डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

संत ज्ञानेश्वर यांचे 'ज्ञानेश्वरी'

नेवासा येथे माझे प्रवचन झाले. तेव्हा पुन्हा एकदा ‘इये मराठीचिये नगरी’ ही ओवी घेतली. एक वर्तुळ जणू पूर्ण झाले. मध्यंतरी मी महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचा अध्यक्ष म्हणून काम केले. आमच्या समितीने राज्याचे भाषिक धोरण ठरवणारा अहवाल सिद्ध केला. या अहवालाची सुरुवातच बाराव्या अध्यायातील मराठी संबंधीच्या ओव्यांनी केली आहे. या ओव्या म्हणजे जणू मराठीचा जाहीरनामाच आहे आणि त्यातील सूत्रांनुसार आपण आजही यशस्वी वाटचाल करू शकतो, अशी माझी धारणा आहे.   

दादा कोंडके यांच्या चित्रपटातील एक गाणे सर्वश्रुत आहे- ‘गेली सांगोनि ज्ञानेश्वरी, मानसापरास मेंढरं बरी’.

अशी एक आख्यायिकाही ऐकण्यात आहे की, एका प्राध्यापकाने हे गाणे ऐकल्यावर परत एकदा संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचून काढली. पण त्याला काही कोठे असा संदर्भ मिळाला नाही. ही आख्यायिका खरी आहे की खोटी याची शहानिशा करायची गरज नाही. मुद्दा एवढाच आहे- असा नसलेला संदर्भ सांगण्याची गरज गीतकाराला वाटली, याचे कारण ज्ञानेश्वरीचा समाजमानसावर असलेला प्रभाव त्याला ठाऊक होता.

बऱ्याच विद्वानांना असेही वाटते की, ‘लोक ज्ञानेश्वरी वाचतात ती तिच्यातील अध्यात्मामुळे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ परमार्थमार्गावरील प्रवाशांचा वाटाड्या आहे. तो वाचून पुण्यप्राप्ती होते.’ या वाटण्यात तथ्य नाही अशातला भाग नाही, या कारणाने ज्ञानेश्वरी वाचणारे लोक लक्षणीय संख्येने आहेत. विशेषत: वारकरी संप्रदायाच्या अनुयायांचा तर तो धर्मग्रंथच आहे. त्याची उत्सवी अशी सामुदायिक पारायणे गावोगावी वेळोवेळी होत असतात.

ज्ञानेश्वरी वाचनाचे विडंबन करण्याची इच्छा खुद्द चिं. वि. जोशी यांना इतकी होती की, ‘चिमणराव ज्ञानेश्वरी वाचतात’ ही त्यांची कथा त्यातूनच निघाली.

माझा जन्मच वारकरी परंपरेत झालेला असल्यामुळे आणि माझ्या देहू गावात भजन, कीर्तन, प्रवचन ही नित्याचीच बाब असल्यामुळे ज्ञानेश्वरीशी माझा परिचय बालवयातच झाला. वारकरी म्हणून रोज ज्ञानेश्वरी वाचणे अंगवळणी पडले. पण या प्रकाराला अभ्यासाची जोड  मिळाली, ती माझे वडील श्रीधरअण्णा यांच्यामुळे. अण्णा सांप्रदायिक तर होतेच, पण त्यांच्या निष्ठेला व्यासंगाचे कोंदण होते. देश-विदेशातील अभ्यासक त्यांच्याकडे चर्चा करायला, मार्गदर्शन घ्यायला यायचे. ही चर्चा मी ऐकायचो. या चर्चेत हळूहळू सहभागीही होऊ लागलो. अण्णांचा ग्रंथसंग्रहही मोठा होता. त्यातील माझ्या वयाला न साजेशी अशी अनेक पुस्तके मी प्राथमिक शाळेत असतानाच फस्त करून टाकली होती. या सर्व प्रकारामुळे मी ज्ञानेश्वरीकडे वेगळ्याच, म्हणजे अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून पाहू लागलो.

इतर वारकरी तीर्थक्षेत्रांप्रमाणे देहूतही अधिक महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह होत असतो. इयत्ता पाचवीत असताना मला या सप्ताहात ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायची इच्छा झाली. हो-नाही करता-करता माझा बालहट्ट पुरवून घेण्यात यशस्वी झालो. या पहिल्याच प्रवचनात मी ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील नमनाच्या ओव्यांमधील ‘इये मराठीचिये नगरी । ब्रह्मविद्येचा सुकाळू करी । देणे घेणे सुखचि बरी । हो देई या जना ॥’ ही ओवी घेऊन निरूपण केले. वास्तविक ही ओवी मराठी भाषेसंबंधी आहे. वारकरी संप्रदायातील महाराजमंडळी अशा भाषिक भानगडीत पडत नाहीत. पण मला तेव्हाही ज्ञानेश्वरीतील भाषाविचार व मराठीची जाणीव महत्त्वाची वाटली आणि मी ते धाडस केले.

जाता-जाता सांगायला हरकत नाही- माझ्या या प्रवचनाला श्रोता म्हणून फलटण संस्थानाच्या श्रीमती लक्ष्मीबाई नाईक-निंबाळकर उपस्थित होत्या. त्यांनी माझे घरी येऊन कौतुक केले. त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजे मी एफ. वाय. बी. ए.ला असताना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तुकाराममहाराजांचे दर्शन घ्यायला देहूला आल्या होत्या. तेव्हा त्यांनी माझी चौकशी केली. देवळातील लोकांनी मला गावातील माझ्या मित्रांच्या घोळक्यातून शोधून काढून राणीसाहेबांसमोर उभे केले. राणीसाहेबांनी मला त्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वरी ‘सांगायला’ सांगितली. मी अर्थातच सांगितली. त्यांना ती आवडली आणि त्यांनी मला फलटण येथील दत्तजयंतीच्या सप्ताहात प्रवचन-कीर्तनासाठी दर वर्षी यायचे निमंत्रण दिले. त्यानुसार बरीच वर्षे माझा फलटणला जायचा परिपाठ होता.

ज्ञानेश्वरीतील भाषिक भान मला महत्त्वाचे वाटते. भाषिक भान हा सांस्कृतिक भानाचा पाया असल्याचे यथावकाश लक्षात आले. त्याला अनुसरून मी ज्ञानेश्वरीच्या सप्तशताब्दीच्या वेळी (इ.स. 1990) पैठण ते आळंदी- नेवासामार्गे अशी भाषिक विजयाची यात्रा काढून हा भाषिक भावाचा मुद्दा अधोरेखित करायचा प्रयत्न केला. नेवासा येथे माझे प्रवचन झाले. तेव्हा पुन्हा एकदा ‘इये मराठीचिये नगरी’ ही ओवी घेतली. एक वर्तुळ जणू पूर्ण झाले.

मध्यंतरी मी महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचा अध्यक्ष म्हणून काम केले. आमच्या समितीने राज्याचे भाषिक धोरण ठरवणारा अहवाल सिद्ध केला. या अहवालाची सुरुवातच बाराव्या अध्यायातील मराठी संबंधीच्या ओव्यांनी केली आहे. या ओव्या म्हणजे जणू मराठीचा जाहीरनामाच आहे आणि त्यातील सूत्रांनुसार आपण आजही यशस्वी वाटचाल करू शकतो, अशी माझी धारणा आहे.

ज्ञानेश्वरी हा वारकरी संप्रदायाचा पायाभूत प्रमाणग्रंथ आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ असे संत बहिणाई कोणत्या अर्थाने म्हणाल्या, हे समजून घ्यायला हवे. वारकरी संप्रदायाची स्थापना तर ज्ञानेश्वरांनी केली नव्हती, तो संप्रदाय त्यांच्याही पूर्वी काही शतके तरी अस्तित्वात होता. धर्मसंप्रदायासाठी आवश्यक असलेल्या घटकांपैकी उपास्य दैवत (म्हणजे विठ्ठल) आणि उपासनापद्धती (म्हणजे वारी) या गोष्टी ज्ञानेश्वरांच्या आधीपासूनच अस्तित्वात होत्या. मग ज्ञानेश्वरांनी असे काय केले की, ज्यामुळे त्यांनी संप्रदायाचा पाया घातला, असे म्हणता येते?

धर्मसंप्रदायासाठी आवश्यक असलेला तिसरा घटक म्हणजे धर्माला मान्य असलेला प्रमाणग्रंथ (जसे बायबल, कुराण) ज्ञानेश्वरी लिहून संप्रदायाला दिला, तेव्हापासून त्यामुळे वारकरी संप्रदायाला स्वतंत्र धर्मसंप्रदाय अशी प्रतिष्ठा प्राप्त झाली. ज्ञानेश्वरांच्या समकालीन व उत्तरकालीन सर्वच संतांनी ज्ञानेश्वरांची स्तुती केली, याचे हे कारण आहे. ‘नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवे । एक तरी ओवी अनुभवावी ।’ असे संत नामदेव काही उगाच म्हणाले नाहीत. नामदेवरायांचे म्हणणे वारकरी संप्रदायाने शिरोधार्य मानले आणि गेली सात-आठ शतके त्यानुसार हा संप्रदाय वाटचाल करीत आहे.

दरम्यानच्या काळात मी पीएच. डी.च्या पदवीसाठी भगवद्‌गीतेच्या तत्त्वज्ञानावर संशोधन केले. त्यामुळे मला ज्ञानेश्वरी व इतर गीताटीका यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याची संधी मिळाली. ज्ञानेश्वरीचा साहित्यशास्त्राच्या अंगाने डॉ. रा. शं. वाळिंबे यांनी केलेला अभ्यास माझ्यापुढे होताच. माझ्या लक्षात आले की, शास्त्र आणि काव्य हा भेद ज्ञानेश्वरीत मिटवला गेला आहे. ज्ञानेश्वरांची परंपरा ही शैव परंपरा होती आणि त्यांच्या तत्त्वज्ञानावर काश्मीर शैव किंवा प्रत्यभिज्ञा दर्शनाचा प्रभाव होता. काश्मिरी पंडित अभिनवगुप्त यांनी एका वेगळ्याच प्रकारच्या साहित्यशास्त्राची निर्मिती केली. या प्रकारच्या काव्यशास्त्राला अपेक्षित असलेली वाङ्‌मयीन कृती- जिच्यात तत्त्वज्ञान हे शास्त्र निरूपित केले आहे- संस्कृत भाषेत अस्तित्वात नव्हती; ती ज्ञानेश्वरांनी मराठीत निर्माण केली. म्हणजेच ज्ञानेश्वरी ही भारतीय साहित्यविचारांची अंतिम परिनिष्पत्ती आहे.

ज्ञानेश्वरी ही केवळ पारंपरिक साहित्यशास्त्राशी सुसंगत साहित्यकृतीच नाही, तर तिने पारंपरिक साहित्यशास्त्रातील त्रुटी भरून काढल्या आहेत. पारंपरिक साहित्यशास्त्रात आठ रस आणि तीन संमिते (प्रभुसंमित, मित्रसंमित आणि जायासंमित) आहेत. नववा शांत रस हा नंतर दाखल करण्यात आल्याचे मानले जाते. पण शांत रसाला सामावून घेईल अशी संमितव्यवस्थेची चौकट नव्हती. ज्ञानेश्वरीत अशा चौथ्या म्हणजे मातृसंमिताचे सूचन आहे व त्यानुसार काव्यव्यवहारही करण्यात आला आहे. ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायात ‘माऊली’ म्हटले जाते, त्याचे रहस्य हे आहे.

ज्ञानेश्वरीचा विचार जागतिक पातळीवरूनही करता येतो. ज्ञानेश्वर विश्वकुटुंबवादी होते. त्यांनी जे पसायदान मागितले, ते सर्व जगासाठी होते आणि ज्या देवाकडे त्यांनी ते मागितले, तो देवही विश्वात्मक होता. ज्ञानेश्वरीच्या पूर्वी भगवद्‌गीतेवर जी भाष्ये लिहिली गेली, ती अर्थातच संस्कृत भाषेत होती. संस्कृतेतर भारतीय भाषेत लिहिले गेलेले ‘ज्ञानेश्वरी’ हे पहिले भाष्य होय आणि ती पहिली भाषा मराठी होती. जवळपास दीडशे वर्षांपूर्वी विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या लक्षात आले की- युरोपात जेव्हा लॅटिन ही धर्मभाषा होती, तेव्हा डांटे या कवीने ‘डिव्हाईन कॉमेडी’ हा ग्रंथ इटालियन भाषेत लिहिला. तो आधुनिक युरोपियन भाषांमधील पहिला ग्रंथ होय. पण ज्ञानेश्वरी ही डांटेच्या या ग्रंथापूर्वी लिहिली गेली आहे.

अनुषंगाने ज्ञानेश्वरांच्या आणखी एका ग्रंथाचा विचार करावा लागतो. तो म्हणजे अनुभवामृत किंवा अमृतानुभव. नेवासे येथे ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर लगोलग ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाची रचना केली. विशुद्ध साक्षात्कारी अद्वैतानुभूती प्रगट करणारा हा ग्रंथ असून त्यावर महाराष्ट्रात खूप चर्चा झाली आहे. ग्रंथावरील शैव अथवा प्रत्यभिज्ञा तत्त्वज्ञानाचा प्रभाव स्पष्ट आहे. या ग्रंथावरील वासुदेवी टीकेचे संपादन मी आणि वा.ल.मंजुळ यांनी केले आहे.

ज्ञानेश्वरी हा इथून-तिथून संवादांवर भर देणारा ग्रंथ आहे. संवाद हा माणसाच्या जगण्याचा गाभा असून तेच त्याचे वैशिष्ट्य आहे. मानवी संस्कृती आणि मानवाच्या विविध संस्था यांच्यात जवळीक भाषिक संवादांमुळे शक्य झाली. अलीकडच्या काळात जर्मनीतील तत्त्ववेत्ता युंगेन हॅबरमास यांनी लोकशाही व्यवस्थेमधील संवादाचे महत्त्व खूप विस्ताराने विशद केले आहे.

प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ डॉ.जयंत लेले यांनी महाराष्ट्रातील संतपरंपरेचा विशेषत: शिवकालीन स्वराज्याच्या अनुषंगाने केलेल्या मांडणीत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा आधार घेतला आहे. डॉ.लेले यांना सापडलेल्या सूत्राचा नीट विस्तार केला तर आधुनिक राजकीय सिद्धांतांच्या संदर्भात ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञानाचे महत्त्व लक्षात येईल. ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणताना ज्ञानेश्वरांच्या विचारातील वैश्विकता नेमकेपणाने सांगण्याचे काम अजून बाकी आहे.

या प्रक्रियेची सुरुवात सव्वाशे वर्षांपूर्वी राजारामशास्त्री भागवत यांनी केली. ‘पसायदान’ या प्रसिद्ध प्रार्थनेचे महत्त्व सांगून ते विश्वगीत असल्याचे सूचन पहिल्यांदा भागवतांनी केले. वैश्विकता ही मराठी माणसाच्या संस्कृती स्वभावाचाच भाग आहे असे भागवतांच्या आधारे म्हणता येते. आणि स्वभाव घडवण्यात ज्ञानेश्वरांचा मोठा वाटा आहे.

ज्ञानेश्वर व ज्ञानेश्वरी यासंबंधी महाराष्ट्रात बरेच वादविवाद झाले. माझ्या मगदुराप्रमाणे मी त्यात भाग घेतला. ‘त्रयोदशी’ हा माझा लेखसंग्रह या चर्चेबद्दलच आहे. पुढे या सर्व प्रक्रियेची परिणती मी लिहिलेल्या ज्ञानेश्वर चरित्रात (चार भावंडे) झाली.

या प्रभावामुळे मी स्वत:ला नशिबवान मानतो.

Tags: पुस्तकदिन वाचन मराठी साहित्य वाङ्मय संत साहित्य सदानंद मोरे ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सदानंद मोरे,  पुणे
sadanand.more@rediffmail.com

महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक अशी ओळख असलेल्या सदानंद मोरे यांची विशेष ओळख आहे ती इतिहास, तत्त्वज्ञान व संत साहित्य या विषयांवरील लेखनासाठी.


Comments

 1. Dattatraya- 23 Apr 2021

  डॉ. सदानंद मोरे यांचा ज्ञानेश्वरीवरील खूप छान आहे.

  save

 1. Dr More Babruwan- 23 Apr 2021

  Very nice Writting Dr Sadanand More Sir

  save

 1. MADHURA Kolte- 23 Apr 2021

  खूपच छान माहिती . खरे तर काही गोष्टींची , वास्तवाची कल्पना नव्हती. धन्यवाद

  save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके