डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उंबरठ्याचे सांस्कृतिक महत्त्व हे असे आहे आणि बऱ्याच प्रमाणात ते सांकेतिक- सांस्कृतिक आहे. उंबरा नावाची भौतिक वस्तू अस्तित्वात उरली नाही तरी एक सांस्कृतिक सांकेतिक वस्तू म्हणून बराच काळ ती अस्तित्वात असेल. उंबऱ्यामुळे घराच्या आतील विश्व आणि घराच्या बाहेरील विश्व ही विभागणी शक्य होते. आपल्या विचारविश्वात देहलीदीपक न्याय प्रसिद्ध आहे. दिवा घरात लावला तर त्याचा प्रकाश फक्त घरातच पडेल. तो घराबाहेर ठेवला तर घराबाहेरच्या वस्तू दिसू लागतील, पण तो उंबरठ्यावर ठेवला तर त्याचा प्रकाश घरातही पडेल व घराबाहेरही पडेल. 

घर ही माणसाच्या जीवनामधील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा यांना मनुष्यप्राण्यांच्या मूलभूत गरजा मानण्याची पद्धत आहे, यावरूनच घराचे महत्त्व स्पष्ट झाले. घर ही तशी भौतिक रचना म्हणावी लागेल, पण घर म्हणजे या भौतिक रचनेपेक्षा अधिक काहीतरी असते. घर बांधणाऱ्याची आर्थिक परिस्थिती, बांधणारे व राहणारे ज्या समाजात राहतात त्या समाजामधील तंत्रज्ञानाची व वास्तुशास्त्राची पातळी यावरून घर या भौतिक वस्तूचे स्वरूप ठरते. 

भौतिक रचनेपेक्षा अधिक काहीतरीची कल्पना स्पष्ट करण्यासाठी इंग्रजी भाषेतील सर्वपरिचित शब्दांचा आधार घ्यायला हरकत नसावी. इंग्रजीत ‘House‘ आणि ‘Home‘ या दोन्ही शब्दांनी एकाच भौतिक वस्तूचा निर्देश होते. परंतु तरीही त्याच्या अर्थांत फरक आहे. ‘House‘ शब्दाने फक्त भौतिक वस्तूचाच निर्देश होतो तर ‘Home‘ शब्द भौतिक वस्तूचा म्हणजेच वास्तूचा अंतर्भाव करून त्या वास्तूत राहणाऱ्या लोकांचीही दखल घेतो. ‘Home‘ मध्ये राहणाऱ्या लोकांच्या समूहाला कुटुंब असे म्हणतात. यात एकमेकांशी रक्ताचे नाते असते व भावनिक बंधही असतात. त्यांनी एकमेकांशी कसे वागावे याचे काही संकेत असतात. काही संकेत जीवशास्त्राने निश्चित झालेले असतात, तर काही संकेत सांस्कृतिक स्वरूपाचे असतात. ते कुटुंब ज्या सांस्कृतिक समूहाचा भाग असते त्याच समूहाच्या संस्कृतीचा ते भाग असतात. 

घराच्या कल्पनेचा विस्तार होतो तेव्हा घराच्या भौतिकतेचा संदर्भ गळून पडलेला असतो. स्वदेशाला ‘Homeland‘ म्हणायचा संकेत आहे, पण येथे कोणत्याही बांधकामाचा प्रश्नच उद्‌भवत नाही. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्‌गीतेच्या बाराव्या अध्यायातील भक्तांच्या लक्षणाच्या वर्णनातील ‘अनिकेत’ या शब्दाचा अर्थ लावताना कमालच केली. ‘अनिकेत’ शब्दाचा शब्दश: अर्थ ज्याला घर नाही असा होईल, पण तो नकारात्मक झाला. ज्ञानेश्वरांना तो भावात्मक करायचा आहे. मग त्यांनी लिहिले ‘हे विश्वचि माझे घर। ऐसी मती जयाची स्थिर। किंबहुना चराचर। आपण जहाला।।’ येथे घराच्या भौतिकतेचा मागमूसही नाही. भक्त चराचराशी एकरूप होण्याच्या अद्वैतानुभवाची ही आलंकारिक अभिव्यक्ती आहे. अध्यात्मातील अशाच परमोच्च अवस्थेचे वर्णन करताना तुकोबांनी ‘निरंजनी आम्ही बांधलेसे घर’ असे म्हणून घर कल्पनेच्या सर्वोच्च प्रातिभ आविष्काराचे जणू दर्शन घडवले. आपल्याला गूढ अशा आध्यात्मिक क्षेत्रात शिरायचे नाही व व्यक्तिश: माझा तो अधिकारही नाही. आपण घराच्या संबंधातील सांस्कृतिक संकेतांची चर्चा करीत होतो व ती लौकिक पातळीवर. त्यासाठी इंग्रजीचा आधार घेतला. 

मराठी भाषेतील अगदी अलीकडील उदाहरण द्यायचे झाले तर एका बांधकाम व्यावसायिक कंपनीचे देता येईल. ही कंपनी आपली जाहिरात करताना ‘घराला घरपण देणारी माणसं’ अशी करीत असते. या जाहिरातीत सदर कंपनीला आपण करीत असलेल्या भौतिक तरतुदी वा सुखसोयी अभिप्रेत नाहीत. त्या तर सर्वच बांधकाम व्यावसायिकांना कराव्या लागतात. येथे ही कंपनी घरात राहणाऱ्या लोकांचे सांस्कृतिक भावविश्व जपण्याचे आश्वासन देत आहे. (उदाहरणार्थ- घराला अंगण असेल, अंगणात तुळशी वृंदावन असेल, सोसायटीत छोटे का होईना सभागृह असेल इत्यादी...) 

विज्ञान तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने घरबांधणीची पद्धत बदलते. अभियंते मंडळी नेहमीच काहीतरी नवे करायच्या नादात असतात. वाडा, चाळ, बंगला, फ्लॅट अशी अनेक स्थित्यंतरे गेल्या शतकभरात आपण अनुभवली आहेत. या भौतिक स्थित्यंतरांबरोबर सांस्कृतिक स्थित्यंतरेही होत गेली. फ्लॅटचा संबंध कुठेतरी व्यक्तिवादी विचारप्रणालीशीसुद्धा पोहोचतो हे सहसा कोणी अमान्य करणार नाही. मार्क्सवादी पद्धतीने संगती लावायची झाल्यास सर्व प्रकारच्या सांस्कृतिक स्थित्यंतरांना ‘आयडियॉलॉजी’ नावाच्या इमल्याचा भाग समाजात असलेल्या आर्थिक (किंवा उत्पादनव्य वस्थेच्या) पायावर उभा असतो असे म्हणावे लागेल. इमल्याचे स्वरूप पायाने नियंत्रित होते, पायाचे इमल्याने नाही; असे म्हणून मार्क्सवादी मंडळी सांस्कृतिक घटितांचे अतिसुलभीकरण करताना आढळतात. अर्थात, हा प्रमाद सुरुवातीच्या काळात अतिउत्साहामुळे घडला असल्याचे खुद्द एंगल्सने नंतर कबूल केले होते. आर्थिक, भौतिक पायाची परतंत्र सावली एवढेच आयडियॉलॉजीचे स्वरूप नसून आयडियॉलॉजीचा हा इमला काही प्रमाणात तरी स्वायत्त असतो व तेवढ्या प्रमाणात तो आर्थिक पायावर परिणामही करू शकतो हे एंगल्सने मान्य केले. मात्र अंतिम नियामकतेचा प्रश्न येतो तेव्हा भौतिक पायाच निर्णायक ठरतो हा मुद्दा अबाधित राहिला. 

सांगायचे हे आहे की, घराची भौतिक रचना बदलली तरी त्या रचनेला लगटून निष्पन्न झालेले सांस्कृतिक संकेत कर्मकांड, म्हणी, वाक्प्रचार या स्वरूपात जिवंत राहतात, इतकेच नव्हे तर त्याचे मूळ भौतिक संदर्भसुद्धा विस्मरणात जातात किंवा धूसर होतात. घराशी संबंधित उदाहरण घेऊन हा मुद्दा स्पष्ट करता येईल. मराठीत मुहूर्तेढ रोवणे हा वाक्प्रचार बऱ्यापैकी प्रचलित आहे. एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करण्याला मुहूर्तमेढ रोवणे असे म्हटले जाते. ते बहुतेकांना समजतेसुद्धा, पण मुळात मुहूर्तमेढ ही काय चीज असते, ती कोठे रोवतात, का रोवतात हे या सर्वांना माहीत असेलच असे नव्हे आणि ही मेढ पाहिली असल्याची शक्यता तर बऱ्यापैकी कमी असणार. 

मुहूर्तमेढीचा संबंध पूर्वीच्या घरबांधणीच्या पद्धतीशी आहे. घर बांधायला सुरुवात करायची तर त्यासाठी अनुकूल वेळ निवडली पाहिजे. या अनुकूल वेळेलाच मुहूर्त असे म्हणतात. शुभ कार्य शुभ वेळी सुरू करावे अशी समजूत आजही प्रचलित आहे. असा मुहूर्त काढण्याचे काम अर्थातच ज्योतिर्विद करतात हे वेगळे सांगायची गरज नाही. एखाद्या मुहूर्तावर घरबांधणीची सुरुवात करायची म्हणजे नेमके काय करायचे? घर म्हटल्यावर त्याच्या चारी बाजूंना भिंती बांधाव्या लागणार हे उघड आहे, पण घरबांधणीची सुरुवात भिंत रचण्याने होत नसायची. घराचे मुख्य प्रवेशद्वार कोठे येईल, ती जागा आधी निश्चित केली जाई. आता या जागेवर घराच्या दाराची चौकट ‘फिक्स’ करणे किंवा उभारणे म्हणजे घरबांधणीची सुरुवात होते- परंतु ज्याला आपण चौकट म्हणतो ती तेथे ठेवण्याची पद्धत घरबांधणीच्या कामात विशेषत: सुतारकामात पुरेशी प्रगती झाल्यानंतरच अस्तित्वात आली असणार. त्या अगोदरच्या काळात दाराची चौकट कशी होती? 

सुताराच्या मदतीने जंगलात जाऊन झाडाच्या अशा दोन फांद्या तोडून आणायच्या ज्या सरळ तर असल्याच पाहिजेत पण त्यांच्या एका टोकाला इंग्रजी ‘व्ही’ आकाराचा फाटा फुटलेला पाहिजे. या दोन फांद्या किंवा खांब जमिनीत विशिष्ट अंतरावर अर्थात सरळ रेषेत रोवून त्याच्या बेचक्यात एक सरळ लाकूड ठेवले की दाराची चौकट स्थिर झाली. अशा फनगाड्यांनी युक्त असलेले लाकूड म्हणजे मेढ. अशी एक मेढ विशिष्ट शुभ वेळी जमिनीत रोवली म्हणजे घरबांधणी सुरू झाली. आधुनिक काळात आपण (म्हणजे बिल्डर) घर बांधायला घेतो तेव्हा अशा प्रकारची मेढ कोणी रोवीत नाही. आता आर.सी.सी. कॉलम, स्लॅब या भाषेत घरबांधणीचा व्यवहार होत असतो. त्याचा मेढीबेढीशी काहीही संबंध उरला नाही. तरीसुद्धा एखाद्या गोष्टीचा प्रारंभ झाला तर आपण तिची मुहूर्तेढ रोवली असे म्हणतच असतो. म्हणजे एवढ्यापुरती तरी भाषिक-सांस्कृतिक विश्वाने आपली स्वायत्तता टिकवून धरली आहे. 

मेढ रोवली गेली असो वा नसो, घराला अजून दार आहे व दारासाठी चौकट लागते. चार बाजूंनी चार लाकडांनी बंदिस्त केलेला सांगाडा म्हणजे चौकट. चौकटीच्या खाली असलेल्या व त्यामुळे जमिनीवर टेकलेल्या लाकडास उंबरठा असे म्हणतात. आणखी सोपे करून हा शब्द उंबरा असा वापरता येतो. कोणे एके काळी चौकटीच्या वरच्या लाकडालाही उंबरा म्हटले जायचे. पण मग खालचा उंबरा आणि वरचा उंबरा असा भेद केला जायचा. आज मात्र उंबरा किंवा उंबरठा म्हणजे चौकटीचे खालचे लाकूड. आपल्या सांस्कृतिक परंपरेत उंबऱ्याला फार महत्त्व दिले गेले आहे. उंबरा हे एकूण घराचे प्रतीक किंवा गृहवाचक संकेत मानला जातो. आमच्या भावकीची गावात पंधरा घरे आहेत असे म्हणण्याऐवजी पंधरा उंबरे आहेत असे आजही ग्रामीण भागात बोलले जाते. 

आधुनिक वास्तुशास्त्रात घराला म्हणजे दाराला उंबरा असलाच पाहिजे असे बंधन नाही. आपल्याकडे अजूनही केवळ प्रवेशद्वारालाच नव्हे तर घरामधील खोल्यांच्या दारांनासुद्धा उंबरे असतात. काही ठिकाणी प्रवेशदारात उंबरा ठेवून आतील खोल्यांच्या उंबऱ्यांचे उच्चाटन केले जाते. माझा मावसभाऊ श्रीकांत आगस्ते अमेरिकेत जन्मला. बालपणाचा काही भाग तेथेच घालवून तो आई-वडिलांबरोबर पुण्यात आला. त्यांच्या अमेरिकेतील घराच्या दारांना उंबरे नव्हते, त्यामुळे त्याला या खोलीतून त्या खोलीत जाताना खाली पाहण्याचे वा अडखळू नये याची दक्षता घेण्याचे काही कारण नव्हते. पण पुण्यातील घरात उंबरेच उंबरे. त्यामुळे स्वारी सुरुवातीला रोज दोनचार वेळा तरी कोणत्या तरी उंबऱ्याची ठेच लागून पडायचीच. हळूहळू सवय झाली. 

आता अमेरिकेचाच संदर्भ घेऊन उदाहरण द्यायचे झाले तर अमेरिकेत वास्तव्य करूनही आपली संस्कृती जपण्याची धडपड करणाऱ्या एखादा कुटुंबातील मुलाचा विवाह अस्सल भारतीय, महाराष्ट्रीय पद्धतीने लावला जाणे अगदीच शक्य आहे. किंबहुना आजकाल सिनेमांमुळे तो प्रकार अधिकच लोकप्रिय झाला आहे. विवाहानंतरचे विधी पार पाडताना भटजी जमिनीवर विटाबिटा ठेवून अग्नी पेटवण्यासाठी वेदी बांधीत नाही. तर लोखंडाच्या घमेल्यात विस्तव ठेवून काम भागवून घेतात. पण मग पुढचा प्रसंग येतो, नवीन वधूने वराच्या घरात येण्याचा, म्हणजे गृहप्रवेश करण्याचा. आपल्याकडे अर्थातच वधूने म्हणजे गृहलक्ष्मीने गृहप्रवेश करताना उंबरठ्यावर धान्य भरून ठेवलेले माप पायाने उलथवून आत यायचे असते. हा अर्थातच तिच्या आगमनाने येऊ घातलेल्या समृद्धी वगैरेंचा सांस्कृतिक संकेत मानला जातो. ‘उंबरठ्यावर माप ठेविले’ ही ओळ अनेकांना परिचित आहे. 

आता अशा घराची कल्पना करा की ज्याच्या दाराला उंबराच नाही, ही मराठी नववधू या घरात यायची झाली तर उंबरा नसला तरी दारात माप ठेवले जाईल व ते ओलांडून ती आत प्रवेश करेल. उंबरठ्याचे सांस्कृतिक महत्त्व हे असे आहे आणि बऱ्याच प्रमाणात ते सांकेतिक-सांस्कृतिक आहे. उंबरा नावाची भौतिक वस्तू अस्तित्वात उरली नाही तरी एक सांस्कृतिक सांकेतिक वस्तू म्हणून बराच काळ अस्तित्वात असेल. उंबऱ्यामुळे घराच्या आतील विश्व आणि घराच्या बाहेरील विश्व ही विभागणी शक्य होते. आपल्या विचारविश्वात देहलीदीपक न्याय प्रसिद्ध आहे. दिवा घरात लावला तर त्याचा प्रकाश फक्त घरातच पडेल. तो घराबाहेर ठेवला तर घराबाहेरच्या वस्तू दिसू लागतील, पण तो उंबरठ्यावर ठेवला तर त्याचा प्रकाश घरातही पडेल व घराबाहेरही पडेल. 

महानुभाव पंथात प्रचलित असलेली अवतारकल्पना स्पष्ट करताना चक्रधरस्वामींनी उंबरठ्याचा उपयोग केला आहे. घरातील माणसाला फक्त घरातले दिसते, बाहेरचे नाही. तसेच घराबाहेरील माणसाला फक्त घराबाहेरील दिसते, घरातील नाही. पण घराच्या उंबरठ्यावर उभे राहिले तर घरातीलही दिसते व घराबाहेरीलही पाहता येते. परमेश्वराच्या अवतारांचे परदृश्या, अवरदृश्या व उभयदृश्य असे प्रकार आहेत. परदृश्या अवतार अलीकडेच म्हणजे लौकिक देवतादि ज्ञान झाकून ठेऊन परमेश्वरी ज्ञान प्रगट करतो. अवरदृश्या अवताराचे याउलट असते. तो पर झाकून अवर प्रगट करतो. उभयदृश्या अवतार मात्र (उंबऱ्यावरील माणसाप्रमाणे) दोन्हीकडचे जाणतो व प्रगटही करतो. उंबरठ्याची ही संकल्पना घेऊन बऱ्याच गोष्टींची चर्चा करणे शक्य आहे. तिची ही मुहूर्तमेढ. 

Tags: चक्रधरस्वामी उंबरठा वास्तुशास्त्र मुहूर्तमेढ घर सदानंद मोरे Chakradhar Swami Umabartha Vastushastra Homeland House Home Sadanand More weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सदानंद मोरे,  पुणे
sadanand.more@rediffmail.com

महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक अशी ओळख असलेल्या सदानंद मोरे यांची विशेष ओळख आहे ती इतिहास, तत्त्वज्ञान व संत साहित्य या विषयांवरील लेखनासाठी.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके