डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

काळजाच्या गाभाऱ्यातून उमटणारा आत्मस्वर

विख्यात कवयित्री इंदिरा संत यांना अलीकडेच जनस्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी श्री. श्री. पु. भागवत यांनी त्यांच्या कवितेचे जे रसग्रहणात्मक विवेचन केले ते पुढे देत आहात..

मित्रहो,

कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'जनस्थान पुरस्कार' कवयित्री इंदिरा संत यांना प्रदान करण्याच्या आजच्या या समारंभात सहभागी होताना मला फार आनंद होत आहे. गेली पन्नासहून अधिक वर्षे मी त्या दोघांची भिन्न प्रकृतीची, तथापि निरतिशय आनंद देणारी, सुंदर कविता पुनःपुन्हा वाचत आलो आहे. तिच्या तजेलदार, स्निग्धशांत आणि अपार सौंदर्याबद्दल मनात दाटून आलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी लाभली हा मला भाग्ययोग वाटतो. 

पैशाचं कर्ज काय किंवा अन्य लौकिक ऋण काय, फेडता येतात; पण सौंदर्यदानाचं अलौकिक ऋण कधी फेडता येत नाही. ते फेडून अऋणी होण्याचा विचार करूही नये, शेवटच्या श्वासापर्यंत त्या ऋणातच राहावं आणि आपल्या वंशजांसाठीही ते मागे जपून ठेवावं. व्यक्तीनं त्याचप्रमाणं समाजानंही. गाढ कृतज्ञताभावानं. कृतज्ञता ही आत्म्याच्या निरामयतेची साक्ष असते.

आज या समारंभात भाग घेताना ज्ञानेश्वरांच्या दोन ओव्यांची आठवण मला होत आहे. ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदान मागताना त्यांनी म्हटलं आहे:

चलां कल्पतरुचे आरव। चेतना चिंतामणीचे गाव।

बोलतो जो अर्णव । पीयूखांचे।।

चंद्रमे जे अलंछान ।मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वा ही सदा सज्जन । सोयरे होंतु।।

या ओव्यांचा विचार करताना आज मला वाटतं, की ज्ञानदेवांनी हे संतसज्जनांचंच नव्हे तर सत्कवींचंही वर्णन केलं आहे. कुसुमाग्रजांची आस्मिक तेजानं तळपणारी प्रभावशाली कविता तापहीन सूर्यभ्रकाशासारखी आहे, तर इंदिराबाईची निष्कलंक चंद्रासारखी. तिच्यातील दुःखाची किंवा उदासीची छाया पाहून हवे तर बोरकरांचे शब्द आठवावेत: 'ढगाआडचा चंद्र थोडा फिका'. गेली साठ पासष्ट वर्ष आपल्या निष्ठावंत कविताभक्तीमुळे एकमेकांचे सखे सोयरे झालेल्या या दोन कविश्रेष्ठांचं सौम्यशीतल दर्शन आपल्या एकत्र होत आहे. ताने बरांनी आपल्यासाठी दान मागितलं नाही, तर जणू वरदानच केलं, त्याप्रमाणं हे उभय ज्येष्ठ कवी आपलेही निरंतर सोयरे झालेले आहेत. त्या श्रेष्ठ संतकवीच्या आशीर्वादानं आपणा सर्वांना लाभलेला तो दैवदुर्लभ प्रसादच आहे.

मी आज इंदिराबाईंच्या कवितेबद्दल बोलणार आहे. पण ते तिचा सर्वांगीण विचार करणारं असं नसेल. तो माझा अधिकारही नाही. शिवाय आपण सगळे रसिक आहात. त्यांची कविता वाचलेले आहात, म्हणून फक्त दोनतीनच मुद्दे इथे मांडावेसे वाटतात.
इंदिराबाईंच्या कवितेबद्दल विचार करू लागलं, की मला नेहमी टी. एस. इलियटच्या एका लेखाची आठवण होते. ईलियट हा फार मोठा आधुनिक कवी होता, नाटककार होता, तसाच तो अतिशय मर्मज्ञ समीक्षक होता. त्यानं 'दी व्हॉइसेस ऑफ पोएट्री' नावाचा लेख लिहिला आहे. त्यात त्यानं असं म्हटलं आहे, की काव्याचे तीन स्वर असतात. काही कवितांचा स्वर मोठ्या लोकसमूहासाठी असतो. त्याला श्रोतृसमुदायाची अपेक्षा असते. 

या प्रकारच्या कवितेला तो ‘डायडॅक्टिक पोएट्री' म्हणतो. आपल्याकडचं उदाहरण द्यायचं तर केशवसुतांच्या 'तुतारी'चं देता येईल. सामाजिक बांधिलकी पुकारणाऱ्या कवितेचं देता येईल. दुसरा स्वर जिला तो 'मेडिटेटिव्ह पोएट्री' म्हणतो- आणि तिलाच त्यानं पुढं 'लिरिकल पोएट्री' असं म्हटलंय -  त्या  कवितेचा. आपल्या बालकवींची 'औदुंबर' ही कविता या प्रकारात मोडेल. इंदिरादाईच्या कवितेला वा. उ. कुलकर्णींनी 'विशुद्ध भावकविता' असं पुढं म्हटलं ते अशाच अभिप्रायानं. अशा कवितेचा स्वर स्वगतासारखा असतो. ती कविता दुसऱ्या कोणाला उद्देशून बोलत नाही, समूहाला तर नाहीच नाही. 

ती कविता जणू त्या कवीसाठी असते आणि त्या कवितेत कवी जणू काही स्वतःशीच बोलत असतो. आत्मगत असंच त्या कवितेचं, तिच्या हलक्या सुराचं स्वरूप असतं. काव्याचा तिसराही एक स्वर असतो. कवीचा तो स्वर समूहाकरता नसतो किंवा स्वतःकरताही नसतो. त्या स्वराचं उदाहरण म्हणून ईलियटनं शेक्सपिअरच्या नाटकाचं दिलंय. ‘ऑथेल्लो' मधला शेक्सपिअरचा स्वर कोणता? तो तर सगळ्याच पात्रांमध्ये विखरून गेलेला, त्यांच्याच सुरात एकजीव झालेला. तीच गोष्ट 'हिमालयाची सावली’ सारख्या नाटकातील कानेटकरांच्या सुराबद्दल म्हणता येईल.

ईलियटनं ज्या दुसऱ्या, आत्मगत काव्यस्वराचं वर्णन केलं आहे तो स्वर इंदिराबाईंच्या कवितेचा आहे. फार मोठ्या समूहाकरिता ती बोलत नाही, आणि समूहातली व्यक्तीही ती कविता वाचते किंवा ऐकते तेव्हा ती आपल्या एकटेपणामध्येच ऐकते. आपल्या एकाकीपणामध्येच ती त्या कवितेचा आस्वाद घेते, तिला आपलीशी करते. आपल्या मनाच्या खोल गाभ्यातील नीरव एकांतात ती मुरू देते. अतिशय खाजगी भावनेची देवाणघेवाण करावी त्याप्रमाणं वाचक त्या कवितेबद्दल बोलतात. जणू ह्या हृदयीचं गूज त्या हृदयी घालावं तसं.

इंदिराबाईंच्या कवितेचा हा जो आत्मगत, अगदी जनान्तिक सूर आहे त्याचे काही गुणविशेष आहेत. काही कवींचा स्वर नेहमी चढा असतो, जसा विंदा करंदीकरांचा आहे. काहींचा नाट्यपूर्ण असतो. जसा वसंत बापटांचा आहे. करंदीकरांची प्रेमकवितादेखील जरा चढ्या सुरात व्यक्त होईल. तर बापटांची प्रीतिकविता नाटयपूर्ण ढंगात, जणू नर्तन करीत बोलेल. इंदिरावाईच्या कवितेचा स्वर मात्र हलका, स्वाभाविक आहे. तो कधी तीव्र सप्तकात चढत नाही; त्याचा ओघ क्वचितच नाट्यपूर्ण होतो; आणि नर्तन तर त्यात कधीच नसतं. त्याची लय संथ असते. 

तो क्वचितच एकसुरी वाटतो खरा. पण मीरेच्या एकतारीच्या सुरासारखा तो स्वर सूक्ष्मपणे झंकारत असतो. त्यामुळे तो कंटाळवाणा आणि परिणामात उणा असा कधीच नसतो. तो ऐकताना असंही वाटतं, की त्यात फार मोठा थकवा भिनून राहिला आहे. ज्यानं सुखदुःखांचे अनेक भोग अतिशय उत्कटपणानं, पण स्वतःशी आणि स्वतःपुरतेच, सोसलेत अशा संवेदनशील, भावोत्कट, पण संयमी आणि सोशिक माणसाचा हा स्वर आहे. दीर्घकाळ एकट्याच्या वाट्याला आलेल्या सुखदुःखांच्या अनुभवानं काहीसा थकलाभागलेला, पण या अनुभवाचं जे अतिशय प्रगल्भ शहाणपण असतं त्याचं सामर्थ्य मुरलेला- आणि अधिक बरोबर वर्णन करायचं तर खिन्न सामर्थ्य असलेला- हा स्वर आहे. 

ऐकणाऱ्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो चढवावा लागत नाही. तो आपोआप आपल्या अनुभवाचे नेमकं रूप दाखवण्याची सहजशक्ती घेऊन व्यक्त होतो. त्यातली हलकी, संथ, अनुभवसंपन्न, शहाणी खिन्नताच वाचकाच्या हृदयाचा थेट आणि नेमका वेध घेते. कदाचित असंही असेल की आपल्या नेणिवेच्या जिव्हारी वसंत स्त्रीच्या दुःखी, एकाकी, करुणार्द्र, असलेल्या, भारतीय सोशिक अशा शतकानुशतकांच्या समजूतदारपणाशी इंदिराबाईंचा स्वर नैसर्गिक संवाद साधत असेल. किंवा त्या सनातन स्वराच्या प्रवाहाचाच एक ओघ असेल.

त्या स्वरातून इतकी वर्ष काय व्यक्त होत आलं? प्रीती व्यक्त झाली. चिरविरहाचं विदारक दुःख परोपरीनं व्यक्त झालं. निसर्गसौंदर्याची नाना रूपं तरलपणं व्यक्त झाली. प्रीती आणि निसर्ग यांची परस्परसंवादी किंवा एकात्म प्रतिमाचित्रं रूपाला आली. कौटुंबिक सुखदुःखं तर व्यक्त झालीच, पण भोवतीच्या समाजाची प्रतिबिंबही कचित व्यक्त झाली. पण मला वाटतं, त्या स्वरामध्ये प्राधान्यानं व्यक्त झालं ते जीवनातील हर्षामर्षांचे अनंत अनुभव घेणाऱ्या आणि ते व्यक्त करणाऱ्या प्रगल्भ, संयमी आणि म्हणून मितभाषी जीवाचं एकाकीपण. प्रापंचिक किंवा लौकिक एकाकीपण नव्हे. 

तर आत्म्याचं एकाकीपण- त्या एकाकीपणाची कधी फिकी तर कधी गडद छाया इंदिराबाईंच्या सगळ्या कवितेवर पडलेली आहे. आता एकाकीपण आपण सगळेच तसं अनेक वेळा अनुभवतो. अतिशय दुःखाच्या वेळी माणूस एकटा असतो, त्याचप्रमाणं सुखदुःखांच्या अतीत असलेला, आध्यात्मिक अनुभवाचा झपूर्झा जर दैवयोगानं वाट्याला आला तर त्या हवंद्वातीत सुवर्णक्षणीदेखील आपण एकाकी असतो. 

ज्ञाताच्या कुंपणावरून, धीरत्व धरून, उड्डाण करून जाणारी चिद्घनचपला एकटीच असते. माणसाच्या वाट्याला सावलीसारख्या आलेल्या एकाकीपणाची अशी विविध रूपं इंदिराबाईंच्या कवितेत प्रतीत होतात. आणि हे एकाकीपण त्या कवितेच्या आत्म्यानं अबोल सोशिकपणानं त्यासंबंधी कुठेही फार तडफड न दाखवता स्वीकारलेले आहे. एक प्रकारच्या मूक जिद्दीनं. 'प्रारब्धा' म्हणून त्यांची एक कविता आहे. प्रारब्धाशी असलेलं आपलं नातं अटीतटीचं आहे असं त्याचं वर्णन करून त्या म्हणतात: 

जिद्द माझी तशीच:

नाही लवलेली मान, 

जरी फाटला पदर

तुझे झेलते मी दान; 

 

काळोखतें भोवताली, 

जीव येतो उन्मळून

तरी ओठांतून नाही

"तुला शरण... शरण, 

 

इंदिराबाईंची ही जिद्दीची आत्मशक्ती त्यांच्या कवितेत परोपरीनं व्यक्त झाली आहे. कथित त्यात सूक्ष्म आत्मकरुणा कळते न कळतेशी मिसळलेली असते. त्यांच्या एका कवितेत या अनुभवार्यं एक रूप, अथवा त्यांच्या कवितेतील एक महत्त्वाचं आशयसूत्रच व्यक्त झाले आहे. त्या कवितेचं नाव आहे ‘फास.’

त्या एका...आठवणीचा फास गळ्याशी हसतो आहे 

अजुनि कशी ना होते बुरखा काळी जाणिव; 

अजुन कसें ना निसटुनि जाते पायतळीचे फळकुट खोटे 

अजुन कुणी का वाट पाहते तशा क्षणाची, 

सुटेल ज्याने फास अचानक 

फिरेल आणिक वलय भोंवती 

झगमगणारे कलाबतूचे.

आठवणीचा फास गळ्याभोवती आहे, पण पायाखालयं फळकूट मात्र निसटून गेलेलं नाही, अशी एक विलक्षण. दचकवून टाकणारी प्रतिमा या कवितेमध्ये आहे. ते फळकूट खोटं आहे, कारण ज्याच्याबरोबर सगळ्या आयुष्याचं साफल्य पाहिलं असं जिवाभावाचं आपलं माणूस गेलं जीवनातलं प्रेय आणि श्रेयच जर हरपल, तर जे उरतं ते प्रामक असतं. पण ते स्वीकारावंच लागतं. 'जगायची तर सक्ती आहे' हे खरंच असतं. उपरोध असा की त्याचाही आधार वाटतो. तुझ्यानंतर मी क्षणभरदेखील जगणार नाही अशी शपथ घेणाऱ्या माणसालाही जगावं लागतं. 

गेलेल्याच्या आठवणीत गुंतून. प्रपंच मांडलेला असतो. मुलंबाळं असतात. व्यवसाय असतो. अशी बाहेरची कारणं तर असतातच, पण मुख्य म्हणजे आपण असतो. आपल्या इच्छाआकांक्षांसह, भावभावनांसह आणि विकारांसहही असतो. जगण्याचा तो निर्घृण असा नेम आहे. हे कसलं जीवन? हे तर त्या खोट्या फळकुटावरचं गळ्याभोवती फास असलेलं नुसतं असणं. इंदिराबाईंच्या शब्दांत केवळ 'जिवंतपण’. जिवंत दृष्टी फिरेल अशा निष्फळ आशेत गुरफटणारं. एकाकीपणाचा हा विदारक अनुभव हादरवून टाकतो आणि आपल्या आर्त सुरानं व्यथित करतो. वाटतं या अस्तित्वापेक्षा फाशी जाऊन विलय पावणं श्रेयस्कर. 

इंदिराबाईची एकाकीपणा बदल एक कविता आहे. त्या कवितेत एकटेपणाची आणखी काही रूपं व्यक्त झाली आहेत:

हे एकटेपण, देवाने दिलेले

सोनावळीच्या फुलासारखे

आभाळाखाली झुलणारे

कोवळ्या उन्हाचा शेला पांघरणारे

स्वप्नांची खेळणी मांडून मग्न होणारेते एकटेपण.

कुणीतरी सन्मानाने काळजाच्या ओंजळीत ओतलेले

अवकाशासारखे जिवाभोवती कोष करून राहिलेले झळंबलेले

नकोसे तरी हवेहवेसे वाटलेले त्याचे म्हणून ते एकटेपण. 

माझे मीच माझ्या वाटचालीत जमवलेले मनभर

कधी प्रसन्न मोकळे

दुपट्यावरील तान्ह्याच्या खेळण्यासारखे

कधी रिकामे... असे रिकामे

वेड्या माणसाच्या हसण्यासारखे. 

या कवितेवर भाष्य करण्याची गरज नाही. फक्त शेवटच्या अकल्पितपणे येणाऱ्या प्रतिमेकडे आपलं लक्ष वेधावंसं वाटतं: 'कधी रिकामे... असे रिकामे, वेड्या माणसाच्या हसण्यासारखे...

खरं तर माणूस हा मूलतःच एकाकी प्राणी आहे. एकाकी जन्माला येतो आणि एकाकी मरून जातो. एकदा नाळ तुटली की जन्मभर जरी गर्दीमध्ये वावरला तरी एकाकीच राहतो. क्वचित कुठे आतडे गुंततं, पण नाळ पुन्हा जुळत नाही. अभिन्नजीव होता येत नाही. साऱ्याच माणसांचं हे भागध्येय असतं, पण त्यातही एखादी व्यक्ती अतिसंवेदनक्षम असली, तिला प्रतिभेचं वरदान असलं, तर ती अधिकच एकटी असते. भोवतीच्या विश्वातून विलग होत आपल्या अंतर्विश्वात मग्न होऊन राहते. अलिनिएशन म्हणजे विलगपण हा शब्द अती वापरानं आता अगदी गुळगुळीत झाला आहे. पण भोवतीच्या माणसांपासून खरं विलगपण संतांना लाभतं. प्रतिभावंतांना लाभतं. 

शुद्ध तात्त्विक विज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधकांना किंवा तत्त्वज्ञान्यांना लाभतं. आणि हे विलगपण केवळ माणसांपासून नव्हे तर स्वतःच्या नवनिर्मितीपासूनही लाभतं. ईलियटच्या ज्या लेखाचा मी सुरुवातीला उल्लेख केला, त्यात त्यानं भावकवितेच्या पहिल्या अरूप भासाचं, त्याच्या शोधाचं, तिला शब्दरूप देतादेताच लाभणाऱ्या देहाकृतीचं आणि प्राणतत्त्वाचं, आणि तिथी परिपूर्ण निर्मिती झाल्यावर त्या जिवंत कवितेनं निर्मात्यापासून विलग होऊन स्वतंत्र आणि स्वायत्त वनण्याचें सुंदर वर्णन केलं आहे. इंदिराबाईंनी 'वंशकुसुम’ च्या प्रस्तावनेतही त्या प्रक्रियेचं तसंच मार्मिक विवेचन केलं आहे. असं अंतर्बाह्य अलिनिएशन किंवा विलगीकरण प्रतिभावंताला आणि संताला लाभतं; आणि त्यापोटी येणारं नवनिर्मितिक्षम एकाकीपण. इंदिराबाईच्या काव्यात त्याच्या अनेक छटा, आत्ताच वाचलेल्या कवितेप्रमाण स्वतंत्र रूपात, अथवा दुसऱ्या प्रत्येक अनुभवाबरोबर सावलीसारख्या व्यक्त झाल्या आहेत, असं मला वाटतं.

इंदिराबाईंच्या कवितेची जी अभिव्यक्ती आहे ती फार साधी, सोपी वाटणारी पण बाळबोध नसलेली आहे. एक तर तिचं नातं ओवीच्या परंपरेशी आहे. त्यांनी स्वतःच तसं सांगितलं आहे. पण त्यांनी सांगितलं नसतं तरी ते सहज कळण्यासारखं आहे. मघाशी त्यांच्या कवितेच्या हलक्या, सोशिक, समजदार स्वराबद्दल बोलताना मी भारतीय स्त्रीच्या तशा परंपरागत सुराचा उल्लेख केला होता. ते हार्द जर ध्यानात घेतलं तर इंदिराबाईंचं मराठी ओवीशी असलेलं जणू रक्ताचं नातं स्वाभाविक वाटेल. थोडी अतिशयोक्ती करून असं म्हणावंसं वाटतं, की इंदिराबाईंची कविता ही आधुनिक काळातली 'मालनगाथा’च आहे. त्यांच्या कवितेचं दुसरं नातं त्या ज्या वातावरणात वाढत्या त्या मुख्यतः रविकिरण मंडळाच्या कवितेशी आहे. 

त्यांच्या कवितेच्या मुक्ततेचं, आणि कलात्मक विकासाचं नातं मढेकरांनी निर्माण केलेल्या नव्या काव्यदृष्टीशी आणि आत्मनिष्ठेच्या वातावरणाशी आहे. पण त्यांच्या कवितेचं फार आतड्याचं नातं मराठी भाषेच्या अतिशय अस्सल स्वाभाविक अशा रूपाशी आहे. त्यांच्या काव्याचा सूर नाट्यमय नाही खरा, पण त्याच्या रूपात सूक्ष्म नाट्य आहे. 'ऐक जरा ना' सारख्या त्यांच्या कवितांत ते नाटयरूप ठळक आहे. पण 'चित्कळा', 'वंशकुसुम' यांसारख्या त्यांच्या अलीकडच्या कवितासंग्रहांतल्या कविता पाहिल्या तर असं दिसेल की अगदी स्वाभाविक, नेहमीच्या बोलण्यातली, गद्यप्राय भाषा वापरून आणि तिचा कळेल न कळेल अशा हळुवार जातीचा नाट्यमय उपयोग करून त्या आपली कविता लिहितात. 

'चित्कळा 'मध्ये 'मीच की’ नावाची एक कविता आहे. अगदी घरगुती संवादासारखी. त्या कवितेतली गृहिणी पुष्कळशा गोष्टी खरेदी करून आणते. ह्याच्याकरता अमूक, त्याच्याकरता तमूक आणि स्वतःकरता 'हे सगळे मलाच ‘की असं ती सांगते. पण तो जेव्हा विचारतो, की 'आणि मला?' तेव्हा म्हणते, 'मीच की' अशी ही छोटी कविता नाटकी न होता, रंगभूमीवर यशाचे झेंडे लावणाऱ्या नाटककारांनी हेवा करावा अशा स्वाभाविक नाट्यगुणांनी भरलेली आहे. त्यासाठी इंदिराबाईनी ज्या तन्हेनं रोजच्या भाषेचा शोध घेतलाय आणि तो घेताना जे पथ्य पाळलंय ते अनेक कवींना साधत नाही. 

कवींजवळ अभिव्यक्तीचं साधन केवळ भाषा हेच असतं. आपल्या मनात दाटलेला आशय सांगण्यासाठी भाषेचं हे साधन किती वापरू आणि किती नको, असं सामान्यतः त्यांना होऊन जातं. इंदिराबाईंनी पाळलेलं पथ्य चांगल्या भावकवितेला अपरिहार्य असतं खरं, पण ते दुर्घटही असतं. ते पथ्य म्हणजे अगदी मोजकं, जितक्यास तितकंच बोलण्याचे- एरवी अबोलपणाचं. ते पथ्य इंदिराबाईंनी व्रतासारखं पाळलंय. त्यांची एक फार प्रसिद्ध कविता आहे:

कधी कुठे न भेटणार: 

कधि न काहि बोलणार: 

कधी कधी न अक्षरांत 

मन माझे ओवणार. 

 

निखळे कधि अश्रु एक 

ज्यात तुझे बिंब दिसे;

निखळे निःश्वास एक

ज्यात तुझी याद असे.

 

पण तिथेच, ते तिथेच

मिटुन ओठ संपणार

व्रत कठोर हे असेच,

हे असेच चालणार

मनात येतं, की ही कविता आणखी कुणाला उद्देशून असोही, ती मनातील अतूट आशयाला आणि त्याच्या अपरिहार्य काव्यरूपाला उद्देशूनदेखील आहे. असं व्रत फार कठीण. पण ते जर का कुणी घेतलं, त्यानं उतलंमातलं नाही, मितभाषित्वाचा आणि तपस्वी कलात्मक औचित्याचा घेतला वसा टाकून दिला नाही, तर त्या व्रताचं केवढं सुंदर आणि अक्षय रसरशीत फळ मिळतं त्याचं उदाहरण म्हणजे इंदिराबाईंची कविता आहे.

मी आत्ताच त्यांच्या मितभाषित्वाचा आणि तपस्वी कलात्मक औचित्याचा उल्लेख केला. कवी म्हणून त्यांना भाषा वापरावीच लागते; तिच्याविना कोणाही कवीला गत्यंतर नसतं. कारण भाषा हे त्याचं साधनद्रव्यच आहे. 'मिटुन ओठ संपणार' हेही शब्दांतच सांगावं लागतं. पण आपल्या आशयाला अपरिहार्य असलेल्या, त्याच्याशी एकात्म झालेल्या भावारूपाचा इंदिराबाईंचा ध्यास 'सहवास' या पहिल्या कवितासंग्रहापासून चालू झालेला दिसतो आणि तो आजही चालू आहे. 

आपल्या अनुभूतीला उचित अशी प्रतिमा कशी मिळेल याचा शोध तर त्या अखंड घेत असतातच, पण कसलेही काव्यालंकार किंवा प्रतिमा न वापरतादेखील आपली प्रतीती तीव्रपणे आणि नेमकी कशी व्यक्त करता येईल याचाही अधिकाधिक आणि अविरत वेध घेताना दिसतात. त्यांचे कवितासंग्रह क्रमाने वाचले तर याची साक्ष पटेल. कवितेच्या इतक्या साध्यासुध्या भासणाऱ्या रूपात एवढं अंगभूत लावण्य क्वचितच आढळतं. आणि एवढं कलात्मक यश मिळूनही त्यांचं समाधान होत नाही असं दिसतं. प्रतिभावंताच्या या असमाधानाचं वर्णन 'सब्लाइम डिस्सेटिस्फॅक्शन' असं केलं जातं. 

हे उदात्त असमाधान प्रत्येक कलावंतांच्या ठिकाणी असावं लागतं; पण फार थोड्यांच्या ठायी ते असतं. अल्पशा यशानं किंवा आज सुलभ झालेल्या प्रसिद्धीनं बहुतेक जण आत्मतृप्त होतात. इंदिराबाई त्यांपैकी नाहीत हे आपलं केवढं सुदैव! कवितेसाठी निष्कलंक आणि उचित शब्दांची अपेक्षा त्यांनी एका कवितेत व्यक्त केली आहे: खरं तर जणू शब्दांची वाट पाहून थकलेल्या कविमनाची ती हाकच आहे. केशवसुतांनी विन्मुख झालेल्या गाणाऱ्या शब्दांना शब्दांनो मागुते या म्हणून निर्वाणीची हाक दिली. इंदिराबाईंची हाक आदर्श शब्दाला आहे.

ते शब्द हवेत

अथांग काळजाच्या गाभाऱ्यांतून उमटणारे

लामणाच्या अलवार झिरिमिरीने मनोमन

उजळून टाकणारे,

गंधगारव्याने लिंपून अवघे जीवन

एक पूजेचे तबक करणारे

ते शब्द हवेत.

त्यांच्यासाठी शब्दाशब्दांचे बाजार धुंडाळले,

भूतकाळाचे वाळवंट तुडवले, 

साहित्याच्या दऱ्याखोऱ्यांतून हिंडले,

अध्यात्माच्या धुक्यांतून वेध घेतले...

आता मन थकले...

तरी त्या मानससरोवराची मंद गाज

त्या निरंजनांना निरंतर हाकारत आहे,

त्यांच्यापर्यंत पोहोचू बघते आहे.

पण निरंजन शब्दांना कवीची आर्त हाक नेहमीच सहज पोचत नाही. त्यांचा अखंड ध्यास घ्यावा लागतो. देवघरातली समई, निरांजन, पूजेची भांडी घासूनपुसून लखलखीत ठेवावीत, तसा कवितेतील प्रत्येक शब्द प्रत्येक प्रतिमा साक्षेपानं निवडावी आणि उजळून घ्यावी लागते. अथकपणे कवितेवर संस्कार करावे लागतात. इंदिराबाई आजही त्या कष्टांना कंटाळत नाहीत. त्यांच्या सदा जागृत आणि अतिसावध सौंदर्यदृष्टीचं समाधान होईतो कवितेचं मनातल्या मनात किंवा प्रत्यक्षात पुनर्लेखन करतात. त्यांनीच म्हटल्याप्रमाणं कवितेतला प्रत्येक शब्द ‘आत्मस्पर्शी' होईपर्यंत. 

'लयवेल्हाळ' या त्यांच्या कवितेचं उदाहरण या संदर्भात सांगण्यासारखं आहे. त्यांनी मौज दिवाळी अंकासाठी प्रथम ती पाठवली, ते तिचं रूप थोडं वेगळं होतं. नाव वेगळं होतं. शेवटच्या ओळी वेगळ्या होत्या. काही शब्द वेगळे होते. ते रूप चांगल होतं. पण त्यानं पुरतं समाधान झालेल नव्हतं म्हणून तिचं पुनर्लेखन करून त्यांनी ती पुन्हा पाठवली. त्या कवितेच्या दोन्ही रूपांची तुलना केली म्हणजे त्यांच्या सुक्ष्म आणि तीक्ष्ण सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय येतो. 

या कवितेच्या पुनर्लेखनावर त्यांनी जे टिपण लिहिलं आहे त्यात त्यांच्या मार्मिक समीक्षादृष्टीची साक्ष तर पटतेच, पण कलावंत म्हणून निर्दोष आणि परिपूर्ण निर्मितीच्या हव्यासाची आणि त्याच वेळी कलावंताच्या गंभीरवृत्तीची आणि विनम्रतेचीही साक्ष पटते. ती कविता अशी आहे. 

किती उंचावरून- पानाफांद्यांमधून

आकाशातून... बकुळीचे हे ओघळणे

किती लडिवाळ... लोभसवाणे!

झुंझुकमुंझुक वाऱ्याच्या अलवार लयीवर

हिचे हळुवार हिंदकळणे... की कुणाच्या मनोमनीचे

मंद्रसुवासी सरगमणे...!

पिवळ्या पिसोळीने अलगद सोनकीवर उतरावे

तसे हिने तळीच्या गवतपात्यावर हलकेच समेवर यावे!

किंचित रेलून... त्या हिरव्या-निळ्या कोवळ्या उन्हात

या गौरांग कवडुसलीने

किती म्हणून लाडके दिसावे...!

हे बकुळीच्या त्या अधुऱ्या अवतरणाचे

लयवेल्हाळ मंत्रमोहन.... की मेघदूताला सुखी भ्रमणाचा

आशीर्वाद देताना

यक्षाच्या कमळाक्षात लहरलेले रंगबावरे मनभावन...!

ही कविता वाचताना मनात येते, की हे बकुळीचं फूल म्हणजे इंदिराबाईंची साधी, गौरांग, मंद्रसुवासी, लयवेल्हाळ कविता तर नव्हे? ती अशीच हलकेच आकाशातून ओघळल्यासारखी तर अवतरत नसेल? ती कितीही जुनी झाली तरी बकुळीच्या फुलासारखी ती बावणार नाही की तिचं निर्माल्य होणार नाही. तिचा मंद सुवास आपल्या मनाच्या बरड मातीलादेखील आशीर्वादासारखा येतच राहील. अभिजात कलाकृतीचं मनभावन अक्षयच असतं.

कोणतीही कविता, विशेषतः भावकविता, रसिकांनी कशी वाचावी? इंदिराबाईंनी एका प्रस्तावनेत म्हटलं आहे: 'तळ्याच्या किंवा नदीच्या काठावरून आपण पाण्यात शिरतो. पाण्याच्या स्पर्शाचा आनंद घेतघेतच आपण पुढंपुढ जातो. कमरेपर्यंत पाणी आलं की हातांनी पाण्याशी खेळतो- आणि गळ्यापर्यंत पुढं जाता जाता आपण पोहण्यासाठी पाण्याच्या स्वाधीन होतो.. कवितेतदेखील असं उतरावं लागतं. तरच कवितेचा खरा आस्वाद आपणाला घेता येतो. त्यांच्या अमृताच्या ताटी माझी नरोटी ठेवायची परवानगी त्यांनी दिली तर मी पुढे म्हणेन, की शेवटी तर कवितेत बुडी घ्यावी लागते. 

तशी बुडी घेऊन तळ गाठता आला, आणि मिटलेले डोळे उघडले, तर त्या नितळशंख पाण्याच्या तळाशी विलक्षण आकाराची आणि रंगांची प्रवाळाची फार सुंदर अशी बेटं दिसतात. सजीव पाणफुलं दिसतात. गोड काळिमा पसरलेल्या गहनगूढ डोहाच्या तळाशी दडलेली एक अद्भुत सृष्टी आपल्या नितळ दृष्टीला मोकळी होते. खरोखर इंदिराबाईंची कविता आपण अशा नितळ, तरलस्पर्शी मनानं वाचायला हवी. 'कैलासलेणं' नावाची त्यांची एक कविता आहे. ते सौंदर्याचं शिल्प कसं पाहावं? त्या म्हणतात, की डोळ्यांवरचा रंगीत चष्मा, खांद्यावरचा ट्रान्झिस्टर आणि प्रवासी पिशवी उतरून ठेवावी. पायांतल्या चपलाही काढाव्या. इतकंच नाही... आणि हे महत्त्वाचं आहे : 

...ठेव उतरुनी तुझियामधले

तुझे तुझेपण... कलावंत मी, चित्रकार मी,

इतिहासाची अभ्यासू मी,

रसिक कवी मी,

मार्मिकशी अन् समीक्षिका मी. 

ठेव उतरुनी

असला शेंदुर आत्म्यावरचा

निखळ जळासम होऊनिया चढ पुढे पायरी.

अशा विनम्र वृत्तीनं त्या अज्ञात कलावंताच्या पाषाणस्वप्नापाशी उभं राहिलं, तर बघता बघता नजरेची छिन्नी होईल: तीच नवनिर्मितिक्षम होईल. बाहेरच्या भक्क जगाचं भानच उरणार नाही. आणि नंतर जरी त्या लेण्यापासून दूर दूर गेलं, तरी

इथे राहशिल शिवमूर्तीच्या जगसंरक्षक पायांभवती

घिरट्या घालित,

इथे राहशिल तुझ्यातील तू होउन हिरवा राघू

इंदिराबाईंची कविता अशीच वाचायची. आपल्यादेखील आत्म्यावर मी मोठा रसिक आहे, अत्याधुनिक टीकाकार आहे. चिकित्सक समीक्षक आहे, विद्वान प्राध्यापक आहे, थोर भाषाशास्त्रज्ञ आहे, चोखंदळ संपादक-प्रकाशक आहे- असे अहंभावाच्या शेंदुराचे लेपावर लेप असतात. ते सगळे खरवडून काढून टाकायला हवेत. अशा निखळ, निर्लेप मनानं जर त्या कवितेला सरळ सामोरं जाता आलं, तर मग कदाचित आपल्या गद्य मनातला हिरवा राघू त्या कवितेशी बोलू लागेल.

इंदिराबाईची कविता आपल्या निरंजन आणि शिवसुंदर रूपाचा सतत शोध घेत राहो आणि त्याच्या संजीवक स्पर्शाने तुमच्या आमच्या मनात रसिकतेचा हिरवा राघू अविरत बोलत गात राहो. इंदिराबाईंनी इतकी वर्ष इतकी चांगली कविता लिहिल्यावरती आपल्या सर्वांच्या मनात जी कृतज्ञता आहे, तिची आजचा जनस्थान पुरस्कार ही एक लहानशी खूण आहे: त्यांच्याच कवितेतील लयवेल्हाळ बकुळीच्या फुलासारखी. किंवा वंशकुसुमासारखी. कधीही न फिटणा-या ऋणानं भारावलेल्या मनानं, आपणा सर्वांतर्फे मी त्यांना वंदन करतो.

Tags: रसग्रहणात्मक विवेचन जनस्थान पुरस्कार कवयित्री इंदिरा संत श्री. पु. भागवत Rasagrahanatmak Vivechan Janasthan Award Poet Indira Sant Weekly Sadhana Mr. P. Bhagwat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके