डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सुखी आणि समताधिष्ठित समाजाच्या धारणेसाठी ही जीवनमूल्यं आवश्यक आहेत असं मला वाटतं. पण प्रत्यक्षात या मूल्यांची कदर होत नाही. क्षणाक्षणाला ती पायदळी तुडवली जातात. कारण माणसांचे पूर्वग्रह असतात. परंपरेनं, धार्मिक संस्कारांनी, कुटुंबातील वैचारिक पालनपोषणानं काही निष्ठा घट्टमुट्ट झालेल्या असतात. माणसाचे भौतिक जीवनाचे स्वार्थ, राजकीय महत्त्वाकांक्षा आणि प्रस्थापित समाजव्यवस्था ही जीवनमूल्यं साकार होऊ देत नाहीत.

मी अमुक एक निष्ठा मानतो असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मला नेमकं काय अभिप्रेत असतं? त्या निष्ठा मला प्रमाणभूत असतात. म्हणजेच माझं जीवन व्यवहारातील निर्णय, इतरांशी वागणं हे त्या निष्ठांनी नियमित होत असतं. त्यांचा भंग झाला की माझ्या मनाला त्रास होतो. मानलेल्या निष्ठेशी एखाद्या प्रसंगी आपण प्रामाणिक राहिलो नाही, लौकिकाची भीड चेपू शकलो नाही तर मनाला शरम वाटते. पण असं झालंच नाही, म्हणजे मनाला त्रास झाला नाही तर माझी निष्ठा वरवरची आहे, उथळ आहे असंच मानायला नको का?

शेवटी जीवननिष्ठा म्हणजे काही जीवनमूल्यांवर विश्वास. ती मूल्यं जीवन अर्थपूर्ण करतात. सत्य, असत्य; विवेक, अविवेक; चांगलं, वाईट यांसंबंधीच्या कल्पनांवर माणसाची मूल्यं अधिष्ठित असतात. स्त्री पुरुष समानता; वंश, जात, भाषा, धर्म यांच्या आधारावर माणसा-माणसांत भेद न करणं; जन्म वा जात यांवरून कुणाला हीन न लेखणं, माणसा-माणसांच्या जीवनमानात फार तफावत नसणं; शिक्षणाची, विकासाची सर्वांना समान संधी असणं ही जीवनमूल्यं आहेत. खरं तर भारताच्या संविधानानं देशासाठी म्हणून ही जीवनमूल्यं घोषित केली आहेत. 

सुखी आणि समताधिष्ठित समाजाच्या धारणेसाठी ही जीवनमूल्यं आवश्यक आहेत असं मला वाटतं. पण प्रत्यक्षात या मूल्यांची कदर होत नाही. क्षणाक्षणाला ती पायदळी तुडवली जातात. कारण माणसांचे पूर्वग्रह असतात. परंपरेनं, धार्मिक संस्कारांनी, कुटुंबातील वैचारिक पालनपोषणानं काही निष्ठा घट्टमुट्ट झालेल्या असतात. माणसाचे भौतिक जीवनाचे स्वार्थ, राजकीय महत्त्वाकांक्षा आणि प्रस्थापित समाजव्यवस्था ही जीवनमूल्यं साकार होऊ देत नाहीत.

मग मी काय करायचं? असहाय होऊन स्वस्थ बसायचं? मी समाजव्यवस्था बदलू शकत नसेन पण माझ्या दैनंदिन जीवनात या मूल्यांचा भंग होतो आहे असं स्पष्ट दिसत असताना माझ्याकडून काहीच प्रतिकार होणार नसेल तर मी अमूक एक निष्ठा मानतो हा एक प्रकारे दंभच नाही काय? माझा खारीचा वाटा मी द्यायला नको का?

या संदर्भात घडलेली एक गोष्ट सांगतो घटना असेल 1950 ची. राष्ट्र सेवादलाचे संस्थापक भाऊसाहेब रानडे कोपरगावला सेवादलाशी संबंधित एका कुटुंबातील लग्न-समारंभाला गेले होते. लग्न मंडपात ते गेले तर पाहुण्यांना बसण्यासाठी गाद्या आणि सतरंज्या पसरल्या होत्या. भाऊंनी विचारलं, “गाद्या आणि सतरंज्या असा भेद का?” तर यजमान म्हणाले, “गाद्या पुरुषांसाठी आणि सतरंज्या स्त्रियांसाठी.” भाऊ गरजले, “असा भेद का म्हणून? एक तर सर्वांना गाद्या, नाहीतर, सर्वांना सतरंज्या हव्यात. तसं होणार नसेल तर मी लग्नासाठी थांबणार नाही.”

झालं! सारी धावपळ सुरू झाली. यजमानांनी सगळ्यांसाठी गाद्यांची समान व्यवस्था केली. मग भाऊ लग्नाला थांबले, जेवले पण भाऊंना म्हणता आले असते, कशाला लग्नसमारंभात आपले स्त्री पुरुष समानतेचे आग्रह? सेवादलाशी संबंधित कुटुंब. उगाच त्यांची, नाहीतर त्यांच्या आप्तेष्टांची अडचण कशाला करायची आणि नाराजी ओढवून घ्यायची? पण भाऊंनी त्या कुटुंबाच्या सेवादलाशी असलेल्या संबंधाला आपल्या वागण्याने अर्थ प्राप्त करून दिला.

घटना छोटीशीच आहे; पण जीवनमूल्यं कशी जगायची असतात याचा प्रेरक संदेश तुमच्या आमच्यासाठी या घटनेत आहे, नाही का?

(सौजन्य : मुंबई आकाशवाणी)

Tags: अर्थ   सेवादल समानता समाजव्यवस्था जीवनमूल्य मूल्य arth sevadal samanta smaajvyvastha jivanmulya mulya weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके