डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

भारताच्या उत्तर सीमेवर भूतान हे एक चिमुकले शेजारी राष्ट्र आहे. साधनेचे कार्यकारी विश्वस्त सदानंद वर्दे यांनी नुकताच या देशाचा धावता दौरा केला. त्या दौऱ्यात या देशाचे जे ओझरते दर्शन त्यांना घडले, त्याची ही काही क्षणचित्रे. 

जोगवनीहून आम्ही सिलिगुडीला पोचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. जोगवनी बिहारच्या कटिहार जिल्ह्यात आणि सिलिगुडी पश्चिम बंगालात. आमच्यापाशी भटकंतीसाठी फक्त सहा दिवस होते. सिलिगुडी हा बेस कँप करून सहा दिवसांत भूतान म्हणजे मुख्यतः राजधानी थिम्फू, गँगटॉक, दार्जीलिंग आणि कालिम्पॉन्ग एवढी सफर करायची होती. पण आमचा अंदाज साफ चुकला होता. बसने जाण्यायेण्यात इतका वेळ जाणार होता की ही सर्व ठिकाणं पाहणं शक्यच नव्हतं. देशाच्या ईशान्य टोकाला आलो होतो म्हणून शेवटी निर्णय केला की परदेशची वारी करायची. भूतानला जायचं.

दुसऱ्या दिवशी सकाळी सिलिगुडी येथील भूतानच्या बस वाहतूक कार्यालयात गेलो तेव्हा समजलं की थिम्फूला एका दिवसात जाता येत नाही. बंगाल-भूतान सरहद्दीवरचं गाव फुनशोलिंग येथे रात्री मुक्काम करावाच लागतो. भूतान सरकारची माफक दरात बऱ्यापैकी बस-सेवा होती. दुपारी 12 ची बस. तिकीट काढायला गेलो तर वाहतूक अधिकारी म्हणाले, "भूतानमध्ये प्रवेश करण्यासाठी परकीय नागरिकांना परवाना काढावा लागतो. 

फुनशोलिंगला भारत सरकारचं संपर्क कार्यालय आहे. रेशनकार्ड इत्यादी दाखवून ओळख पटवलीत की लगेच प्रवेशाचा परवाना मिळेल. बाराची बस चार वाजता फुनशोलिंगला पोचेल. लगेच संपर्क कचेरीत जा. उशीर केलात तर दुसऱ्या दिवसापर्यंत थांबावं लागेल. कारण फुनशोलिंगपासून थिम्फूची बस सकाळी सात वाजता (म्हणजे भारतीय वेळ साडेसहाची) सुटते." 

मी म्हणालो, "आमच्याकडे इथं रेशन कार्ड कुठं असणार? पण फ्रीडम फायटरचे ओळख पत्र आहे. (माझं आणि डॉ. देशपांड्यांचं होतं म्हणून म्हणालो.) ते चालेल?" 

तो अधिकारी एकदम उल्हसित झाला. "यू आर फ्रीडम फायटर? तुम्ही किती ब्रिटिश मारलेत?" त्याचा भर फायटर या शब्दावर होता. तो थट्टा करीत होता असं वाटलं नाही. आमच्याबरोबर हिंद खेत मजदूर पंचायतचा सचिव अलीमुद्दीन होता. तो वैतागला. तो गरजला, "हे सर्व गांधींचे अनुयायी आहेत. हिंसेवर त्यांचा विश्वास नाही." ओळखपत्र पाहून ते चालेल असं तो अधिकारी म्हणाला, पण फायटर असून एकाही ब्रिटिशाला मारलं नाही याबद्दलचं त्याच्या चेहेऱ्यावरचं प्रश्नचिन्ह कायम होतं. 

सिलिगुडीहून बस सुसाट निघाली. वाटेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विस्तीर्ण चहाच्या मळ्यांची मौज लुटत न्यू जलपैगुरीवरुन जयगावला (हे पश्चिम बंगालमधील आपले सरहद्दीवरचे गाव) आणि तेथून अर्ध्या फर्लांगावर एका भव्य प्रवेशद्वारातून फुनशोलिंगला ठीक पावणेचार वाजता पोचलो. उतरल्या उतरल्या आम्ही कामाचं वाटप केलं. डॉक्टर सामानाकडे, अलीमुद्दीन दुसऱ्या दिवशीची थिम्फूची बस तिकिटं काढण्यासाठी, सुधा हॉटेलच्या शोधात आणि मी भारत संपर्क कार्यालय शोधात धापा टाकीत कचेरीची वेळ टळू नये म्हणून. 

मी बरोबर चार वाजता कचेरीवर पोचलो तर कचेरीला कुलूप. तारीख होती 13 एप्रिल (गुरुवार). दरवाजावर नोटीस होती की 13 एप्रिल महावीर जयंती आणि 14 एप्रिल गुड फ्रायडेची सुट्टी असल्यामुळे कचेरी बंद. शनिवार 15 एप्रिलला उघडेल. माझ्या डोळ्यांपुढे काजवे चमकले. कारण शनिवारी कचेरी उघडणार सकाळी 11 वाजता आणि थिम्फूची बस निघते सकाळी 7 वाजता. म्हणजे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार तीन दिवस फुनशोलिंगला बेकार घालवून रविवारच्या सकाळच्या बसनं थिम्फूला जायचं? 

मनाचा जळफळाट. हे भारत सरकारचे संपर्क अधिकारी पर्यटकांची अशीच दखल घेतात काय? एखादा ड्यूटी ऑफिसर ठेवायला काय झालं होतं? पण जळफळाट करून काही उपयोग नव्हता. कचेरीतून मी बाहेर रस्त्यावर आलो. तेवढ्यात एक लाल दिव्याची गाडी आवाराच्या समोरच येऊन उभी राहिली. कुणी अधिकारीच गाडी चालवत होते. नशीब सिकंदर! (डॉ. नरेंद्र दाभोलकरांची क्षमा मागून) ते अधिकारी गाडीतून पाय बाहेर टाकीपर्यंत मी त्यांच्यासमोर उभा. 

मी माझं गाऱ्हाणं मांडलं, पण ते म्हणाले, "मी काही करू शकत नाही. शनिवारी या." असलं नसलं सर्व आर्जव एकवटून मी त्यांना अपील केलं. तीन दिवस इथं राहून काय करणार? माझा पवित्रा भांडणाचा मुळीच नव्हता. साहेब द्रवले. त्यांनी गाडीच्या डॅशबोर्डवरून अर्जाचे दोन फॉर्म दिले आणि म्हणाले, "इथं थांबू नका. समोर तो बगीचा आहे तिथं बसून फॉर्म भरा आणि वीस मिनिटांनी इथं या. इथं आणखी पर्यटक आले तर माझी पंचाईत होईल", आणि गाडीत बसून निघून गेले. 

तोपर्यंत आणखी सात-आठ पर्यटक जमा झाले होते. ते मला काही विचारायच्या आत मी बागेत पळालो. फॉर्म भरताना एक अडचण आली. अलीमुद्दीनच्या वडिलांचे नाव मला माहीत नव्हतं. ठोकून दिलं करीमुद्दीन. त्यांचं नाव आहे अब्दुल रफीक. फॉर्म भरून वीस मिनिटांनी मी पुन्हा कचेरीपाशी आलो. आवाराच्या मुख्य दरवाजापाशी उभा राहिलो. आसपास सात-आठ पर्यटक होते. थोड्या वेळाने ती लाल दिव्याची गाडी आली. 

ते अधिकारी, आणखी दोघं गाडीतून उतरले. जाता जाता त्यांनी माझ्या हातातून दोन फॉर्म इतक्या शिताफीनं घेतले की कुणाला काही कळलं नाही. ते आत गेले आणि कचेरीचं दार बंद झालं. पंधरा-वीस मिनिटांनी ते बाहेर आले. त्यांनी मला विचारलं, "तुम्हाला बस स्टेशनवर जायचं आहे का? मी त्या दिशेने जात आहे." मी ओळखायचं ते ओळखलं. मुकाटपणे त्यांच्या गाडीत जाऊन बसलो. इतर पर्यटकांच्या गाड्या होत्या. त्यांना लिफ्ट द्यायचा प्रश्नच नव्हता. गाडी सुरू झाली आणि साहेबांनी माझ्या हातात भूतान प्रवेशाचा आणि कमाल पाच दिवस राहण्याचा परवाना दिला. 

मी त्यांचे आभार मानले. मनाला सदसद्विवेकबुद्धीची टोचणी होती. इतर पर्यटकांना परवाना मिळाला नसेल हे बरोबर झालं का? पण मी त्याचा विचार करायला तयार नव्हतो. कारण थिम्फूची ओढ अनावर होती. 

सकाळी ठीक 7 वाजता आम्ही भूतान सरकारच्या मिनीबसमधून निघालो. फुनशोलिंगहून भूतानची राजधानी थिम्फू 187 किलोमीटर. सगळा रस्ता पक्का डांबरी. डोंगर कपारीतून. पूर्णपणे नागमोडी. रस्त्याचे सलग 50/100 फूट झाले नाहीत तो वळण. हा दीर्घ पट्ट्याचा रस्ता सुमारे आठ वर्षांत सेनादलाच्या बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने केला. एका बाजूला उंच कडे आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी असा हा जवळपास अर्धाअधिक प्रवास डोळ्यांचं पारणं फेडणारा. दक्षिण भूतानमध्ये वनश्री विपुल आहे. सुरुवातीच्या जवळ जवळ दोन तासांच्या प्रवासात उंच उंच सुरूच्या झाडांची आणि देवदारांची रेलचेल होती. त्यांतील काही सामाजिक वनीकरणाच्या धर्तीची होती. मात्र थिम्फू जवळ येऊ लागलं तशी वनश्रीची लयलूट कमी होऊ लागली. डोंगर उघडे-बोडके दिसू लागले. वाटेत तीन वेळा चेक नाक्यांवर आम्हा चार भारतीय नागरिकांचा प्रवेश परवाना दाखवावा लागला. अर्ध्या वाटेवर वाँचू नदीचा प्रवाह दिसू लागला. त्याची साथ थेट राजधानीपर्यंत होती. 

साडेसात तासांनी दुपारी दोन वाजता आम्ही थिम्फूला पोचलो. कडकडीत ऊन असूनही हवेत थोडा गारवा होता. आमच्यापाशी फिरायला जेमतेम एक दिवस होता. त्यामुळे एक खासगी वाहन आणि वाटाड्या अनिवार्य होते. मिनीबसमधून उतरलो तो आम्हाला वाटाड्यांनी गराडाच घातला. वाटाडे हे ड्रायव्हरही. त्यांच्या मारुती व्हॅन्स! आम्हाला उतरायची सोय पाहायची होती. पण एक मध्यम वयस्क माणूस आमचा पिच्छा काही सोडेना. कायम डोक्यावर घट्ट कापडाची हॅट आणि डोळ्यांवर काळा चष्मा. सुरेख हिंदी आणि बऱ्यापैकी इंग्रजी बोलत होता. आम्हाला थिम्फू शहर पाहायचं होतं. शिवाय 60 कि .मी. दूर पारो येथे जायचं होतं. तिथं भूतानचा नॅशनल म्युझियम आहे. शिवाय एक फोक फेस्टिवल पारंपरिक लोकनृत्यांचा मेळा होता. त्याला सगळं माहीत होतं. 

मी त्याला विचारलं, "आपलं नाव काय?" तर म्हणाला, "बी. बी. छत्री." (खरं म्हणजे एका कागदावर लिहून दिलं.) 'हे बी. बी. म्हणजे काय?' तर 'बलभद्र.' सारखी डोक्यावर हॅट का?' त्यानं लगेच हॅट काढून आदबीनं नमस्कार केला. डोक्याला छोटी शेंडी होती. हा हिंदू होता. मी साउदर्नर आहे म्हणाला. भूतानच्या सखल भागातला, दक्षिणेकडचा. बोलणारा मिठ्ठास. आमचा सौदा पटला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता आम्ही चौघे श्रीकृष्णाच्या थोरल्या बंधूंच्या स्वाधीन झालो. 

सकाळी सकाळी बलभद्रने आम्हांला एका जुन्या बुद्धमंदिरात नेलं. विस्तीर्ण पटांगण. मध्यभागी आकाशाचा वेध घेणारं मंदिर. वातावरण शांत निःस्तब्ध. कुणाचा हुंकारही ऐकू येत नव्हता. माणसं अगदी मोजकी. भूतानचं क्षेत्रफळ 47 हजार चौरस कि मी. आणि लोकसंख्या 13 लाख. येणार कुठून माणसं? शिवाय आम्ही गेलो तो दिवस धार्मिक सणाचा नव्हता. काही भाविक साष्टांग दंडवत घालून बुद्धाला शरण गेले होते तर काही प्रदक्षिणा घालत होते. एका कोपऱ्यात कुणी तरी कालचक्र फिरवीत होतं. 

बलभद्रबरोबर राजधानीचा फेरफटका मारला. राजवाडा, सचिवालय, असेंब्ली, सर्वोच्च न्यायालय... स्मशानभूमी... सारं पाहिलं. थिम्फू ही भूतानची राजधानी. पण राजधानीचा दरारा किंवा प्रतिष्ठितपणा अजिबात नाही. प्रेमात पडावं असं छोटं शहर. इमारतींना, विशेषतः सरकारी, निमसरकारी सार्वजनिक इमारतींना, राजवाड्यालाही एका विशिष्ट वास्तुशिल्पाचं सौंदर्य आणि शिस्त असावी याची काळजी घेतलेली दिसली. पॅगोडापद्धतीची बुद्ध-मंदिरांची जी रचना असते त्याचा प्रभाव या सर्व इमारतीवर, विशेषतः छपरांवर आहे. सगळी छपरं तांबडी आहेत. 

भूतानी माणसांप्रमाणेच त्या इमारती शालीन वाटतात. आपल्याला बोलावताहेत असा प्रत्यय त्यांच्याकडे पाहिल्यावर येतो. सर्वोच्च न्यायालयाची रचना तर लाजवाब आहे. अप्रतिम वास्तुशिल्पाचा एक नमुना. राजवाड्याच्या आवाराची भिंतही वास्तुशिल्पाच्या या शिस्तीतून सुटलेली नाही. भिंतींचा रंग सफेद. पण वरच्या बाजूला भिंतीला छपरासारखा आकार आणि तोही पुन्हा तांबड्या रंगात. 

आपल्या परंपरा, संस्कृतिविशेष आणि त्यातून साकारलेलं स्वत्व जतन करण्याचा हा छोट्या देशाचा आग्रह निश्चितच अंतर्मुख करायला लावणारा होता. 

भूतान सार्क संघटनेचा सदस्य आहे. नजीकच्या भविष्यात त्याची एक परिषद थिम्फूला व्हायची आहे. त्यासाठी एक भव्य इमारत तयार झाली आहे. त्याचा ढांचा, चारी दिशांना विस्तार आणि साज हा इतर सार्वजनिक इमारतीसारखाच आहे. ही इमारत अधिक दिमाखदार असली तरी त्यावर भूतानी संस्कृतीची ठळक छाप आहे. परिषदेचं निमित्त साधून एक आलिशान हॉटेलही बांधलं जात आहे. 

थिम्फूचा मुख्य रस्ता म्हणजे 'माल'. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानं, हॉटेलं, मद्यगृहं, भूतानी हस्तोद्योग वस्तुंचं, कापडांचं,  कपड्यांचं भव्य भांडार आणि टोकाला एक मोठा गाडी तळ. सर्वत्र मद्यगृहांची जाहिरात ठसठशीत आहे. परदेशी उंची मद्ये उपलब्ध आहेत. भूतानच्या थंड हवेला मद्य आवश्यकही असेल. पण रस्त्यावर, हॉटेलात कुठेही झिंगलेला माणूस दिसला नाही. बलभद्र म्हणाला, 'दिसणार नाही. इथली माणसं रस्त्यावर झिंगून आपली अप्रतिष्ठा करून घेणार नाहीत.' सिलिगुडीला मात्र रस्त्याच्या कडेला झिंगणारी माणसं दिसली. 

थिम्फूची रपेट झाल्यावर बलभद्रने आम्हाला 57 कि.मी.वर असलेल्या पारो या गावाला नेलं. वाटेत त्याच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. आपण पोस्टात सहायक पोस्टमास्तर म्हणून नोकरी केली. तेव्हा ड्रायव्हिंग शिकणं भाग होतं. मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेऊन जो फंड मिळाला त्यात बँक कर्जाची भर टाकून मारुती व्हॅन घेतली आणि पर्यटन वाहन म्हणून परवाना मिळवून ती चालवतो. कर्ज फेड होत आली आहे. थोरल्या मुलाला मद्रासच्या उच्च तंत्रशाळेत घातलं आहे, असं सांगून त्यानं मला त्याचं पत्रही वाचायला दिलं. 

अर्धाअधिक प्रवास झाल्यावर, दूर दरीत एका आधुनिक विमानतळाचं बांधकाम चाललं होतं त्याकडे आमचं लक्ष वेधलं. ही आगामी सार्क परिषदेची पूर्वतयारी. परदेशचे प्रतिनिधी आणि पत्रकार येणार. त्यांच्या सोयीसाठी हा छोटा देश विमानतळ बांधतोय. एकदा अशी कायम सुविधा निर्माण झाली की पर्यटकांची ये-जा वाढेल आणि त्यामुळे देशाच्या आर्थिक जीवनाला साहाय्य होईल... ही बलभद्रची मल्लिनाथी. 

पारो हे शहर नाहीच. जरा मोठं गाव. त्याचं महत्त्व यासाठी की तिथं भूतानचा नॅशनल म्युझियम आणि विभागीय आयुक्तांचं कार्यालय आहे. 

नॅशनल म्युझियममध्ये भूतानचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा जपून ठेवला आहे. म्युझियमची दगडी इमारत 1645 सालची आहे. दोन मजले आणि तळघरात सर्व वस्तू, आकर्षक पद्धतीनं मांडून ठेवल्या आहेत. जुनी कागदपत्रं, स्वयंपाकाचे मोठे टोप व इतर साहित्य, शस्त्रास्त्रं, छोटी आयुधं, चिलखतं तसेच कलाकुसरीचे तर कितीतरी प्रकार. भूतानी माणसांच्या बोटात विलक्षण जादू आहे. विणकामाचे, नक्षीकामाचे विविध रंगी आणि अद्भुत रचनाकृतींचं (पॅटर्नस्) दालन पाहून मन थक्क झालं. स्टफ् केलेले हिमचित्तेही पहायला मिळाले. 

तसा म्युझियम लहान आहे पण आधुनिक जगातील स्थित्यंतराशी संबंधित असं एक दालन आहे. ते भूतानच्या स्टेम्पसचं. स्टेॅम्पसचे विषय जसे भूतानची संस्कृती, राजेशाही, निसर्ग, पशुपक्षी आहेत तसेच अलीकडच्या काळात घडलेल्या महत्त्वाच्या घटना, थोरांच्या जन्मशताब्द्या, महत्त्वाचे वैज्ञानिक शोध... यांची दखल स्टॅम्पसमध्ये घेतलेली दिसते. आपण जगापासून अलग नाही, त्याचाच एक भाग आहोत याची ही कृत जाणीव वाटली. त्यामुळे स्टॅम्प गांधी जन्मशताब्दीचा आहे तसाच रॅफेलच्या पाचव्या जन्मशताब्दीचाही. जतन आणि परिवर्तन असं द्विविध दर्शन म्युझियममधील वस्तूंमुळे होतं. 

लोकनृत्यांचा मेळा आणि जत्रा दोन्ही एकत्रच होत्या. गावोगावच्या लोकांनी आपले नृत्याचे तांडे आणले असावेत. चित्रविचित्र पोषाख घातलेले पाचपन्नास स्त्रीपुरुष एकाच वेळी नाचत होते. डोलत होते. दोन दिवस हे तासन्तास चाललं होतं. रंगमंच वगैरे काही नाही. खुल्या मैदानावर लोकांच्या वर्तुळाकार गराड्यात मधल्या भागात संगीताच्या धुनीत लोकनृत्यं चालली होती. काय चाललं आहे हे कुणी सांगणारं नव्हतं. गर्दीही फार होती. पण आम्ही पाहिलं ते लोकनृत्य विवाह समारंभासंबंधीरचं होतं. 

दुसऱ्या बाजूला आपल्या गावाकडच्या जत्रेसारखीच मोठी जत्रा. दाटीवाटीनं किती तरी स्टॉल्स्. घरून तयार करून आणलेल्या खाद्यवस्तू, तयार रंगीबेरंगी कपडे, स्वेटर्स आणि अर्थातच खास भूतानी लोकांच्या सर्व अंग लपेटून टाकणाऱ्या पेहेरावासाठी रंगीबेरंगी कापडांचे तागे, अनेक नमुन्यांचे. पुरुषांच्या पेहेरावाला त्यांच्या भाषेत म्हणतात 'घो' आणि स्त्रियांच्या पेहेरावाला 'किरा'. त्या मेळ्यात आणि जत्रेत यो आणि किराचे इतके विविध रंगीबेरंगी प्रकार पहायला मिळाले. या पेहेरावाची किंमत काय असेल हे जाणून घेण्याचं कुतूहल होतं. जत्रेतील एका माणसाला सुधाने विचारलंही. तो म्हणाला, "हे फार खर्चिक काम आहे. मी पोलीस अधिकारी आहे. माझ्या अंगातील कपड्यांची किंमत आहे दोन हजार रुपये. (भूतानच्या चलनाचं नाव 'नाऊल्ट्रम'. योडक्यात नू. एक नू बरोबर एक रुपया.) पण समोरून दोन भगिनी येताहेत. 

त्यांच्या अंगावरील किराची किंमत प्रत्येकी तीस ते चाळीस हजार रुपये असेल." इतक्या भारी किमतीचा पेहेराव रोजचा असणं शक्य नाही. जत्रा ही नटून थटून जाण्याची संधी म्हणून इतका खर्चिक कपडा असावा आणि तोही वरच्या उत्पन्नगटातील लोकांचा. स्टॉल्सवर वस्तू विकायला बसलेल्या स्त्रियांचे कपडे असे उंची नव्हते. त्यातील ज्या अगदीच कष्टकरी होत्या त्यांचे किरा जाड्याभरड्या कापडाचे वाटले. 

भूतानमधील, विशेषतः उत्तरेकडील स्त्रियांची आणि मुलांची कांती गोरीपान. नजर खेचून घेणारी. लहान मुलांचे गोरे गोल लाल लाल गुब्बे गाल, मिचमिचे डोळे, कपाळावर केसांची झुल्पं आणि सदाबहार हसणं पाहून मन मोहित होऊन जायचं. त्यांच्याशी बोलण्याचा मोह अनावर व्हायचा. पण बोलणार काय? मग हस्तांदोलन करायचं, नाहीतर केसांची झुल्पं अधिक विस्कटायची...

आम्ही थिम्फूत जेमतेम दीड-दोन दिवस होतो. पण थिम्फूच्या प्रेमात पडलो. एखादयाचे आभार मानायचे तर 'भूतानी भाषेत काय म्हणतात' असं मी बलभद्रला विचारले, तो म्हणाला, "थँक यू ला करीनच्छे म्हणतात." 

सोळा एप्रिलला सकाळी 7 वाजता आमची बस थिम्फूहून फुनशोलिंगच्या दिशेने निघाली. बलभद्र निरोप द्यायला आला होता. बस सुटली तेव्हा मी मोठ्याने ओरडलो, "करीनच्छे थिम्फू."

Tags: नाउट्रम. कारो घो पारो सार्क भूतान सिलीगुडी सदानंद वर्दे Noutrum. #थिंफू Karo Gho Paro SAARC Bhutan Siliguri Sadanand Varde Thimphu weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके