Diwali_4 दो बिघा जमीन
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

माझ्या आयुष्यात एवढं मोठं आणि महत्त्वाचं स्थान ज्या ‘दो बिघा जमीन’ला मी देतो, तो चित्रपट लहानपणी एकदाच काय तो बघायला मिळाला मला. तेव्हापासून आजपर्यंत इतकी वर्षं लोटली, पण पुन्हा एकदाही तो पुन्हा पाहता यावा, अशी संधी मला मिळालेली नाही.

माझ्या आयुष्यावर ज्यांचा खूप परिणाम झाल्याचं म्हणता येईल, अशा काही गोष्टींपैकी ‘फिल्म’ ही एक आहे! मला आठवतंय, मी अगदी छोटा असताना ‘दो बिघा जमीन’ बघायला माझा मावसभाऊ मला घेऊन गेला होता. तत्कालीन एक मोठे अभिनेते बलराज साहनी यांनी त्या सिनेमात एका रिक्षावाल्याचा रोल केला होता. माणसाला रिक्षा ओढताना त्या वेळी मी प्रथमच बघत होतो. त्यानंतर मी माणसांना रिक्षा ओढताना पाहिलं ते परभणीला. मी नोकरीला लागलो, तेव्हा. पण लहानपणी या सिनेमात जेव्हा माणसाला रिक्षा ओढताना पहिल्यांदाच पाहिलं, तेव्हा फार विचित्र वाटलं होतं मनाला. कुठे तरी असं ‘बेरहम’ चित्र असल्यासारखं वाटलं.

आज म्हटलं, तर ‘दो बिघा जमीन’विषयी मला फारसं काही आठवत नाही. पण तरीही, नायकाची छोटीशी झोपडी, त्याचं भाकरी बांधून खाणं- असं काहीसं मला अजूनही लक्षात आहे. या सिनेमातलं त्यांचं ते रिक्षा ओढणं हे त्या काळात माझ्या मनावर इतकं खोलवर बिंबलं होतं की, जो भेटेल त्याला मी त्याबद्दल सांगत असे. ‘मी दो बिघा जमीन बघितला’- असं म्हटल्यावर, ‘तुला त्यात काय आवडलं?’ हा साहजिक प्रश्न येत असे. अशा वेळी मग, ‘मला बलराज साहनी रिक्षा ओढतात तो सीन मनाला खूप भावला असल्याचं’ मी समोरच्याला सांगायचो!

एवढं सोडता, बाकी मला सांगता येण्यासारखं काही नव्हतं. पण का कुणास ठाऊक, तो सिनेमा आजही माझ्या मनावर कोरला गेलेला आहे. त्यामुळेच की काय, पण मी नंतर पुढे बलराज साहनींचे अनेक सिनेमे पाहिले. पण एक निरीक्षण इथे जरूर मांडेन; ते असं की, बलराज साहनी ज्या वेशात समोर यायचे, तसेच ते वाटायचे. शेतकरी असो की सूट घातलेला माणूस... बलराजजी त्यात चपखल बसायचे. त्या अर्थाने ते त्यांचं वैशिष्ट्यच म्हणेन मी.

पण एवढं मात्र निश्चित की, ज्या-ज्या वेळी मी त्यांना पुढच्या काळात पाहिलं, त्या-त्या वेळी तो ‘दो बिघा जमीन’मधला रिक्षावाला माझ्या नजरेसमोरून कधीही हटला नाही! याचाच परिणाम असाही झाला की, गेल्या अनेक वर्षांत मी नगर, मुंबई किंवा पुण्यात असताना जेवढे काही हातगाडी ओढणारे पाहिले (किंवा आजही पाहतो!), त्यांच्याकडे पाहिल्यावरही मला बलराजजी अगदी हटकून आठवतात. बहुधा मनात घर करून राहिलेली ती भूमिका, हेच कारण असावं गरिबीशी माझी नाळ जोडली जाण्याचं!

पुढे ‘प्रेमचंद’ वाचल्यानंतर अनेक वर्षांनी ‘दो बिघा जमीन’ या नावाचा नेमका अर्थ मला लागल्याचं म्हणता येईल. केवळ दोन बिघे जमीन असणाऱ्यांची अवस्था त्या वेळी लक्षात येऊ लागली होती. केवळ दोन बिघे जमिनीवर कुटुंबाची गुजराण होत नसल्यामुळे एखाद्याला रिक्षा ओढणं कसं भाग आहे, ते वास्तव आता उमगत होतं. जनावरांसारखे कष्ट माणसाला करावं लागण्यातली सक्तीची अपरिहार्यता दिसत होती. पुढची गोष्ट आज आठवत नाही, परंतु ‘दो बिघा..’ने माझ्या आयुष्यावर फार मोठा परिणाम मात्र निश्चितच केला! आज जरी मी सिनेमाक्षेत्रात काम करत असलो, त्यातून पैसे कमवत असलो, तरीही माझ्या मनात असणारा गरिबांविषयीचा कळवळा या चित्रपटाच्या माझ्यावरील खोल परिणामातूनच निर्माण होऊ शकला आहे.

एक महत्त्वाची बाब इथे अधोरेखित करून मी म्हणेन की, त्या काळात या सिनेमात कुठलाही रोँमॅटिसिझम दाखवलेला नाही. ज्या काळात चित्रपटांतून हीरो-हिरोईन हे डान्स करत असल्याचे बघायला मिळत होते, त्याच काळात असा एखादा सिनेमा येणं, हे खूप महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. त्यानंतर अशा प्रकारचे चित्रपट पाहिल्याचं मला आठवत नाही. मनुष्यमात्रांकडे पाहण्याचा एक माणुसकीचा दृष्टिकोन मला देण्यात ‘दो बिघा जमीन’चाच वाटा आहे! (हा चित्रपट नसता तर माहीत नाही, मी कसा झालो असतो.)

  ...माझं आयुष्य हेदेखील खूप सुंदर वगैरे गेलं होतं, असं नाही. नगरहून मुंबईला आल्यानंतर सुरवातीला नाटकांत कामं करतानाचे दिवस हे मी कसे जगलो, ते माझं मलाच माहितीये. आत्ताही डोळ्यांसमोर आहे- त्या काळात फुटपाथवर झोपताना, दुकानांच्या फळीवर झोपताना ‘दो बिघा जमीन’चा तो नायक नेहमीच आठवायचा. कष्ट करणारा- अपार कष्ट करणारा. कुटुंबासाठी दोन वेळची रोटी मिळवणारा! तो काळ होता, जेव्हा एकाच वेळी उंदीरही पाय कुरतडायचे आणि झुरळंही. पण तरीही आज मी असं अवश्य म्हणेन की, ती आठ-नऊ वर्षं मी बलराजजींच्या सहवासात अगदी आनंदात काढली.

योगायोगाने पुढे कधी तरी बलराज साहनींच्या मुलाशी- परीक्षितशी काही चित्रपटांच्या निमित्ताने संबंध आला, तेव्हा एकदा मी त्याला माझी बलराजजींबद्दलची आठवण सांगितल्याचं मला आठवतं. त्यालाही ते ऐकून छान वाटलं होतं. मध्यंतरी मग मी बलराज साहनींचं पुस्तकही वाचलं. त्यात त्यांच्या सिनेमांव्यतिरिक्तही अनेक इन्सिडन्सेसचा उल्लेख होता. सारांश, त्यांच्या चित्रपटाने माझ्यावर खूप लहानपणी केलेला परिणाम हा आजतागायत टिकून आहे. अत्यंत लहानपणी पाहिलेला... पुढच्या ‘पिटात’ बसून पाहिलेला... नातेवाइकांबरोबर पाहिलेला दो बिघा जमीन! डोळ्यांसमोरून न हटणारी ती दृश्यं आजही पुढ्यात आहेत- एक, कलकत्त्याच्या रस्त्यांवर बलराज साहनी टांगा ओढतोय. दुसरीकडे, आपल्या झोपडीत आल्यावर तो भाकरी खातोय...!

नगरला त्या वेळी खूप चित्रपट येत आणि मी ते पाहायचोही खूप सारे. आमच्या घरी त्या वेळी नातेवाईक आले की, सिनेमा पाहायला जाणं- हे एकच आकर्षण त्या वेळी त्यांना असायचं. त्यांच्यासोबत सिनेमा पाहणं नेहमीच होत असे. पण या सिनेमाने घडवून आणलेला बदल दुसऱ्या कुठच्याही सिनेमाने आणला नाही.. आणला नसता! माणूस एकदा शहाणा झाला की त्याला बरंच काही बरं-वाईट  कळायला लागतं, असं त्याला वाटतं. पण अत्यंत इनोसंट, म्हणजे निष्पाप वयात बालमनावर झालेला परिणाम हा फार मोठा असतो. माझ्या बाबतीत बलराज साहनीच्या रिक्षावाल्याने तेच केलंय.

लहानपणीच मनावर नकळतपणे घडवल्या गेलेल्या या परिणामामुळे असेल बहुधा, पण पुढे मग त्या गरिबीचं एक आकर्षणच वाटायला लागलं. कळवळा वाटायला लागला. त्यांचं आयुष्य जाणून घेण्याची एक उत्सुकता वाटायला लागली. माझ्या पुढच्या आयुष्यात वेगवेगळ्या चळवळी आणि आंदोलनांत असणाऱ्या माझ्या सक्रिय सहभागाचे मूळ कुठे तरी यात असू शकेल. आजही एखाद्या चळवळीकडे किंवा घटनेकडे फार इमोशनली पाहतो मी. मेधा पाटकरांच्या आंदोलनाच्या ठिकाणी जेव्हाही मी जातो, तेव्हा तिथे असताना कैक वेळा माझ्या डोळ्यांना धार लागलेली असते. मी खूप इमोशनल होतो. अशा वेळी मला बोलताही येत नाही. विशेषतः, एरवी मांडताना मुळीच अडचण नसणारे बुद्धिवादी मुद्दे, अशा इमोशनल क्षणी मात्र मला मांडता येत नाहीत! अर्थात, असं असतानाही हीच भावनिक स्थिती मला काम करण्याला ऊर्जा देते, असंही मला ठाऊक आहे. गरिबाचं आयुष्य कसं असतं, ते किती कठीण असतं- असं खूप काही या सिनेमाने दाखवलं. माझ्या मते, तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. माणसांचं आयुष्य समजून घेणं हे नेहमीच गरजेचं आहे, असं मी मानतो.

अजूनही जेव्हा मी कलकत्त्याला जातो, तेव्हा तिथे काय दिसतं?... आजही तिथे खूप गरिबी आहे. खूप लोक आहेत. खूप तंबाखू खातात. विड्या वळतात, ओढतात. अपार कष्ट करतात. मोठ्यानं बोलतात. इमोशनल होऊ बोलतात. अशी परिस्थिती आणि गरिबीचं व गर्दीचं मिश्रण मी मुंबईतसुद्धा नाही पाहिलं! एवढं प्रचंड दारिद्र्य, दुःख तिथं भरलेलं आहे. झोपलेल्या गरीब लोकांनी रात्रीचे तिथले रस्ते भरून जातात. जिकडे एकीकडे मोठमोठ्या माड्या आहेत, तिकडे दुसरीकडे याही गोष्टी आहेतच. आज मी जे पाहतोय, मुंबईसारख्या (किंवा इतरही) शहरात जे भरभर-भरभर बदल घडतायत, त्याला मी तरी ‘प्रगती’ नाही म्हणू शकत.

हा खरा समर्थ भारत आहे, असं मला नाही वाटत. जेव्हा गरिबीत माणूस सुखी होईल... श्रमाची रोटी समाधानानं खाईल... डोक्यावर त्याच्या छप्पर असेल... गरजेला औषध-पाणी असेल... हातांना काम असेल... आणि रात्री तो ‘उद्याची’ कुठलीच काळजी न करता समाधानानं झोपेल, तो दिवस समर्थ भारताचा असेल! गरिबांतला गरीब माणूस जर अशा प्रकारे जगू शकला, तर ते व्हायला हवं आहे. भले या भारतात टीव्ही नसेल, मोटार नसेल, लॅपटॉप वा सिनेा नसेल. हरकत काय? या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. समाधानाचे दोन घास आणि रात्रीची शांत- डाराडूर झोप, हे आधी गरजेचं आहे! यात खऱ्या अर्थाने कुठे तरी समर्थ भारत उभा दिसेल.

माझ्या आयुष्यात एवढं मोठं आणि महत्त्वाचं स्थान ज्या ‘दो बिघा जमीन’ला मी देतो, तो चित्रपट लहानपणी एकदाच काय तो बघायला मिळाला मला. तेव्हापासून आजपर्यंत इतकी वर्षं लोटली, पण पुन्हा एकदाही तो पुन्हा पाहता यावा, अशी संधी मला मिळालेली नाही. ‘ब्लॅक अँड व्हाईट’ असल्यामुळे की काय, पण तो आजकाल टी.व्ही. वर सुद्धा फारसा पाहायला मिळत नाही. खऱ्या अर्थाने आता काळाच्या पडद्याआड गेलाय तो! अत्यंत चांगले संस्कार घडवणारा, माणुसकी दाखवणारा असा हा ‘दो बिघा जमीन’ आणि त्यातला तो रिक्षा ओढणारा रिक्षावाला पुन्हा कधी बरं परत पाहायला मिळेल?

(शब्दांकन : स्वप्नील जोगी)

Tags: बलराज साहनी स्वप्नील जोगी सदाशिव अमरापूरकर दो बिघा जमीन फिल्म सिनेमा film cinema Balaraj Sahani Swpnil Jogi Sadashive Amrapurkar Do Bigha Jamin weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात