डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

फाळणीचे हत्याकांड, लेझीम खेळणारी पोरं, सिगारेट्स अलविदा...

स्पर्धा परीक्षा म्हटली, की प्रशासकीय सेवा व पोलिस सेवा एवढेच सामान्यतः माहीत असते. याखेरीजही असलेल्या अन्य सेवांविषयी, त्यातील कामाविषयी इत्यंभूत माहिती येथे मिळते. नागरी सेवेत मराठी माणूस कमी आहे. जिद्द, चिकाटी, परिश्रम, शिस्त, नियोजन या गुणांच्या आधारे ही टक्केवारी वाढवणे मराठी माणसाच्या हाती आहे. पण याखेरीजही असलेल्या कारणांची मीमांसा, मराठी पालकांची मानसिकता याची चर्चा या पुस्तकात निमित्तानिमित्ताने फार चांगल्या तऱ्हेने करण्यात आली आहे. प्रभावी ललित शैलीत वाचकांना खिळवून ठेवण्याची किमया श्री. नाईकवाडे यांनी येथे साध्य केली आहे.

साधना शिफारस : फाळणीचे हत्याकांड, लेझीम खेळणारी पोरं, सिगारेट्स अलविदा, पावणेदोन पायांचा माणूस, राष्ट्रध्वज, स्टील फ्रेम

मानवनिर्मित शोकांतिकेची चिकित्सा 

माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचा ‘द होलोकॉस्ट ऑफ इंडियन पार्टिशन : अ‍ॅन इन्क्वेस्ट’हा महत्त्वाचा ग्रंथ आता ‘फाळणीचे हत्याकांड : एक उत्तरचिकित्सा’या शीर्षकाने मराठीत उपलब्ध झाला आहे. भारतीयांना स्वातंत्र्याचा आनंद आणि फाळणीच्या वेदना या दोन गोष्टी एकाच वेळी मिळाल्या. स्वातंत्र्याचा आनंदोत्सव आपण साजरा करीत आलो आणि फाळणीच्या वेदनांनी वेळोवेळी गहिवरलो. पण या दोघांकडे पुरेशा चिकित्सक दृष्टीने आपण पाहिले नाही. भारतीय स्वातंत्र्यलढ्याविषयी भरपूर लिहिले गेले, पण त्या अभ्यासाच्या क्रमात फाळणीचा विषय नसायचा. बहुतेकदा ‘फाळणीच्या आठवणीही नकोत’अशीच त्यामागची भावना असे. स्वाभाविकच फाळणीचा सर्व अंगांनी नीट अभ्यास झाला नाही, त्यामुळे स्वातंत्र्यलढ्याचा इतिहासही अपुरा राहिला. किंबहुना स्वातंत्र्यलढ्याविषयी गैरसमजावर आधारित मिथकेही रूढ झाली. स्वातंत्र्यानंतर तब्बल साठ वर्षांनी या फाळणीचा अभ्यास आपल्यासमोर येतो आहे; त्यातून काही गैरसमज दूर व्हायला आणि दृष्टी निवळायला मदत होईल, असे वाटते.

स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील फाळणीचा कालखंड हा सर्वाधिक वादळी होता. पारतंत्र्यातून मुक्त होऊ पाहणाऱ्या भूमीसाठी तो निर्णायकही होता. या देशाची फाळणी ही एका रात्रीत घडलेली नैसर्गिक घटना नव्हती. त्यामागे अनेक घडामोडी घडत होत्या, त्यातून राजकीय धोरणे आकाराला येत होती. ब्रिटिश, काँग्रेस व मुस्लिम लीग या तीनही पक्षांची याबाबतची धोरणे काय होती आणि त्याचे परिणाम काय झाले हे पाहणे आवश्यक होते. या प्रत्येकाने फाळणीची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याची खबरदारी घेतलेली दिसते. त्यावेळच्या राजकीय चर्चा प्रक्रियेतून या घटनेचा समग्र आढावा घेणे, त्याचा अन्वयार्थ लावणे ही अवघड कामगिरी होती. हा कालखंड म्हटला तर अवघ्या अठरा महिन्यांचा; पण त्याच कालखंडात पूर्वी कधीही नव्हती एवढी गुंतागुंत निर्माण झाली होती. त्यातील प्रत्येक धागा सोडवून कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय निरखणे हे सोपे काम नव्हते. पण श्री. गोडबोले यांनी ते पार पाडले आहे.

असंख्य सरकारी फायली, अहवाल, त्यातील टिपणे यांचा अभ्यास त्यांनी केला आहे. फाळणीशी संबंधित नेत्यांच्या चरित्रातून त्या अठरा महिन्यांचा अभ्यास करून त्यावेळची त्यांची मानसिकता, फाळणीच्या निर्णयापर्यंत पोहोचणारी त्यांची विचारप्रक्रिया यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्नही श्री. गोडबोले यांनी केला आहे.

कोणत्याही चिकित्सेशिवाय आपण काहीजणांकडे फाळणीचे गुन्हेगार म्हणून बोट दाखवत होतो. या पुस्तकाच्यावाचनानंतर आपले दृष्टिकोन, मते तपासून घ्यावी लागते त्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत विशिष्ट कोणी एकच गुन्हेगार असू शकत नाही हे पटेल. त्याच वेळी तो निर्णय घेण्यामागे काय विचार होते हेही समजून येईल. त्या दृष्टीने हे पुस्तक मोलाचे आहे.

माझ्या पिढीला फाळणीचा अनुभव नाही; वाचल्या आहेत फक्त थरकाप उडवणाऱ्या कहाण्या. त्यावेळी लक्षावधी निरपराध जीव बळी गेल्याच्या वेदना जरूर होतात. पण फाळणी या घटनेत मानसिक गुंतवणूक होत नाही. त्यामुळे काहीशा अलिप्तपणे आम्ही त्याकडे पाहू शकतो. भारताचा इतिहास व हिंदू- मुस्लिम संबंध लक्षात घेता फाळणी झाली हे योग्यच झाले असे वाटते. एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे सगळ्याच मुस्लिमांना एका पारड्यात टाकता येणार नाही. त्यांच्यामध्येही वांशिक व जातीय भेद आहेत. सुफी संतांच्या शिकवणुकीचाही खोलवर परिणाम आहेत. हे ध्यानात घेऊनही फाळणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे लागते. महाराष्ट्राचाच विचार केला तर इतक्या वर्षांनीही भिवंडी व मालेगाव येथील मुस्लिम या समाजात नीट मिसळू शकलेले नाहीत हे मान्य करावे लागते. आणि त्यामागचे कारण वांशिक भेदात शोधावे लागते. याच कारणामुळे, पाकिस्तानचे वेगळे होणे हे भारताच्या आताच्या प्रगतीसाठी, येथील शांतीसाठी, स्थैर्यासाठी लाभदायक ठरलेले दिसेल.याच कारणासाठी, अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पाहणे ही स्वतःचीच फसवणूक ठरेल, फाळणीच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या प्रश्नांकडे पाहण्याच्या उजव्या व डाव्यांच्याही दृष्टिकोनातील पूर्वग्रह, गैरसमज या पुस्तकाच्या वाचनानंतर दूर होतील, अशी अपेक्षा आहे.

श्री. गोडबोले यांच्या पत्नी सुजाता गोडबोले यांनी या पुस्तकाचा अनुवादही प्रवाही केला आहे. हा अनुवाद सोपा नव्हता. मूळ घटनाच गुंतागुंतीची असल्याने त्याचे प्रतिबिंब ग्रंथलेखनात पडलेले होते. घटनांची, पत्रव्यवहारांची, भाषेची अशी सर्वच प्रकारातील गुंतागुंत जपतही वाट सोपी करत जाण्याचे कौशल्य अनुवादिकेला दाखवावे लागले आहे. काही किचकट तपशीलांमुळे हा इतिहास रटाळ होण्याचा धोका होता; पण त्यातील वाचनीयता अनुवादिकेने जपली आहे.

सुबोध सावेल गाणे 

‘माझ्या जगण्याच्या प्रक्रियेचा मूळ अजेंडा काय होता?’या स्वतःलाच पडलेल्या प्रश्नाचा शोध संजय कृष्णाजी पाटील आपल्या ‘लेझीम खेळणारी पोरं’ या काव्यसंग्रहात घेताना दिसतात. खेड्यातील मुळं मातीतल्या ओलाव्यासह टिकवून धरत हा कवी महानगरात वाढतो आहे. त्यामुळे येणारे आंतरिक व बाह्य ताण पेलण्याचा यत्न करतो आहे. ते ताण फारच ताणले गेले की कवी कवितेच्या आधाराला जाताना दिसतो आहे.

या कवितेचं प्रथमदर्शनी लक्षात येणारं वैशिष्ट्य म्हणजे कवीला असलेलेजागितक भान. चित्रे कोलटकर सारंग यांच्या कविता प्रतिमांच्या अंगाने जग व्यक्त होत होते. तर येथे सर्वसामान्य भारतीय माणसाच्या जगण्याच्या दैनंदिन व्यवहारात जागतिकीकरणामुळे पडणाऱ्या थेट प्रतिबिंबामुळे नवे जागतिक भान व्यक्त होते. त्यामुळे केवळ सांस्कृतिक प्रतिमा नव्हे, तर जागतिक- राजकीय- सामाजिक घडामोडींचे आर्त या कवितेत प्रकटलेले दिसते. जागतिक दृष्टिकोनातूनच समाजाच्या वर्तमानाचे तो छेद घेतो. त्यातून समाजजीवनाचे जे दाहक वास्तव समोर येते, त्याने तो अंतर्मुख होतो. मग ‘मुंबई’ला विचारतो- ‘खरेच या पहाटेनंतर तुला उठायचे मिळेल बळ?’या महानगरातील जीवनसंघर्षाला अत्यंत तीव्रतेने भिडत ‘शांत स्वस्थ झोपलेल्या मुंबईस उद्देशून’ ही कविता तो लिहितो. [ही तीव्रता या कवितेच्या पहिल्या भागात दिसते.नंतरच्या दोन भागांत ओसरलेल्या लाटेसारखे पसरलेल्या मुंबईची जाणीव करून देणारे केवळ तपशील येतात.त्यांचे काव्यात्म विधान बनत नाही.] 

कवी प्रशासकीय सेवेत आहे. त्यामुळे वेचक प्रशासकीय शब्दांतून सामाजिक भाष्य धारदार बनते. ‘जन्मतृष्णगळा’, ‘सूर्यवाटा’असे वेगळे शब्द कवी योजतो. कधी आकाशवाणीवरील बातमीपत्राचा, तर कधी लोकगीताचा आकृतिबंध वापरत कवी आपले सामाजिक भाष्य तीव्रतेने अभिव्यक्त करतो. ‘जगन ऊठ, कमल ऊठ’हा पाठ्यपुस्तकातील धडा येथे सामाजिक उपहास करतो. मात्र ही सामाजिक उपहासाची ताकद राजकीय भाष्यात येत नाही. किंबहुना राजकारणाच्या अंगाने जायचे टाळल्याने ती तेवढीशी मर्मभेदी होत नाही. सरळसोट अर्थांच्या ओळी कवी मांडून ठेवतो. कविता दिसणाऱ्या शब्दांहून अधिक काहीतरी सुचवणारीहवी हे येथे घडत नाही. साहजिकच धारदार राजकीय कविता बनण्याची क्षमता ती गमावून बसली आहे. ‘लेझीम खेळणारी पोरं’ही कविता त्यातील लय, माणुसकीची गोष्ट, गावाच्या ऐक्याची कहाणी यांसाठी लक्षात राहील. संग्रहातील अन्य कवितांमधून कवीला जे अभिप्रेत आहे तेच या कवितेत खूप सहजसुंदर व्यक्त होते.

नाटकी नसलेली नाटके 

मनस्विनी लता रवींद्र या तरुण लेखिकेची ‘सिगारेट्स’आणि ‘अल्विदा’ही नाटके वाचताना खूप मजा आली.येथे ‘मजा’हा शब्द त्या कलाकृतींच्या कलात्मकतेच्या आकलनाने होणारा आनंद या अर्थाने वापरत आहे; या कलाकृतींचा भावनिक परिणाम आनंद देणारा नक्कीच नाही; उलट तो अनेक ताण निर्माण करणारा आहे. पण हे ताण निर्माण करण्याची क्षमता हेच या दोन्ही नाटकांचे यश आहे, असे मला वाटते.

या लेखिकेबद्दल आणि दोन्ही नाटकांच्या प्रयोगांबद्दल कुणाकुणाकडून ऐकले होते; पण प्रयोग पाहता आले नव्हते. मात्र या संहितांमधून दिसणारे नाटकही तितकाच आनंद देऊन जाते. या नाटकांमध्ये आहे तरी काय? -  तरुणपिढीचे लैंगिक समस्यांसह, समाजातील मूल्यव्यवस्थेने मनात निर्माण केलेल्या प्रश्नांसह, दैनंदिन जगण्याला सामोरे जाणे येथे चित्रित केले आहे. हे या तरुणांचे जगणेच आपण वाचत/ पाहात जातो.

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांनी प्रस्तावनेत, नाटकाला हवे ते नाट्यनसतानाही आपण नाटकात हरवलो होतो, हे मोठ्या कौतुकाने कबूल केले आहे. कुठेही नाटक नसल्यानेच या नाटकांमधील पात्रांचे जगणे आपल्याला भावते. गुंता निर्माण करणे आणि नेहमीच्या चाकोरीत तो सोडविण्याचा खेळ खेळणे, त्याचा क्लायमॅक्स साधणे, त्या आधी काही नाट्यमय घडणे यांपैकी काहीच या नाटकांमध्ये घडत नाही.समोरे येतो तो तरुणांच्या जगण्याचा अनुभव. हा जगण्याचा अनुभवच नाट्यानुभव बनतो. त्यामुळेच दोन्ही नाटके ताजी टवटवीत वाटतात. ही नाटके वाचताना ‘मजा आली’असे जे सुरुवातीला लिहिले आहे ते यामुळेच.‘परंपरेपासून साफ वेगळे असलेले शंभर टक्के नाटक’असे नेमके वर्णन तेंडुलकरांनी केले आहे.

आपल्या समकालिनांचे भावजीवन फार समंजसपणे, धीटपणे, प्रामाणिकपणे, कोणत्याही आविर्भावाशिवाय, कोणताही अभिनिवेष न बाळगता, अत्यंत आत्मविश्वासाने लेखिकेने उलगडून दाखवले आहे. आपण फक्त त्या जीवनाला विनासंकोच सामोरे जायला हवे.

रंजक कादंबरी 

श्रीकांत बोजेवार यांची ‘पावणेदोन पायांचा माणूस’ही कादंबरी ‘साधना’च्या वाचकांना नवीन नाही. ‘साधना’च्या 2005च्या दिवाळी अंकात ती पहिल्यांदा प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी खरे तर, मला ती कादंबरी अजिबात आवडली नव्हती.ती त्यावेळी का आवडली नसेल, याचा मी आता विचार केला तेव्हा दोन शक्यतासमोर आल्या. खरे तर ती दोन्ही बाह्य कारणे आहेत. पण त्यांचाच मनावर अधिक परिणाम झाला असावा, असे आता वाटते.

त्यातील पहिले कारण –‘साधना’ दिवाळी अंकाच्या संपादकीयात ‘तंबी दुराई स्टाईल’ ने लिहिलेली ही कादंबरी असल्याचा उल्लेख होता.

‘लोकसत्ता’मधील ‘दोन फूल एक हाफ’या तंबी दुराई यांच्या सदरामध्ये सामाजिक-राजकीय परिस्थितीवर विनोदात्म शैलीने केलेले ‘भाष्य’असते.पत्रकाराने दिलेला एक मस्त टोला असतो. केवळ फिरकी असे त्या लेखनाचे स्वरूप [काही अपवाद वगळता नसते. ही ‘तंबी दुराई स्टाईल’मी कादंबरीत नकळत शोधायला लागलो होतो.सामाजिक-राजकीय परिस्थितीतील हास्योत्पादक गोष्टींचे खेळकर वृत्तीने केलेले ‘चिंतन’मी त्यावेळी कादंबरीत शोधत होतो. ते न सापडल्याने मला त्यावेळी कादंबरी आवडली नसावी.

दुसरे कारण - त्यावेळी कादंबरीच्या सजावटीसाठी वापरलेल्या चित्रांनी माझी दिशाभूल केली होती.

साहित्यकृतीसोबतची चित्रे केवळ त्या पानांच्या ले-आऊटसाठी नसतात; ती त्या साहित्यकृतीचा भर कशावर आहे, तिची दिशा काय आहे, हेही सांगत असतात.त्यावेळी वापरलेली बहुतांश चित्रे शृंगारसूचक होती. त्यामुळे, ग्रामीण विनोदाचा मुलामा असलेल्या भानगडकथांहून ही कादंबरी वेगळी नसेल, असा एक पूर्वग्रह मनात तयार झाला होता.

आता दोन वर्षांनी ही दोन्ही कारणे मनात उरली नव्हती, त्यामुळे पुस्तकरूपात आलेल्या या कादंबरीने माझे चांगले रंजन केले. सत्तेच्या अंगणात वाढणाऱ्या दलालांचे, त्यांच्या चातुर्याचे चित्रण किती विनोदात्म ठरू शकते, याचा ही कादंबरी एक उत्तम नमुना आहे. शंकर पाटील यांच्या प्रारंभाच्या काही कथांमधून विनोदरूपाचा कथात्म आविष्कार दिसला होता, त्याची चांगल्या अर्थाने आठवण ही कादंबरी करून देते.

चिं.वि. जोशी हे मानवी नात्यांतील गुंतागुंत, त्यांच्यातील चांगुलपणा किंवा क्षुद्र हेवेदावे, त्यांची सामाजिक- सांस्कृतिक पार्श्वभूमी याची मांडणी विरोध-विसंगतीच्या विनोदनिर्मितीच्या आधारे करीत. हा गुण बोजेवारांच्या या लेखनात दिसतो. या लेखनात चार-पाच ठिकाणी शृंगारसूचन (शृंगारीक वर्णन नव्हे) आहे; पण शृंगार व विनोद यांची जुळणी रंजकतेसाठी करण्याचा काही लेखकांचा प्रयत्न असतो, तो इथे नाही. इथे कथेला वळण देणारी ‘की’ म्हणून शृंगार येतो.

सुखात्म अनुभव देण्याचे सामर्थ्य या लेखनात आहे, कलाकृतीचा एकूण भावनिक परिणाम आनंदरूप होतो. मात्र तरीही, बोजेवारांनी आपल्यातील पत्रकाराला वाव देऊन मर्मभेदी लेखन करण्याची एक संधीही गमावली हे मनात आल्यावाचून राहात नाही.

राष्ट्रध्वजाचा इतिहास 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘तिरंगा ध्वज’आणि ‘वंदे मातरम्’या शब्दांना अनन्य मोल आहे. एखाद्या अस्राचे काम या दोन गोष्टींनी केले. देशाच्या गौरवाच्या क्षणी राष्ट्रध्वज फडकत राहिला. प्रत्येक भारतीयाला केवळ राष्ट्राचा ध्वज म्हणून अभिमान नाही, तर त्या ध्वजामागे असलेल्या इतिहासाचा अभिमान असतो. या ध्वजाचा इतिहास,पंरपरा व सांस्कृतिक स्थान मिलिंद प्रभाकर सबनीस यांनी ‘राष्ट्रध्वज :प्राचीन ते अर्वाचीन’या पुस्तकात विस्ताराने मांडले आहे.

केवळ राष्ट्रध्वजाविषयीच नाही, तर भारतीयांनी प्राचीन काळापासून आतापर्यंत वापरलेल्या ध्वजांच्या माहितीचे हे संकलन आहे. पहिल्यांदा ध्वज कधी वापरला गेला या निर्णयापर्यंत सबनीस येऊ शकले नाहीत, मात्र ते जास्तीत जास्त मागे जाण्याचा प्रयत्न करतात. ध्वजसंकल्पनेचे मूळ आदिमानवाच्या जीवनपद्धतीतच असल्याचे दाखवून देतात. वेदवाङ्मयात, रामायण-महाभारतात असणारे ध्वजांचे संदर्भ देतात. प्राचीन भारतातील काही वीर, त्यांच्या ध्वजांची नावे व त्यांची वैशिष्ट्ये सांगतात.

गुढी पाडव्याला उभारल्या जाणाऱ्या गुढीपासून ते सध्याच्या राष्ट्रध्वजापर्यंत ‘ध्वज’ही संकल्पना कशी विकसित झाली हे या पुस्तकातून समजून घेता येते. मादाम कामा यांनी स्टुटगार्टमध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय स्वातंत्र्याची मागणी करीत फडकवलेला ध्वज, हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिला ध्वज होय. ‘वन्दे मातरंम’असे शब्द लिहिलेला हा ध्वज आता पुण्यात लोकमान्य टिळक वस्तुसंग्रहालय पाहायला मिळतो. राष्ट्रध्वजाचा आकार, रंग ठरवताना काय चर्चा झाली, त्यासाठी लागणारे कापड कुठे तयार होते.राष्ट्रध्वज कुठे बनवला जातो, तो कोण उपलब्ध करून देते यांसारखी माहिती व पूर्ण ध्वजसंहिता या निमित्ताने मराठीत संकलित झाली आहे.

स्पर्धा परीक्षेसाठी सज्जता 

फारुक नाईकवाडे यांचे ‘स्टील फ्रेम’हे पुस्तक स्पर्धा परीक्षेला बसू इच्छिणाऱ्यांना प्रेरणा-प्रोत्साहन देणारे आहे. एरव्ही स्पर्धा परीक्षेची पुस्तके म्हणजे ‘अपेक्षित प्रश्नसंच’ असेच स्वरूप असते. हे पुस्तक मात्र स्पर्धा परीक्षेला सज्ज करणारी मानसिकता घडवणारे आहे.

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून प्रशासकीय सेवेत महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या काही मित्रांची ही व्यक्तिचित्रे आहेत. पण ही केवळ मित्रांची व्यक्तिचित्रे उरत नाहीत, ती पोलादी चौकटीतील अधिकारी यांची व्यक्तिचित्रे बनतात.श्री. नाईकवाडे यांचे हे सगळेच मित्र सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले व घरात प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची परंपरा नसलेले, मराठी माध्यमात शिकलेले आहेत. पण या माणसांमधूनच या देशाला दिशा देणारे प्रशासक निर्माण झाले आहेत. त्यामागची त्यांची स्वयंशिस्त, जीवनसंघर्ष व त्यासाठी लागणारी अफाट जिद्द यांचे दर्शन या पुस्तकात होते. त्यांच्यातील ‘माणसा’चेही दर्शन लेखकाने घडवलेले आहे.

यातील प्रत्येकाचे यश मिळवण्यामागचे रहस्य उलगडले आहे. या परीक्षांसाठी अभ्यास कसा करावा, त्यांची पद्धती कशी असावी, परीक्षेतील अपेक्षित प्रश्नांचा विचार कसा करावा, इतरांपेक्षा चांगले उत्तर लिहिण्यासाठी पूर्वतयारी कशी हवी, मुलाखतीची तयारी कशी करावी लागते यांविषयी योग्य मार्गदर्शन करणारे याहून चांगले दुसरे पुस्तक नसावे.

स्पर्धा परीक्षा म्हटली, की प्रशासकीय सेवा व पोलिस सेवा एवढेच सामान्यतः माहीत असते. याखेरीजही असलेल्या अन्य सेवांविषयी, त्यातील कामाविषयी इत्यंभूत माहिती येथे मिळते. नागरी सेवेत मराठी माणूस कमी आहे. जिद्द, चिकाटी, परिश्रम, शिस्त, नियोजन या गुणांच्या आधारे ही टक्केवारी वाढवणे मराठी माणसाच्या हाती आहे. पण याखेरीजही असलेल्या कारणांची मीमांसा, मराठी पालकांची मानसिकता याची चर्चा या पुस्तकात निमित्तानिमित्ताने फार चांगल्या तऱ्हेने करण्यात आली आहे. प्रभावी ललित शैलीत वाचकांना खिळवून ठेवण्याची किमया श्री. नाईकवाडे यांनी येथे साध्य केली आहे.

Tags: स्टील फ्रेम राष्ट्रध्वज पावणेदोन पायांचा माणूस सिगारेट्स अलविदा लेझीम खेळणारी पोरं फाळणीचे हत्याकांड weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके