डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

राम : ब्राह्मण-ब्राह्मणेतरांच्या राजकारणाचा नायक

तमिळनाडूमधले सर्वसाधारण जनमत, तेथील वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आणि राजकारणाचा पोत लक्षात घेऊन, हिंदू कितीही धार्मिक असला तरी वेगवेगळ्या बाबींच्या अनुषंगाने तो अनेक धार्मिक बाजूंवर टीकाही करतो. एखाद्या धर्मसुधारकाच्या भूमिकेतून तेथील हिंदू धर्माकडे पाहतात. रामाच्या अस्तित्वाला आव्हान देऊनही करुणानिधी त्यांच्या स्थानावर टिकून राहिले आहेत, ते तेथील हिंदूंच्या याच अढळ विश्वासामुळे.

द्रमुक नेते आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.करुणानिधी रामाला ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व समजत नाहीत, तर मानवी कल्पनाविलासाची एक लहर समजतात. त्यांनी भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांना रामाच्या ऐतिहासिक स्थानाच्या संदर्भात जाहीर चर्चा करण्यासाठी आमंत्रित तर केले आहेच; पण जखमेवर मीठ चोळीत त्यांना वाल्मिकी रामायणाचे एकाग्रतेने अध्ययन करून येण्यास सांगितले आहे.

करुणानिधींच्या या शेऱ्याने अडवाणी आणि त्यांचे चेले यांच्या अंगाची संतापाने लाहीलाही झाली असेल यात शंका नाही, परंतु करुणानिधींविरुद्ध तामिळनाडूमधील हिंदूंना चिथवण्यात त्यांना अजिबात यश आलेले नाही. त्यामुळे त्यांना जे वैफल्य आले ते भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी पत्रकार परिषदेत करुणानिधींचे आणि त्यांच्या समर्थकांचेही कदाचित डोके फिरले असावे, असे जे उद्गार काढले त्यांतून व्यक्त होते.

पण काही मूठभर विचारवंत सोडले, तर द्रमुकचे बहुतांश अनुयायी आणि हितचिंतक हे ब्राह्मणेतर हिंदू असून श्रद्धाळू आहेत. ते अत्यंत नियमाने देवळात जातात, पूजा बांधतात आणि देवस्थानांच्या यात्राही करतात. रामाला नाकारणाऱ्या करुणानिधींबरोबर ही मंडळी आहेत, त्यामागे त्यांची काही स्वतंत्र मानसिकता असू शकते. एकतर करुणानिधींनी रामायणावर मारलेल्या शेऱ्यांत नवीन असे काहीच नाही. 192० साली तमिळनाडूमधील बहुजन समाजाचे नेते पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांनी 'स्वाभिमान आंदोलन' चालू केले, तेव्हापासूनच तेथील जनतेमध्ये राम हा जोरदार सार्वत्रिक चर्चेचा विषय होऊन बसला आहे.

तमिळनाडूमधील ब्राह्मणेतरांची रामायणावरील टीका तीन प्रकारच्या घटनांच्या आधारे केलेली आहे. पहिली घटना म्हणजे जन्माने क्षत्रिय असूनही राम ब्राह्मणी संस्कारात वाढला. प्रायश्चित्त म्हणून त्याने शंबूकासारख्या शूद्राला मारले. त्यामुळे ब्राह्मणी मूल्यांचे तुष्टीकरण करणारा, अशीच त्याची प्रतिमा लोकांमध्ये निर्माण झाली. दुसरी गोष्ट म्हणजे वालीचा बंदोबस्त त्याने सरळसरळ समोर लढून केला नाही; तर त्याची फसवणूक करून दुसर्याच्या आडून बाण मारून त्याची हत्या केली. त्यामुळे राम हा नैतिकतेचा आदर्श राहिला नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रामायणाच्या कथेत उत्तर भारतीयांचे दक्षिणेवरील वर्चस्व अधोरेखित केलेले आहे. त्यामुळे तमिळनाडूमधील ब्राह्मणेतरांवर या घटनांचे प्रतिसाद उमटत आले आहेत. ब्राह्मणांना ब्राह्मणेतरांपेक्षा विशेष अधिकार कोणी दिले व का दिले, हा या प्रदेशातील जनतेचा कायम प्रश्न आहे. त्यामुळे रामायणाचा स्वीकार येथे टीकेशिवाय अगर चिकित्सेशिवाय होत नाही.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे द्रविडांच्या राजकारणाने तमिळांची प्रादेशिक अस्मिता जपलेली आहे. कोणत्याही धर्माच्या अस्मितेऐवजी ब्राह्मणेतर म्हणून आपली ओळख ते अभिमानाने सांगतात. द्रविडांच्या या राजकारणाला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्व धर्मीयांचा पाठिंबा आहे. सार्वजनिक जीवनात धार्मिक प्रश्न उद्भवलेच तर ते भाषिक आणि जातीय अस्मितेतून उद्भवतात. उदाहरणार्थ, येथील ब्राह्मणेतरांची एक मागणी दीर्घ काळापासून प्रलंबित आहे, ती म्हणजे त्यांना पूजा देवळाच्या गाभाऱ्यात जाऊन संस्कृतमधून नव्हे, तर तमिळ भाषेतून पूजामंत्र म्हणून करता यावी.

अशा त-हेने जाती-भाषा-प्रदेशनिरपेक्ष अशा एकसंध हिंदू धर्माची ओळख, येथील ब्राह्मणेतर जनतेसमोर प्रश्नचिन्हे उभी करणारी आहे. त्यामुळे भाजपने उभ्या केलेल्या सलग आणि भेदरहित हिंदुत्वाच्या प्रतिमेकडे येथील बहुजन समाज संशयाने पाहत असल्यास नवल नाही. या हिंदू ब्राह्मणेतर अनुयायांवर करुणानिधींचा असलेला विश्वास तेथील राजकीय परंपरांचा विचार करता सार्थच होता. हिंदू मूलत्त्ववाद्यांनी याआधीही करुणानिधींच्या विरोधात अशाच अनेक मोहिमा चालवल्या होत्या.

1972 सालच्या विधानसभा आणि लोकसभा निरवडणुकांत याचा प्रत्यय आला. पेरियारांनी सालेम येथे अंधश्रद्धा व जुन्या रूढींविरोधी परिषद घेतली होती. त्यातील कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रामाच्या प्रतिमेची धिंड काढून तिला चपलांचा हार घालून अखेर तिचे दहन करण्यात आले. जेव्हा या कार्यक्रमाची सर्व छायाचित्रे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली, तेव्हा उत्तर भारतात संतापाची लहर उठली. त्या वेळच्या जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी सालेम परिषदेचे वर्णन 'लाजिरवाणी घटना' या शब्दांत केले. या घटनेने देशातील लक्षावधी हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. 

या सालेम परिषदेमध्ये घडलेल्या घटनांचा फायदा करून घेण्याचे संघटना काँग्रेस (कॉ.ओ)चे नेते कामराज यांनी ठरवले. आपला धर्मनिरपेक्ष मुखवटा बाजूला ठेवून त्यांनी सरळसरळ हिंदू जातीयवाद्यांशी हातमिळवणी केली. दुसरे नेते स्वतंत्र पक्षाचे सी.राजगोपालाचारी यांनी कामराजांबरोबरचे आपले मतभेद मिटवले आणि ब्राह्मणांना जानवी परिधान करण्याचे आवाहन करून द्रमुक विरोधी मतदान करावे, असा आदेश दिला. जनसंघ, मंदिर बचाव समिती आणि आस्तिक समाज यांसारख्या हिंदू जातीयवादी संघटनांनी द्रमुक विरुद्ध वृत्तपत्रांच्या साहाय्याने कडवा प्रचार करून द्रमुक ही संघटना हिंदूविरोधी असल्याचे जाहीर केले.

पण निवडणुकांचे निकाल मात्र संघटना काँग्रेस आणि उजवे हिंदू जातीयवादी संघटन यांना तीव्र धक्का देणारे होते. लोकसभेची जागा मिळवणारे कामराज हे संघटना काँग्रेसचे एकमेव नेते होते. उरलेल्या लोकसभेच्या सर्व जागा द्रमुक आणि त्यांचे आघाडीतील सहकारी पक्ष यांच्याकडे गेल्या. तमिळनाडूमधील द्रमुकची कामगिरी उल्लेखनीय आणि अभूतपूर्व होती. विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी 184 जागा द्रमुकने जिंकल्या. अशा त-हेने बहुसंख्य तमिळ हिंदूंनी द्रमुकची निवड करून रामाला दूर ठेवले.

म्हणूनच असे म्हणावे लागते, की हिंदू म्हणून असण्याचे एक नव्हे अनेक मार्ग आहेत. तमिळनाडूमधले सर्वसाधारण जनमत, तेथील वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आणि राजकारणाचा पोत लक्षात घेऊन, हिंदू कितीही धार्मिक असला तरी वेगवेगळ्या बाबींच्या अनुषंगाने तो अनेक धार्मिक बाजूंवर टीकाही करतो. एखाद्या धर्मसुधारकाच्या भूमिकेतून तेथील हिंदू धर्माकडे पाहतात. रामाच्या अस्तित्वाला आव्हान देऊनही करुणानिधी त्यांच्या स्थानावर टिकून राहिले आहेत, ते तेथील हिंदूंच्या याच अढळ विश्वासामुळे.

('टाइम्स ऑफ इंडिया वरून साभार)

Tags: तमिळनाडू हिंदू ब्राह्मणेतर द्रमुक मुख्यमंत्री एम.करुणानिधी राम कल्पनाविलासाची एक लहर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके