डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

नाथ पै यांचे भाषण सुरू झाल्यापासून पाच मिनिटांच्या आत पंडित नेहरू सभागृहातील आपल्या आसनावर येऊन बसले. नाथ पै यांच्या भाषणातील आर्जवाने त्यांना खेचून आणले होते. एवढे त्यांच्या भाषणाचे सामर्थ्य होते. पण हे केवळ शब्दांचे सामर्थ्य नव्हते. त्यांचा शब्दाशब्दांतून त्यांच्या तत्वनिष्ठ भूमिकेवरील विश्वास व्यक्त होत होता. नाथ पैंच्या शब्दांना सामर्थ्य दिले ते त्यांच्या तत्वनिष्ठ चारित्र्यसंपन्न त्यागी व्यक्तिमत्त्वाने.

वक्तृत्वाचे अनेक प्रकार आहेत. आक्रमक व घणाघाती; इतके प्रेरक की चवड्यांवर उभे राहायला लावणारे, प्रभावी, मन वळविणारे पाण्याच्या संथ प्रवाहाप्रमाणे वाहणारे, ओजस्वी आणि ओघवते, बिनतोड युक्तिवाद करून प्रतिपक्षाला निरुत्तर करणारे, सभेचा फड जिंकणारे, मृदु आणि संयत, कर्णकर्कश आणि तर्ककर्कशही इत्यादी....

वक्तृत्व स्थलकालसापेक्ष

वक्तृत्व हे स्थलकालसापेक्ष असते. संसद वा विधान मंडळातील भाषणे, निवडणूक प्रचाराच्या मोहिमेतील भाषणे, विशिष्ट विषयांवर निमंत्रितांपुढे भाषणे, परिसंवादातील भाषणे, वक्तृत्व स्पर्धेतील भाषणे, दुखवट्याच्या सभेतील भाषणे... यांची जातकुळी एक नाही. काही ठिकाणी वेळेचे बंधन असल्यामुळे नेमके मुद्देसूद बोलण्याची आवश्यकता असते तर वेळेचे बंधन नसले की अघळपघळ बोलण्याकडे वक्त्यांची प्रवृत्ती झुकते. वेळ आणि स्थळ यांचे भान नसलेले वक्तृत्व बडबडीत जमा होण्याचा धोका असतो. म्हणून चांगल्या वक्त्याला नेहमीच स्थलकालाची दखल घ्यावी लागते.

विचारांचा ठोस आधार हवा

श्रोत्यांचे केवळ मनोरंजन करणारे, चार घटका हसवून करमणूक करणारे वक्तृत्व चिरस्थायी परिणाम करीत नाही, फार काल ते आठवणीतही राहत नाही. ऐकणाऱ्यांचे शिक्षण, प्रबोधन आणि मतपरिवर्तन करण्यासाठी भाषणाला विचारांचा आधार असावा लागतो. त्या विचारांची मुद्देसूद आणि तर्कशुद्ध मांडणी, सुस्पष्ट उच्चरण आणि बाजारी बोलण्याचा मोह टाळणे यात यशस्वी वक्तृत्वाचे रहस्य दडलेले आहे. शब्दांचे चढउतार, आरोह-अवरोह, मधूनमधून चिमटे घेणारी उपहासगर्भ विधाने, उपमा उत्प्रेक्षा, दृष्टांत यांची पखरण, काही ठळक दाखले देऊन परिणाम साधणे. मध्येच काही सेकंद थांबून (Pause) श्रोत्यांचे कुतूहल वाढवणे... या सगळ्यांचे योग्य मिश्रण झाले की भाषण परिणामकारक होते. या बोलण्याच्या लकबी झाल्या. त्यांच्या जोरावर वेळ मारून नेता येते; पण श्रोत्यांवर चिरस्थायी परिणाम करता येत नाही. प्रभावी वक्तृत्वाला विचारांचा ठोस आधार हवा. आशायहीन वक्तृत्वाचा पालापाचोळा व्हायला फार वेळ लागत नाही. 'ते बोलले छान, पण त्यांनी सांगितले काहीच नाही. ' हा अभिप्राय एखाद्या वक्त्याला खासच शोभादायक नाही.

ध्वनि - प्रदूषण 

काही वक्ते भाषणाची सुरूवातच एकदम टिपेत करतात आणि उतरत्या भाजणीने भाषण आवरते घेतात. ध्वनिक्षेपकावर अशी कर्णकर्कश भाषणे झाली की ध्वनि प्रदूषण होते. पण बऱ्याच वक्त्यांच्या हे लक्षात येत नाही आणि त्यांच्या शब्दांची घोडदौड चालूच राहते. आधुनिक कालात भाषणे सर्रास ध्वनिक्षेपकापुढे होतात. त्या समोर कसे बोलावे, आवाजाची कुठची पातळी ठेवावी आणि ऐकणाऱ्यांच्या कानांवर आपला ध्वनिक्षेपित आवाज आघात तर करीत नाही ना, हे पाहवे लागते.

नाथ पैंच्या आवाजातील आर्जव 

वक्त्याचा आवाज ही सामान्यतः निसर्गदत्त देणगी असते. प्रयत्नपूर्वक आवाज कमावता येतो, नाही असे नाही. पण मूळ आवाज हा अंगभूतच असतो. बॅ. नाथ पै यांच्या आवाजाला एक अद्वितीय गुण (Quality) होता. डॉ. श्रीराम लागू यांचा आवाज असाच अद्भुत अनुभूती देणारा आहे. इंग्रजीत ज्याला Ringing Voice म्हणतात तसा नाथ पै यांचा आवाज होता. त्या आवाजातील शब्द कानांत घुमत राहतात. एक विलक्षण आर्जव त्या आवाजात असते आणि प्रभावी वक्तृत्वाला ते साहाय्यीभूत होते यात शंका नाही. नाथ पै यांचे वक्तृत्व या कोटीतील होते. आपल्या बिनतोड युक्तिवादाने लोकांची मने जिंकीत असताना त्यांचे भाषण, विशेषतः इंग्रजी, अंत:करणाला स्पर्श करून जाई. त्यांच्या भाषणात कधीही कटुता नसे. क्वचित् संताप असायचा. राजकारणातील व्यक्तीला संताप न येऊन कसे चालेल? पण त्यांच्या वक्तृत्वाचे खरे सामर्थ्य त्यांच्या भाषणातील ऋजुता, आर्जव आणि एकामागून एक सहजतेने येणारे अर्थवाही शब्द यांत होते. सुप्रसिद्ध घटनातज्ज्ञ श्री.एच.एम.सीरवाई एकदा एका सभेत म्हणाले होते की नाथ पै यांच्यासारखा प्रभावी आणि श्रोत्यांची मने वळविणारा, त्यांना मुग्ध करून टाकणारा वक्ता त्यांनी ऐकला नव्हता.

नेहरू सभागृहात आले 

या संदर्भात नाथ पै यांच्या लोकसभेत गाजलेल्या एका भाषणाची आठवण सांगण्यासारखी आहे. 1960 सालचा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा संप नेहरू सरकारने मोडीत काढला होता. नाथ पै हे संपाचे एक नेते होते. संपावर लोकसभेत चर्चा झाली तेव्हा पंडित नेहरूंनी आपल्या भाषणात संपनेत्यांना धारेवर धरले आणि संप राष्ट्रघातक असल्याचा आरोप केला. भाषण झाल्यावर ते आपली कागदपत्रे घेऊन संसद भवनातील पंतप्रधानांच्या कार्यालयात निघून गेले. नेहरूंच्या भाषणानंतर सभापतींनी नाथ पै या तरुण खासदाराचे नाव पुकारले. नेहरूंनंतर नाथ पैंचे भाषण! ती एक सत्वपरीक्षाच होती. कारण त्या कालात नेहरूंचा लोकसभेत मोठा दरारा होता. पंडित नेहरू हे सभागृहाचे नेते. लोकसभेतील ज्येष्ठ व मान्यवर सदस्य. आपले सर्व वजन खर्ची टाकून त्यांनी विरोधी पक्षांवर हल्ला केल्यानंतर लगेच भाषण करायचे ही लहानसहान गोष्ट नव्हती. नेहरूंनी केलेले आरोप नाथ पै यांच्या जिव्हारी लागले होते. ते संतापले होते; पण त्यांनी आपला तोल ढळू दिला नाही. कमालीच्या आवेशाने पण सहिष्णुतेने नाथ पै यांनी नेहरूंच्या भाषणाचा समाचार घेतला. आणि स्वातंत्र्य आंदोलन काळातील त्यांच्या भूमिकांचा उल्लेख करून बाजू उलटवली. पंतप्रधानांच्या संसद भवनातील कार्यालयात सभागृहातील भाषणे ऐकण्याची व्यवस्था असते. नाथ पै यांचे भाषण सुरू झाल्यापासून पाच मिनिटांच्या आत पंडित नेहरू सभागृहातील आपल्या आसनावर येऊन बसले. नाथ पै यांच्या भाषणातील आर्जवाने त्यांना खेचून आणले होते. एवढे त्यांच्या भाषणाचे सामर्थ्य होते. पण हे केवळ शब्दांचे सामर्थ्य नव्हते. त्यांचा शब्दाशब्दांतून त्यांच्या तत्वनिष्ठ भूमिकेवरील विश्वास व्यक्त होत होता. नाथ पैंच्या शब्दांना सामर्थ्य दिले ते त्यांच्या तत्वनिष्ठ चारित्र्यसंपन्न त्यागी व्यक्तिमत्त्वाने. 

फर्नांडिसांचे अमोघ आणि आक्रमक वक्तृत्व 

अगदी अलीकडे न्यायमूर्ती रामस्वामी यांच्याविरुद्ध लोकसभेत महाभियोग चालवण्यात आला तेव्हा अ‍ॅटर्नी जनरल कपिल सिबाल यांनी आपल्या सहा तासांच्या भाषणात रामस्वामींच्या बाजूने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. काही काल लोकसभेचा बुद्धिभेद झाल्यासारखे झाले. पण त्यानंतर लगेच जॉर्ज फर्नांडिस यांनी आपल्या अमोघ आणि आक्रमक वक्तृत्वाने अॅटर्नी जनरल यांच्या भाषणाची चिरफाड करून टाकली. काँग्रेस पक्षाचा 'व्हिप' नसता तर महाभियोग मंजूर झाला असता आणि त्याचे श्रेय जॉर्ज फर्नांडिस यांना मिळाले असते. कधी कधी तयारी केलेल्या भाषणांपेक्षा उत्स्फूर्त भाषणे अधिक यशस्वी ठरतात आणि मुख्य म्हणजे चर्चेला दिशा देऊन जातात. ही दोन्ही भाषणे त्या कोटीतील होती.

पारदर्शक व्यक्तिमत्त्व 

काही वक्तृत्वांत जोष वा आवेश नसतो; पण वक्त्यांच्या पारदर्शक व्यक्तिमत्वांचे मनोज्ञ दर्शन घडते. वक्ता जे बोलतो आहे त्यावर त्याचा विश्वास आहे याची खात्री पटवून देणारे प्रामाणिक आणि प्रांजळ भाषण मनाला जाऊन भिडते. भारताचे विद्यमान अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग हे पट्टीचे वक्ते नाहीत; पण त्यांची भाषणे त्यांच्या पारदर्शक निष्ठेची साक्ष पटविणारी असतात. म्हणून मला ती आवडतात.

दंडवते यांच्या भाषणांचा आगळा अनुभव 

यशस्वी वक्ता भाषण करताना श्रोत्यांशी आपले नाते जुळवतो, सभा आपल्या कवेत घेतो आणि होमग्राउंडवर फलंदाज जसा बेफिकीर आत्मविश्वासाने खेळतो तसा वक्ता बोलतो आणि सभा त्याला वश होते. अनेक वर्षांचे खासदार आणि भारताचे भूतपूर्व अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांचे वक्तृत्व या गुणवत्तेचे आहे. 'वक्ता दशसहस्त्रेषु' अशी त्यांची ख्याती आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तीनही भाषांत, लोकसभेत आणि लोकसभेच्या बाहेर राजकीय आखाड्यात विद्वज्जनांच्या सभेत ते लीलया बोलू शकातात. त्यांची भाषणे विचार परिप्लुत, त्यांच्या व्यासंगाची साक्ष देणारी आणि श्रोत्यांना कृतीसाठी प्रेरित करणारी असतात. प्रबोधन हे आपल्या जीविताचे कार्य आणि फलश्रुती आहे असे मानणाऱ्या फार थोड्या लोकनेत्यांमध्ये मी त्यांची गणना करतो. विज्ञान, राजनीती आणि अर्थनीती यांवरीत त्यांची भाषणे ऐकणे हा एक आगळा अनुभव असतो.

काय आणि कसे बोलतो
ज्याला समूहात बोलायचे त्याला सभाधीट असलेच पाहिजे. सभा किंवा जनसमूहच ज्याला वर्ज्य त्याची स्वगते कदाचित् यशस्वी होतील, पण भाषणे नाही.

काय बोलतो यापेक्षा कसे बोलतो म्हणजे वक्तृत्व हे समीकरण बरोबर नाही. काय आणि कसे या दोहोंचाही सुंदर मिलाफ ज्यात झाला आहे ते यशस्वी वक्तृत्व. त्याला फार तपश्चर्या लागते.

(श्री. समर्थ सेवक मंडळ, पुणे यांच्या विद्यमाने कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा स्मरणिकेत प्रसिद्ध झालेला लेख)

Tags: प्रा. मधू दंडवते डॉ. मनमोहन सिंग जॉर्ज फर्नांडिस पंडित नेहरू डॉ. श्रीराम लागू नाथ पै वक्तृत्व Prof. Madhu Dandavate Dr. Manmohan Singh George Fernandes Pandit Neharu Dr. Shreeram Lagoo Speech Naath Pai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके