डिजिटल अर्काईव्ह

2023 मध्ये साधना प्रकाशनाने काय दिले?

वर्षभरात साधना प्रकाशनाच्या सर्व छापील पुस्तकांच्या विक्री झालेल्या प्रतींची संख्या आहे 30 हजार. गेल्या वर्षी ती संख्या होती 27 हजार प्रती. या वर्षी साधना प्रकाशनाच्या सर्व ई-बुक्सची किंडलवर वाचली गेलेली पाने आहेत पावणेतीन लाख, गेल्या वर्षी हा आकडा होता साडेचार लाख पाने. आणि गेल्या वर्षी Storytel वर साधना प्रकाशनाच्या सर्व पुस्तकांचे मिळून ऐकले गेलेले तास होते 9 हजार, या वर्षी तो आकडा आहे 6 हजार तास. 

2023 या वर्षभरात साधना प्रकाशनात एकूण 37 पुस्तके दाखल झाली आहेत, ती पुस्तके तीन प्रकारांत विभागता येतील.

पहिला विभाग : साधना साप्ताहिकातील लेखमाला किंवा विशेष अंक यांना दिलेले पुस्तकरूप.

या विभागात 10 पुस्तके आलेली आहेत. त्यातील सहा पुस्तके मुलाखतींचे संग्रह आहेत, तर चार पुस्तके लेखसंग्रह आहेत.

'धर्मरेषा ओलांडताना' या पुस्तकात 'कर्तव्य साधना'वर प्रसिद्ध झालेल्या 15 आंतरधर्मीय विवाहित जोडप्यांच्या मुलाखती आहेत, या सर्व मुलाखती हिना कौसर खान यांनी घेतलेल्या आहेत. 'केशवरावांच्या मुलाखती' हे पुस्तक म्हणजे विनोद शिरसाठ यांनी 2020-21 मध्ये साधना साप्ताहिकाच्या संपादकीय जागेवर लिहिलेल्या अकरा मुलाखतींचा संग्रह आहे. 'तीन संपादकांच्या मुलाखती' या पुस्तकात 'द हिंदू'चे एन. राम., 'इंडियन एक्स्प्रेस' व 'द प्रिंट' चे शेखर गुप्ता, आणि 'द स्क्रोल'चे नरेश फर्नांडिस या तिघांच्या दीर्घ मुलाखती आहेत. या तिघांच्या इंग्रजी मुलाखती घेतल्या आहेत संकल्प गुर्जर व जायला वाव्हळ यांनी; तर अनुवाद केले आहेत प्रभाकर पानवलकर आणि सुहास पाटील यांनी... 'भारत सासणे यांची मुलाखत' हे छोटे पुस्तक म्हणजे ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा दासू वैद्य यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्या वतीने साहित्य व समाजकार्य पुरस्कार मागील 30 वर्षांपासून दिले जातात. त्यांतील 2015 ते 19 या पाच वर्षांत ते पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती असलेले विशेषांक साधना साप्ताहिकाने काढले होते. त्या काळातील साहित्य पुरस्कारप्राप्त 22 व्यक्तींच्या मुलाखतींचा संग्रह म्हणजे 'आम्हा घरी धन', आणि समाजकार्य पुरस्कारप्राप्त 25 व्यक्तींच्या मुलाखतीचा संग्रह म्हणजे 'देव तेथेची जाणावा'. शिवाय, या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांची दीर्घ मुलाखत 'आम्हा घरी धन' मध्ये समाविष्ट केली आहे. वरील सहा पुस्तकांत मिळून 78 मुलाखती आहेत, या सर्व मुलाखतींतील ऐवज वाचनीय तर आहेच, पण वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास संशोधन करता येईल या दर्जाचा झाला आहे.

साधना साप्ताहिकातील लेखांचा संग्रह असलेली चार पुस्तके आहेत. त्यात 'मला प्रभावित करून गेलेले पुस्तक'. हे पुस्तक म्हणजे साधनाने 2021 व 2022 मध्ये काढलेल्या दोन मिनी विशेषांकाचा संग्रह, यात विविध क्षेत्रांतील 21 मान्यवरांचे लेख आहेत. 'विज्ञानाने मला काय दिले' हा विशेष अंक 'डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती अंक' म्हणून 2020मध्ये काढला होता, त्यात 14 व्यक्तींनी लिहिलेले लेख आहेत, तो अंक आता पुस्तकरूपाने आला आहे. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांनी साधना साप्ताहिकात वेळोवेळी लिहिलेल्या 10 छोट्या लेखांचे पुस्तक 'सावध ऐका पुढल्या हाका'. डॉ. राजन हर्षे यांनी मागील वर्षभर साधना साप्ताहिकातून लिहिलेल्या 12 दीर्घ लेखांचे पुस्तक, 'पक्षी उन्हाचा सात विद्यापीठांच्या आवारात' या नावाने आले आहे.

या वर्षी साधना प्रकाशनाकडून आलेल्या पुस्तकांचा दुसरा विभाग म्हणजे पूर्णतः नवीन मजकूर असलेली पुस्तके. या विभागात 11 पुस्तके आहेत. त्यामध्ये विशेष महत्त्वाचा ऐवज म्हणजे मधु लिमये यांच्या पुस्तकांचे अनुवाद. लिमये यांनी 1994मध्ये लिहिलेल्या 'जनता पार्टी एक्सपेरिमेंट' हा इंग्रजीतील बृहद ग्रंथ 'जनता पक्षाचा प्रयोग' या नावाने चार खंडांत आला आहे, त्यातील खंड एक व दोनचे अनुवाद वासंती फडके यांनी, तर खंड तीन व चारचे अनुवाद सुनीती जैन यांनी केले आहेत. लिमये यांनी 1989 मध्ये लिहिलेला 'बर्थ ऑफ नॉनकॉंग्रेसीझम' हा ग्रंथ, 'जन्म बिगर काँग्रेसवादाचा' या नावाने दोन खंडांत आला आहे, या दोन्ही खंडांचे अनुवाद सतीश कामत यांनी केले आहेत.

डॉ. अभिजीत वैद्य यांनी आरोग्य सेनेच्या मुखपत्रात मागील दशकभरात लिहिलेल्या संपादकीय लेखांचे पुस्तक म्हणजे 'शब्दांचीच शस्त्रे'. तर डॉ. आनंद नाडकर्णी यांनी विविध स्तरांतील व्यसनाधीन व्यक्तींच्या कुटुंबातील सहा मुलामुलींची रेखाटलेली व्यक्तिचित्रे म्हणजे 'वादळाचे किनारे'. नामदेव माळी यांनी लिहिलेली कुमार वयीन मुलांसाठी लिहिलेली कादंबरी म्हणजे 'एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. हाँसदा सौभेंद्र शेखर यांनी 'आदिवासी विल नॉट डान्स' हा कथासंग्रह इंग्रजीत लिहिला, त्याचा मराठी अनुवाद सुजाता देशमुख यांनी 'नाही नाचणार आदिवासी आता' या नावाने केला आहे. प्रसिद्ध गायिका नीला भागवत यांची दीर्घ मुलाखत स्मिता गांधी यांनी घेतली, तिची छोटी पुस्तिका 'एक मैफल' या नावाने आली आहे.

या वर्षी साधना प्रकाशनाकडून आलेल्या पुस्तकांचा तिसरा विभाग म्हणजे, जुन्या पुस्तकांच्या दीर्घ काळानंतर आलेल्या नव्या आवृत्त्या. या विभागात 16 पुस्तके आली आहेत. त्यांमध्ये सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे, साधना साप्ताहिकाला साठ वर्षे पूर्ण झाली तेव्हा ग.प्र. प्रधान व रा. ग. जाधव यांनी संपादित केलेला 'निवडक साधना' हा आठ खंडांचा ग्रंथसंच दशकभरानंतर आला आहे. मधु दंडवते यांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे, त्या निमित्ताने त्यांच्या 'डायलॉग विथ लाइफ' या इंग्रजी ग्रंथाचा कुमुद करकरे यांनी केलेला मराठी अनुवाद 'जीवनाशी संवाद', दशकभराने आला आहे. केशव गोरे यांचा 'असिधारा' हा स्मृतिग्रंथ 1960 च्या दशकात प्रकाशित झाला होता, त्याची नवी आवृत्ती अर्ध शतकानंतर आली आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा मृत्यू झाल्यानंतर 'शास्त्रीजी' हे पुस्तक रा.ग. जाधव यांनी लिहिले होते, त्याची नवी आवृत्ती पाव शतकानंतर आली आहे. वसंत बापट यांनी लिहिलेल्या कवितांचा पहिला संग्रह 'बिजली', 1952 मध्ये प्रकाशित झाला होता, त्याची नवी आवृत्ती पाव शतकानंतर आली आहे.' श्यामची आई' या पुस्तकाची सचित्र व हार्ड बाऊंड आवृत्ती प्रथमच आली आहे, या आवृत्तीमध्ये सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेल्या 'श्यामची आई' चित्रपटातील 35 छायाचित्रे त्या-त्या प्रसंगाला अनुरूप ठिकाणी समाविष्ट केली आहेत. आणि नीती बडवे यांनी लिहिलेल्या 'अनंत अक्षर' मालिकेतील तीन पुस्तके 'भाषेकडे बघताना', 'मराठी भाषेकडे बघताना', 'बहुभाषिकतेकडून भाषांतराकडे' या नावाने आली आहेत.

वरील तिन्ही विभागांतील सर्व 37 पुस्तके ई-बुक स्वरूपात त्या त्या वेळीच आणलेली असून, किंडलवर उपलब्ध आहेत.

याशिवाय, या वर्षभरात तेरा पुस्तके ऑडिओ बुक स्वरूपात आली असून, ती स्टोरी टेलवर उपलब्ध आहेत. ती तेरा पुस्तके अशी : अवधूत डोंगरे यांनी लिहिलेले कुमारकथांचे पुस्तक 'तात्पर्य', अरुण गांधी यांनी लिहिलेले व सोनाली नवांगुळ यांनी अनुवाद केलेले 'वारसा प्रेमाचा', साने गुरुजींनी लिहिलेले वैचारिक पुस्तक 'भारतीय संस्कृती', संतोष पद्माकर पवार यांचे 'बहादुर थापा आणि इतर कविता', प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेले 'आई', विनोद शिरसाठ यांनी संपादित केलेले 'विज्ञानाने मला काय दिले?', ग.प्र. प्रधान यांनी लिहिलेली 'हाजीपीर', 'सोनार बांगला', 'टॉलस्टॉय यांच्याशी पत्रसंवाद' ही तीन पुस्तके, रघुराज मेटकरी यांचे 'माझे विद्यार्थी', दत्तप्रसाद दाभोळकर यांचे 'मुलांसाठी विवेकानंद', सुरेश द्वादशीवार यांचे 'तारांगण' आणि 2023 चा 'बालकुमार दिवाळी अंक'.

यामध्ये 'तात्पर्य' आणि 'वारसा प्रेमाचा' या दोन पुस्तकांचे वाचन रीमा अमरापूरकर यांनी केले आहे. 'आई', 'विज्ञानाने मला काय दिले?', 'हाजीपीर', 'सोनार बांगला', 'मुलांसाठी विवेकानंद', 'टॉलस्टॉय यांच्याशी पत्रसंवाद', आणि 'बालकुमार दिवाळी अंक 2023' या सात पुस्तकांचे वाचन गौरी देशपांडे यांनी केले आहे. 'माझे विद्यार्थी' या पुस्तकाचे वाचन राजकुमार तांगडे यांनी केले आहे. 'बहादूर थापा' या पुस्तकाचे वाचन स्वतः संतोष पद्माकर पवार यांनीच केले आहे. 'तारांगण' या पुस्तकाचे वाचन गजानन परांजपे यांनी केले आहे; तर 'भारतीय संस्कृती' या पुस्तकाचे वाचन सुहास पाटील यांनी केले आहे. या तेरा ऑडिओ बुक्सचे एकूण तास आहेत ७५. 

या वर्षभरात साधना प्रकाशनाच्या सर्व छापील पुस्तकांच्या विक्री झालेल्या प्रतींची संख्या आहे 30 हजार. गेल्या वर्षी ती संख्या होती 27 हजार प्रती. या वर्षी साधना प्रकाशनाच्या सर्व ई-बुक्सची किंडलवर वाचली गेलेली पाने आहेत पावणेतीन लाख, गेल्या वर्षी हा आकडा होता साडेचार लाख पाने. आणि गेल्या वर्षी Storytel वर साधना प्रकाशनाच्या सर्व पुस्तकांचे मिळून ऐकले गेलेले तास होते 9 हजार, या वर्षी तो आकडा आहे 6 हजार तास. 

साधना प्रकाशनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि छापील पुस्तके खरेदी करण्यासाठीही sadhanaprakashan.in या वेबसाइटला जरूर भेट द्या. वेबसाइटवर सर्व दोनशे पुस्तकांची विस्तृत सूची उपलब्ध आहे. शिवाय, साधना प्रकाशनाची सर्व छापील पुस्तके amazon.in वरूनही खरेदी करता येतात. आणि साधना प्रकाशनाची सर्व e books किंडलवर, तर सर्व ऑडिओ बुक्स स्टोरी टेलवर उपलब्ध आहेत…

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी