s h deshpande weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

स. ह. देशपांडे

ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात