डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

फुटलेला पेपर आणि एक गुणवंत

महाराष्ट्रातील सहा केंद्रांवरील त्या दुपारची परीक्षा रद्द झाली. त्याचं सारं श्रेय सत्याला जागणाऱ्या त्या मुलाचं. तो मुलगा गुणवत्ता यादीत झळकला की नाही हे मला माहीत नाही. पण त्याला शिक्षणाचं मर्म समजलं होतं. गुणवत्ता स्पर्धेत शिक्षणाचं मर्म विसरलं जातंय ही शिक्षणक्षेत्रातील मोठी शोकांतिका आहे.
 

जून महिन्याच्या मध्यावर दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतात आणि गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची नावं झळकतात. 'गुवणत्ता' हा शिक्षणक्षेत्रात आता परवलीचा शब्द झाला आहे. मिळालेल्या मार्कांच्या निकषावर विद्यार्थ्यांचे क्रमांक लावले जातात. पहिल्या दहांत, नाही तर पन्नासांत आपला क्रमांक लागावा यासाठी विद्यार्थी अधीर असतात. ज्यांचा यादीत क्रमांक लागतो त्यांना आकाश ठेंगणं होतं. ती खूष आणि ज्यांची नावं नसतात ती मुलं निराश, नाराज आणि विमनस्क होतात. परीक्षेला बसलेल्या मुलांपैकी पन्नास ते पंचावन्न टक्के मुलं नापास होतात या वास्तवाचा शिखरावरील गुणवत्तेच्या स्पर्धेत विचारही होत नाही.

गुणवत्ता यादीच्या ध्यासानं विद्यार्थी ज्ञानार्थी होण्याऐवजी परीक्षार्थी बनले आहेत. गुणवत्ता यादी म्हणजे एक अजबखानाच आहे ! अर्धा, एक वा दोन मार्कांचा फरक असलेल्या विद्यार्थ्यांचे उतरत्या भांजणीने क्रमांक लावायचे आणि अधिक गुणवान आणि कमी गुणवान अशी त्यांची प्रतवारी ठरवायची...हे मूल्यांकन फसवं आहे; अशैक्षणिक आहे.

या व्यवस्थेचा पालकांवरही परिणाम झालेला आहे. आपला पाल्य गुणवत्ता यादीत झळकावा यासाठी त्यांच्या जिवाची तगमग होत असते. त्यासाठी मुलांनी जीवनोपयोगी आणि आनंददायी इतर सर्व छंद विसरून केवळ अभ्यास एके अभ्यास करावा म्हणून पालक त्यांचा पिच्छा पुरवतात. आकलनशक्तीपेक्षा स्मरणशक्तीवर भर देणाऱ्या या यंत्रवत् परीक्षा पद्धतीमुळे खाजगी शिकवण्या, कोचिंग क्लासेस यांची चलती आहे. निकाल जाहीर झाले की कोचिंग क्लासेसच्या जाहिराती वर्तमानपत्रांत झळकतात...गुणवत्ता यादीतील अमुक इतके विद्यार्थी आमच्या कोचिंग क्लासमधले! 

मुलं कोचिंग क्लासमध्ये गेल्यामुळे गुणवत्ता यादीत चमकतात तर मग शाळा काय करतात? शाळेच्या शिक्षकांनी खाजगी शिकवण्या घ्यायच्या नाहीत, कोचिंग क्लासेसमध्ये शिकवायचं नाही असा शासनाचा दंडक आहे. पण कोण मानतो? शिक्षण म्हणजे मार्कांसाठी म्हणजेच गुणवत्तेसाठी स्पर्धा असं दुर्दैवी समीकरण झालं आहे. कहर झाला तो दोन वर्षांपूर्वी शालांत परीक्षेचे पेपर फुटले होते. काहीही किंमत देऊन आपल्या पाल्यासाठी ते पेपर मिळावेत म्हणून पालकांची धावपळ चालली होती. स्पर्धेचा रेटा एवढा की यात आपण काही वावगं करीत आहोत असं त्यांना वाटले नाही. 

या संदर्भात काही वर्षापूर्वी मला आलेला एक विलक्षण, विश्वास न बसण्यासारखा अनुभव सांगण्यासारखा आहे. एक दिवस सकाळीच एक विद्यार्थी माझ्या घरी आला. काय काम आहे म्हणून मी विचारलं तर त्यानं माझ्या हातात एक फूलस्केप कागद ठेवला. काय आहे म्हणून मी पाहतो तर त्याच दिवशी दुपारी तीन वाजता तंत्रशिक्षण मंडळाची जी परीक्षा व्हायची होती त्यातील कॉम्प्यूटर विषयाची ती प्रश्नपत्रिका होती. मी त्याला विचारले, 'ही प्रश्नपत्रिका कुठं मिळाली ?' तर तो विद्यार्थी म्हणाला, आमच्या वर्ग प्राध्यापकांनी दिली. 

पण मला कशासाठी हा पेपर दाखवतो आहेस? मी काय करणार?' असं पुन्हा विचारलं तर तो म्हणतो, "सर! ही फसवणूक आहे चोरी आहे. परीक्षेपूर्वी हा पेपर मिळाला तर मग आमच्या ज्ञानाची आकलनशक्तीची खरी चाचणी कशी होणार? ही लबाडी थांबली पाहिजे. तुम्ही शिक्षणमंत्री होतात. तंत्रशिक्षण मंडळाकडे फोन करून पेपर फुटला आहे की नाही याची खात्री करून घ्या. पण कसंही करून ही परीक्षा थांबवा.' 

मी ताडकन् उभा राहिलो. माझ्यासमोर साक्षात् सत्याची आणि सदसदविवेकबुद्धीची प्रतिमा उभी आहे असं मला वाटलं. माझं अंग शहारून आलं. मन उल्हसित झालं. फुटलेला पेपर त्याच्या हातात; भरपूर मार्क मिळवण्याची संधी त्याच्या दारात.... पण हा मुलगा परीक्षा रद्द करा म्हणून मला गळ घालत होता. गुणवत्ता स्पर्धेचा तो शिकार झाला नव्हता. आजच्या स्वार्थी जगातील हा आगळा अनुभव मन उदात्त करणारा होता. त्या मुलाला जवळ घेऊन मी त्याला शाबासकी दिली. 

त्याच दिवशी दुपारी परीक्षा होती. त्यामुळे मला फार धावपळ करावी लागली. तंत्रशिक्षण मंडळाने विद्यार्थ्याने दिलेल्या पेपरची पडताळणी केली आणि हे सिद्ध झाले की पेपर शंभर टक्के फुटला होता! महाराष्ट्रातील सहा केंद्रांवरील त्या दुपारची परीक्षा रद्द झाली. त्याचं सारं श्रेय सत्याला जागणाऱ्या त्या मुलाचं. तो मुलगा गुणवत्ता यादीत झळकला की नाही हे मला माहीत नाही. पण त्याला शिक्षणाचं मर्म समजलं होतं. गुणवत्ता स्पर्धेत शिक्षणाचं मर्म विसरलं जातंय ही शिक्षणक्षेत्रातील मोठी शोकांतिका आहे.

('मुंबई आकाशवाणी च्या सौजन्याने)

Tags: गुणवत्ता यादी कोचिंग क्लास सदानंद बर्दे फुटलेला पेपर आणि एक गुणवंत चिंतन Futelela Paper aani ek Gunvant Vidyarthi Sadanand Barde Coching Class Gunavatta Yadi Chintan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके