डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

स्वातंत्र्याची चळवळ करू पाहणाऱ्या राष्ट्रवादी देशभक्तांसाठी क्रिकेट हा परकीय सत्ताधाऱ्यांचाच खेळ राहिला. या मंडळींना इतरही पाश्चात्त्य खेळ फारसे रुचत नसत. उदाहरणच द्यायचे झाले तर लोकमान्य टिळकांचे देता येईल. टिळकांचा ज्येष्ठ मुलगा विश्वनाथ अकाली मृत्युमुखी पडला. दुसऱ्या क्रमांकाच्या मुलाला म्हणजे रामभाऊला फूटबॉलचे वेड होते. रामभाऊ स्वत: चांगले फूटबॉलपटू होते, पण टिळकांना आपल्या या मुलांनी (धाकटा श्रीधर) देशी खेळ खेळावेत, देशी व्यायाम करावेत असे वाटे. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी पत्र लिहून गायकवाड वाड्यात या मुलांसाठी छोट्या तालीमखान्याची उभारणी करण्याची सूचनाही केली होती. पण टिळकांना फूटबॉल किंवा अन्य पाश्चात्त्य खेळांसंबंधी काहीही वाटो, भारतीय कलावंतांच्या निर्मितिक्षम प्रतिभेने टिळकांना क्रिकेट खेळायला लावलेच! त्याचे असे झाले,

माणसामध्ये ज्या प्रवृत्ती जन्मजातपणे अस्तित्वात असतात त्यांच्यात क्रीडाप्रवृत्तीचा समावेश करायला हरकत नसावी. नाना प्रकारचे खेळ खेळल्यामुळे जो व्यायाम होतो त्यामुळे शरीर सुदृढ होण्यास मदत होते हे वेगळे सांगायची गरज नाही, पण तो काही खेळाचा मुख्य उद्देश नाही. खेळ खेळताना (आणि अर्थात पाहतानासुद्धा) जो आनंद होतो तो खरा महत्त्वाचा. अगदी तान्हे बाळसुद्धा पडल्यापडल्या हात-पाय हलवीत असते, तो त्याचा खेळच असतो. खरे तर माणूस हा एक प्राणीच आहे. त्यामुळे त्याच्यात आणि इतर प्राण्यांध्ये अनेक साम्यस्थळे आढळून येतात. कुत्रा, मांजर, हत्ती, माकड हे प्राणी कधी स्वत:शी तर कधी इतरांबरोबर खेळताना दिसून येतात. त्यांच्यातील ही प्रवृत्ती जाणूनच की काय दरवेशी आणि सर्कशीतील रिंगमास्टर त्यांना माणसांबरोबरच्या खेळात समाविष्ट करून घेताना दिसतात. माणसाची प्राण्यांबरोबर तुलना करताना भेदाचाही एक मुद्दा विचारात घ्यावा लागतो. माणूस आपल्या सहजप्रवृत्तींवर संस्कार करून संस्कृती निर्माण करतो. सहजप्रवृत्तींना नियंत्रित आणि नियमित करून तो त्यांचीही एक व्यवस्था बांधतो. खेळांचीही अशीच व्यवस्था बांधण्यात आली. त्यातून ‘क्रीडासंस्कृती’ नावाची एक महत्त्वाची उपसंस्कृती निर्माण झाली. प्रत्येक खेळाचे निश्चित असे काही नियम असतात. या नियमांच्या चौकटीतच खेळाडूंना आपले क्रीडाकौशल्य प्रगट करावे लागते. खेळांध्ये स्वाभाविक उस्फूर्तता व नियमबद्धता यांचा समन्वय साधलेला दिसून येतो.

खेळांचा इतिहास पाहता अनेकदा हे खेळ कधी देवदेवतांच्या जत्रांध्ये किंवा उत्सवांध्ये सुरू झाल्याचे दिसतात, कधीकधी ते निखळ करमणुकीसाठी खेळले जात असल्याचे आढळून येते. पुढे पुढे खेळाांगील देवदेवतांचे, उत्सवांचे व निखळ करमणुकीचेही संदर्भ गळून पडतात व खेळ स्वायत्त सामाजिक-सांस्कृतिक घटित असे स्वरूप धारण करतो. इतकेच नव्हे तर मानवजात एकच असल्याने, एका प्रदेशात वा लोकसमूहात निर्माण झालेला खेळ स्थानिक मर्यादा ओलांडत जगभर पसरल्याचेही इतिहास सांगतो. अन्यथा, ग्रीकांच्या छोट्या नगर राज्यांध्ये रुजलेल्या ‘ऑलिंपिक’चा क्रीडोत्सव तेवढ्यापुरता मर्यादित न राहता विश्वव्यापक कसा झाला याची संगती लागणार नाही. या उत्सवात आपल्याही देशाचा सहभाग हवा असे ब्रिटिश काळातील परतंत्र भारतालाही वाटले आणि इतकेच नव्हे तर त्यात खेळल्या जाणाऱ्या हॉकी नावाच्या सर्वस्वी परकीय खेळात भारतीय खेळाडूंनी इतके प्रावीण्य संपादन केले की ‘हॉकीचे सुवर्णपदक भारताला’ असे समीकरणच एके काळी रूढ झाले. ध्यानचंद यांच्यासारखा अतिकुशल हॉकीपटू व कर्णधार भारताने जगाला दिला. (याच ध्यानचंदांच्या ऑलिंपिक संघातून खेळणाऱ्या निमल बंधूंपैकी बाबू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉकीपटूच्या घरात भाडेकरू म्हणून मी काही काळ राहिलो होतो. भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळातील आठवणी निमलांच्या तोंडातून ऐकणे ही एक पर्वणीच होती.)

परकीय उगमाचे हॉकीसारखे खेळ खेळताना भारतीय खेळांनाही ऑलिंपिकमध्ये स्थान मिळावे असे कोणाला वाटू लागले तर ते भारतीयांच्या राष्ट्राभिमानाशी सुसंगतच म्हणावे लागेल. एका देशातला खेळ दुसऱ्या देशातील लोकांनी स्वीकारणे यात माणसाच्या अनुकरण वृत्तीबरोबर त्यासाठी निमित्त ठरलेल्या विस्तारवादी वृत्तीचाही वाटा असतोच. भारताचेच उदारहरण घेऊ. भारतातील सर्वांत लोकप्रिय खेळ म्हणजे अर्थातच क्रिकेट. क्रिकेट हा खरे तर इंग्लंडमध्ये जन्मलेला ब्रिटिश लोकांचा खेळ. ब्रिटिशांच्या राज्यविस्ताराबरोबर क्रिकेटचाही विस्तार झाला व ब्रिटिशांचीच एक वसाहत असलेल्या परतंत्र भारतीयांनी तो स्वीकारला. यात जेत्या राज्यकर्त्यांच्या अनुयायांचा अंश असल्याची व म्हणून हा खेळ भारतीयांच्या गुलामी मनोवृत्तीचा अंश असल्याची काहींची भावना प्रामाणिकच मानायला हवी. पण एरवीसुद्धा बर्नार्ड शॉपासूनक म्युनिस्टांपर्यंत अनेकांनी क्रिकेटची, बावीस मूर्ख खेळतात व बावीसशे तो खेळ पाहतात, किंवा भांडवलशाहीचे प्रतीक असणारा क्रीडाप्रकार अशा संभावना करीत अनेक वेळा नाक मुरडले आहे. त्याचा परिणाम काय? तर खेळाडूंचा आकडा तोच म्हणजे बावीसच राहिला, मात्र प्रेक्षकांच्या संख्येतील बावीसावरील शून्यांची संख्या वाढतच गेली आणि विशेष म्हणजे याला कोलकत्यासारखे कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेले शहरही अपवाद नव्हते.

पण क्रिकेटचा उगम खरोखरच इंग्लंडमध्ये झाला असेल काय? या बाबतच्या रूढ समजुतीला धक्का देणारे उल्लेख चक्क संत साहित्यात आढळतात. तुकाराम गाथेत ‘काला चेंडुफळी’ या शीर्षकाखाली दोन अभंग आढळतात. गोकुळात नंदयशोदेच्या घरी वाढलेला कृष्ण आपल्या गोपाळमित्रांसह गाई चारण्यासाठी रोज यमुनेच्या तीरावरील रानात जात असे. गार्इंना चरायला सोडून ही मुले वेगवेगळे खेळ खेळत आणि खेळून खेळून दमली की सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्यांचा काला करण्यात येई व कृष्णासह त्या सर्वांचे सहभोजन होई. या खेळांधील चेंडुफळी या खेळाचे नावच त्याचे क्रिकेटशी असलेले साम्य सूचित करते. हा खेळ खेळण्यासाठी चेंडू आणि लाकडाची फळी (जिला क्रिकेटमध्ये बॅट म्हटले जाते) एवढे किमान साहित्य लागणार हे उघड आहे. चेंडूला हातातील फळीने टोला मारायचा व तो चेंडू इतर खेळाडूंपैकी कोणीतरी झेलायचा असे या खेळाचे स्वरूप असल्याचे निश्चितपणे म्हणता येते. तुकोबांच्या अभंगातील संबंधित ओळी याप्रमाणे....

‘झेला रे झेला वरचेवर झेला। हातीचे गमावी तो पाठी साहे टोला।।

त्रिगुणाचा चेंडू हाते झुगारी निराळा। वरिलिया मुखे मन लावी तिथे डोळा।।

आगळा होऊनि धरी वरिचिया वरी।चपळ तो जिंके गांढ्या ठके येरझारी।।’

कृष्णचरित्रात प्रसिद्ध असलेल्या कालियामर्दन या कथेची संगती लावताना तुकोबांनी याच चेंडुफळी खेळाचा उपयोग केला आहे. त्यानुसार कृष्णाने उंच टोलवलेला चेंडू यमुनेच्या डोहात पडतो व तो परत आणण्यासाठी कृष्णाला यमुनेत प्रवेश करावा लागतो, तेथे त्याचे व कालियानागाचे द्वंद्व होते असा हा कथाभाग आहे. त्यातील संबंधित काही ओळी येथे उद्‌धृत करतो.

खेळ मांडियेला यमुने पाबळी। या रे चेंडुफळी खेळू आता।।

चिंतुनिया चेंडू हाणे ऊर्ध्वुखे। ठेली सकळिक पाहातचि।।

मुखे सांगे त्यांसी पैल चेंडू पाहा। उदकात डोहाचिया माथा।।

क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाले तर कृष्णाने मारलेला षट्‌काराचा फटका इतका जोरकस होता की, त्याने फटकावलेला तो चेंडू मैदानाबाहेरील नदीच्या पात्रात पडला! या फटक्याचे वर्णन बॉबी तल्यारखान, विजय मर्चंट, रवी शास्त्री, सुनील गावसकर किंवा हर्षा भोगले यांनी कसे केले असते याची आपण कल्पना करू शकतो.  अर्थात तुकोबांना अभिप्रेत असलेल्या या खेळात स्टंपस्‌, बेल्स इत्यादी गोष्टी नाहीत. क्रिकेटसारखे काहीतरी आपल्याकडे खेळले जात असे आणि त्यामुळे क्रिकेटचा स्वीकार करायला भारतीय जनमानसाला काही अडचण आली नसावी हा मुद्दा आहे.

अर्थात आपल्या क्रिकेटचे आजचे जे स्वरूप पाहायला मिळते ते नि:संशयपणे ब्रिटिशच आहे. आणि त्यामुळेच बहुधा भारतीय क्रिकेटचा इतिहास भारतातील ब्रिटिश वासाहतिक सत्तेच्या इतिहासाशी समांतर राहिला असावा. ब्रिटिश सत्ताधीशांचा संबंध अगोदर येथील राजेरजवाड्यांशी म्हणजेच संस्थानिकांशी आला. त्यामुळे या खेळाची लागण पहिल्यांदा त्यांना झाली. ते क्रिकेट खेळू लागले, काहींनी तर आपापल्या संस्थानांचे स्वतंत्र संघ निर्माण केले. उदाहरणच द्यायचे झाले तर बडोद्याच्या संघाचे देता येईल. खेळाडूंची गोष्ट निघाली तर दुलिप आणि रणजी ही नावे पटकन नजरेसमोर येतात. बिझी किंवा विजयनगरच्या महाराजांचे नाव येते, पण वेगळ्या संदर्भात. मुंबई, कलकत्ता आणि मद्रास ही येथील ब्रिटिश सत्तेची आद्य सत्ताकेंद्रे होती. त्यांतील मुंबईचा विचार केला तरी भारतीय क्रिकेटचा पुढील प्रवास उलगडू शकतो. ब्रिटिशांशी संबंध आलेली मुंबईतील पहिली जमात पारशांची. पारशी मंडळींनी क्रिकेटला इतके उचलून धरले की संख्येने अल्प असलेल्या या जातीचा क्रिकेटचा स्वतंत्र संघ निर्माण होऊ शकला. त्या अनुषंगाने मग हिंदू, मुस्लिम यांचेही संघ मैदानावर उतरले. त्यातूनच चौरंगी-पंचरंगी सामन्यांचा प्रारंभ झाला. हे सारे आपल्या जातिधर्माधारित समाजरचनेस धरूनच झाले असे म्हणता येते. हिंदू संघामुळे मुंबईतील हिंदूंधील मध्यम व उच्च मध्यम वर्गात पोहोचलेल्या जातीमधील तरुण क्रिकेटकडे आकृष्ट झाले, पण त्यातही अग्रेसर ठरले ते सारस्वत.

अर्थात, असे असले तरी स्वातंत्र्याची चळवळ करू पाहणाऱ्या राष्ट्रवादी देशभक्तांसाठी क्रिकेट हा परकीय सत्ताधाऱ्यांचाच खेळ राहिला. या मंडळींना इतरही पाश्चात्त्य खेळ फारसे रुचत नसत. उदाहरणच द्यायचे झाले तर लोकमान्य टिळकांचे देता येईल. टिळकांचा ज्येष्ठ मुलगा विश्वनाथ अकाली मृत्युमुखी पडला. दुसऱ्या क्रमांकाच्या मुलाला म्हणजे रामभाऊला फूटबॉलचे वेड होते. रामभाऊ स्वत: चांगले फूटबॉलपटू होते, पण टिळकांना आपल्या या मुलांनी (धाकटा श्रीधर) देशी खेळ खेळावेत, देशी व्यायाम करावेत असे वाटे. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी पत्र लिहून गायकवाड वाड्यात या मुलांसाठी छोट्या तालीमखान्याची उभारणी करण्याची सूचनाही केली होती. पण टिळकांना फूटबॉल किंवा अन्य पाश्चात्त्य खेळांसंबंधी काहीही वाटो, भारतीय कलावंतांच्या निर्मितिक्षम प्रतिभेने टिळकांना क्रिकेट खेळायला लावलेच!

त्याचे असे झाले, पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करायला आलेल्या रँड या जुलमी अधिकाऱ्याची हत्या चाफेकर बंधूंनी केली. या प्रकरणात टिळकांना गोवण्याची ब्रिटिशांची तीव्र इच्छा होती, मात्र त्यासाठी पुरेसा पुरावा त्यांच्या हाती लागत नव्हता. तेव्हा टिळकांनी ‘केसरी’तून केलेल्या राजद्रोही चिथावणीखोर लेखामुळे रँडचा (व आयर्स्टचा) खून झाला असा दावा करून ब्रिटिश सत्तेने 124अ या भारतीय दंडसंहितेच्या कलमान्वये टिळकांवर खटला भरला. वस्तुत:, या दोन गोष्टींचा संबंध लावण्यासाठी पुराव्याची व कायद्याच्या कलमांची चांगलीच ओढाताण करावी लागली. ‘Sedition’ या शब्दाच्या अर्थाचा नको तितका विस्तार करावा लागला. न्या.स्ट्रॅची यांनी टिळकांना सश्रम कारावासाची शिक्षाही ठोठावली.

अर्थात, त्यासाठी ज्यूरीच्या सभ्य सभासदांनी टिळकांना दोषी ठरविण्याची गरज होती. अशा प्रकारच्या फौजदारी खटल्यात ज्यूरींचे एकमत होणे गरजेचे असते. या खटल्यातील नऊपैकी सहा सभासद युरोपियन होते व तीन भारतीय. सहा जणांनी टिळकांना दोषी ठरवले तर तिघांनी निर्दोष. न्यायमूर्तींनी बहुमताचा निर्णय प्रमाण मानला! कोर्टाच्या या निर्णयावर भारतीय वृत्तपत्रांमधून खूप चर्चा झाली. ब्रिटिश न्यायव्यवस्थेवर खूप टीकाही करण्यात आली. (ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांच्या सौजन्याने या खटल्याचे इतिवृत्त व नंतरच्या चर्चेचे पुस्तकच उपलब्ध होऊ शकले.) मुंबईतील एका पत्राने त्यासाठी व्यंगचित्राचा उपयोग केला. फलंदाज टिळक क्रिजवर पाय ठेवून असल्यामुळे ते यष्टिचीत होण्याचा प्रश्नच नाही, परंतु खुद्द न्यायाधीश असलेल्या यष्टिरक्षकाने अपील केले व अंपायर ज्यूरीने ते ग्राह्य धरले आणि टिळक आऊट! प्रस्तुत व्यंगचित्राने केलेली टीका डझनभर अग्रलेखांतील टीकेपेक्षा बोलकी होती, हे वेगळे सांगायची गरज नाही.

टिळकांना स्वत:ला क्रिकेट आवडत नसेलही; पण जेव्हा बाळू पालवणकर (पी.बाळू) या चर्मकार समाजातील गोलंदाजाने इंग्रजांच्या संघाला जेरीस आणले तेव्हा एकूणच महाराष्ट्रीयांना आनंद झाला. बाळू भारतीय आणि त्यातल्या त्यात हिंदू अस्मितेचे प्रतीक बनला. त्याचा पुण्यात टिळकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. टिळकांनी बाळूच्या गळ्यात पुष्पहार घालून त्याच्या गुणगौरवाचे भाषणही केले. येथे क्रिकेट हा खेळ स्वदेशी की विदेशी हा मुद्दाच नव्हता. भारतीय खेळाडू क्रिकेटमध्ये इंग्रजांचा पराभव करू शकतात तसा राजकारणातही करू शकतील व स्वातंत्र्य मिळवू शकतील याचा हा विजय म्हणजे जणू संकेत होता. अर्थात स्वत: बाळूचा आणि विठ्ठलसह त्याच्या इतर भावंडांचा जातिग्रस्त हिंदू संघामधील प्रवेश सोपा नव्हता. त्यासाठी त्यांना वाजवीपेक्षा अधिक वाट पाहावी लागली, स्वत:ला वारंवार सिद्ध करावे लागले हा भाग वेगळा!

Tags: पी.बाळू ब्रिटिश ऑलिंपिक क्रीडासंस्कृती खेळ सदानंद मोरे क्रिकेट लोकमान्य टिळक P Balu british Olympic sports Sadanand More Cricket Lokmanya Tilak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सदानंद मोरे,  पुणे
sadanand.more@rediffmail.com

लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात