डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आषाढी एकादशी आली की गेली- संतपरंपरेवरचं वार्षिक ‘रिंगण’ प्रकाशित होणार, याची आता सवयच झालीय. दिवाळीचे अंक असतात, तर महाराष्ट्राचा सगळ्यांत मोठा सोहळा असलेल्या आषाढी एकादशीचे अंक का नकोत, या प्रश्नाच्या उत्तरादाखल सुरू झालेल्या ‘रिंगण’चा यंदा नववा अंक येईल. दर वर्षी एका संताच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या पाऊलखुणा शोधणारा हा अंक नव्या पिढीच्या शैलीत संतपरंपरा मांडतो. एक तरुणांची नवी चळवळच बनलेल्या ‘रिंगण’चे संपादक सचिन परब यांच्याशी केलेला हा संवाद.

प्रश्न - सगळ्यात पहिलं, ‘रिंगण’ची कल्पना तुम्हांला कशी सुचली?

- घरात सांप्रदायिक वातावरण नसलं तरी कार्तिकी वारी होती. आजी आणि नंतर वडील कार्तिकी एकादशीला वारीला जात होते. तितकेच वाचनाचे संस्कार होते. साने गुरुजींपासून कॉ. शरद पाटलांपर्यंत आणि म. वा. धोंडांपासून भालचंद्र नेमाडेंपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे लिहिणारी माणसं मला ढकलत ढकलत ‘रिंगण’कडे घेऊन आली. त्यात डॉ. सदानंद मोरेंच्या ‘तुकाराम दर्शन’ने शेवटचा घाव घातला. मी तुकाराम दर्शन वाचलं नसतं, तर ‘रिंगण’च्या नादाला लागलोच नसतो, इतका तो प्रभाव आहे. तुकोबा एकदम जवळचे वाटत होते आणि नामदेवरायांचं अद्भुत काम दिपवून टाकत होतं. मग पत्रकार म्हणून जिथं काम करत होतो, तिथं हळूहळू व्यक्त होत गेलो.

महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटचा संपादक असताना ते माझंच मला प्रकर्षानं जाणवू लागलं होतं. तेव्हा म.टा.ने आषाढी एकादशीचा अंक केला होता. पण डॉ. भारतकुमार राउतांनी संपादकपद सोडल्यानंतर तो बंद झाला. मी त्यांना भेटायला गेलो, म्हणालो, ‘‘आषाढीचा अंक निघायला पाहिजे.’’ ते म्हणाले, ‘‘मी आता तिथे नाही. तू आहेस, तू कर काहीतरी.’’ मी काय कप्पाळ करणार होतो! पण ती गोष्ट डोक्यात राहिली. आपण आषाढी एकादशीचा अंक करायचाच. दिवाळीचे अंक असतात, तर महाराष्ट्राचा सगळ्यांत मोठा सोहळा असलेल्या आषाढी एकादशीचा अंक का नको?

प्रश्न - पण हा अंक एका संतावरच करायचा ही कल्पना कशी पुढे आली?

- सुरुवातीला श्रीरंग गायकवाड सोबत होते. ते पारंपरिक वारकरी सांप्रदायिक कुटुंबातून आलेले. त्यांच्याशी दिवस दिवस गप्पा व्हायच्या. त्यातून दर वर्षी एका संतावर अंक करण्याची कल्पना पुढे आली. मी नामदेवांपायी वेडा झालो होतो. ठरलं, पहिला अंक नामदेवांवरच करायचा. महाराष्ट्रभरातून माणसं जुळत गेली. अंक आला. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. वर्ष 2012 होतं ते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरला प्रकाशन. राज्यभर वितरण. माध्यमांनी घेतलेली दखल. सत्कार, मुलाखती, कौतुक, असं खूप काही.

त्यानंतर 2013 ला नवी नोकरी होती. पैसे नव्हते. त्यामुळे अंक निघाला नाही. 2014 ला संत चोखामेळा, नंतर संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत विसोबा खेचर, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत सोपानदेव हे अंक आतापर्यंत आलेत. यंदा 2021 च्या आषाढी एकादशीला ‘संत नरहरी सोनार विशेषांक’ येतोय.

संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं वार्षिक असं त्याचं स्वरूप आहे. प्रत्येक अंकात जागतिक कीर्तीचे चित्रकार शिल्पकार भास्कर हांडे यांचं अभ्यासातून साकारलेलं मुखपृष्ठ. तरुण पत्रकारांनी संतांच्या गावांमध्येे जाऊन रिपोर्ताजच्या माध्यमातून संतांच्या पाऊलखुणांचा घेतलेला शोध. सदानंद मोरे, रामदास डांगे, अशोक कामत, श्रीकांत देशमुख, अभय टिळक, रंगनाथ तिवारी अशा अनेक मान्यवर अभ्यासकांचं चिंतन. चरित्र, कादंबरी, गाणं, सिनेमा, नाटक, लोकपरंपरा यांतला त्या संताचा प्रभाव. असा समग्र पट उत्तम निर्मितिमूल्यं सांभाळून मांडण्याचा प्रयत्न ‘रिंगण’च्या अंकातून होतो. 

प्रश्न - ‘रिंगण’नं स्वतःच्या लेखनाची भाषा शोधली. संतपरंपरेचा शोध रिपोर्ताजच्या माध्यमातून घ्यायचा. इथून पाठीमागे अशा पद्धतीनं ते काही फार प्रमाणात झालं नव्हतं. त्याविषयी काही सांगा.

- आधी भाषेविषयी बोलतो. आम्ही संतसाहित्याचे अभ्यासक नाही, संशोधक नाही, सांप्रदायिकही नाही. मग आम्ही कोण आहोत? तर पत्रकार आहोत. आपण पत्रकार म्हणून सामाजिक-सांस्कृतिक अंगानं संतपरंपरेचा शोध घ्यायचा हे स्पष्ट होतं. पत्रकारिता ही एकदम कसदार, रसदार, रसरशीत भाषेची गोष्ट आहे. सर्वसामान्य वाचकाला सर्वाधित कम्फर्टेबल अशी भाषा पत्रकाराचीच असते. भाषेचे अनेक प्रयोग झालेल्या ‘आज दिनांक’ या सायंदैनिकात मी पत्रकारितेचे धडे गिरवले. मराठी वर्तमानपत्रांची भाषा बदलत असताना महाराष्ट्र टाइम्समध्ये नोकरी केली. तरुणांसाठीची ‘व्हायब्रंट’ भाषा वापरणाऱ्या मुंबई टाइम्सचा मी संपादक होतो. टीव्ही आणि इंटरनेट पत्रकारितेतली भाषा अनुभवलेली होती. त्यामुळे या पत्रकारितेच्या भाषेवर विश्वास होता आणि आहे. त्यामुळे माझ्या भाषेत काही बदल झाला नाही. पण सांगायच्या गोष्टी बदलल्या. बातम्यांच्या जागी संतपरंपरा आली.

सोप्या भाषेत मांडायचं म्हणून ‘रिंगण’मध्ये आजही अनेक लेख री-राइट केले जातात. मग तो लेख कुणाचाही असो. बोलीभाषेतले शब्द असतात. इंग्रजी, हिंदी शब्दांची रेलचेल असते. ॲकॅडमिक भाषेतल्या लेखांचं गांभीर्य कायम ठेवून ती खूपच वाकवावी लागते. जवळपास पूर्ण महाराष्ट्र निमशहरी झालाय. त्याचं राहणं-खाणं बदललंय. तसंच भाषाही बदललीय. त्या सगळ्यांसाठी ‘रिंगण’ आहे, हे नेहमी डोक्यात असल्यामुळे भाषा बदलत गेलीय.

प्रश्न - हे झालं भाषेचं, पण ‘रिंगण’च्या प्रत्येक अंकात रिपोर्ताजवर भर असतो. त्याआधी संतसाहित्यावर पारंपरिक निबंध लिहिण्याची पद्धत होती. त्याला तुम्ही फाटा दिला आणि संतपरंपरेचा शोध घेण्याच्या बाबतीत रिपोर्ताजचं एक नवं माध्यम आणलं?

- दोन वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाने ‘रिंगण’वर एका दिवसाचं चर्चासत्र घेतलं होतं. त्यात ‘रिंगण’ने संतसाहित्याची नवी शैली घडवल्याचं अनेक मान्यवर अभ्यासकांनी म्हटलं. संत आपण वर्तमानाच्या संदर्भात शोधतोय, हे ‘रिंगण’चं सूत्र सुरुवातीला स्पष्ट नव्हतं. ते अंक करताना उमगत गेलं. ते करण्यासाठी रिपोर्ताज हे माध्यम मात्र पक्कं होतं. बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष बनले तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की मी टीव्हीवर पोसलेल्या पिढीचा प्रतिनिधी आहे. आम्ही नव्वदच्या दशकात दहावी झालेले लोकही टीव्हीवर पोसलेली इथली पहिली पिढी आहोत. त्यामुळे आमच्या मांडणीत टीव्ही होताच. रिपोर्ताज ही डॉक्युमेंट्री असते. त्यामुळे तो फॉर्म कायम आवडत राहिला. फणीश्वरनाथ रेणूंपासून आपल्या अनिल अवचट, निळू दामले यांच्यामुळे तो जास्त जवळचा झाला होता. चित्रलेखा, आउटलुक यांचाही प्रभाव होता.

सातशे वर्षांपूर्वी झालेल्या संतांचा संबंध आलेल्या गावांत आज त्यांच्या पाऊलखुणा शोधायच्या होत्या. त्यासाठी रिपोर्ताज हेच माध्यम होतं. त्यातूनच त्यांचं चरित्र आणि प्रभाव दोन्ही उलगडत जाणं अपेक्षित होतं. मग नामदेवांसाठी पंढरपूर आणि नरसींबरोबरच पंजाबला जावं लागणार होतं. आमचा मित्र नीलेश बने पंजाबमध्येही गेला. कुणीतरी लिहिण्यासाठी बऱ्याच वर्षांनी नामदेवरायांना शोधात पंजाबात गेलं होतं. त्यामुळे मजा आली. तेच पुढच्या अंकांमध्ये घडत गेलं. मग अनेक मोठमोठ्या लेखक-अभ्यासकांचे लेख असूनही रिपोर्ताज ही ‘रिंगण’ची ओळख बनली.

प्रश्न - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथं ‘रिंगण’वर झालेल्या चर्चासत्रात तुम्ही एक विधान केलं होतं, की आजारी महाराष्ट्राचा इलाज करायचा असेल तर चंद्रभागेच्या वाळवंटात पुरलेली नाळ शोधावी लागेल. आजच्या आधुनिक महाराष्ट्राच्या मूल्य ऱ्हासासंबंधी तुम्ही हे विधान केलं होतं. संत परंपरेविषयी परतून इलाज शोधण्याविषयी तुम्ही इथं बोलत आहात. त्यातून कसा इलाज शोधता येईल असं तुम्हांला वाटतं?

- स्टेमसेल थेरपी नावाची एक उपचारपद्धती मध्यंतरी खूप चर्चेत होती. आपल्या मुलाची नाळ जन्मताच जपून ठेवायची. नाळेत कोणतीही विकृती न आलेल्या मूळ पेशी असतात. त्यामुळे पुढे शरीरात विकृती आल्यावर मूळ पेशी वापरून उपचार करायचा, असं सूत्र या उपचारपद्धतीत असावं असा माझा समज आहे. त्यामुळे आपल्या समाजजीवनात विकृती आली असेल तर आपल्या परंपरेची मुळं आपल्याला शोधायला हवीत. मूळ जे निर्मळ आहे, तिथं आपण जायला पाहिजे. मग महाराष्ट्राच्या संस्कृतीची अशी मूळ गोष्ट कोणती? तर ती संतपरंपरा आहे. म्हणून महाराष्ट्राची नाळ ही चंद्रभागेच्या तीरावर पुरलेली आहे. तो मूळ संतविचार समजून घेतला, तर आपल्याला गेल्या 750 वर्षांत झालेलं संस्कृतीतलं प्रदूषण दूर करता येईल. किमान नामदेवरायांपासून तुकोबारायांपर्यंत आपल्या संस्कृतीची मूस घडलीय. त्यांनी चिकित्सेचे प्रयोग केलेत, त्याचा प्रभाव आजही आपल्याला पाहता येतो. किंबहुना सांस्कृतिक प्रदूषण दूर करण्याचे नंतरही जे काही प्रयोग झालेत, त्यावर संतांचा प्रभाव आहे. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य, ते प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, गाडगेबाबा, साने गुरुजी ही तर त्याची ठळक उदाहरणं आहेत. देशपातळीवर गांधीजींचा विचार यात करावा लागेल.

प्रश्न - एकीकडे ‘रिंगण’ अशा विधायकपणे परंपरेचा शोध घेतंय. दुसरीकडे धर्मांध राजकारण करण्यासाठीही परंपरेचा शोध घेतला जातो. ते परंपरेला सनातनी व्यवस्थेकडे नेत आहेत. इतिहासाचे अर्थ चुकीचे लावले जातात, त्याप्रमाणे परंपरेचे अर्थही चुकीचे लावले जातात. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता?

- सातशे वर्षांपूर्वी जे घडलं त्याचं आपल्याला काय करायचं आहे, असं आज आपल्याला वाटतं. पण माझ्या सगळ्या जगण्याशी संबंधित असलेल्या बारीकसारीक गोष्टी या परंपरेशीच जोडलेल्या आहेत. ते सोडून आपण फक्त समकालाचाच विचार करणार असू, तर त्यातून फक्त उथळपणा हाती लागतो. अनेक नवी माध्यमं, नव्या कादंबऱ्या, नवे सिनेमे, नव्या वेबसीरिज परंपरेच्या संदर्भात नवं काही शोधू पाहत आहेत. मग ते सातपाटीलपासून कर्ननपर्यंत खूप काही आहे. पण फक्त परंपराही कामाची नाही. आपल्याला वर्तमान आणि परंपरा यांचा एकत्रित विचार करत नव्याचा शोध घ्यावा लागतो.

परंपरेकडे डोळसपणे बघणं आणि चिकित्सा करणं, हाच तर संतविचारांचा गाभा आहे. त्यामुळे तू प्रश्नात विचारलेल्या परंपरा शोधण्यासाठीच्या दोन्ही दृष्टिकोनांचा संघर्ष तेव्हापासूनच आहे. ‘वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा’, असं तुकोबाराय म्हणतात तेव्हा ते वेदांचा नव्यानं अर्थ लावत असतात. ज्ञानेश्वर माउली गीतेचा नव्यानं अर्थ लावत असतात. अशा वेळेस मूलतत्त्ववादी सनातन्यांनी त्यांचा छळ केलेला आहेच. संत त्यांच्या जगण्यातून सांगतात की धर्माची चिकित्सा करणं ही फार आवश्यक गोष्ट आहे.

आपण धर्म, जात या गोष्टी ऑप्शनला टाकतो. कारण याच्यामुळं भेद निर्माण झालेले आहेत. पण धर्म आणि जात यांनी आपल्याला वेढलेलं असताना त्यापासून पळून काय फायदा आहे? त्यांनी उभ्या केलेल्या आव्हानांना निधड्या छातीने भिडायला पाहिजे. ते करताना धर्म समजून घ्यावा लागेल. धर्माचे दोन परस्परविरोधी अर्थ लावण्यामधला सगळा संघर्ष आहे. अशा वेळेस धर्मच मान्य नसेल, तर त्यात तुम्हांला स्थान नाही. म्हणून माझ्यासारख्या माणसाला धर्म आणि देव या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. आम्ही वाटल्यास श्रद्धेने डोळे मिटू, पण आमचं डोकं उघडं असेल. कारण चिकित्सा नसेल तर श्रद्धा ही तकलादू बनते. आपण चड्डी विकत घेण्याआधीही विचार करतो, मात्र जगण्याला वेढलेला धर्मविचार डोळे मिटून स्वीकारतो. अर्थकारण, समाजकारण, राजकारण, अध्यात्म, नातेसंबंध या सगळ्यांना व्यापून धर्म दशांगुळं उरलेला आहे. म्हणून संत एकीकडे देवाच्या भक्तीत डुंबून गेलेले आहेत. पण तीच भक्ती त्यांना धर्माची प्रचंड चिकित्सा करायला लावते. कबीर आणि एकनाथ तर आधुनिक अभ्यासाच्या मापदंडांवरही सहजपणे महान धर्मचिकित्सक ठरतात. कुठेच कोरडं न होता, धर्माची खुलेआम चिकित्सा करणं ही त्यांची फारच जबरदस्त गोष्ट आहे. कोरड्या विचारवंतांना मात्र संतांसारखा प्रतिसाद आणि प्रभाव दाखवता आलेला नाही. दुसरीकडे अनेक आधुनिक समाजसुधारकांनी संतांचा मार्गच अनुसरलेला आहे. त्यात महात्मा गांधी हे सर्वांत महत्त्वाचं उदाहरण. महाराष्ट्रात न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, साने गुरुजी आणि अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरही. यांपैकी कुणीच धर्माचा हात सोडलेला नाही आणि त्यांनी उत्तम धर्मचिकित्साही केलीय.

प्रश्न - आधुनिक भारताचा सध्याचा लोकशाहीचा काळ संघर्षाचा काळ आहे. या काळात तुम्ही ‘रिंगण’च्या माध्यमातून संतपरंपरेचा पुनर्विचार करत आहेत. किंवा या परंपरेतलं विद्रोहाचं रूप आहे, परंपरेतलं बंड आहे, त्याचा अर्थ आजच्या पडझडीच्या काळात नव्यानं लावत आहात. तुम्ही एका संपादकीयामध्ये कॉ. गोविंद पानसरे अण्णांना पत्र लिहिलं होतं, त्यानंतर डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर विसोबा खेचर यांच्यावर ‘रिंगण’चा अंक केला होता. त्याशिवाय एक अंक नामदेव ढसाळ आणि कॉ. शरद पाटलांना समर्पित केलाय. तसंच भिडे गुरुजींनाही तुम्ही खरमरीत पत्र लिहिलं होतं. याचा अर्थ काय की ‘रिंगण’ संतपरंपरेसोबत आजच्या वर्तमानाविषयीही सजग आहे. तर ‘रिंगण’च्या माध्यमातून आजच्या भीषण वर्तमानाकडे कसं पाहता?

- मला जे बोलावसं वाटतंय, ते बोलता न येणं, ही सगळ्यांत भयंकर गोष्ट आहे. संतांचा जो एल्गार आहे, तो त्यासाठीच आहे. माझी जात कुठलीतरी आहे, वंश कुठलातरी आहे, माझा प्रांत कुठलातरी आहे, माझा धर्म कुठलातरी आहे, म्हणून जर तुम्ही मला दाबणार असाल, तर ते चुकीचंच आहे. त्या दडपशाहीच्या विरोधात आणि मक्तेदारीच्या विरोधात हे बंड आहे. संत सावता माळी, तुकोबारायांच्याही अगोदर 250-300 वर्षं सांगतात, की बरं झालं मला ब्राह्मण बनवलं नाहीस, कारण मी नको त्या गोष्टींमध्ये अडकून बसलो असतो. ही त्या काळातली फार मोठी चिकित्सा आहे. सोपानदेव सांगतात, तुम्ही माझं कूळ कशाला विचारताय? पांडवांचं, व्यास-वाल्मीकींचं कूळ कुणी विचारलं होतं का? नामदेवरायांचं गुरू ग्रंथसाहेबामधलं पद आहे, हिंदू देवळाला पुजतो आणि मुसलमान मशिदीत पुजतो. नामा तिथे पुजतो, जिथं देऊळही नाही आणि मशीदही नाही. जनाई सांगतात, बाई म्हणून जन्मले त्यात उदास होण्यासारखं काही नाही. आणि त्याही पुढे जाऊन त्या सांगतात, देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते. ही सगळी बंडखोरी आपण समजून घेणार आहोत की नाही? नेमाडेसरांच्या शब्दांत ही ‘विनम्र बंडखोरी’ आहे.

संतांचं अध्यात्म, साधना, उपासना आम्हांला मान्यच आहे. तो भाग नाकारताच येणार नाही. आम्ही मुळात अत्यंत आस्तिक, धार्मिक, श्रद्धाळू माणसं आहोत. तासन्‌तास बारीत उभं राहिल्यानंतर पंढरपूरच्या देवळात विठ्ठल समोर दिसू लागतो, तेव्हा डोळ्यांतून आसवं आपसूक ओघळायला लागतातच. माउलींच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर रोम रोम उभा राहतोच. पालखीसोबत चालताना स्वर्गसुखाचा आनंद मिळतोच. पण आमचं म्हणणं वेगळं आहे. संतांच्या काळात समाधी वगैरे लावणारी, तप करणारी, माकडहाडावरचं चक्र जागृत करणारी, देवाचा साक्षात्कार झालेली, असल्या नसल्या सिद्धी मिळवलेली खूप माणसं असणारच. त्यांना आज कोण किती आठवतंय? संतांनी वैयक्तिक उपासनेच्या पुढे जाऊन एक व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक विचार मांडला. परंपरागत पोथीनिष्ठा, मोक्ष, कर्मकांड, भेदाभेद नाकारले. समतेचा नवा एल्गार जागवला. म्हणून आजही संतांचा थेट प्रभाव असणारी लाखो माणसं महाराष्ट्रात आहेत. तो सामाजिक-सांस्कृतिक दृष्टिकोन आम्ही ‘रिंगण’मधून मांडण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेस भिडेगुरुजींसारखा कुणी विचारत असेल की माउली मोठ्या की मनू? तर त्याला उत्तर द्यावंच लागतं. आमच्यासाठी असा विचार करणं म्हणजे व्यभिचार आहे. माउलींसमोर आम्हांला मनूच नाही, तर व्यास, वाल्मीकी, शंकराचार्यांशीही घेणंदेणं नाहीये. माउली, नामदेवराय, नाथबाबा, तुकोबाराय आम्हांला सत्त्व देतात, ते आम्हांला पुरेसं आहे. त्याच वेळेस केवळ धर्माची चिकित्सा केली म्हणून हत्या झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे, डॉ. एम. एस. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे विचार संतपरंपरेशी संवादी वाटतात. त्यामुळे त्यांच्यातला सांधा मांडण्याचा प्रयत्न आम्ही ‘रिंगण’च्या निमित्ताने करतो. पण म्हणून भिडेगुरुजींविषयी द्वेष बाळगण्याचं कारण नाही.

प्रश्न - ‘रिंगण’चे बहुतेक लेखक तरुण आहेत. वाचकही तरुण आहेत. शिकलेला तरुण कीर्तनात दिसत नाही, पण ‘रिंगण’ वाचतो. तुमचा अनुभव काय आहे?

- कीर्तन ही गोष्ट फारच ग्रेट आहे. ‘रिंगण’च्या मर्यादित प्रभावाच्या तुलनेत ते खूपच मोठं आहे. तरीही तुझा मुद्दा मला मान्य आहे. कारण ‘रिंगण’च्या वाचकांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. ग्लोबलायझेशननंतर आमची पिढी बाजारपेठेचा ग्राहक बनत गेली. त्यामुळे आमचा गोंधळ झाला. त्यातून बाजारपेठ आम्हांला मनूकडे घेऊन चालली होती, आम्ही आमची ओळख शोधत माउलींकडे आलो, विठोबाकडे आलो. पण आम्ही एकटे नव्हतो. कथा, कादंबऱ्या, कविता, गझलांत विठोबा अचानक दिसू लागला. पण पत्रकारिता, सिनेमा, नाटक, डॉक्युमेंट्री, फोटोग्राफी, गाणं, सोशल मीडिया, कॅलिग्राफी या सगळ्यांत तो बागडायला लागला. ‘लय भारी’ ते ‘एलिझाबेथ एकादशी’त तो आहे. सातपाटील कुलवृत्तांत तो अफगाणिस्तानपर्यंत जाऊन आलाय. ‘रिंगण’ त्या सगळ्या पिढीच्या शोधाचा एक भाग आहे, असं मला वाटतं.

संतविचार आजच्या भाषेत डी-कोड करण्याचा प्रयत्न आम्ही ‘रिंगण’मधून करतो. यातून सापडलेलं सूत्र असं आहे की संत जसे आहेत, तसे ते तरुणांपर्यंत पोचवायला हवेत. मुळात संत आपल्याला भेटावेत, म्हणून ‘रिंगण’ आहे. ते भेटले की नाही, यावरून ‘रिंगण’चा अंक यशस्वी झाला की नाही, ते ठरवतो. म्हणजे आता संत नरहरी सोनार आपल्याला भेटायला हवेत, याची धडपड सुरू आहे. मग लेख मिळवण्यापासून पैसा उभा करण्यापर्यंत, लेआउटपासून प्रकाशनापर्यंत त्यात डुंबून जायचं. मग शेवटी शेवटी दुसरं काहीच सुचत नाही. झोप नाही. भूक नाही. मजा येते. संत भेटले की सगळं मिळालं.

प्रश्न - गेल्या वर्षी ‘संत सोपानदेव विशेषांक’ तुम्ही लॉकडाउनच्या काळात प्रकाशित केलाय. तेव्हा नियमित निघणाऱ्या नियतकालिकांनीही डिजिटल कॉपी, पीडीएफ वगैरे मार्ग निवडले. अशा वेळी तुम्ही हा विशेषांक हार्ड कॉपीमध्ये केला. याच्यासाठी खूप मोठ्या समस्या होत्या. एक तर लेखन मिळवण्यापासून ते वितरणापर्यंत. तो अनुभव काय आहे?

- मुळात असं होतं की 2020 हे संत नामदेवांचं 750 वं जयंती वर्ष होतं. त्या निमित्तानं पुन्हा एकदा संत नामदेव विशेषांक करायचा होता. महाराष्ट्र आणि भारतभरात जिथं नामदेवरायांचा प्रभाव आजही आहे, ते फिरून शोधायचं होतं. त्यामुळे गेल्या मार्च महिन्यात गावी गेलो तेव्हा नामदेवांवरच्या संदर्भग्रंथांची मोठी झोळी गाडीत टाकली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात वळीवंडे या गावी आमचं छोटंसं घर आहे. तिथं पोचलो आणि दोन दिवसांनी लॉकडाउन सुरू झाला. तिथेच अडकलो. हळूहळू लक्षात आलं की देशभर फिरणं शक्य नाही. म्हणून संत सोपानदेवांवर अंक करायचं ठरवलं. आधी प्रिंटिंग होऊ शकतं का ते बघितलं आणि कामाला लागलो. सोबत संदर्भासाठी पुस्तकंही नव्हती. पैसा उभा करणं कठीण वाटत होतं. बायको म्हणाली, ‘‘एफडी मोडू. पण अंक करू.’’ वितरणाचा तर विचारच केला नाही. सोबत फक्त मोबाइल होता. त्यावर पहिली पोस्ट टाकली. जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. या नकारात्मक वातावरणात कुणाला काहीतरी करायचंय तर त्याच्या सोबत राहायला हवं, अशी भावना सर्व स्तरांतून आली. पुस्तकं नव्हती, म्हणून संदर्भ मागितले. तीन दिवस मी फक्त फोटो काढलेली आणि स्कॅन केलेली पानं डाउनलोड करत होतो. मित्रांनी पुस्तकंच्या पुस्तकं स्कॅन करून पाठवली.

गेली काही वर्षं ‘रिंगण’साठी आम्ही 1000 रुपये मदत मागतो. त्याला आम्ही ‘अभंगदूत’ म्हणतो. ज्यांना ‘रिंगण’ अभंग राहावं, असं वाटतं, त्यांनी आपला एक सहभाग निधी द्यायचा असं याचं स्वरूप आहे. पुढे फक्त या क्राउड फंडिंगमधून ‘रिंगण’चा अंक यावा, अशी इच्छा आहे. या वर्षी आवाहन केल्यानंतर ते व्हायरल झालं. तीनशेपेक्षा जास्त जणांनी मदत पाठवली. त्यातले काही अनुभव अंकातही मांडले आहेत.

यामुळे माझ्या हौसेसाठी चालणारं ‘रिंगण’ माझ्या एकट्याचं उरलं नाही. या वर्षी अंक काढू या, पुढच्या वर्षीचं पुढे बघू, इतका कॅज्युअल असणारा मी त्याकडे जबाबदारीने बघू लागलो. आलेल्या पैशाचा नीट हिशेब ठेवायला हवा. आलेला पैसा हा ‘रिंगण’च्याच कामासाठी वापरला जायला हवा, यासाठी मी आता बारकाईने लक्ष ठेवतो. त्यामुळे कोरोनाकाळातल्या ‘रिंगण’ने मला समृद्ध केलं.

दुसरीकडे प्रत्यक्ष अंक काढण्यातल्या अडचणीही खूप होत्या. लेआउट करणारे पुष्पराज पोपकर गोव्यात होते. संपादनात मदत करणारा अभिजित सोनावणे पुण्यात होता. आणि मी गावी अडकलो होतो. साधे साधे रेफरन्स, फोटो मिळवायला नेहमीपेक्षा खूप आटापिटा करायला लागत होता. अनेक गोष्टी राहिल्या. काही चुकल्याही. पण काहीही झालं तरी रोज डेडलाइनच्या आत पेपर काढण्याची पत्रकाराची चिकाटी कामाला आली. म्हणून अंक निघाला. त्यानंतर दर वर्षीप्रमाणे आषाढी एकादशीच्या पहाटे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्याचा शिरस्ता गेल्या वर्षीही पूर्ण झाला. त्या परिस्थितीत तर ते एखाद्या चमत्कारासारखंच होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबाच्या अगत्यामुळे ते शक्य झालं.

प्रश्न - ‘रिंगण’नं आता जवळजवळ एक दशकाचा प्रवास पूर्ण केला आहे. एक संपादक म्हणून तुम्ही या सगळ्या प्रवासाकडे कसं पाहता?

- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव, संत ज्ञानदेव आणि संत तुकाराम यांच्या नावाने असणाऱ्या अध्यासनांनी मिळून ‘रिंगण’वर एक दिवसाचं राज्य पातळीवरचं चर्चासत्र आयोजित केलं, हा मोठा सन्मान होता. नेमाडेसरांपासून दुसरी-तिसरी शिकलेल्या खेडेगावातल्या वयस्कर आजींपर्यंत अनेकांनी केलेलं कौतुक हा आनंदाचा भाग होता. त्याशिवाय जेव्हा कुणी सांगतं, आमचा संतपरंपरेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, तेव्हा सगळ्यांत समाधान मिळतं. या प्रतिक्रिया सगळ्यांत जास्त असतात आणि त्या तरुणांकडून असतात, म्हणून आनंद जास्त असतो.

नेहमीपेक्षा वेगळ्याच अंगांनी संतांच्या प्रभावाचा शोध घेणं ही संपादक म्हणून मजा होती. उदाहरणार्थ, सोपान जोशी हे हिंदीतले लेखक आणि पत्रकार आहेत. त्यांचे ब्लॉग वाचताना मला पडलेला हा प्रश्न होता की त्यांचं नाव सोपान कसं? त्याचं उत्तर अद्‌भुत होतं. ते सोपानदेवांच्या अंकात आलं. संत सावता माळी त्यांच्या अभंगात मिरचीचा उल्लेख करतात. मिरची खूप नंतर पोर्तुगिजांनी आणली. तर ती सावतोबांच्या काळात कशी आली? वरुड नावाचं मध्य प्रदेशापासून हाकेच्या अंतरावर गाव आहे. तिथले गोविंद राऊत नावाचे शिक्षक शंभर वर्षांपूर्वी सावतोबांचं पहिलं चरित्र कसं लिहितात? किंवा स्वतःला चोखामेळा समाज म्हणवून घेणारे स्वतःला आंबेडकरी समाज म्हणवून घ्यायला लागले. हे स्थित्यंतर कसं झालं? प्रत्येक व्यवसायाचे लोक आपापल्या व्यवसायातल्या संतांना आयकॉन मानतात. मग मोलकरणींसाठीच संत जनाबाई या आयकॉन का नसतात? या आणि अशा प्रश्नांचा शोध घेणं संपादक म्हणून मजेचं होतं.

प्रश्न - तुम्ही म्हणालात की नामदेवांवर अंक करणार होतात. अशा भविष्यातल्या आणखी काय योजना आहेत?

- गेल्या अंकात ‘प्रोजेक्ट नामदेव’ म्हणून त्याची घोषणा केलीय. नामदेवरायांशी संबंधित किमान 120 गावाशहरांत फिरायचं. त्यांचं डॉक्युमेंटेशन करायचं. त्यासाठी जवळपास सगळा भारत पायाखाली घालायचा. त्याचे व्हिडिओे करायचे. शिवाय वारकरी संप्रदायातले फड, मठ, दिंड्या, पालख्या यांचं सविस्तर संशोधन करायचंय. जास्तीतजास्त जुनं खोदत जायचं. कीर्तनाची मूळ पद्धत, भजनाच्या मूळ चाली शोधून ठेवायच्या आहेत. ‘रिंगण’चे काही उपक्रम जमेल तसे सुरू असतात. त्या उपक्रमांमध्ये आजरेकर फड कृतज्ञता सोहळा आजऱ्यामध्ये आयोजित केला होता. ‘वारकरी वीकेंड’ नावाच्या कार्यशाळेत दोन दिवस डॉ. सदानंद मोरेंसोबत वारकरी संप्रदायाच्या इतिहासावर चाळीसेक अभ्यासक-पत्रकार-कार्यकर्ते यांनी मिळून गप्पा मारल्या. असं खूप काही करायचं डोक्यात आहे.

संशोधनासाठी फेलोशिप देता येतील का? पुस्तकं करता येतील का? जुनी महत्त्वाची पुस्तकं नव्यानं छापता येतील का? दर वर्षी वक्तृत्व स्पर्धा घेता येईल का? सोशल मीडियात हे नव्या पद्धतीनं पोचवता येईल का? नामदेव फेस्टिव्हल करायचाय. त्यात परफॉर्मिंग आर्ट असतील. संतांच्या गावांची सहल करायचीय. ‘रिंगण’चं एक वारकरी कॅलेंडरही करायचंय. हे सगळं नेहमीचे पोटापाण्याचे उद्योग सांभाळून करायचंय. त्यामुळे यातलं काय होईल ते पांडुरंग ठरवेल.

प्रश्न - शेवटचा प्रश्न. यंदा 2021 च्या आषाढी एकादशीला ‘संत नरहरी सोनार’ यांच्यावर विशेषांक आहे. त्यात विशेष काय?

- यंदाही कोरोना आहे. अडचणी तुलनेने कमी आहेत. पण संपलेल्या नाहीत. त्यामुळे यंदाही अंक करण्यात मजा येईल. वेगवेगळ्या संस्कृतींच्या लोकांनी एकत्र कसं राहायचं, हा आजच्या जगासमोरचा प्रश्न आहे. त्यासाठी वेगवेगळ्या थिअरी जगभर मांडल्या जात आहेत. संत नरहरी सोनारांनी सातशे वर्षांपूर्वी शैव-वैष्णव समन्वयाचा मांडलेला विचार याचं सोपं सोल्युशन देतं. ते पाहिल्यास नरहरीरायांचं मोठेपण ठळकपणे दिसतं. तो शोध घ्यायचाय. संत नरहरी सोनारांना भेटायचंय.

संपर्क : सचिन परब, Mob. 99870 36805
संवादक : संदीप जगदाळे, Mob. 98226 35347

(संदीप जगदाळे हे पैठण येथील शिक्षक आणि नव्या पिढीतील महत्त्वाचे कवी आहेत.)

Tags: संदीप जगदाळे मुलाखत विशेषांक संतसाहित्य मराठी साहित्य सचिन परब रिंगण वारकरी संप्रदाय संत परंपरा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सचिन परब,  मुंबई
ssparab@gmail.com

पत्रकार


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके