डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

पुरोगामी चळवळींची धर्मविषयक भूमिका

धर्मासारख्या नाजूक बाबींवर बोलताना काळजीपूर्वक बोलले पाहिजे. पण ही पथ्ये पुरोगामी मंडळींना सांभाळता आली नाहीत. धर्म या बाबीकडे पाठ फिरवल्यामळे पुरोगामी धर्मामधील पुरोगामी आशयापासून वंचित झाले, जनसामान्यांपासून दुरावले, तुटले आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे प्रतिगाम्यांचेच हात बळकट झाले.

इ. स. 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. त्यापूर्वी जवळजवळ 1920 पासून ते हिंदू या भूमिकेतून हिंदू धर्मावर टीका करीत होते. ही त्यांची हिंदू धर्माची आंतरिक समीक्षा होती. याच काळात महात्मा गांधीही अस्पृश्यांची बाजू घेऊन हिंदू धर्मामधील सनातन्यांशी लढत होतेच. 1956 मधील आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर हिंदू धर्माची आंतरिक समीक्षा जवळजवळ संपुष्टात आल्यासारखे झाले.

आंबेडकरांच्या दलित अनुयायांनी हिंदू धर्माचा त्यागच केला होता. बौद्धेतर दलित जरी हिंदू धर्मात राहिले तरी त्यांचा दबाव तितका नव्हता. नंतर ज्या विचारवंतांनी हिंदू धर्माची समीक्षा केली, त्यांच्यापैकी बहुतेक जन्माने हिंदू असले, तरी पुरोगामी, बुद्धिवादी अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या वर्गातील होते. काहींना एकूणच धर्म या प्रकाराबद्दल आस्था नव्हती. काहींना आपण हिंदू असल्याची लाज वाटत होती. त्यामुळे या मंडळींनी हिंदू धर्मावर केलेली टीका गंभीरपणे घेण्याची, सर्वसामान्य हिंदू माणसाला आवश्यकता भासली नाही. त्यांचा तो एक बौद्धिक / वैचारिक खेळ आहे असे त्याला वाटले.

विशेष म्हणजे या अशा टीकाकारांची शैली महात्मा गांधींप्रमाणे सहानुभूतीने किंवा कळवळ्याने ओथंबलेली वाटत नसून विध्वंसक स्वरूपाची वाटे. धर्माची खिल्ली उडविण्यात त्यांना आनंद वाटतो असे चित्र निर्माण होई. खरे तर धर्मासारख्या नाजूक बाबींवर बोलताना काळजीपूर्वक बोलले पाहिजे. लोकांना विश्वासात घेतले पाहिजे. पण ही पथ्ये या मंडळीना सांभाळता आली नाहीत. आपली बांधिलकी लोकांशी असण्यापेक्षा स्वतःच्या वैचारिक कोषाशी, ‘बुद्धिवादी’ या आत्मप्रतिमेशी अधिक आहे असे वाटावे इतकी जणू त्यांनी खबरदारीच घेतली होती. तात्पर्य हे की, त्यांची हिंदू धर्मावरील टीका आंतरिक असली तरी त्यांनी घेतलेल्या विशिष्ट पवित्र्यामुळे ती बाहेरून केली गेलेली टीका आहे असे वाटत राहिले व तिचा फारसा उपयोग झाला नाही.

तळमळीविषयी शंका नाही 

प्रवाहविल्हेच सांगायचे झाले तर आंबेडकरवादी, समाजवादी, साम्यवादी, रॉयवादी, विवेकवादी अशी नावे घेता येतील. (यातील आंबेडकरवाद्यांना तूर्त चर्चेबाहेरच ठेवू या. कारण आता ते हिंदू राहिले नसल्यामुळे सर्वसामान्य हिंदू एक तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करील किंवा आपल्या धर्माचे विरोधक मानील.) या साऱ्यांना सोयीसाठी पुरोगामी असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या हेतूविषयी, कार्यनिष्ठेविषयी, तळमळीविषयी शंका घ्यायचे कारण नाही. पण एक महत्त्वाचा मुद्दा कार्यपद्धती हाही असतो हे लक्षात ठेवले पाहिजे. तुम्ही पत्करलेली कार्यपद्धती जर कार्यालाच बाधक ठरत असेल तर महत्त्व कार्याला देणार की पद्धतीला?

मला वाटते निदान धर्माच्या बाबतीत तरी त्यांनी कार्यापेक्षा कार्यपद्धतीला व तिच्यातून निष्पन्न होणाऱ्या आत्मप्रतिमेलाच जपण्याचा प्रयत्न केला. आत्मप्रतिमा जपताना ध्येय दुरावले तरी चालेल ही त्यांची वृत्ती राहिली. धर्माकडे पाहण्याची उपेक्षा, उपहास आणि उच्छेद यांच्यापैकी एखादी दृष्टी ते अंगीकारताना दिसतात. त्यामुळे या देशातील मोठ्‌या जनसमूहापासून ते तुटलेलेच राहिले. अर्थात असे का होते याची आत्मपरीक्षणात्मक चिकित्सा न करताना लोकांच्या अडाणीपणाला दोष देण्यातच त्यांनी समाधान मानले, मूर्ख लोकांना शहाणे करण्यासाठी आलेलो आपण जणू काही प्रेषितच आहोत (धर्माच्या क्षेत्रातील उपमा केवळ समजुतीसाठी घेतली आहे.) अशा समजुतीने ते वागत राहिले. इतकेच नव्हे तर आपली अल्पसंख्यात्मकता आणि अलगता हे आपले अलंकारच आहेत अशा प्रकारे मिरवीत राहिले.

प्रतिगाम्यांचा आपोआप फायदा पुरोगाम्यांच्या धर्मविषयक पवित्र्यांचा फायदा प्रतिगाम्यांना आपोआप मिळत राहिला व त्यांनी उठवलाही. जनसामान्यांच्या मनात पुरोगाम्यांची धर्मशत्रू (या संदर्भात हिंदू धर्माचे) अशी प्रतिमा रंगविण्यात प्रतिगामी यशस्वी ठरले व आपली अशी प्रतिमा निर्माण होण्यात आपल्या कार्यपद्धतीचा गौरव होत असला तरी कार्याचा मात्र नाश होईल ही शंका मात्र पुरोगाम्यांना कधी आली नाही. याचे एक उदाहरण पुरेसे आहे. श्रीरामाच्या नावाचा घोष करीत बाबरी मशीद पाडली गेल्यापासून राम हाच एक चर्चेचा मुद्दा ठरला आहे. त्यापूर्वी बाबासाहेबांच्या 'रिडल्स' पुस्तकाच्या वेळीही रामावर चर्चा झाली होतीच.

रामाच्या चरित्राची चिकित्सा करणे हा पुरोगाम्यांचा एक आवडता छंद आहे. त्यातून मग रामाची उत्तरेतील वसाहतवादी धर्माचा प्रतिनिधी, दक्षिणेतील मूळ रहिवाशांचा शत्रू, सीतेचा त्याग करणारा म्हणजेच स्त्रीवर अन्याय करणारा, शंबूकाची-शूद्राची हत्या करणारा, बालीला कपटाने यमसदनाला पाठवणारा इत्यादी - अशी रामाची एक प्रतिमा पुरोगाम्यांनी रंगवली. वस्तुतः सर्वसामान्य भारतीय माणूस रामाला पूज्य मानतो, तो वरीलपैकी एकाही गोष्टीसाठी नव्हे. एकपत्नी आणि एकवचनी पितृभक्त राम ही त्याची रामाची प्रतिमा आहे. गांधीजींनी जो राम पाहिला आणि ज्या रामराज्याची कल्पना केली ती याच प्रतिमेशी सुसंगत अशी. आता पुरोगाम्यांनी पुढे आणलेल्या मुद्यांपैकी काही सत्य असतीलही कदाचित, (बरेचसे वादग्रस्त आहेत) पण मुद्दा तो नाही. मुद्दा ॲकॅडेमिक चर्चेचा नाही. तुम्हांला जर लोकांविषयी आस्था आहे तर तुम्ही कोणता 'राम' घेऊन पुढे जाणार, हा खरा प्रश्न आहे. 

इथे आपण मुख्यत्वे बुद्धिवादी अ‍ॅकॅडेमिशियन आहोत की परिवर्तनवादी अ‍ॅक्टिव्हिस्ट आहोत, याचा निर्णय घेण्याची वेळ येते. दोन्हींपैकी एका भूमिकेचा त्याग करावा लागतो. निदान तिला गौण समजावे लागते. या भूमिका नेहमीच परस्परपूरक ठरतील असे नाही. शिवाय भारताच्या पुराणेतिहासातील घटना इतक्या विवादास्पद आहेत की त्यांच्या सत्यासत्यतेबद्दल आणि स्वरूपाबद्दल निश्चयात्मक निर्णय करणे खरोखर अवघड आहे. मग होते काय की, आपल्या स्वतःच्या सामाजिक/राजकीय भूमिकेला अनुसरून आपल्या बुद्धिवादाची चौकट कमीजास्त करण्यात येते. त्यात ऐतिहासिक साधनसामग्रीची ओढाताण केली जाते व या प्रक्रियेतून निघणारे निष्कर्ष सत्य असल्याचे जाहीर केले जाते. अगदी रामचरित्राचेच उदाहरण घ्यायचे म्हटले तरी त्या संबंधीच्या कम्युनिस्ट इतिहासकारांचा अन्ययार्य वेगळा, आंबेडकरवाद्यांचा वेगळा, शरद पाटलांचा आणखी तिसराच. भारतीय लोकमानसाच्या राम आणि रामराज्य यांच्यासंबंधीच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब तुकारामांच्या अभंगात पडले आहे - 

‘‘झाले रामराज्य काय उणे आम्हांसी।

धरणी घरी पीक गाई वोळल्या म्हैसी।।

राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविषे।

दळिता कांडिता जेविता गे बाइये।।

स्वप्नीही कोणी दुःख न देखे डोळा

रामाच्या गजरे भय सुटले काळा।।"

समृद्ध आणि दुःखमुक्त प्रजेचे राज्य ते रामराज्य, आणि समताविषमतेचा प्रश्न यात तर रामराज्य  

राम प्रजा लोकपाल एकचि सकळ दुजे नाही।।

मंगळावाचोन उमटेना वाणी ।।

अखंडचि खाणी एक राशी।।

मोडते हे स्वामी ठायाठाव।।

सेवा वाढवावा हेचा कोणा अंगे।।

तुका म्हणे अवघे दुमदुमिते देवे।।

उरले ते गावे हेचि आता।।

असा हा लोकशाहीला पोषक मामला आहे. 

चटवडीतला धार्मिक आशय 

धर्मचर्चेची परंपरा भारतात तशी फार पुरातन आहे. पण इतिहासात फार लांब जायची गरज नाही. आपण ब्रिटिशांच्या भारतामधील आगमनानंतरच्या काळाचाच विचार करू. ब्रिटिशांनी भारत जिंकल्यानंतर भारतात नव्याने धर्ममंथन सुरू झाले. त्याचे कारण असे की ब्रिटिशांनी आपल्यावर मात करण्याचे अंतिम कारण त्यांचा धर्म असला पाहिजे, म्हणून आता त्यांच्या धर्माच्या संदर्भात आपल्या धर्माचा विचार करायला हवा व त्याच्यात सुधारणा घडवून आणायला हवी, असे येथील धुरीणांना साहजिकपणे वाटू लागले. हा खोलवरचा विचार होता. नंतरच्या काळात इतिहासाचार्य राजवाड्यांनी पॉझिटिव्हिस्ट दृष्टीचा अंगीकार करून ज्याचे हत्यार अधिक सक्षम तो अधिक सक्षम असा निष्कर्ष काढून बाकीचे मुद्दे निकालात काढले.

सावरकरांनीही त्याचीच ‘री’ ओढून सक्षम हत्यारांच्या विद्येला म्हणजे विज्ञानाला महत्त्व दिले, हा भाग वेगळा. अगोदरच्या विचारवंतांची मांडणी, राजकीय आर्थिक अवनतीची कारणे सामाजिक अवनतीत व सामाजिक अवनतीची कारणे धार्मिक अवनतीत आहेत व म्हणून सुधारणेची सुरुवात धर्मसुधारणेपासून करायला हवी, अशी होती. बाळशास्त्री जांभेकर या आद्य जागरणकाराने म्हणून तर धर्मावर लक्ष केन्द्रित केले. बाळशास्त्र्यांच्याच तालमीत तयार झालेल्या दादोबा पांडुरंगांनी परमहंस सभा काढली. परमहंस सभेतूनच रानडे-भांडारकरांचा प्रार्थना समाज आणि महात्मा फुल्यांचा सार्वजनिक सत्यधर्म/सत्य समाज पुढे आले.

फुल्यांनी सामाजिक शोषणाचा रॅडिकल पद्धतीने विचार केला तो धर्माच्या चौकटीतच. न्या. रानड्यांनी तर भारताच्या पुनरुत्थानाचा विचार करताना नवी आर्थिक मीमांसा केली ती त्यांच्या धर्ममीमांसेला सोडून नव्हती. महाराष्ट्राच्या इतिहासाची त्यांनी लावलेली सरणीदेखील धर्माच्या चौकटीतील होती. (ती डॉ. आंबेडकरांनाही स्थूल मानाने मान्य होणारी होती.) इथेही त्यांचा प्रतिवाद झाला तो राजवाड्‌यांकडून आणि पॉझिटिव्हिस्ट दृष्टीनेच. सत्यशोधक समाजाच्या पहिल्या पिढ्या सार्वजनिक सत्यधर्माचे पालन त्यांच्या वकूबाप्रमाणे करीत होत्या. पुढे ही चळवळ प्रबळ अशी सामाजिक व विशेषतः राजकीय ब्राह्मणेतर चळवळ बनली तेव्हा तिच्यातीठ धार्मिक आशय दुर्लक्षित झाला.

स्वातंत्र्योत्तर काळातील पुरोगाम्यांमधील जो गट फुलेवादी म्हणून ओळखला जातो, किंवा जे कार्यकर्ते स्वतःला फुलेवादी मानतात, त्यांचेही या धार्मिक आशयाकडे प्राय: दुर्लक्षच असते. किंबहुना ती त्यांना आपल्या मार्गातील अडचणच वाटत असावी. मग ही मंडळी फुल्यांचा संकोच करून त्यांना आपल्यासारखे बनवू इच्छितात. त्यासाठी ‘निर्मिक’ या संकल्पनेची ओढाताण करून ती नास्तिकतेच्या जवळपास आणून सोडतात. फुल्यांचा निर्मिक आणि वैदिक परंपरेतील ईश्वर यांच्यातील भेद जमेस धरूनही फुले हे ईश्वरवादी होते व त्यांच्या सामाजिक कार्याचे प्रेरणास्थान त्यांची धर्मश्रद्धा होती हे नाकारण्यात काही हशील नाही. ईश्वरवादी धर्मश्रद्ध माणूस स्वभावतःच प्रतिगामी आणि निरीश्वरवादी निधर्मी मनुष्य स्वभावतः पुरोगामी अशी समीकरणे आकर्षक असली तरी बाळबोध आहेत. 

कष्टकऱ्यांना धर्माची गरज 

वैदिक परंपरेच्या संदर्भातही काही मुद्यांची चर्चा करायला हवी. विशेषतः महात्मा फुल्यांपासून वैदिक ब्राह्मणी एका बाजूला व अवैदिक अब्राह्मणी दुसऱ्या बाजूला असे चित्र उभे राहिले आहे व बहुतेक पुरोगाम्यांना ते मान्य असल्यासारखे दिसते. अर्थात फुले व्यवहारचतुर कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना दयानंद सरस्वतींसारख्याच कट्टरपंथीय वैदिकाबरोबर जायला काही अडचण आली नाही. ब्राह्मण, आर्य आणि वेद या सर्व गोष्टी दयानंदांमध्ये एकवटल्या असूनही फुल्यांनी त्या सहन केल्या याचा अर्थच मुळी फुले आत्मप्रतिमा आणि कार्यपद्धती यांपेक्षा कार्याला अधिक महत्त्व देत होते, हे स्पष्ट होते.

एकदा वेद आणि वैदिक यांना दूर ठेवायचे ठरवले म्हणजे वेदांना व वैदिकांना विरोध करणारा आपोआपच पुरोगाम्यांना जवळचा वाटणार हे उघड आहे. यातूनच पुरोगाम्यांची चावार्काशी जवळीक होते. त्यात परत वेद आणि ब्राह्मण यांचा संबंध प्रसिद्ध व चार्वाकाने ब्राह्मणांवरही टीका केलेती. मग पुरोगामी बुद्धिवाद्याबरोबर पुरोगामी बहुजनवादी इतकेच नव्हे, तर पुरोगामी आंबेडकरवादीही चार्वाकाच्या प्रेमात पडतात. ऐतिहासिक वस्तुस्थिती अशी आहे की या देशातील कष्टकरी, श्रमिक, बहुजन स्त्रीपुरुष कधीही चार्वाकाच्या मागे नव्हते व चार्वाकवाद्यांनीही कधी त्यांचे प्रतिनिधित्व केले नव्हते.

सामान्य माणसांच्या अडचणी, इच्छाआकांक्षा यांच्या बाबत चार्वाक अनभिक्त होते. मूठभर अनुभववादी, बुद्धिवादी, सुखवादी ब्राह्मणांची क्लबवजा कम्युनिटी असे चार्वाकांचे स्वरूप राहिलेले आहे. चार्वाक, बुद्ध असा वारसा सांगणाऱ्या काही आंबेडकरवाद्यांना, तत्कालीन बौद्धांना चार्वाकाचा जडवाद, सुखवाद व निधर्मवाद मान्य नव्हता, हे खरेच सांगायला हवे काय? कम्युनिस्टांशी आपले मतभेद व्यक्त करताना गरिबांना व कष्टकऱ्यांना धर्माची गरज असते हे आंबेडकरांनीच वारंवार प्रतिपादिले आहे. हेच प्रतिपादन त्यांनी चार्वाकांच्या संदर्भातही केले असते.

वेदांवर व वेदाध्ययनावर नियंत्रण प्रस्थापित करून ब्राह्मणांनी वर्चस्व गाजवले व आपल्या हितसंबंधांचे रक्षण केले हे खरे असले तरी वेद ही सर्वस्वी ब्राह्मणांची कृती म्हणणे चूक आहे. वेदांच्या निर्मितीमध्ये क्षत्रियांसह इतरांचाही समावेश आहे आणि निदान क्षत्रिय तरी ही सारी जबाबदारी ब्राह्मणांच्या डोक्यावर ठेवून उपरणे झटकू शकत नाहीत, खेरीज वेदांमध्ये चांगल्या गोष्टीही आहेत. उपनिषदांमधील ब्रह्मवादी तत्त्वज्ञानाची डॉ. आंबेडकरांनीही प्रशंसा केली आहे. वेदांचे सारे कर्तृत्व ब्राह्मणांना बहाल करणे म्हणजे त्यांना फारच मोठे करण्यासारखे आहे. अब्राह्मणांच्या कितीतरी चांगल्या कृतींचे श्रेय परस्पर ब्राह्मणांना देण्यात काय शहाणपणा आहे हे मला तरी समजत नाही.

पुरोगामी चळवळ व जातिव्यवस्था

पुरोगामी चळवळींमध्ये महाराष्ट्रामधील जातिव्यवस्थेचे प्रतिबिंब कसे पडले आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सुशिक्षित दलित तरुण इतिहासदत्त परिस्थितीमुळे चळवळीकडे खेचले जातात. इतर मागासवर्गीयांमध्ये मंडलोत्तर काळात बरीच जागृती झालेली दिसते. ब्राह्मणांचा विचार केला तर असे दिसते की त्यांच्यातील मोठी संख्या समाजकारण-राजकारणापासून अलिप्त व उदास आहे. राहिलेल्या अल्पसंख्येतील एक भाग प्रतिगामी कट्टरवादी तर दुसरा पुरोगामी. बरेच पुरोगामी ब्राह्मण आपल्या पूर्वजांनी केलेल्या उद्योगांचे ओझे विनाकारण आपल्या खांद्यावर क्रूसासारखे वाहत असतात. तो त्यांचा अपराधगंडच म्हणा ना. त्यामुळे अब्राह्मण विचारवंत, लेखक, कलावंत यांच्या प्रत्येक कृतीला त्यांचा पाठिंबा असतो.

अब्राह्मणांविषयी व विशेषकरून दलितांविषयी आपण काही बोललो, त्यांचे काही चुकते आहे असे प्रतिपादन केले तर आपल्या पुरोगामित्वाविषयी संशय घेण्यात येईल अशी भीती त्यांना वाटत असावी. आपल्यातले ब्राह्मण्य पार निपटून गेले आहे असे दाखविण्याची त्यांची धडपड चालू असते. त्यामुळे ब्राह्मणांवर एखादा खोटा आरोप केला गेला व तो खोटा असल्याची या पुरोगाम्यांची खात्री असली तरी तसे स्पष्ट सांगायला ते कचरतात. वस्तुतः आमचे पुरोगामित्व प्रमाणित करणारे तुम्ही कोण, किंवा संशयास्पद ठरवण्याचा अधिकार तुम्हांला कोणी दिला, असे विचारून त्यांनी अब्राह्मणांच्या चुकीच्या गोष्टींना चूकच म्हणण्याचे धैर्य दाखवले पाहिजे.

राजारामशास्त्री भागवत हा या बाबतीत त्यांचा आदर्श असायला हवा. भागवतांची सहानुभूती सत्यशोधकांना होती. साहाय्यही होते. शाहू छत्रपतींना आपली धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने होत नसून शूद्रोचित पुराणोक्त पद्धतीने होत आहेत ही जाणीव भागवतांनीच करून दिली व त्यातूनच पुढील महाभारत घडले. परंतु आवश्यकता भासेल तेये भागवत सत्यशोधकांचेही कान उपटायला मागेपुढे पाहत नसत. दुसऱ्या बाजूचे प्रतिगामी ब्राह्मण मात्र असल्या कोठल्याही दडपणापासून मुक्त असतात. त्यांच्या संघटनेतील अब्राह्मण त्यांना मनापासून मानतात. त्यांच्याविषयी शंका घेत नाहीत. त्यांना कोणतेही दिव्य करावे लागत नाही. पुरोगामी ब्राह्मणाच्या एखाद्या क्षुल्लक कृतीवरून किंवा वृत्तीवरून त्याची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते.

आतापर्यंतच्या सर्व तपश्चर्येवर पाणी पडू शकते. पुरोगामी चळवळीलील अब्राह्मणाचे पुरोगामित्व जणू स्वयंसिद्ध. स्वयंप्रकाशित व स्वतःप्रमाण. उलट पुरोगामी चळवळीतील ब्राह्मणाचे पुरोगामित्व त्याला वारंवार सिद्ध करावे लागते. उजळून घ्यावे लागते. त्याचे प्रामाण्य परतःप्रामाण्य होय. 1948 च्या गांधीहत्येच्या प्रसंगी ब्रांह्मणांच्या घरांची जाळपोळ वगैरे झाली. त्या वेळी असे विचित्र चित्र दिसले की कट्टर ब्राह्मणेतर शंकरराव मोरे या कृत्यांचा निषेध करतात, तर नानासाहेब गोरे समर्थन करतात! अब्राह्मण्याचे पुरोगामित्व जणू कवचकुंडलांसारखे जन्मसिद्ध, कर्णाप्रमाणे; ब्राह्मण्याला मात्र आपल्या पुरोगामित्वाची श्रावणी करावी लागणार!! आंतरजातीय विवाह करून घरात आलेली सून, सासरचे कुळाचार जपण्याचा प्रयत्न अधिक कसोशीने करते इतरांनी त्याविषयी थोडी बेफिकिरी दाखविली तरी त्यांच्याबद्दल कोणी शंका घेणार नसते.

ब्राह्मण पुरोगाम्यांच्या या मर्मस्थानाचा गैरफायदा अब्राह्मण पुरोगामी घेत नाहीत हे निदान मी तरी म्हणू शकणार नाही. अब्राह्मण पुरोगाम्याची बायको जत्रेत गेली तर तो लोकधर्म व ब्राह्मण पुरोगाम्याची बायको हळदीकुंकवाला गेली की ती पुरुषसत्ताक व्यवस्थेला शरण गेली म्हणायला सगळे तयारच. पुरोगामी चळवळीमधील मराठ्‌यांचे प्रमाण त्या मानाने बरेच कमी आहे. एका बाजूला ग्रामीण व सरंजामी वातावरणाचे संस्कार व दुसऱ्या बाजूला 1960 नंतर लागलेली राजकारणाची चटक ही त्याची कारणे असावीत. पुरोगामी चळवळीतील मंडळींना राजकारणासाठी वापरायचा धूर्तपणा मराठा नेत्यांमध्ये आहे, हा भाग वेगळा. मात्र त्याचबरोबर हेही खरे की मराठा समाज येथे बहुसंख्य असल्याने त्याला टाळून, डावलून वा त्याच्या विरोधी जाऊन चळवळ उभारणे ही अव्यवहार्य बाब आहे.

पुरोगाम्यांच्या धर्मविषयक प्रतिसादांचे वर्गीकरण तीन भूमिकांमध्ये करता येते. उपेक्षा, उपहास आणि उच्छेद. उपेक्षांमध्ये एक प्रकारचा तटस्थपणा असतो. धर्माकडे व धार्मिकांकडे दुर्लक्ष केले जाते. उपहास ही भूमिका तटस्थपणा सोडून धर्माची टिंगलटवाळी करू पाहते, धर्माला हास्यास्पद बनवू पाहते. धार्मिक लोक मूर्ख आहेत, अडाणी आहेत असा हा दृष्टिकोन आहे. उच्छेदवादी भूमिका मात्र एक पाऊल पुढे जाऊन धर्म ही बाबच नाहीशी करू पहाते. ती मानवी समाजाच्या उत्क्रांतीमधील एक प्राथमिक अवस्था आहे. एक अंधश्रद्धा आहे. अज्ञानातून निर्माण झालेली आहे.

विज्ञानाच्या विकासाबरोबर धर्मसंस्था नाहीशी होईल अशी उच्छेदवाद्यांची भूमिका असते. धर्मसंस्था कालबाह्य झाल्या असल्याचा पहिला पुकारा गोपाळ गणेश आगरकरांनी केला. आगरकरपूर्व समाजसुधारक धर्माच्या आधारे समाजसुधारणा करण्याच्या प्रयत्नात होते याचा उल्लेख यापूर्वी केलेला आहेच.

आगरकरांनी पाश्चात्त्य पंडितांनी पुढे आणलेल्या उत्क्रांतिवादी समाजशास्त्राच्या आधारे धर्मसंस्था मोडीत काढली. मात्र त्यांना आर्य संस्कृतीचा अभिमान होता व महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्माचा गाभा जो ईश्वर त्याच्या बाबतीत आगरकर नास्तिकतावादी नसून अज्ञेयवादी होते. म्हणजेच त्यांचा धर्मविरोध लटपटीत होता, परिपूर्ण नव्हता. त्यामुळे परिपूर्ण अशी धर्मविरोधी भूमिका विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात - कम्युनिस्टांनी आणि नवमतवाद्यांनी घेतली. कम्युनिस्टांचा धर्मविरोध ज्या तत्त्वज्ञानातून निष्पन्न झाला तो कार्ल मार्क्सचा विचार त्याच्या समकालीन युरोपिअन अनुभववादाच्या आणि बुद्धिवादाच्या पेक्षा वेगळा होता. म्हणून तर मिल आणि कांट ही आगरकरांची श्रद्धास्थाने मार्क्सच्या टीकेची लक्ष्ये होती.

धर्माची पुरेशी चिकित्सा

मार्क्सची धर्मचिकित्सा ही अधिक गंभीर आहे. किंबहुना धर्माची चिकित्सा ही सर्व चिकित्सेची सुरुवात आहे असे मार्क्स म्हणतो. मार्क्सने धर्मसंस्थेचे विश्लेषण करून तिचे आर्थिक स्वरूपही स्पष्ट केले. धर्म ही अफूची गोळी आहे हे त्याचे प्रसिद्ध वाक्य नेहमी उद्धृत केले जाते, परंतु संदर्भ सोडून, हेगेलच्या नीतितत्त्वाची समीक्षा करणाऱ्या ग्रंथात हे वाक्य येते. तेथे मार्क्स धर्माची सकारात्मक कामेही स्पष्ट करतो. धर्म हे शोषितांच्या लक्ष्यातले हत्यार बनू शकते हे त्याने सूचित केले आहे. जेव्हा असा लढा शक्य नसतो तेव्हा धर्म शोषितांच्या दुःखाची अभिव्यक्ती होतो; आणि जेव्हा तेही शक्य नसते तेव्हा शोषणाची तीव्रता कमी करणारी भूल देतो.

शोषितांच्या अस्तित्वाचीच ही गरज आहे असे त्याला म्हणायचे आहे. अर्थात धर्मामुळे व्यवस्थेला एक पावित्र्यवलय प्राप्त होते व तिचे रक्षण होते हेही सांगायला मार्क्स विसरत नाही. थोडक्यात, मार्क्सला धर्माचे स्वरूप किती जटिल आहे याची जाणीव होती. विशेषतः ख्रिश्चन धर्माची पुरेशी चिकित्सा मार्क्सच्या पूर्वसूरींनी केलेली होती. अशा प्रकारची धर्मचिकित्सा भारतात झालेली आहे, असे म्हणता येते काय? ही जबाबदारी इथल्या मार्क्सवाद्यांनी टाळली. 

अल्युसर या युरोपिअन मार्क्सवाद्याने मार्क्सची धर्ममीमांसा युरोपकेन्द्री व म्हणून अपुरी असल्याचे लक्षात आणून देऊन आशिया खंडात धर्म युरोपातल्याप्रमाणे विचारप्रणालीच्या इमारतीचा भाग नसून तो आर्थिक पायाचा हिस्सा राहिल्याचे प्रतिपादन केले. उत्पादनव्यवस्था टिकविण्यासाठी उत्पादनसंबंधांचे पुनरुत्पादन करण्यावी आवश्यकता असते. आशियाई देशांत हे कार्य धर्म करतो. भारतातील मार्क्सवाद्यांनी धर्म ही बाब पुरेशा गंभीरपणे घेतलेली नाही. दि. के. बेडेकरांसारखा एखादा अपवाद सोडला तर बराच विचार यांत्रिक पद्धतीने झालेला असल्याचे दिसते.

मार्क्सवादातूनच फुटून निघालेल्या रॉयवादाबद्दलही असेच म्हणावे लागते. रॉयवादाचे अध्वर्यू तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आयुष्याच्या संध्याकाळी अज्ञेयवादाकडे झुकत होते. मुद्दा व्यक्तींचा नाही. धर्म ही एक अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीची बाब आहे. समाजजीवनातील एक अत्यंत प्रभावी घटक आहे. त्याचा पुरोगाम्यांनी पुरेशा गांभीर्याने विचार केला नाही. बुद्धिवाद, अनुभववाद आणि विज्ञान यांच्याशी धर्म विरोधी आहे अशी त्यांची समजूत झाली व आपली एवंगुणविशिष्ट प्रतिमा जपण्यासाठी या प्रभावाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व त्याच्यावर प्रहार करीत राहिले. नेमका याचाच फायदा प्रतिगाम्यांनी उठवला.

विशेषतः ज्या पुरोगामी मंडळींचा सक्रिय राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध आहे त्यांना या डोळेझाकीचे प्रत्यक्ष फटके बसले आहेत. पण तरीही ते अद्याप डोळे उघडायला तयार नाहीत. ह्या विशिष्ट दृष्टिकोनामुळे आपण धर्मावर टीका करू शकतो तो पाश्चात्त्य विचारविश्वातून आल्यामुळे आपल्या परंपरेत धर्माची समीक्षा करायला वावच नाही किंवा दृष्टिबिंदूही नाही असाच अनेकांचा समज असतो, परंतु तो चुकीचा आहे. धर्मसंस्था आणि विशिष्ट धर्म यांच्यावर टीका करण्याची प्रथा आपल्याला नवी नाही. उदाहरण म्हणून एकनाथांचे काही विचार सांगता येतील.

‘धर्म हा म्हणजे एक धवल बैल आहे,’ असे रूपक करून एकनाथ त्याचे स्वरूप स्पष्ट करतात. धर्माचे ते खोटे, उफराटे, आव्हाटे आणि पोटे असे प्रकार करतात. हे प्रकार म्हणजे शुद्ध धर्म नव्हे. लांड्यालबाड्‌या करून मिळवलेले धन दान करणे, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यातून पैसे मिळविणे, प्रसिद्धी व प्रतिष्ठा वाढण्यासाठी धार्मिक आचरण करणे, पोट भरण्यासाठी धर्म वापरणे अशा वेगवेगळ्या उदाहरणांचा ते येथे उल्लेख करतात. तेच धर्माची आर्थिक, वाचिक, शारीरिक आणि मानसिक अंगे असतात असे स्पष्ट करून त्यातील मानसिक अंग सात मुख्य असून इतर अंगे गौण असल्याचे सांगतात.

एकनाथांच्या काळात हिंदू आणि मुसलमान यांच्यातील वैमनस्य वाढले होते. दोघेही आपलाच धर्म श्रेष्ठ असे मानून दुसऱ्याला तुच्छ लेखायचे, एकनाथांनी 'हिंदु-तुर्क संवाद' नावाचे एक प्रयोगक्षम भारूड रचले. या भारुडात मुसलमान हिंदू धर्मातील व्यंगांवर बोट ठेवतो तेव्हा हिंदू अशाच प्रकारची व्यंगे इस्लाममध्ये सुद्धा आहेत हे साधार पटवून देतो. शेवटी दोघांनाही आपली चूक उमगते, ते एकमेकांना आलिंगन देतात; अशी या संवादाची रचना आहे. ग्रहण नावाच्या एका रचनेत एकनाथ राहू सूर्याला मिळतो या कल्पनेची टर उडवतात. हे ते धर्माच्या चौकटीत राहून करू शकतात.

धर्म या बाबीकडे पाठ फिरवल्यामुळे पुरोगामी, धर्मामधील पुरोगामी आशयापासून वंचित झाले. जनसामान्यांपासून दुरावते, तुटले आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे प्रतिगाम्यांचेच हात बळकट झाले असे माझे निरीक्षण आहे. मग पुरोगाम्यांनी स्वतःच्या विचारांशी प्रतारणा करून धर्म मानणाऱ्या लोकांचा अनुनय वगैरे करावयाचा की काय, अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यांची उत्तरे माझ्याकडे असतीलच असे नाही. मी फक्त एवढीच अपेक्षा करू शकतो ज्या कृतीमुळे प्रतिगामी नसलेले सर्वसामाम्य लोक प्रतिगाम्यांकडे खेचले जातील अशा कृती तरी त्यांनी टाळाव्यात.

Tags: जातिव्यवस्था पुरोगामी चळवळ धर्माची गरज पुरोगामी प्रतिगामी धर्मचर्चा वैचारिक caste system progressive movement need for religion progressive reactionary religion discussion ideological weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सदानंद मोरे,  पुणे
sadanand.more@rediffmail.com

महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक अशी ओळख असलेल्या सदानंद मोरे यांची विशेष ओळख आहे ती इतिहास, तत्त्वज्ञान व संत साहित्य या विषयांवरील लेखनासाठी.


Comments

 1. Nilesh- 19 Jul 2021

  हा लेख म्हणजे फक्त आणि फक्त बुद्धिभेद आहे...सामाजिक, वैज्ञानिक, तार्किक, ऐतिहासिक etc.. असल्या कुठल्याच कसोटीवर हा लेख खरा उतरत नाही... अतिशय सुमार दर्जाचे विषयाचे आकलन आणि लेखन...

  save

 1. Dilip Ingole- 15 Nov 2021

  योग्य विश्लेषण केले.

  save

 1. Dilip Ingole- 15 Nov 2021

  योग्य विश्लेषण केले.

  save

 1. Dilip Ingole- 15 Nov 2021

  योग्य विश्लेषण केले.

  save

 1. Dilip Ingole- 15 Nov 2021

  योग्य विश्लेषण केले.

  saveसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके