डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कोणताही खडखडाट न होता, संपबिंप न होता ‘सकाळ’ने रूळ बदलला. गाडीचा वेग वाढला, पण कोणाला भोवळ आली नाही. प्रतापराव मालक नाही झाले; चालक झाले, नेते झाले. सध्याच्या ब्रँडिंगच्या जमान्यात प्रतिमानिर्मिती महत्त्वाची झाली आहे. तिथे वास्तवापेक्षा समजच अनेकदा महत्त्वाची ठरते. प्रतापरावांनी हे रिॲलिटी आणि परसेप्शनमधील अंतर मिटवले ते त्यांच्या अंगी असलेल्या गुणवत्तेमुळे. विेशासार्हता वृत्तपत्रांचा सर्वांत मोठा गुण. प्रतापरावांनी ती प्राप्त केली. ‘सकाळ’ची मालकी रास्त आणि पात्र व्यक्तीच्या हाती गेली, हे जनमानसात मान्य झाले. हा सर्वांत अवघड टप्पा होता. अडथळ्यांचीच शर्यत होती. कायदेशीर लढाईपेक्षा ती गुंतागुंतीची होती. ती त्यांनी जिंकली होती. ‘सकाळ’च्या विस्तारासाठी आणि विकासासाठी त्यामुळे नवा हुरूप आला.

‘सकाळ’कार डॉ. नानासाहेब परुळेकर यांचे 8 जानेवारी 1973 रोजी निधन झाले. आपल्या निधनानंतर ‘सकाळ’ची व्यवस्थापकीय संरचना कशी असावी, हे त्यांनी आपल्या इच्छापत्रात स्पष्टपणे नमूद केले होते. ‘सकाळ’ची मालकी खासगी असली, तरी मूलतः ती एक सामाजिक संस्था आहे आणि आपल्या निधनानंतरही वृत्तपत्र म्हणून ‘सकाळ’ केवळ टिकलाच पाहिजे असे नव्हे तर वाढला पाहिजे, ही त्यांची मनोधारणा होती.

नानासाहेब हाडाचे पत्रकार होते. पत्रकारिता त्यांची जीवननिष्ठा होती. इतर अनेक क्षेत्रांतील संधी नाकारून त्यांनी आपले जीवन ‘सकाळ’ला आणि त्याला अनुसरून पत्रकारितेला वाहिले होते. ते उच्चविद्याविभूषित होते. अमेरिकेतील प्रख्यात कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. आणि पीएच.डी. पदव्या प्राप्त केल्या होत्या. विख्यात तत्त्वज्ञ डॉ.जॉन ड्युई हे त्यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक प्राध्यापक. साडेपाच वर्षे ते शिक्षणासाठी अमेरिकेत होते. स्वदेशी परत येताना सहा महिने युरोपमध्ये फिरून आलेले. अमेरिकेतील वास्तव्यात ‘न्यूयॉर्क वर्ल्ड’ व इतरत्र ते लेखन करीत. येतानाच पुण्यात स्वतःचे वृत्तपत्र सुरू करण्याचा त्यांचा निर्धार झाला होता.

तत्कालीन मराठी वृत्तपत्रसृष्टीत अशा प्रकृतीचा दुसरा संपादक नव्हता. ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या राष्ट्रीय महत्त्वाच्या वृत्तसंस्थेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता आणि तिच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे होते. तिचे ते दोन वेळा अध्यक्ष होते. ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन (एबीसी) या वृत्तपत्रव्यवसायात कळीचे स्थान असलेल्या संस्थेचे अध्यक्ष, प्रेस कौन्सिलचे सदस्य, इंडियन ॲन्ड ईस्टर्न न्यूजपेपर सोसायटीचे (सध्या आयएनएस) अध्यक्ष इंडियन लँग्वेज न्यूजपेपर असोसिएशनचे (इल्ना) अध्यक्ष, अशा राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या संस्थांच्या व्यवस्थापनात एवढा सन्मान मिळविणारा त्यांच्या समकालीन एकही मराठी संपादक आणि मालक नव्हता. परुळेकरांचे पत्रकारितेकडे पाहण्याचे परिप्रेक्ष्य व्यापक होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांचे साधकबाधक विवेचन करणारे लेखन ‘सकाळ’मध्ये प्रकाशित होत असे. त्यासाठी ते अशा समस्याग्रस्त देशांचा अभ्यासदौरा करीत आणि वृत्तमालिका लिहीत. परदेशात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ‘सकाळ’चे अर्धवेळ बातमीदार किंवा ज्याला इंग्रजीत ‘स्ट्रिंगर’ म्हणत, ते असत. ‘सकाळ’ने भाषिक आणि प्रादेशिक मर्यादा वारंवार ओलांडल्याचे दिसते.

वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्याचे स्वातंत्र्य जपले पाहिजे, यासाठी प्राइस पेजशेड्यूलसारख्या प्रकरणात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला. जे काम टाइम्स वगैरेंसारख्या मोठ्या भांडवलदारी वृत्तपत्रसमूहांनी (त्याला त्या काळी ‘ज्यूट’ प्रेस असेही निर्भर्त्सनादर्शक नामाभिधान मिळाले होते.) करायचे, कारण त्यात त्यांचेच हितसंबंध मुख्यत्वे अडकले होते; त्यासाठी नानासाहेबांनी लढा दिला आणि जिंकलाही.

नानासाहेब अखंड चार दशके ‘सकाळ’च्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात वावरत होते. त्यांच्या या निःस्पृह सामाजिक योगदानाची दखल सरकारबरोबरच समाजानेही घेतली. ‘पद्मभूषण’ हा राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाला. पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट- डी.लिट. देऊन त्यांचा गौरव केला. पत्रकारितेतील कामगिरीसाठी राष्ट्रीय पातळीवरील दुर्गा-रतन पुरस्कारही त्यांना मिळाला. नानासाहेबांचे समाजातील हे स्थान आणि ‘सकाळ’मधील एकछत्री अंमल लक्षात घेतला, तर त्यांच्या निधनानंतर संस्थेत केवढी मोठी पोकळी निर्माण झाली असेल याची कल्पना आपण करू शकतो. कुटुंबासाठी भरघोस आर्थिक तरतूद करून आणि ‘सकाळ’मध्ये संचालक म्हणून असलेले त्यांचे स्थान कायम ठेवूनही व्यावसायिक दृष्ट्या ‘सकाळ’ चालविण्याची जबाबदारी मात्र त्यांनी विश्वस्तांकडे सोपविली होती. डॉ.बानू कोयाजी त्यातील प्रमुख.

बानूबाई वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व. त्यांच्या नेतृत्वाखाली के.ई.एम. या पुण्यातील हॉस्पिटलचा मोठा विस्तार झाला. कुटुंबनियोजन आणि लोकसंख्यानियंत्रण या क्षेत्रात त्यांनी केलेले काम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही नावाजले गेले. केंद्र सरकारच्या त्या सल्लागार होत्या. पद्मभूषण सन्मान आणि मॅगसेसे ॲवॉर्ड यांच्या त्या मानकरी. नानासाहेबांच्या निधनानंतर तर ‘सकाळ’ची धुरा सांभाळण्याची जोखीम त्यांच्यावर येऊन पडली. परुळेकरांच्या शिस्तीत तयार झालेली ‘सकाळ’ची टीम बरोबर घेऊन एका तपाच्या तपश्चर्येत त्यांनी ‘सकाळ’चे जनमानसातील स्थान कायम टिकविले. तत्कालीन संपादक श्री.ग. मुणगेकर यांचे या काळातील योगदान कळीचे होते. परुळेकरांनंतर ‘सकाळ’चे काय होणार, अशी चिंता वाटणाऱ्या मराठी समाजाला त्यांनी आश्वस्त केले होते. ‘मुंबई सकाळ’ने मुळे धरली होती. मुंबईच्या प्रकृतीला साजेसा माधव गडकरींसारखा आक्रमक संपादक तिथे नव्याने आला होता. 

‘सकाळ’ने 1980 मध्ये स्थानिक वृत्तपत्रांच्या प्रचंड विरोधाला सामोरे जात ‘कोल्हापूर’मध्ये स्वतंत्र आवृत्ती सुरू करून दक्षिण महाराष्ट्रात जोमदार पदार्पण केले होते. राज्यातील एक अग्रेसर वृत्तपत्र म्हणून ‘सकाळ’ने आपले स्थान पक्के केले होते. फेब्रुवारी 1985 मध्ये संपादक मुणगेकरांचे हृदयविकाराने अचानक निधन झाले. बानूबाई सत्तरीकडे सरकत होत्या. नानासाहेबांनी आपल्याकडे सोपविलेला ‘सकाळ’चा वारसा सुरक्षित हातात सोपविण्याची वेळ आली आहे, हे त्यांनी ओळखले.

मला आठवते, 1985 च्या उत्तरार्धात त्यांनी एके दिवशी मला सकाळी साडेसात वाजताच त्यांच्या निवासस्थानी येण्याचा निरोप दिला. एरवी त्या ‘सकाळ’मध्येच भेटत असत. के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये एका छोट्या इमारतीत पहिल्या मजल्यावर त्या राहत असत. लिफ्टनेच त्या घरात प्रवेश करावा लागे. मी पहिल्यांदाच तिथे जात होतो. माझ्यासमोर चहा आला. माझी उत्सुकता न ताणता त्यांनी सरळ विषयाला हात घातला. गेली दहा-बारा वर्षे लीला (परुळेकर) बरोबर काम करणं कसं अशक्य झालंय, हे त्यांनी थोडक्यात सांगितलं. के.ई.एम.चं विस्तारीकरण व इतर जबाबदाऱ्यांमुळे आपण ‘सकाळ’साठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. ‘सकाळ’साठी नव्या छपाई यंत्रांची व एकंदरीतच आधुनिकीकरणासाठी नव्याने मोठी गुंतवणूक करणे स्पर्धेत टिकण्यासाठी कसे आवश्यक आहे वगैरे बोलून झाल्यावर ‘सकाळ’ची मालकी अंशतः पवारांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यासाठी तो आश्चर्याचा धक्काच होता.

आत्तापर्यंत ‘सकाळ’ राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांपासून जाणीवपूर्वक दूर राहिला असताना ‘सकाळ’च्या संचालक मंडळाचा हा निर्णय अनाकलनीय होता. या हस्तांतराची समाजात काय प्रतिक्रिया उमटेल, याविषयी त्यांना माझे मूल्यमापन हवे होते. ‘सकाळ’ची मालकी केवळ एका प्रभावशाली राजकीय घराण्याकडेच जाणार होती असे नव्हे, तर त्याला काही प्रमाणात जातीय रंगाचेही अस्तर होते. श्री. शरद पवार त्या वेळी मंत्री किंवा  मुख्यमंत्री नव्हते, विरोधी पक्षात होते. तरीही फार प्रभावशाली होते. सत्तेचा गैरवापर करून त्यांनी ‘सकाळ’वर कब्जा मिळविला, असाही आरोप झाला असता. आपण या निर्णयापर्यंत कसे आलो, त्याची पार्श्वभूमी बानूबार्इंनी विशद केली.

नामवंत उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर हे नानासाहेब परुळेकरांचे चांगले स्नेही होते. यमूताई किर्लोस्कर ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या अध्यक्ष होत्या. किर्लोस्कर घराण्याला मराठी समाजमनात मोठ्या आदराचे स्थान होते. किर्लोस्करांनी ‘सकाळ’ घ्यावा, असा प्रस्ताव घेऊन आपण शंतनुरावांकडे गेलो तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली, ते बानूबार्इंनी सांगितले. त्याचा सारांश असा : ‘‘बानू, प्रश्न पैशांचा नाही. कोटीभर रुपये मी केव्हाही गुंतवू शकतो. (हस्तांतरित होणाऱ्या शेअर्सचे बाजारमूल्य तेव्हा 85 लाखांच्या जवळपास होते.) परंतु मग सकाळ हा नानासाहेबांचा सकाळ राहणार नाही. ते एका भांडवलदाराचे पत्र होईल. ‘सकाळ’ची स्वतंत्र, इंडिपेंडंट पेपर म्हणून असलेली ओळख पुसली जाईल. तसे व्हावे असे नानासाहेबांचा ‘मित्र’ म्हणून मला आवडणार नाही.’’ किर्लोस्करांनी अर्थातच प्रस्ताव नाकारला.

जळगावमधून दोन आणि कोल्हापुरातून एक असे आणखी तीन प्रस्ताव होते. बानूबार्इंना ते मान्य नव्हते. ‘सकाळ’ची मालकी ‘मराठी’ माणसाकडेच राहावी, ज्यांचे ‘स्टेक्स’ सर्वपरीने महाराष्ट्रात गुंतलेले आहेत आणि पुढील अनेक वर्षे ‘सकाळ’ सांभाळण्याची ज्यांची कुवत आहे त्यांच्याकडे ती जावी, याबाबत बानूबाई ठाम होत्या. त्यांच्या दृष्टीने हा काही केवळ आर्थिक व्यवहार नव्हता. त्या काही ‘डील’ करायला, पैसे कमवायला बाजारात उभ्या नव्हत्या. ‘सकाळ’ म्हणजे नानासाहेबांचा जीव होता. तो सांभाळण्याचा शब्द बानूबार्इंनी दिला होता. कुटुंबीयांना डावलून नानासाहेबांनी त्यासाठी कार्यवाहक म्हणून बानूबार्इंची निवड केली होती. आपल्यावर असलेल्या जबाबदारीची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्याचा भाग म्हणून त्यांनी स्वतःहून पवारांना आमंत्रित केले होते, या व्यवहारात जाणीवपूर्वक गोवले होते. या निर्णयावर कोर्टबाजी होणार, हे त्यांनी गृहीत धरले असणार.

प्रतापराव पवार ‘सकाळ’मध्ये कसे आले त्याची ही पार्श्वभूमी. ती माहीत असल्याशिवाय त्यांच्या ‘सकाळ’मधील कामगिरीचे, त्यांच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करता येणार नाही, म्हणून हा संदर्भ जरा सविस्तरपणे नोंदविला आहे, एवढेच. अर्थात हे माझे व्हर्शन. कथन किंवा आकलन म्हणा हवे तर. त्या काळात दर मंगळवारी ‘सकाळ’च्या संपादकीय विभागाची साप्ताहिक बैठक असे. सरव्यवस्थापकांपासून इतर विभागांतील अधिकारीही त्यासाठी उपस्थित असत. कार्यकारी संचालक म्हणून डॉ.बानू कोयाजीही त्यासाठी आवर्जून येत. एके दिवशी त्या प्रतापराव पवारांसोबत बैठकीत आल्या. प्रतापरावांची ओळख सर्वांना करून दिली. सत्तांतरावर औपचारिक शिक्कामोर्तब झाल्याचे आम्हाला समजले. चांगले सहा फूट उंच, सडपातळ, गोरेपान आणि सुटाबुटात असल्याने रुबाबदार दिसणाऱ्या प्रतापरावांनी पहिल्याच बैठकीत फारसे न बोलताही आपली छाप पाडली. फर्स्ट इंप्रेशन वगैरे जे काही म्हणतात, ते उत्तम होते. ‘‘...विशाल सह्याद्री’ या दैनिकातील व्यवस्थापकीय कामाचा आपला अगदीच नाममात्र अनुभव वगळता वर्तमानपत्राच्या कामाशी आपण परिचित नाही, सगळ्या गोष्टी तुमच्याकडूनच शिकायच्या आहेत-’’ असं अगदी ‘लो की’ संभाषण करून बानूबार्इंसमवेत ते आतल्या खोलीत लुप्त झाले.

मराठी वृत्तपत्रसृष्टीतील ‘सकाळ’च्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानाची त्यांना अर्थातच कल्पना असणार. लीलातार्इंबरोबर संघर्ष करायचा की समेट, हा त्यांच्यापुढचा यक्षप्रश्न असणार. कामगार  आणि कर्मचाऱ्यांची सहानुभूती लीलातार्इंकडे होती. संचालकांमधील वादाचे प्रतिबिंब कामगारांशी वागताना त्यांच्या वर्तनात दिसत नसे. मादाम परुळेकर ‘सकाळ’मध्ये प्रसंगपरत्वेच येत. परंतु लीलाताई सर्वांशी मिळून-मिसळून वागत. मालकीणबार्इंचा तोरा त्यांच्या वागण्यात नसे. याच कर्मचाऱ्यांकडून आणि कामगारवर्गांकडून प्रतापरावांना काम करून घ्यायचे होते. कायदेशीर लढाई, (पवार) प्रतिमेची लढाई आणि कामाची लढाई अशा तीन आघाड्यांवर एकाच वेळी त्यांना उभे राहायचे होते.

आव्हान अवघड होते, परंतु प्रतापरावांची त्याला तयारी असावी. लहानपणापासून त्यांच्या आईने जाणीवपूर्वक केलेल्या कार्यसंस्कृतीच्या संस्कारांचा ठसा त्यांच्या मनावर दृढ झाल्याचा उल्लेख त्यांनी अनेकदा केला आहे. पिलानीच्या बिर्ला इन्स्टिट्यूटमधून इंजिनिअरिंग केल्यानंतर ते नोकरीच्या मागे लागले नाहीत. त्यांचे मोठे बंधू माधवराव पवार यांच्याबरोबर ते स्वमालकीच्या ‘अजय मेटॅकेम’मध्ये काम करू लागले. विशिष्ट प्रकारची औद्योगिक रसायने तयार करणारा हा एक लघुद्योग होता; परंतु त्याचे ग्राहक भारतभर होते. उद्योग चालविणे म्हणजे काय, उद्यमशीलता म्हणजे काय, हे बाजारात उभे राहून ते शिकले होते. त्याचे तंत्र आणि मंत्रही. उद्योग उभारणीत किती विविध गोष्टींचे भान ठेवावे लागते, अडचणी येतात आणि येणारच; परंतु त्याचा मुकाबला कसा करायचा, सामना कसा करायचा, त्यातून मार्ग कसा काढायचा, हे अनुभवानेच शिकावे लागते. किंमत चुकविल्याशिवाय शहाणपण येत नाही, हे त्यांना माहीत होते आणि त्यासाठी त्यांची तयारी होती. ‘सकाळ’मधील प्रतापरावांच्या पदार्पणाआधी ते किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनीच्या संचालक मंडळात होते. शंतनुराव किर्लोस्कर कसे काम करतात; उत्पादनाबरोबर, व्यावसायिक गुणवत्तेबरोबर नैतिकता, नीतिमूल्य यांचं भान किती महत्त्वाचं असतं, हे त्यांच्या निरीक्षणातून सुटलं नसणार. 

प्रतापरावांबरोबर मी पंचवीस वर्षं काम केलं. माझ्या समजुतीप्रमाणे आमच्यात एक स्नेहाचं, आदराचं, विश्वासाचं वैशिष्ट्यपूर्ण नातं प्रस्थापित झालं होतं. तरीही ते स्वतःसंबंधी फारसं कधी बोलत नसत, असं मी निश्चित म्हणू शकतो. ‘मी’पासून ते नेहमीच दूर असत. नवनव्या गोष्टी सातत्याने शिकण्याची, आत्मसात करण्याची त्यांची तयारी असे, उत्सुकता असे. आपल्या व्यवसायात त्यांचा कसा उपयोग करून घेता येईल याचे तीव्र भान त्यांना असे. बोलणं कमी, काम जास्त हेच त्यांचं सूत्र असे. कृतिशीलता हे त्यांचं व्यवच्छेदक लक्षण आहे. ते मितभाषी आणि अल्पाक्षरी आहेत. मोठमोठी भाषणं त्यांना जमत नाहीत. मुद्याचं मोजकं बोलणं, सम्यक्‌ बोलणं त्यांच्या प्रकृतीला मानवतं. त्यांचं बोलणंही असं की, जणू मराठीतील सर्व व्यंजनं अल्पप्राण आहेत आणि सगळे उच्चार निभृत आहेत. आपल्या कार्यशैलीने त्यांनी फार अल्प काळात ‘सकाळ’मध्ये सर्वांना आपलेसे केले. त्यांनी सुरुवात केली ती ‘चमको’ कामांनी नाही. त्यात नेत्रदीपक, झगमगाटी काही नव्हतं.

आज आश्चर्य वाटेल, परंतु त्यांनी पहिल्यांदा हात घातला ‘वेस्ट मॅनेजमेंट’ला. छपाई करताना वाया जाणाऱ्या कागदाच्या प्रमाणापासून. न्यूजप्रिंट आजही महाग आहे, तेव्हाही महागच होता. वाया जाणाऱ्या न्यूजप्रिंटचं मान्यताप्राप्त प्रमाण आहे. छपाईयंत्र कसं चालविलं जातं, किती ब्रेक्स होतात वगैरे अनेक कारणं त्यात असतात. कामगार, फोरमन आणि इंजिनिअरांबरोबर उभे राहून, त्यांना टप्प्याटप्प्याने उद्दिष्ट देऊन त्यांनी आपला हेतू साध्य केला. काटकसर आणि कार्यक्षमता दोन्ही कमाल मर्यादेपर्यंत खेचल्या. न्यूजप्रिंटमधील बचत म्हणजे तोट्यात घट नव्हे, तर नफ्यात वाढ आणि अनुषंगाने वाढीव पगार हे सूत्र कामगारांच्या पचनी पडलं. एवढंही करून काही न्यूजप्रिंट वाया जाणारच. विद्यार्थी सहायक समितीचे ते अध्यक्ष आहेत. तेथील मुलांना ‘कमवा व शिका’ योजनेत काम उपलब्ध करून देऊन वाया गेलेल्या या फाळ्यापासून लिहिण्यासाठी पॅड्‌स तयार करण्याचं तंत्र त्यांनी वापरलं. विद्यार्थ्यांना थोडा रोजगार आणि कागदाचा सदुपयोग. तिथून ते वळले न्यूजप्रिंटच्या इन्व्हेंटरीकडे. कागदाचा पुरवठा अनेकदा सुरळीत नसे. म्हणून मिळेल तेव्हा व तेवढा न्यूजप्रिंट विकत घ्यायचा आणि गोडाऊनमध्ये साठवून ठेवायचा, ही प्रचलित पद्धत. गोडाऊनचे भाडे आणि पेपर खरेदीसाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जावरचे व्याज असा दुहेरी भुर्दंड. टंचाईच्या टांगत्या तलवारीने पर्चेसच्या माणसांची मानसिकताच अशी घडली होती.

प्रतापरावांनी सप्लायर चेन ओलांडून थेट उत्पादकांशी वाटाघाटी करून पंधरा दिवसांची गरज भागेल एवढाच न्यूजप्रिंटचा साठा करावा लागेल असं वेळापत्रक बसवलं. पुन्हा बचत. ट्रकमधून रिळं उतरवून घेताना दणादण आपटली तर न्यूजप्रिंट खराब होतो आणि मशिनवर वारंवार तुटतो. झालं ‘लोडर’ लोकांचं प्रशिक्षण. नंतर मोर्चा वळवला शाईकडे.  शाईच्या गुणवत्तेवर छपाईची गुणवत्ता. औद्योगिक रसायनांचा उद्योग ते स्वतःच करीत असल्याने त्यांच्याकडे याचं विषयज्ञान होतंच. सगळ्या स्तरांवर पाठपुरावा करून दर्जेदार शाई रास्त किमतीत मिळविण्यात ते यशस्वी झाले. वृत्तपत्रातील मजकूर छापण्यासाठी टंकासाठी जो ‘पॉइंट साइज’ वापरला जातो, त्या प्रयोगात तर माझाही सहभाग होता. ‘बारा पॉइंट’ हा मान्यताप्राप्त साइज होता. ऑफसेट मशिनवर उत्तम कागद आणि उत्तम शाई वापरून केलेल्या सुबक मुद्रणामुळे, वाचकांच्या डोळ्यांवर ताण न येताही पॉइंट साइज कमी केला तर त्याच पानावर जास्त मजकूर मावू शकेल, हे गृहीत धरून आम्ही विविध ‘डमी’ पाने तयार केली आणि साडेअकरा पॉइंटवर स्थिरावलो. हा बदल वाचकांच्याही लक्षात आला नाही आणि प्रत्येक पानावर चार-पाच टक्के अधिक मजकूर जाऊ लागला. ही अगदी सुरुवातीची उदाहरणं आहेत; परंतु प्रतापरावांच्या कार्यशैलीचा परिचय करून देणारी, आज ज्याला आपण व्यवसायातील ‘इनोव्हेशन’ असा पारिभाषिक शब्द वापरतो त्याची ‘सकाळ’मधील सुरुवात कशी झाली ते स्पष्ट करणारी आहेत. त्याचा परिणाम असा झाला की, नंतर कामगारांनीच ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. एक सर्जनशील, स्पर्धात्मक वातावरण तयार झालं. त्याचंच पर्यवसान पुढे क्वॉलिटी सर्कलमध्ये झालं. तंत्रज्ञान बदललं, हॉटमेटल ते कोल्डप्रेसपर्यंत प्रवास झाला, पण ‘सकाळ’मधील एकाही कामगारावर बेकारीचं संकट ओढवलं नाही. सर्वांनी आपापल्या विभागात आवश्यक असलेलं नवं तंत्रज्ञान शिकून घेतलं- नव्हे, त्यात ते पारंगत झाले. कोणताही खडखडाट न होता, संपबिंप न होता ‘सकाळ’ने रूळ बदलला. गाडीचा वेग वाढला, पण कोणाला भोवळ आली नाही. प्रतापराव मालक नाही झाले; चालक झाले, नेते झाले. सध्याच्या ब्रँडिंगच्या जमान्यात प्रतिमानिर्मिती महत्त्वाची झाली आहे. तिथे वास्तवापेक्षा समजच अनेकदा महत्त्वाची ठरते. प्रतापरावांनी हे रिॲलिटी आणि परसेप्शनमधील अंतर मिटवले ते त्यांच्या अंगी असलेल्या गुणवत्तेमुळे. विेशासार्हता वृत्तपत्रांचा सर्वांत मोठा गुण. प्रतापरावांनी ती प्राप्त केली. ‘सकाळ’ची मालकी रास्त आणि पात्र व्यक्तीच्या हाती गेली, हे जनमानसात मान्य झाले. हा सर्वांत अवघड टप्पा होता. अडथळ्यांचीच शर्यत होती. कायदेशीर लढाईपेक्षा ती गुंतागुंतीची होती. ती त्यांनी जिंकली होती. ‘सकाळ’च्या विस्तारासाठी आणि विकासासाठी त्यामुळे नवा हुरूप आला.

पुणे-मुंबई- कोल्हापूर या आवृत्त्यांत नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर अशी भर पडत गेली. एके काळी पुण्याचे मुखपत्र असलेला ‘सकाळ’ महाराष्ट्रातील एक प्रमुख, आघाडीचे पत्र म्हणून प्रस्थापित झाला. याच काळात इतर काही वृत्तपत्रांची वाताहत होताना दिसत होती. परुळेकरांनंतर ‘सकाळ’चे काय होणार, याचे उत्तर खपाच्या दहा लाखांच्या आकड्याने दिले होते. सध्याच्या बाजारकेंद्री व्यवस्थेत आकडेच सर्व काही बोलतात; मग ते खपाचे असोत, उलाढालीचे असोत, की नफ्याचे. ‘हे उद्दिष्ट गाठले नाही तर आपण मरू; स्पर्धक आपल्याला खाऊन टाकतील,’ असं वाक्य प्रतापरावांच्या तोंडी नेहमी असे. ते वस्तुस्थितीचे निदर्शकच होते. मी इथे ‘प्रतिस्पर्धी’ किंवा ‘स्पर्धक’ असे म्हणतो; प्रतापरावांच्या शब्दकोशात त्यासाठी एक ठणठणीत शब्द होता, एवढाच काय तो फरक.

इथेच एक गोष्ट आवर्जून नोंदवली पाहिजे. विकास आणि वाढीची नवनवी शिखरे पादाक्रांत करताना प्रतापरावांनी एक पथ्य नेहमी सांभाळले. हा पेपर पवारांचा आहे, असे त्यांनी कधी वाटू दिले नाही. ‘पवार’ शब्दात अनुस्यूत असलेल्या अर्थांच्या सर्व छटा इथे मला अभिप्रेत आहेत. एकदा अनौपचारिक संभाषणात ‘कन्फेशन’ म्हणता येईल असे एक विधान त्यांनी केल्याचे माझ्या अजून स्मरणात आहे. ते म्हणाले होते, ‘‘शरदरावांना मी पुरेशी मदत करू शकलो नाही, याची खंत माझ्या मनात आहे.’’ त्याचे स्पष्टीकरण मी विचारले नाही. माझ्या अल्पमतीप्रमाणेच अर्थांतरण करून मी गप्प राहिलो. संस्था मोठी होणे म्हणजे संस्थेतील लोक मोठे होणे यावर प्रतापरावांचा दृढ विश्वास होता. सर्वसाधारण कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व्हावे यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. ज्यांची कामगिरी आश्वासक होती त्यांना कामाच्या अधिक जबाबदाऱ्या दिल्या, पदोन्नती दिली, कार्यालयीन कार्यक्रमात त्यांना पारितोषिके दिली. महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्यांनी जग पाहिले पाहिजे, अनुभवले पाहिजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर वृत्तपत्रक्षेत्रात कुठले नवे प्रवाह येताहेत, तंत्रज्ञान कसे बदलते आहे, व्यवस्थापनक्षेत्रात कुठल्या नवनवीन पद्धती स्वीकारल्या जाताहेत याचा अभ्यास करून त्यातील आपण काय घेऊ शकतो, याचे नियोजन केले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता.

ते स्वतः अनेक निमित्ताने परदेश प्रवास करीतच; परंतु आपल्या अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांना त्यांनी एकदा नव्हे,  अनेकदा परदेशात जाण्याची संधी दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रे, कार्यशाळा, परिषदा आणि प्रदर्शने यांना उपस्थित राहिलेल्या ‘सकाळ’च्या कर्मचाऱ्यांची संख्या त्या काळी तरी उच्चांकी होती- बहुधा देशातील वृत्तपत्रांमध्ये सर्वाधिक. अनेकांचा पहिला परदेशप्रवासच यानिमित्ताने झाला. प्रतापराव त्यांना सर्व प्रकारची मदत करीत.

अर्थात परत आल्यानंतर प्रत्येकाला प्रवासात शिकून आलेल्या नव्या गोष्टींचे सादरीकरण करावे लागे, गटचर्चेत मांडणी करावी लागे. निरंतर शिक्षणाचाच हा भाग होता. कामाची जबाबदारी देण्याबरोबरच त्यासाठी आवश्यक असलेले स्वातंत्र्य देण्यात ते कुचराई करीत नसत. ‘सकाळ’च्या सर्वच संपादकांच्या स्वातंत्र्याचा त्यांनी कधी अनादर केला नाही. इतर वृत्तपत्रांत एवढे स्वातंत्र्य मिळणे दुरापास्तच. जबाबदारी ही स्वातंत्र्याची दुसरी बाजू. या स्वातंत्र्याचा काही जणांनी गैरफायदा घेतला, हे त्यांना दिसत होते; परंतु आपल्या मूळ भूमिकेपासून ते विचलित झाले नाहीत.

पत्रकारितेतील माझ्या कामगिरीचे जेव्हा मी स्वतःसाठी मूल्यमापन करतो, तेव्हा मला मिळालेल्या आणि मी घेतलेल्या स्वातंत्र्याचा वाटा फार मोठा आहे, याच निष्कर्षापर्यंत मी येतो. माझ्या प्रसंगपरत्वे केलेल्या लेखन/ भाषणात आणि पुस्तकांच्या मनोगतात त्याचे श्रेय प्रतापरावांना देण्यात मी कधी अनमान केला नाही. माझ्या संपादकीय कारकिर्दीत एक ब्रॅन्ड म्हणून ‘साप्ताहिक सकाळ’ला मिळालेल्या मान्यतेत प्रतापरावांचा पाठिंबा मला नेहमीच गृहीत धरता आला, एवढं आमचं नातं विश्वासाचं होतं.

 शक्यता आहे की, इतर अनेकांनाही प्रतापरावांशी आपले ‘खास’ नाते आहे असे वाटत असेल. तसे ते असेल तर त्याचा अर्थ एवढाच की, प्रतापरावांचे व्यक्तिमत्त्व मैत्रभावाने संपृक्त आहे. लीलातार्इंनी हे ओळखले असते, तर ‘सकाळ’चा विकास अधिक वेगाने झाला असता. माझी ही भावना भाबडी असली तरी प्रामाणिक आहे. पहिल्या पिढीतील उद्योजक म्हणून प्रतापराव स्वबळावर उभे राहिले, हे खरेच; पण त्यांच्यातील सामाजिक उद्यमशीलतेला मात्र कौटुंबिक वारसा आहे. पुण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे जैविक नाते आहे. विद्यार्थी सहायक समिती, पुणे अंधशाळा, बालग्राम, पुणे बालकल्याण संस्था या संस्थांमध्ये कार्यक्रमानिमित्त त्यांच्याबरोबरच मला जाता आले. त्यांच्याकडे असलेल्या व्यावसायिक शिस्तीची प्रचिती तिथेही येते. उद्योगांशी संबंधित इतर संस्थांचेही ते पदाधिकारी आहेत. मराठा चेंबरचे ते अध्यक्ष होते. माझ्या समजुतीप्रमाणे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजचा नामविस्तार आणि कार्यविस्तारही ते अध्यक्ष असतानाच झाला. ‘ॲग्रिकल्चर’ची भर त्यात पडली. कृषी-औद्योगिक समाजाचं स्वप्न महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलं आणि नंतर वसंतदादा पाटील व शरदराव पवार यांनी त्याचा कृतिप्रवण पुरस्कार केला. मराठा चेंबरने नावातील बदलाने हीच वस्तुस्थिती ठळकपणे अधोरेखित केली.

शरद पवारांच्या राजकारणात समाजकारणाचा समावेश असतोच; परंतु राजकारणाचे पारडे जड आहे. आता तर पवार घराण्यातील तिसरी पिढीही राजकारणात प्रवेश करती झाली आहे. प्रतापरावांचा पिंड मात्र वेगळा आहे. राजकारण त्यांच्या प्रकृतीला मानवणारे नाही. त्या बैठकीत ते बसत नाहीत. याचं कारण ते उद्योजक असले आणि समाजसेवेशी संबंधित अनेक संस्थांचे नेतृत्व करीत असले, तरी ते फार ‘खासगी’ आहेत. एका अर्थाने इंग्रज. आपण आणि आपले काम, त्यात ते समाधानी असतात. या समाजाबद्दल त्यांची काही निश्चित धारणा आहे. परिवर्तन झाले पाहिजे असे त्यांना तीव्रपणे वाटतेही; पण त्याच्या मार्गांबद्दल, पद्धतींबाबत त्यांचे मतभेद आहेत. त्याची तर्कमीमांसा ते करतात. वृत्तपत्रातही राजकारण फार वरचढ होता कामा नये, जीवनातील इतर क्षेत्रेही महत्त्वाची आहेत, असे त्यांना वाटते. अर्थात ही काही त्यांनी मला एखाद्या मुलाखतीत सांगितलेली, केलेली विधाने नाहीत. पाव शतकाच्या त्यांच्या सहवासातून काढलेले ते माझे आपले निष्कर्ष आहेत. गेल्या दशकात आमच्या भेटी दुर्मिळ झाल्या आहेत. या काळात जग फार वेगाने बदलले, माणसे बदलली आणि मूल्येही. ‘सकाळ’ही बदलला. मग प्रतापरावांनीच बदलू नये, असे मी कसे म्हणणार? परंतु 1985 ते 2010 या पंचवीस वर्षांतील प्रतापराव आणि भारतीवहिनी निखालसपणे ‘सर्वांगी सुंदर’ होते, हे माझे मत मात्र मलाच प्रिय आहे.

(गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या ‘अमृतअनुभव’ या पुस्तकातून हा लेख घेतला आहे.)

Tags: sakal newspaper amrutanubhav pratap pawar सकाळ वृत्तपेपर अमृतअनुभव सदा डुम्बरे प्रताप पवार weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सदा डुम्बरे,  पुणे, महाराष्ट्र
sadadumbre@gmail.com

पत्रकार, लेखक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके