डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

मुस्लिम समाज राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्यासाठी...

सद्य काळात भारताचा प्रवास अतिशय धोकादायक वळणातून जात आहे. विेशातील वाढत्या दहशतवादाने सांप्रदायिक सद्‌भाव- निर्मितीच्या प्रक्रियेत मोठा अडसर निर्माण केला आहे. अशा या भयग्रस्त वातावरणात देशाच्या सर्वंकष विकासाला पायबंद न बसला तरच नवल. आणि म्हणून आपल्या देशातील हिंदू-मुस्लिम तणाव कमी होण्याची गरज आहे. दोन्ही समाजांत सांस्कृतिक एकात्मता वाढली पाहिजे; त्याशिवाय मुस्लिम समाज राष्ट्रीय प्रवाहात सामील झाला आहे, असे कसे म्हणता येईल?

भारत देशात जवळजवळ सात धर्मांचे लोक नांदत आहेत. परंतु त्यांची विभागणी बहुसंख्य आणि अल्पसंख्य अशी केली गेलेली आहे. त्यामुळे येथील प्रधान धर्म हिंदू असून, दुसऱ्या क्रमांकाचा धर्म इस्लाम आहे. इस्लामशिवाय ख्रिस्ती, शीख, बौद्ध, जैन, पारशी इत्यादी धर्मांचे लोक भारतात राहतात. हिंदू-मुसलमान यांच्यातील धार्मिक तणाव वगळता, हिंदू आणि इतर धर्मीय यांच्यात फारसा तणाव आढळत नाही. या तणावांची कारणे शोधण्यासाठी आपणाला इतिहासाचा परामर्श घ्यावा लागेल. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात मुस्लिम लीगच्या चळवळीमुळे हिंदू-मुसलमानांमध्ये तणाव निर्माण झाला होता. स्वातंत्र्योत्तर काळातदेखील हिंदू-मुस्लिमांचे संबंध खूप सलोख्याचे राहिले आहेत, असे आढळून येत नाही.

भारत- धर्मनिरपेक्ष राष्ट्र

भारतीय राज्यघटनेत सर्व धर्मांची सुरक्षितता गृहीत धरली असून, आपल्या धर्म व संस्कृतीची जोपासना करण्याची हमी प्रत्येकाला देण्यात आली आहे. 42 व्या घटनादुरुस्तीनंतर तर भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहील, असा उल्लेख आपल्या घटनेत केलेला आहे. तथापि, धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक सलोख्याचे तत्त्व मान्य करूनही लोकांमध्ये वेळोवेळी तणाव निर्माण होतात, सामाजिक शांतता पूर्णपणे भंग पावते. विशेष म्हणजे, हे धार्मिक तणाव इतर धर्मीयांच्या तुलनेत हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये अधिकांश प्रमाणात दिसून येतात. या तणावांच्या कारणांचा शोध घेतल्यास खालील काही ढोबळ मुद्दे दिसून येतील.

हिंदू-मुस्लिम तणावाची कारणे

1. देशातील जनतेची विभागणी हिंदू बहुसंख्य (Majority) आणि इतर धार्मिक अल्पसंख्याक (Minority) अशी झाल्यामुळे, साहजिकच हिंदूंच्या मनात आपण बहुसंख्याक आहोत ही भावना निर्माण होणे नैसर्गिक आहे व हे सर्वथा गैर आहे.

2. घटनादत्त अधिकार समान असतानादेखील इतर धर्मीयांच्या मनात असुरक्षिततेची (Insecurity) भावना निर्माण होते, त्यामुळे धार्मिक तणाव आपोआप निर्माण होतो.

3. अल्पसंख्याकांमधील मुस्लिम धर्मीयांना लष्करात, पोलिस दलामध्ये व सरकारी खात्यात पुरेसे प्रतिनिधित्व नाही, असे मुस्लिमांना सतत वाटत राहते आणि त्यामुळे हा समाज असंतुष्ट राहतो.

4. ज्या तत्त्वांच्या आधारावर हिंदू समाजातील अन्य लोकांना आरक्षणाचा फायदा मिळाला व त्यांचा विकास झाला तसे आरक्षण मुस्लिमांना असले पाहिजे, अशी मुस्लिमांची अपेक्षा आहे. ही त्यांची अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून काही राजकीय पक्ष/संघटना या विषयाचे राजकारण करतात.

5. प्रत्येक धर्मामध्ये धर्माच्या रक्षणासाठी काही संघटना निर्माण झालेल्या आहेत. या संघटना कधी कधी मर्यादा सोडून वक्तव्ये करतात, त्यामुळे प्रचंड क्षोभ निर्माण होतो. मग काही जुने प्रश्न- उदा. गो-हत्याबंदी किंवा Muslim Personal Law असे प्रश्न- उकरून काढले जातात आणि त्यामुळे तणाव निर्माण होतो.

6. भाषा प्रश्नावरूनही क्षोभ निर्माण होतो. उदा.- उत्तर प्रदेशात उर्दूला जोडभाषेचा दर्जा मिळावा किंवा पंजाबी भाषा बोलणाऱ्यांचे (शिखांचे) वेगळे राष्ट्र पाहिजे, अशा चळवळींमुळे धार्मिक प्रश्न अधिक फोफावला जातो. हिंदू-मुस्लिम आंतरिक सलोखा हवा

भारतात गेली कित्येक शतके हिंदू आणि मुसलमान यांचे सहजीवन सुरू असले तरी त्यांच्यात आंतरिक एकता निर्माण होऊ शकली नाही, हे कटुसत्य आहे. हिंदू विचारधारा व इस्लाम या दोहोंत बौद्धिक समन्वय न झाल्या कारणाने भारतीय मुसलमानांची बरीच हानी झाली आहे, असे मत थोर इतिहासतज्ज्ञ श्री.हुमायूँ कबीर यांनी नोंदविले आहे. या अलगपणाच्या भावनेमुळे कुणाचेच कल्याण होणार नाही. ही अलगपणाची भावना दूर करून हिंदू-मुस्लिमांमध्ये आंतरिक सलोखा निर्माण व्हावयास हवा, ही काळाची खरी गरज आहे. भारताची संस्कृती ही गंगा- जमना (मिलीजुली) संस्कृती आहे, असे केवळ म्हणून चालणार नाही; तर दोन्ही समाजांनी प्रत्यक्ष त्याचा अंगिकार केला पाहिजे. गंगा-जमना संस्कृती कागदावर नको, त्यासाठी खालील काही सांस्कृतिक समरसतेचे उपक्रम दोन्ही धर्मांच्या लोकांना राबवता येणे सहज शक्य आहे.

1. प्रत्येक धर्माच्या धर्मग्रंथाचे परिशीलन त्या-त्या धर्मीयांकडून योग्य पद्धतीने होतेच असे नाही. आणि म्हणूनच विश्वशांती केंद्र- आळंदीच्या वतीने दि. 30 व 31 जानेवारी 2015 रोजी ‘धर्मग्रंथ म्हणजे जीवनग्रंथ’ या विषयावर एक राष्ट्रीय परिषद घेऊन एक ग्रंथ प्रकाशित केला गेला. सर्व धर्मग्रंथ हे लौकिक अर्थाने जेवढे महान आहेत, तेवढेच ते मानवाला आपले जीवन यशस्वीपणे जगण्यासाठी मार्ग दाखवितात; म्हणून ते जीवनग्रंथ आहेत अशी मांडणी या ग्रंथात केल्यामुळे प्रत्येक धर्माबद्दल आपल्या मनात आदर निर्माण होतो. अशा उपक्रमांना शासनाने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली पाहिजे.

2. विश्वमानव अभिमानात आपला धर्माभिमान विसर्जित करता आला पाहिजे. धार्मिक विधी व कर्मकांड यांचे स्तोम न माजविता त्यांना फाटा द्यावयास हवा. जेव्हा एखाद्या धर्मातील लोक अतिउत्साहाने काही सण, उत्सव, पर्व, व्रते साजरे करतात, तेव्हा त्यांच्या अतिरेकामुळे इतर धर्मीयांच्या जीवनातील स्वातंत्र्यावर गंडांतर येण्याची शक्यता असते. मग सर्वसमावेशक पातळीवर सर्वधर्मीय एकत्र नांदण्याची शक्यता कमी होते आणि सांप्रदायिक सद्‌भावाला पायबंद बसतो. यासाठी काही कडक नियम करणे आवश्यक आहे.

3. विशिष्ट धर्माच्या परिषदेचे आयोजन फार मोठ्या प्रमाणात होते, परंतु सर्व धर्मांच्या परिषदांचे आयोजन मात्र फारसे होताना दिसत नाही. धर्मशास्त्राच्या तौलनिक अभ्यासामुळे इतर धर्मांच्या नव्या ज्ञानकक्षा ज्ञात होण्याची शक्यता निर्माण होते. सर्व धर्मांचे प्रतिनिधी एकत्र येऊन, त्यांनी त्या धर्मातील मानव-कल्याणाची तत्त्वे सामुदायिक रीतीने दृष्टिपथात घेतल्यास विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लागू शकते. शिकागो येथे 1883 मध्ये Parliament of World Religions या नावाने आयोजित केलेली धर्म परिषद म्हणूनच आदर्श ठरली. अशा धर्मपरिषदांचे आयोजन सातत्याने केले पाहिजे. विश्वशांती केंद्र आळंदीद्वारे अशा परिषदांचे आयोजन प्रत्येक वर्षी केले जाते. सद्‌भावनेच्या दृष्टीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरते. अशा सर्वधर्म परिषदांचे आयोजन शासकीय पातळीवर करणे आवश्यक आहे.

4. प्राचीन युगात बहुतांश व्यवहार हे धर्माधिष्ठित होते; आता मात्र आधुनिक युगात आपले व्यवहार धर्मनिरपेक्ष पद्धतीने कसे होतील, याकडे विशेष लक्ष दिले जाते. अनेक धर्म जेव्हा आपल्या देशात नांदतात, तेव्हा आपल्या धर्म- व्यवहारामुळे दुसऱ्या व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य कमी होणार  नाही व कलहाची स्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.

5. राजकीय पक्ष आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्म आणि राजकारण याची सदैव सांगड घालताना दिसून येतात. राजकारणाला धर्मापासून अलिप्त राखणे सध्याच्या लोकशाहीत अशक्य असले, तरी त्याच्या वाढत जाणाऱ्या प्रभावावर नियंत्रण राखणे अत्यंत जरुरीचे आहे. धर्म आणि राजकारण यांच्यातील सरमिसळ देशासाठी अत्यंत धोकादायक आहे, असा इशारा लिबरहान आयोगाने आपल्या अहवालात दिला आहे.

6. आपल्या मानसिकतेचा संबंध जोपर्यंत आपण वेगळ्या पद्धतीने इतिहासाशी लावणार नाही, तोपर्यंत सद्‌भावाचा आपला पुढील प्रवास सुरू होणारच नाही. कारण धार्मिक विद्वेष सहज वाढेल असे किती तरी प्रसंग आपल्या इतिहासात आहेत. आपल्या देशाची फाळणी ज्या तत्त्वावर झाली त्याचे विस्मरण लोकांना होत नाही, हे स्वाभाविक आहे. परंतु देशाच्या विभाजनाची एक रेषा ओढली गेली आणि मानवतेच्या, सलोख्याच्या, परस्पर- बंधुभावाच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या उडाल्या. ती रेषा आता आपण बुजवून टाकली पाहिजे आणि जागतिकीकरणाच्या या काळात सांप्रदायाला कायमची मूठमाती देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी नव्या प्रबोधनाची गरज आहे. येणाऱ्या नव्या पिढीने ही फाळणी पाहिलेली नाही. त्या पिढीस त्या फाळणीच्या जखमा पुन: पुन्हा सांगण्याची गरज नाही.

प्रेरणा भारतीय हव्यात

भारतात राहायचे, परंतु प्रेरणा मात्र इस्लाम अथवा पाश्चिमात्य देशाकडून घ्यायची- हे कुणाही भारतीयांसाठी योग्य नाही. अभारतीय प्रेरणेमुळे आपण येथील भारतीय सत्त्व विसरून जाऊ; मग भारतीय संस्कृतीत कसे मिसळून जाऊ शकतो? भारतीय मुस्लिमांनी आपल्या पूर्वजांचा शोध घेतल्यास ते भारतीयच होते; ते काही इराण, इराक किंवा सौदी अरेबियातील नव्हते, हे ध्यानात येईल.

ईेशर एकच आहे

हिंदू धर्मातदेखील वेदांमध्ये निर्गुण-निराकार परमेश्वराचीच प्रार्थना सांगितली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 13, श्लोक 11 मध्ये ‘ईश्वर एक आहे’ हेच सांगितले आहे. असे असताना टोकाची, अलगपणाची भावना बाळगणे योग्य होणार नाही. एकमेकांच्या चाली-रीती समजून घेऊन त्यामध्ये सहभागी व्हावे लागेल. ईद-मिलन, दिवाळी- मिलन, मोहरम इत्यादी अनेक उपक्रमांतून हिंदू-मुस्लिम प्रेमच वाढीस लागेल; परंतु त्यासाठी मात्र सहकार्याच्या, सौहार्दाच्या, परस्परबंधुभावाच्या, सांस्कृतिक संमिश्रणाच्या नव्या युगात आपण प्रवेश केला पाहिजे.

संस्कृतीत समरसतेच्या उपक्रमांची गरज

सूफी संतांच्या दर्ग्यावर श्रद्धापूर्वक हजेरी लावून हिंदू बांधवांनी सहिष्णुतेचे, बंधुभावाचे पाऊल उचलले आहे. अनेक मुस्लिम संस्थांनी/समूहांनीही अशाच प्रकारे सुरुवात केली आहे. एम.सी.ई.सोसायटी, पुणे या मुस्लिमांच्या शिक्षण संस्थेद्वारे छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा फुले किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढली जाते. कडेगाव, जि.सांगली येथे हिंदू- मुस्लिम एकत्र येऊन मोहरम साजरी करतात. लखनौमध्ये होळीचा सण हिंदू-मुस्लिम एकत्र साजरा करतात. एम.आय.टी. पुणे या संस्थेच्या विश्वशांती केंद्राच्या वतीने ‘वारकरी संत आणि सूफी संत’ ही परिषद घेण्यात आली आणि भजन व कव्वाली यांचा एकत्र कार्यक्रम झाला. अर्थात, अशा उपक्रमांची संख्या वाढवावी लागेल. सांस्कृतिक एकात्मता हाच राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याचा एकमेव मार्ग आहे.

‘डॉ. अब्दुल कलाम सांप्रदायिक सद्‌भाव मंच’

शासन स्तरावर डॉ.अब्दुल कलाम सांप्रदायिक सद्‌भाव व सामाजिक शांतता फाउंडेशनची स्थापना झाल्यास, वेळोवेळी कृत्रिमरीत्या जातीय तणाव निर्माण करणाऱ्या गटांत ‘सद्‌भाव’ निर्माण करण्याचे कार्य हे फाउंडेशन करू शकेल. शासन स्तरावरून सर्वधर्म परिषदांचे आयोजन करता येईल, आणि हिंदू-मुस्लिम एकात्मतेच्या यशोगाथांना प्रसिद्धी मिळेल. शेवटी कवी गुलजार यांच्या काव्यातील दोन पंक्तीमध्ये सांगावयाचे झाल्यास, ‘लकीर है तो रहने दो, किसी पागल ने खिची थी,

आओ इसे हम बनाएँ पाला और खेले कबड्डी’

या देशात परस्परसौहार्दासाठी मुळात असलेल्या सांस्कृतिक एकात्मतेचा आधार अधिक महत्त्वाचा आहे. त्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Tags: मुस्लिम हिंदू एस. एन. पठाण एकात्मता देश समाज अल्पसंख्य बहुसंख्य Unity Country Society Minority Majority Muslim Hindu S.N. Pathan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात