डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

यवतमाळ येथे झालेल्या साहित्य संमलेनाच्या उद्‌घाटनासाठी नामवंत ज्येष्ठ लेखिका व महाराष्ट्र कन्या नयनतारा सहगल केंद्र सरकारच्या दडपशाहीविरुद्ध काही बोलतील व सत्ताधीशांना ते मानवणार नाही या भीतीने त्यांना दिलेले आमंत्रण संयोजकांनी कच खाऊन ऐनवेळी मागे घेतले. त्यामुळे नयनतारांचा अवमान झाला, हे खरेच; परंतु महाराष्ट्राच्या अस्मितेची व प्रतिष्ठेचीही हानी झाली. त्याचा निषेध म्हणून, महाराष्ट्र म्हणजे केवळ साहित्य संमेलन नव्हे या भावनेतून मुंबईत त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी गंभीर प्रकृती-अस्वास्थ्य असताना, चाकाच्या खुर्चीत बसून पुष्पाताईंनी खणखणीत भाषण केले. वय अवघे ऐंशी. त्या दिवशी अवघ्या महाराष्ट्राचा सामूहिक सदसद्‌विवेकच त्यांच्या मुखातून अभिव्यक्त झाला. पुष्पाताईंची महत्ता आहे ती या निर्भयतेत. दुर्गा भागवत यांनी 1976 मध्ये आणीबाणी कालखंडातील कऱ्हाडच्या साहित्य संमेलनात केलेल्या भाषणाशीच याची तुलना होऊ शकते. 

प्रा.पुष्पा भावे यांच्या निधनाने आपण काय गमावले? पुष्पाताईंच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. मराठीच्या नामवंत प्राध्यापक व समीक्षक, विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षिका, बिनीच्या सामाजिक कार्यकर्त्या, वैचारिक जागरण करणाऱ्या प्रबोधनकार, प्रागतिक विचारांच्या कृतिशील सामाजिक संस्था व चळवळींच्या नेक मार्गदर्शक, स्त्रीवादाच्या मूलगामी तत्त्वचिंतक, निर्भीड वक्त्या, नाट्यसमीक्षक, गांधीवादी वाटाव्यात अशा खादीच्या धुवट पांढऱ्या साड्या नेसणाऱ्या प्रसन्नचित्त बाई... वगैरे वगैरे. पण समकालीन संदर्भात बोलायचे झाले, तर निर्भयतेचे एक तेजस्वी प्रतीक दृष्टिआड झाले. अविचल निष्ठेने ‘निर्भय बनो’चा दिवा त्यांनी अखेरपर्यंत तेवत ठेवला. त्यांची निर्भयता नैतिक होती. सत्यासनावर दृढ होती. आधुनिक मानवी मूल्यांच्या प्रकाशात तेवणारी होती. समाजाचा सदसद्‌विवेक जागा करणाऱ्या जागल्यासारखी होती. पुष्पाताई गेल्या हे खरे, पण जाताना एक प्रखर नैतिक भान मागे ठेवून गेल्या- सामाजिक जीवन अर्थपूर्ण करणारे लखलखीत नैतिक भान.

पुष्पाताईंची अनेक रूपे. पण मी त्यांना ‘पाहिले, ऐकले आणि त्यांच्याशी नाते जुळले’ ते रूप होते एका प्रगल्भ राजकीय, सामाजिक, विचारशील कार्यकर्त्याचे. त्याचा प्रारंभ झाला आणीबाणीपूर्वकालीन अशांत, अस्वस्थ मुंबईत. माझ्या पत्रकारितेची ती सुरुवात, वार्ताहर म्हणून. महागाईविरोधी अनेक आंदोलने, बंद, घेराओ, धरणे, चक्का जाम, रेल्वे संप, कामगारांच्या मोठ्या सभा आणि गेट मीटिंग्ज, पत्रकार परिषदा, मंत्रालयातील रोजची ब्रीफिंग्ज अशा त्या दिवशी वाट्याला येतील त्या असाइनमेंट्‌स ‘कव्हर’ करत मी पळत असे. जातिवंत पुणेकराला मुंबईत धावावेच लागे. प्रस्थापित व्यवस्थेला आणि प्रचलित राजकारणाला कृतिशील व वैचारिक आव्हान देणारा हा कालखंड. बंडखोरी आणि विद्रोह हा जणू मुंबईचा स्थायिभाव होता. तत्कालीन राजकारणामुळे भ्रमनिरास झालेला मध्यमवर्ग, कामगार आणि तळागाळातील समाज आपला असंतोष विविध प्रकारे व्यक्त करीत होता. बीडीडी चाळीतील दंगली नुकत्याच शमल्या होत्या, ‘दलित पँथर’चा आवाज सर्वत्र घुमत होता. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या त्रिशताब्दी समारंभाच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर महाप्रदर्शन भरविण्यात शिवसेना मग्न होती. एस.के.पाटलांच्या हातातील मुंबईची सूत्रे जॉर्ज फर्नांडिस यांनी हिसकावून घेतली होती. 

‘बुद्धा इज स्माइलिंग’ या सांकेतिक शब्दाने ओळखली जाणारी पहिली ‘शांततापूर्ण’ अणुचाचणी होत होती. अणुशक्ती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सेठना हे रेडिओ क्लबमध्ये पत्रकारांशी बोलत होते. जे.पी. नावाचं वादळ मुंबईच्या किनाऱ्यावर धडकत होतं. वातावरणात ‘लोकशाही तणाव’ होता. त्यात ‘पाणीवाली बाई’ म्हणून ख्यात झालेल्या मृणाल गोरे, त्यांच्या जोडीला अहिल्या रांगणेकर, प्रेमा पुरव, कमल देसाई यांनी ‘लाटणं मोर्चा’सारख्या आंदोलनांच्या अभिनव कल्पनांनी मुंबईचा काही अवकाश व्यापला होता. 

पुष्पाताई मूळच्याच मुंबईकर. स्थलांतरित नव्हे. साठोत्तरी कालखंडातील नवसर्जनाच्या या प्रक्रियेत त्या अंत:प्रेरणेने सामील झाल्या. आपण कुठल्या बाजूने असणार, याची निवड त्यांनी केली होती. त्यांचा स्वभाव लक्षात घेता, त्यांच्यापुढे पर्यायच नव्हता. त्या वातावरणाच्या त्या अविभाज्य भाग होत्या. लोकशाही समाजवादाच्या बाजूने त्यांचा कौल होता. त्यामुळेच मृणालताईंच्या सर्व रचनात्मक व आंदोलनात्मक कामाशी त्यांचे अनुबंध निर्माण झाले होते. त्या तेव्हा समंजसपणाच्या मध्य तिशीत होत्या. पुष्पाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा हाच तत्त्ववैचारिक गाभा होता. त्यांच्या वैचारिक प्रवासात काळानुसार तो विकसित होत गेला. समाजवाद, गांधीवाद आणि आंबेडकरवाद यांचा सर्जनशील समन्वय साधणारी कालोचित भूमिका त्या मांडत राहिल्या. पक्षीय व संघटनात्मक अभिनिवेशापेक्षा त्यांचे मूल्यभान प्रखरपणे प्रकट होत राहिले. 

त्यानंतर आलेल्या आणीबाणीच्या काळात भूमिगत असलेल्या मृणाल गोरे व पन्नालाल सुराणा यांना स्वत:च्या घरी लपवून ठेवण्याचं धाडस म्हणजे लोकशाही स्वातंत्र्यासाठी चाललेल्या लढ्याशी असलेल्या त्यांच्या बांधिलकीचे ठळक उदाहरण आहे. आणीबाणीला प्रखर विरोध आणि त्याचे पर्यावसान म्हणून निर्माण झालेल्या जनता पक्षाच्या प्रयोगातील सक्रिय सहभाग यामुळे राजकीय विचार व पक्षीय राजकारण आणि त्यातील अंतर्विरोध याविषयीची त्यांची समज प्रत्यक्षदर्शी होती. या तऱ्हेने विचार करण्याच्या प्रक्रियेवरील त्यांची पकड शेवटपर्यंत सुटली नाही. याचे प्रमाण त्यांच्या व्याख्यानांत किंवा चर्चासत्रातील त्यांच्या सहभागात प्रत्ययास येत असे.

त्यांना ऐकणं ही बौद्धिक मेजवानीच असे. त्यांचा आवाज जात्याच धारदार होता. प्रखर वैचारिकतेने तो अधिक लखलखीत होत असे. विचारांना अनुसरत शब्दकळा उमलत असे, फुलत असे. शब्दांच्या योग्य निवडीसाठी त्यांना प्रयास करावा लागत नसे. भाषणात ‘मी’पणा कधीच नसे. ‘स्व’ टाळूनच बोलत. भाषा ओघवती आणि प्रवाही असे. ‘मराठी’च्या प्राध्यापिका आणि इंग्रजी पुस्तकांचे सखोल वाचन यामुळे भाषेवर त्यांचे प्रभुत्व असावे. परंतु, त्याच्याआधारे श्रोत्यांना गुंगवून टाकण्याऐवजी त्या त्यांना विचाराला प्रवृत्त करीत. त्यामागे अभ्यास, व्यासंग आणि चिंतन असे.

तशा त्या मौखिक पंरपरेतल्याच म्हणायच्या. लेखनापेक्षा त्यांना लोकसंवाद आवडायचा. बोलायला आवडायचे. प्रा.राम बापट यांच्याच कुळातील. पण एक फरक होता. बापटसर प्राध्यापकी वळणाने बोलायचे, पुष्पाताईंमधील कार्यकर्ता कायम जागा असे. सरळ व मुद्याचे बोलणे. त्यांना काय सांगायचे आहे, ते लोकांना विनासायास कळे. कार्यकर्त्यांसाठी किंवा अभ्यासकांसाठी आयोजित केलेल्या अनेक शिबिरांत विविध विषयांची मांडणी करण्यासाठी त्यांना नेहमीच आग्रहाचे आमंत्रण असे त्याचे हेच कारण. स्पष्ट भूमिका, स्वच्छ विचार. त्यासाठी महाराष्ट्रभर त्यांची भ्रमंती असे. तीही एसटी बसने. डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शिबिरे असोत, स्त्रीचळवळीतील कार्यकर्त्यांचे अभ्यासगट असोत, की सामाजिक कृतज्ञता निधीचे कार्यक्रम- पुष्पाताई नाहीत, असे कधी व्हायचे नाही. स्वत: नरेंद्रचा सगळाच प्रवास बसने असायचा. प्रा.यशवंत सुमंतही याच पंक्तीतला. हे सगळेच हाडाचे कार्यकर्ते. बैठकीसाठी सतरंज्या घालायलाही पुढे असलेले. लोकलढे आणि जनआंदोलनांच्या कार्यकर्त्या आणि मार्गदर्शक अशी दुहेरी भूमिका पुष्पाताईंनी आयुष्यभर निभावली. सामाजिक कृतज्ञता निधीचे रचनात्मक काम असो, की नर्मदा बचाव आंदोलन किंवा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा- त्या कधीच मागे राहिल्या नाहीत. आणीबाणीतील असो की समकालीन- लोकशाही स्वातंत्र्यासाठी एकाधिकारशाहीच्या विरोधात ठामपणे उभ्या राहणाऱ्या, जनभावनांचा स्पष्ट उच्चार मुखर करणाऱ्या, मूल्यभान बळकट करणाऱ्या त्या श्रेष्ठ प्रतीच्या निष्ठावान कार्यकर्त्या होत्या. 

आणीबाणीच्या कालखंडात- पंचाहत्तरमध्ये जोखीम पत्करून त्यांनी भूमिगत झालेल्या राजकीय नेत्यांना आश्रय दिला व इतर खलबते केली, तेव्हा त्या तरुण तरी होत्या. परंतु जानेवारी 2019 मध्ये यवतमाळ येथे झालेल्या साहित्य संमलेनाच्या उद्‌घाटनासाठी नामवंत ज्येष्ठ लेखिका व महाराष्ट्र कन्या नयनतारा सहगल केंद्र सरकारच्या दडपशाहीविरुद्ध काही बोलतील व सत्ताधीशांना ते मानवणार नाही या भीतीने त्यांना दिलेले आमंत्रण संयोजकांनी कच खाऊन ऐनवेळी मागे घेतले. त्यामुळे नयनतारांचा अवमान झाला, हे खरेच; परंतु महाराष्ट्राच्या अस्मितेची व प्रतिष्ठेचीही हानी झाली. त्याचा निषेध म्हणून, महाराष्ट्र म्हणजे केवळ साहित्य संमेलन नव्हे या भावनेतून मुंबईत त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी गंभीर प्रकृती-अस्वास्थ्य असताना, चाकाच्या खुर्चीत बसून पुष्पाताईंनी खणखणीत भाषण केले. वय अवघे ऐंशी. त्या दिवशी अवघ्या महाराष्ट्राचा सामूहिक सदसद्‌विवेकच त्यांच्या मुखातून अभिव्यक्त झाला. पुष्पाताईंची महत्ता आहे ती या निर्भयतेत. दुर्गा भागवत यांनी 1976 मध्ये आणीबाणी कालखंडातील कऱ्हाडच्या साहित्य संमेलनात केलेल्या भाषणाशीच याची तुलना होऊ शकते. एक फरक मात्र होता : तेव्हाची आणीबाणी प्रत्यक्ष व कायदेशीर होती, आत्ताची अप्रत्यक्ष व कायद्याच्या चौकटीत न बसणारी.

अर्थात अशा तऱ्हेचा संघर्ष करणे, न्यायाच्या बाजूने उभे राहणे, पीडितांच्या पारड्यात आपले वजन टाकणे हे पुष्पाताईंच्या दृष्टीने अपवादात्मक नव्हते. तो त्यांचा स्वभाव होता. आता विस्मृतीत गेलेल्या किणी प्रकरणात शीला किणी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई देण्याचे असाधारण धाडस त्यांनी दाखविले. बाहेर प्रचंड दशहत असताना. ठाकरेंबरोबर पंगा घेणे सोपे नव्हते. तो त्यांनी घेतला. वैयक्तिक नव्हे, सार्वजनिक कारणासाठी. जीवाची बाजी लावल्याशिवाय अशी प्रकरणे पुढे जात नाहीत. महाराष्ट्रातील शिवसेनेची वाढ, विकास व तिची खास कार्यशैली याविषयी त्यांचे विश्लेषण सडेतोड होते. ते त्यांनी कोणाचा मुलाहिजा न ठेवता स्पष्ट शब्दांत नि:संदिग्धपणे व्यक्त केले. हरित वसई आंदोलनातही धनदांडग्यांच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस कोणी करीत नव्हते; त्यांनी ते केले.

स्त्रीप्रश्न, स्त्रीवाद आणि स्त्रियांच्या चळवळीचा त्यांचा अभ्यास फार सखोल असल्याचे त्यांच्या बोलण्यातून प्रत्ययाला येत असे. त्यामुळे त्यांनी एकरेषीय किंवा एकारलेली भूमिका कधीच घेतली नाही. त्यांची भूमिका नेहमीच सम्यक्‌ असे, व्यापक परिप्रेक्ष्यात असे. विद्याताई बाळ त्यांच्या घनिष्ठ स्नेही. ‘किर्लोस्कर’ गटातील ‘स्त्री’ मासिकाच्या संपादक म्हणून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वत:चे ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक काढले. ते चालविण्यासाठी ‘निरामय’ ट्रस्ट स्थापन केला. त्याचा मीही एक विश्वस्त होतो. विद्याताईंच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी समकालीन महत्त्वाच्या एखाद्या गंभीर विषयाची सर्वांगीण चर्चा करणारा ग्रंथ प्रकाशित करावा आणि अभ्यासकांकडून विस्तृत लेख लिहून घ्यावेत, अशी कल्पना होती. त्यासाठी तयार झालेल्या एका छोट्या गटात, कोअर कमिटीत पुष्पाताई असणे अनिवार्यच होते. जागतिकीकरणाने त्या वेळी जीवनाच्या अनेक क्षेत्रांत प्रमाणक परिवर्तन होत होते, म्हणून त्या सूत्राभोवती ग्रंथाची रचना करावी- अशी सुरुवातीची कल्पना होती. त्या वेळी झडलेल्या चर्चांमध्ये पुष्पाताईच्या व्यासंगाचा, त्यांच्या अभ्यास करण्याच्या, विचार करण्याच्या पद्धतींचा परिचय होई. नंतरच्या काळात ‘स्त्रीवाद’ हा विषय घ्यावा, असे ठरले. तो तर पुष्पाताईंच्या विशेष आस्थेचा. या प्रकल्पाला त्यांनी केलेले वैचारिक मार्गदर्शन, मांडलेली सैद्धांतिक भूमिका त्यांच्याच तोंडून ऐकणे म्हणजे विचारपरिप्लुत मेजवानीच असे.

उदा. ‘एम्पॉवरमेंट ऑफ वीमेन-’, स्त्रियांचे सबलीकरण ही कल्पना. स्त्रीअभ्यासाच्या परिभाषेत अशा शब्दांची व संकल्पनांची त्या वेळी चलती होती. बाईंचा त्या शब्दाला, त्यामागील ध्वनित अर्थाला सकारण विरोध होता. त्यातील ‘पॉवर’ किंवा ‘सत्ता’ त्यांना खटकत असे. स्त्री-पुरुष संबंधातील वर्चस्वाची-अधिकाराची कल्पना त्याज्य आहे, ती टाकून दिली पाहिजे, निर्मळ सहजीवन स्वीकारले पाहिजे- असा बारकाव्याने त्या विचार करीत. स्त्रीप्रश्न, स्त्रियांच्या चळवळी आणि ॲकडेमिक क्षेत्रातील स्त्रीअभ्यास यांच्यातील परस्परावलंबित्व त्या नेहमीच अधोरेखित करीत. या तिन्हींमध्ये संवाद व समन्वय असणे गरजेचे आहे, हे पटवून देत. याविषयीचा अभ्यास, चिंतन, मनन आणि समाजात अनुभवाला येणारं वास्तव यांचा ताळमेळ घालून त्या आपली भूमिका मांडत. चर्चासत्रात असो की कार्यकर्त्यांच्या शिबिरात- प्रसंगानुरूप त्यांची मांडणी बदलली, तरी गाभ्याचा विचार तोच असे. विशेषत: भारतीय संदर्भात कळीच्या असलेल्या ‘जात’ या वास्तवाचा आयाम लक्षात घेऊन तो लिंगसापेक्ष विषमतेशी त्या जोडून घेत. विषमतेच्या पोटातील विषमता- मग ती वर्गीय असो, जातीय असो की लिंगभावप्रधान- तिची दखल घेतल्याशिवाय त्या पुढे जात नसत. भारतीय प्रश्नांकडे पाहताना त्यांचे वैश्विक परिप्रेक्ष्य लक्षात घेणे, ही त्यांची वेगळी दृष्टी होती. त्यामुळे त्यांची मांडणी आणि विचारप्रक्रिया नेहमीच प्रस्तुत, कालसुसंगत राहिली. त्यातील नावीन्य हरवले नाही.

जागतिकीकरणात अनुस्यूत असलेल्या वर्चस्ववादी, बाजारकेंद्री विचारव्यूहाने स्त्रीमुक्ती चळवळ कशी मागे ढकलली याचे भान त्यांना होते. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्तारवादाने माजलेल्या चंगळवादामुळे स्वातंत्र्याचा सर्वच क्षेत्रांत संकोच झाला. स्त्रीमुक्तीचा आभास निर्माण केला, पण प्रत्यक्षात स्त्रिया व स्त्रीप्रतिमा बाजारकेंद्री विक्रीव्यवस्थेच्या अविभाज्य भाग झाल्या. सौंदर्यप्रसाधने तयार करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सौंदर्य स्पर्धांतीलअंत:स्थ हेतू ओळखून स्त्रीचळवळीने आपले विचारमंथन बदलले पाहिजे. स्त्रिया पुढे आल्या, परंतु स्त्रीचळवळींची पीछेहाट होते आहे, या वास्तवाकडे डोळेझाक करून चालणार नाही, असा इशारा त्या वारंवार देत.

जागतिकीकरणाचे विश्लेषण केल्याशिवाय समकालीन प्रश्नांचा नीट उलगडा होणार नाही, या मताशी त्या ठाम होत्या. इतरांप्रमाणेच जागतिकीकरण म्हणजे नववसाहतवाद आहे, हे त्यांनी ओळखले असावे. गरिबी आणि दारिद्य्राचे फसव्या, छद्‌म अर्थशास्त्रीय परिभाषेत हुशारीने केलेले समर्थन म्हणजे जागतिकीकरण. गरीब देशांतील नैसर्गिक संसाधनांवर कब्जा करून तेथील अर्थव्यवस्था कायमची पांगळी करण्याचे डावपेच... तेथील सत्ताधीशांना अंकित करायचे, त्यांची स्वायत्तता नष्ट करायची, महासत्तांवरील व तेथील बहुराष्ट्रीय कंपन्यांवरील अवलंबित्व वाढवीत न्यायचे, संरचनात्मक विषमतेचे समर्थन करायचे- हे पैलू अधोरेखित करणारी पर्यायी विचारधारा पुष्पाताईंना अमान्य नव्हती. मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाओ आंदोलनाला पुष्पाताईंचे उघड समर्थन होते, त्याचे कारण विचारातील ही एकवाक्यता- असे म्हणता येईल.

मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाओ आंदोलनाशी पुष्पाताईंचा स्थापनेपासूनच संबंध आला. त्याचे कारण पुष्पाताई ज्या रुईया कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या, त्याच कॉलेजच्या मेधा पाटकर विद्यार्थिनी. चळवळ्या विद्यार्थ्यांमध्ये पुष्पाताईंना विशेष स्वारस्य. मुंबईतील मेधाताईंच्या पहिल्या उपोषणात आमचा पुण्याचा- परिसरचा- एक गट सहभागी होता. मुंबईतील विजया चौहान, नीरा आडारकर वगैरेंबरोबर पुष्पाताईही होत्या. पर्यावरण, विस्थापन, हवामानबदल आणि या सगळ्यांना कवेत घेणऱ्या पर्यायी विकासनीतीचे नवे विचारविश्व या आंदोलनामुळे आकाराला आले. पुष्पाताईंना त्या सगळ्याच संभाषितांत अतोनात रस होता. खरे तर 1975 नंतरच्या महाराष्ट्रातील सर्वच लोकलढ्यांशी आणि सामाजिक प्रश्नांशी या ना त्या प्रकारे त्या जोडलेल्या होत्या. सामाजिक कृतज्ञता निधी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचा अपवाद नव्हता. त्यामुळे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्याविषयी त्यांना विशेष आत्मीयता. नरेंद्रच्या कामाच्या निष्ठेशी, व्याप्तीशी आणि परिणामांशी त्यांचे एक सेंद्रिय नाते होते. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात जो विवेकाचा जागर होतो आहे, त्याचे महत्त्व त्यांना कळत होते आणि त्यातला त्यांचा सहयोगही महत्त्वाचाच होता. पण यापेक्षा मोठे आणि व्यापक कार्य करण्याची, त्याचे नेतृत्व करण्याची क्षमता नरेंद्रमध्ये होती; तशी त्याची कुवत होती; ती उपयोगात आली नाही, अशी खंत पुष्पाताई व्यक्त करीत. माणसे जोखण्याचे त्यांचे कसब वादातीत होते. त्यामुळे दाभोलकरांच्या नेतृत्वगुणांचे, त्यांच्या कार्यशैलीचे आणि मोठे काम उभे करण्याच्या त्यांच्या क्षमतेचे पुष्पातार्इंनी केलेले मूल्यांकन वास्तवदर्शी होते, यात शंका नाही.

डॉ.श्रीराम व दीपा लागू यांच्याशी पुष्पाताईंचे मैत्र असण्याचे कारण डॉक्टरांचे बुद्धिप्रामाण्यवादी किंवा विवेकवादी व्यक्तिमत्त्व हेही एक महत्त्वाचे कारण. रंगकर्मी म्हणून डॉक्टरांशी त्यांचा आधीपासूनच परिचय होता. नाट्यसमीक्षक म्हणून पुष्पाताईंनी जे नाट्यभान व्यक्त केले आहे, त्यात अर्थातच डॉ.लागूंची अभिनयशैली चपखल बसते. ‘आम्हाला भेटलेले डॉ.श्रीराम लागू’ हे संपादन पुष्पाताईंना करावेसे वाटले, यातच सर्व काही आले. (या पुस्तकावरील ‘साप्ताहिक सकाळ’मधील परीक्षण- परिचयपर माझा लेख (सन 2000) वाचून त्यांची प्रशंसा माझ्या वाट्याला आली होती.)

पुष्पाताई आणि अनंतराव भावे खूप प्रेमळ व स्नेहशील जोडपे. एकमेकांच्या स्वतंत्र अवकाशाचा आदर करून साहचर्याचा आनंद घेणारे. दोघेही माणसांचे लोभी. अगत्यशील. माणसांना जवळ करण्याचे पुष्पाताईंचे निकष अधिक काटेकोर. निवड करतानाच त्या पारखून घेत. अशोक जैन यांच्यापासून प्रदीप चंपानेरकरांपर्यंत आणि विद्या बाळ यांच्यापासून वंदना भागवत यांच्यापर्यंत माझे अनेक स्नेही पुष्पाताईंच्या निकट होते. पुस्तके भेट देऊन किंवा सुग्रास जेवणाचा आग्रह करून दोघे आपला स्नेह व्यक्त करीत. पंधरा-वीस वर्षांपूर्वी ‘जाळ्यातील चंद्र’ या म.वा.धोंड यांच्या फार वाचनीय पुस्तकाची प्रत मला त्यांनी भेट दिली. त्यांच्याच संग्रहातील. मुंबईहून पुण्याला येताना आठवणीने ती आणली. अगत्य तर नेहमीच. एकदा मी आणि माझी मुंबईतील सहकारी शिल्पा शिवलकर दुपारी चार-साडेचारला त्यांच्याकडे गेलो. चहाबरोबर पटकन्‌ सँडविचेस केली आणि वर ‘संध्याकाळचं जेवायला थांबताय का बघा- छान मासे करते’ असा आग्रह. त्यांचे मत्स्यप्रेम खवय्यांना सुपरिचित आहे. 

रुईया महाविद्यालयातील चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला फार प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने ‘उद्याचा महाराष्ट्र’ या विषयसूत्राभोवती तीन व्याख्याने जानेवारी 2010 मध्ये योजली होती. मीही त्यातील एक व्याख्याता होतो. पुष्पाताई त्याला आवर्जून उपस्थित होत्या. अगदी प्रश्नोत्तरे संपेपर्यंत थांबल्या. कौतुकाचे मोजके बोलून गेल्या. माझे इथे-तिथे प्रसिद्ध होणारे लेखन आवडले, तर आवर्जून फोन करीत. या वर्षी फेब्रुवारीत आला तो फोन शेवटचाच. त्याआधी नोव्हेंबर महिन्यात मी विद्याताईंबरोबर एका कार्यक्रमासाठी वसईला गेलो होतो. जाता-येताना मुंबईत विजया चौहान यांच्याकडे मुक्काम होता. पुष्पाताईंना 16 नोव्हेंबरला भेटून पुण्याला परतायचे, असे ठरले होते. परंतु विद्याताईंच्या प्रकृती-अस्वास्थ्यामुळे आमचा बेत रहित झाला. पुष्पाताईंना न भेटताच आलो, ही चुटपूट लागून राहिली. दुसऱ्या दिवशीच तपासणीसाठी विद्याताईंना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. म.गांधी स्मृतिदिनाच्या दिवशी 30 जानेवारीला विद्याताईंनी आपली जीवनयात्रा संपविली. अवघ्या आठ महिन्यांनंतर गांधीजयंतीच्या मध्यरात्री दि.2 ऑक्टोबरला पुष्पातानी हा इहलोक सोडला. दोघीही मैत्रिणींचा अशा योगायोगावर विश्वास नव्हता, हे मात्र खरे.

Tags: विद्याताई पुष्पाताई आदरांजली स्मृतीलेख सामाजिक कार्यकर्त्या सदा डुम्बरे पुष्पा भावे pushpa bhave sada sumbare on pushpa bhave sada dumbare on pushpa weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सदा डुम्बरे,  पुणे, महाराष्ट्र
sadadumbre@gmail.com

पत्रकार, लेखक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात