डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

नारायण तावडे : सेवादलाचा व्रती कर्मयोगी

राष्ट्र सेवा दल, समाजवादी आणि प्र. स. पक्ष, अपना बाजार राजापूर ग्रामस्थ संघटना… अनेक विधायक प्रवृत्तींतून परिपक्व होत गेलेले नारायण तावडे 1 मे रोजी कालवश झाले. जनता केंद्र आणि युसुफ मेहेरअली हायस्कूल, ही त्यांच्या रचनात्मक आणि संघर्षात्मक पुरुषार्थाची, त्यांच्या नैतिक सामर्थ्याची जागती स्मारके. चाळीस वर्षांच्या कार्यांतल्या या ध्येयधुंद सहकाऱ्याला वाहिलेली ही अक्षरांजली.

मला तो दिवस अजूनही आठवतो. माझ्याशी बोलताना भाऊ फार गंभीर झाले होते. नारायणकडे ते दुपारी जेवायला गेले होते आणि हा आपला सर्ववेळ सेवक कोणत्या परिस्थितीत राहतो याची अनुभूती घेतल्यानंतर त्यांच्या मनाला तीव्र वेदना झाल्या होत्या, त्या ते व्यक्त करीत होते.

नारायणचं अर्धअधिक आयुष्य ताडदेव तुळशीवाडीच्या एका पत्रा-शेडमध्ये गेलं- जिथं उन्हाळ्यात अंग तापायचं आणि पावसाळ्यात पाणी गळायचं. तापायचं म्हणजे अक्षरशः अंगाची लाही व्हायची. त्याच्या वस्तीच्या लगतच ताडदेवची सुप्रसिद्ध कचरपट्टी आणि त्याच्या पलीकडे उंच कुंपणाआड लपलेला विलिंग्डन क्लब- सधन वर्गीयांचं ऐषारामाच आणि विरगुळ्याचं स्थान! गरिबीचे चटके बसत असतानाच नारायणानं राष्ट्र सेवा दलाचं व्रत स्वीकारलं. त्याच्या संस्कारांतून कार्यकर्ता म्हणून जो नारायण तयार झाला तो कर्मठ, आग्रही, त्यागी आणि निष्ठेचा पक्का होता. सेवा दलाचा ध्येयवाद अंगात पुरा भिनलेला. रचना आणि संघर्ष या दोन्ही क्षेत्रांत सारख्याच कर्तृत्वानं तळपणारा.

मीही सेवा दलाचा एक कार्यकर्ता. पण बऱ्यापैकी मध्यम वर्गातला. गरिबीचे चटके कधीच न अनुभवलला. नारायणची धगधगती निष्ठा मला आणि माझ्यासारख्या त्याच्या अनेक सहकाऱ्याना नेहमी प्रेरक वाटली; यापुढेही वाटत राहील.

आज त्या पत्राशेड वस्तीचा चेहरा-मोहरा साफ बदलला आहे. आता तिथं दिमाखानं मुंबई महानगरपालिकेच्या गलिच्छ वस्ती निर्मूलन योजनेखालील चार मजली इमारती उभ्या आहेत. बाजूलाच जनता केंद्र आणि वस्तीच्या मध्यभागी युसुफ मेहेरअली हायस्कूल! नारायणच्या रचनात्मक आणि संघर्षमय पुरुषार्थाची जिवंत स्मारक निष्ठेचा पीळ घट्ट असला म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजकीय झब्बूशाहीला सामोरे जाऊन पैशाचं पाठबळ नसताना माणसं काय निर्माण करू शकतात याचं एक नितांत सुंदर उदाहरण.

तुळशीवाडीच्या पुनर्रचनेसाठी नारायणानं दिलेली लढाई ही एक शौर्यगाथाच आहे! काही क्षुद्र कॉग्रेसजनांनी त्याच्या प्रयत्नांना अपशकून करण्यासाठी आपल्या बहुमताचा वापर करून पुनर्रचित वस्तीला 'आर्यनगर’ हे तद्दन अर्थशून्य नाव दिलं, पण नारायणानं त्याकडे दुर्लक्ष केलं. कारण तो एक मोठी लढाई जिंकला होता. केंद्र सरकारच्या गलिच्छ वस्ती निर्मूलन योजनेचा त्यानं सखोल अभ्यास केला होता. त्या पत्राशेडमध्ये राहून त्यानं ती योजना महापालिकेच्या गळी उतरवली आणि महापालिकेचं कुठच्याही अधिकारपदाचं संक्शन मागं नसताना रात्रंदिवस बांधकामात लक्ष घालून एक आदर्श वसाहत उभी केली. सगळी माणसं नव्या इमारतीत रहायला गेल्यावर नारायण पत्राशेड सोडून मग चांगल्या घरात रहायला गेला. ती नवी वस्ती, ते जनता केंद्र आणि युसूफ मेहेरअली शाळा पाहिली की नारायणच्या नैतिक सामर्थ्याचा साक्षात्कार होतो.

नारायणचं शिक्षण बेताचंच. म्हणजे पाचसहा इयत्तेच्या पलीकडे नाही. पण त्याच्या समजुतीचा आणि सामान्यज्ञानाचा आवाका फार मोठा होता आपण 'त्या अर्थानं' सुशिक्षित नाही, आपल्याला इंग्रजी येत नाही याचा त्याला न्यूनगंड होता. आणि म्हणून सेवा दलाचा सर्ववेळ सेवक असताना त्यानं दादरला रात्रशाळेत जाऊन वेळात वेळ काढून इंग्रजी शिकण्याचा आटापिटा केला. पण तो म्हणत असे त्याप्रमाणे त्याचं खरं शिक्षण हे राष्ट्र सेवा दलात झाल, प्रतिकूल परिस्थितीमुळं आपण शिक्षण घेऊ शकलो नाही याची सतत जाण ठेवून त्यानं स्वतःला तयार केलं आणि आपल्या निकटवर्ती मित्रांच्या सहकार्यानं अडचणींवर मात केली. 

सभेत किंवा बैठकीत नारायण आवश्यकतेपेक्षा जास्त मोठ्या आवाजाने कधी कधी शिरा ताणून बोलत असे. पण तो शुद्ध बाळबोध मराठी बोलत असे. सेवा दलाच्या दैनंदिन कामात अहवाल, निवेदन या पलीकडे त्याचा लेखनाचा संबंध नसे. त्यामुळे नारायणची लेखनाची काही शैली असेल असं कुणालाही स्वप्नातसुद्धा वाटलं नसतं. पण कॉम्रेड झाबवालांवर साधनेत त्याने लिहिलेल्या लेखाने अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. श्री. पु. भागवत, वसंत बापट यांच्यासारख्या, साहित्यातील अग्रणींनी त्याच्या लेखाची वाहवा केली. अनुभूतीशी प्रामाणिक राहिलं, प्रतारणा केली नाही की लिखाण अस्सलपणाची प्रचिती देऊन जातं. नारायणाचा लेख त्या कोटीतला होता. नारायण कॉम्रेड झाबवालांचा पट्टेवाला म्हणून काम करायचा. झाबवाला हा केवढा मोठा माणूस होता याचं मनोज्ञ दर्शन नारायणानं त्या लेखात घडवलं जाहे.

राष्ट्र सेवा दल, समाजवादी आणि प्रजासमाजवादी पक्ष आणि नंतर जनता पक्ष, अपना बजार, राजापूर तालुक्यातील ग्रामस्थांची संघटना, जनता केंद्र, युसूफ मेंहेरअली शिक्षण संस्था...अशा विविध राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सहकारी आणि विधायक प्रवृत्तींतून काम करीत नारायण हा एक परिपक्व आणि तत्त्वनिष्ठ सामजिक कार्यकर्ता बनला. नारायण कमालीचा स्पष्टवक्ता होता. लौकिकाच्या भीडेपेक्षा अन्यायाची चीड त्याच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरलेली होती. त्यामुळे पोटात एक आणि ओठात दुसरं असं त्याच्या बाबतीत कधी झालं नाही. पण याचा अर्थ तो अरेरावी वा हम करे सो कायदा या प्रवृत्तीचा होता असं मुळीच नाही. कधी कधी त्याचं बोलणं कर्कश वाटायचं, पण त्याची अंतःप्रेरणा पूर्णपणे लोकशाहीवादी आणि सहकाऱ्यांना सांभाळून घेणारी होती. चार युक्तीच्या गोष्टी सांगून वेळ मारून नेणारा त्याचा स्वभाव नव्हता. जे पटलं त्यासाठी अहर्निश खटपट करायची, हा त्याच्या जीवनाचा नित्यक्रम होता. जनता केंद्राच्या उभारणीसाठी ज्यांनी त्याला राबताना पाहिलं आहे ते अभिमानानं सांगतील की केंद्राच्या इमारतीची भिंत अन् भिंत त्याच्या परिश्रमाला साक्षी आहे.

ताडदेव भागातील नगरसेवक आणि नंतर राजापूर मतदारसंघाचा आमदार हा त्याचा प्रातिनिधिक जीवनाचा अनुभव. परंतु लोकप्रतिनिधी हा दर्जा नसतानाही त्यानं फार मोलाची लोकसेवा केली होती. निवडून आल्यानंतर अर्थातच आपल्या मतदार संघाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करीत राहणे, त्यांच्या दुःखांना विधान सभेच्या व्यासपीठावर वाचा फोडणं आणि शासकीय विकास योजनांचे फायदे त्यांच्यापर्यंत पोचवणं यासाठी तो अहर्निश झटला. या कामात त्याला विलक्षण आनंद मिळत असे. नगरसेवक आणि आमदार म्हणून खरोखरच तो आदर्श प्रतिनिधी होता.

नारायणचं वक्तृत्व फर्ड किंवा सभा जिंकणारं नव्हतं. पण त्याची वृत्ती अभ्यासू होती. त्यामुळे प्रश्नाच्या सर्व बाजू समजावून घेतल्याशिवाय सहसा तो तोंड उघडीत नसे. महापालिकेने किंवा विधानसभेत एखाद्या विषयावर बोलायचं असं त्यानं ठरवलं की तो सर्व संदर्भ काळजीपूर्वक पाहत असे आणि त्यामुळे त्याची भाषणं माहितीपूर्ण होत असत. प्रश्नाचा पाठपुरावा करायचा, विशेषतः व्यक्तिगत गाऱ्हाण्यांचा, तर त्याला फार चिकाटी आणि शासकीय कचेऱ्यांत हेलपाटे घालण्याची तयारी लागते. आणि जे खऱ्या अर्थानं वंचित आहेत त्यांच्याबद्दल अंत:करणात सहानुभूतीचा ओलावा असावा लागतो. नारायणकडे या दोन्ही गोष्टी मुबलक प्रमाणात होत्या. फारच थोड्या आमदारांनी पोस्टाला त्याच्याइतकं काम पुरवलं असेल. शासकीय अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना पत्र लिहिण्याचा त्याचा कायमचा सपाटा असायचा. बर्नाडं शॉने समर्पित जीवनाचा जो आदर्श सांगितला आहे त्याचा तो उत्कृष्ट नमुना होता.

जी माणसं खऱ्या अर्थाने तत्वनिष्ठ असतात, म्हणजे ज्यांचा तत्त्वनिष्ठेचा केवळ आव नसतो, अशी माणसं सहसा तडजोड करीत नाहीत. ती भांडतात, बंड करतात, आणि त्याची किंमतही मोजायला तयार असतात. नारायण असा आग्रही तत्त्वनिष्ठ, होता. आणीबाणीचं पर्व संपून केंद्रात जनता पक्षाचं राज्य आलं आणि 1978 साली विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. जनता पक्षाकडे तिकिटासाठी उमेदवारांची नुसती झुंबड लागली. नारायणनं तिकिट मागितलं नाही आणि त्याला मिळालं नाही म्हणून त्याची तक्रारही नव्हती. पण बाळकेश्वर मतदार संघातून मंगला परीस यांना ते मिळावं असा त्यांचा आग्रह होता. आणीबाणी जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच मंगला आणि प्रमिला दंडवते यांना मिसाखाली अटक करण्यात आलं होतं, मंगलाला तिकीट न देता, आणीबाणीत ज्यांनी इंदिरा गांधींची व त्यांच्या राजवटीची खुशामत केली. त्या बल्लू देसाईना केवळ श्री. हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या किळसवाण्या आग्रहामुळे तिकीट बहाल करण्यात आले. नारायणचं पित्त खवळलं. पक्षशिस्तीच्या चौकटीत राहून त्यानं निर्णय बदलून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण ती अयशस्वी झाल्यावर त्यानं बंड केलं आणि अपक्ष म्हणून उभा राहिला. कशासाठी? स्वतःला तिकीट मिळालं नाही म्हणून नव्हे, तर मंगलाला मिळालं नाही म्हणून. अशी प्रखर मूल्यनिष्ठा दुर्मिळ असते. त्याची किंमत त्याला मोजावी लागली. त्याच्या विरूध्द पक्षाने शिस्तीची कारवाई केली.

नारायणला त्याच्या पत्नींनी- आनंदी वहिनींनी जी सतत साथ दिली त्याला तोड नाही. देशासाठी फकिरी स्वीकारलेल्या या माणसानं स्वतःच्या प्रकृतीकडे आणि संसाराकडे दुर्लक्षच केलं. आंनदी वहिनींची निश्चयी साथ नसती तर नारायणला फार ठेचा खाव्या लागल्या असत्या. आपल्या पत्नीबद्दल चारचौघांत कौतुकानं तो कधीच बोलला नाही. पण त्याच्या अंतर्मनातील आनंदीवहिनीसंबंधीची कृतज्ञता त्याच्या निकटवर्तीयांना ठाऊक होती.

आम्हा कार्यंकर्त्यांचा चाळीस वर्षांचा हा ध्येयधुंद साथीदार, समाजवादी आंदोलनातील एक ज्येष्ठ सहकारी आम्ही बंगलोरला जनता पक्षाच्या अधिवेशनासाठी गेलो असताना आम्हाला सोडून गेला, याचं मनस्वी वाईट वाटलं. नारायणच्या स्मृतींना विनम्र प्रणाम.

Tags: नैतिक सामर्थ्याची जागती स्मारके अपना बाजार राजापूर ग्रामस्य संघटना समाजवादी आणि प्र. स. पक्ष राष्ट्र सेवा दल सदानंद वर्दै सेवा दलाचा व्रती कर्मयोगी नारायण तावडे World Monuments of Moral Strength Apna Bazar Rajapur Gramsya Sanghatana Samajwadi and Q. C. Paksha Rashtra Seva Dal Sadanand Vardai Seva Dal Vrati Karma yogi Narayan Tawde weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके