Diwali_4 यहुदी
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

इतर कोणत्याही (धार्मिक धरून) भावनेपेक्षा प्रेमभावना ही मूलभूत मानवी भावना असून, इतर भावनांवर मात करायचे सामर्थ्य या भावनेत असल्याचा प्रत्यय ‘यहुदी’ चित्रपट आणून देतो.

चित्रपट हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य हिस्सा होऊन बसला आहे. आता एखाद्याने आपण चित्रपट बघणारच नाही, असे हट्टाने ठरवले; तर तो त्यापासून दूर राहू शकेल, नाही असे नाही. पण त्यामुळे तो कलेमुळे मिळणाऱ्या आनंदाला मुकेल, हे वेगळे सांगायला नको; मात्र मुद्दा फक्त आस्वादाचा व कलानंदाचा नाही. चित्रपटांतून दिसून येणाऱ्या गल्लाभरू, बाजारू वृत्तीचे तोटे गृहीत धरूनही त्यांतून होणाऱ्या जीवनदर्शनाकडे काणाडोळा करता यायचा नाही. वाचनाला जसे आपण महत्त्व देतो, तसेच चित्रपटालाही दिले पाहिजे.

 वाचनाची आवड तर मला लहानपणापासूनच होती. या वाचनात वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांचाही समावेश होता. चित्रपटांचा आणि माझा पहिला परिचय झाला तो वर्तमानपत्रांतील जाहिरातींमुळे व चित्रपट परीक्षणांमुळे. आमच्या देहूगावात सिनेमा थिएटर नसले, तरी तेव्हा लक्ष्मी आणि सुरेश या दोन टुरिंग टॉकीज अधून-मधून आमच्या गावी येत असत. या टॉकीजमध्ये जुन्या काळातील मराठी व हिंदी सिनेमे दाखवले जायचे. त्यामुळे एक वेगळेच दालन खुले होऊ शकले.

देहू गावात चित्रपटगृह नसले, तरी देहू रोड येथील कॅन्टोन्मेंटमध्ये लष्करी जवानांसाठी ‘डिफेन्स’ नावाचे चित्रपटगृह होते. त्याचे दर विद्यार्थ्यांना परवडणे अवघडच होते. मग तीन मैल पायी जाऊन पायीच यायचे व अशी बचत करून सिनेमे पाहायचा उपक्रम सुरू झाला. समवयस्क मित्रमंडळी अर्थातच बरोबर असायची. मग त्यांच्याबरोबर चर्चा, वाद-विवाद व्हायचे. रुचिवैचित्र्य अर्थातच होते. कोणाला शम्मी कपूर आवडायचा, तर कोणाला डायलॉगबाजीमुळे राजकुमार (नंतर त्याची जागा शत्रुघ्न सिन्हाने घेतली.) माझ्या वाचनामुळे, नाही म्हटले तरी माझ्या अपेक्षा व अभिरुचीची पातळी आपोआप वाढली आणि हायस्कूलात असतानाच दिलीपकुमार हा सर्वश्रेष्ठ नट असल्याच्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो. त्यामुळे मी माझ्या मित्रमंडळींत एकटा पडलो, हे वेगळे सांगायची गरज नाही.

पुढे मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याला जाणे अटळच होते. मग पदवी घेता-घेता सिनेमाचा बॅकलॉग भरून काढायचे काम निष्ठापूर्वक सुरू झाले. एका दिवसात दोन किंवा प्रसंगी तीन सिनेमे पाहणे, हा अपवाद नव्हता! विशेषत: जुन्या सिनेमांसाठी मॅटिनीची सोय होती. देव आनंद हा मॅटिनी शोचा हुकमी एक्काच. करमणुकीसाठी देव आणि दर्जेदार अभिनय पाहायचा असेल तर दिलीप, असा तेव्हाचा संकेत होता... या प्रक्रियेत दिलीपकुमारचे जुने सिनेमे पाहून झाले. त्यांतील एक ‘यहुदी’.

‘यहुदी’ ही दिलीपची 1958 मध्ये प्रदर्शित झालेली फिल्म. विशेष म्हणजे, त्याच दरम्यान ‘मधुती’ही प्रदर्शित झाला होता. या दोन्ही सिनेमांनी रौप्यमहोत्सव साजरा केला असला, तरी नंतरच्या काळात ‘मधुती’ जितका चर्चेत राहिला, तितका ‘यहुदी’ राहिला नाही... दिलीप 1958 पर्यंत ट्रॅजेडीकिंग म्हणून ओळखला जाऊ लागला असला, तरी ‘आझाद’, ‘नया दौर’ असे वेगळ्या पठडीतील चित्रपट देऊन त्याने आपले अष्टपैलुत्वही सिद्ध केले होते. तथापि, त्याला मान्यता होती ती मुख्यत्वे शोकात्म नायक म्हणून. नायकाची ही शोकांतिका नायकाने नायिकेसाठी केलेल्या त्यागातून व सहन केलेल्या क्लेशातून सहसा आकार घेत असे. कधी-कधी यासाठी नायक-नायिकेत जणू चुरसच लागायची!

‘यहुदी’ची निर्मिती बॉम्बे टॉकीजचे मालक वाच्छा यांची होती. या कथानकावर न्यू थिएटर्सने ‘यहुदी की लडकी’ नावाचा चित्रपट त्यापूर्वी काढला होता. (त्यातील सोहराब मोदी नव्या ‘यहुदी’तही होते.) वाच्छा या कथानकाच्या प्रेमात इतके पडले होते की, त्यांनी कॉलेजमध्ये असताना त्याचे नाटकही केले होते. विशेष म्हणजे ‘मधुती’चे दिग्दर्शक बिमल  रॉय हेच ‘यहुदी’चेही दिग्दर्शक होते. मात्र, मधुती ही स्वत: बिमलदांचीच निर्मिती होती.

युरोपच्या इतिहासात ख्रिश्चन आणि यहुदी (म्हणजे ज्यू) यांच्यातील संघर्ष प्रसिद्ध आहे. या दोन्ही धर्मांचे केंद्र असलेला (आजच्या) इस्रायलचा प्रदेश येशूच्या काळात रोमन साम्राज्याचा भाग होता. ख्रिस्ताला सुळावर दिले गेले ते रोमन राज्यकर्त्यांकडून आणि पारंपरिक यहुदीनिष्ठेच्या लोकांच्या चिथावणीवरून. ख्रिस्ती धर्माची तेव्हा नुकतीच सुरुवात होत होती आणि रोमन राज्यकर्त्यांना दोन्ही धर्म समानच होते. तथापि, नंतर रोमन सम्राटानेच ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यामुळे सर्वच समीकरणे बदलली व संघर्षाचे स्वरूप यहुदी विरुद्ध रोमन असे फक्त राजकीय न राहता त्याला धार्मिक अस्तरही लागले.

यहुदी लोकांचा कितीही छळ झाला असला, तरी ते होते श्रीमंत. व्यापार व सावकारी करणाऱ्यांची ही जमात. एझरा हा असाच एक हिऱ्यांचा व्यापारी. त्याचा छोटा मुलगा इलिया रस्त्यावर खेळत असताना त्याने भिरकावलेला दगड रोमन सरदार ब्रूट्‌स याला लागतो. गुलामाकडून झालेला हा अवमान सहन न झाल्याने ब्रूट्‌स त्या मुलाला वाघाच्या तोंडी द्यायची सजा फर्मावतो. इलियाच्याच वयाची हन्ना या ब्रूट्‌सच्या मुलीची रदबदली अंतिमत: निष्फळ ठरते. इकडे चिडून गेलेला जालिम नावा ज्यू हन्नाचे अपहरण करून तिला एझराच्या ताब्यात देतो. हेतू हा की, एझराने तिची हत्या करून आपल्या मुलाच्या हत्येचा सूड घ्यावा; परंतु सत्प्रवृत्त एझरा तसे न करता उलट हन्नाला पोटच्या मुलीसारखे वाढवतो. अर्थात, आता ती वाढते यहुदी म्हणून! तिच्यावर तसेच संस्कार होतात.

हन्ना मोठी होऊन वयात येते. (तरुण हन्नाची भूमिका मीनाकुमारी करते.) रोमन सम्राटाची अशी इच्छा असते की, युवराज मार्क्‌स आणि भाची ऑक्टोव्हिया यांचा विवाह व्हावा. हा शाहजादा माकर्‌स (म्हणजे दिलीपकुमार) ऑक्टोव्हियाच्या वाढदिवसासाठी निघाला असता अपघातात जखमी होतो. हन्ना त्याला मदत वगैरे करते. शुद्धीवर आल्यावर तो हन्नाच्या रूपसौंदर्यावर मोहित होतो. ती तिथून निघून गेल्यावर तिच्या शोधात भटकतो. बाजारात रोमन सैनिक तिची छेडछाड करताना पाहून तो त्याला ठार मारतो व हन्नाची सुटका करतो. हन्नाला घेऊन एझराच्या घरी येतो व आपण यहुदीच असल्याची ओळख सांगतो. नाव मन्शिया. मात्र, त्याचे हे सोंग फार काळ टिकत नाही. तो रोमन असल्याचे स्वत: हन्नाचाच लक्षात येते. संतापलेला एझरा पुढे शांत होतो. इतकेच नव्हे, तर त्या दोघांचे लग्न लावून द्यायलाही तयार होतो; पण त्यासाठी माकर्‌सने यहुदी धर्माचा स्वीकार करावा, अशी अट घालतो. ती मार्क्‌सला मान्य नसते. मग तो नाइलाजाने ऑक्टोव्हियाशी विवाह करण्यास  उभा राहतो. हन्ना तेथे येऊन त्याने यहुदी असल्याचे नाटक करून आपल्याला फसवल्याचा आरोप करते. मार्क्‌स हा आरोप मान्य करतो. त्यातून त्याला मृत्युदंड होईल, हे कदाचित तेव्हा तिला माहीत नसावे; पण ऑक्टोव्हियाकडून ते समजल्यावर ती कोर्टात येऊन आपण खोटा आरोप केल्याचा कबुलीजबाब देते. परिणामत: मार्क्‌सची निर्दोष मुक्तता होऊन एझरा व हन्ना यांना उकळत्या तेलात टाकण्याची सजा जाहीर होते; पण तरीही आपणच दोषी असल्याच्या आग्रहावर ठाम राहून हन्नाची सुटका करायची विनंती मार्क्‌स करतो. ब्रूट्‌सने ती फेटाळल्यावर तो उघड बंड पुकारतो. त्याला अटक केली जाते. त्याच कारागृहात हन्नाला उकळत्या तेलात टाकायचे असते. ते दृश्य पाहायलाच नको, म्हणून आपल्या डोळ्यांत स्वत:च्या हाताने काहीएक जहरी द्रव टाकून मार्क्‌स स्वत:ला अंध करतो. (यापूर्वीच्या ‘दीदार’ चित्रपटातही दिलीपने स्वत:ला अंध करून घेतले होते.)

इकडे हन्ना व एझराला तेलात टाकायची तयारी सुरू असताना हन्नाच ब्रूट्‌सची मुलगी असल्याचा गौप्यस्फोट एझरा करतो, तेव्हा ब्रूट्‌सही कोलमडतो. त्याला आनंद तर होतोच; पण हन्नाची सुटकाही करण्यात येते. दरम्यान, अंध झालेला राजपुत्र मार्क्‌स तेथे पोहोचतो. तो आणि हन्ना राज्य सोडून प्रकाशाच्या दिशेने चालू लागतात व चित्रपट संपतो. चित्रपटात दिलीप आणि मीनाकुमारी यांनी आपापल्या कीर्तीला साजेल असा अभिनय केला आहे. बिमलदांच्या कलात्मक दिग्दर्शनामुळे चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर जातो. चित्रपटगृहात सुन्न करणारा सन्नाटा पसरतो.

‘ये मेरा दिवानापन है, या मुहब्बत का सुरूर

तू न पहचाने तो ये है, तेरी नजरोंका कसूर’

हे या सिनेमातील मुकेशने गायलेले गीत तेव्हा खूपच लोकप्रिय झाले होते. मुकेशचा दर्दभरा आवाज आणि दिलीपचा काळजाला हात घालणारा अभिनय- लाजवाब. इतर गाण्यांच्या चालीही चांगल्याच होत्या. संगीतकार शंकर-जयकिशन. सोबत हेलनची नृत्ये.

मला प्रभावित करणारे घटक खुद्द चित्रपटातच पुरेसे होते, हे आता वेगळे सांगायची गरज नाही. अभिनय, दिग्दर्शन, संगीत, नृत्य अशा सर्वच बाबी समाधान देणाऱ्या होत्या, यात शंका नाही.

पण त्यापलीकडे जाऊन चित्रपट दोन संस्कृतींमधील व धर्मांधील संघर्ष दाखवतो. या प्रकारचा संघर्ष थेट हिटलरपर्यंत सुरूच होता. युरोपमधील हा मूलभूत संघर्ष होय. आज युरोपात ज्यू-द्वेषाची लाट बऱ्यापैकी ओसरली असली, तरी मुसलमान आणि ज्यू यांच्यातील संघर्षाने त्याची जागा घेतली आहे.

इतर कोणत्याही (धार्मिक धरून) भावनेपेक्षा प्रेमभावना ही मूलभूत मानवी भावना असून, इतर भावनांवर मात करायचे सामर्थ्य या भावनेत असल्याचा प्रत्यय ‘यहुदी’ चित्रपट आणून देतो. पुत्रवधाचा बदला घेण्याचे बाजूला ठेवून एझरा शत्रूच्या मुलीचा ज्या ममत्वाने सांभाळ करतो, त्याने पितृभावनेचे सार्वत्रिकीकरण होते, असे म्हणायला हरकत नाही. (प्रसिद्ध अमेरिकन नाटककार ऑर्थर मिलरच्या ‘ऑल माय सन्स’मध्ये तर हे सार्वत्रिकीकरण पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळते.) या बाबतीत धर्म आड येत नाही, हे महत्त्वाचे.

हीच गोष्ट नायक-नायिकेच्या प्रेमाच्या बाबतीतही सत्य आहे. रोमन असलेला मार्क्‌स राजपुत्रसुद्धा आहे. हन्ना यहुदी व गरीब, परंतु धर्म वा आर्थिक दर्जा प्रेमापुढे तुच्छ ठरतात.

आणखी एक मुद्दा जणू तळाशी दडला आहे. हन्नाला एझराने यहुदी म्हणून वाढवले, पण मुळात ती यहुदी नसतेच. तिला शेवटी ती यहुदी नसल्याचे कळते; पण त्यामुळे तिच्यात काही फरक पडत नाही. म्हणजेच, व्यक्तीच्या ‘आयडेंटिटीत’ येथे धर्म गौण ठरतो. ‘क्ष’ किंवा ‘य’- काही फरक पडत नाही, अशा प्रकारचा ‘व्हेरिएबल’ ठरतो.

प्रेमाचे सामर्थ्य सांगणारा हा चित्रपट आहे. याला शोकांतिका म्हणावे, तर शेवटी नायक-नायिकेचे मीलन तर सूचित आहे; पण म्हणजेच प्रेमाची कसोटी पाहिली जाते. प्रेमात त्याग करावा लागतो, क्लेश सहन करावा लागतो, साऱ्या दुनियेचे शत्रुत्व पेलावे लागते. प्रेम अस्सल असेल, तर ते सर्व अडथळ्यांना-अडचणींना पुरून उरते. प्रेयसीविषयीची स्वामित्वाची भावना प्रसंगी विकृतीचे रूप धारण करू शकते, हे आपण पाहत असतोच. प्राप्त न होणाऱ्या प्रेयसीच्या तोंडावर ॲसिड फेकून तिला विद्रूप करणे या विकृतीची; प्रेयसीच्या वेदना पाहायला लागू नयेत, म्हणून प्रियकराने आपल्या डोळ्यांत ॲसिड टाकून स्वत: दृष्टिहीन होणे- याच्याशी तुलना करा. प्रेमाची महती सांगणाऱ्या या चित्रपटाचा प्रभाव पडला नाही, तरच नवल!

Tags: बिमल रॉय मीनाकुमारी दिलीपकुमार सदानंद मोरे यहुदी फिल्म सिनेमा film cinema Bimal Roy Meenakumari Dilipkumar Marcus Hannah Sadananda More Yahudi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सदानंद मोरे,  पुणे
sadanand.more@rediffmail.com

लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात